डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाबरी मशिदीच्या पाडावानंतर ‘भाजपा’ ने आपला मोर्चा 'बांगला देशी' घुसखोरांकडे वळवला आहे. भाजपाचे एक खासदार श्री. राम नाईक यांनी 'बांगलादेशी' घुसखोरांची एक पुस्तिका लिहून 1989 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा तो मुद्दा बनवला होता. तर 1993 च्या कलकत्ता येथील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात 'घुसखोरांना' परत पाठवण्याचा ठराव पास केला गेला. तेव्हापासून बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न भाजपाच्या राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेवर आला आहे. 

बाबरी मशिदीच्या पाडावानंतर ‘भाजपा’ ने आपला मोर्चा 'बांगला देशी' घुसखोरांकडे वळवला आहे. भाजपाचे एक खासदार श्री. राम नाईक यांनी 'बांगलादेशी' घुसखोरांची एक पुस्तिका लिहून 1989 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा तो मुद्दा बनवला होता. तर 1993 च्या कलकत्ता येथील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात 'घुसखोरांना' परत पाठवण्याचा ठराव पास केला गेला. तेव्हापासून बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न भाजपाच्या राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेवर आला आहे. 

या प्रश्नाला परत गती निर्वाचन आयोगाने हजारों लोकांना ओळखपत्र देण्यापूर्वी आपले नागरिकत्व सिद्ध करावयास सांगितले. पोलिसांनी अर्थात आपला राग बांगला देशी घुसखोरांवरच काढला. त्यातून प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी पण सुटले नाहीत. ‘सेना-भाजपा’ युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या वचननाम्यातील वचनाप्रमाणे घुसखोरांना शोधण्यासाठी व त्यांना हाकलण्यासाठी शिवसैनिकांनी पोलिसांना मदत करावी असा आदेश 'रिमोट कंट्रोल’ ने काढला.

या सर्व पार्श्वभूमीवर, बांगलादेशी घुसखोर किती आहेत? घुसखोरीची काय कारणे आहेत? त्यासाठी कुठले कायदे आहेत व काय उपाय योजना कराव्या लागतील, याहीपेक्षा 'सेना भाजपा’ च्या बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याच्या कार्यक्रमामुळे काय दुष्परिणाम होतात, या सर्वांचे निरीक्षण व पाहणी करून मुंबईतील परिवर्तनकारी चळवळीतील कार्यकर्ते शमा दलवाई व इरफान इंजिनिअर, यांनी 'बांगलादेशी घुसखोर : भ्रम आणि वस्तुस्थिती, एक सत्यशोधन अहवाल' ही पुस्तिका लिहिली आहे.

स्थलांतरित निर्वासित व घुसखोर : पक्षपाती व्याख्या

दळणवळणाची साधने वाढल्यावर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा स्थलांतराचे प्रमाण वाढतच आहे. मोठ्या संख्येने भारतीय मजूर जसे कामासाठी आखाती देशांत जातात तशी मुंबईत पोट भरण्यासाठी किमान 350 कुटुंबे येतात. भारताच्या शेजारच्या सर्व देशांतून लोक मोठ्या प्रमाणावर भारतात येतात. ईशान्य भारतात जसे बांगला देशातून येणारे लोक आहेत, तसे पहारेकरी म्हणून सर्व देशभर काम करणारे नेपाळी गुरखे आहेत. 

मुंबईच्या वेश्या वस्त्या तर अगणित अशा नेपाळी मुलींना काम पुरवितात. श्रीलंकेतील तामीळ लोकांच्या वस्त्या केवळ दक्षिण भारतात नाहीत तर मुंबई व दिल्लीत पण त्या आहेत. याचा अर्थ एवढाच की, भारतात येणारे केवळ बांगला देशीयच नाहीत तर शेजारील सर्व राष्ट्रांतून लोक येतात. 'बांगला देश' हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे त्या देशातून जे हिंदू येतील त्यांना निर्वासित म्हणावयाचे व मुस्लिम येतील त्यांना 'घुसखोर' संबोधून त्यांना हाकलून लावण्याच्या नावाखाली भारतीय समाजात 'हिंदु मुस्लिम' तेढ निर्माण करावयाची हे भाजपाचे षड्यंत्र आहे.

घुसखोर किती असावेत?

घुसखोर किती असावेत याबाबत भाजपा जो दावा करत आहे. त्यात तशी सुसंगती नाही. भारतात किमान 2 कोटी घुसखोर असावेत असा भाजपाचा दावा आहे. त्याबाबत भाजपाने बांगला देशातील लोकसंख्या वाढीचा वेग 3.1 टके धरल्यास 1991 मधील जनगणनेनुसार बांगला देशाची लोकसंख्या 13 कोटी असावयास हवी. ती आज 11 कोटी आहे. तर 2 कोटी लोक गेले कुठे? मग 2 कोटी बांगला देशीय घुसखोरांनी भारतात प्रवेश व वास्तव्य केले आहे, असा भाजपाचा दावा आहे.

प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ श्री. बी. के. रॉयवर्मन यांनी सिद्ध केल्यानुसार बांगला देशाच्या लोकसंख्या वाढीचा वेग 3.1 टक्के नसून 1992 च्या सुमारास तो 2.4 टक्के एवढा आहे. पुस्तिकेत बांगला देशी, भारत व दक्षिण आशिया आदी देशांतील लोकसंख्या वाढीचा वेग या सोबतच बांगला देशातील जिल्हानिहाय लोकसंख्या वाढीचा वेग (1971-1991) आकडेवारीनिशी सिद्ध केला आहे. आपल्या देशात बांगला देशवासियांचे किती प्रमाण आहे याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तरी भारताचे माजी परराष्ट्र सचिव व भारताचे बांगला देशातील माजी उपायुक्त श्री दुवे यांच्या म्हणण्यानुसार दर वर्षी किमान 8 ते 20 हजार बांगला देशीय भारतात येतात. यावरून दहा लाख बांगला देशीयांचे स्थलांतर करण्यास किमान 20 वर्षे लागतील.

मुंबईत तीन लाख बांगला देशीय वास्तव्य करून राहतात असा 'सेना- भाजपा' युतीचा दावा आहे. शमा दलवाई व इरफान इंजिनीअर यांनी बांगला देशीय बहुसंख्येने राहत असलेल्या रफीकनगर (गोवंडी) बंगालीपुरा (अ‍ॅन्टॉप हील). मालवणी, रे रोड या भागात जाऊन बांगला देशीय लोक, त्यांचे हिंदू शेजारी व पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या सर्वांच्या मते 30,000 पेक्षा कमी बांगला देशीय मुंबईत असावेत. मुंबईतील सहपोलीस आयुक्त श्री. वली यांच्या म्हणण्यानुसार केवळ 191 वांगला देशीय घुसखोरांची माहिती अद्याप मिळाली असून त्यांपैकी 32 जणांना परत पाठवले आहे.

कमालीचे आर्थिक दारिद्य, रोजगाराच्या संधीचा अभाव, विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, भाषिक व सांस्कृतिक समानता, शेजारी देशांतील परस्पर नातेसंबंध, दळणवळणाच्या साधनांची विपुलता या कारणांमुळे लोकांचे स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. पाहणी केलेल्या सर्व वस्त्यांतील लोक अत्यंत कमालीच्या वकाल अवस्थेत व भीषण दारिद्यात आणि असुरक्षित मानसिकतेत जीवन जगत आहेत. 30-40 वर्षांपूर्वी कधी तरी मुंबईत आलेले हे लोक. आज त्यांच्या मुला-मुलींची लग्ने भारतीयांसोबत झाली आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच की ते ‘मुसलमान’ आहेत. पाहणी केलेल्या सर्व बांगला देशीय लोकांबाबत हिंदूंना सहानुभूती होती.

बांगला देशवासीयांना परत पाठवण्याची कार्यवाही विशेष आवाज वा गाजावाजा न करता 1982 पासून करण्यास प्रारंभ केला होता. तथापि त्यास गती 1992 साली मिळाली. बांगला देशाच्या पंतप्रधान 'श्रीमती वेगम खालिदा झिया' भारतात आल्यावर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी याबाबत एक ठराव पास करून 'सीमेवरील बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केली. परंतु ठराव झाल्यावर सप्टेंबर 1992 मध्ये बांगलादेशीयांना हुडकून काढण्यासाठी 'ऑपरेशन पुश बॅक' या नावाने योजना एकतर्फीच तयार केली. भारतातून 1982-1995 या काळात बांगला देशवासी 5225 लोकांना परत पाठवल्याची नोंद आहे. पुश-बँक (परत पाठवणी) ही कारवाई 'फॉरिनर्स अ‍ॅक्ट' या कायद्यातील सेक्शन 14 नुसार केली जाते.

'ऑपरेशन पुश-बॅक' या कारवाईतून काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उदभवल्याचे पुस्तिकेत नमूद केले आहे. भारतीयांवरील कारवाई, कुटुंबांची ताटातूट, हक्कांवर कारवाई. कायद्यातील त्रुटी, खरा प्रश्न मानवी हकांचा आहे. 'ऑपरेशन पुश बॅक' योजनेनंतर परत पाठवणी केलेल्या बांगला देशीयांना ऑपरेशन पुश-इन, या योजनेखाली बांगला देशात परत घेतले जात नाही. मग या मंडळींनी जावे कुठे? या सर्व कार्यवाहीमुळे घटनेतील मूलभूत हक्काच्या तत्वाची व नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली होत आहे.

सारांश, परकीय नागरिक विविध कारणांमुळे आपल्या देशात असतीलही, पण त्यांना शोधून काढून परत पाठवण्यावाबत, दोन्ही देशांच्या सरकारने परस्पर विचार करून, धोरणात्मक भूमिका ठरवून कार्यपद्धती बनवून विशेष म्हणजे अशा लोकांना विश्वासात घेऊन ही कार्यवाही करावयास हवी. परकीय देशांतील स्थलांतरितांना घुसखोर ठरवून, दंगलखोर समजून कायदा हातात घेऊन सरसकट मुसलमानांना दोषी ठरवणे ही बाब अमानवीय आहे.

'सेना-भाजपा' युतीचे सरकार सत्तेत आल्यावर त्याच्या सवंग घोषणा चालूच आहेत. त्या सर्व स्तरांवर अपयशी ठरते असताना लोकसभा निवडणुकीपर्यंत एखादा मुस्लिमविरोधी विषय हातात असावा या उद्देशाने घुसखोर विरोधी आंदोलन चालू ठेवण्याचा प्रयत्न 'सेना-भाजपा' करत आहे, ही शंका बळावते. 

या पुस्तिकेच्या शेवटी विदेशी नागरिकांच्या स्थलांतराबाबत व्यापक दृष्टिकोन स्वीकारून तिसऱ्या जगातील सरकारांनी हा प्रश्न सोडवावा अशी सूचना केली आहे. बांगलादेशीय स्थलांतरित नागरिकांची परिस्थिती, कारणे व उपाय याबाबत वस्तुस्थितिदर्शक सत्यशोधन अहवाल बनवून ती पुस्तिका रूपाने मांडून एक महत्त्वपूर्ण कार्य लेखकद्वयाने केलेले आहे. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या 'भाजपा' ची झाकली मूठ उघडी करण्यात सदर पुस्तिका यशस्वी ठरली आहे.

बांगलादेशी घुसखोर 
भ्रम आणि वस्तुस्थिती - एक सत्यशोधक अहवाल 
लेखक - शमा दलवाई, इरफान इंजिनीयर 
सुगावा प्रकाशन, पुणे 30 
किंमत - 5 रुपये 

Tags: वस्तुस्थितिदर्शक सत्यशोधन अहवाल श्रीनिवास कुलकर्णी स्थलांतरित निर्वासित व घुसखोर लोकसभा निवडणूक प्रचार भ्रम आणि वस्तुस्थिती बांगलादेशी घुसखोर Srinivas Kulkarni Refugees and Infiltrators Migrants Lok Sabha Election Campaign Illusions and Facts Bangla Indigenous Infiltrators Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्रीनिवास कुलकर्णी,  गंगाखेड, जि. परभणी
| मोबा. 9890344547.

बचपन बचाओ आंदोलन


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके