डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘एका बाजूला गिधाडे या नाटकाने मी इतका झपाटलो की जणू ते केल्याशिवाय माझे पितर स्वर्गात जाणार नाहीत तर दुसऱ्या बाजूला निरनिराळी माणसे मला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती की सद्य परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे शक्य नाही.’ माझा फार कोंडमारा झाला. नाटक माझ्या अंगी मावेनासे झाले. फोडून बाहेर येईल की काय असे वाटू लागले.
 

‘मि जिंकलो’ चे प्रयोग जोरात चालू होते. (‘जोरात’ म्हणजे प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या हिशेबात. व्यावसायिक हिशेबात नव्हे!) मधेच वसंतरावांची बदली एकदम आसाम सरहद्दीवर झाली त्यामुळे त्यांच्याऐवजी श्रीकांत मोघे यांना घेऊन नाटक चालू ठेवले. श्रीकांत हा एक देखणा, बुद्धिमान नट, अगदी मन लावून तालमी करून त्याने ‘शेखर’ उभा केला. अभिनयात त्याने वसंतरावांची उणीव जराही भासू दिली नाही. गाण्याच्या बाबतीत मात्र त्याची वसंतरावांशी तुलना होणे शक्य नव्हते. तो ठूमरी म्हणू लागला की ती ऐकून धुंद झाल्याचे दाखवण्याकरता मला सारे अभिनयकौशल्य पणाला लावावे लागे! पण रंगायनच्या चमूत तो चांगला रंगला. नारायण पै, विजय दाते, श्रीकांत लागू, बाबा पार्सेकर, राम शितूत , गोखले, अरुण काकडे आदी नाटकवेडया, आनंदी मंडळींचा उत्साह अगदी शिगेला पोचला. आणि अचानक विजयाबाईंच्या व्यक्तिगत आयुष्यात एक भीषण दुर्घटना घडली. त्यांच्या तरुण पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सामान्य स्त्रीला भुईसपाट करणाराच तो प्रसंग होता. पण असामान्य धैर्याने विजयाबाईंनी स्वतःला सावरले आणि ‘रंगायन’ चा डोलारा कोसळू दिला नाही. ‘मी जिंकलो’ चे प्रयोग चालू राहिले. प्रायोगिक संस्थांच्या इतिहासात कदाचित प्रथमच नाटकाचा आठ-पंधरा दिवसांचा विदर्भाचा दौरा आखला गेला आणि तो यशस्वीपणे (पण आर्थिकदृष्टया तोट्यात!) पार पडला. 

‘रंगायन’ मध्ये माझा बऱ्यापैकी जम बसत असताना पुण्याला पी.डी.ए.चे काम चालूच होते. पण माझा जास्त काळ आता  रंगायन मध्ये जात होता. याच काळात मी ‘ऊगो बेट्टी’ या इटालियन नाटककाराच्या ‘क्वीन अँड द रेबेल्स’ (इंग्रजी भाषांतर) या नाटकाचे मराठी रूपांतर केले होते. पी.डी.ए.त मी त्याचे वाचन केले आणि भालवांना ते खूप आवडते. त्यांना ते पी.डी.ए.करता करायचे होते. मला तीच धास्ती वाटत होती! कारण माझ्या मनात ते नाटक विजयाबाईंनी ‘रंगायन’ करता करावे, असे फार होते. दिग्दर्शक आणि अभिनेत्री या दोन्ही नात्यांनी त्या नाटकाला न्याय देऊ शकतील असे मला वाटत होते. अर्थात त्यांनी ते अद्याप वाचले नव्हते. त्यांना ते आवडेल असा अंदाज होता... पण खात्री कोण कुणाबद्दल देणार ? पण भालवांना हे नाटक दिग्दर्शक म्हणून मुळीच झेपणार नाही हे मला दिसत होते आणि या नाटकातल्या नायिकेची भूमिका झेपू शकेल अशी अभिनेत्री पी.डी.ए. त नव्हती, तेव्हा मी भालवांना स्वच्छ सांगितले की हे नाटक मी विजयाबाईंना देणार आहे. त्यांनी ते नाकारने  तर ते आपण ‘पी.डी.ए.' करता करू, पण त्यावेळी त्याचे दिग्दर्शन तुम्ही न करता मी स्वतः करणार. भालवा अर्थातच नाराज झाले. दुखावलेही गेले पण नाईलाजाने कबूल झाले. 

लौकरच ते नाटक मी विजयाबाईंना वाचून दाखवले आणि त्यांना खूप आवडले. एकदम त्यांनी ते ‘रंगायन’ करता घेऊन टाकले. अट फक्त एकच घातली की मी स्वतः त्या नाटकात काम करावे. आमचा संयुक्त नटसंचाचा प्रयोग रंगायनमध्ये यशस्वी झाल्यामुळे विजयाबाईंनी मला रंगायनचा कायम सभासद करून टाकले होते! मलाही ते हवेच होते. कारण पी.डी.ए. दिवसेंदिवस फार साचेबंद होऊ लागली होती. तिथे फार काळ काम करत राहणे कठीण होत होते. अर्थात नावाला का होईना मी पी.डी.ए. चा उपाध्यक्ष होतोच. 

एका संध्याकाळी तेंडुलकर पुण्याला माझ्या घरी अचानक आले. तसे ते पुण्याला मधूनमधून येत असत. त्यांच्या आई आणि भाऊ पुण्यात राहात होते. पुण्याला आले की माझ्याकडे चक्कर टाकीत असतच. यावेळी एक नाटक घेऊन आले होते. हस्तलिखित ‘वाचून पहा म्हणाले’. मी ठेवून घेतले. जरा वेळ गप्पा झाल्यावर तेंडुलकर निघून गेले. मी नाटक उघडले. नेहमीप्रमाणे सुट्या चतकोर कागदांवर, बारीक पण सुरेख अक्षरात लिहिलेले होते. चांगले जाडजूड होते. ‘साडेतीन चार तास चालणार’ मी मनाशी म्हटले आणि वाचू लागलो. शीर्षक होते ‘गिधाडे.’

सुरवातीपासूनच नाटकाबरोबर मी अक्षरशः फरफटत गेलो तीन- चार तासांत नाटक वाचून संपले आणि मी भयंकर अस्वस्थ झालो. इतके सर्वार्थाने अंगावर येऊन छाताडावर थयाथया नाचणारे नाटक मी तोपर्यंत वाचले नव्हते. नाटक फार हिंस्र होते आणि फार जिवंत होते. अत्यंत निघृण हिंस्रपणाने त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले आणि मग त्यातलेच एक टमरेलभर तोंडाला लावून घटाघटा गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली.

मी येणारा-जाणाराला या नाटकाबद्दल सांगत सुटलो. पी.डी.ए., रंगायन आणि इतरत्र त्याची वाचने केली. नाटक ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असायच्या. एक वर्ग असा असायचा की त्याला ते नाटक बीभत्स, हिंस्र वाटायचे आणि तो अर्ध्या वाचनातून संतापून निघून जायचा. आणि दुसरा वर्ग त्या नाटकाच्या अमानुष प्रांजळपणाने विलक्षण अस्वस्थ व्हायचा; त्या नाटकात घडणाऱ्या माणसांच्या गिधाडपणाचे, भोगलालसेचे, मूल्य-शून्यतेचे दर्शन असह्य होऊन अवाक् व्हायचा. 

काही असले तरी हे नाटक रंगमंचावर आणणे अशक्य दिसत होते. पी.डी.ए.चे अध्यक्ष भालबा केळकर, बहुसंख्य सभासदांच्या (विशेषतः) स्त्री सभासदांच्या आड दडून त्यांनी हे नाटक बापजन्मी पी.डी.ए. तर्फे करू देणार नाही, अशीच भूमिका घेतली! रंगायनचे अध्यक्ष श्री.पु. भागवत ते म्हणाले ‘नाटक चांगले आहे. ते करायलाच पाहिजे हे खरे. पण सध्याच्या सेन्सॉर बोर्डाची अवस्था पाहता, आत्ता हे नाटक सेन्सॉरकडे पाठवणेच चूक ठरेल. कारण ते पास होणार नाही हे नक्की. आणि एकदा नापासाचा शिक्का बसला म्हणजे पुढे कधीच ते नाटक करता यायचे नाही. तेव्हा काही वर्षे थांबा!’ संताप येण्याइतका हा युक्तिवाद बिनतोड होता!

मला उपलब्ध असलेल्या दोन्ही वाटा बंद झाल्या. मी भयंकर चडफडलो. हे नाटक झालेच पाहिजे... ते आपणच केले पाहिजे... हे नाटक आपण केल्याशिवाय आपले पितर स्वर्गाला जायचे नाहीत! एका बाजूला मी या नाटकाने इतका झपाटलो होतो आणि दुसऱ्या बाजूला निरनिराळी माणसे निरनिराळ्या मार्गांनी मला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती की सद्यः परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे शक्य नाही. माझा फार कोंडमारा झाला. नाटक माझ्या अंगी मावेनासे झाले. फोडून बाहेर येईल की काय असे वाटू लागले. सगळ्याच वाटा बंद झालेल्या पाहून एका रात्री मी समोर टेपरेकॉर्डर घेऊन बसलो. आणि सबंध नाटक एका बैठकीत वाचून रेकॉर्ड करून टाकले. रजनीनाथ मीच, रमा मीच , पपा, माणिक, रमाकांत, उमाकांत सगळे मीच!

मग मला खूप हलके वाटले. एखाद्या मोठ्या आजारातून उठल्यासारखे. दुसऱ्या दिवशी मी सबंध टेप ऐकली. भर रस्त्याला लागून असलेल्या एका खोलीत बसून मी नाटक रेकॉर्ड केले होते त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचे आणि माणसांचे भरपूर आवाज त्यात रेकॉर्ड झाले होते. पण नाटक वाचून मला जी पिळवटून टाकणारी वेदना जाणवली होती ती रेकॉर्डिंगमध्ये सरळ उतरली होती. मी काहीशा समाधानाने ती टेप तेंडुलकरांच्या स्वाधीन केली आणि मनावरचे प्रचंड ओझे उतरल्यासारखा माझ्या इतर उद्योगात गुंतलो. जणू काय मी तेंडुलकरांच्या आणि त्यांच्या नाटकाच्या ऋणातून मुक्त झालो होतो. मी गिधाडे मनातून काढून टाकले. 

पण ते तसे मनातून गेले नाही. त्याने मला सतावणे बंद केले एवढेच. मनाच्या एका कोपऱ्यात वेटोळे घालून ते आपले पडून राहिले!

Tags: गिधाडे तेंडूलकर रंगायन श्रीराम लागू Gidhade Tendulkar Rangayan Shreeram Lagu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके