डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भालबा केळकर नावाचे विद्यापीठ

अगदी अद्ययावत पाश्चात्य पोषाखातला डॉ. कांचन आणि डोक्यावर वुरखुंडीसारखे काढलेले, बूट- पॉलिश लावलेले केस! काय सोंग दिसलं असेल कुणास ठाऊक! नाटक सुरू होईपर्यंत मला फार धास्ती वाटत होती. पोरं माझी रेवडी उडवतील म्हणून. पण नाटक सुरू झालं आणि मी हे प्रकरण पार विसरूनच गेलो. नाटकाला प्रमुख पाहण्या आणि परीक्षक म्हणून स्नेहप्रभा प्रधान आल्या होत्या. त्यांनी मला पहिले बक्षीस देऊन टाकलं. त्या वर्षी आमच्या कॉलेजने 'वाळवेकर ट्रॉफी’ च्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातही मला पहिलं बक्षीस! म्हणजे पुण्यातल्या सगळ्या हौशी नटांत मी पहिला, डोक्याला बूट-पॉलिश लावलेला डॉ.. कांचन!

वाल-जॉर्ज वॉशिंग्टनच्या हाती कुल्हाड लागली! मेडिकल कॉलेजच्या पाच वर्षांत मी चार मोठी नाटकं आणि अगणित एकांकिकांत कामं केली. कशी केली माहीत नाही. पण लोकांना आवडत होती. त्याची पावती मला तिथल्या तिथे स्टेजवरच मिळत होती आणि माझा हुरूप दिवसेंदिवस वाढतच होता. वाटेल ते काम करायची माझी तयारी होती. भावबंधनमध्ये मला अर्थातच घनश्याम करायचा होता. पण डोंगरे हा स्कूलचा ज्येष्ठ नट आणि तो फक्त खलनायकच करू शकतो म्हणून मग 'घन:श्याम' त्याच्याकडे गेला. 

मग मी 'कामण्णा' करतो म्हटलं, पण वाघ हा स्कूल गाजवलेला विनोदी नट. तेव्हा 'कामण्णा' त्याच्याकडे गेला मग मी धुंडिराज करतो म्हटलं, पण नगरकर हा फक्त म्हाताऱ्याचीच काम करू शकतो - त्यामुळे धुंडिराज ही हातातून गेला. शेवटी वाट्याला आला 'प्रभाकर'! आणि तोही संगीत! त्या वर्षी गॅदरिंगच रद्द झालं म्हणून, नाही तर माझे संगीत काम बिचाऱ्या प्रेक्षकांना बचाव (ऐकावं!) लागलं असतं! 

पण सांगायचा मुद्दा असा की मी घनःश्याम, कामण्णा, धुंडिराज किंवा प्रभाकर - काहीही करू शकतो इतपत विश्वास, दोन वर्षांत आमचे दिग्दर्शक मालवा केळकर यांच्या मनात निर्माण झाला होता. पुढच्या वर्षी "लग्नाची बेडी करायला घेतलं, मी नेहमीप्रमाणे 'गोकर्ण', 'अवधूत ', तिमिर असा घसरत 'डॉ. कांचन वर स्थिरावलो. गॅदरिंगला पंधरा दिवस उरले असताना एक भलताच प्रकार झाला. सुमारे वर्षापूर्वी हुतूतू खेळताना माझ्या पायाला घोट्यापाशी एक जखम झाली होती. भरून तर येत नव्हतीच, पण वर्षाभरात इसबासारखी पाऊलभर पसरली होती. खूप उपचार करून झाले पण बरीच होत नव्हती. 

दुखाबिखायची नाही पण खाज खूप सुटायची आणि खाजवलं की पाणी यायच. सारखं पायाला बँडेज बांधून ठेवायला लागायचं. मी अगदी टेकीला आलो होतो. इसब बर होण्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होतो! माझा एक जुना शाळकरी मित्र होता, तो एक दिवस एका वैदूला घेऊन माझ्याकडे आला. तो वैदू म्हणे, असले जुनाट चामडी रोग, एक औषध छावून ताबडतोब बरे करतो. मोठ्या मिनतवारीने माझ्या मित्राने त्या भटक्या वैदूला शोधून काढून पुण्याला माझ्याकडे आणलं होतं. 

मी अर्थातच ताबडतोब उपचार करून घ्यायला तयार झालो, औषध लावल्यावर थोडी आग होणार होती, पण वर्ष-दीड वर्ष छळणारं इसब चटकन नाहीसं होणार असेल तर थोडी आग सहन करायला काहीच हरकत नव्हती! आमच्या घरच्या दवाखान्यातच वैद्यबुवांनी माझ्यावर उपचार केला. एका अत्यंत तीक्ष्ण ब्लेडनं त्यांनी माझ्या पाऊलभर जखमेवर जवळजवळ शंभरेक छोटे छोटे छेद घेतले. ब्लेड इतकं तीक्ष्ण आणि वैद्यांचा हात इतका हलका की कापताना काही कळायचंही नाही. एक थेंबभर रक्त टचकन् वर यावं, त्यावरून कळायचं की कातडीचा छेद घेतलाय. 

सुमारे दोन एक मिनिटांत शंभरेक लालभडक थेंबांनी माझी जखम मीठी सुशोभित दिसू लागली! मी खुष होतो. इतक्या ठिकाणी कापूनसुद्धा काहीच त्रास झाला नव्हता! मग वैदुबूवांनी ब्लेड कोटाच्या खिशात टाकले आणि दुसऱ्या खिशातून एक कागदाचा पुडा बाहेर काढला. पुडा सोडून त्यातली एक मूठभर पावडर माझ्या ताज्या जखमांवर खसखसून चोळती..जखमेवर मीठ चोळणे या म्हणीचा अर्थ इतका भीषण असेल असे मला वाटले नव्हते. पुढचा तास-दीड तास माझ्या पायाची इतकी विलक्षण आग झाली की त्या वेळी माझा पाय, भूल न देता कुणी तोडला असता तरी मी हूं का चूं न करता तो तोडू दिला असता! 

सबंध पावलावर धगधगते निखारे ठेवले होते! सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. कोरडी जीभ टाळ्याला चिकटली होती. असह्य वेदनांत दिलासा एकच होता की आता एकदोन दिवसांत इसब कायमचे बरे होणार होते - इतक्या वेदना सोसल्यावर कायमचे बरे होणे हे त्याचे कर्तव्य होते! विलक्षण धैर्याने किंवा कोडगेपणाने ती आग सोसत राहिलो...संध्याकाळपर्यंत आग शांत झाली दिवसभर उपास घडला होता. त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. चिकार जेवून झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी उठलो तो अंगभर टप्पोरे फोड आलेले होते! चेहऱ्यावर, दोन्ही हातापायांच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये, डोक्यात, भाजल्यावर येतात तसे टरारलेले पाणीदार फोड, काहीतरी भलतेच झाले होते. वडील डॉक्टर होते - पण त्यांनाही काही कळेना. मग ताबडतोब आमच्या कॉलजमधले त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बी. बी. गोखल्यांना बोलावून आणलं. त्यांनी सांगितलं की, जखमेवर चोळलेल्या पावडरीत आर्सेनिक असणार, ते रक्तात भिनले आहे आणि त्या विषारी द्रव्याची ही अंगभर उठलेली तीव्र प्रतिक्रिया आहे! जिवाला काही धोका नाही.

हळूहळू ते आर्सेनिक शरीराबाहेर फेकलं जाईल. तोपर्यंत या फोडांची काळजी घ्यायची. आठवड्याभरात सगळं पूर्वपदावर येईल. तोपर्यंत हे औषध फोड आलेल्या सगळ्या भागांवर सकाळ-संध्याकाळ लावायचे आणि मुख्य म्हणजे डोक्याचे सगळे केस काढून गोटा करून टाकायचा!" आणि औषध काय? तर Gentian Violet म्हणजे गडद जांभळी शाईच! ती शाई डोक्यात, चेहऱ्याला, हातापायांना, सगळीकडे फासून आठवडा काढायचा? आणि डोक्याचा गोटा करायचा? गॅदरिंग नाटक जेमतेम दहा-बारा दिवसांवर आलेलं - तेवढ्यात केस कसे वाढणार? मग, गोटा केलेला डॉ. कांचन? कल्पनाही करवेना.

मी गोखलेसरांची आणि वडिलांची खूप विनवणी केली. पण दोघांनीही कर्तव्यकठोरपणे आपला निर्णय अमलात आणला. न्हाव्याकडून डोकं भादरून घेताना 'पण लक्षात कोण घेतो'मधल्या 'यमू'च्या वेदनेशी मी तत्काळ एकरूप झालो. पुढचा आठवडा कॉटवर मच्छरदाणीत बसून काढला. कॉलेजच्या मित्रमैत्रिणी भेटायला यायच्या, त्यांना भुतासारखं तोंड दाखवायची लाज वाटायची म्हणून मच्छरदाणी! डॉ. कांचनचं भाषण पाठ म्हणण्यात वेळ काढायचा. भालबा आले तर त्यांना भाषण पाठ म्हणून दाखवायचं. हेतू हा की त्यांनी आपल्याला नाटकातून काढून टाकू नये! आठवडाभरात फोड सगळे विरले, चेहरा स्वच्छ झाला - मी कॉलेजला जाऊ लागलो. 

अर्थात् टोपी घालून! आठवडाभरात केस काय वाढणार? नाटकाच्या दिवसापर्यंतसुद्धा फार वाढले नाहीतच. शेवटी चक्क काळा बूट पॉलिश डोक्याला लावून नाटकात काम केलं! अगदी अद्ययावत पाश्चात्य पोषाखातला डॉ. कांचन आणि डोक्यावर वुरखुंडीसारखे काढलेले, बूट- पॉलिश लावलेले केस! काय सोंग दिसले असेल कुणास ठाऊक! नाटक सुरू होईपर्यंत मला फार धास्ती वाटत होती. पोरं माझी रेवडी उडवतील म्हणून. 

पण नाटक सुरू झालं आणि मी हे प्रकरण पार विसरूनच गेलो नाटकाला प्रमुख पाहण्या आणि परीक्षक म्हणून स्नेहप्रभा प्रधान आल्या होत्या. त्यांनी मला पहिले बक्षीस देऊन टाकलं. त्या वर्षी आमच्या कॉलेजने 'वाळवेकर ट्रॉफी’ च्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातही मला पहिलं बक्षीस ! म्हणजे पुण्यातल्या सगळ्या हौशी नटांत मी पहिला, डोक्याला बूट-पॉलिश लावलेला डॉ.. कांचन! 

पहिल्या वर्षी भूमिगत दिग्दर्शक असलेले भालबा दुसऱ्या वर्षीपासून अधिकृत दिग्दर्शक झालेले होते. त्यामुळे पुढच्या चार वर्षात भालबांचा खूपच संबंध आला. नाट्यक्षेत्रात नट आणि विशेषतः दिग्दर्शक म्हणून त्यांचा अनुभव मोठा होता. ते स्वतः स्त्री-पार्ट उत्तम करतात अशी त्यांची ख्याती होती. दिग्दर्शक म्हणून तर त्या काळी पुण्यात भालवांना तोड नव्हती. पुण्यातल्या सर्वच कॉलेजांत नाटकांचे दिग्दर्शन करायला भालबा जात असत. आणि इतक्या आपुलकीने आणि तळमळीने ते सर्वच नाटकांचे दिग्दर्शन करत की कुठलेही कॉलेज त्यांना सोडायला तयार नसे. 

प्रत्येक कॉलेजचे नाटक म्हणजे जणू भालबांच्या घरचे कार्यच असे. हे सारे कसल्याही प्राप्तीची अपेक्षा न ठेवता. त्या काळी दिग्दर्शकाला प्राप्ती कसली होणार? एखादा फ्लॉवरपॉट किंवा गणपतीचे चित्र मिळायचे! पण त्याचीही अपेक्षा भालबा ठेवायचे नाहीत. किंबहुना पदराला खार लावूनच ही सारी नाट्यसेवा चालायची. ध्यास एकच नाटक चांगले झाले पाहिजे- मग ते कुठल्याही कॉलेजचे असो! आपण इतक्या निरहंकारीपणे, कशाचीही अपेक्षा न धरता दुसऱ्याकरता सातत्याने काही करतो आहोत यातही कधी कधी एक सूक्ष्म का होईना, उपकाराची भावना डोकावायला लागते. तिचीही बाधा कधी भालबांना झाली नाही. 

शेवटच्या वर्षी (1950-51) आमच्या पुण्यप्रभाव च्या तालमी घ्यायला भालबा डेक्कन जिमखान्यावरून सायकल मारत पुणे स्टेशनजवळच्या आमच्या कॉलेजात सकाळी सात वाजता हजर व्हायचे. डिसेंबरची पुण्याची थंडी असल्याने गळ्याला एक लोकरीचा स्कार्फ गुंडाळलेला असायचा. थंडीने हात पाय गारठलेले असायचे. नाक लालबुंद झालेले. कॅन्टीन अद्याप उघडलेले नसल्याने चहाही मिळायचा नाही. पण ह्या सगळ्याकडे भालवांचे दुर्लक्षच असायचे. आल्या आल्या तालीम सुरू व्हायची सकाळी सात ते नऊ-दहापर्यंत तालीम घेऊन ते परस्पर वाडिया कॉलेजात केमिस्ट्री शिकवायला जायचे. 

संध्याकाळी कॉलेजची नोकरी संपली की पुन्हा आमच्या कॉलेजात येऊन 'पुण्यप्रभाव'च्या तालमी सुरू! रात्री 9 च्या सुमारास सायकल मारत डेकन जिमखान्याच्या घरी! अशा जवळजवळ दोन महिने भालबांनी आमच्या तालमी घेतल्या. थोड्या फार फरकाने हाच प्रकार मी चार-पाच वर्ष अनुभवला. पण कधी तक्रार नाही की आपण काही विशेष करतो आहोत असा आविर्भाव नाही. भालबांच्या आणि माझ्या वयात चार-पाच वर्षांचेच अंतर असल्याने आणि मोठेपणाचा नस्ता बडेजाव भालबांच्या स्वभावात नसल्याने माझी त्यांच्याशी छान दोस्ती झाली. 

नाटक आणि साहित्य हा समान दुवा. नाटकाचे वेड तर दोघांनाही होतेच. सिनेमाही खूप पाहात होतो आणि अवांतर ललित वाचनही दोघांचे बऱ्यापैकी होते. मराठीतले त्या काळचे सगळे महत्त्वाचे ललित लेखक आमच्या वाचनात असायचे. मग खूप गप्पा व्हायच्या. मुख्य म्हणजे काही अमराठी मित्रांमुळे मला इंग्रजी वाचनाची गोडी या काळात चांगलीच लागली. फडके, खांडेकर, अत्रे, गाडगीळ, भावे, माडखोलकर, गोखले, माडगूळकर इत्यादींच्या जोडीला आता शॉ, इब्सेन, आल्डस हक्सले, सॉमरसेट मॉम, कॉनन डॉयल, क्रोनीन, रॉटिंगन आदी मंडळी येऊन बसली. मग गप्पांना काय तोटा? तासन्तास इराण्याच्या हॉटेलात चहा पीत गप्पा चालायच्या. 

भालबा खूप वेळ आम्हांला द्यायचे. अगदी बरोबरीच्या नात्याने गप्पा मारायचे. औपचारिक नाट्यशिक्षण असे काही त्या काळात नव्हतेच. राष्ट्रीय नाट्यविद्यालय तर सोडाच पण सरकारी वा विनसरकारी शिबिरंसुद्धा नव्हती. किंबहुना नाट्यशिक्षण नावाची काही वस्तू देणाऱ्या शिक्षणसंस्था अस्तित्वात असतात याचीही जाणीव नव्हती. पण नकळत नाट्यशिक्षण चालू होतेच! एखादे नाटक वाचले किंवा एखादा मस्त सिनेमा पाहिला म्हणजे त्यानंतर त्याची तासन्तास चिरफाड चालायची. रात्र संपायची पण गप्पा संपायच्या नाहीत अशी स्थिती! 

सगळ्याच बाबतीत भालबांशी एकमत व्हायचे असे नाही- पण गप्पा रंगायच्या. खूप नवीन विचार सुचायचे. मग नाटकात काम करताना तर ते प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करायचाच पण नेहमीच्या वागण्यातही ते डोकवायचं. पॉल म्यूनीचा एमि झोला पाहून आलो की मी पुढे काही दिवस झोला असायचो किंवा चार्लस् बॉयेथा मेरी वैलावस्का पाहून आलो की काही दिवस नेपोलियन असायचो! भालबांना अभिनय करून दाखवला की ते सूचना करायचे, चुका दुरुस्त करायचे. दिग्दर्शनाचा उत्तम वस्तुपाठ असायचा रांगणेकरांच्या कंपनीचं नाटक. रांगणेकरांचं कुठलंही नाटक पाहून आलं की भालबा त्या नाटकावर दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून बौद्धिकच घ्यायचे! 

दिग्दर्शनाच्या समर्थ जागा कुठल्या, कच्च्या जागा कोणत्या, प्रकाशयोजनेचं महत्त्व, सुनियंत्रित हालचालींचं महत्त्व काय, वेशभूषा, रंगभूषा यांचं स्थान काय, पार्श्वसंगीताचं महत्त्व काय, झाडून साऱ्या गोष्टींचा कीस पडायचा. पण सगळ्या सर्वेचा रोख असायचा शिस्तबद्ध आणि रेखीव प्रयोगावर! आणि रेखीव प्रयोगाचं रांगणेकरांच्या नाटकाइतकं उत्तम उदाहरण दुसरं नसायचं! थोडक्यात भालबा म्हणजे एक फिरते नाट्यविद्यालय होते. या विद्यालयात फार काही सखोल हाती लागलं असं नाही - जे काही हाती लागलं त्यापेक्षा अधिक सखोल काही असतं याचीही कल्पना नव्हती! पण नाटकाला प्रॉम्प्टिंग असता कामा नये', 'नाटकाचा प्रयोग खूप मेहनतीनं शिस्तशीर, रेखीव, बांधेसूद बसवला पाहिजे', 'नाटकाच्या प्रत्येक अंगाचा बारकाईने विचार केला पाहिजे अशा काही मूलभूत गोष्टी मनात चांगल्याच ठसल्या.

तर या विद्यालयात शिकत मी भावबंधन (प्रभाकर), लग्नाची वेडी, पुण्यप्रभाव (वृंदावन) ही मोठी नाटकं आणि 'तुझं माझं जमेना', "उपटसुंभ', 'कुछवर', 'मागणी',विचारा डायरेक्टर, 'राजसंन्यास' (संभाजी - शिवाजी प्रवेश) इत्यादी छोटी नाटकं चार वर्षात केली. म्हणजे भडक अगदीच की राहिलं नाही!आता मागं वळून पाहताना मला वाटते की मेडिकल कॉलेजच्या पाच वर्षांनी मला खूपच काही दिले. 

शरीरशास्त्राचं चांगल्यापैकी ज्ञान मला मिळालं, खूप वेळ आणि व्यायाम यांमुळे बऱ्यापैकी शरीरसंपदा जमा झाली, इंग्रजी वाचनाची आणि चर्चा करण्याची गोडी लागल्यानं बौद्धिक मशागतही बऱ्यापैकी झाली, जीवनाच्या विविध अंगांविषयी कमालीची आस्था निर्माण झाली. 

नाटकाच्या अनुभवामुळे खूप आत्मविश्वास निर्माण उदारमतवादाचं, बुद्धिप्रामाण्यार्थ बिजही याच काळात रुजलं, कादंबऱ्यात, सिनेमा-नाटकांत वाचलेलं पाहिलेलं, आयुष्य उजळून आणि उधळून टाकणारं पहिलं प्रेमही मी याच काळात केलं! म्हणजे मला ते मिळालं. ते वजनात फार भारी होतं, असं नाही मला म्हणायचं. पण आता आयुष्याच्या अखेरी अखेरीस जे काही सगळं जमा झालेलं आहे, त्यातलं टक्केवारीनं बरंचसं मला त्या पाच वर्षांतच मिळालं. बियाण्याच्या रूपात असेल, पण पंचेचाळीस वर्षांपूर्वीच मिळालं, म्हणजे गेली पंचेचाळीस वर्ष, त्या बियाण्याची निगराणी करून, त्याला खतपाणी घालून, रोपटी वाढवण्यांतच गेली म्हणायची. 

झाडं बऱ्यापैकी डवरली, फुला-फळांनी लगडलीही - नाही असे नाही. पण पंचरंगी पोपटांचे आणि रानपाखरांचे थवे काही झाडांवर उतरले नाहीत, वरूनच निघून गेले. आता असंही वाटतं की याच काळात, दीडशे वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला (राजकीय) स्वातंत्र्य मिळालं. देश छिन्नविच्छिन्न झाला; शुभंकर, परमदयाळू, विघ्नहर्त्या परमेश्वराच्या आणि अल्लाच्या नावानं स्थापन झालेल्या धर्मांच्या आंधळ्या अनुयायांनी आपल्या लाखो बांधवांचं, आयाबहिणींचं रक्त गटारात ओतून दिलं, क्रूर, आंधळ्या रखरखीत वाळवंटात फुलबागांचे ताटवेच ताटवे फुलवण्याचा ज्यानं जिवापाड प्रयत्न केला, पृथ्वी नावाच्या एका क्षुद्र ग्रहावर जन्माला आलेल्या मानव नावाच्या एका क्षुद्र प्राण्याला ज्यानं नक्षत्रांच्या उंचीवर नेण्याचं स्वप्न पाहिलं त्या गांधी नावाच्या माणसाचा आम्ही खून केला. 

पाठोपाठ महाराष्ट्रभर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ, आभाळाचा कर्मठ सांधा फुटेल किंवा वसुंधरेच्या अर्ध्या अंगाला तडा जाईल असं वाटायला लावणाऱ्या या घटना याच काळात घडल्या आणि मी मात्र माझ्याच मस्तीत दंग!

(क्रमशः)

Tags: स्वातंत्र्य डॉ. कांचन श्रीराम लागू भालबा केळकर नावाचे विद्यापीठ जडण-घडण Jadan Ghadan Bhalba Kelkar Navach Vidyapitha Shriram Lagu Dr. Kanchan Indipendence Swatantrya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके