डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्याला नाटक इतके सर्वस्वानिशी करावेसे वाटते तर आपण पूर्ण वेळ नाटकासाठी द्यायला काय हरकत आहे असा एक पाखंडी विचार मनात डोकावला, आणि मी जरा घाबरलो... निदान जास्तीतजास्त वेळ आपण नाटकाकरता द्यायला हवा, त्यात अधिक खोलवर शिरायला हवे असे तर फार फार वाटू लागले.

‘यशोदा’चे स्वागतही 'रंगायन’च्या कीर्तीला साजेसे झाले. नाटकाशी संबंधित सर्व ललित कलांचा परिचय रंगायनच्या सभासदांना आणि प्रेक्षकांनाही व्हावा हे 'रंगायन’चे प्रथमपासूनचे धोरण होतेच. त्यात मग कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, जितेंद्र अभिषेकी अशांच्या गाण्याच्या बैठकी, बाबूराव सड़वेलकरांची चित्रकलेवर व्याख्याने, गायतोंडे, लक्ष्मण पै अशा चित्रकारांशी चर्चा, नाट्यवाचने असे कार्यक्रम जाणीवपूर्वक योजले जायचे. पी.डी.ए.मध्ये त्या दिशेने काही फारशी हालचाल झालेली नव्हती.

दर महिन्याला एक नाटक नेमून देऊन, महिन्याच्या शेवटी त्या नाटकावर सांगोपांग चर्चा घडवून आणायची असा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न झाला,  पण त्याने फार जीव धरला नाही. पुण्यात डॉ. रा. शं. वाळिंबे, प्रा. अरविंद मंगरूळकर अशा ज्येष्ठांनी पी.डी.ए.त काही काळ स्वारस्य दाखवले, पण तेही लवकरच थंड झाले. मी, जब्बार, श्यामला वगैरेंनी 'स्तानिस्लावस्की' वाचायचा उपक्रम काही आठवडे चालवला. पण तोही फार काळ चालला नाही. म्हणजे, या प्रकारची अभ्यासू वृत्ती सामुदायिक पातळीवर लोकांत रुजवणे कठीण दिसले.

वैयक्तिक पातळीवर ज्याची त्यानेच ती जोपासायला हवी. पण नाटकवाल्यांनी या त-हेच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे ही जाणीव मात्र पी.डी.ए.-रंगायन काळात तीव्रतेने झाली. ‘यशोदा’चे प्रयोग चालू होते आणि अचानक 1965 मध्ये काही व्यक्तिगत अडचणींमुळे 'यशोदा’ नाटक बंद करीत असल्याचे विजयाबाईंनी जाहीर केले! माझी आफ्रिकेला जायची वेळ आता चारपाच महिनेच दूर होती. त्यामुळे 'रंगायन'चा संबंध संपल्यातच जमा झाला. पी.डी.ए.चा संबंध मीच संपवला होता. आता रंगायनचाही संपला. आता फक्त आफ्रिकेची तयारी करणे राहिले! तीन वर्षे कॅनडा-इंग्लंडमध्ये काढून, पाश्चात्त्य संस्कृती आणि पाश्चात्त्य (इंग्रजी) नाटकं अगदी जवळून पाहायला मिळाली.

नाटक आणि सामाजिक अप्रतिष्ठा यांची जी सांगड मनामध्ये खोलवर कुठेतरी रुतलेली होती ती सुटून दृष्टिकोन चांगला स्वच्छ झाला. भारतात परत आल्याआल्या 'रंगायन'शी संबंध आला. विजयाबाई नाटकाकडे ज्या समर्पित वृत्तीने पाहत होत्या त्याचा माझ्यावर चांगलाच खोल परिणाम झाला. आपल्याला नाटक इतके सर्वस्वानिशी करावेसे वाटते तर आपण पूर्ण वेळ नाटकासाठी द्याला काय हरकत आहे - असा एक पाखंडी विचार मनात डोकावला आणि मी जरा घाबरलो. वैद्यकीय व्यवसाय हा माझ्या उपजीविकेचा व्यवसाय होता. तो सोडून कसा द्यायचा? कुटुंबाच्या जबाबदारीचे काय? पण निदान, जास्तीतजास्त वेळ आपण नाटकाकरता द्यायला हवा; त्यात अधिक खोलवर शिरायला हवे, अभ्यास करायला हवा- असे मात्र फार फार वाटू लागले.

रंगायनच्या एका परिसंवादात मी असे म्हटले की, 'मराठी नाटक आज एका महत्त्वाच्या कालखंडातून जात आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षांतली मराठी रंगभूमीची मरगळ संपून तिथे आता नवे वारे वाहू लागले आहेत. रंगायनसारख्या संस्था आज नाट्यविषयक एक आधुनिक दृष्टिकोन घेऊन मराठी रंगभूमीला काही नवीन आकार देण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करताहेत ही फार उत्साहजनक गोष्ट आहे. पण हे वर्तुळ रंगायनने किंवा विजयाबाईंसारख्यांनी हौशी संस्थांपुरते मर्यादित ठेवता कामा नये. मराठी व्यावसायिक रंगभूमीला आज या आधुनिक दृष्टिकोनाची, व्यावसायिक नीतिमत्तेची, शिस्तीची, समर्पणाच्या वृत्तीची - थोडक्यात म्हणजे रंगायनसारख्या संस्थांची, विजयाबाईंसारख्या समर्पित वृत्तीच्या कलावंतांची - नितांत आवश्यकता आहे. तेव्हा आपण मंडळींनी, केवळ व्यक्तिगत पातळीवर नव्हे तर संस्थात्मक पातळीवर व्यावसायिक रंगभूमी पादाक्रांत करण्याचा ध्यास घेतला पाहिजे !’’

माझ्या या प्रतिपादनाने त्या वेळी विजयाबाईही गांगरल्या होत्या. तत्त्वतः त्यांचा काही विरोध नव्हता (उदा. भालबा या बाबत फारच सोवळे होते. हौशी कलावंतांना व्यावसायिकांचा विटाळ दुरूनही होता कामा नये असे ते मानत. त्यांनी आयुष्यभर व्यावसायिक नाटक नुसते दिग्दर्शित करायलासुद्धा सातत्याने नकार दिला आणि पी.डी.ए.मधल्या व्यावसायिक झालेल्या कलावंतांना बहिष्कृत करून टाकले!) पण ही फार घाई होते आहे असे विजयाबाईंना त्या वेळी वाटले. रंगायनकडून एवढे संचित जमा करून मी डिसेंबर 1965 मध्ये पुन्हा एकदा भारताचा किनारा सोडला, आफ्रिकेला जाण्याकरता! आदल्या वर्षीच जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले होते.

नेहरूंच्या निधनाने भारतात अराजक माजेल अशा वावड्‌या उठवणाऱ्या परदेशी आणि स्वदेशी शक्तींना भारतीय जनतेने चोख उत्तर दिले होते - जवाहरलाल यांच्या जागी लालबहादूर शास्त्रींची निवड करून! त्यानंतर भारतावर लादल्या गेलेल्या युद्धात पाकिस्तानला खड़े चारून आपली निवड किती योग्य होती हे शास्त्रींनी सिद्ध केले होते. फार मोठ्‌या आशेने सारा देश शास्त्रींच्या कारकिर्दीकडे बघू लागला. 1962 च्या जूनमध्ये मी इंग्लंडून परत आलो त्या वेळी माझी मानसिक स्थिती मोठी चमत्कारिक होती. आदल्याच वर्षी माझ्या पत्नीचे अपघाती निधन झाले होते आणि आठवडाभरात पुण्याचे पानशेत धरण फुटून पुण्यात हलकल्लोळ माजला होता, गेली पाच-सात वर्षे गाजत असलेल्या माझ्या काकांच्या खूनखटल्यावर आता धूळ साचत चालली होती. पण त्या खटल्याने माझ्या वडिलांच्या कणखर तब्येतीला पार पोखरून काढले होते. मी परत येताना लंडनची एक पदविका खिशात टाकून आलो होतो. त्यामुळे आल्याबरोबर मी माझे खासगी आणि हॉस्पिटलचे काम सुरू केले.

वडिलांनी आयुष्यभर खूप खस्ता खाल्ल्या होत्या. त्यांना आता विश्रांती द्यायला हवी होती. मी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून वैद्यकी करत होतो, पण माझे मन त्यात नव्हते. मन सारे नाटकातच होते! रात्री आठपर्यंत मी माझा व्यवसाय करी आणि आठ वाजता पी.डी.ए.त तालमींना निघून जाई. काही ना काही नाटक चालू असायचेच. 'वेड्याचं घर', 'राजमुकुट', ‘खून पहावा करून' असे काहीतरी. त्यातच आल्या आल्या 'रंगायन’शी संबंध आला. त्यामुळे भरीस भर म्हणून पुणे-मुंबई चकरा सुरू झाल्या. व्यवसाय आणि नाटक दोन्ही सांभाळताना खूप ओढाताण होऊ लागली. पण खूप काम करीत राहिले की डोक्यातली वादळे फार त्रास यायची नाहीत. 

रंगायनमध्ये मी अधिकाधिक गुंतू लागलो आणि इकडे भालबांबरोबरचे मतभेद वाढू लागले, तेव्हा डोक्यात असा विचार आला की आपल्याला नाटकाच्या क्षेत्रात खूप काही करावेसे वाटते आहे. त्यातून काही सुटका दिसत नाही. इतकी वर्षे झाली, इतक्या निरनिराळ्या परिस्थितीतून गेलो, आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले तरी हे नाटकाचे वेड काही डोक्यातून जात नाही - उलट वाढतेच आहे. आता तर ते ‘वेडा’पलीकडे जाते आहे आयुष्यातल्या अग्रक्रमात पहिला नंबर पटकावते आहे. तेव्हा इथे पुणेरी वातावरणात आपल्याला काही भरीव काम करता येणार नाही.

पुण्याचा व्यवसाय गुंडाळून जर मुंबईला जाऊन स्थायिक झालो तर व्यवसाय आणि नाटक हे दोन्ही एकमेकांत तंगड्‌या अडकून पडलेले प्रश्न नीट सुटतील. अर्थात मुंबईला जाऊन नव्याने व्यवसाय सुरू करणे त्या काळातही अवघड होऊ लागले होते. आजच्या इतके बकाल स्वरूप वैद्यकीय व्यवसायाला त्या काळात आलेले नव्हते, पण मुलाचे पाय पाळण्यात दिसू लागले होते. एकतर भांडवल खूप लागणार होते - (तेही मजजवळ नव्हते) आणि दुसरे म्हणजे त्यात संपूर्णपणे स्वतःला गुरफटून घ्यावे लागणार होते - नाटक करण्याचा उडाणटप्यूपणा करताच येणार नव्हता! मग मुंबईला कशाला जायचे? तेव्हा एखादी सुखाची नोकरी मिळते का ते पाहावे म्हटले. पण नाक-कान-घशाच्या सर्जनला सुखाची नोकरी मिळणे अशक्यच दिसले! तेवढ्यात आफ्रिकेत स्थायिक झालेला माझा एक जुना मित्र चंदू सहस्रबुद्धे अचानक भेटला. त्याला मी ही सारी समस्या सांगितली, तेव्हा त्याने सुचवले, की ‘टांझानिया’ हा नुकताच स्वतंत्र झालेला आफ्रिकेतला एक देश आहे. तिथे आता खूप चांगल्या नोकऱ्या आहेत. त्यातली एक घ्यायची. तीन वर्षे तिथे काढायची, पुरेसा पैसा गाठीला लागेल, तो घेऊन इकडे यायचे आणि मुंबईला स्थापिक व्हायचे! कल्पना एकदम आवडली!

टांझानिया सरकारशी पत्रव्यवहार केला. त्यांनी लगेच उत्तर पाठवले. त्यांना माणसे हवी होती. पगारही चांगला देत होते. घरच्या माणसांना कल्पना सांगितली. वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. आई, भाऊ, वहिनी वगैरेंनी विरोध केला नाही, कारण विरोध करण्याचा काही उपयोग नाही, अशा निष्कर्षाला ते पूर्वीच आलेले असणार! पण कल्पना कुणालाच फारशी आवडली नाही. माझ्या हट्टापुढे कुणाचेच काही चालत नाही असे सगळ्यांनीच ठरविले होते! माझी दोन्ही मुले - आनंद आणि बिंदा - त्या वेळी शाळेत शिकत होती. आनंद बारा वर्षांचा आणि बिंदा दहा वर्षांची.

माझी आई, भाऊ आणि वहिनी यांनी त्या दोघांची जबाबदारी घेतली म्हणूनच मी हा घाट घालू शकलो. जाण्यापूर्वी एकेकाला भेटत होतो. श्री.पुं.च्याकडे गेलो होतो. बोलता बोलता गडकऱ्यांच्या 'एकच प्याला' नाटकाचा विषय निघाला. त्या नाटकाचा मला जो अर्थ भावला होता तो मी भागवतांना बोलून दाखवला. त्यांना तो खूप नवीन वाटला. मला म्हणाले. ‘‘आता तुम्ही तीन वर्षे जाताहात तर तुम्हांला महत्त्वाची वाटणारी जुनी काही नाटके बरोबर घेऊन जा. (तिकडे मिळण्याची शक्यता फारच कमी!) आणि आत्ता बोललात त्याच पद्धतीने तुम्हांला त्या नाटकांचा जो अर्थ भावेल तो लिहून काढा. एक छान पुस्तक होईल!’’ मी मनात म्हटले, ‘‘पुस्तकाचे सोडा - आपला छान व्यायाम तर होईल.’’

मी लगेच बाजारातून 'कीचकवध', शारदा', 'संशयकल्लोळ', भाऊबंदकी', ‘सवाई माधवरावाचा मृत्यू' अशी काही नाटकांची पुस्तके विकत घेऊन माझ्या सामानात टाकली. पण तीन वर्षांत लिहून काढणे काहीच जमले नाही! माझ्या मनात, स्तानिस्लावस्कीची Actor Prepares for Building the Character ही पुस्तके बरोबर नेऊन, जमल्यास त्यांचे मराठी भाषांतर करावे असे होते. के. नारायण काळ्यांना भेटायला गेलो तेव्हा माझी कल्पना मी त्यांना सांगितली. तर ते म्हणाले, ‘‘छे:, छे:, त्या फंदात तुम्ही मुळीच पडू नका. आता त्यांना तेवढे महत्त्व उरलेले नाही!’’ आणि मी आज्ञाधारकपणे तो विचार मनातून काढून टाकला. पुढे तीन वर्षांनी मी भारतात परतल्यावर पुन्हा काळ्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला स्वतः भाषांतर केलेल्या Actor Prepares ची मराठी प्रत ‘अभिनय साधना भेट’ म्हणून दिली.

(क्रमशः)

Tags: टांझानिया नाटकवेड रंगायतन पीडीए श्रीराम लागू  आठवणी tanzania dramaholic 'rangayatan' 'PDA' shriram lagu memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके