डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ज्ञानेश्वर समाधीचे लौकिक दर्शन

निरांजनावर कधी फुंकर घालून ते विझवायचे नसते. त्याच्या ज्योतीवर हलकेच एक फूल टेकवून ते मालवायचे असते. संतपुरुष जेव्हा, आपले जीवितकार्य संपले आहे, आता वृथा देह शिणवण्यात अर्थ नाही या भावनेने आपल्या कृतार्थ जीवनाला शांतपणे आणि आनंदाने पूर्णविराम देतात, तेव्हा ते आपली प्राणज्योत अशीच हळुवारपणे मिटवतात. हे वर्ष संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षे झाल्याचे स्मरण जागे करणारे आहे. त्या समाधीची स्मृती एकीकडे आपणां सर्वांची मने विव्हळ करत असते तर त्याबरोबरच त्या महापुरुषाच्या अभिमानाने आपली अंतःकरणे थरारूनही सोडते. या शतकातील थोर मराठी साहित्यिक आणि देशीकार लेण्यांचे समर्थ शिल्पकार श्री. म. माटे यांनी ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या प्रसंगाचे जे हृदयस्पर्शी चित्र रेखाटलेले आहे, त्याला तोड नाही. साहित्यमंजरी या त्यांच्या लेखसंग्रहातील 'ज्ञानेश्वर- समाधीचे लौकिक दर्शन या लेखाचा थोडासा संक्षेप करून या अंकात तो आवर्जून पुनःप्रकाशित करीत आहोत.

पंढरीच्या वाळवंटात ज्ञाना आणि नामा सुखसंवाद करीत बसले होते. साक्षीला फक्त चंद्रभागा होती. त्यांचा संवाद म्हणावयाचा पण ते गप्प बसूनच एकमेकांकडे पाहत होते. नामा बोलला असता, पण ज्ञानेश्वर केवळ स्मित करून त्याच्याकडे पाहत होता. बराच वेळ गेल्यावर नामा म्हणाला, 'तुझे ठरले का?' ज्ञानेश्वराने उत्तर केले. 'माझे केव्हाच ठरले आहे! मला आता काही उरले नाही, नामा! जन्माला आलो त्याचे सार्थक झाले आहे. साऱ्या विश्वाचे आर्त माझ्या मनात प्रगट झाले आहे. माझ्या दोन बाहूंनी मी आकाश कवळिले आहे, असे मला वाटते! मी आता जातो.' नामा स्तंभितच झाला. 

तो म्हणाला, 'ज्ञानेश्वरा! तू गेलास म्हणजे मला पोरके झाल्यासारखे वाटू लागेल. मी वयाने तुझ्याहून थोडा मोठा आहे. पण तू माझा गुरू आहेस : तू गेलास म्हणजे मी कोणाकडे पाहू? मला या बिकट वाटेवर हाताला धरून कोण चालवील? मला सगळे वडील समजू लागतील. मला ते ओझे उचलायचे नाही. तुझ्या ज्ञानवाटिकेत माझा प्रवेश नुकताच झालेला आहे. तू मात्र तेथला शाश्वताचा रहिवासी आहेस. पण तू जर जातो म्हणतोस, तर आता आपले संतमंडळ मोडेल!' 

ज्ञानेश्वर उद्गारला. 'संतमंडळ मोडणार नाही. तू आहेस नामा तुझे सामर्थ्य तुलाच अजून कळले नाही.तू संतांचा शिरोमणी आहेस, भक्तांचा अग्रणी आहेस. अरे! मीच तुझ्याकडून कितीतरी गोष्टी शिकलो. शिवाय माझा निवृत्तिनाथ आहे ना! तो तर गुरूंचा गुरू आहे. त्याने माझ्या मुखातून ज्ञानदेवी वदविली, त्याचा हात तुम्हां सर्वांच्या मस्तकावर राहील.' नामदेव काही वेळ घुम्मच बसला. मग चंद्रभागेच्या पाण्यात बारीक बारीक खडे टाकीत तो म्हणाला, 'ज्ञानेश्वरा ! तुझ्यामागे तुझी ही भावंडे फार दिवस राहतील असे तुला वाटते? अरे, तू आहेस म्हणून ही आहेत. तू नाहीस असे झाले की, ती तुझ्याच वाटेने चालू लागतील. 

संतमंडळ मोडले म्हणून समज.' ज्ञानेश्वराने उसासा टाकला आणि नामदेवाच्या खांद्याला हात लावून तो म्हणाला, 'माझी भावंडे कदाचित जातीलही. पण तू आहेस तोपर्यंत संतमंडळ मोडत नाही. माझे मात्र आता संपले आहे. रात्रीपुरता धर्मशाळेत उतरलेला पाहुणा सकाळी उठून चालू लागतो तशी माझी गत झाली आहे. या जगताच्या अंगणात इतर पक्ष्यांच्या बरोबर मी थोडे दिवस दाणे टिपले. पण आता मला माझ्या आकाशात गेलेच पाहिजे. हे लोक माझे कोणी आहेत असे मला वाटतच नाही. माझ्या मनात उपेक्षा नाही रे नाही; खचित नाही. पण माझे मनोधर्म बदलले आहेत त्याला मी काय करू? तत्त्वज्ञानापासून निराळे राहता येते हे मला खरे वाटत नाही. 

या जगात रहावे असे आम्हांला काही तरी लाभले होते का? आम्ही भिकेवरच जगलो आणि निद्रेवरच पोसलो-' नामा सद्गदित होऊन उद्गारला, 'माझ्या सख्या, तू ती आठवण काढू नकोस ; मला त्याने फार क्लेश होतात.' ज्ञानेश्वर म्हणाला, 'माझा जगावर राग नाही. येथे चिकटावयाचे कारण आम्हांला लहानपणापासूनच नव्हते; पण दुबळी मानव-कुड़ी चिकटली. तथापि नामा, त्याचाच उपयोग झाला. ज्ञान प्राप्त झाले : गुरूपदेश झाला : अध्ययन झाले : बुद्धीचा पोष झाला; चार अक्षरे लिहून झाली. तुझ्यासारख्यांची मैत्री झाली. भक्ती म्हणजे काय हे तू मला शिकविलेस ; मला पूर्णता आली. याच्या पलीकडचे आणखी काय उमगणार? मला जावेसे वाटू लागले आहे.'

नामा जास्तच उदास दिसू लागला. पुढे प्राप्त होणारे एकाकीपण त्याला आतापासूनच जाचू लागले. निरुत्साह होऊन तो ज्ञानेश्वराकडे पाहत बसला ; जणू काही पुढे याचे मुख पाहावयास सापडणार नाही तर ते आताच मनात साठवून ठेवावे असे त्याला वाटत होते! "मग तू इथे पंढरीतच शाश्वताचा राहशील का?" नामदेवाने विचारले, ज्ञानेश्वर म्हणाला, “नाही : मी इथे राहणार नाही. माझ्या राहण्याने विठ्ठलाचा अवमान होईल. 

मी माझ्या आजोळच्या गावी जातो. तूही चल. माझी भावंडे तेथेच आहेत. मुक्ताई माझी वाट पाहत असेल.” नामदेव पराकाष्ठेच्या सद्बुद्धीने हसला आणि त्याच्या नेत्रांत पाणी आले. ज्ञानेश्वर म्हणाला, “नामा! आता तू मात्र एक कर, की तू माझ्याबरोबर शेवटपर्यंत ऐस. तुझी माझी ताटातूट आता होऊ नये, मी आपल्या पायांनीच जात आहे पण तू मला चालीव व तू मला निरोप दे! आणि मी गेलो म्हणजे माझ्या भावंडांना तू धीर दे.” ज्ञानेश्वराचा मित्रभाव ध्यानात घेऊन नामदेव आपल्या मुलांना बरोबर घेऊन आळंदीस जावयास निघाला.

ज्ञानेश्वर केव्हा परत येईल याची कल्पना निवृत्तिनाथाला आली होती. नामदेवाची संगती त्याने का धरली आहे व ते दोघे यात्रेला का गेले आहेत याचे मर्म त्याच्या ध्यानात येऊन चुकले होते. तिकडून परत आल्यावर ज्ञानेश्वर फार दिवस इहलोकी राहणार नाही, अशी शंका निवृत्तीला आलेली होतीच. ज्ञानेश्वर हा परमार्थमार्गाचे आक्रमण झपाझप करीत आहे, तर शेवटच्या मंदिरात पोचावयास त्याला आता अवकाश लागणार नाही हे त्याने ओळखले होते. 

या काळात तो स्वतः नावालाच आळंदीस राहिला होता. कधी इंद्रायणीचे वाळवंट, कधी लोहगिरीच्या गुहा. कधी इंद्राचा डोंगर, असे त्याचे चाललेले असे. ज्ञानेश्वराच्या शाश्वत वसतीला हे इंद्रायणीचे तीरच योग्य आहे असे त्याने आपल्या मनाशी ठरविले. 'अलंकापुरी’ हे पुरातन शिवपीठ आहे. येथे पूर्वी ब्रह्मादिकांनी मोठे तप केले आहे : इंद्राने खाली येऊन या भूमीवर यज्ञयाग केले आहेत. येथे त्रिवेणी गुप्तरूपाने वसत असते, याच्या आसमंतात वृक्षवल्लीची दाट राई आहे व प्रत्यक्ष देव पक्ष्यांची रूपे घेऊन या राईत कूजन करीत असतात. 

या ठिकाणी जर कोणी समाधीस बसला तर इंद्र त्याला सामोरा येईल.' असे शिवागम-ग्रंथात लिहिलेले निवृत्तीला ठाऊक होते. याच पवित्र स्थळी ज्ञानेश्वराने वास करावा हे त्याला बरे वाटले. निवृत्तीनेच त्याला या मार्गावर आणून सोडले होते; पण गुरूलाही आनंद वाटावा व आश्चर्य वाटावे इतकी झपाझप पावले ज्ञानेश्वराने टाकली होती. आणि नामदेवाशी भक्तिमार्गाचे हितगूज हा त्याचा शेवटचा टप्पा आहे हे निवृत्तीने ओळखले होते.

0000

पहाटेचा सुमार होता. इतक्यात नदीच्या वाळवंटात गडबड आहेसे वाटू लागले. 'पुंडलिक-वरदा हरिविठ्ठला' चा गजर चालू झाला. भजनी मंडळी भराभर नदीकडे धावली. 'ज्ञानेश्वर आले, ज्ञानेश्वर आले.' असा गलका सुरू झाला. घरोघरीची माणसे धावत आली. 'अहो, नामदेवही आले आहेत! नामदेवही आले आहेत!' असे काहीजण एकमेकांना सांगू लागले. यात्रा संपवून संतमंडळी परत आलेली होती, या वेळेपर्यंत ज्ञानेश्वराचे संतपण सर्वमान्य झालेले होते. ज्ञानेश्वराची प्रवचने आणि नामदेवाची कीर्तने ऐकून लोक मोहित झाले होते. शिवाय ज्ञानेश्वरासारखा सत्पुरुष आपल्या गावचा : यामुळे लोकांत एक आपुलकी होती. 

'संन्याशाची पोरे' ही कुचकूच चालूच असे आणि नातेवाईकांतील काही जवळचे लोक यांना जवळ करावयास अजूनही कबूल नव्हते; पण त्यांना देवाने जवळ केले होते. तत्त्वज्ञानाने जवळ केले होते, लोकप्रेमाने जवळ केले होते. हसतमुखाने ज्ञानेश्वराने सर्वांना नमस्कार केला. लोकांनी कुशल विचारले, त्याने खुशाल असल्याचे सांगितले. पुढे जावे, सस्मित नमस्कार करावा असे चालले होते.

इतक्यात मागून कोणीतरी अंगावरच्या पंचाचे टोक ओढल्यासारखे त्याला वाटले, त्याने मागे पाहिले तो ती लडिवाळ मुक्ताबाई होती. तिच्या शेजारी सोपाना होता. त्यांना पाहताच ज्ञानेश्वराच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना ज्ञानेश्वराने जवळ घेतले आणि निवृत्तिदादा कुठे आहे म्हणून विचारले. मुक्ताबाई म्हणाली, “तो भेटतच नाही. तू गेल्यापासून तो असाच करतो.'' “बर, बरं”' म्हणून ज्ञानेश्वर हसला आणि भोवती जमा होत असलेल्या लोकांकडे तो वळला. विठ्ठलाचा जयजयकार अखंड चालू होता. मुक्ताई आणि सोपाना यांच्याकडे काही माणसे केविलवाण्या दृष्टीने पाहत आणि निवृत्ती कुठे दिसेल म्हणून इकडे तिकडे पाहत होती.

काही अंतर गेल्यावर मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणाली, 'दादा! घरी चल की!' 'मुक्ते, हे सारे आपले घरच आहे' 'पण आजी वाट पाहत असेल. तू गेल्यापासून ती अगदी थकली आहे!' 'बरं चल ; आपण जाऊ.' असे म्हणून ज्ञानेश्वर गावच्या डगरीकडे वळला. समाज तिकडे गोळा होऊ लागला. पण 'मागे व्हा, मागे व्हा,' असे काही लोक ओरडू लागले. त्यांच्यामधून एक वृद्ध संन्यासिनी स्त्री पुढे येऊ लागली. ती तांबडे लुगडे नेसली होती. ती याही वयात कांतिमान दिसत होती. तिच्या उजव्या हातात तुळशीची माळ होती आणि डाव्या हातात काठी होती. 

ती मधूनमधून उजव्या डाव्या बाजूच्या लोकांकडे रोखाने पाही. ते म्हणत, 'व्हा पुढे बाई !' ज्ञानेश्वराने ती करुण वृद्ध मूर्ती पाहिली आणि रोमांचित होऊन तो भराभर पुढे गेला. त्या वृद्धेपुढे त्याने दंडवत घातले. सोपान व मुक्त यांनीही घातले. आजीचा चेहरा गहिवराने रुदन करू लागला. तिने त्या नातवंडाला जवळ घेतले आणि ती म्हणाली. 'तू आपल्या आईसारखा दिसतोस ज्ञाना!' आईचे नाव निघताच तो विरक्त सत्पुरुष पंचाच्या पदराने डोळे पुसू लागला. वैराग्य आणि मानवता यांचा तो मधुर संगम पाहून भोवतालचे लोक स्फुदु लागले. कारण त्यांना जुन्या आठवणी होत्या. 

ती माऊली असती तर बरे झाले असते असे ते एकमेकांना म्हणाले. ज्ञानेश्वर सावरला आणि म्हणाला, 'आजी! इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेल गेला गगनावरी। होय ना !' "होय रे नाथा ! तू माझा गुरू आहेस! तू विठ्ठलरूप आहेस. मी तुझ्या पायावर-” इतके बोलून ती वृद्ध स्त्री वाकू लागली. ज्ञानेश्वराने तिला उचलून धरले. सगळा समाज करुणरसाने नाहून निघाला. ज्ञानेश्वर आजीला म्हणाला, 'आजी, आता हे सारे संपवावे असे मला वाटते.' 'तू म्हणतोस तरी काय, ज्ञाना ! असले काही बोलू नकोस!' आजी कष्टी होऊन म्हणाली.

0000

ज्ञानेश्वराच्या मनात काहीतरी अघटित करावयाचे आहे ही वार्ता हळूहळू पसरू लागली. काय ते मात्र कोणास सांगता येत नव्हते; पण तो काहीतरी अद्भुत करणार हे अनुमान सर्वांनी केले. निवृत्ती लोहगिरीच्या गुहेत जाऊन बसला होता. आळंदीस नदीच्या काठी काहीतरी घोष चालू आहे आणि काही नवे घडत आहे हे त्याने पाहिले किंवा ओळखले आणि तो त्वरेने परत आला. उभयता बंधूंचे आलिंगन रामाला आणि भरताला शोभले असते. 

मग नामदेवाने आपल्या मंडळातील सर्वांना आमंत्रणे धाडली आणि तेही आले. संतांचा मेळा पुरता जमला. ज्ञानेश्वराचे वैराग्य अधिकाधिकच प्रस्फुट होऊ लागले. तो त्यांच्या मेळात विश्वाच्या वार्ता बोलू लागला. त्याला बाहेरची ओढ लागली आहे, हे स्वच्छ दिसू लागले. समुद्रात पसरलेले जाळे कोळी परत ओढू लागतो. तसे भोवतालच्या व्यवहारात शिरलेले आपले मन ज्ञानेश्वर जलदीने परत घेत आहे, हे सर्वांच्याच ध्यानात येऊन चुकले. 

मात्र सोपाना आणि मुक्ताई यांच्यावरची ज्ञानेश्वराची ममतेची पाखर शेवटपर्यंत टिकून राहिली. मग तो प्रतिपादनाला आणि भजनालाही नाही म्हणू लागला. कारण त्याची तंद्री दुसरीकडे लागत होती. त्याच्या मनात प्रेमरसाच्या धारा अखंड वाहू लागल्या होत्या. पृथ्वीच्या अडणीवर आकाशाचे ताट ठेवले असून त्यात वाढलेला अमृतरस आपण भुरकीत आहो, असे त्याला वाटू लागले. आपण माया विवर्जित झालो आहोत. सारे गोत मागे राहिले आहे, असा हुंकार त्याला येऊ लागला. अद्वैताचा मेळ बसला आहे, द्वैत याने गिळून टाकले आहे आणि चित्ताची काजळी झडल्याचा आनंद हा अनुभवीत आहे असे त्याच्याकडे पाहणाऱ्याला सहज कळले असते. 

तो मध्येच एकादेवेळी पुटपुटे की, अनुपम तेजाने ब्रह्मांड ढवळले आहे. ' पुन्हा केव्हातरी तो म्हणे. “अरुणोदय झाला म्हणजे सूर्याचे तेज उजळत जाते. हे तेज त्याहूनही सतेज आहे.” त्याला काय वाटत आहे हे सामान्य माणसांना कसे समजणार? त्यांना एवढेच कळून चुकले की, हा योगी आता आपल्यापैकी राहिलेला नाही. 

आता पुढे काय आहे हे भावंडांना चक्क दिसू लागले. त्यांना चैन पडेना. विश्व रिकामे होणार आहे असे त्यांना वाटू लागले. दिवा जाणार, सूर्यबिंब कायमचे ग्रस्त होणार, वायूचा खडा होऊन बसणार, समुद्राचे पाणी शोषून जाणार. वनस्पती जागच्या जागी करपणार. या जाणिवेने सोपान आणि मुक्ताई गलबलून गेली. त्यांना जगात कोणी नव्हते. ज्ञानेश्वर होता तर सगळे काही होते. तो आता जाणार हे ठरले. 

आपल्याच तत्त्वज्ञानाचा जाच त्यांना होऊ लागला. मुक्ताबाई तर सारखीच त्याच्या सांगाती राहू लागली. ती त्याला एकदा म्हणाली, “दादा तुझे कुणीकडेच लक्ष नसते. आपण एकदा पूर्वीसारखी रंगत करू. थोडी मौज होईल.” “बरे, करू, पण माझे ते माधुकरीचं फडके सकाळी तयार ठेव.” ज्ञानेश्वर म्हणाला. मुक्ताई रडू लागली. तो म्हणाला, “मुक्ते! माझे माधुकरीचे एक फडके मी परमेश्वरापुढे धरले आणि त्याने दोन्ही हातांनी मला सुग्रास माधुकरी पुरी पुरी वाढली. मी जेवून तृप्त झालो आहे. पण ही माधुकरी मी उद्या मागून आणतो आणि आपण सर्वजण जेवू. तुझी अंगतपंगत होऊ दे.” “दादा ! तू कशाला मागतोस? मी जातो.” सोपान म्हणाला. “नको. तू जाऊ नको. पूर्वीच्यासारखे करायचे ना? तर मीच जातो. 

मीच तुम्हाला जेवू घातले पाहिजे. माधुकरी हा आपला खराखरा वारसा आहे.” मग ज्या दोन हातांनी या गंभीर पुरुषाने व्योम कवळिले होते त्यांतील एकात माधुकरीचे फडके आणि एकांत पंचपात्री घेऊन ज्ञानेश्वर 'ॐभवती 'साठी निघाला. ही त्याची शेवटचीच माधुकरी होती. चारही भावंडे एका मेळात जेवावयास बसली, त्यांनी आईची आठवण तोंडी लावली : बाबांची आठवण तोंडी लावली. ज्ञानेश्वराचा प्रसाद दोघांनी घेतला. 

निवृत्ती शून्य व्योमाकार होऊन उदासवाणा बसला होता. वैराग्य, तत्त्वज्ञान, घरगुती भावना, आईबापांच्या आठवणी, पैठणचा पाठीवरचा मार, रेड्याचे वेदगायन, पोरकी भ्रमंती यांचा उधार पुन्हा पुन्हा केला. ही त्यांना एकमेकांपासून निवडून काढता येईनात. पण ज्ञानेश्वर हा जागरूक होता. भावंडांच्या अश्रूच्या प्रवाहात त्याने आपले अश्रू मिसळले खरे; पण तो लागलीच म्हणाला, “मुक्ते, सोपाना, आता हे संपलेच पाहिजे!” 

नामदेवाने कपाळावर हात मारला आणि तो म्हणाला, "हाय रे दैवा! ज्ञाना जात आहे. माझ्या जिवाला होणारे क्लेश मी आता कुणाला सांगू? माझ्या डोळ्यांचे पाणी आटत नाही ; मी काय करू, माझ्या कंठातून पुरता शब्दही उमटत नाही ; माझ्या जिवाचे हार्दच मला सोडून जात आहे : या ज्ञानेश्वराची ख्याती तरी किती सांगावी? याने रेड्याच्या मुखांतून वेद वदविला ; याने मातीची भिंत चालविली; याने अविद्येचा वाराही लागू दिला नाही. हा ज्ञानियाचा ईश्वर झाला आणि भक्तीचाही डंका याने जगात गाजविला. एवढ्याशा कोवळ्या वयात याने संपादिलेला अनुभव सागरासारखा खोल आहे आणि अध्यात्मविचार तर याने नदीच्या वाळवंटाप्रमाणे स्पष्ट केला आहे; कल्पनातरंगाला याने जागाच ठेवली नाही आणि ज्याला गूढ, गूढ म्हणून म्हणतात ते सारे याने तळहातासारखे स्पष्ट केले आहे. 

पोटात ढवळणारे अहंकाराचे विष याने काढून टाकले आहे ; दंभाचा बडिवार याने नष्ट केला आहे; आणि संशयाचे मोड याने जागच्या जागी जिरवून टाकले आहेत. माझा प्राण कासावीस होत आहे आणि पाण्यावाचून मासोळी जशी तळमळते तसे माझे मन तळमळत आहे. साऱ्या दिशा मला ओस वाटत आहेत. प्राण कंठाला आला आहे. आता इथे राहण्यात काय मतलब आहे? हा योग्यांचा राजा आमच्यातून आपण होऊन निघून चालला हो!”

निवृत्ती, सोपान आणि धाकटी मुक्ताबाई ही बाजूला बसली होती. वेदांताच्या साऱ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या : किंबहुना त्यांनीच लोकांना त्या सांगितल्या होत्या. पण ही भावंडे अगदी कळवळून गेली; आणि मोठयाने रडू लागली : पुन्हा पुन्हा स्फुंदून आणि मुसमुसून मुक्ताई म्हणाली, “आमचा ज्ञानदेवदादा आम्हाला सोडून जात आहे हो!” हे सारे संत खरे; पण यांचे चित्त दुश्चित्त झाले! जेथे नामदेवासारखा विरागी भगवद्भक्त रडू लागला तेथे ज्ञानेश्वराच्या या कोवळ्या भावंडांची काय कथा! सोपान आणि मुक्ताई म्हणाली, “आम्हाला आई नाही, बाप नाही. ज्ञानेश्वरच आमचा आई-बाप होता; आता आम्ही कुणाला जाऊन कवटाळावे? आम्ही दोघे लहान म्हणून या ज्ञानेश्वराने आमच्यासाठी कोरान्न मागितले आणि चिमणी पिलांना वाढविते तसे त्याने आम्हाला वाढविले. पण आता हा ज्ञानदेव आम्हाला सोडून चालला आहे.”

ज्ञानेश्वराने दुरून पाहिले तो भावंडे रडून रडून हैराण झाली आहेत असे त्याला दिसले. तेव्हा तो जवळ आला आणि ममतेने त्यांना म्हणाला, “तुम्ही का कष्टी होता? तुम्हांला सांभाळणारा आपला पांडुरंग आहे. त्याने आपल्याला कधी टाकले आहे काय?” ज्ञानेश्वराच्या तोंडून हे शब्द निघताच त्यांचा अध्यात्मगुरु जो निवृत्ती तो सद्गदित आवाजाने म्हणाला, “ज्ञाना, तू समाधान करतोस खरे; पण काही केल्या माझे मन राहत नाही!” इतके बोलून तो योग्यांचा राजा रडू लागला. तळ्याची ताल फुटावी तसे निवृत्तीचे झाले. त्याला रडे आवरेना. 

पेंढीचे बंधन तुटले म्हणजे गवत रानोमाळ पांगते तसा निवृत्तीचा संयम सुटला आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. तो म्हणाला, “हरिणीला कुणीतरी धरून नेले म्हणजे तिची पाडसे ज्याप्रमाणे वेडी होऊन दशदिशा हिंडू लागलात तसे आता आम्हाला होईल. आईबापांनी आम्हाला टाकले तेव्हासुद्धा एवढे दुःख मला झाले नाही.” योग्यांचा हा दारुण शोक पाहून नामा बाजूला म्हणाला, “देवा, माझ्या पोटात आग भडकली आहे. या निवृत्तीचे समाधान कोणी करतील का?”

निवृत्ती, नामदेव यांच्या तोंडून अनेक भक्तांनी आणि साधकांनी जगाच्या नश्वरतेचे विवेचन ऐकले होते; मन जिंकल्याच्या कथा ऐकल्या होत्या, आणि वैराग्याचे कोरडे व भगभगीत विचार श्रवण केले होते. हे सारे लोक देवळाच्या ओहऱ्यात, सिद्धेश्वराच्या मठात आणि इंद्रायणीच्या वाळवंटात वसलेले होते. त्यांनी जेव्हा निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांच्या शोकाचे वर्तमान ऐकले तेव्हा ते सारे त्यांच्याभोवती जमा झाले. एवढी विरक्त माणसे; पण स्फुदून स्फुदून रडत आहेत हे पाहून त्यांना विस्मय वाटला ; त्यांना वाईटही वाटले. पण मनाच्या खोलात कुठेतरी त्यांना बरेही वाटले. 

हे जर कोणीच रडले नसते आणि टाळ्या वाजवून त्यांनी ज्ञानेश्वराच्या समाधीवर चिरा ठेविला असता तर ही माणसे हैवान आहेत असे त्यांना वाटले असते. यांच्यात माणुसकी उरली नाही हे पाहून आपण त्यांच्यापासून दुरावलो आहोत, आपला आणि यांचा काहीच संबंध नाही असा भाव त्यांच्या मनात उत्पन्न झाला असता! जगाची नश्वरता खरी आणि वैराग्यही खरे. पण मानवता खोटी आहे काय? त्या मानवतेच्या पोटीच या साऱ्या उदात्त भावना आणि ही दिव्य ज्ञाने उत्पन्न झाली आहेत आणि तिच्याच पोटी कोमल भावनाही उत्पन्न झाल्या आहेत. त्या अजूनही यांच्या ठिकाणी वागत आहेत हे पाहून या साधकांना आणि भक्तांना, त्यांच्याशी आपले थोडेसे नाते आहे, असे वाटू लागले. मग चमत्कार असा झाला की, निवृत्ती इत्यादिकांची भूमिका या साध्या माणसांनी घेतली आणि साध्या माणसांची भूमिका पत्करलेल्या या विरागी भावंडांना ती वेदात सांगू लागली! “महाराज, आपण ज्ञानी माणसे आहात, आणि इतके दुःख करता! मग आमच्यासारख्याचा काय बरे पाड? 

तुमचा महिमा काय सामान्य आहे काय? पण ग्रंथात सांगितले आहे की, जे धर्मचक्षुंना दिसत आहे ते विसरून जावे! आकाशात अभ्रे येतात आणि जातात; पण आली म्हणून कोणी आनंद मानीत नाही, गेली म्हणून कोणी खंत मानीत नाही. निवृत्तिमहाराज, आम्ही तुम्हाला काय सांगावे! पण राम, कृष्ण हे अवतारी पुरुषसुद्धा गेले की हो! मृगजळ जसे नाहीसे होते तसे ते निघून गेले. येथे काय शाश्वत आहे? आपण कशाला शोक करता?” नेहमीच्या श्रोत्यांपैकीच काही सामान्य लोक जेव्हा असा वेदान्त सांगू लागले तेव्हा निवृत्तीच्या मनाला खरोखर आचकाच बसला. क्षणभर क्षीण झालेले त्याचे वैराग्य पुन्हा खडबडून जागृत झाले आणि ज्ञानेश्वराच्या भोवती जमलेल्या लोकांत तोही जाऊन बसला.

0000

निवृत्ती आणि नामदेव यांचे बोलणे झाले. निवृत्तीने सांगितले की, इंद्रायणीच्या काठीच ज्ञानेश्वराने समाधी घ्यावी. हे पुराणप्रसिद्ध ठिकाणी आहे आणि या ठिकाणी इंद्राने पूर्वी यज्ञयाग केलेले आहेत व ब्रह्मदेवाने तप केले आहे. नामा म्हणाला. “हे तर आहेच. पण ही तुमच्या आजोळची भूमी आहे हाही विचार आपण ध्यानात ठेवावयास हवा.” निवृत्तीने नामाकडे सस्मित पाहिले व तो म्हणाला, “हेही खरे आहे.” नामदेवाला आळंदीची माहिती तितकीशी नव्हती. म्हणून निवृत्तीने पुढे सांगितले की, येथे एक रिकामे समाधिस्थान आहे, त्यात शेकडो तपस्व्यांनी तप केले आहे. ते सध्या रिकामेच आहे. 

ज्ञानोबा म्हणतो की, जिवंत समाधी घ्यावयाची आहे, तर त्याला हे ठिकाण फार चांगले आहे. नामाला ही कल्पना पसंत पडली. मग त्याने आपले मुलगे नारा, महादा यांना त्या स्थानाकडे धाडले. त्यात उतरण्याच्या वाटेच्या तोंडावर नंदी बसविला होता. तो मोठ्या प्रयासाने त्यांनी हलविला आणि विवराची शिळा उघडली. आत समाधीचे आसन फार नामी होते. नामदेवाच्या मुलांनी हे समाधिस्थान झाडून स्वच्छ केले आणि ज्ञानदेवाच्या अनंतकाळ वसतीला ते स्थान शोभेसे केले.

हे वृत्त भराभर सगळीकडे झाले. ज्ञानेश्वर जिवंत समाधी घेणार या बातमीने केवळ पंचक्रोशीच नव्हे तर पंढरपुरापर्यंतचा प्रदेश गलबलून गेला. भक्तिसंप्रदायातील सहस्रावधी लोक दिंड्यापताका घेऊन आळंदीकडे निघाले. आणि पुण्याचा सारा टापू नामघोषाने दुमदुमून गेला. रेडयाच्या मुखातून वेदघोष करविणारा बालयोगी, भगवद्गीतेवर भाष्य लिहिणारा तत्त्वज्ञानी जिवंत समाधी घेत आहे या वार्तेत विलक्षण जादू होती. माणसांनी आपापले व्यवसाय टाकले आणि जो तो आळंदीच्या वाटेने चालू लागला. वास्तविक पाहता घडू घातलेला प्रकार दुःख उत्पन्न करणारा होता. पण जनसंमदनि त्याला उत्सवाचे रूप आणले. हे एक अघटितच होते. एवढ्या लहान वयात माणसाने जगातून जाण्याची वांच्छा धरावी याचे सर्वांना नवल वाटत होते. जे जाणणारे होते ते जाणू लागले की ते यथायोग्यच आहे. आळंदी गाव आणि त्याचा परिसर माणसांनी फुलून गेला. 

0000

मग ज्ञानेश्वर जनसमूहाच्या हाती सापडला होय-नाही म्हणण्याची त्याला सोयच उरली नाही. त्यांनी ज्ञानेश्वराला अभ्यंगस्नान घातले. त्याला त्यांनी चंदनाची उटी लावली. त्याच्या कपाळाला गंधाचा आणि कस्तुरीचा मळवट भरला. त्याच्या गळ्यात त्यांनी पुष्पमाला घातल्या, समाधीच्या भोवती त्यांनी उत्तम शृंगार केला. चंदनाचे खांब उभे केले, वेलींचे पदर सोडले. मुक्ताफळाचे घोस लोंबविले. चामरे ढळत ठेवली. नाना प्रकारची वाद्ये त्यांनी जमा केली. तुळशीच्या माळा घातलेले सहस्रावधी भक्त नामाचा गजर करीत समाधीची आरास करू लागले, भक्ती, हौस आणि आदर एक झाली. 

ज्ञानेश्वर समाधी घेणार होता : जिवंत समाधी घेणार होता. भक्तांना निरनिराळी स्वप्ने पडू लागली. ते एकमेकांना सांगू लागले की, “विठ्ठलाची स्वारी प्रत्यक्ष येणार आहे. गंधर्वांचे मेळे येणार आहेत. निरनिराळी तीर्थे इंद्रायणीत येऊन मिसळणार आहेत. काय वाटेल ते होणार आहे.” लोक भान विसरून बोलू लागले. मानावे ते होतच असते. समाधीतील सारी व्यवस्था अग्रेसर संतांनी स्वहस्ते केली. शुभ्रवस्त्राचे आसन त्यांनी तयार केले आणि त्यावर दुर्वा. तुळशी आणि वेल यांचा थर घातला. दीप प्रज्वलित केले आणि निरांजने लाविली. 

निरंजन, निरामय, निर्विकल्प ज्ञानेश्वर आज समाधी घेणार होता; जिवंत समाधी घेणार होता. होता होता महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या संतांच्या मेळात मंद मंद पावले टाकीत, सर्वांना वंदन करीत, गंभीर स्मित करीत ज्ञानेश्वर या समाधिस्थानाकडे निघाला. वाटेत त्याला थोडे थांबावे लागले निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई मागे चालली होती. ती कासावीस झाली होती. व्हावयाचे ते इतक्या सन्निध आल्यानंतर या भावंडांचा शोकावेग अनावर झाला. त्यांना घेऊन तो पुढे निघाला.

समाधीच्या प्रांगणातील देखावा देवांनीच बघावयास हवा होता आणि तो त्यांनी पाहिलाही असेल, ज्ञानेश्वर तेथे प्राप्त होताच सहस्रोनी त्याच्या पायांवर डोकी ठेवली. नामदेवाच्या जवळ जाऊन ज्ञानेश्वराने त्याच्या पायांवर मस्तक ठेवले आणि नामदेवाने तर त्याच्या पायावर लोळणच घेतली. शेवटी आपला सद्गुरु जो निवृत्ती त्याच्यापुढे ज्ञानेश्वर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, “निवृत्तिनाथा, मला तू पाळलेस, पोसलेस, ज्ञान दिलेस, तुझ्यामुळे मी मायानदी उतरून गेलो आहे.” निवृत्तीने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. पुन्हा पुन्हा गहिवरून त्याने भावाला कवटाळून धरले. तो म्हणाला, “बाबा. तू माझी कधी अमर्यादा केली नाहीस. तू महाभगवद्भक्त झालास ; वेदांचे गुह्य तू सर्वांच्या हाती दिलेस : माझा जीव कासावीस होत आहे.” निवृत्ती रडू लागला. चोखामेळा, सावता, सेना, परसा हे सारे रडू लागले. मग सोपाना आणि मुक्ताई यांना ज्ञानेश्वराने निवृत्तीच्या हाती दिले.

पण आता वेळ नव्हता. ठरलेला मुहूर्त जवळ आला होता. निवृत्तीने त्याचा हात धरून त्याला समाधीत नेले, पण जाण्याच्या आधी ज्ञानेश्वराने अजानवृक्षाची एक वठलेली फांदी बाहेर रोवली. तो आत जाताच जनसमूह दुःखाने वेडा झाला. ज्ञानेश्वर आसनावर जाऊन बसला आणि त्याने परमेश्वराचे प्रदीर्घ स्तवन केले. समोर ज्ञानेश्वरी ठेवविली. मग त्याने ध्यानाला आरंभ केला. तीन वेळा त्याने करकमळे जोडली आणि नेत्र झाकले. ज्ञानेश्वराची समाधी लागली. प्रचंड कल्लोळात आणि भावनेच्या महापुरात ज्ञानेश्वराची समाधी लागली. नामा गदगदून म्हणाला, “सूर्य मावळला, हो मावळला!” निवृत्ती धीर धरून उभा होता. समाधी लागणे म्हणजे काय हे त्याला ठाऊक होते. त्याने ज्ञानेश्वराला नमस्कार केला. सारेजण बाहेर आले आणि निवृत्तीने आपल्या हाताने ज्ञानेश्वराच्या समाधीवर चिरा ठेवला.

महाराष्ट्राचा 'बालदिनमणि' पूर्णस्वरूप होऊन आपल्या पायांनी समाधीत प्रविष्ट झाला. बाहेर आल्यावर भावंडांनी धरणीवर अंगे टाकली. नामदेव त्यांचे सांत्वन करू लागला. इतक्यात कोणसे जोराने ओरडले, “ऐका ऐका, काय ऐकू येत आहे पहा.” गंभीर ध्वनी सर्वांच्या कानी आला की,

अगा अगा रे ज्ञानेश्वरा । चंद्र तारा जब दिनकरा।

तव तुझी समाधी स्थिरा । राहो रे निरंतर ॥

जंववरी हे क्षितिमंडळ । जववरी हे समुद्रजळ ।

मग कल्पक्षयी यथाकाळ । माझ्या हृदयी ठसावे ।।

ही वाणी ऐकून लक्षावधी लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि अजान वृक्षाच्या त्या वाळक्या फांदीवर एकाएकी नवपल्लवांचे सहस्त्रावधी धुमारे फुटले.

Tags: ज्ञानेश्वराची प्रवचने आणि नामदेवाची कीर्तने जीवितकार्य संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर समाधी Dnyaneshwar's discourses and Namdeva's kirtans Jeevitakarya Sant Dnyaneshwar Dnyaneshwar Samadhi Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्री. म. माटे

(1886 - 1957) लेखक, संपादक, समाजसुधारक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके