डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचा प्रश्न

पी.डी.ए.ने पहिली दहा-बारा वर्षे नाटकाविषयीच्या परंपरागत जाणिवांना छेद देणारी नाटके यशस्वीरीत्या सादर केली. मात्र यानंतर संस्था स्थितिशीलतेच्या मुक्कामावर येऊन पोहोचली. हे केवळ नेत्याच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे होत असेल तर नेतृत्व बदलले पाहिजे असे मला फार तीव्रतेने वाटले.
 

‘खून पहावा करून’ हे नाटक चांगलेच यशस्वी झाले. वृत्तपत्रात परीक्षणेही खूप चांगली आली. काही महिन्यांच्या अवधीतच संस्थेने नाटकाचे पंचवीस प्रयोग केले. पी.डी. ए. च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पण आपला विरोध असतानाही पी.डी.ए.त एक नाटक इतके यशस्वी झाले याची खंत भालबांना फार बोचली. अर्थात त्यांनी ती बोलून दाखविली नाही. पण त्यांच्या वागण्यात ती दिसत राहिली. पूर्वी आम्ही सगळेच एकत्र बसून चर्चा करायचो, निर्णय घ्यायचो. आता अनेक चर्चा मला टाळून होऊ लागल्या. माझ्या अपरोक्ष घेतले गेलेले निर्णय मला दुसऱ्या कुणाकडून तरी कळू लागले. ‘खून पहावा करून’च्या तालमीच्या काळातले भालबांचे फटकून वागणे नाटकात काम करणाऱ्या सगळ्याच मंडळींना खटकले होते. आणि नकळत त्यातली बरीच मंडळी भालबांना विरोध करू लागली होती. पी.डी.ए.मध्ये दुहीची स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. अर्थात हे मतभेद 'खून पहावा करून’च्या निमित्ताने स्पष्ट झाले एवढेच. एरवी बरेच दिवस ते खदखदत होतेच.

भालबांचे आणि माझे मतभेद आता केवळ वैयक्तिक पातळीवर राहिले नव्हते. त्यांना आता सामुदायिक स्वरूप आले होते. पाळंदे, विश्वास मेहेंदळे, जब्बार, अनिल जोगळेकर, वि.भा. देशपांडे, कळसकर, श्यामला वगैरे मंडळीही भालबांच्या नेतृत्वाच्या विरोधात उभी राहत होती. भालबांचे नेतृत्व आता जुनाट व स्थितिशील झाले आहे आणि ते आता बदलणे अवश्य झालेले आहे असे बऱ्याच मंडळींना वाटू लागले होते. अर्थात भालबांच्या नेतृत्वावर संपूर्णपणे विश्वास असणारीही काही मंडळी होतीच, पण त्यात एकनिष्ठेचा भाग अधिक होता, विचाराचा कमी असावा असे मला वाटते. जया, राजगुरूसारखी काही मंडळी कुंपणावर होती. पण त्यांची अवस्था फारच दोलायमान होती. 

1951 मध्ये प्रागतिक विचारांची काही मंडळी एकत्र येऊन त्यांनी पी.डी.ए. सुरू केली. पुण्यात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अशा काही नाट्यसंस्था होत्या, त्या जुनाट विचारांच्या आहेत, आपल्याला त्यांच्यापेक्षा काही वेगळे, काही प्रागतिक स्वरूपाचे कार्य करायचे आहे या जाणिवेने या काही मंडळींनी पी.डी.ए. ही वेगळी 'प्रोग्रेसिव्ह' संस्था काढली. दहा-बारा वर्षे त्या दिशेने त्यांनी काही भरीव कार्य केले. नाट्‌यविषयक एक नवी जाणीव प्रेक्षकांत रुजवण्याचे काम केले, नाटकाविषयीच्या परंपरागत जाणिवांना छेद देणारी नाटके यशस्वीरीत्या सादर केली. त्या प्रागतिक संस्थेने 1965 साली पंधरा वर्षांच्या आत स्थितिशीलतेच्या मुक्कामावर येऊन पोचावे आणि उलट्या दिशेला तोंड फिरवून वाटचाल सुरू करावी याची मला फार खंत वाटली. आणि हे केवळ नेत्याच्या परंपरागत, प्रतिगामी विचारसरणीमुळे होत असेल तर नेतृत्व बदलले पाहिजे असे मला फार तीव्रतेने वाटले.

एकाद्या व्यक्तीचा विकास थांबला असेल तर त्या व्यक्तीने संस्थेच्या विकासाच्या आड येता कामा नये. आणि तशी जर ती येत असेल तर संस्थेतल्या, पुरोगामित्वाची चाड असलेल्या माणसांनी, व्यक्तिनिष्टेचा विचार बाजूला ठेवून, थोड्‌या निष्ठुरपणे का होईना, पण त्या व्यक्तीला बाजूला केले पाहिजे. त्यातच संस्थेचे, तिच्या कार्याचे, एकूण चळवळीचेच हित आहे. या विचारांनी मी पी.डी.ए.च्या कार्यकारिणीच्या एका बैठकीत नेतृत्वबदलाचा ठराव मांडला! ठराव मांडण्यात राजकारण किंवा माझी नेतृत्वाची हौस असले काहीच नसल्याने तो कसलीही पूर्वतयारी न करता एकदमच मांडला गेला. या दिशेने विचार चालू आहेत याची जाणीव एव्हाना सर्वांनाच झाली होती. पण एकदम, कसलीही पूर्वसूचना न मिळता असा बैठकीतच बाँब टाकला जाईल असे कुणालाच वाटले नव्हते. सारेच गोंधळून गेले.

मी माझी ठराव मांडण्यामागची भूमिका सांगितली. मग प्रत्येकाने आपापले मत मांडले. भालबांनी आता निवृत्त होऊन संस्थेचा कारभार तरुण मंडळीवर सोपवावा असा विचार बऱ्याच बहुसंख्येने मांडण्यात आला. अशा वेळी ठराव मताला टाकला असता तर तो नक्की पास झाला असता. पण कुंपणावरच्या मंडळींनी असा प्रश्न उपस्थित केला की नेतृत्व बदला हे ठीक आहे....पण नवे नेतृत्व द्यावे कुणाला? मी वर्षा-दोन वर्षांत पुण्यातील वास्तव्य हलवून मुंबईत स्थायिक होण्याचा विचार करतो आहे, त्यासाठी मी मुंबईत चांगली नोकरीही शोधतो आहे हे सगळ्यांना ठाऊक होते. त्यामुळे मी नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता! मग कोण? हा फार मोठा प्रश्न ठरला. उरलेल्या कुठल्याच नावांबाबत एकमत होईना!

ठराव मताला टाकला तेव्हा ठरावाच्या बाजूने (म्हणजे भालबांचे नेतृत्व बदलण्याच्या बाजूने) जितकी मते पडली, नेमकी तितकीच मते ठरावाच्या विरुद्ध पडली! खरे म्हणजे स्वतःविरुद्ध ठराव मांडला जातो आहे अशा वेळी त्यांनी बैठकीतून उठून बाहेरच जायला हवे होते. ते तर त्यांनी केले नाहीच. पण कार्यकारिणीची मते एकसारखी विभागली गेलेली पाहून त्यांनी आपले निर्णायक मत स्वतःच्याच वाजूने (म्हणजे ठरावाच्या विरुद्ध) टाकले ! ठराव नापास झाला. पी.डी.ए.चे नेतृत्व सुवासिनीच्या कुंकवासारखे शाबूत राहिले. मला अर्थातच फार वाईट वाटले. मी विचार केला, भालबांच्या जागी मी असतो तर मी काय केले असते? उत्तर स्पष्ट होते. 'प्रोग्रेसिव्ह' म्हणवणाऱ्या संस्थेच्या कार्यकारिणीचे निम्म्यापेक्षा अधिक सभासद आपल्यावर प्रतिगामी विचारांचा, स्थितिशीलतेचा आरोप करतात, अशा परिस्थितीत आपण या संस्थेचे नेतृत्व करावे काय? हा प्रश्न खुर्चीला चिकटून राहण्याचा असू शकत नाही.

हा प्रश्न एक सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचा आहे. ती चळवळ पुढे नेण्याच्या आपल्या बुद्धीची, प्रतिभेची कुवत संपली असेल तर आपणच नेतृत्व करण्याचा हट्ट करण्याने त्या चळवळीचे नुकसान होणार आहे; असा विचार भालबा करू शकले नाहीत. खुर्चीला चिकटून राहण्यातच त्यांनी आपला विजय मानला. स्वतःची जागा समर्थपणे भरून काढू शकणारे नेतृत्व भालबांनी संस्थेत वाढूच दिले नाही. माझे तर सोडा. मी पुणे सोडून जाण्याचाच विचार करत होतो. पण पुढे काही वर्षांनी जब्बार पटेलच्या रूपाने हे नेतृत्व 'घाशीराम कोतवाल' घेऊन उभे राहिले तेव्हा तर जब्बारला संस्थेच्या अनेक सभासदांसह संस्था सोडून बाहेर पडण्याखेरीज पर्यायच उरला नाही. भालबांनी तो उरू दिला नाही! भालबांच्या तंगड्यांत तंगड्या अडकवून पी.डी.ए.त पडून राहण्यात काही अर्थ नव्हता. इथून पुढे भालबा मला काही करू देतील हे शक्य दिसत नव्हते. तेव्हा मी पी.डी.ए.चाच राजीनामा देऊन मोकळा झालो . कार्यकारिणीने मला एक विनंती केली. ‘खून पहावा करून’चे पंचवीस प्रयोग पुरे होईपर्यंत मी त्या प्रयोगात काम करीत राहावे; अशी ती विनंती होती! तोपर्यंत मी पी. डी ए. बाहेर राहून ‘खून पहावा करून’च्या प्रयोगात काम करत राहिलो. पण पी.डी.ए.चा संबंध संपला एप्रिल 1965 मध्ये. याच सुमारास वडील वारले.

(क्रमशः)

Tags: भालबा डॉ. श्रीराम लागू ‘पीडीए’तील घडामोडी वैचारिक bhalaba dr. shriram lagu events in PDA ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके