डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 4 जानेवारी 1998 'आयडियल बुक डेपो' या संस्थेला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने तिचा इतिहास आणि तिचे सांस्कृतिक स्वरूप यांचा परिचय करून देणारा हा लेख.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नेरूर गावातील नारायण गणेश तथा नाना नेरूरकर नामक एका सामान्य सद्गृहस्थाने पुस्तकांच्या जगात स्वतःचे नशीब पणाला लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. वाट्टेल तेवढे कष्ट उपसण्याची मनोमन तयारी, चिकाटी आणि सचोटी हे कोकणी माणसाचे उपजत गुण नानांमध्ये होते. अशा तुटपुंज्या भांडवलाच्या बळावर नाना प्रथम पुण्यात व कालांतराने मुंबईत दाखल झाले.

 गिरगावातल्या एका बुक डेपोत त्यांनी आरंभी नोकरी केली. पुस्तक विक्री व्यवसायातले सगळे बारकावे त्यांनी आत्मसात केले. 'अवधूत बुक डेपो'च्या मालकाने ठाण्यातले आपले दुकान नानांना चालवावयास दिले. हळूहळू नानांनी स्वतःच्या मालकीचे दुकान थाटले. परळच्या कामगार वस्तीतही त्यांनी आणखी एक बुक डेपो सुरू केला. दादरमधील छबिलदास हायस्कूल समोरच्या इमारतीमध्ये नानांनी 4 जानेवारी 1937 रोजी - म्हणजे साठ वर्षापूर्वी स्वतंत्र गाळा घेऊन 'आयडियल बुक कंपनी' या नावाचे मोठे दुकान थाटले.
 
एव्हाना पुस्तकविक्री व्यवसायाचे उत्तम कसब आत्मसात केलेल्या नानांनी नंतरच्या चार दशकांत 'आयडियल'चा सर्वांगीण विकास साधला. गणेश, सदानंद, वामन व शंकर ही त्यांची चारही मुले वडिलांच्या तालमीत तयार होऊ लागली. शिस्त, वक्तशीरपणा, उच्च दर्जाची व्यावसायिक नीती व निष्ठा, कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा इत्यादी अंगभूत गुणांच्या बळावर 'आयडियल' हे नावाप्रमाणेच ग्रंथविक्रीचे एक आदर्श केन्द्र बनले. 

दुर्दैवाने नाना नेरूरकरांचे 1976 मध्ये अपघाती निधन झाले. नंतर व्यवसायाची जबाबदारी चौघा बंधूंनी उचलली. तेव्हापासून आजच्या हीरकमहोत्सवी वर्षापर्यंत 'आयडियल बुक कंपनी'ने सतत उत्कर्षाच्या दिशेनेच दमदार वाटचाल केली आहे. पाठ्यपुस्तक विभाग, स्टेशनरी विभाग, 'पुस्तक त्रिवेणी' नामक ललित पुस्तकांचा विभाग आयडियलच्या उत्कर्षाचे द्योतक आहेत. 

'आयडियल आणि कांताशेठ नेरूरकर' हे समीकरण तर पुस्तकांच्या जगात आता सर्वतोमुखी झाले आहे. वामन उर्फ कांताशेठ हे नानांचे तिसरे सुपुत्र आणि शंकर उर्फ छोटूशेठ हे चौघा भावांमध्ये सर्वात धाकटे, नेरुरकर यांच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी - मंदार - हाही आज आपल्या पित्याच्या व काकांच्या बरोबरीने याच व्यवसायात अहोरात्र राबतो आहे. हीरकमहोत्सव साजरा करण्याइतपत दीर्घायुष्य लाभलेल्या आयडियल बुक कंपनीचे स्वरूप पुस्तकविक्री पुरतेच मर्यादित नाही. कांताशेठ नेरूरकर आणि बंधूंच्या लोभस स्वभावगुणांमुळे आज 'आयडियल-त्रिवेणी' हे महाराष्ट्रातल्या मातब्बर लेखक-प्रकाशकांचे माहेरघर बनले आहे. 

आयडियल हे पुस्तके विकण्याचे केवळ एक दुकान नाही : तर कवी, लेखक, प्रकाशक, पत्रकार आणि ग्रंथवितरक मंडळींच्या विसाव्याचे आणि वाङ्मयीन घडामोडींचे एक सांस्कृतिक केन्द्र ठरले आहे. विशुद्ध, आनंददायी गप्पाष्टकांचा हा एक 'कट्टा' झालेखा आहे. प्रत्येक महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी 'आयडियल पुस्तक त्रिवेणी' तर्फे भरणारा स्तंभलेखकांचा मेळावा हे त्याचेच द्योतक आहे. साहित्य, रंगभूमी, उद्योग, शिक्षण, कला इत्यादी विविध क्षेत्रांत ज्यांनी उल्लेखनीय कार्य-कर्तुत्व दाखविले आहे, अशांपैकी एखाद्या महनीय व्यक्तीस येथे मुद्दाम पाचारण केले जाते. विचारांची देवाणघेवाण होते. या उपक्रमामागची उत्सवमूर्ती असते कांताशेठ. 

कांताशेठ हे यशस्वी व्यावसायिक आहेत हे सिद्धच झाले आहे. तथापि, ते माणसांचे अभिजात लोभी गृहस्थ आहेत. मुंबई-पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक साहित्य श्रेष्ठांचा विश्वास आणि प्रेम कांताशेठ मिळवू शकले ते मुळात वाङ्मयाबद्दलच्या त्यांच्या उपजत प्रेमामुळेच. 

एखादी संस्था एकसष्टीत पदार्पण करते तेव्हा ती घटना समाजजीवनाच्या व्यापक संदर्भात विशेष स्पृहणीय ठरते. 'आयडियल बुक कंपनी'च्या हीरकमहोत्सवास एकूणच मराठी पुस्तकांच्या जगात आणि साहित्याच्या संदर्भात म्हणूनच एक आगळेवेगळे परिमाण लाभले आहे. याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. 

आयडियलच्या आजच्या उज्ज्वल यशामागे संपूर्ण नेरूरकर बंधुचे अथक परिश्रम, निष्ठा, सचोटी आणि सुदीर्घ तपश्चर्या उभी आहे. यश, धनदौलत, प्रतिष्ठा उदंड मिळविली तरी हे कुटुंब आपल्या गिऱ्हाईकांपुढे सदैव विनम्रच असते. म्हणूनच सकाळपासून रात्रीपर्यंत आयडियलच्या सगळ्या काऊंटर्सपुढे गिऱ्हाईकांची झुंबड उडालेली दिसते. वर्षागणिक गर्दी वाढतेच आहे. व्यापार उद्योगात मराठी माणूस मागे का, यावर भरपूर चर्वितचर्वण नेहमी होते. 'व्यापार उद्योगात मराठी माणूस का नि कसा पुढे' गेला या प्रश्नाचे चालते बोलते उत्तर हवे असेल तर 'आयडियल कडे पाहा!

Tags: कांताशेठ नेरुरकर नाना नेरुरकर आयडियल बुक कंपनी पुस्तक विक्रेते वाचन साहित्य Shriram borkar reading literature kantasheth nerurkar nana nerurkar ideal book company ideal book depo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके