डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका क्षणी तर दत्ता भट नावाचा दुःशासन माझे शब्दहरण करतो आहे आणि भगवान श्रीकृष्ण मला शब्दामागून शब्द नेसवतो आहे, असे चित्र मला लख्ख दिसले.

दुसरा मोठा नट बाईंनी ‘मी जिंकलो’ मध्ये घेतला होता. तो म्हणजे दत्ता भट, भट मूळचे नाशिकचे होते आणि नाशिकच्याच ‘ऑथेल्लो’ नाटकात त्यांनी केलेली ‘वागो’ ची भूमिका भी पाहिली होती. ती भूमिका त्यांनी थोड्या कृत्रिमपणे, काही हिशेब मांडून केली होती. आणि ‘ऑथेल्लो’ चे काम करणाऱ्या बाबूराव सावंताचा आवाज त्या दिवशी साफ बसला होता याचाही ताण भटांना थोडाफार जाणवत असणार. पण एकूण नट म्हणून त्यांच्या ताकदीचा अंदाज येत होता. बाईंना तर ते नट म्हणून माहितही होते. 

दत्ता भटांनी नायिकेच्या (विजयताई) वडिलांचे म्हणजे माझ्या सासऱ्याचे काम केले होते. मुळात ते काम माधव वाटवेने करावे असे वाटत होते. माधवने ते काम छानच केले असते. रंगायनच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून माधव हा रंगायनचा एक महत्त्वाचा घटक होता. विजयाबाईंचा सर्वात विश्वासू सहकारी, उत्तम बुद्धिमत्ता, भरपूर वाचन, प्रथम दर्जाचे अभिनयकौशल्य आणि विजयाताईवर... त्यांच्या कार्यावर अविचल निष्ठा या त्याच्या गुणांमुळे खरे म्हणजे तो रंगायनचा सर्वात महत्वाचा नट असायचा, पण त्याची देहयष्टी किरकोळ होती, महत्त्वाकांक्षा त्याला अजिबात नव्हती, पुढे पुढे करण्याची वृत्ती नव्हती, सदैव स्वतः त गुरफटलेला असायचा कपाळावर आठ्यांचे एक घनदाट जाळे असायचे की सदैव विश्वाच्या चिंतेत गढल्यासारखा दिसायचा, अबोल इतका की चार चौघांत बोलावे लागू नये म्हणून बहुधा तोंडात सदैव तंबाखूचा बार भरलेला असायचा. विलक्षण तल्लक अशी विनोदबुद्धी त्याला होती... पण आपण केलेला विनोद आसपासच्यांना कळेल की नाही या चिंतेने बोलायचाच नाही. एखादा विनोद आवडला की मात्र तोंडातला तंबाखूचा रस सांभाळत इतके गोड हसायचा आणि डोळ्यांत अशी काही खट्याळ चमक यायची की नेहमीचा चिंतातूर जंतू माधव क्षणार्धात नाहीसा होऊन त्या जागी एक निर्व्याज, गोंडस हसरे मूल समोर उभे रहायचे! अबोल, बुजरा वाटणारा माणूस आतून खूप सखोल आहे हे जाणवायचे. त्याच्या व्यक्तिमत्वात ते जाणवायचे तसे त्याच्या अभिनयातही ते जाणवायचे. 

माधवने ती भूमिका करण्याचे नाकारले. त्याचे कारणही त्याच्या स्वभावाला धरूनच होते ती व्यक्तिरेखा हुबेहूब माधवचे वडील संस्कृतचे प्रख्यात पंडित, प्रा. के.ना.वाटवे यांच्यावरून बेतली गेली होती. विचार करण्याची आणि मांडण्याची पद्धत, खूप साहित्यिक शब्दांचा वापर, वाक्य बोलता बोलता मध्येच सोडून देण्याची लकब इत्यादी अगदी उघड उघड प्रा. के. ना. वाटवे यांचेच होते, आणि माधव तर पुष्कळसा दिसतही असे त्यांच्यासारखा! आपल्या स्वतःच्याच वडिलांचे सोंग नाटकात काढणे हे त्याच्या ऋजू स्वभावाला पटणे शक्यच नव्हते. त्याने ती भूमिका करायला नकार दिला आणि अर्थातच विजयाबाईंनी आणि तेंडुकरांनी अत्यंत समजूतदारपणे तो नकार स्वीकारला. होकार येईल अशी त्यांचीसुद्धा अपेक्षा नसणार! प्रा. वाटवे त्यावेळी हयात होते आज तीस वर्षानंतर तेही नाहीत, आणि माधवही नाही. प्रा. वाटवे प्रदीर्घ कृतार्थ आयुष्य जगले. माधव मात्र अकाली गेला. रंगायनची मोडतोड झाल्यावर त्याने व्यावसायिक रंगभूमीवर आणि दूरदर्शनवर मालिकांमधून आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविली. माधव वाटवे हा एक मोठा नट आहे हे जे गुपित फक्त रंगायनच्या वर्तुळात माहीत होते ते सर्वज्ञात झाले. माधवच्या हक्काची प्रसिद्धी आणि सन्मान त्याला आता मिळणार अशी खात्री वाटत असतानाच माधव अचानक गेला. शेवटीशेवटी, अभिनयशास्त्रावर एक ग्रंथ लिहायला त्याने घेतला होता. तो जेव्हा प्रकाशात येईल तेंव्हा महाराष्ट्र माधव वाटवे या नटाची बुद्धिमत्ता आणि व्यासंग पाहून चकित होईल. फक्त ते पहायला माधव नसेल.

दत्ता भटांचीही बुद्धिमत्ता आणि अभिनयकौशल्य दांडगेच, ते सारे पणाला लावून भटांनी या भूमिकेचे सोने केले. सुरुवातीला ते रंगायनच्या मुंबईकर चमूत जरा बुजल्यासारखे वागायचे. विजयाबाई, तेंडुलकर थोड्याफार प्रमाणात मी, या मंडळींच्या अस्तित्वाचे थोडे दडपण त्यांच्यावर असायचे. पण त्यांच्या गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे ते फार लवकर रंगायनमध्ये रुळले. आणि एकदा मोकळे झाल्यावर, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष तालमी यांच्या जोरावर त्यांनी आपल्या भूमिकेला अशी काही झळाळी आणली की नायक नायिका (मी आणि विजयाबाई) यांच्यापेक्षा भटांच्या भूमिकेचीच जास्त चर्चा झाली. वसंतरावांनी गायलेली ठुमरी ऐकायला आणि भटांचे काम बघायला लोक ‘मी जिंकलो- मी हरलो’ नाटक पाहू लागले.

‘मी जिंकलो- मी हरलो’ चा विषय तसा चाकरीबाहेरचाच. एक प्रतिभावान कलाकार सभोवतालच्या कलाबाह्य, व्यावहारिक जगाच्या अनेक ढोबळ आणि सूक्ष्म दडपणापोटी यशाच्या मागे लागून आपली प्रतिभा कशी गमावून बसतो, आपला आत्मा कसा विकून टाकतो... आणि शेवटी उत्तुंग व्यावहारिक यश मिळवूनदेखील कसा भंगून जातो, असा मानवी मनोव्यापारांचा शोध घेणारा तरल विषय. पण नाटकाची गुंफण तेंडुलकरांनी इतकी सुगम तऱ्हेने केली आहे की त्यांतल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या प्रसंगांनी, जिवंत व्यक्तिरेखांनी, कथानकाच्या सरळपणाने, विनोदी प्रवेशांनी आणि खास तेंडुलकरी संवादांनी ते नाटक सुबोध वाटते आणि एक कौटुंबिक नाटक म्हणून परिणामकारक वाटते. त्या काळी ते नाटक लोकांना आवडले, तेंडुलकर या नावाचा चांगलाच दबदबा नाटककार म्हणून, एकांकिकाकार म्हणून निर्माण झाला होता. पण त्यांना ‘यश’ हे प्रथम ‘मी जिंकलो... मी हरलो’ या नाटकाने दिले. अर्थात व्यावसायिक किंवा आर्थिक यश असे ते नव्हतेच, कारण एक तर एका प्रायोगिक नाट्यसंस्थेने ते नाटक केलेले होते... त्यामुळे आर्थिक यशाचा प्रश्नच नव्हता. पण हौशी नाटसंस्थाचे एका नाटकाचे दोनचार प्रयोग होण्याच्या त्या काळात ‘रंगायन’ त्या नाटकाचे पन्नासच्या आसपास प्रयोग करू शकले. संस्थेला आणि नाटकाला (पर्यायाने नाटककाराला) लोकप्रियता निश्चित मिळाली. आचार्य अत्र्यांनी तर त्यांच्या दैनिक मराठामध्ये अग्रलेख लिहून हे नाटक कसे मोठे आहे हे सांगितले.

प्रभाकर पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदात’ या व्यवसायीक संस्थेने हे नाटक व्यावसायिक म्हणून करण्यासाठी मागितले होते. विजयाबाईंच्या मनातही तसे होते. पण तीस-एक प्रयोग वर्षभरात झाल्यामुळे ‘रंगायन’ च्या सगळयाच सदस्यांचा त्या नाटकावर (आणि त्याला मिळालेल्या यशावर!) जीव जडला होता. त्यामुळे सर्व मंडळींनी (माझ्यासकट) नाटक व्यावसायिकांना देण्याचा प्रस्ताव हाणून पाडला. पी.डी.ए.ची ‘जगन्नाथाचा रथ’ आणि 'वेड्याचं घर उन्हात’ ही नाटके प्रायोगिक क्षेत्रात उत्तम चालली होती. पण ती कुणा व्यावसायिकाने करण्याची इच्छा व्यक्त केली नवती!

नाटकाचे प्रयोग बरेच होऊ लागले आणि सगळ्यांच्याच मनावरचा ताण खूप सैल झाला. वाजवीपेक्षा जरा जास्तच सैल झाला म्हटले पाहिजे. कारण पुण्याच्या एका प्रयोगात दत्ता भट वेळेवर प्रवेश करण्याचेच विसरले ! पहिल्या अंकात भटांचा सुरुवातीचा प्रवेश संपल्यानंतर जवळजवळ अंक संपेपर्यंत, मध्ये त्यांना काहीच काम नसे. अंक संपण्याच्या काही वेळ आधी त्यांचा प्रवेश असे आणि मग नंतरच्या भागात अंकाला एक वेगळीच कलाटणी मिळे. रंगमंच्यावर पात्रे फक्त दोन. मी आणि वसंतराव देशपांडे. नुकत्याच संपवून आलेल्या नाटकाच्या प्रयोगात मी माझ्यामते फार चांगले काम केलेले आणि त्यामुळे मी अत्यंत खुशीत आहे. त्या खुशीच्या भरात मी माझ्या जिवश्चकंठश्च मित्रापाशी (वसंतराव) कामात वारा भरलेल्या वासरासारखा वेफाम बडबड करतो आहे.

एकूण नाट्यजगतात कशी क्रांती व्हायला पाहिजे आणि ती माझ्याच हातून कशी होणार आहे या अर्थाची आशयघन बडबड मी अगदी बालिश उत्साहाने उचंबळून करतो आहे. त्यातल्या एका क्षणी माझे सासरे (भट) दारात येतात आणि त्यांच्या रूक्ष पद्धतीने हाक मारून ते मला एकदम जमिनीवर आणतात, माझा मित्र, एकूण रागरंग ओळखून निघून जातो आणि मग नंतर मी आणि भट यांचा संवाद. असा प्रसंग. त्या दिवशीच्या प्रयोगात, ज्या विशिष्ट वाक्याला भटांनी प्रवेश करायला हवा होता तो केलाच नाही. ते वाक्य संपता संपता भटांची हाक कानावर येणार आणि मी मागे वळून पहाणार हे इतके सवयीचे झाले होते की वाक्य संपल्याबरोबर भटांनी हाक मारलेली असणार हे गृहीत धरून भी मागे वळून दाराकडे पाहिले. भट बेपत्ता! दारात कुणीच नाही! भट आल्याशिवाय नाटक पुढे जाणे शक्य नव्हते. नाटककाराने लिहिले संवाद संपले होते. पण नाटकात खंड पडलेला प्रेक्षकांना जाणवू देता कामा नये. सेकंदभरात मी पुन्हा वसंतरावांकडे ताडकन् वळलो आणि पूर्वीच्याच उत्साहात, पूर्वीच्याच वेगात, पूर्वीच्याच विषयाचर, पूर्वीच्याच भाषेत.... पण चक्क पदरचे संवाद बोलू लागलो!

वसंतरावही भयंकर नर्व्हस होऊन वारंवार रिकाम्या दाराकडे पाहू लागले, सुदैवाने त्यांना बोलायचे काहीच नव्हते. आणि भट येईपर्यंत मला बोलणे थांबवता येत नव्हते. किती वेळ बोलत होतो, काय बोलत होतो... काही आठवत नाही. विषयाला धरून बोलत होतो .. कदाचित तेंडुलकरी भाषेतही बोलत होतो, कारण प्रेक्षकांना काहीच वावगे वाटत नव्हते. मी मात्र काही सेकंदातच घामाने धबधबलो होतो. मनात विचार येत होते ते, मी जे बोलत होतो त्याच्या उलट्या टोकाचे, कारण विचार येत होते की भटांना काय झाले असेल? आजारी झाले असतील? काहीतरी गंभीर प्रकरण असल्याशिवाय भट असे करणार नाहीत! भट आले नाहीत तर काय करावे? विचार एका दिशेने धावताहेत- बोलणे दुसऱ्याच दिशेने धावते आहे. बरे, त्या बोलण्यालाही विचारांचे पाठबळ असलेच पाहिजे त्याशिवाय बोलणे विषयाला धरून, विशिष्ट शैलीला धरून, विशिष्ट लयीला धरून कसे होईल ? बोलत तर राहिलेच पाहिजे. एका क्षणी तर दत्ता भट नावाचा दुःशासन माझे शब्दहरण करतो आहे. आणि भगवान कृष्ण मला शब्दांमागून शब्द नेसवतो आहे. असे चित्र मला लख्ख दिसले!

शेवटी एकदाचे भट प्रवेश करते झाले, आणि जणू काय काहीच घडले नाही अशा थाटात नाटक पुढे सुरू झाले. मध्यंतरात भटांनी खुलासा केला की ते तळघरात असलेल्या मेकअप रूममध्ये तंबाखू लावून बसले होते आणि वर रंगमंचावर चाललेले संवाद त्यांना ऐकू येत नव्हते! कधी नव्हे ते तेंडुलकर स्वतः प्रेक्षागृहात मागे उभे राहून त्यादिवशी नाटक पाहात होते. स्वतःचे नाटक ते कधी बघत नसत. ते अंक संपल्यावर आत आले आणि मला म्हणाले, “तुम्ही मला चांगलंच तोंडघशी पाडलंत!” मी बाहेर उभ्याउभ्या नाटक पाहात होतो. माझ्याशेजारी उभ्या असलेल्या मित्राला मी म्हणत होतो की, ‘हा डॉक्टर, एकमेव असा नट आहे की जो लेखकाने लिहिलेला एकही शब्द इकडे-तिकडे न फिरवता नाटकातले संवाद म्हणतो. कधीही पदरचा एक शब्द घुसडत नाही!’ आणि हे माझं वाक्य पुरं होतंय न होतय तो तुम्ही असं काही बोलायलात की ते नाटकात मी लिहिल्याचं अजिबात आठवेना! भले शाब्बास! 

दत्ता भटांनी मला अभिनयातला एक फार मोठा धडा शिकवला होता! वर सांगितलेला प्रसंग कोणत्याही नटावर केव्हाही येऊ शकतो आणि त्यासाठी त्याने सदैव तयार राहिले पाहिजे हे मला तोपर्यंत जाणवलेच नव्हते.... आणि म्हणून आयत्या वेळी माझी हवेलहंडी उडाली. पण त्यानंतर मात्र मी नाटकाच्या तालमींमध्येच अशा संभाव्य प्रसंगांना तोंड देण्याची तयारी करू लागलो, त्याकरिता मग प्रत्येक नाटककाराची भाषाशैली, त्याच्या भाषेचा पोत, बीण, लय सारेच खूप बारकाईने तपासून आत्मसात करावे लागे. त्यामुळे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची सोय तर होत असेच पण जी व्यक्तिरेखा रंगमंचावर साकार करायची तिच्या अंतरंगात अधिक खोलवर जाता येई. नाटककाराने त्या व्यक्तीच्या तोंडी एखादे मध्येच तोडलेले वाक्य घातले आहे.... ते जर तिथे तोडले गेले नसते तर त्याच्या पुढे काय बोलले गेले असते? ते वाक्य कसे पुरे झाले असते? त्या वाक्यानंतर आणखी कोणती वाक्ये येऊ शकली असती? या साऱ्या प्रश्नांचा मागोवा घ्यायचा म्हणजे केवळ शब्दांची जुळवणी करून भागणार नाही तर ते वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण मानसिकतेचा आलेख लक्षात घेऊन शब्दयोजना करावी लागेल आणि तीही नाटककाराच्या शैलीत. तरच त्या विशिष्ट व्यक्तीच्या आविष्करणात सुसंगती राहील हा एक मोलाचा धडा मी शिकलो.

[क्रमशः]
 

Tags: नाटक ऑथेल्लो दत्ता भट विजयाताई डॉ. श्रीराम लागू Theater Othello Datta Bhat Vijayatai Dr. Shreeram Lagu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके