डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कोकणातील एका गरीब कुटुंबातील सुस्वरूप कुमारी मुलगी गर्भार राहिली. ज्या कुणापासून ती गर्भार राहिली आहे त्याचे नाव सांगायला ती तयार नाही. तिची विधवा मावशी, उडाणटप्पू भाऊ, लग्न झालेली थोरली बहीण आणि या प्रकाराला जबाबदार असलेला गावचा खोत या साऱ्यांच्या मनावर घडलेल्या घटनेचा प्रचंड ताण आहे. प्रत्येक व्यक्तीचा ताण वेगळ्या प्रकारचा आहे. पण त्यात यशोदाच्या भविष्याच्या चिंतेपेक्षा स्वतःचा स्वार्थ, घराण्याची बेअब्रू- असल्या ताणांचे धागे बळकट आहेत.

अपयशाने खचून जाणे हे विजयाबाईंना आणि रंगायनला माहीतच नव्हते. 'जिंकलो-हरलो'चे प्रयोग मधून मधून चालू होते. पण आता तेही संपायला आले होते. पण पुढचे नाटक तयार होते श्री. ना. पेंडसे यांचे यशोदा. या नाटकाची गंमतच झालेली होती. आम्ही 1957 साली पी.डी.ए.करता ‘वेड्‌याचं घर’ केले. त्यानंतर थोड्‌याच काळात पेंडशांनी ‘यशोदा’ आम्हांला पुण्याला वाचून दाखवले होते. पी.डी.ए.ने ते करावे अशी त्यांची इच्छा होती. वाचनाला भालबा, मी, आणखी एक-दोघे असे होतो. श्री. ना. पेंडसे त्या वेळीही ख्यातनाम कादंबरीकार होते.

आम्हांला त्यांच्या साहित्याबद्दल प्रचंड आदर वगैरे होता; पण नाटक आम्हांला अजिबात आवडले नव्हते. नाटकात घडत काहीच नाही, जे घडायचे ते नाटक सुरू होण्याच्या आधीच घडून गेले आहे आणि नाटकभर सगळी पाने तोच एक प्रसंग उगाळीत बसली आहेत, असे आमचे स्पष्ट मत आम्ही परखडपणे पेंडश्यांना ऐकवले होते. (आम्हीही 'वेड्‌याचं घर'मुळे ख्यातनाम झालो होतोच की! आमचा पराक्रम पाहून तर पेंडसे एवढे मोठे लेखक असूनसुद्धा आमच्याकडे नाटक घेऊन आले होते.) पेंडसे शांतपणे सुपारी कातरत, तंबाखू खात आमची समीक्षा ऐकत होते. आमचे बोलणे झाल्यावर ते उठले. बाहेर जाऊन एक तंबाखूची पिचकारी टाकून आले आणि ‘बराय, मी येतो,’ म्हणून निघून गेले. 

आम्ही एवढ्‌या मोठ्या लेखकाला कसे स्पष्टपणे सुनावले या गुर्मीत. मोठा कादंबरीकार झाला म्हणून नाटक लिहिणं काय सोपी गोष्ट आहे काय! या गोष्टीला 5-7 वर्षे उलटून गेली होती. मध्यंतरी मी तीन वर्षे परदेशी काढून परत आलो होतो. पी.डी.ए., रंगायनची नाटके करत होतो. अचानक एक दिवस विजयाबाई म्हणाल्या, ‘‘पेंडशांचं नवीन नाटक छान आहे. आपल्याला करायचं आहे.’’ नाटकाचे नाव ऐकल्यावर मी विजयाबाईंना 5-7 वर्षांपूर्वीची पी.डी.ए.तल्या वाचनाची हकिकत सांगितली. त्यांना माझे मत ऐकून आश्चर्य वाटले, त्या म्हणाल्या, ‘‘मग कदाचित पेंडश्यांनी त्यानंतर पुन्हा लिहिलं असेल. पण मला चांगलं वाटतंय.’’ रंगायन करणारच आहे म्हटल्यावर मी पुन्हा 'यशोदा' वाचायला घेतले. आवडले नाही तर काम करायला नकार देणे माझ्या हातात होते. मी नाटक वाचू लागलो आणि सुरुवातीपासूनच त्यात असा काही खेचला गेलो की नाटक वाचून संपले केव्हा, ते कळलेच नाही.

नाटक तसे लहानच आहे. पण त्याने मला पार अस्वस्थ करून टाकले. त्या वेळी आम्ही बोललो त्यातले पहिले वाक्य खरेच होते. ज्या घटनेच्या आधारे नाटक लिहिले आहे ती घटना नाटकाआधीच घडून गेली आहे. कोकणातल्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबातील एक सुस्वरूप कुमारी मुलगी यशोदा गर्भार राहिली आहे! ज्या कुणापासून ती गर्भार राहिली आहे. त्याचे नाव सांगायला ती तयार नाही, घरात असलेली तिची वयस्क विधवा मावशी, तिचा नाकर्ता उडाणटप्पू भाऊ, तिची लग्न झालेली आणि म्हणून चवचालपणा करायला मोकळी असलेली थोरली बहीण, डोळ्यांचे ऑपरेशन करून घ्यायला शहरात गेलेला आणि तिकडून 'दृष्टी' मिळवून परत आलेला म्हातारा काका आणि या प्रकाराला जबाबदार असलेला गावचा खोत या साऱ्यांच्या मनांवर घडलेल्या घटनेचा प्रचंड ताण आहे.

प्रत्येक व्यक्तीचा ताण वेगळ्या प्रकारचा आहे. पण त्यात यशोदेच्या भविष्याच्या चिंतेपेक्षा स्वत:चा स्वार्थ, घराण्याची वेअब्रू असल्या तणावाचे धागेच बळकट आहेत. एका छोट्याशा खेड्यातल्या छोट्याशा कुटुंबातल्या सामान्य माणसांच्या मनातल्या ताणतणावांचे जाळे पेंडश्यांनी इतके घट्ट विणले आहे की आपणही त्यात गुरफटत जातो. सुटू शकत नाही. तडफडतो. आणि शेवटी जेव्हा एका नपुंसक माणसाशी यशोदेचे लग्न लावून हा भयानक गुंता सोडवल्याचा निर्लज्ज भास निर्माण केला जातो तेव्हा आपणही तेवढ्‌याच निर्लज्जपणे सुटकेचा श्वास टाकतो. 

हे नाटक मला त्या वेळी अजिबात आवडले नाही- असे कसे झाले? इतका मी त्या काळी निर्बुद् होतो ? सात-आठ वर्षांपूर्वी खूप आवडलेले एखादे नाटक किंवा कादंबरी आता वाचली तर तेवढी आवडत नाही हे आपण समजू शकतो. आपली अभिरुची अधिक चोखंदळ झाली, मॅच्युअर झाली असे आपण मानतो. पण पूर्वी अजिबात न आवडलेले नाटक आज सात-आठ वर्षांनंतर एकदम मोठे नाटक वाटू लागते याचा अर्थ आपली अभिरुची काळावरोवर अप्रगल्भ होत चालली नाही ना? का ती मॅच्युअर झाली असंच म्हणायचं? म्हणजे आपल्यात कुठल्याही दिशेने बदल घडला तरी आपण मॅच्युअर झालो, असे म्हणणे सोयीचे दिसते तेव्हा तसेच आपण म्हणावे. पण मला वाटते निर्बुद्ध, प्रगल्भ वगैरे असली वर्गवारी करत बसू नये. पूर्वी खांडेकर, साने गुरुजी यांच्या कथा, कादंबऱ्या मला आनंद देत असत. आता त्या देत नाहीत; पूर्वी ‘यशोदा’ने मला आनंद दिला नाही, आज ते आनंद देते; एवढीच वस्तुस्थिती आपण प्रामाणिकपणे नोंदवावी. मी ताबडतोब पेंडशांकडे जाऊन माझा पराभव कबूल केला आणि ‘यशोदे’च्या तयारीला लागलो. 

श्री.ना.पेंडसे यांच्या पत्नी कमलाबाई या माझ्या काकूची मैत्रीण असे दूरान्वयाचे का होईना नाते असल्याने माझा पेंडशांशी थोडा परिचय होता. ‘यशोदे’मुळे तो दृढ झाला. माझे एक मामा दापोलीलाच राहतात... आणि पेंडशांचे कोकण सगळे दापोलीच्या आसपास असल्याने तो एक दुवा आमच्या स्नेहबंधात होताच. पण शिरुभाऊ पेंडशांसारखा ज्येष्ठ स्नेही मला लाभला ही ‘यशोदा’ने मला दिलेली मोठी देणगी आहे. ‘यशोदा’नंतर पेंडशांनी अनेक नाटके लिहिली, त्यांतली बरीचशी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांवरून बेतल्यामुळे खूप गाजलीही. पण 'यशोदा' हे पैंडशांचे सर्वोत्कृष्ट नाटक आहे असे मला वाटते. बाकीची नाटके ‘यशोदा’च्या आसपासही पोचू शकत नाहीत. 

'यशोदा' नावाची पेंडशांची जी कादंबरी आहे ती नाटकानंतर लिहिलेली आहे हे ध्यानात आल्यावर असे वाटले की, ‘यशोदा’हे पेंडशांना नाटक म्हणून स्वतंत्रपणे सुचले आहे. कादंबरीवरून घेतलेले नाही म्हणूनच ते इतके चांगले नाटक असेल का? 'यशोदा’मधल्या प्रत्येक स्वभावरेखेत आणि प्रसंगात जो एकसंधपणा आणि अपरिहार्यता आहे तो त्यांच्या इतर नाटकांतून जाणवत नाही. ती कौशल्याने रचलेली नाटके वाटतात. 'यशोदा’ जसे एकात्मसंपन्न अनुभव देते तशी इतर नाटके देत नाहीत. 'यशोदा’च्या तयारीकरता पेंडसे आम्हांला कोकणात दापोलीला घेऊन गेले. पेंडसे, श्री. पु., विजयाबाई आणि मी- आम्ही चौघे जण एसटीने दापोलीला गेलो. हा प्रवास मुख्यतः दिग्दर्शकाकरता होता. विजयाबाई कधी कोकणात गेल्या नसाव्यात, त्यामुळे त्यांना कोकणातील घरे, तिथली माणसे, निसर्ग- सारे नीट पाहणे अवश्य वाटत होते. दोन दिवस आम्ही खूप हिंडलो. विजयाबाईंनी टिपणे वगैरे काही केली आणि आम्ही परतलो. मी पुण्याला आणि बाकी तिघे मुंबईला. 

‘यशोदे’मध्ये आंधळ्या काकांचे काम करायला वृद्ध, कोकण्या वाटणारा नट हवा होता. हौशी नट तसा शोधून सापडणे कठीण होते, तर विजयाबाईंनी चक्क मामा पेंडशांनाच तयार केले. मामा पेंडसे म्हणजे मराठी रंगभूमीचे भूषण होते. जुन्या पिढीच्या मोठ्या नटांत नानासाहेब फाटक, केशवराव दाते, गणपतराव बोडस यांच्या बरोबरीने मामांचे स्थान होते. गोरापान, कृश देह. कवटीवर त्वचा ताणून बसवल्यासारखा चेहरा, तरतरीत सरळ नाक, घारे, भेदक डोळे आणि तितकीच भेदक स्वच्छ वाणी ही मामांची वैशिष्ट्ये. भूमिकेची समजही चांगली. मामांची या कामाकरता केलेली निवड हा विजयाबाईंच्या दिग्दर्शन-कौशल्याचा एक ठोस पुरावा होता. मामांनीसुद्धा आपल्या सगळ्या व्यावसायिक नाटकांतून वेळ काढून दमडीच्याही प्राप्तीची अपेक्षा नसताना, अतिशय मन लावून तालमी केल्या. काम अर्थातच उत्तम केले.

तो काळ जुन्या जाणत्या नटांनी नव्या, प्रायोगिक म्हणवणाऱ्या नटांना शिव्या देण्याचा, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण्याचा होता. हे नवे लोक कानामागून येऊन तिखट होताहेत असे जुन्यांना वाटत होते. अर्थात, आमच्या नव्या मंडळींचा प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास काही वेळा उद्धटपणाच्या पातळीवर जायचा आणि त्यामुळे जुनी मंडळी दुखावली जायची हेही खरे. पण हे सगळे विसरून मामा अगदी मनापासून आम्हां पोरासोरांचे सहकारी कलावंत म्हणून वावरले. विजयाबाईंनी 'यशोदा' नाटक फारच सुंदर बसवले. वास्तवदर्शी नेपथ्याचा आधार न घेता कोकणातले वातावरण समर्थपणे उभे केले. प्रचंड ताणाखाली वावरणाऱ्या संगळयाच व्यक्तिरेखा अगदी नेमकेपणाने उभ्या केल्या.

नाटकामध्ये रंजनाचा भाग फारच थोडा. तोसुद्धा नाटकातला अतिगंभीर प्रसंग आणि त्यामुळे सगळ्याच संबंधितांच्या मनावर असलेल्या प्रचंड ताणाच्या अनुषंगाने आलेला आणि मधूनमधून ताण थोडा सैल करणारा. पण नाटकाचा मूळ गाभा म्हणजे निरनिराळ्या  पातळ्यांवरचा ताण... आणि त्या सगळ्या ताणतणावांचे घट्ट विणलेले जाळे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनोव्यापारांची घडण निरनिराळी- त्यांच्या समस्या निरनिराळ्या. त्यामुळे ‘यशोदेचे कुंवारपणी गर्भार राहणे,' या  मध्यवर्ती घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा. प्रत्येक व्यक्तीचा ताण निरनिराळ्या प्रकारचा असला तरी सगळ्यांच्या ताणांमुळे एकत्रितपणे जो तणाव निर्माण व्हायचा त्याने सगळे वातावरण भारून जायचे. हे सारे विजयाबाईंनी फार समर्थपणे उभे केले. वृद्ध, प्रेमळ, विधवा मावशीची त्यांची भूमिका तर त्यांनी अप्रतिमच केली.

मी ‘शितू’पासून गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांच्या सात-आठ भूमिका पाहिल्या होत्या. चार वेळा तर मीही त्यांच्याबरोबर रंगमंचावर होतो. अतिशय वास्तवदर्शी, सहजसुंदर असा त्यांचा अभिनय होता. तंत्राचा वापर त्या खूप प्रमाणात जाणीवपूर्वक करायच्या; पण अभिनयाशी ते तंत्र इतके एकजीव झालेले असायचे की त्याचे स्वतंत्र अस्तित्व कधीही जाणवायचे नाही. स्वत:च्या शरीरावर, भावदर्शनावर त्यांचा संपूर्ण ताबा असायचा आणि त्यामुळे त्यांचा अभिनय मर्यादा सोडून कधी इकडेतिकडे वाहवत जायचा नाही. कणभर कमी नाही की कणभर जास्त नाही! एकदाच त्यांचा ताबा सुटलेला मी पाहिला होता. त्यांच्या तरुण पतीचे अकाली निधन झाले आणि काही काळात त्या त्यांच्या धक्क्यातून सावरल्या. 

'मी जिंकलो-मी हरलो' हे नाटक अचानक बंद पडले होते ते पुन्हा सुरू करायचे रंगायनने ठरवले. आम्ही तयारी केली. पतिनिधनानंतरचा तो विजयाबाईंचा पहिला प्रयोग होता. रंगायनची सगळीच मंडळी विजयाबाईंना नेहमीच फुलासारखे जपत असत. आजचा प्रसंग तर फार गंभीर होता. बाईंच्या मनावर खूपच ओझे असल्याचे जाणवत होते. अगदी गप्प गप्प होत्या. मनामध्ये खूप काही तुफान चाललेले होते, पण ते बाहेर दिसू देऊन लोकांची सहानुभूती ओढवून घ्यायची नव्हती! सगळे एकटीने थोपवायचे होते. थोपवले होते. नाटक सुरू झाले आणि सगळी मंडळी विंगेत उभी राहून काम करीत असलेल्या विजयाबाईंवर बारीक लक्ष ठेवून उभी होती. कुणाच्या हातात पाण्याचा ग्लास, कुणाच्या हातात चहाचा कप. कुणाच्या हातात अमृतांजनची बाटली... बाईंना कुठल्या क्षणी कशाची गरज लागेल याचा नेम नव्हता.

पण बाई अगदी नेहमीप्रमाणे संयत, नेमका अभिनय करत होत्या. पहिला अंक संपला आणि सगळ्या मंडळींवरचा ताण एकदम सैल झाला व एकदम रंगायनचे नेहमीचे जल्लोशी वातावरण परत आले. बाईही आता पुन्हा नेहमीच्या बाई झाल्या होत्या. दुसरा अंक हसतखेळत सुरू झाला आणि व्यवस्थित नेहमीप्रमाणे चालू लागला. मग एक गंभीर प्रवेश सुरू झाला. फक्त बाई आणि मी दोघांचाच. नवऱ्याच्या नाटकवेडाने, घरात होणाऱ्या दुर्लक्षाने, नवरा-बायकोत थोडी तणातणी चालली आहे, असा प्रवेश होता. बायकोच्या बोलण्याने चांगलाच चिडून एकदम संयम सुटून नवरा (म्हणजे मी) विचारतो, ‘‘मग कशाला लग्न केलंस माझ्याशी?’’ बायकोचे उत्तर आहे, ‘‘लग्न कशासाठी करतात माणसं? सुख मिळविण्यासाठी!’’ मी प्रश्न विचारीपर्यंत नाटक व्यवस्थित चालू होते. नाटकाच्या पातळीवर होते! मी चिडून प्रश्न विचारला आणि विजयाबाईंकडे पाहिले. प्रचंड धरणीकंप होऊन धरणी वेडीवाकडी उसवावी तसा एकदम विजयाबाईंचा चेहरा झाला. तोंडून उत्तर आले नाही.

आतमध्ये प्रचंड स्फोट होऊन ठिकऱ्या ठिकऱ्या व्हाव्यात आणि बाहेर मात्र काहीच झाले नाही हे दाखवण्याकरिता जिवाच्या आकांताने त्या ठिकऱ्या एकत्र करण्याचा निकराचा प्रयत्न करावा तसे विजयाबाईंचे सर्वच शरीर उभ्या उभ्या शहारले आणि डोळ्यांतून घळघळा पाण्याच्या धारा लागल्या. गुदमरून टाकणारा एक गळाभर आवंढा विजयाबाईनी गिळला. तोंडातून शब्द फुटेना. नाटकाच्या पातळीवरून नाटक एखाद्या-उधळलेल्या हिंस्र जनावराप्रमाणे जीवनात घुसले होते आणि तिथे त्याने विध्वंस मांडला होता. विजयाबाई ‘अनु’ राहिल्या नव्हत्या. ‘विजया खोटे’ झाल्या होत्या. 'सुख मिळवण्याकरता माणसं लग्न करतात,' हे वाक्य विकट हास्य करत त्यांच्या उजाड जीवनावर थयथय नाचत होते. आणि विजयाबाईंच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते, तोंडातून आवाज फुटत नव्हता.

विजयाबाईंची ती अवस्था पाहून माझे पाणी पाणी झाले. वाटले, त्यांना जवळ घेऊन थोपटून धीर द्यायला पाहिजे. नाहीतर त्या इथेच उम्या कोसळतील. पण मी, 'मी जिंकलो - मी हरलो’ या नाटकातला 'माधव' होतो. श्रीराम लागू नव्हतो! हे असे हळवे होण्याची माझी चैन नाटकाला अजिबात परवडण्यासारखी नव्हती. नाटकाचा विचका झाला असता. मी तसाच निर्दयपणे विजयाबाईंकडे बघत बसून राहिलो. त्या निःशब्दतेत किती वेळ गेला ठाऊक नाही. पण एवढा मोठा विराम (पॉज) मी नाटकात कधीच अनुभवला नाही! त्याआधी किंवा नंतरही. थोड्याच क्षणांत विजयाबाई सावरल्या. पुन्हा ‘अनू’ झाल्या आणि नाटक पुढे व्यवस्थित गेले. पण त्या काही क्षणांनी मात्र चांगलेच हादरवले. त्यांना आणि मलाही. आम्ही निर्ढावलेले, पक्के नाटकवाले असल्याचा निर्वाळाही त्या क्षणांनी दिला!

(क्रमशः)

Tags: एकात्म अनुभव कोकण पार्श्वभूमी सहजसुंदर अभिनय विजया मेहता श्रीराम लागू श्री. ना. पेंडसे यशोदा नाट्‌याविष्कार integrated experience konkan background easy beautiful acting vijaya mehata shriram lagu s. n. pendse yashoda drama invention weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके