डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वसंतरावांच्या गायनाच्या दर्जाबद्दल वादच नव्हता. ते अभिनेतेही फार चांगले होते. पण खडकीच्या ऑर्डनन्स डेपोत कारकुनी आणि फावल्या वेळात गाणे अशी कसरत या भारतातल्या श्रेष्ठ गवयाला करावी लागत होती.

या काळात रंगायनचे एकांकिकांचे कार्यक्रम चालूच होते. खुर्च्या, चार दिवस, पुढारी, अजगर-गंधर्व वगैरे एकांकिका विजयाबाईनी रंगायनकरिता बसवल्या होत्या. त्यांचे प्रयोग चालू होते. रंगायनने आता वार्षिक सभासद योजना सुरू केलेली होती. प्रेक्षक सभासदांकडून दरवर्षाची काही ठराविक वर्गणी घ्यायची आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभरात चार-सहा कार्यक्रम द्यायचे अशी ती योजना होती. संस्थेची आर्थिक बाजू थोडीफार बांधली जावी ही कल्पना तर या योजनेमागे होतीच, पण त्याचबरोबर, आपला समविचारी प्रेक्षकवर्ग किती आहे त्याचा अंदाज यावा आणि तो वाढविण्याची खटपट करावी असाही दूरगामी विचार त्यात होता. आपल्याला नवीन नाटक निर्माण करायचे आहे, त्याचे पालन, पोषण, वर्धन करायचे आहे. त्याकरिता नव्या जाणिवेचा प्रेक्षकवर्गही तयार करायचा आहे; आणि हे काम वर्षानुवर्षे चालणारे आहे याचे स्पष्ट भान रंगायनच्या रूपाने, प्रथमच रंगकर्मींना आले होते.

नाटके किंवा एकांकिका करीत राहणे, याचरोबर नाटकाशी संबंधित असलेल्या सगळ्याच कलांची, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला इत्यादी....जाण वाढवण्याचा प्रयत्न करावा हाही रंगायनच्या योजनेचा भाग होता. हे तर मला फारच महत्त्वाचे वाटले. मी पुण्यात स्थायिक असल्यामुळे, रंगायनने मुंबईबरोबरच पुण्यातही हातपाय पसरावेत आणि त्याकरता माझा उपयोग त्यांनी करावा है क्रमप्राप्त होते. एवढा विश्वास रंगायनने माझ्यावर टाकावा इतके ते मला ‘आपला’ मानू लागले होते- आणि मीही अगदी सहजपणे या सगळ्यात सामील झालो. मला घेऊन करता येईल असे नाटकही लवकरच विजयाबाईंना मिळाले. तेंडुलकरांनीच लिहिलेले होते. “मी जिंकलो, मी हरलो!”  नाटक छानच होते- पण खास तेंडुलकरी पद्धतीचे नव्हते!  एव्हाना तेंडुलकरांच्या अनेक एकांकिका प्रसिद्ध झालेल्या होत्या. ‘श्रीमंत’, ‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’ वगैरे नाटकेही आली होती. आणि तेंडुलकरांची स्वतःची एक अगदी वेगळी शैली सिद्ध झाली होती. अगदी बोलीभाषेतील, घरगुतीच वाटतील असे अल्पाक्षरी पण आशयघन संवाद प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनात खोल उतरण्याची तयारी, आणि तिथे जे दृष्टीस पडेल ते सच्चेपणाने समोर मांडण्याची तयारी, सहसा आसपास दिसणारी मध्यमवर्गीय माणसे आणि त्यांची तीव्र मानसिक दंव्दे, सामान्य माणसांच्या सामान्य वाटणाऱ्या समस्या आणि त्यामुळे पार पिळवटून जाणारी आयुष्ये, अशा माणसांना त्यांच्या समस्यांच्या ओझ्यासकट जगत रहावे लागावे हीच त्यांची शोकांतिका! असा काहीसा करुण-गंभीर पण खूप अस्वस्थ करून टाकणारा आशय तेंडुलकर मांडत असत.

नाटकाला घटनाप्रधान कथानक असे फारसे नसेच. मराठीतला सर्वात सिद्धहस्त नाटककार हे बिरुद वसंत कानेटकरांना त्यांच्या अलीकडच्या नाटकांच्या प्रचंड यशाने मिळवून दिले होते. पण, मराठीतला सर्वात लक्षणीय नाटककार, स्वतंत्र, स्वयंभू प्रतिभेचा नाटककार या दृष्टीने महाराष्ट्र तेंडुलकरांकडेच पहात होता. व्यावहारिक यश तेंडुलकरांच्या वाट्याला अद्याप आलेलेच नव्हते, पण त्याची त्यांना पर्वा होती असेही दिसत नव्हते. ‘मी जिंकलो’ ला चक्क कथानक होते, विनोदी प्रवेश होते, स्वगते होती! व्यावहारिक यश मिळावे म्हणून तेंडुलकरांनी जाणूनबुजून कानेटकरांच्या कारखान्यातला माल काढला आहे की काय असे वाटून गेले! नाटक खूपच लांबलचक होते. बरीच काटछाट करून विज्ञयाबाईंनी ते बेताचे केले- आणि ते बरेचसे तेंडुलकरी वाटू लागले. रंगायनच्या नाटकात मी काम करण्याबद्दल पुन्हा एकदा भालवांशी वाद झाला. कुरकुरत का होईना पण भालवांनी परवानगी दिली. अर्ध्या तासाची एकांकिका बसवणे वेगळे होते आणि तीन तासांचे, दहाबारा पाने असलेले नाटक बसवणे वेगळे. तालमी खूप कराव्या लागणार होत्या. मी फक्त आठवड्यातून एकच दिवस मुंबईला जाऊ शकणार होतो. बाकीचे सहा दिवस पोटापाण्याचा उद्योग करणे भाग होते! बाई म्हणाल्या, "काळजी करायची नाही. भरपूर तालमी करून नाटक नीट बसले म्हणजेच बाहेर काढू. आपल्याला काय घाई आहे?" तीन-चार महिने तरी मुंबईला फेन्या माराव्या लागणार होत्या. या वेळी माझ्याबरोबर महाराष्ट्रातले एक श्रेष्ठ, अवलिया गायक वसंतराव देशपांडे असणार होते ! त्यांनाही बाईंनी नाटकात काम करायला तयार केले होते.

नाटकात नायकाचा (म्हणजे माझा) एक गायक मित्र असतो आणि तो नाटकातल्या एका प्रवेशात नायकाच्या आग्रहावरून, एक ठुमरी म्हणतो असा प्रसंग होता. अर्थातच वास्तववादी नाटकात गाताना पेटी, तंबोरा वगैरे साथ चालणार नव्हती. आणि साथीच्या सुरांशिवाय ठुमरी गाणारा नट म्हणजे अव्वल दर्जाचा गायक असणे आवश्यक होते. वसंतरावांच्या गायनाच्या दर्जाबद्दल वादच नव्हता. अखिल भारतीय श्रेष्ठ गवयांत त्यांची गणना होती. पण माणूस खडकीच्या ऑर्डनन्स डेपोत कारकुनी करत होता. आपली नोकरी आणि फावल्या वेळात गाणे, याबाहेर जग नव्हते. बाईंनी हा हिरा कसा हेरला आणि सदाशिव पेठेतल्या त्यांच्या चाळीत खेटे घालून त्याला कसा प्रकाशात आणला याचे मला फार कौतुक वाटले. वसंतराव अभिनेते म्हणूनही फार चांगले निघाले. त्यांचे माझे छान मेतकूट जमले. अंतर्बाह्य स्वच्छ निर्मळ माणूस. त्यांच्या चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात गेले म्हणजे अगत्याने फाटक्या सतरंजीवर, गुंडाळलेल्या गादीला टेकवून बसवणार, कानतुटक्या कपातून चहा देणार, समोर पानाचे तबक ठेवणार... आणि दिलखुलास गप्पा. एकूण वागण्यात आव असा की वाटावे, एखादा महाराजा आपले स्वागत करतो आहे! नाटकातल्या ‘त्या’ प्रवेशात वसंतराव ठुमरी तर इतकी अप्रतिम गायचे की ऐकताना त्यात रंगून गेल्याचा अभिनय असा करावाच लागायचा नाही, आपोआपच तंद्री लागायची वसंतराव गातायत आणि मी ऐकून वैतागलोय असा जर नाटकात प्रसंग असता तर मात्र ती माझ्या अभिनयाची सत्त्वपरीक्षाच ठरली असती ! आम्ही दोघे पुण्याहून एकत्र मुंबईला जायचो. दिवसभर तालीम करायचो आणि रात्रीच्या पॅसेंजरने पुण्याला परतायचो.

दिवसभर तालमीत वसंतराव म्हणजे उत्सवमूर्ती असायचे. विनोदी किस्से, नकला आणि गाणे - धमाल चालायची, पुण्यात मात्र आम्ही आपापल्या जगात असायचो- त्यांची नोकरी आणि माझी प्रॅक्टिस. एक दिवस माझ्याकडे पेशंट म्हणून आले. खोकला झाला होता. कोरडा होता. आडवे पडले की जास्त व्हायचा. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने सांगितले होते, नाक-कान, घशाच्या स्पेशालिस्टला दाखवायला. ‘तो तर म्हटलं, घरचाच आहे...म्हणून तुला त्रास द्यायला आलो.' वसंतराव म्हणाले. मी घसा पाहिला, पडजीभ खूपच लांबली होती. खाली जिभेवर येऊन लोळत होती. मी म्हणालो वसंतराव, पडजीभ फार वाढलीय. कापावी लागेल!’ “बापरे! म्हणजे भूल-बिल द्यावी लागेल की काय?" वसंतराव जरा घाबरलेले दिसले. मी म्हटले, "नाही-नाही. हे आता आपण समोरासमोर बसलोत ना तसेच बसायचे. तुम्ही आ करायचा. मी एक बारीकसं इंजेक्शन देईन घशात. आणि एक मिनिटात पडजीभ कापून टाकीन." मी अगदी मुरलेल्या सर्जनप्रमाणे घाबरलेल्या पेशंटला धीर देत म्हणालो, आपल्या व्यवसायाशी संबंध आला की वैयक्तिक नाती सगळी विसरायला होतात. आपण सर्जन, समोर बसलेला तो रुग्ण त्याची वाढलेली पडजीभ हे लक्ष्य! आपसूकच येते ही अवस्था. त्यासाठी काही प्रयत्न करायला लागत नाही. “अरे मग आत्ताच कापून टाक ना! रात्री झोप तरी लागेल चांगली." वसंतराव क्षणाचाही विचार न करता म्हणाले. आणि मी एकदम दचकून भानावर आलो. काळीज एकदम धडधडू लागलं. ‘आपण कुणासमोर बोलतोय?’ समोर बसलेला रुग्ण नाही. वसंतराव देशपांडे आहेत. भारतातले एक श्रेष्ठ गायक. त्यांच्या घशात तू कात्री घालणार? त्यांचा आवाज गेला म्हणजे? “देशातले संगीतप्रेमी लोक तुला फाडून खातील!" माझे हातपाय लटलटू लागले. मी वसंतरावांना म्हटले, ‘वसंतराव आज नको आज तुम्ही पान खाऊन आला आहात. उद्या पान न खाता या. उद्या कापूया.' चांगली सबब सुचल्याने मी सुटकेचा श्वास टाकला. दुसऱ्या दिवसापर्यंत मी चांगला सावरलो होतो!

एकदा सकाळी हॉस्पिटलला जायच्या तयारीत होतो. बाहेरून वसंतरावांची हाक आली 'डॉक्टर, एक पाहुणे घेऊन आलो.' मी पाहिलं तर दारात वसंतरावांच्या बरोबर साक्षात कुमार गंधर्व उभे! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझी अवस्था म्हणजे ‘पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी ! माझे कुमारांच्या गाण्यावरचे टोकाचे प्रेम वसंतरावांना माहीत असल्याने ते मिष्किलपणे गालातल्या गालात हसत, माझी तारांबळ पाहात उभे! मला काय बोलावे हेच सुचेना. माझी एकूण अवस्था पाहून वसंतरावांनीच गप्पा मारून कशीबशी माझी लाज राखली. कुमारांची ही माझी पहिली भेट! पुढे काही वर्षांनी मी आफ्रिकेला जायला निघालो तेव्हा निरोप घ्यायला मी वसंतरावांकडे गेलो. ‘तुमच्याकरता काय आणू वसंतराव?" मी विचारले. ते म्हणाले, ‘मोंबासाला जात असलास तर थोडे केशर आण माझ्यासाठी. ‘मी टांझानियाला जातोय बुवा : दारेसलामला.' मी म्हणालो, ‘मग राहू दे. दारेसलामला काय मिळतंय ? समुद्रावरची रेती ! पण तू मात्र परत ये हो. तिकडच्या काळ्याशार बायका फार डेंजरस असतात!' असं म्हणत ते मिष्किल हसले. पण मी आफ्रिकेतून परतताना बोटीने आलो. आणि आमची बोट चक्क मोंबासाला थांबली. वसंतरावांचे केशर घेण्याकरता!

आफ्रिकेतून परतलो त्या वेळी वसंतराव नोकरी सोडून व्यावसायिक नट आणि गायक झाले होते. मी त्यांचे ‘कट्यार काळजात घुसली' पाहिले आणि थक्कच झालो. केवढा मोठा संगीत नट! गाणे आणि अभिनय दोन्ही अप्रतिम आणि या माणसाने आयुष्यातला एक उमेदीचा काळ खडकीला कारकुनी करण्यात घालवला. आमचे भाग्यच म्हणायचे की आमच्यासारख्या हौशी नटांबरोबर याने अगदी बरोबरीच्या नात्याने एकदा तरी काम केले 

वसंतराव नाट्यपरिषदेचे अध्यक्ष झाले. त्या वेळी मी पूर्णवेळ नट झालो होतो. वसंतरावांचे अभिनंदन करायला फुले घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. आता जुन्या चाळीतून ते एरंडवण्याला त्यांच्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. घरात लक्ष्मी नांदायला आली होती. खूप खुशीत होते. उशीरा का होईना त्यांचा हक्काचा सन्मान त्यांना मिळत होता. मला पाहताच आनंदाने त्यांनी मला मिठीच मारली. आत बघून हाक दिली. ‘अगंS, आपल्या घरी बघ नटसम्राट आलाय. बेसनाचा लाडू आण त्याला एक आणि मला पण एक दे! ‘तुम्हांला नाही हं मिळायचा! डॉक्टरांनी बंदी केलीय' आतून वहिनींचा आवाज. चल, चल. त्या डॉक्टरला काय कळतंय? हा त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टर आहे. आणि शिवाय कोकणस्थ ब्राह्मण ! हा इथे असताना काय बिशाद आहे त्या बेसनाच्या लाडवाची?' व मधुमेह असताना वसंतरावांनी अत्यंत खुशीत आख्खा बेसनाचा लाडू खाल्ला. ती माझी त्यांची शेवटी भेट. अचानक एक दिवस गेलेच ते.

(क्रमशः)

Tags: तेंडूलकर वसंत कानेटकर वसंतराव देशपांडे श्रीराम लागू Tendulkar Vasant Kanetkar Vasantrao Deshpande Shreeram Lagu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके