डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक थोर न्यायमूर्ती : महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गेल्या शतकातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. केवळ कायदा या क्षेत्रातच नव्हे तर इतरही अनेक क्षेत्रांत त्यांनी चौफेर कर्तृत्व गाजवले. त्यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन, दोन्ही जानेवारी महिन्यातच येतात. त्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय वाचकांना करून देणारा हा लेख.
 

भारताचे एक सुपुत्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे राजकारणातील मुत्सद्दी, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, अर्थशास्त्रज्ञ आणि एक विद्वान व विचारवंत म्हणून सर्वपरिचित आहेत. ते स्वतः साधे, नम्र, शांत स्वभावाचे असे साधुतुल्य पुरुष होते. भारतीय राष्ट्रीय सभेची काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली तेव्हा काँग्रेसच्या संस्थापकांपैकी ते एक होते. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे गुरू होते, तर रानडे हे गोखले यांचे गुरू होते. म्हणून महात्मा गांधींनी रानडे यांचा माझ्या 'गुरुचे गुरू' असा उल्लेख केला आहे.

रानडे ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिपद 23 नोव्हेंबर 1893 ते 16 जानेवारी 1901 पर्यंत म्हणजे त्यांचे निधन होईपर्यंत भूषविले. रानडे हे त्यांच्या इतर क्षेत्रांमधील कर्तबगारीबद्दल जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांनी न्यायमूर्ती म्हणूनही फार मोठी कर्तबगारी दाखवली आहे. परंतु इतरांना तर सोडाच पण प्रत्यक्ष न्याय व कायद्याच्या क्षेत्रांतील पुष्कळ लोकांना रानडे ह्यांनी न्यायमूर्ती म्हणून केलेल्या श्रेष्ठ कामगिरीचा फारसा परिचय नाही. म्हणून हा लेख त्यांच्या जीवनातील न्यायाधीश ह्या पैलूचा परिचय करून देण्याचा एक नम्र प्रयत्न आहे.

न्या. रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी झाला. ते 1863 साली एम.ए. झाले व 1866 साली त्यांनी कायद्याची पदवी सन्मानासह प्राप्त केली. महाविद्यालयात रानडे हे एक बुद्धिमान व कष्टाळू विद्यार्थी म्हणून ओळखले जात. मे 1866 मध्ये त्यांनी शिक्षणखात्यात मराठी भाषांतरकार म्हणून दरमहा 200 रुपये पगारावर सरकारी नोकरी पत्करली. ह्या जागेवर ते मार्च 1868 पर्यंत होते. या काळात त्यांनी त्या वेळच्या कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश व अक्कलकोट संस्थानात कारभारी म्हणूनही काही काळ काम केले. 

मार्च 1868 मध्ये ते मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात इंग्रजी आणि इतिहासाचे सहायक प्राध्यापक म्हणून दरमहा 400 रुपये पगारावर रुजू झाले. 1871 साली रानडे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी प्रत्येक परीक्षेत पहिला वर्ग मिळविला. म्हणून ते राजकुमार पदवीधर म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यांनी वकिली व्यवसाय कधीही केला नाही. 

1871 मध्ये त्यांनी काही काळ महानगर दंडाधिकारी म्हणून मुंबई येथे व नंतर लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुणे येथे काम केले. त्याच वर्षी त्यांची पुणे येथे प्रथम वर्गात प्रथम श्रेणीचे दिवाणी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. फेब्रुवारी 1873 मध्ये त्यांची ही नेमणूक कायम स्वरूपाची झाली. त्या वेळी त्यांचा पगार दरमहा आठशे रुपये होता. 

न्या. रानडे जरी न्यायाधीश म्हणून सरकारी नोकरीत होते तरी ते अनेक सामाजिक व धार्मिक, तसेच पाठीमागे राहून राजकीय चळवळीतही भाग घेत असत. ही गोष्ट त्या वेळच्या मुंबई सरकारला तसेच मुंबई उच्च न्यायालयाला रुचली नाही. म्हणून 1879 च्या जानेवारीत त्यांची बदली प्रथम नाशिक व नंतर धुळे येथे झाली आणि त्याच कारणाकरिता त्यांचा क्रम आलेला असताना 1880 मध्ये सत्र न्यायाधीश ठाणे ही बढतीची जागा त्यांना मिळाली नाही. 

1881 च्या जानेवारीत रानडे ह्यांची मुंबई येथे महानगर दंडाधिकारी म्हणून बदली झाली. त्या जागेवर ते चार महिने होते आणि एप्रिल 1881 मध्ये त्यांची दख्खन शेतकरी कर्ज निवारण कायद्याखाली सहायक विशेष न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. 1884 मध्ये काही महिने त्यांनी पुणे येथे लघुवाद न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. 1885 ते 1887 ह्या काळात त्यांची मुंबई कायदे कौन्सिलवर सरकारी सभासद म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात त्यांनी कायदेमंत्री म्हणून काम पाहिले. 

1887 ह्या वर्षी रानडे ह्यांची मुंबई शेतकरी कर्जनिवारण कायद्याखाली विशेष न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. ह्या जागेवर ते नोव्हेंबर 1893 पर्यंत म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमू्ती होईपर्यंत होते. ही विशेष न्यायाधीशाची जागा आय पी. एस. लोकांकरिता होती. पण रानडे ह्यांची कर्तबगारी पाहून त्यांना ह्या जागेवर नेमण्यात आले. ह्या जागेवर काम करीत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्याकरिता व सोडविण्याकरिता रानडे यांना वर्षातून आठ महिने पुणे, सातारा, सोलापूर व अहमदनगर हा जिल्ह्यांतून फिरावे लागत असे. पण त्याचा बिलकुल कंटाळा न करता रानडे खेड्यापाड्यांतून फिरले व कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला. 

विशेष न्यायाधीश म्हणून काम करीत असतानाच नोव्हेंबर 1893 मध्ये रानडे ह्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. त्या वेळेस त्यांचा निदान पंचवीस निरनिराळ्या संस्थांशी संबंध होता व ते पुण्याचे अनभिषिक्त राजे म्हणून ओळखले जात होते. 

रानडे ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तिपद 23 नोव्हेंबर 1893 ते 16 जानेवारी 1901 पर्यंत म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत भूषविले. न्या. तेलंग ह्यांचे अकाली निधन झाले व त्यांच्या जागेवर रानडे ह्यांची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. त्या काळात बॅरिस्टर, आय.सी.एस., ओरिजिनल साईड अ‍ॅडव्होकेट असेच लोक उच्च न्यायालयातील न्यायाधीश होऊ शकत असत. रानडे असे कोणीच नव्हते. त्यांनी वकिलीही केली नव्हती. पण त्यांची कायद्याची सूक्ष्म दृष्टी व विद्वत्ता पाहून त्यांची नेमणूक मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. 

न्या. रानडे हे मुंबई उच्च न्यायालयात सात वर्षे न्यायाधीश होते. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून केलेल्या कामाचे त्यांच्या सहकारी न्यायाधीशांनी कौतुक केले. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे स्पष्ट विवेचन, सर्व पुराव्यांचे काळजीपूर्वक परीक्षण आणि तर्कशास्त्राला अनुसरून दिलेली कारणे ही रानडे यांच्या निकालपत्रातील खास वैशिष्ट्ये असत. मुंबई उच्च न्यायालयाने हिंदू कायद्याचा व्यापक दृष्टीने विचार करून तो हिंदू विधवांच्यासाठी अधिक उदार केला व त्यांना अधिक अधिकार प्राप्त करून दिले. त्या दृष्टीने न्या. रानडे ह्यांची हिंदू कायद्यावरील निकालपत्रे ही महत्त्वपूर्ण मानली जातात. त्यांची हिंदू कायद्यावरील निकालपत्रे म्हणजे वारसाहक्का, विवाह आणि दत्तक ह्या विषयांवरील विद्वत्तापूर्ण अशी विवेचने म्हणून आजही त्यांचे महत्त्व कायम आहे. 

रानडे हे त्यांच्यासमोर असलेल्या प्रकरणासंबंधीची कायद्याची पुस्तके सुट्टीच्या दिवशी घरी घेऊन जात असत व त्यांचा सखोल अभ्यास करीत. तसेच त्यांच्यासमोर सुनावणीसाठी येणाऱ्या प्रकरणांच्या कागदांचे ते अगोदर घरी वाचन करीत असत. त्यामुळे जे अपील दाखल करण्याजोगे नसेल असे अपील, न्यायालयात त्या वकिलीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, रानडे दाखल करून न घेता तेथल्या तेथेच नामंजूर करीत असत. ह्या पद्धतीमुळे न्यायालयाचा वेळ व पक्षकाराचा पैसा ह्या दोन्हींची बचत होत असे. अशी कार्यपद्धती हे न्या. रानडे यांचे खास वैशिष्ट्य होते.

रानडे ह्यांनी न्यायदान करताना लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला नाही. त्यांनी लोकप्रियतेवर भर देऊन निकाल दिले नाहीत. त्यांचे सर्व निकाल अगदी निःस्पृह आणि निःपक्षपाती होते. कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती पॅरसन्स आणि न्या. रानडे ह्यांच्या खंडपीठाने लो. टिळकांचा जामिनाचा अर्ज नामंजूर केला. त्याच खंडपीठाने रँड वध खटल्यातील एक आरोपी दामोदर हरि चाफेकर ह्याला पुण्याच्या सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा कायम केली. ह्या दोन्ही निकालानंतर रानडे ह्यांच्यावर बरीच टीका झाली. पण ती त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केली. रानडे यांचा स्वभाव अत्यंत थंड होता. त्यांचे मन कशानेही विचलित होत नसे. त्यांचे वकीलवर्गाबरोबरचे संबंध फारच सलोख्याचे होते. सामाजिक व धार्मिक सुधारणा, इतिहास संशोधन, अर्थकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी वजावली. पण ह्या इतर क्षेत्रांतील त्यांचे कार्य त्यांच्या न्यायक्षेत्रातील कार्याच्या आड कधीही आले नाही किंवा त्या कार्याचा त्यांच्या न्यायक्षेत्रातील कार्यावर कधीही परिणाम झाला नाही.

न्या. रानडे हे एक अत्यंत बुद्धिमान, अतिशय उद्योगी व प्रकांड पंडित असे न्यायाधीश होते. 16 जानेवारी 1901 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदावर असतानाच न्या. रानडे ह्यांचे निधन झाले. रानडे गाढे विद्वान व कनवाळू अंत:करणाचे व योग्य निर्णय देणारे न्यायाधीश होते, असे त्यांच्या निधनानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे त्या वेळचे मुख्य न्यायमूर्ती सर लॉरेन्स जेंकींस ह्यांनी म्हटले आहे. 

रानडे ह्यांच्या मृत्यूनंतर इंडियन लॉ रिपोर्टरने त्यांच्याबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे – 'शांतपणा आणि सभ्यता हे जर सद्गुण असतील तर ते सद्गुण न्या. रानडे ह्यांच्याजवळ होते. कायदा स्पष्ट आणि सुबोध भाषेत सांगणे हा जर अलंकार असेल तर तो अलंकार न्या. रानडे यांच्याजवळ होता.' 

मुंबई उच्च न्यायालयात अनेक नामवंत न्यायमुर्तींनी न्यायमूर्तिपद भूषविले आहे, आणि त्यांच्यामध्ये न्या. रानडे ह्यांचा क्रम फार वरचा आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे एक निवृत्त मुख्य न्यायमूर्ती श्री. छगला यांनी म्हटले आहे. त्या काळात मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या फारच कमी म्हणजे दहापेक्षाही कमी होती. (आता ती संख्या पन्नासच्या वर आहे.) फक्त आय.सी. एस. किंवा बॅरिस्टर किंवा अ‍ॅडव्होकेट (ओरिजनल साईड) हेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होऊ शकत असत, त्या काळात इतरांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होणे हे जवळजवळ अशक्यप्रायच होते. रानडे ह्यांनी वकिलीचा व्यवसाय कधीही केला नाही. पण त्यांची विद्वत्ता एवढी मोठी होती की त्यामुळे ते सरकारी नोकरीतून मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या पदापर्यंत पोचले. 

'न्या. रानडे हे मुंबई उच्च न्यायालयातील सर्वश्रेष्ठ न्यायमूर्तीपैकी एक होते.' माजी मुख्य न्यायमूर्ती छगला यांचे हे उद्गार अगदी सर्वार्थाने सार्थ आहेत.

Tags: श्रीनिवास बेळवी न्या. रानडे महादेव गोविंद रानडे मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती लोकमान्य टिळक महात्मा गांधी mahatma Gandhi lokmanya tilak case shrinivas belvi justice Mahadeo Govind ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके