डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘प्रेक्षक नाटकाशी अगदी समरस झाला पाहिजे' ही नाटकाच्या यशाची एकमेव कसोटी आपण मानतो, तीच ब्रेख्ट उधळून लावतो. प्रेक्षकाने भावनात्मकदृष्ट्या नाटकाशी कधीच समरस होता कामा नये. त्याने आपली विचारशक्ती शाबूत ठेवली पाहिजे. नाटकातल्या व्यक्तिरेखांविषयी, ज्या परिस्थितीमुळे त्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात ते नाटक घडत आहे, त्या परिस्थितीविषयी, ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आणि ती कशी बदलता येईल याविषयी विचार करत राहिले पाहिजे... ब्रेख्टचे विचार कळल्यावर प्रथमच अभिनयासंबंधी गंभीरपणे विचार करणे आवश्यक झाले.

गेल्या वेळेप्रमाणेच तो 'जरा भेटू इच्छितो. वेळ आहे का?' अशी चिठ्ठी पाठवूनच आला होता. हे इंग्रज लोक कुठेही गेले तरी त्यांचा भिडस्तपणा काही जात नाही, तर तो भेटायला हॉस्पिटलमध्येच आला. हातात एक नाटकाचे पुस्तक घेऊनच आला होता. Good Woman of Setzuan- By "Bertolt Brecht" ब्रेख्ट (किंवा ब्रेश्ट)चे नाव मी बरेच ऐकले होते. पण त्याचे वाचले काहीच नव्हते. नाटक न वाचताच मी नाटकात काम करायला ताबडतोब होकार देऊन टाकला! मी नाटक लगेचच वाचून काढले. छान होते. नाटकातल्या तीन देवांपैकी पहिल्या देवाचे काम मी करायचे होते. अवघड नव्हते. पण नाटकाला अनुवादकाने (मूळ जर्मन नाटकाचा हा इंग्रजी अनुवाद होता) प्रस्तावना लिहिली होती. ती वाचताना मी जरा बुचकळ्यात पडलो.

ब्रेख्टच्या नाट्यशास्त्रातल्या 'ए इफेक्ट' एपिक थिएटर इत्यादी संकल्पनांचा अर्थ मला कळेना. मी ब्रुमफिटला तसे सांगितल्यावर त्याने मला ऑक्सफर्डने काढलेली नाटकाची डिक्शनरी आणून दिली! ब्रेख्टच्या नाट्‌यशास्त्राची यापेक्षा अधिक माहिती देणारा ग्रंथ त्याच्यापाशी नव्हता. टबोऱ्याला तिथल्या मिशनचे एक पुस्तकाचे दुकान होते. पण त्यात नाट्य या विषयावर काहीच साहित्य नव्हते. दारेसलामप्रमाणेच इथेही फालतू अमेरिकन कादंबऱ्या, अध्यात्मशास्त्र आणि प्ले-बॉय पेंटहाउसचे अंक! ब्रुमफिटने आणून दिलेल्या डिक्शनरीवरून एवढा प्रकाश डोक्यात पडला की प्रेक्षक नाटकाशी अगदी समरस झाला पाहिजे ही जी नाटकाच्या यशाची एकमेव कसोटी आपण मानतो, तीच हा 'ब्रेख्ट' नावाचा माणूस उधळून लावतो आहे! तो उलट असे म्हणतो आहे की प्रेक्षकाने भावनात्मकदृष्ट्या नाटकाशी कधीच समरस होता कामा नये.

नाटक पाहत असताना प्रेक्षकाने आपली विचारशक्ती शाबूत ठेवली पाहिजे. नाटक पाहत असताना प्रेक्षकाने सतत नाटकातल्या व्यक्तिरेखांविषयी, परिस्थितीमुळे त्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात ते नाटक घडत आहे त्या परिस्थितीविषयी, ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आणि ती कशी बदलता येईल याविषयी विचार करत राहिले पाहिजे. शोकांतिका पाहताना प्रेक्षक गहिवरून जाता कामा नये. त्याला रडू येता कामा नये. तर परिस्थिती बदलली म्हणजे ही शोकांतिका घडणारच नाही, या विचाराने त्याला हसू आले पाहिजे! प्रत्येक नाटक हे या पद्धतीने प्रबोधनात्मकच असले पाहिजे याचे भान नाटककाराने ठेवले पाहिजे. एखाद्या करुण प्रसंगांशी प्रेक्षक फार समरस होतो आहे, किंवा भावनात्मकदृष्ट्या तो त्यात फार गुंतत चालला आहे असे दिसले तर त्याच्या त्या तंद्रीचा भंग करण्यासाठी एकदम मध्येच गाणे वगैरे म्हणून त्याला त्यातून बाहेर खेचले पाहिजे- विचार करण्याला प्रवृत्त केले पाहिजे! एखाद्या व्यक्तिरेखेशी संपूर्णपणे समरस होऊन ती  व्यक्तिरेखा मूर्तिमंत जिवंत उभी करणारा वास्तवदर्शी अभिनय हा गैरलागू अभिनय होय! ब्रेख्टच्या मते आजचा नट हा वैज्ञानिक नट असला पाहिजे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आज आपल्या जीवनावर एकापाठोपाठ एक आघात करीत आहेत आणि आपल्या जीवनात प्रचंड उलथापालथी घडवून आणीत आहेत या सत्याची ठाम जाणीव नटाला असली पाहिजे. वास्तवाच्या या जाणिवेचे एक परिमाण त्याने सतत आपल्या अभिनयाला देत राहिले पाहिजे. भूमिकेशी संपूर्ण समरस होऊन, प्रेक्षकाला वर्तमान विसरायला लावून कुठल्यातरी स्वप्नाळू सृष्टीची धुंदी त्याच्या डोळ्यांवर चढविणे हे प्रेक्षकाला अफू पाजून गुंगी आणणे आहे. हे नटाने करता कामा नये. प्रेक्षकाच्या भोवतालच्या वर्तमान वास्तवाची जाणीव त्याला सतत करून देत राहिले पाहिजे.

प्रत्यक्ष पाहिलेल्या एखाद्या भयानक अपघाताचे अगदी तंतोतंत वर्णन करणाऱ्या माणसासारखी नटाची वृत्ती असली पाहिजे. वर्णन अगदी तंतोतंत झाले पाहिजे. पण हे वर्णन तिऱ्हाइताने केलेले आहे; वर्णन करणाऱ्याला अपघात झालेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे! एक मोठे बोलके उदाहरण ब्रेख्टने दिलेले आहे. बहीण शोकाकुल होऊन युद्धावर जाणाऱ्या आपल्या भावाला निरोप देते आहे. पण भाऊ ज्या युद्धावर निघाला आहे ते लोकयुद्ध आहे आणि भाऊ लोकांच्या बाजूने जुलमी सत्तेशी लढायला निघाला आहे. मग? आपण बहिणीच्या दुःखात संपूर्णपणे सहभागी व्हावे का? का अजिबात होऊ नये ? किती आणि कसे सहभागी व्हायचे, याचे भान आपण सतत राखले पाहिजे! अ‍ॅरिस्टॉटलने मांडलेला ‘कॅथॉर्सिस’चा विचार ब्रेख्ट खोडून काढत होता!

'कॅथॉर्सिस' म्हणजे नाटकात व्यक्त झालेल्या भावनांशी संपूर्णपणे समरस होऊन आपल्या अशुद्ध भावनांचा निचरा करायचा, आपल्या विकार-भावनांचे उदात्त विशुद्धीकरण करायचे! ब्रेख्ट सांगत होता, नाटकाचा आस्वाद 'कॅथॉर्सिस 'द्वारा घेणे म्हणजे अफू घेणे होय. त्याऐवजी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन, त्याचे विश्लेषण करून, प्रश्नाच्या स्वरूपाची समग्र जाण झाली पाहिजे आणि तिचा उपयोग केला पाहिजे! ब्रेख्टच्या विचाराची दिशा सर्वस्वी नवीन होती. चक्रावून टाकणारी होती. अभिनयासंबंधी जे अर्धवट विचार डोक्यात होते ते पार उधळून लावणारी होती, भूमिकेशी नटाने संपूर्णपणे समरस झाले पाहिजे, भूमिका ‘जगली’ पाहिजे, असल्याच विचारांचा कळत नकळत मनावर पगडा होता. ब्रेख्टचे विचार कळल्यावर प्रथमच अभिनयासंबंधी गंभीरपणे विचार करणे अवश्य झाले. स्तानिस्लावूस्कीचा हवाला देऊन के. नारायण काळे जेव्हा सांगत होते की नटाने प्रत्येक भूमिका जगली पाहिजे.

संभाजीची भूमिका करायची असेल तर नटाने साक्षात संभाजी झाले पाहिजे. संभाजीचे जगणे, त्याचे मनोव्यापार आणि विकार, त्याची सारी सुखदुःखे ही सारी त्या नटाची झाली पाहिजेत. संभाजीच्या अंतरंगात नट इतका खोलवर घुसला पाहिजे की संभाजीचे बोलणे, चालणे, बसणे, उभे राहणे, तलवार उपसणे हे नटाला शिकवावेच लागणार नाही. एवढेच नव्हे तर संभाजीचे भाषणसुद्धा पाठ करावे लागणार नाही! त्याच वेळी त्यातली अतिशयोक्ती जाणवली होती. या पद्धतीने कुणीच करू शकणार नाही हे कळत होते.

अभिनय करण्यासाठी भूमिका ‘जगली’ पाहिजे हा विचार जसा अगदी टोकाचा, अतिरेकी वाटत होता तसाच ब्रेख्टचा विचारही दुसऱ्या टोकाचा वाटत होता. एखाद्या व्यक्तिरेखेचे किंवा प्रसंगाचे केवळ आत्मनिष्ठ अनुभवाने कितीही प्रभावी दर्शन घडविले तरी ते नाटक मोलाचे ठरू शकत नाही. नाटकाने फक्त वस्तुनिष्ठपणे भोवतालच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी परिस्थितीचे भान जागृत करायला हवे हा ब्रेख्टचा विचार नाटकाच्या एकूण आवाक्यावर फार मोठी मर्यादा घालतो असे दिसत होते. या दोन्ही टोकांच्या अभिनय पद्धतींचा समन्वय साधायला हवा; या दोन पद्धतींचा सुवर्णमध्य शोधायला हवा असे फार तीव्रतेने जाणवले.

नाटकातील जी व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर साकार करायची ती प्रेक्षकांना अगदी जिवंत वाटली पाहिजे हे तर खरेच. पण त्याकरता ती ‘जगण्या’चे वगैरे काही कारण नाही. भूमिकेच्या सखोल अभ्यासाने आणि तंत्राच्या सुयोग्य, पद्धतशीर वापराने भूमिका जिवंत आहे, असा बेमालूम भास निर्माण करता येईल म्हणजे भूमिका ‘जगणे’ हे महत्त्वाचे नाही, तर ती जगल्याचा भास निर्माण करणे हे महत्त्वाचे ! पण मग, केवळ तंत्राच्या आधाराने जर भूमिका सजीव होत असेल तर अभिनय ही कला की केवळ कारागिरी? केवळ तंत्राचा वापर करावा असा याचा अर्थ नाही.

भूमिकेचा सखोल अभ्यास आणि तंत्राचा वापर या शेवटच्या पायऱ्या. सर्वांत प्राथमिक गरज ही आहे की, जी भूमिका साकार करायची आहे तिचे जिवंत दर्शन नटाच्या मनश्चक्षूंना झाले पाहिजे! तो त्या नटाचा ‘कलात्मक’ अनुभव असणार. म्हणजे केवळ मनचश्चक्षूंना दर्शन घडणे एवढेच पुरेसे नाही. तर ती व्यक्तिरेखा नटाला सर्वांगांनी अनुभवता आली पाहिजे. अनुभवाच्या पातळीवर एखादी व्यक्तिरेखा आत्मसात करण्याची एखाद्या नटाची ताकद किती आहे त्यावर त्या नटाच्या प्रतिभेचे लहान किंवा मोठेपण अवलंबून असणार, आणि नटाची प्रतिभा जितकी मोठी अगर लहान तितका तो मोठा अगर लहान कलावंत असणार, पण कलावंत असणार, केवळ कारागीर नव्हे हे नक्की! पण केवळ महान प्रतिभा असून महान कलावंत होणार नाही. तंत्राची, कारागिरीची जोड हवीच. महान प्रतिभा आणि महान तंत्रशुद्धता यांच्या मिश्रणाने महान नट तयार होणार.

ब्रेख्ट म्हणतो त्याप्रमाणे... नटाने रंगमंचावर असताना आपण नट असून अमुक-अमुक भूमिका करतो आहोत हे भान क्षणभरही सोडता कामा नये. नटाने अदृश्यपणे आपल्या भूमिकेच्या पाठीशी उभे राहून तिचे अतिशय काटेकोरपणे सूत्रसंचालन सतत करीत राहिले पाहिजे. भूमिका आणि ती करणारा नट यांतले संतुलन इतके नाजूक असले पाहिने की क्षणभरही ते ढळता कामा नये. नटाने भूमिकेवर किंवा भूमिकेने नटावर कधीही कुरघोडी करता कामा नये. नटाचे काम हे आहे की, त्याला जो कलात्मक अनुभव आलेला आहे तो त्याने प्रेक्षकांना कलात्मकतेच्या पातळीवर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. केवळ दृष्टिसुख आणि श्रवणसुख देण्यावर समाधान मानता कामा नये.

अभिनयाला कलात्मक उंची द्यायची असेल तर प्रतिभेला तंत्राची जोड इतकी संपूर्णपणे आणि सफाईदारपणे दिली पाहिजे की तंत्राचा केलेला वापर प्रेक्षकाला अजिबात जाणवता कामा नये. स्तानिस्लावस्कीने याचे जे उदाहरण दिले आहे ते लक्षणीय आहे. तो म्हणतो, ‘‘नुकतेच बसू लागलेले लहान मूल जेव्हा उभे राहून चालायला शिकते तेव्हा उभे राहण्याच्या आणि चालण्याच्या क्रिया शिकण्यासाठी त्याने दीर्घ काळ खूपच तंत्राचा वापर केलेला असतो; सुरवातीला ते तंत्र उघड दिसतेही. पण मूल जेव्हा सफाईने चालू लागते तेव्हा त्याची चालण्याची क्रिया तेवढी दिसते त्याकरता वापरलेल्या तंत्राचा मागमूसही दिसत नाही इतके ते तंत्र क्रियेशी एकरूप होऊन जाते. तसे अभिनयाचे झाले पाहिजे!

नटाने भूमिका ‘जगण्याच्या’ भानगडीत न पडता अलिप्तपणे अभिनय केला तर त्याची मानसिक तब्येत अधिक निकोप राहील हे उघड आहे. भ्रमिष्ट माणसाची भूमिका वारंवार जगावी लागली तर सवयीने नट स्वतःच भ्रमिष्ट होईल ही शक्यता फार आहे! 'ऑथेल्लो'ची भूमिका वारंवार 'जगत' राहिल्याने, स्वतःच्या बायकोचा खरोखरीच गळा दाबून प्राण घेणाऱ्या नटाचे फार प्रत्ययकारी दर्शन आपण 'रोनल्ड कोल्मन’ च्या 'डबल लाईफ' या चित्रपटात घेतलेच आहे. असे सगळे विचार ब्रेख्टच्या परिचयाने डोक्यात शिजू लागले. ‘गुड वुमन ऑफ सेत्झुआन’ नाटकाचा प्रयोग छान झाला. स्थानिक वृत्तपत्रांत त्याची परीक्षणेही आली. माझी या नाटकातील भूमिका बऱ्यापैकी महत्त्वाची होती आणि ती लोकांना आवडलीही. किंबहुना, नाटकात सर्वांत उजवे काम माझेच झाले असे एकंदर लोकमत झाले. माझेही तसेच मत झाले! याने मी सुखावलो तर खराच- पण आपण पूर्णवेळ अभिनय न करता डॉक्टरी करण्यात वेळ वाया तर घालवीत नाही ना, असा विचार प्रथमच स्पष्टपणे मनाला स्पर्शून गेला! आणि मग पुढे तो मला सतत सतावीत राहिला.

Tags: ब्रेख्टचे नाट्‌यविषयक विचार गुड वुमन ऑफ सेत्झुआन टबोरा आठवणी dramatical concepts of brecht good woman of setzuan tabora shriram lagu memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके