डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका छोट्या पेशंटने उतरविली नशा!

वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी माझे टॉन्सिलचे ऑपरेशन झाले. मला चालतच ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथली काचेची कपाटे, त्यात लखलखणारे अनेक चाकू, कात्र्या, चिमटे, मधले ऑपरेशन टेबल - त्यावर टांगलेला प्रचंड दिवा, भोवती उभी असलेली चमत्कारिक कपडे घातलेली, नाक-तोंड बांधलेली माणसे आणि बसकन् नाकात शिरणारा औषधांचा उग्र दर्प - या साऱ्यांमुळे उरात धडकीच भरली होती...
 

वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी माझे टॉन्सिलचे ऑपरेशन झाले. मला चालतच ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथली काचेची कपाटे, त्यात लखलखणारे अनेक चाकू, कात्र्या, चिमटे, मधले ऑपरेशन टेबल - त्यावर टांगलेला प्रचंड दिवा, भोवती उभी असलेली चमत्कारिक कपडे घातलेली, नाक-तोंड बांधलेली माणसे आणि बसकन् नाकात शिरणारा औषधांचा उग्र दर्प - या साऱ्यांमुळे उरात धडकीच भरली होती...

डॉ. बेली माझा जरा दोस्त झाला होता. त्याला मी विचारले की मी अगदी नवखा आहे आणि मला दारू प्यायला शिकायचे आहे. चार-चौघांत माझी फजिती होता कामा नये - तर मी पार्टीत काय प्यावे? तो स्वतः फारसा दर्दी पिणारा नसावा. तो म्हणाला, 'रम आणि कोकाकोला मिसळून पी म्हणजे तू काय पितोयस कुणाला कळणार नाही! मी म्हणालो, 'मग काय उपयोग? मी पितो आहे हे सगळ्यांना कळले तर पाहिजेच. नाहीतर मी कोक पिणारा कुणीतरी बायल्या इंडियन आहे असे सारे समजतील. पण पार्टीत पिऊन माझं माकड नाही झालं पाहिजे!'

"Montreal Children's Hospitar" संपूर्णपणे वातानुकूलित हॉस्पिटल होते. एकेका मजल्यावर दोन दोन वार्ड असायचे. त्यालाच लागून काही खास खोल्या सुमारे ऐंशी रुग्ण एकेका मजल्यावर असायचे. पण सगळ्या खाटा भरलेल्या आहेत असे चित् कधी तरी व्हायचे. गर्दी, गिचमिड तर नाहीच भरपूर, हवेशीर जागा सर्व रुग्णांना हॉस्पिटलचे स्वच्छ परीट घाडीचे कपडे, उत्तम दर्जाचे जेवण आणि औषधोपचार, लहान मुलांचे हॉस्पिटल असले तरी नातेवाईकांनी पेशंट्समवेत ठराविक भेटण्याच्या वेळेव्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये राहायचे नाही ह्या शिस्तीचे कडक पालन व्हायचे. 

सुमारे पाचेक मुलामागे एक नर्स असे प्रमाण असल्याने रुग्णाकडे दुर्लक्ष होईल ही भीती नाही आणि नर्सेस खूप कार्यक्षम, प्रेमळ असायच्या. काम कमी असल्याने त्यांच्यावर फार ताण नसायचा आणि अगदी मनापासून काम करायच्या. रात्री बेरात्रीसुद्धा खुर्चीत बसून पेंगणारी किंवा डूलकी घेणारी नर्स कधी दिसायची नाही. पेशंटशी संबंधित, पैशाने विकत घेता येणारी कुठलीही गोष्ट मागितली की ती ताबडतोब हजर व्हायची. पहिल्याच दिवशी एका मुलाला तपासताना मी थर्मामीटर मागितला (आमचे नाक कान-घशाचे खाते असल्याने थर्मामीटर सहसा लागायचा नाही) तर नर्सने थर्मामीटर असलेले एक खोकेच माझ्यासमोर धरले. डझन दोन डझन थर्मामीटर त्या खोक्यात पडलेले होते! 

मला चटकन् पुण्याच्या ससून हॉस्पिटलची आठवण आली. थर्मामीटर फुटला की वॉर्ड-सिस्टरला (मुख्य नस) सांगायचे. मग तिने एक अर्ज भरून तो स्टोअरकडे पाठवायचा. तिथून तो हॉस्पिटलप्रमुखाकडे मान्यतेकरता जायचा. तिथून मान्यता मिळून अर्ज परत स्टोअरकडे जायचा. आणि मग थर्मामीटर वॉर्डात यायचा. तीन चार दिवस लागायचे! तोपर्यंत, जरूर पडली की शेजारच्या वॉर्डात जाऊन, दादापुता करून तिथला उसना आणायचा आणि काम झाल्याबरोबर परत करायचा. दुसऱ्या वॉर्डची सिस्टर आणि आमच्या वॉर्डची सिस्टर यांचे थोडे बिनसलेले असले म्हणजे तिच्या वॉर्डत जाऊन भीक मागायला लागायची!

नाक-कान-घशाचे ऑपरेशन थिएटर दहाव्या मजल्यावर. (प्रत्येक शाखेचे थिएटर वेगवेगळे असायचे.) लहान मुलांचे हॉस्पिटल असल्याने सगळ्या शस्त्रक्रिया भूल देऊनच करायला लागायच्या. थिएटरला लागूनच भूल देण्याची एक खोली असायची. आठव्या मजल्यावरच्या आमच्या वॉर्डमधून, पेशंट कपडे बदलून, त्याच्या कोटसकट, लिफ्टमधून या भूल देण्याच्या खोलीत आणले जायचे. तिथे त्याला खेळवायला, त्याच्याशी गप्पा मारायला नर्सेस असायच्याच. खूप खेळणी पण असायची. कापडाचे किंवा लोकरीचे, कापूस भरलेले मऊमऊ टेडी वेअर, डॉनल्ड डक, मिकी माऊस वगैरे बालकांचे लाडके प्राणी असायचे. 

प्रत्येक खेळण्याच्या शेपटीपासून तो थेट त्याच्या उघड्या तोंडापर्यंत एक पोकळ नळी त्याच्या शरीरात बसवलेली. आपले आवडते खेळणे घेऊन पेशंट त्याची पापी घेऊ लागला की शेपटीकडच्या नळीच्या टोकला भूल देण्याच्या मशीनची नळी जोडून द्यायची - आणि मशीन सुरू करायचे. बघता बघता मूल झोपी जायचे! दंगा नाही, आरडाओरड नाही. भूल चांगली चढली की मुलाला उचलून आत ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जायचे. हॉस्पिटलचे प्रमुख संमोहनशास्त्री डॉ. डॅव्हनपोर्ट यांनी मुद्दाम ही सगळी, नळ्या बसवलेली खेळणी हॉस्पिटल करता तयार करून घेतली होती. 

माझे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी टोन्सिलचे ऑपरेशन झाले. मला चालतच ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथली काचेची कपाटे, त्यात लखलखणारे अनेक चाकू, चाव्या, चिमटे, मधले ऑपरेशन टेबल- त्यावर टांगलेला प्रचंड दिवा, भोवती उभी असलेली चमत्कारिक कपडे घातलेली नाक तोंड बांधलेली माणसे आणि वसकन् नाकात शिरणारा औषधांचा उग्र दर्प- या साऱ्यांमुळे उरात धडकीच भरली होती. तेवढ्यात एका खाकी काड्यातल्या, नाकतोंड बांधलेल्या माणसाने मला झटक्यात उचलून मधल्या टेबलावर उताणे टाकले आणि माझे दोन्ही खांदे आणि हात दाबून धरले त्याच क्षणी दुसऱ्या एका तसल्याच माणसाने माझे दोन्ही पाय दाबून घरले. 

डोक्याशी उभ्या असलेल्या एकाने माझे नाक-तोंड-डोळे झाकून टाकणारी एक पांढरी भयंकर उग्र वासाची छोटी टोपी माझ्या चेह-यावर दाबून धरली आणि मी एकदम जिवाच्या आकांताने किंचाळत, हातपाय झाडत, मला धरून ठेवणाऱ्या त्या तीन राक्षसांच्या कचाट्यातून सुटका करून घेऊन टेबलावरून उडी मारून पडू लागलो. 

अर्थात् शत्रूपक्ष फारच प्रबळ असल्याने त्यांनी मला पकडलेच. पण त्या प्रकाराचा फार मोठा धसका मी कैक वर्षे पेलला होता, मला वाटते डॉ. डॅव्हलपोर्टनही लहानपणी असा धसका घेतला असेल आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना त्यापासून वाचवण्याकरिता ती सगळी खेळणी मुद्दाम तयार करून घेतली असतील! अर्थात डॅव्हनपोर्ट कॅनडासारख्या श्रीमंत देशात होते हे आहेच! ही श्रीमंती ठायीठायी दिसायची. हॉस्पिटलमधल्या बहुतेक नर्सेसकडे स्वतःची गाड़ी असायची. दिवसातून दोन ते तीन पाकिटे (म्हणजे चाळीस ते साठ) सिगरेटी ओतायच्या! पण सगळ्या तरुण, तरतरीत, हसतमुख आणि कार्यक्षम. कामाव्यतिरिक्त वेळात निरनिराळे छंद जोपासायच्या. 

बर्फावर स्केटिंग करणे. स्कीईंग करणे, बर्फावरची हॉकी, असले खेळ कॅनडात खूप खेळले जायचे, कारण तिथला हिवाळा खूप प्रदीर्घ आणि बर्फाळ असायचा, एका नर्सचा छंद होता पॅराशूट-जंरपिंग!' म्हणजे विमानातून वर जायचे आणि पॅराशूट लावून विमानातून उडी मारून तरंगत खाली यायचे! माँट्रियलपासून पन्नासएक मैलांवर, अगदी गावाबाहेर हा विमानांचा क्लब असायचा. सुट्टीच्या दिवशी सकाळी गाडीतून तिथे जायचे. मस्तपैकी नाश्तापाणी करायचे. मग स्वतःचे पॅराशूट गुंडाळून तयार करायचे. 

हा एक समारंभच असायचा. पॅराशूटचे एक टोक एका मोठया झाडाच्या बुंध्याला बांधायचे आणि दुसरे टोक धरून मागे मागे जायचे. सबंध पॅराशुट, दोऱ्यांसकट ताणले जाईपर्यंत चांगले पंचवीस एक मीटर मागे जायला लागायचे. तिथे ते टोक ताणून धरून एकाने उभे राहायचे. दुसऱ्याने झाडाकडे जायचे. पॅराशूट हवेत तरंगू लागले म्हणजे घुमटासारखा फुगा तयार होतो. त्याला शेकडो मीटर कापड वापरावे लागते आणि त्याला खालच्या बाजूला पन्नासएक दोऱ्या बांधलेल्या असतात. त्या प्रचंड कापडाच्या विस्ताराच्या एका ठराविक शिस्तीत घड्या घालायच्या. 

प्रत्येक घडीच्या खालच्या बाजूला जोडलेली दोरी सुटी सरळ आणि दुसऱ्या कुठल्याही दोरीत गुंतलेली नाही हे पाहात सगळ्या दोऱ्या एकत्र करायच्या. मग झाडाला बांधलेले टोक सोडून, त्या टोकाने सबंध पॅराशूट एका विशिष्ट पद्धतीने गुंडाळून, बांधून त्याचा पाठीवर बांधता येईल असा गड्डा तयार करायचा. कमरेभोवती, खांद्यांभोवती, मांडयांभोवती बांधायचे पट्टे जागच्या जागी आहेत अशी खात्री करून घ्यायची. 

एवढे सगळे बाळंतपण करेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ व्हायची. मग जेवण घ्यायचे. जरा आराम करायचा आणि क्लबचा जो तज्ज्ञ शिक्षक असेल त्याला नेऊन ते बांधून तयार केलेला गड्डा दाखवायचा आणि त्याच्याकडून पास करून घ्यायचा. त्याने काही चुका दाखवल्या तर त्या दुरुस्त करायच्या आणि मग आपला नंबर येण्याची वाट पाहत बसायचे. नंबर लागला कीपॅराशुट पाठीला बांधून विमानात जाऊन बसायचे. 

पाचएक मिनिटांत विमान वर जाऊन क्लबच्या डोक्यावर घिरट्या घालायला लागायचे. एका ठराविक ठिकाणी विमान आले की विमानातून खाली उडी मारायची- दोरी ओढून पॅराशूट उघडायचे आणि मजेत तरंगत तरंगत जमिनीवर उतरायचे! हे सगळे तिने केले. माझी नुसतीच लुडबूड! 

जमिनीला पाय लागल्यानंतर पॅराशूटपासून सुटका करून घेऊन ती धावत माझ्याकडे आली आणि एखाद्या लहान मुलासारखी तिने मला कडकडून मिठी मारली. तिचा चेहरा प्रचंड आनंदाने आणि उत्साहाने उजळला होता. विमानातून उडी मारल्यापासून जमिनीवर उत्तरेपर्यंत फार तर दोन-तीन मिनिटे लागली. 

त्या दोन मिनिटांच्या थरारीकरता एक सबंध दिवस, शंभरएक मैल स्वतः गाडी चालवणे, शंभरएक हॉलरची फी आणि सुटीचा दिवस असून दिवसभर एवढे काबाडकष्ट. हे सारे करण्याची गरज आहे काय, हा गद्य प्रश्न मी तिला विचारला नाही. कारण त्या दोन मिनिटांची किंमत काय आहे हे तिच्या चेहऱ्याने मला सांगितले होते. पण मी तिला विचारले 'समज, एखादे वेळी पराशूट उघडलेच नाही तर?' 

'तर काय ?' तिने तिचे फ्रेन्च खांदे उडवले.

'प्सॉप' - आणि तोंडाने आवाज केला, आपले डोळे आणि हात आभाळाच्या दिशेने भिरकावून दिले आणि खळखळून हसली. 

ती स्वतःच्या कामाशी इतकी बांधलेली आणि तरीही इतकी स्वतंत्र, निरागस, जीवनावर अपार प्रेम करत मरण खिशात ठेवून हिंडणारी, एक नर्स. ईव्हा. आर्थिक सुबत्तेतून एवढे सगळे मिळवता येते काय? 

आम्हा निवासी डॉक्टरांचे वसतिगृहही,पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या मानाने चैनीचेच होते. प्रत्येकाला स्वतंत्र खोली. खोलीत स्वतंत्र टेलिफोन, उत्तम फर्निचर, आठवड्यातून दोन परीटघडीच्या स्वच्छ चादरी, अभ्रे, हॉस्पिटलमध्ये काम करताना घालण्याकरता वेगळे कपडे. खाण्यापिण्याची तर चंगळच होती. 

वसतिगृहाला लागूनच कॅफेटेरिया होता. चहा, नाश्ता, जेवण - सारे कैफेटेरियातच. हा कॅफेटेरिया जवळजवळ दिवसभर उघडाच असायचा. सकाळी 5॥ ते 9॥ नाश्ता. 10 ते 11॥ कॉफी ग्रेक, दुपारी 12 ते 3 भोजन, 3॥ ते 5 चहा, संध्याकाळी 6 ते 9 भोजन आणि रात्री 10 ते 12 सपर! अशा त्याच्या वेळा असायच्या. प्रत्येक वेळचे पदार्थ वेगळे - गरम आणि थंड दोन्ही, आपले आपण हवे तेवढे वाढून घ्यायचे आणि टेबलाशी बसून जेवायचे. नर्सेस पगारी असल्याने त्यांना थोडे का होईना पण पैसे द्यावे लागत, पण आम्ही निवासी डॉक्टर! आम्हांला सारे कुकट! म्हणजे, वेळ असेल आणि भूक असेल तर दिवसातून सहा वेळा हवे तेवढे खातापिता यायचे! आणि तरीही काम फार असल्यामुळे कधी वेळेवर जेवण जमले नाही (काही वेळा ऑपरेशन्स 10-12 तास चालायची) तरी अगदी उपाशी राहावे लागायचे नाही. 

वसतिगृहाला एक छोटेसे स्वैपाकघर होते. त्यातल्या फडताळात पाव, बिस्किटे, चॉकलेट, केक असे पदार्थ, एका भल्यामोठ्या फ्रीजमध्ये दूध, चीज, अंडी, निरनिराळ्या मांसांचे हवाबंद डबे, फळे आणि एका ओट्यावर विजेची शेगडी आणि जुजबी स्वैपाकाची भांडी असायची. हे स्वैपाकघर 24 तास उघडे असायचे! फक्त स्वतःचे स्वतः करून घ्यायला लागायचे एवढेच.

दारू प्यायला मी इथेच शिकलो. वसतिगृहात डॉक्टरांची पार्टी होती. काही तरी निमित्ताने महिन्यातून एखादी पार्टी व्हायचीच. पण ही माझी पहिलीच होती. माझ्या शेजारच्या खोलीत राहणारा डॉ. बेली माझा जरा दोस्त झाला होता. त्याला मी विचारले की मी अगदी नवखा आहे आणि मला दारू प्यायला शिकायचे आहे. चार चौघांत माझी फजिती होता कामा नये - तर मी पार्टीत काय प्यावे ? तो स्वतः फारसा दर्दी पिणारा नसावा. तो म्हणाला, 'रस आणि कोकाकोला मिसळून पी म्हणजे तू काय पितोयस कुणाला कळणार नाही!" 

मी म्हणालो, 'मग काय उपयोग ? मी पितो आहे हे सगळ्यांना कळले तर पाहिजेच. नाहीतर मी कोक पिणारा कुणीतरी वायल्या इंडियन आहे असे सारे समजतील. पण पार्टीत पिऊन माझं माकड नाही झालं पाहिजे तर तो म्हणाला, 'स्कॉच पी.' 

मी म्हटलं! लेका, तू इंग्लंडचा, म्हणून तुझी दारू लपवायचा प्रयत्न करतोस काय ? तर तो वसूकन् माझ्या अंगावर आला. हुत्. मी इंग्लंडचा नाही स्कॉटलंडचा आहे!' त्याची राष्ट्रीय अस्मिता मी दुखावली होती.

दारूचा विषय तसाच राहून गेला. पार्टीत जाऊन मी रम आणि कोक एका ग्लासात ओतून घेतला. भीत भीत एक पुटका घेतला. काहीतरीच, अगदी गुळचट-कडवट चव लागती. तेवढ्यात, पार्टीत माझ्याखेरीज़ आणखी एक भारतीय डॉक्टर दिसला. माझ्याच रोखाने येत होता. जवळ येऊन त्याने आपली ओळख करून दिली. 'मी डॉ. रामकृष्णन्, सर्जरी करतोय. मद्रासचा एम् एस्. आहे. तुम्ही काय पिताय ?'

मी म्हटले, 'मला रम आणि कोक फार आवडतो. पण तुम्ही नवखे असाल तर रम आणि कोकच घ्या. काय पिता, कुणाला कळणार नाही!'

हळूहळू मी पिऊ लागलो. खूप मजा यायची. खूप मोकळे मोकळे वाटायचे. तसा मी जरा बुजरा आणि मुखदुर्बळा पण प्यायला लागलो की खूप बोलायचो, हसायचो. पार्टीत नाचायलाही शिकलो हॉलिवूडचे एकेक हीरो आठवायचे ते जसे पार्टीत वागायचे तसाच मी वागायचो डोलायचो - सिगरेट ओढायचो. पण भान कधी सुटायचे नाही. आपण रंगमंचावर एक भूमिका वठवतो आहोत आणि पार्टी जमलेले सारे स्त्री पुरुष आपले प्रेक्षक आहेत - त्यांच्यासमोर आपला अभिनय चांगलाच वठला पाहिजे असे काहीसे वाटत राहायचे. 

एकदा मी 'कॉल'वर होतो. म्हणजे त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्रभर मला वसतिगृह सोडून कुठे जाता येणार नव्हते. नाक-कान-घशाच्या विभागात आम्ही तिघे निवासी डॉक्टर होतो आणि तिघांचीही आलटून पालटून एकएक दिवस ड्यूटी असे. त्याला कॉलवर असणे म्हणत. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर नाक कान या विभागाचा कुणीही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला तर त्याची संपूर्ण जबाबदारी या कॉलवर असलेल्या डॉक्टरची असायची. 

सामान्यपणे आमच्या विभागात अत्यंत तातडीच्या उपचारांची गरज असेल असे रुग्ण फार क्वचित् येत. कुणाच्या कानात पेन्सिलचा तुकडा गेलाय किंवा नाकात शेंगदाणा अडकून बसलाय - फार तर कुणाचा घाणा फुटून नाकातून रक्त येते आहे असलेच रुग्ण असायचे. त्यामुळे काम फार नसायचे पण हॉस्पिटल किंवा आपली खोली सोडून बाहेर जाता यायचे नाही. बहुतेक वेळ टिवल्याबावल्या करण्यात, टी वी. बघण्यात नाहीतर वाचण्यात घालवायचा.

तर त्या दिवशी मी 'कॉल'वर होतो. माझा जो सहकारी डॉक्टर होता - डॉ. मदन अरोरा. तो मोकळाच होता पण त्याने तीन वर्षे मॉट्रियलमध्ये काढलेली असल्याने त्याला आमच्यासारखा भटकण्याचा षौक नव्हता. तो त्याच्या खोलीतच होता.  मी वेळ घालवण्याकरता गप्पा मारायला त्याच्या खोलीवर गेलो. टेलिफोन ऑपरेटरला मी त्याच्या खोलीचा नंबर दिला आणि गप्पा मारायला बसलो. तो एकटाच वाचत पडला होता. पडल्या पडल्या ग्लासातून दारू पीत होता. 

मी आल्यावर तो उत्साहाने उठून बसला. एकटा बसून वैतागला होता. पाच-दहा मिनिटांत गप्पा आमच्या आवडत्या विषयावर आल्या. देव आहे की नाही? तो पक्का श्रद्धाळू आणि मी पक्का नास्तिक. मग गप्पा रंगायला काय उशीर? गप्पांच्या नादात केव्हा मला दारूचा आग्रह झाला - केव्हा मी घ्यायला लागलो कळलेही नाही. वाईन होती. त्यात काही मिसळण्याची भानगड नव्हती - म्हणजे तत्त्वाशी तडजोड नव्हती! चवही छान होती. पीत गेलो. वितण्डाही चढत गेली. मी कॉलवर आहे याचे भानच राहिले नाही. तासाभरानंतर फोनची घंटा घणघणली. 

अरोराचा काही तरी खासगी फोन असेल म्हणून मी उठून जायला निघालो. तेवढ्यात अरोराने फोन घेतला आणि मला म्हणाला, "तुझ्याकरता आहे." तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की मी 'कॉल'वर आहे! मी चाचरत, अडखळत फोन घेतला. इमर्जन्सी !... श्वास पार अडलेला आहे... वय वर्षे तीन... ओठ काळे-निळे पडले आहेत. ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे... थेट ऑपरेशन थिएटरकडे पाठवले आहे.... हो सरळ तिकडेच जा!' बापरे! आता मेलो.
 
टेकिऑस्टमी! गळ्यामध्ये श्वासनलिकेला भोक पाडून त्यात एक नळी घालून श्वास मोकळा करून द्यायचा. अरोराच्या खोलीतून बाहेर पडून कॉरिडॉरमध्ये आलो आणि कॉरिडॉरसकट सगळ्या खोल्या गर्रकन् उलट्या-सुलट्या फिरल्या. मी भिंतीला टेकून उभा राहिलो. हातपाय लटपटत होते. कपाळावर टरारुन घाम फुटला होता. कसाबसा रुमाल काढून पुसला. 'आता डावीकडून सरळ जायचं, कॅफेटेरिया ओलांडायचा. पुन्हा डावीकडे वळलं की लिफ्ट... नाही डावीकडे नाही- उजवीकडे.' मी मनातल्या मनात स्वत:वर चाबकाचे कोरडे ओढत, स्वतःशी बोलत, मिळेल त्या वस्तूचा आधार घेत चालत होतो. पाय लटपटतच होते. 

'लिफ्ट ही नाही. ती शेवटची. इमर्जन्सी लिफ्ट.'

बटण दाबल्यावरोबर घणाघणा घंटा वाजवत लिफ्ट येऊन थांबली. दार उघडल्यावर मी आत उडीच मारली. 'दहावा मजला' मी दहा नंबरचे बटन दाबले. लिफ्टमधल्या आरशात पाहिले, चेहरा घामाने डबडबला होता. घाम पुसला. छातीचे ठोके भलतेच वाढले होते. त्यांचा ढाणढाण आवाज कानात आदळत होता. डोके दगडासारखे जड झाले होते. लिफ्ट दहाव्या मजल्यावर थांबली. मी धावतच ऑपरेशन थिएटरच्या शेजारच्या, कपडे बदलायच्या खोलीत गेलो. 

अंगावरचे कपडे ओरबाडून काढले आणि ऑपरेशनचे हिरवे कपडे चढवले. मास्क तोंडावर बांधला आणि बेसिनचा नळ सोडून हात धुवायला उभा राहिलो. दोन्ही हातांना कोपरापर्यंत साबण लावून किमान दोन मिनिटे खरखरीत ब्रशने हात घासून धुवायचे होते. 

डोक्यात गरगरणे चालूच होते. छातीतली धडधड वाढतच होती. 'भलता गाढवपणा झाला! कॉलवर असताना दारू प्यायला सांगितली होती कुणी? आता बसा जन्मभर बोंबलत. ऑपरेशन नीट झाले नाही, आणि ते पोर दगावले म्हणजे? म्हणजे हॉस्पिटलमधून हाकलून लावतील गांडीवर लाथा मारून. हे कॅनडा आहे - पुणे नाहीय् - एखादे पोर जगले काय न मेले काय! ऑपरेशन करताना पेशंटचा चुकून एखादा दुधाचा दात पडला तरी केवढी बोंबाबोंब होते! आणि तू दारू प्यायलायस हे कळणार सगळ्यांना. तो अरोरा साला बोंबलत सुटणार सगळीकडे. भडव्याने मुद्दामच पाजली असेल मला' – मी स्वतःशीच बडबडत होतो.

दोन मिनिटे हात खराखरा घासून ओले हात वर धरून मी थिएटरमध्ये गेलो. नर्सने दिलेला गाऊन चढवला - रबराचे मोजे घातले आणि टेबलवर ठेवलेल्या पेशंटकडे गेलो. तीनवर्षांची गुटगुटीत पोरगी. गुटगुटीत. म्हणजे श्वासनलिका सापडायला आस होणार! श्वास चांगलाच लागला होता. दमेकऱ्यासारखा छातीचा आवाज येत होता. दर श्वासागणिक, ओठ, गाल,कान निळे पडायला लागले होते. डोळ्यांत सगळे त्राण संपल्याचा विलक्षण हताश भाव होता. नर्सने दिलेना चाकू मी हातात घेतला आणि आतता सगळा गोंगाट, कोलाहल स्विच ऑफ केल्यासारखे एकदम बंद झाले. 

छातीतली धडधड थांबली.(हृद्यही थांबले की काय कुणास ठाऊक!) हातांची थरथर थांबली, पायांचे लटपटणे थांबले व डोक्यातले पण गरगरणे थांबले. आणि अत्यंत कठोर, टोकदार आणि नितळ अशा एकाग्रतेने मी ऑपरेशन करू लागलो. मिनिटा भरात श्वासनलिकेचा शोध लागला -तिला भोक पडले- त्यात रुपेरी ट्रेकिऑस्टमी नलिका अडकवून दिली आणि तिच्या फितीची गाठ मानेच्या मागच्या बाजूला बांधून टाकली. पेशंटने एक दीर्घ मोकळा श्वास घेतला आणि क्षणार्धात ती झोपीच गेली. दोन दिवस झोपलीच नसेल. ओठ, गाल, कान पूर्ववत् गुलाबी झाले, जिवावर बेतले होते, पण वाचलो. 

मी हातमोजे काढले. नाकावरचा मास्क खाली केला आणि अंगातला गाऊन काढून, बोळा करून समोरच्या नर्सच्या हातात दिला. तिनही चेहऱ्यावरचा मास्क काढला होता. ईव्हा! 'हे काय? आज ऑपरेशन करताना एवढा गप्प, गप्प काय होतास? आणि घाम केवढा थोरला आलाय! तापबीप आहे की काय?' तिने विचारले. माझे लेंगा-शर्ट भिजून चिंब झाले होते! 'नाही. घाबरलो होतो, पॅराशूट उघडणारच नाही असे वाटले होते!' आम्ही दोघंही मग अखंड हसलो. 

माझं डोकं एकदम स्वच्छ झालं होतं. आत्ता पाच मिनिटापूर्वी मी जवळजवळ झिंगलेल्या अवस्थेत होतो. कुठे गेली ती सगळी दारू? एकदम खाडकन् उतरली कशी? मघाशी ऑपरेशन करताना ती उतरली नसती- आणि पेशंट टेबलवरच दगावली असती तर? कपडे बदलायच्या खोलीत मी ढसढसा रडलो! एवढा प्रचंड थकवा कधी जाणवला नव्हता आयुष्यात !

Tags: अनुभव आत्मचरित्र जडणघडण श्रीराम लागू experinces autobiography jadanghadan hriram lagoo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके