डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'नॉट इन द बुक' या इंग्रजी नाटकाचे 'खून पहावा करून' हे रूपांतर करताना सरिताबाई पदकींनी त्याची नस अचूक पकडली होती. विनोदही मजबूत आणि रहस्यही मजबूत, सगळ्याच व्यक्तिरेखा जिवंत. पण हे नाटक दिग्दर्शित करावयास पी.डी.ए.ला दिग्दर्शक मिळेना.

एक दिवस सरिता पदकींचा फोन आला. त्यांनी एक नाटक लिहिले होते. मी ते वाचून पाहावे आणि आवडल्यास पीडीएकरता करावे असा त्यांचा प्रस्ताव होता. माझा आणि सरिताबाईचा प्रत्यक्ष परिचय नव्हता. पण एक ख्यातनाम कवयित्री म्हणून मी त्यांना ओळखत होतो. वास्तविक भालबा माझ्याकडे सरिताबाईंच्या नाटकाबाबत बोलले होते, पण ते फारसे चांगले नसल्याचा अभिप्राय त्यांनी दिला होता, त्यामुळे मी लक्ष घातले नाही. आता दस्तुरखुद्द लेखिकेचा फोन आला तेव्हा लक्ष घालणे जरूर होते.

नाटक चांगले नसले तरी एका नवीन नाटककर्तीचा परिचय होईल हा स्वार्थ होताच. त्यांच्या कथा-कविता वाचून त्यांची जाण आधुनिक आहे हे जाणवले होते. त्यांचे पती श्री. मंगेश पदकी हेही पुण्यातले नावाजलेले साहित्यिक होते- सरिताबाईंतके नसले तरी मंगेश आणि सरिता पदकी हे पुण्यामध्ये एक आधुनिक विचारांचे, रसिक, साहित्यिक जोडपे म्हणून प्रसिद्ध होते. अशा जोडप्याचा परिचय झाला तर हवाच होता. मी सरिताबाईंचे नाटक आणून वाचले आणि ते मला फारच आवडले.

‘नॉट इन द बुक’ या इंग्रजी नाटकाचे मराठी रूपांतर होते ते. मराठी नाव होते ‘खून पहावा करून’. विनोदी अंगाने जाणारी रहस्यकथा होती ती. विनोदही मजबूत आणि रहस्यही मजबूत होते. सगळ्याच व्यक्तिरेखा जिवंत होत्या. शाब्दिक विनोदापेक्षा प्रासंगिक विनोदावर जास्त भर होता आणि प्रसंगांची गुंफण कौशल्याची असल्याने विनोद सहज होणारा आणि उच्च दर्जाचा होता. उत्तम रहस्यकथा लिहायला आवश्यक असणारी बुद्धिमत्ता आणि उत्तम दर्जाची विनोदबुद्धी या दोन्हींचा मोठा हृद्य संगम लेखकाच्या लेखणीत होता आणि सरिताबाईंनी रूपांतर करताना ती नस अगदी अचूक पकडली होती. 

इंग्रजी वातावरणाचे मराठीकरणही बेमालूम होते. नाटकाचा एकूण पिंड हलक्या-फुलक्या विनोदी नाटकाचा असला तरी विनोद निर्मितीकरता वापरलेली रहस्यकथेची वीण इतकी पक्की होती की नाटकाची पकड़ कधीही ढिली होत नसे. एक अतिशय गोड नाटक, असाच एकंदर परिणाम होता. एवढे चांगले नाटक का आवडले नाही असे मी भालबांना विचारले तर ते म्हणाले, ‘‘फार थिल्लर आहे. त्याला काही वजनच नाहीये. पी.डी.ए.ने ते करावे असे मला वाटत नाही!’’ मी फारच त्या नाटकाच्या बाजूने वाद घातला तेव्हा भालबा तडजोडीला तयार झाले. तडजोड अशी की नाटकाचे सामुदायिक वाचन पी.डी.ए.च्या सभासदांकरता करावे आणि जर बहुसंख्यांना ते आवडले तर ते आपण करावे. ‘गिधाडे’च्या माझ्या वाचनाने पी.डी.ए.ची काही मंडळी फारच हादरली होती. त्यामुळे वाचन खुद्द लेखिकेनेच करावे असे ठरले.

सरिताबाईंना दातांच्या त्रासामुळे मोठ्यांदा वाचायला त्रास होत असे.... तरीही त्यांनी मान्य केले. सुमारे पंचवीसेक सभासदांसमोर सरिताबाईंनी नाटक वाचले. इतके परिणामशून्य वाचन मी फार क्वचित ऐकले आहे. आधीच दाताचा त्रास, त्यात परिणाम साधण्याचा अजिबात प्रयत्न नाही. नुसते शब्द वाचत होत्या! म्हणजे पु.शि. रेगे स्वतःच्या उत्तमोत्तम कविता ज्या पद्धतीने वाचत असे तसे, मी जाम नर्व्हस होत ऐकत राहिलो. वाटले की, एक उत्तम नाटक केवळ वाचन परिणामकारक नाही म्हणून हातचे जाणार! पण सुदैवाने नाटक बऱ्याच मंडळींना आवडले. विशेषतः पाळंदे, जया, राम खरे, विश्वास मेहेंदळे या मंडळींना ते खूपच आवडलेले दिसले. आणि हे नाटक पी.डी.ए.ने करावे असेच ठरले.

पी.डी.ए.चे नाटक भालबांनीच दिग्दर्शित करायचे असा एक अलिखित दंडकच होता (अपवाद फक्त 'राजमुकुट!') भालबांना नाटक आवडले नसल्याने ते काहीतरी करून दिग्दर्शनातून अंग काढून घेतील असे मला वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी अंग काढून घेतलेच. पण आम्ही तयार होतो. हे विनोदी नाटक असल्याने माझ्या जातीचे नाही (म्हणजे काय कुणास ठाऊक !) तेव्हा यावेळी दिग्दर्शन मी न करता वासुदेव पाळंद्यांनी करावे असाच आम्ही ठराव केला. पाळंद्यांनीही ते मान्य केले आणि नाटकाच्या जमवाजमवीला सुरुवात झाली. पाळंद्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना नाटकावर काम करायला आठ-पंधरा दिवस हवे होते. त्यानुसार ते तालमी सुरू करणार होते. त्यांनी भूमिका ठरवल्या... ज्याला त्याला नाटकाच्या प्रती देण्यात आल्या . सामान्यपणे नवीन नाटक बसवायला घ्यायचे म्हणजे आम्ही सगळेच उत्साहाने एकत्र बसून चर्चा करायचो. या वेळी भालबांनी चर्चा जवळजवळ टाळलीच.

ठरलेल्या दिवशी रात्री आम्ही सगळे आपापल्या प्रती घेऊन तालमीसाठी जमले. तास झाला, दोन तास झाले तरी दिग्दर्शकाचा पत्ताच नाही. पाळंदे शाळेत शिक्षक होते. एकत्र कुटुंबात राहत असत. दूर कसबा पेठेत त्यांचे घर होते त्यामुळे ते काही वेळा अचानक गैरहजर राहत असत. त्यातलाच प्रकार असेल म्हणून आम्ही घरोघर गेलो. दुसऱ्या दिवशीही पाळंदे आले नाहीत. तिसऱ्या दिवशीही नाही, चौथ्या दिवशी त्यांचा निरोप घेऊन कुणीतरी त्यांच्या घरून आले. 'पाळंदे दिग्दर्शन करू शकणार नाहीत. त्यांनी नाटक परत पाठवले आहे!' मी चाटच पडलो. पाळंदे स्वतः नाटकात कामही करणार होता. नुसते दिग्दर्शन करणार नव्हता. त्याने इथे येऊन आम्हांला स्वतः सांगायला हवे होते.

नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तारीख त्याच्या विचारानेच ठरवली होती. प्रयोगाला जेमतेम महिन्याचासुद्धा अवधी नव्हता आणि अजून तालमींना सुरुवातही झाली नव्हती. आम्ही सगळे हवालदिल होऊन भालबांच्या घरी जाऊन त्यांना साकडे घातले. पाळंदे दिग्दर्शन करायला तयार नाहीत आणि नाटकाला जेमतेम चार आठवडे राहिलेत ह्या परिस्थितीत भालबांना नकार देणे अशक्य झाले. काही झाले तरी ते पी.डी.ए.चे अध्यक्ष होते. कर्तव्यभावनेपुढे स्वतःच्या आवडीनिवडींना मुरड घालणे भाग होते. ते एवढेच म्हणाले ....‘‘मला तीन दिवस द्या. नाटकावर माझे काम मी पुरे करतो आणि आजपासून चौथ्या दिवशी आपण तालमी सुरू करू या.’’ भालबांनी इतक्या सहजी होकार दिला ह्या आनंदात आम्ही पुन्हा घरोघर गेलो. दुसऱ्या दिवशी पाळंदे भेटला, म्हणाला, ‘‘मी दिग्दर्शन करू शकत नसलो तरी मी नाटकात ठरल्याप्रमाणे काम करायला तयार आहे. नाटक मला आवडलेले आहे.... पण त्याचे दिग्दर्शन मला झेपणार नाही असे माझ्या लक्षात आले म्हणून मी अंग काढून घेतले. सर्वांसमोर तसे कसे सांगू? म्हणून आज तुला सांगायला आलो.’’ आणि पुढे काहीही मनात न ठेवता, पाळंदेने त्याचे नेमून दिलेले काम खिलाडूपणे, मन लावून केले.

भालबांनी सांगितल्याप्रमाणे चौथ्या दिवशी आम्ही सगळे तालमीला जमलो. तासभर झाला तरी भालबांचा पत्ता नाही. वेळेवर येण्याकरता भालबा कधीच प्रसिद्ध नव्हते. त्यामुळे आणखी एक तासभर थांबलो. तरी ते आले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. भालबा शांतपणे बाहेर आले. हातात नाटकाची प्रत होती ती माझ्याकडे देऊन म्हणाले, ‘‘मी नाही करू शकणार !’’ खोदून खोदून विचारलं तरी कारणही काही सांगेनात. ‘‘मी नाही करू शकणार.’’ एवढ़ेच पालुपद. आम्ही मुकाट्याने परतलो.

भालबांचा नकार ऐकून स्मशानातून परतल्याप्रमाणे आम्ही सगळे बराच वेळ निमूटपणे चाललो होतो. मग मीच बोलायला लागलो. मी म्हटले, ‘‘आपण सर्वांनी मिळून नाटक करायचे ठरविले आहे. त्यात माझी जबाबदारी मी जास्त मानतो.... कारण पी.डी.ए.च्या वतीने सरिताबाईंना शब्द दिलेला आहे. तेव्हा आता दिग्दर्शनाची जवाबदारी मी स्वतःच घ्यायला पाहिजे. आणि ती मी घेतो. माझे ‘राजमुकुट’ चे दिग्दर्शन फसलेले आहे हे मान्य आहे. पण ते नाटक अवघड होते. हे नाटक काही तसे अवघड नाही. नाटक विनोदी असल्यामुळे ते पाळंदे किंवा भालबांनी बसवले असते तर कदाचित अधिक बरे झाले असते, पण मीसुद्धा ते बऱ्यापैकी बसवू शकेन असा मला विश्वास वाटतो. तेव्हा तुमची हरकत नसेल तर दिग्दर्शनाची जबाबदारी मी घेतो. फक्त मला नेपथ्य, पात्रयोजना वगैरे बाबतींत संपूर्ण स्वातंत्र्य हवे. विशेषतः पात्रयोजना मला बदलावी लागेल.’’  मी पात्रयोजना बदलली.

सबंध नाटकात एकच स्त्री-भूमिका होती आणि ते काम नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ताराबाई धारपुऱ्यांना देण्यात आलेले होते. ताराबाई ह्या पी.डी.ए.मधल्या एकमेव मध्यमवयीन स्त्री कलावंत. अतिशय सोज्ज्वळ, सुस्वरूप अशा व्यक्तिमत्त्वाची ही स्त्री पी.डी.ए.च्या अगदी सुरुवातीपासून, उद्याचा संसारमध्ये 'करुणा'. दूरचे दिवेमध्ये 'सौदामिनी', आंधळ्याची शाळामध्ये ‘सुशीला’, वेड्याचे घर उन्हातमध्ये 'जीजी'- अशा करुणगंभीर भूमिका चोख करीत आली. एक प्रकारचे गूढ कारुण्य त्यांच्या नजरेत होतं, ते त्यांना या सगळ्यांच भूमिकांत मदत करत असे आणि अतिशय मन लावून त्या आपले काम करीत. पण 'खून पहावा करून' या नाटकातील भूमिका बव्हंशी विनोदी होती आणि ती ताराबाईंना मुळीच झेपली नसती. त्यांना नुसताच त्रास झाला असता. तेव्हा ती भूमिका मी बदलायचे ठरविले आणि तसे ताराबाईंना सांगितले. त्यांनीही एखाद्या शिपाईगड्याच्या वृत्तीने ते मान्य केले.

पी.डी.ए.त आपल्यावर सोपवलेले काम मन लावून करायचे, एवढा साधा त्यांचा दृष्टिकोन होता! ते काम मग मी श्यामला आगाशेला दिले. आता ती श्यामला वनारसे झाली होती. पूर्वी तिने आमच्या ‘राजमुकुट’मध्ये लेडी मॅक्वेथचे काम सुरेखच केले होते. एकुणातच फसलेल्या त्या ‘राजमुकुट’च्या प्रयोगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सुसह्य गोष्टी होत्या. त्यात श्यामलाची लेडी मॅक्वेथ होती! आता या नाटकात रंगभूषेचा वापर करून तिला जरा वयस्क करावे लागणार होते. पण एकदा ते केल्यावर ‘खून पहावा करून’मध्ये तिने वेगळीच उंची गाठली! जब्बार पटेल या नवीन तरुण नटाला मेडिकल कॉलेजमधून पळवून आणला. विद्यार्थी म्हणून मेडिकल कॉलेजच्या रंगमंचावर तो लक्षणीय कामगिरी करीत होता. त्याला पी.डी.ए.त ओढणे क्रमप्राप्तच होते. या नाटकात त्याला तरुण रहस्यकथा-लेखकाची भूमिका होती. ती करायला जब्बार मुळीच उत्सुक नव्हता. कारण भूमिका तुलनेने छोटी होती. दुसऱ्या अंकात त्याला कामच नव्हते. पण माझ्या मताने भूमिका फार महत्त्वाची होती. आणि त्याचे नाटकातले बहुतेक सारे प्रवेश महणजे माझ्याबरोबर जुगलबंदीच होती. एकदा हे सारे पटवून दिल्याबरोबर जब्बारने त्या भूमिकेत असा काही रंग भरला की आज तीस वर्षांनंतरही जब्बार त्या भूमिकेकरता आठवला जातो!

दिवस फार कमी असल्याने आम्ही सर्वांनी अतिशय कसून आणि शिस्तबद्ध तालमी केल्या. तालमींकडे भालबा किंवा बाकीही कुणी फारसे फिरकत नसत. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया फारसा कळत नसत... आणि खरे तर त्याबद्दल चिंता करत बसायला वेळच नव्हता. सरिताबाई व मंगेश पदकी तेवढे अगदी कर्तव्यबुद्धीने तालमींना हजर राहत. पण स्वतःच्याच विनोदांना ते काय हसणार? आम्ही आपल्याच बुद्धीने नाटकातले विनोदी प्रवेश वसवत होतो आणि ते विनोदी होताहेत असे आत्मविश्वासाने गृहीत धरत होतो! प्रयोग अगदी बांधीव, सुविहित बसवणे एवढेच आमच्या हाती होते आणि ते आम्ही चोख केले.

रंगीत तालमीला मात्र भालबा आले. पदकी दांपत्य होतेच. आणखीही तीनचार जाणकार हितचिंतक होते. प्रेक्षागृहात सारे आठदहा प्रेक्षक होते. प्रयोग (रंगीत तालीम म्हणजे प्रयोगच तो!) मात्र आम्ही सर्वांनी अगदी मन लावून केला. कसलीही, छोटीसुद्धा चूक न होता तिन्ही अंक पार पडले. पण सबंध प्रयोगात एकदाही कुणी हसले नाही! विनोदी नाटकात, एकही हशा नाही!! आम्ही सगळे प्रचंड नर्व्हस! विशेषतः मी! एवढ्या हट्टाने, नाटक चांगले आहे म्हणून मी हे पी.डी.ए.च्या माथी मारले की काय? ‘राजमुकुट’च्या पाठोपाठ पुन्हा अपयश? म्हणजे दिग्दर्शक म्हणून माझे अस्तित्वच संपलं की, मी नाटक चुकीचे निवडले काय? मला तर हे नाटक फार आवडलेले आहे. माझी आणि प्रेक्षकांची अभिरुची यांत एवढी तफावत कशी असेल ? का दिग्दर्शन चुकले? पण मला माझ्या मनाच्या रंगभूमीवर या नाटकाचा प्रयोग जसा दिसला तसाच मी तो बसवला आणि तो मनाच्या रंगभूमीवर घडलेला प्रयोग मला खूपच मनोरंजक, विनोदी, उत्कंठावर्धक वाटला होता. मग दिग्दर्शनाचा माझा आडाखा इतका कसा चुकला? 

रंगीत तालीम संपल्यावर भालबा गंभीर चेहरा घेऊन माझ्याकडे आले व म्हणाले, ‘‘प्रयोग तू खूप फार्सिकल पद्धतीने बसवायला होतास, तू सारे नाटक कॉमेडीच्या अंगाने बसवलेस. ते ‘फार्स’च्या  अंगाने बसवायला हवे... तर ते कदाचित परिणामकारक होईल. इतका अंडर प्ले केलेला विनोद आपल्या प्रेक्षकांना पुरत नाही. कुठलीही गोष्ट त्यांना जरा जादा करून दाखवावी लागते. उद्याचा दिवस अजून मधे आहे. मी पाहिजे तर सगळ्यांशी बोलतो. अजून या प्रयोगाला फार्सिकल रूप देता येईल!’’ मी एकदम चटका बसल्यासारखा जागा झालो ! मी म्हणालो, "नको भालबा. एक तर तो फार्स आहे असे मला मुळीच वाटत नाही. ओढून ताणून त्याचा फार्स केला तर चार हशे मिळतील कदाचित- पण परिणामाच्या दृष्टीने नाटक शून्य होईल. या नाटकाचा जवळजवळ सगळा विनोद हा एका उत्कंठावर्धक रहस्यकथेवर आधारलेला आहे आणि नाटकाचा फार्स केला तर रहस्यकथेचाही फार्स होईल.

नाटकातली रहस्यकथा ही उत्कंठावर्धक, थरारक राहिलीच पाहिजे तरच तिच्यावर आधारलेले सारे विनोद अर्थपूर्ण वाटतील. नाहीतर ते विनोद म्हणजे प्रेक्षकांना हसवण्याकरिता मारलेल्या कोलांट्या उड्या वाटतील. तेव्हा या नाटकाचा फार्स करायचा नाही. प्रयोग उत्तम बसलेला आहे. यशस्वी झाला, लोकांना आवडला तर तो असाच्या असाच आवडला पाहिजे! तेव्हा आता आपण आहे तसाच प्रयोग करायचा!’’ आणि तसाच्या तसाच प्रयोग केला. भरत नाट्य मंदिराच्या खुल्या प्रेक्षागृहात प्रयोग होता. हाऊसफुल्ल होता. दहाबारा वर्षांत पी.डी.ए.ने एवढी पुण्याई गाठीला लावली होती. तुरळक अपयशाचे अपवाद असले तरी पी.डी.ए.चा नवीन प्रयोग पाहण्याकरता लोक उत्सुक असायचे. पहिल्या एकदोन मिनिटांतच हशे सुरू झाले आणि पुढे सातत्याने वाढतच गेले. प्रचंड हशे आणि रहस्यकथेचा भाग सुरू झाला की संपूर्ण शांतता. पाच मिनिटांच्या तणावपूर्ण शांततेनंतर एकदम सबंध थिएटरभर हशाचा स्फोट व्हायचा. या पद्धतीने नाटक रंगत गेले आणि शेवटचा पडदा पडल्यावर कडाडून टाळी आली. नाटकाचा फार्स न करता प्रयोग विलक्षण यशस्वी झाला होता. रंगीत तालमीला आलेल्या जाणकारांचे चेहरे पडलेलेच होते. पण नाटकाशी संबंधित मंडळींचा उत्साह आणि आनंद बांध फुटून वाहत होता.

(क्रमशः)

Tags: यशस्वी प्रयोग रहस्यमय-विनोदी खून पहावा करून समीक्षा नाटक successful drama suspence but humorous khoon pahava karun review drama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके