डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘टबोरा’ला जाताना रेल्वेत ओळख झालेला 'ब्रुमफिट' हा इंग्रजी शिक्षक नाटकवेडा होता. आफ्रिकेतील 'टबोरा'च्या जंगलात तीन वर्षे नाटकाशिवाय कशी काढायची याची त्याला सगळ्यांत जास्त चिंता होती. ते त्याचे म्हणणे ऐकताच मी एकदम दचकलोच. मी हा विचारच केला नव्हता काय?

दारेसलामच्या दोनेक महिन्यांच्या जवळजवळ अर्थहीन वास्तव्यानंतर मी एक दिवस टबोराला जाणाऱ्या गाडीत बसलो. 'टबोरा' हे दारेसलामच्या पश्चिमेला सुमारे हजार किलोमीटर आत होते. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर असल्यामुळे हवा थंड आणि कोरडी असणार होती. टांझानिकावर ब्रिटिशांचे राज्य येण्यापूर्वी जर्मनांचे राज्य होते. त्यावेळी टबोरा ही देशाची राजधानी होती. ब्रिटिश आल्यावर त्यांनी ती दारेसलामला हलवली. म्हणजे टबोरा है बऱ्यापैकी शहर असणार. रेल्वेचा प्रवास जवळजवळ दीड दिवसाचा होता. पण सुखाचा होता. टांझानियात आल्याबरोबर मला खरेदी करावी लागलेली माझी 'मर्सिडीस' गाडीसुद्धा माझ्याबरोबर रेल्वेनेच टबोऱ्याला येणार होती. तिच्याकरता खास वॅगन रेल्वेला जोडली होती.

माझ्या प्रथमवर्गाच्या डब्यात आम्ही दोनच माणसे होतो. दोघेही सरकारी अधिकारी. एक मी आणि दुसरा एक इंग्रज शिक्षक होता. 'क्रिस ब्रुमफिट' त्याचे नाव. तो टबोऱ्यालाच शिक्षक म्हणून चालला होता. तरुण होता. त्या वेळी इंग्लंड-अमेरिकेतील तरुण-तरुणी अगदी मामुली वेतनावर या देशात शिक्षक म्हणून दोन-तीन वर्षे काम करण्यासाठी येत असत. अडाणी, मागासलेल्या समाजात प्रबोधनाचे काम सेवाभावाने करावे हा त्यांचा उद्देश. (अर्थात, अमेरिकेच्या जगभर चाललेल्या दादागिरीमुळे या मंडळींच्या मिषाने अमेरिका आपले हेर आफ्रिकेत पाठवते असा प्रवाद होताच!) हा ‘ब्रुमफिट’ माणूस इंग्रजी भाषेचा शिक्षक होता. इंग्रज असल्यामुळे अति भिडस्त होता. माझ्यासारख्या ‘काला आदमी’शी कसे बोलावे असे मात्र त्याच्या मनातही नव्हते. नुसताच संकोची होता माझ्यासारखाच! सारखा आपला पुस्तकात डोके खुपसून बसला होता.

दोन-एक तासांनंतर आम्ही बोलू लागलो. 'इंग्रजी वाङ्मय' हा त्याचा अभ्यासाचा आणि माझा आवडीचा विषय असल्याने गप्पा छान सुरू झाल्या. बोलताबोलता असे लक्षात आले की माझ्याप्रमाणेच तोही ‘हौशी’ नाटकवाला होता. लंडनमध्ये त्याचाही एक नाटकवाल्यांचा चमू होता आणि बऱ्याच गांभीर्याने तो नाटक या विषयात घेत होता. मग गप्पा रंगायला काय अडथळा? मी व्हिस्कीची बाटली काढली आणि उरलासुरला अडथळाही दूर करून टाकला! 

‘‘मला व्हिस्की खूप आवडते- पण माझ्या शिक्षकाच्या पगारात मला ती फार वेळा परवडत नाही!" असे म्हणून तो अत्यंत रसिकतेने व्हिस्की घेऊ लागला. आपल्या अत्यंत आवडत्या विषयावर जाणकारीने गप्पा मारणारा सहकारी मिळाला (अगर मिळाली!) तर व्हिस्की या पेयाला जगात तोड नाही! खूप गप्पा झाल्या. जेवायला जायची वेळ झाली ('डायनिंग कार' जवळच होती) तेव्हा उठता उठता अतिशय भावनावश होत तो म्हणाला, ‘‘तीन वर्षे या देशात व्हिस्कीशिवाय कशी काढायची हा काही फार त्रासदायक प्रश्न नाही.

खरा त्रासदायक प्रश्न आहे की या अंगलात तीन वर्षे नाटकाशिवाय कशी काढायची! मी तर खलासच होऊन जाईन.’’ ते ऐकताच मी एकदम दचकतो. मी हा विचार केला नव्हता काय? आपल्याला नाटक जास्त गांभीर्याने करता यावे याकरिता आपण मुंबईला स्थायिक होणे अवश्य आहे. आणि त्याकरिता तीन वर्षे आफ्रिकेत राहून पैसा मिळवणे अवश्य आहे हा विचार आपण केला आणि आफ्रिकेता निघून आलो, पण आफ्रिकेच्या जंगलात आपल्याला नाटक करायला मिळणारच नाही, हा विचारच आपण केला नाही.

दारेसलाममध्ये दोन महिने नव्या नवलाईत आणि बदली करून घेण्याच्या खटपटीत निघून गेले. पण आता? जवळजवळ तीन वर्षे नाटकाचा अजिबात संबंध येणार नाही, हे आपल्याला तरी झेपेल काय? असल्या विचारांत झोपेचे पार खोबरे झाले. 'बोरा’ स्टेशनवर पानवलकर मला न्यायला आले होते. दारेसलाममध्ये पद्माकर वर्दे नावाचा एक नवीन मित्र मला मिळाला होता. चंदू सहस्रबुद्धेच्या मित्रांपैकी तो एक. मोठा आनंदी, उत्साही. सतत हसरा आणि अगत्यशील असा हा माणूस. दारेसलाममध्ये जेमतेम महिनाभर आम्ही भेटत राहिलो. पण छान दोस्ती झाली. 

मी बदलीवर 'टबोरा’त जाणार म्हणताच त्यानेच पानवलकरांना कळवून ठेवले होते, माझी व्यवस्था करण्याबाबत. त्याप्रमाणे पानवलकर स्टेशनवर गाडी घेऊन आले होते. ते मला त्यांच्या घरीच घेऊन गेले, घर फार मोठे नव्हे. नवरा-बायको आणि शाळेत जाणारी दोन मुले एवढाच संसार होता. पण पानवलकर स्वतः टांझानियाच्या वीजकंपनीत एका बेताच्या हुद्यावर होते आणि सौ. पानवलकर शाळेत काम करीत होत्या. तेव्हा फार दिवस त्यांच्या घरी राहून त्यांची गैरसोय करण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तीनचार दिवसांत मला सरकारी बंगला मिळाल्याबरोबर मी त्यांच्या घरातून मुक्काम हलवला. 

टबोऱ्याबाबतचा माझा अंदाज बराच बरोबर निघाला. हवा छानच होती. चाळीस हजार वस्तीचे शहर. वीज, पाणी वगैरे मूलभूत सोयी ठीक होत्या. एक छोटा विमानतळही होता. बऱ्यापैकी डांबरी रस्ते होते. व्यापारी सगळे एशियन्सच होते. बहुतेक साऱ्याच वस्तू परदेशांतून आयात कराव्या लागत असल्यामुळे भरपूर मिळत असत. बहुतेक सगळी प्रजा एतद्देशीय काळेच. त्यातले सरकारी नोकरीतले लोक बऱ्यापैकी सधन असायचे, पण बहुतेक सारी प्रजा प्रचंड दरिद्री आणि अडाणी. दोन हजार एशियन्स होते. त्यांत मात्र दरिद्री कोणीच नाहीत. काही तर चांगलेच श्रीमंत. गोरे लोक सगळेच सरकारी नोकरीत वरच्या हुद्यावर असायचे- पण ते सगळे मिळून पाचशे असतील. तेवढ्या शहरात तीन क्लब होते. कायद्याने वंशभेद मानलेला नव्हता- पण एक क्लब एशियनांचा, एक काळ्यांचा, आणि एक गोऱ्यांचा आणि सरकारी अधिकाऱ्यांचा. क्लबमध्ये टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डार्ट्स, पत्ते आणि बिलियर्ड टेबल अशा सोयी असायच्या. पण मुख्य आकर्षण म्हणजे दारू स्वस्त मिळायची.

हॉस्पिटल्स दोन होती. एक 'टबोरा हॉस्पिटल'- सर्वसामान्यांकरता, आणि दुसरे कालुंडे हॉस्पिटल पैसेवाल्यांकरता. चार मेडिकल ऑफिसर्सच्या जागा होत्या. पण त्या सर्व कधीच भरलेल्या नसत. मी गेलो तेव्हा दोनच जागा भरलेल्या होत्या. प्रमुख डॉ. गोमेझ हे गोव्याचे होते आणि दुसऱ्या डॉ. बेगम या मूळच्या पाकिस्तानी, पण टबोऱ्यात जन्मलेल्या आणि स्थायिक झालेल्या. त्या कायम टबोऱ्यालाच असायच्या. त्यांची कधी बदली व्हायची नाही. त्यामुळे कधीकधी दोन्ही हॉस्पिटल्सची सगळी जबाबदारी त्यांच्या एकटीवर पडायची. मी टबोऱ्याला येणार ही बातमी सगळ्यांनाच माहीत होती. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोचल्याबरोबर दोन्ही डॉक्टरांनी माझे हर्षभराने स्वागत केले. त्यांचे कामाचे ओझे थोडे कमी होणार होते! 

मेडिकल ऑफिसर्सच्या मदतीला दोन सहायक डॉक्टर्स असायचे. त्यांना संपूर्ण वैद्यकीय शिक्षण मिळालेले नसे- पण कुठेही खेडेगावातही उपयोगी पडावे इतपत जुजबी शिक्षण मिळालेले असे. सामान्य आजारांची माहिती आणि त्यांवरचे उपचार इतकेच ते शिक्षण मर्यादित असे. हे सहायक डॉक्टर्स सगळे एतद्देशीय असत; कारण संपूर्ण वैद्यकीय शिक्षण घेणे त्यांना परवडत नसे. सर्वसामान्य रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला की तो प्रथम या सहायक डॉक्टरकडे जाई आणि त्यांनी पुढे पाठवला तरच तो आमच्यापर्यंत पोचू शके. या बिचाऱ्या सहायक डॉक्टरांचे अस्तित्व कुणाच्याच खिजगणतीत नसे. कारण ते फक्त बाह्य रुग्ण विभागात बसत असत. वॉर्डपर्यंत पोचतच नसत. त्यामुळे नर्सेसही त्यांना ओळखत नसत. काही सधन एतद्देशीय काळे डॉक्टर्स इंग्लंडमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊन येत, पण त्यांच्याही खिजगणतीत या सहायकांची किंमत शून्यच असे. हळूहळू हॉस्पिटलच्या कामात माझा जम बसला.

आता मला माझं स्वत:चं(नाक, कान, घसा) सोडून बाकीचे इतर कामही करावे लागे. मेडिकल ऑफिसर्स म्हणजे सर्वज्ञ असावे लागत! एखाद्या संकुचित क्षेत्राचा तज्ज्ञ डॉक्टर इथे फारसा उपयोगी पडत नसे. म्हणजे तुम्हांला फक्त नाक-कान-घशाची ऑपरेशन्स करता येऊन उपयोगी नाही, तर आपत्काली जीव वाचवण्याकरिता कुठलेही ऑपरेशन करता आले पाहिजे. गर्भार बाईचे मूल अडून बसले तर तातडीने 'सिझेरियन’ करून बाळ-बाळंतिणीचे प्राण वाचवता आले पाहिजेत! भारतात काळ बराच पुढे गेला होता. पण टबोऱ्यात फारसा नव्हता गेला! 

माझे वडील 1920 च्या सुमारास डॉक्टर होऊन व्यवसाय करू लागले तेव्हाच्या आठवणी सांगत. रात्री-बेरात्री बैलगाडीत बसून शेजारच्या खेड्यात अडलेल्या बाईला सोडवायला जावे लागे आणि तिथे कंदिलाच्या प्रकाशात सर्जरीचे पुस्तक उघडे ठेवून, त्यातले वाचून सिझेरियन करावे लागे! जवळजवळ तीच अवस्था सुमारे अर्धशतकानंतर टबोऱ्यात होती! म्हणजे एक परीने माझे नव्याने शिक्षण सुरू झाले म्हणा ना. सुदैवाने शिक्षक फारच अनुभवी आणि उत्साही मिळाला.

डॉ. नुसरत बेगम- माझी सहकारी डॉक्टर. ही बाई म्हणजे थोरच होती. एका खानदानी मुसलमान घराण्यातील. चार भावंडांपैकी सर्वांत जास्त शिकलेली. डॉक्टर झालेली. तिशीची अविवाहित. सगळे कुटुंब खूपच प्रागतिक विचाराचे. 80 वर्षांचे वृद्ध वडील अनेक वर्षांपासून टबोऱ्यात येऊन स्थायिक झालेले. कारण सिंधमध्ये होणारा ‘अहमदियांचा छळ’. हे स्वतः अहमदिया पंथाचे. खूप प्रागतिक विचारांचे. इतिहासात खूप रस असलेले. 'हिंदोस्थानात' दर शंभर वर्षांत एकतरी छत्रपती शिवाजी निर्माण व्हायला पाहिजे होता, असे म्हणणारे! मुलांना किंवा सुनांना कुणालाच शिक्षणात रस नव्हता. पण शेंडेफळ 'नुसरत'. तिला शिकायचे होते तर यांनी शिकविले. नुसरत पाकिस्तानात लाहोर, मग युगांडामध्ये 'मकेरेरे' विद्यापीठ अशा ठिकाणी एकटी राहून शिकली. मग टबोऱ्याला आपल्या कुटुंबात परत आली. पण स्वस्थ बसली नाही. टबोरा हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. उत्तम 'स्वाहिली" बोलायची. कामात निष्णात होती. रात्री-बेरात्री केव्हाही बोलावणे आले तर एकटी, आपली छोटी 'फोक्सवॅगन' गाडी घेऊन टबोऱ्याच्या निर्जन रस्त्यांतून बिनधास्त हॉस्पिटलमध्ये जायची आणि काम आटोपून पुन्हा एकटी घरी जायची. सोबतबिबत कुणी नाही.

रात्रीच्या अंधारात मलासुद्धा एकट्याला सुरुवातीला भीती वाटायची! टबोऱ्याचे रस्ते चांगले असले तरी झाडी खूप होती. त्यामुळे अंधार फार वाटायचा. हॉस्पिटलमध्येसुद्धा अगदी मिणमिणता उजेड असायचा. नर्सेस पांढऱ्या कपड्यात असल्याने दिसायच्या- म्हणजे त्यांचे कपडे दिसायचे. चेहरे, हात, पाय सगळे अंधाराशी एकरूप असायचे. पेशंट्सही सगळे काळेभोर! गोरे किंवा एशियन्स टबोरा हॉस्पिटलमध्ये यायचेच नाहीत. ते जरूर पडली तर 'कालुंडे' हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचे. डॉक्टर्स दोन्हीकडे एकच असायचे- पण 'कालुंडे’मध्ये पैसे घेत असल्याने व्यवस्था जरा बरी असायची. नुसरतने मला बरीच वेगवेगळी ऑपरेशन्स शिकविली. विशेषतः सिझेरियन्स. एखादी अवघड केस आली म्हणजे मी नुसरतला फोन करून बोलावी. तीही विनातक्रार रात्रीबेरात्री उठून येई.

नोकरीच्या नियमांप्रमाणे तिने येणे मुळीच आवश्यक नसायचे. पण बिचारी यायची. आपुलकीने मला मदत करायची आणि घरी जायची. ऑपरेशन्सच्या वेळी पेशंटला भूल द्यायला वेगळा डॉक्टर नसायचा. आपले आपणच सगळे करायचे. मी नाक-कान-घसावाला असल्यामुळे भूल देण्यात किंचित तज्ज्ञ झालो होतो. त्यामुळे मग पुढे नुसरतला रात्रीबेराबरी ऑपरेशन करावे लागले तर ती फोन करून मला भूल द्यायला बोलवायची. लवकरच असे लक्षात आले की एकास दोघे असलो की काम फार झपाट्याने उरके. मग आम्ही आपापसांत नियमच करून टाकला की कुणाही एकाला 'कॉल' आला की त्याने (अथवा तिने) दुसऱ्याला (अथवा दुसरीला) बोलावून घ्यायचेच! वर्षाभरात नुसरत आणि तिचे भले मोठे कुटुंब यांच्याशी माझी छानच दोस्ती झाली. तिचे भाऊ स्वतंत्र व्यवसाय करून खूप पैसे मिळवत होते. फार चैनीत नाही- पण नीट सुसंस्कृत माणसांसारखे राहत होते. घरात काही चांगलाचुंगला पदार्थ केला की तो माझ्याकडे यायचाच, सणावारी जेवायला त्यांच्या घरीच मी असायचा. (एरवी माझे जेवण, एका गोवेकर किरिस्तांव कुटुंबातून नियमित आणलेल्या डब्यावर चालायचे). एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटा भुतासारखा राहतो म्हणून त्या सगळ्यांना माझ्याबद्दल करुणा वगैरे वाटायची! टबोऱ्यातला जवळजवळ तीन वर्षांचा माझा मुक्काम नुसरत आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुसह्य झाला. 

एक दिवस मी हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासत होतो तेवढ्यात वॉर्डबॉयने एक चिट्ठी आणून दिली. "मी जरा भेटू इच्छितो. वेळ आहे का?- क्रिस ब्रुमफिट.’’ (म्हणजे कोण ओळखा!) ते नाव मी विसरणे शक्यच नव्हते. दारेसलामहून टबोऱ्याला येताना गाडीत भेटलेला इंग्रज नाटकवाला! टबोऱ्याला येऊन वर्ष उलटून गेले होते. माझा आणि त्याचा काहीच संपर्क नव्हता. तोही माझ्याप्रमाणेच, नाटकाचा काहीच संबंध नाही म्हणून झुरत, टबोऱ्यातल्या नवीन आयुष्याशी जुळते घेण्याच्या प्रयत्नांत गुंतलेला असेल आणि आता काहीतरी आजार घेऊन माझ्याकडे आला असेल असेच मला वाटले. समोरचा पेशंट हातावेगळा करून मी क्रिस ब्रुमफिटला आत बोलावले. खूप वर्षांची जुनी ओळख असल्यासारखी आम्ही एकमेकांची चौकशी केली. राहतो कुठे, जेवतो कुठे, शाळेचे काम कसे आहे वगैरे... तोही वैतागलाच होता. कसेबसे दिवस काढीत होता. पण आज फार उत्साहात होता. आजारीबिजारी तर नव्हताच. उलट टबोऱ्यात नाटक करण्याची एक कल्पना घेऊन आला होता.

(क्रमशः)
 

Tags: क्रिस ब्रुमफिट नुसरत ‘टबोरा हॉस्पिटल’ टबोरा दारेसलाम टांझानिया श्रीराम लागू वैयक्तिक आठवणी cris broomfit nusarat ‘tabora hospital tabora tanzania shriram lagu personal memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके