डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बेजबाबदार सरकारी कर्मचारी आणि असहाय नागरिक

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा दबाव शासनावर सतत असतो. जनतेकडून कराच्या रूपात मिळणाऱ्या पैशाचा फार मोठा हिस्सा या कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते यांसाठी खर्च होत असतो. पण हेच कर्मचारी सर्वसामान्य माणसाला कशी वागणूक देतात व त्यापायी त्याची कशी गांजणूक होते हे दाखविणारी ही दोन उदाहरणे.

‘भारतीय टपालसेवा' फार कमी पैशात संदेशवहनाची उत्तम सेवा देते असे अभिमानाने सांगितले जाते व बऱ्याच अंशी ते खरेही आहे. परंतु सध्या 'टपालसेवा' कार्यालयात बँकेप्रमाणे पैशांची देवघेव, मुदतठेवी, बचत योजना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांचे काम वाढते, हे खरे असले तरी सामान्य ग्राहकांना कित्येक पटीने त्रास होत आहे. टपालसेवेतील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि नियमांविषयीचे अज्ञानच ह्या त्रासास पूर्णपणे कारणीभूत आहे. त्यांच्या अशा बेजबाबदारपणावर, अज्ञानावर पांघरूण घालण्यासाठी व सामान्य ग्राहकांना रडविण्यासाठीच टपालखात्याने नियम बनविलेले असावेत. 

टपालखात्याचे सर्व नियम हे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठीच आहेत असे बघितल्यानंतर 'अजब आपुले (?) सरकार' असे तर वाटतेच पण असे नियम: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 50 वर्षे टिकून आहेत हे पाहून मनस्वी चीड येते. हे नियम सामान्य माणसास अजूनही 'गुलाम' समजूनच बनविलेले दिसतात. आणि त्यामुळेच सध्याचे सरकार, सरकारी नोकरांच्या वागणुकीमुळे ब्रिटिश सरकारइतकेच नव्हे तर कांकणभर जास्तच जुलमी आहे असे वाटते. सरकारी योजना कागदोपत्री अतिशय आकर्षक, समाजोपयोगी व सामान्य नागरिकांच्या हिताच्या असतात. पण विसंगत कार्यवाहीमुळे प्रत्यक्षात त्या नागरिकांना कष्टप्रद होतात.... सरकारी नोकर ही एक नवी भयावह जात स्वातंत्र्यापासून दिवसेंदिवस फोफावत आहे व सर्व समाजपयोगी कामात, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात वारंवार अडसर अडचण बनत आहे. अशा प्रकारचे दुःखद अनुभव खूप जणांना येतात. 

तसेच काही अनुभव मी आज आपणा सर्वांसमोर मांडत आहे. आम्हांस ज्याप्रमाणे त्रास झाला तसा त्रास आपणास होऊ नये तसेच पुढील लेखावरून सरकारी अधिकाऱ्यांनी योग्य तो विचार करून कार्यपद्धतीत बदल घडवावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. समाजासाठी, गरिबांसाठी काहीतरी करावे अशी कळकळ असणाऱ्या आम्ही 10/12  समविचारी मंडळींनी एकत्र येऊन उमदा समाज विकास प्रतिष्ठान ची स्थापना 1994 साली केली. सुरुवातीस प्रत्येकाने वैयक्तिक दहा-दहा हजार रुपये खर्च करून पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या, महागाव- परभाची वाडी, ता. मावळ, जि. पुणे या डोंगरदऱ्यांत वसलेल्या एक हजार वस्तीच्या खेडेगावी समाजमंदिराची स्थापना केली. गेल्या 2/3  वर्षांत उमदा च्या सभासदांची संख्या 100 च्या वर गेली आहे. 

आरोग्यसेवा, कुटुंबनियोजन, वृक्षारोपण असे कार्यक्रम आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून गेली 3 वर्षे करीत आहोत. एकंदरीत कामाचा प्रतिसाद वाढत आहे. नवनवीन मंडळी ह्या कामात सहभागी होत आहेत. समाजामध्ये आजही चांगुलपणा, गरिबांविषयी कणव, चांगल्या कामास मदत करण्याची वृत्ती आहे पण ‘सरकारी' अडचणी अनंत आहेत. समाजसेवेचे काम निरंतर सुरू राहण्यासाठी Corpus fund (गंगाजळीची अतिशय गरज असते. त्यादृष्टीने आम्ही एकत्रित केलेल्या निधीमधून 60,000 रुपये टपालाच्या 'मासिक व्याज’ योजनेत ठेवण्याचे ठरविले. प्रथम 30/1/95 रोजी 30,000 रुपये भरून एक खाते व नंतर 22/2/95 रोजी 30,000 रुपये भरून दुसरे खाते उघडले. ह्या दोन्ही खात्यांवरील व्याज आमच्याच तिसऱ्या बचत (सेव्हींग्ज खात्यात दरमहा जमा होत होते. टपालखात्यात पैसे ठेवताना कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व फॉर्स भरून दिले होते. 

विश्वस्त मंडळाचा पैसे ठेवण्याविषयीचा ठराव खात्याचे कामकाज बघणाऱ्या कार्यकारी विश्वस्त सचिव, खजिनदार ह्यांच्या सह्या एकदा नव्हे, दोनदा सादर केल्या होत्या अशी तिन्ही खाती आमच्या संस्थेच्या नावाने अडीच वर्षे व्यवस्थित सुरू होती. सर्व व्यवहार, चेकपुस्तक आमच्या संस्थेच्या नावानेच होते. ह्या ठेवींच्या व्याजातून समाजपयोगी कामे काही प्रमाणात सुरू होती. सरकारकडे पैसे ठेवले म्हणजे 'विनधोक' असा विचार होता. व्याज कमी तरी मुद्दल सुरक्षित असे वाटत होते. परंतु 6 जून 97 रोजी एका पत्रान्वये आम्हांस असे कळविण्यात आले की, 'मासिक व्याज योजना’ खाती त्वरित बंद करा. त्यानंतर वेगवेगळ्या टपाल कार्यालयात वारंवार खेटे घातल्यानंतर, चौकशीअंती असे कळले की ‘मासिक व्याज योजना’ ही संस्थेसाठी, ट्रस्टसाठी नाही. 

ही खाती पोस्टाच्या नियमास धरून नाहीत. अर्थात हे नियम नागरिकांना बघता येत नाहीत किंवा त्याविषयी मासिक व्याज योजनेच्या माहितीपत्रकातही तसा उल्लेख नाही. बऱ्याच वादविवादानंतर आमची काहीही चूक नसताना आम्ही खाती बंद करण्याचे मान्य केले परंतु टपालखात्याच्या सेवकांनी आम्हांला दणकाच दिला. टपालखात्याच्या म्हणण्याप्रमाणे/नियमांप्रमाणे त्यांच्या सेवकांच्या चुकीमुळे जरी खाते उघडले गेले, त्यावर व्याज दिले गेले तरी अडीच वर्षानेसुद्धा सर्व खाती टपालखाते बंद करू शकते व सर्व भुर्दंड हा नागरिकांनीच सहन करावयाचा असतो. 

आमच्या संस्थेस अडीच वर्षात 13 टक्क्याने रु. 60,000  रुपयांवरती जे 19,000  रुपये व्याज मिळाले ते सर्व आमच्या 60,000  मुद्दलालून कापून घेऊन आम्हांला पोस्टखात्याने फक्त 41,000 रुपये परत केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एवढेच पैसे घ्यायचे तर घ्या, नाहीतर व्याजही मिळणार नाही व पैसेही अडकून पडतील. खरे तर ह्या योजनेच्या मुदतीअंती म्हणजे 6 वर्षाच्या अखेरीस (10 टक्के) म्हणजे रु. 6000 /- बोनसही मिळणार होता. त्याविषयी तर आम्ही बोलायचेसुद्धा नाही. आहे का नाही पठाणी व्यवहार? आता ह्या गोंधळाविषयी टपालखात्याच्या सर्व अधिकाऱ्यांशी, केंद्र सरकारच्या मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार, तक्रार केली आहे. परंतु न्याय मिळणार नाही ही खात्री असल्याने ग्राहक पंचायतीत दावा दाखल करणे हाच एक उपाय दिसतो. 

त्याचाही खर्च, त्रास दगदग वेळ आम्हीच खर्च करायचा कारण- 'समाजसेवेची आवड आम्हांला.' महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळही अशाच पद्धतीने लोकांना, नागरिकांना सळो की पळो, भीक नको पण कुत्रा आवर' अशा म्हणींचा अर्थ समजावून सांगते, आमच्या ‘महागावी' समाजपयोगी कामे करण्यासाठी 2 खोल्यांचे बांधकाम आम्ही देणगीरूपाने मिळालेल्या पैशातून व विश्वस्तांच्या वर्गणीतून 1994  साली पूर्ण केले तेथे वीज मिळण्यासाठी संस्थेतर्फे 95 साली रीतसर अर्ज केला. बऱ्याच कालावधी, भेटी-गाठी, चकरा मारल्यावर मंडळाने 'एस्टीमेट' दिले ते रु. 4500 /- मंडळाचा हिशोब पाहून पुन्हा एकदा धक्का. जे काम 200 ते 400  रुपयांत होईल असे सांगण्यात आले होते तेथे आमचा अंदाज साफ चुकला. 

चौकशीअंती कळले की मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वप्न पडले की त्या दोन खोल्यांत. हजार वस्तीच्या गावात, फार मोठ्या प्रमाणावर 'व्यवसाय सुरू होणार तेव्हा व्यावसाविक' दर लावा. पुन्हा भेटणे, खेटे मारणे सुरू, जीवाचे हालच- कारण काम महागावला. कार्यालय तळेगावला. मंजुरी कार्यालय खेडला तर तक्रार निवारण पुण्याला. बऱ्याच कालावधीनंतर पाहणी झाली' व जेथून जोड मिळणार ती जागा 125 फूट भरली. झाले! आमचे नशीबच खत्रुड! नियमानुसार 100 फुटापर्यंत जोड मिळतो. तुम्हांला नियमानेच काम करून पाहिजे मग पोल टाकावा लागेल. 'इस्टीमेट' देतो, पैसे भरा. कागदपत्रे... अर्ज वगैरे! पुन्हा ओळखी, भेटी, वेळेचा अपव्यय सगळे झाले, पोलसाठी पैसे भरले. 

अखेरीस 5/6 महिन्यांनी 'पोल' न टाकताच जोड' मिळाला व मंडळाच्या कृपेने समाज मंदिरात प्रकाश पडला. पोल टाकण्यासाठी दिलेले जास्तीचे पैसे वीजमंडळाच्या उदरात गुप्त झाले. ह्या ठिकाणी आम्ही महिन्यातून दोनदा दिवसाउजेडी जातो व रुग्ण-तपासणी, औषधे वाटप, आरोग्य शिक्षण देतो. त्यामुळे वीजेचा वापर महिन्यास जास्तीत जास्त 4-5 यूनिटस्. बरे सुदैवाने 'मीटर व्यवस्थित सुरू असून तीन वर्षांत वीजेचा वापर झाला आहे फक्त 40 युनिटस. पण मंडळाच्या अजब कारभारामुळे 18/8/96  ला बिल  आले रुपये 1450/- पवना-तळेगावला तासन्तास घालवून बिल दुरुस्त करून मिळाले व भरले रु. 63 /-. मंडळाच्या अजब व अचाट कारभारामुळे लगेच 16/11/96  ला बिल आले रु.2002 /-.बिल हातात पडून तक्रार/दुरुस्ती करण्याअगोदरच अतिशय तत्परतेने वीज तोडण्यात आली. 

पुन्हा तळेगाव-मंडळाच्या दारी. तेथे कोणी सकाळी 11 वाजल्याशिवाय येत नाहीत व सायंकाळी 4 च्या पुढे भेटत नाहीत. त्यामुळे जाता-येताना काम होण्याची शक्यता नाही. पूर्ण दिवस खर्च करून बिल दुरुस्त केले गेले. रु. 240 /- बिल भरले तरी आमची काहीही चूक नसताना वीज तोडली होती. ती जोडण्याचे पैसे आम्हीच भरले. वर विनंत्याही आम्ही केल्या. गुलामच आम्ही! करणार काय! वाटले, दोनदा गोंधळ झाला. आता तरी माणसे सावध होतील. पण ही मंडळी म्हणजे 'यमदूतां चे नातेवाईकच. पुन्हा 14/2/97  रोजी बिल  दिले रु. 2600 /-. आहे की नाही वेड लावणारा कारभार? मध्यंतरी वेळ झाला नाही तर 15/5/97 रोजी बिल मिळाले रु. 3125/- मग मात्र मी परस्पर रास्ता पेठ, पुणे येथील अधिक्षक अभियंता कार्यालयात जाण्याचे ठरविले. पण तेथील कारभार व साहेब थंडच थंड. 

मोठमोठया पार्टीबरोबर त्यांच्या तासन्तास बैठका सुरू. शेवटी साहेबांच्या खोलीत मी घुसल्यानंतर मला 'पोलिसात देण्याचा दम देण्यात आला. संरक्षक अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. परंतु मीसुद्धा पेटलेलोच होतो. प्रहार 'मधील' नाना पाटेकर चा 'अंश' माझ्यात आला होता. बऱ्याच गोंधळानंतर माझे म्हणणे ऐकण्यात आले. हे असेच चालायचे.... कनिष्ठ माणसे आमचे ऐकत नाहीत. त्यांच्या संघटना आहेत. राग मानू नका वगैरे वगैरे झाले. शेवटी कार्यकारी अभियंत्याने त्वरित तळेगावास फोन करून 'झापाझापी' केली. व चार दिवसांनी दुरुस्त केलेले बिल पुण्यात देण्याची व्यवस्था केली. धन्यवादच द्यायला हवेत. मी माझ्या मनाला बरेच दिवस विचारतोय- हे सर्व मी का करायचे? झाले एवढे ‘समाजकार्य' खूप झाले. पण मग आपल्यावर विश्वास टाकून देणग्या दिलेल्या देणगीदारांचा विश्वासघात केल्याचे पापही मनास त्रास देणार... मग पुन्हा मनाची ‘उभारी' आणतो व झगडत, रडत, त्रासत का होईना 'काहीतरी चांगले काम सुरू ठेवण्याचा निश्चय करून ‘सरकारी माणसांसमोर' जाण्याची मनाची तयारी करतो.

Tags: नाना पाटेकर समाजसेवा वृक्षारोपण कुटुंबनियोजन आरोग्यसेवा तळेगाव पुणे भारतीय टपालसेवा श्रीपाद दाबक Nana Patekar Social work Plantation family Palaning Healthcare Talegaon Pune Indian Post Service Shripad Dabak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके