डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तीस वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर आलेले ‘गिधाडे’ हे नाटक नाट्यसृष्टीत एक मोठे वादळ उठून गेले. या नाटकाने प्रथमच सेन्सॉरशिपला जबरदस्त आव्हान दिले. सुसंस्कृत समाजात सेन्सॉरशिप शासनाने लादण्याची गरज नाही; तर ती कलाकृती निर्माण करणाऱ्याचीच जबाबदारी आहे हा मुद्दा येथे प्रामुख्याने पुढे आला. कोणत्याही कलाकृतीचे कार्य लोकरंजन किंवा लोकशिक्षण नसते; तर समग्र मानवी आयुष्य आणि विश्व यांच्यातील परस्पर संबंधांची जाण अगर आत्मभान जास्तीत जास्त विकसित करणे हेच कलाकृतीचे कार्य आहे, हेही या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत अधोरेखित झाले. या नाटकाच्या निर्मितीची झपाटलेली कहाणी आणि त्यानिमित्ताने सेन्सॉरशी दिलेली झुंज याबद्दल लिहिताहेत स्वतः डॉ. श्रीराम लागू.


मी 1962 च्या जूनमध्ये इंग्लंडहून परत आलो. त्यावेळी मी पुण्यात राहत होतो. वैद्यकीय व्यवसाय करीत होतो. माझ्या काकांचा गाजलेला खून-खटला, माझ्या पहिल्या पत्नीचे इंग्लंडमध्ये झालेले अचानक अपघाती निधन आणि पानशेतच्या प्रलयाने केलेली पुण्याची वाताहत... एकपाठोपाठ एक झालेल्या या आघातांनी मनाच्या जवळपास चिंधड्या झाल्या होत्या. फुंकर घालायला फक्त नाटकांचा सहवास होता. पी.डी.ए. आणि रंगायनमधील स्नेहीमंडळी होती. पण एकंदरीत मन थाऱ्यावर नव्हते. 

अशा अवस्थेत तेंडुलकरांनी एक दिवस ‘गिधाडे’ चे हस्तलिखित माझ्या हातांत दिले, ‘एकदा वाचून पाहा’ म्हणाले. मी लगेचच वाचले. भयंकर अस्वस्थ झालो. एका खडकाळ, ओसाड, रखरखीत प्रदेशातल्या गिधाडांच्या ढोलीत माणसांची रूपे घेऊन वावरणारी निर्घृण गिधाडे स्वप्नांत येऊन मनाचा थरकाप उडवू लागली. रक्ताने बरबटलेले त्यांचे पंजे आणि सुळे यांच्या तावडीत सापडलेल्या एका असहाय चिमणीचा भयानक तहफडाट मन विदीर्ण करू लागला. माझ्या वैयक्तिक समस्यांनी झालेली माझ्या मनाची विकल अवस्था मी पार विसरून गेलो, इतका मी ‘गिधाडे’ वाचून हेलकावून गेलो होतो. नाटक हिंस्र होते- आणि फार जिवंत होते. अत्यंत निर्घृण हिंस्त्रपणाने त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले. आणि मग त्यातलेच एक टमरेलभर तोंडाला लावून आधाशीपणाने गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली. 

नाटकाने पुरे झपाटले 
मी येणाऱ्या जाणाऱ्याला या नाटकाबद्दल सांगत सुटलो. पी.डी.ए., रंगायन आणि इतरत्र त्याची वाचने केली. नाटक ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकाच्या असायच्या. एक वर्ग असा असायचा की तो नाटकातल्या बीभत्सपणाची, हिंस्रपणाची किळस आणि तज्जन्य संताप घेऊन अर्ध्या वाचनातून उठून जायचा; आणि दुसरा, नाटकात माणसांच्या हिंसक वृत्तीने भोगवादाचे, मूल्य-शून्यतेचे, अमानुष अशा प्रामाणिकपणाने घडवलेले दर्शन पाहून विलक्षण प्रभावित, अस्वस्थ व्हायचा. 

काही असले तरी हे नाटक रंगमंचावर आणणे त्या काळात अशक्य दिसत होते. पी.डी.ए.चे अध्यक्ष भालबा केळकर. बहुसंख्य सभासदांच्या (विशेषतः स्त्री सभासदांच्या) मताचा आदर करण्याकरता हे नाटक पी.डी.ए.तर्फे करू देणार नाही, असे भालबांनी निक्षून सांगितले. रंगायनचे अध्यक्ष श्री.पू.भागवत यांनी सांगितले, ‘नाटक श्रेष्ठ आहे, करायलाच पाहिजे हे खरे, पण सध्याच्या सेन्सॉर बोर्डाची अवस्था पाहता, आता हे नाटक सेन्सॉरकडे पाठवणेच चुक ठरेल. कारण ते नक्की नापास होईल. आणि एकदा नापासाचा शिक्का बसला म्हणजे पुढे कधीच हे नाटक करता येणार नाही. ’ 

मला उपलब्ध असलेल्या दोन्ही वाटा बंद झाल्या. मी भयंकर चडफडलो. हे नाटक झालेच पाहिजे....ते आपणच केले पाहिजे... हे नाटक रंगमंचावर आणल्याशिवाय आपले पितर स्वर्गाला जायचे नाहीत! एक बाजूला या नाटकाबाबत मी इतका वेडा आणि हटवादी झालो होतो, आणि दुसऱ्या बाजूला निरनिराळी माणसे निरनिराळ्या  मार्गांनी माझी खात्री पटवीत होती की सद्य परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे शक्य नाही, माझा फार कोंडमारा झाला. नाटक माझ्या अंगी मावेनासे झाले-फोडून बाहेर येईल की काय असे वाटू लागले. सगळ्याच वाटा बंद झालेल्या पाहून एक दिवस मी समोर टेपरेकॉर्डर घेऊन बसलो- आणि सबंध नाटक एका बैठकीत वाचून रेकॉर्ड करून टाकले. 

मग मला खूप हलके वाटले. एखाद्या मोठ्या आजारातून उठल्यासारखे. मी ती टेप तेंडुलकरांच्या हवाली केली आणि मनावरचे मोठे ओझे उतरल्यासारखे माझ्या इतर उद्योगांत गुंतलो. ‘गिधाडे’ मनातून काढून टाकले. पण हे तसे मनातून गेले नाही. त्याने मला सतावणे बंद केले एवढेच. मनाच्या एका कोपऱ्यात वेटोळे घालून ते आपले पडून राहिले. यानंतर पाच-सहा वर्षांचा काळ गेला. 1969 च्या जानेवारीत मी आफ्रिकेहून भारतात परतलो आणि माझा वैद्यकीय व्यवसाय बंद करून संपूर्ण वेळ नट झालो. पुण्याहून मुंबईला स्थलांतर केले. व्यावसायिक नाटकांत कामे करू लागलो; आणि सुदैवाने लवकरच दुबेंच्या तावडीत सापडलो. त्यांच्या ‘थिएटर युनिट' करता मोहन राकेशचे, तेंडुलकरांनी भाषांतर केलेले मराठी नाटक ‘आधेअधुरे’ करू लागलो. थिएटर युनिट प्रयोगिक संस्था होती. समानशील माणसे खूप भेटल्यामुळे गप्पा, चर्चा खूप व्हायच्या. अगदी हिरीरीने रंगायच्या. तिथे लक्षात आले की गिधाडे अजून मनातून गेलेले तर नाहीच, पण थिएटर युनिटच्या मोकळ्या, प्रागतिक वातावरणात ते मोठ्या आशेने आणि उत्साहाने पुन्हा फणा काढून उभे राहते आहे. मी ‘गिधाडे’ बद्दल खूप उत्साहाने बोलायचो- पण बाकीच्या मित्रमंडळींना ते नाटक रंगमंचावर सादर करणे अशक्यप्राय वाटायचे आणि त्यामुळे ते मला माझ्या विचारापासून परावृत्त करायचे. एव्हाना सर्वांनीच ते नाटक वाचले होते किंवा माझी टेप ऐकली होती. नाटक विलक्षण आहे. याबद्दल जवळपास सर्वांचेच एकमत होते. पण ते सेन्सॉर कसे होणार? सादर करण्याचे धाडस कुठली संस्था करणार? दिग्दर्शन कोण करणार? त्यात कामे करायला कोण तयार होणार? इत्यादी अनेक प्रश्न त्या मित्रांना भेडसावीत. माझ्याजवळ तरी या प्रश्नांची उत्तरे थोडीच होती? पण उत्साहाच्या भरात मी नाटकाची तरफदारी करत होतो- त्याचा प्रयोग रंगमंचावर सादर झालाच पाहिजे, असे हिरीरीने मांडत होतो. जवळपास प्रत्येक बैठकीत हा ‘गिधाडे’चा विषय निघायचाच. अशाच एका बैठकीत आव्हाने देण्या घेण्यापर्यंत मजल गेली. दिग्दर्शन करण्याचे आव्हान मी स्वीकारले, निर्मितीचे आव्हान दुबेने स्वीकारले. मी आव्हान स्वीकारले याला फारसा अर्थ नव्हता, कारण मी ते फार पूर्वी, कुणी देण्याआधीच स्वीकारून बसलो होतो. दुबेने निर्मितीचे आव्हान स्वीकारणे फार  महत्त्वाचे होते. कारण निर्मितीच्या बाळंतपणाची कटकट आणि निर्मितीनंतरच्या वादळाला तोंड देण्याची तयारी या दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून त्याने हे आव्हान स्वीकारले होते. 


नाटक तीन महिन्यांत म्हणजे मे 1970 पर्यंत सादर करण्याची पैजही घेण्यात आली. आणि मग झपाटल्यासारखे सगळे कामाला लागलो. खूप वर्षांपूर्वी वाचलेले नाटक, प्रत्यक्ष सादर करण्याच्या दृष्टीने जेव्हा पुन्हा (कितव्यांदा कुणास ठाऊक) वाचले, तेव्हा प्रथमच असे जाणवले की नाटकात अनावश्यक भाग खूप लिहिला गेला आहे. तो प्रथम छाटावा लागेल- नाटक प्रमाणबद्ध करावे लागेल. त्याचे नीट संपादन करावे लागेल- कदाचित थोडेफार पुनर्लेखन करावे लागेल. मूळ तीन अंकी, जवळजवळ साडेतीन तास चालेल असे नाटक, शक्य तर दोन अंकी आटोपशीर करायला हवे. हे जाणवले तेव्हा फार बरे वाटले. वाटले, की विचार बरोबर असेल किंवा चूक, पण त्या नाटकाची जी जबरदस्त भावनिक जबाबदारी माझ्यावर होती, तिच्यातून मी मोकळा झालो आहे; थोडा अलिप्त होऊन त्या नाटकाचा विश्लेषणात्मक विचार करू शकलो आहे, हे चांगले लक्षण आहे!

पुनर्लेखन व पात्रयोजना

संहिता घेऊन तेंडुलकरांकडे गेलो आणि नाटक छाटून बेताचे करावे- शक्य तर दोन अंकातच ते बसवावे, हा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडता तेंडुलकर म्हणाले, ‘तुम्ही गिधाडे आता बसवताहात तेव्हा तुमच्या दृष्टीने ते वर्तमान आहे. पण मी ते अनेक वर्षापूर्वी लिहिलेले आहे. आणि त्यातून केव्हाच मुक्त झालो आहे. आता त्यात मी पूर्वीसारखा गुंतू शकणार नाही, तेव्हा काय संपादन करायचे ते तुम्हीच करा. तुम्ही योग्य तेच कराल असा मला विश्वास आहे!’ 

मी संहिता घेऊन बसलो. नाटकात पुनरावृत्ती बरीच असल्याने तीन अंकांचा ऐवज, योग्य ती काटछाट करून दोन अंकात बसवणे कठीण नव्हतेच. मूळ आशयाला धक्का न लावता हे सहज करता आले. पण एक-दोन ठिकाणी सांधा निखळला. तो नीट जोडण्यासाठी दोन प्रवेश नव्याने लिहिणे आवश्यक होते. ते स्वतः लिहिण्याची कल्पनाही माझ्या मनात येणे शक्य नव्हते. (तेंडुलकरांच्या ताजमहालला माझी वीट?) तेव्हा मी पुन्हा तेंडुलकरांकडे दाखल झालो. तेंडुलकरांनी संपादित संक्षिप्त संहिता वाचली. त्यांनाही ही संक्षिप्त आवृत्ती नाटक म्हणून अधिक परिणामकारक वाटली. आणि त्यांनी तत्परतेने मला हवे असलेले दोन प्रवेश नव्याने लिहून दिले. (कदाचित तेही मी लिहीन, अशी त्यांना भीती वाटली असावी!)


संहिता तयार झाली. आज ते नाटक बसवताना अवघड वाटणार नाही. पण तीस वर्षांपूर्वीची (1970) मराठी रंगभूमीची अवस्था लक्षात घेतली पाहिजे. इतका नेमका, इतका प्रांजळ आणि इतका रांगडा घाव प्रेक्षकांवर तत्पूर्वी कुठल्याही नाटकाने घातला नव्हता. प्रत्येक माणसात दडून असलेल्या हिंस्त्र श्वापदाचे प्रत्ययकारी दर्शन हे नाटक निधडेपणाने घडवत होते. ते तितक्याच प्रामाणिकपणे रंगमंचावरूनही घडवणे आवश्यक होते. आणि त्याकरिता रंगभूमीवरील अनेक सभ्यतेचे संकेत झुगारून द्यावे लागणार होते. प्रेक्षकांचा अनुनय तर हे नाटक करणार नव्हतेच, उलट त्यांच्या मर्मस्थानी एक सणसणीत ठोसा लगावणार होते. आव्हान मोठे होते. गफलत झाली तर अंगावर शेकणार होते. पण आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. नाटक सेन्सॉर बोर्डाकडे पाठवले; आणि तालमींची जुळवाजुळव सुरू झाली. पात्रयोजना काळजीपूर्वक करणे फार महत्त्वाचे होते. (तसे ते नेहमीच असते म्हणा!), कारण नाटकात हिंस्र मानवी गिधाडांचे (पपा, रमाकांत, उमाकांत, माणिक) प्रत्ययकारी दर्शन घडविणे जेवढे महत्त्वाचे दिसत होते, तेवढेच-किंबहुना थोडे जास्तच- महत्त्वाचे दिसत होते, त्या गिधाडांच्या तावडीत सापडलेल्या दोन अश्राप जीवांची (रमा व रजनीनाथ) शोकांतिका प्रत्ययकारी उभी करणे हे. हा समतोल साधला गेला नसता तर नाटक नुसतेच शिवीगाळीने भरलेले एक बीभत्स दर्शन झाले असते. गिधाडांच्या भूमिका तुलनेने सोप्या आणि भाव खाऊन जाणाऱ्या असल्याने रजनीनाथ आणि रमा यांची निवड करणे अवघड होते. रमाच्या भूमिकेत मीना सुखठणकर (आता नाईक) हवी तेवढी कृश दिसणार नव्हती; पण तिचा अभिनयाचा आवाका लक्षात घेऊन तिला ते काम दिले. रजनीनाथाचे काम मी स्वतःच करावे असे ठरवत होतो- कारण ते काम अवघड होते आणि योग्य माणूस चटकन मिळत नव्हता. पण मग अशोक साठे मिळाला आणि प्रश्न सुटला. एकनाथ हट्टंगडी या अत्यंत गुणी नटाचे तुफान विनोदी काम मी बादल सरकारांच्या ‘वल्लभपूरची दंतकथा' या नाटकात पाहिले होते. आणि मी त्या नटाच्या प्रेमात पडलो होतो. गिधाडेत पपा चे काम त्याने करावे, असे भी ठरविले. पण तो तयार होईना. ‘एवढं गंभीर काम मला पेलणार नाही' असे त्याचे म्हणणे. मोठ्या आग्रहाने त्याला तयार केले. बाकी मग दीपा, अशोक, कामेरकर आणि मी अशी सगळी टोळी जमली. बापू लिमयांशी नेपथ्याबद्दल चर्चा झाली. एका बाजूला रजनीनाथ राहत असलेले गॅरेज, यामध्ये गिधाडांच्या ढोलीसारखा वाटणारा गिधाडांचा दिवाणखाना आणि दुसऱ्या बाजूला ‘तुळशी- वृंदावन' असे नेपथ्य करायचे होते. नेपथ्य लांबलचक होत होते. पण फक्त तेजपाल थिएटरमध्येच प्रयोग करायचे असल्याने त्या रंगमंचावर ते बसणार होते (एवढे अवघड प्रायोगिक नाटक आपण करतो आहोत; त्याचे जेमतेम पाच प्रयोग होतील. तेवढे आपण तोटा सोसूनही तेजपालमध्ये करू शकू, अशी हमी दुबेने दिली होती!) मागच्या झिरझिरीत पडद्यावर एक प्रचंड वृक्षाच्या आडव्यातिडव्या फांद्या काढल्या होत्या, त्यांमागे उजेड केला की जाण्या-येण्याचा जंगलातला मार्ग दिसायचा. मधला दिवाणखाना अगदी कच्च्या लाकडाचा, एखाद्या जंगली वस्तीत असतो तसा ओबडधोबड ठोकळ्यांचा केला. खुर्च्या, दिवाण, जिन्याच्या वरच्या खोलीतला बिछाना, सगळे सुक्या जंगली लाकडाचे. चकाकी अजिबात नाही. रंग सगळा वाळलेल्या झाडाच्या खोडाचा. एका बाजूचे गॅरेज आणि दुसऱ्या बाजूचे अंगणातले तुळशी-वृंदावन यात मात्र हिरव्या रंगाचा लक्षात येण्याइतपत शिडकावा. बापू लिमयांनी खूप मन लावून, मोठया प्रेमाने नैपथ्य तयार केले. 

गिधाडांचे आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी विनोद दोशी आणि अमोल पालेकरांनी काय काय लटपटी-खटपटी केल्या ते त्यांचे त्यांना ठाऊक.

माझी बाकीची नाटके (इथे ओशाळला मृत्यू, गुरुमहाराज गुरू, काचेचा चंद्र इत्यादी) सांभाळून मी तालमी घेत होती. आणि एक दिवस सेन्सॉर बोर्डाकडून नाटक परत आले. नाटक पास केले होते- पण त्यातील सुमारे दीडशे आक्षेपार्ह शब्द गाळायला सांगितले होते. रूढार्थाने शिव्या नाटकात खूपच होत्या. (‘भ’ची सबंध बाराखडी!) पण ती गिधाडांची बोलीभाषा होती- सुसंस्कृत माणसांची नव्हती. त्यांनी त्याच भाषेत बोलायला हवे होते. नागरी, सभ्य भाषेत बोलली असती, तर ती गिधाडे वाटली नसती. माणसाच्या गिधाडपणाला अत्यंत प्रखर वास्तवरूप देण्यात या नाटकाच्या भाषेचा फार मोठा हातभार लागलेला आहे, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. भाषेच्या रांगडेपणाला घाबरून, लाजून ती भाषा गुळगुळीत करायचा प्रयत्न केला तर नाटकातील तीन चतुर्थांश नाट्य तरी हरवून जाईल, या मुद्यावर दुबेचे आणि माझे एकमत झाले. सेन्सॉरबोर्डाने असा पेच टाकल्यावर आता काय करायचे? असा विचार करताना तीन पर्याय समोर दिसले : 
1. आक्षेपार्ह भाग गाळून नाटक करायचे. (हा पर्याय आम्ही ताबडतोब धुडकावूनच टाकला. ‘गिधाडे’ नाटक चिमण्यांचे करण्यात काहीच अर्थ नव्हता.) 
2. त्यापेक्षा नाटक करायचे नाही. (श्री.पु.मागवतांचा इशारा आठवला!) पण तिसरा पर्याय होता. सेन्सॉरने घेतलेल्या दीडशे आक्षेपांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्याला भावले तसे नाटक करायचे; आणि जे परिणाम भोगावे लागतील त्याला तयारी ठेवायची! काय करतील? नाटकावर बंदी घालतील? आपण सत्याग्रह करू! मग तुरुंगात टाकतील? तर जाऊ! गांधींचा मार्ग! हा तिसरा पर्याय म्हटला, पण अगदी सहजपणे पहिल्यांदाच आपसुकच मनात आला होता. त्यात हौतात्म्याची हौस वगैरे काही नव्हती! आपल्याला नाटक विलक्षण आवडलेले आहे. आपण ते संपूर्ण जबाबदारीने करणार आहोत. एक समर्थ कलाकृती आविष्कृत करण्यापलीकडे कसलाही स्वार्थ नाही, असे सांगताना ‘हे नाटक करू नका असे सांगण्याचा हक्क कुणाला, कसा पोचतो?’... असा म्हटला तर अराजकवादी, म्हटला तर विशुद्ध स्वातंत्र्यवादी असा विचार होता.


आम्ही फार सहजतेने हा तिसरा पर्याय स्वीकारला आणि तालमी चालू ठेवल्या. ह्याचे एक कारण असेही असेल, की या नाटकाने एवढे काही वादळ उडेल, याची आम्हांला कल्पनाही नव्हती. आमच्या दृष्टीने त्यात बीभत्स, सनसनाटी असे काही नव्हतेच. आधुनिक जगात माणूस संस्कृतीच्या किती हीन पातळीपर्यंत पोचला आहे; आणि त्यापायी निरागस, अश्राप माणसांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त होतात. असा (थोडासा भावुकच) निष्कर्ष या नाटकांतून निघत होता. त्यावर हळवेपणाचा आरोप फार तर करता आला असता- पण आक्षेपार्ह असे त्यात काहीच नव्हते. उलट नाटक प्रायोगिक असल्याने प्रेक्षक तिकडे फिरकणारच नाहीत- फार तर पाच प्रयोग या नाटकाचे होतील, असाच अंदाज होता. त्यावेळी (मे 1970) छबिलदास अस्तित्वातच नव्हते (म्हणजे नाटकाकरता म्हणून- नाहीतर हे नाटक छबिलदासमध्येच व्हायचे!)

प्रयोगाचे आव्हान

एकटया दुबेने पुढचे वादळ थोडेफार, अपेक्षिले होते, असे तो खूप नंतर- प्रत्यक्ष वादळ घोंघावू लागल्यावर म्हणाला. आम्ही बाकीचे मजेत तालमी करत होतो. मी तर त्या नाटकाने झपाटल्यासारखाच झालो होतो. हे नाटक आपल्याला कधी काळी प्रत्यक्ष करायला मिळेल ही आशाच नाहीशी झालेली असताना अचानक हा योग आला होता. आपल्याजवळ जे असेल नसेल ते सारे या नाटकाच्या दिग्दर्शनात ओतले पाहिजे. या जाणिवेने काम करत होती. दुबे स्वतः एक समर्थ दिग्दर्शक आणि नाटकाचा निर्माता असतानाही माझ्या दिग्दर्शनात अजिबात हस्तक्षेप करत नव्हता, हा मोठा दिलासा होता. त्याचे निर्माता म्हणून आमच्या पाठीशी उभे राहणे मात्र सारखे जाणवायचे. तालमीची जागा (ताडदेव, वालचंद टेरेसचा तळमजला) म्हणजे थिएटर युनिटचा अड्डाच होता. कधी तालमी रात्री उशिरापर्यंत चालल्या तर आम्ही तिथेच झोपून जायचो! दुसऱ्या दिवशी प्रयोग वगैरे नसला, तर दिवसभर मुक्काम तिथेच. संध्याकाळी सगळेजण जमले की तालीम सुरू. नाटक बसवताना दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टींचे भान सतत ठेवायला हवे होते. गिधाडे (पपा, रमाकांत, उमाकांत आणि माणिक) ही अस्सल गिधाडे वाटणे महत्त्वाचे होते, त्यांचे बोलणे, चालणे, अंग खाजवणे, शिव्या देणे. त्यांची वेशभूषा या सगळ्यांतून त्याची अत्यंत हीन सांस्कृतिक पातळी, त्यांचा स्वार्थ  आणि भोगलोलुपता, त्यांची ओंगळ पाशवी वृत्ती ही प्रत्ययकारी वाटायला हवी. काम करणारे आम्ही सारेच मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत, पापभीरू, समाजभीरू असे बुजरे लोक. असुसंस्कृत, खेडवळ माणसाची, सुटाबुटातल्या सुसंस्कृत माणसाचे काम करताना जशी तारांबळ उडते तशी आमची उडायची! एकनाथ हट्टंगडीच्या (पपा) तोंडात मादरचोद-भांचोद यांसारख्या शिव्यांची रेलचेल होती. त्या साऱ्या उच्चारताना त्या बिचाऱ्या अतिसभ्य नि कजू माणसाची अक्षरशः बोबडी वळायची. तोंडातून बंदुकीच्या गोळीसारखी सुटायला हवी, अशी शिवी मोठ्या कष्टाने कशीबशी त्यांच्या तोंडातून टपकायची आणि त्यांना घाम फुटायचा! पण कठोर परिश्रमाने, त्या प्रतिभावंत नटाने ‘पपा' ची भूमिका अशा काही ताकदीने सादर केली की त्या साऱ्या शिव्यांचे ‘शिवीपण’ नाहीसे झाले; ती नुसती वाक्यातली विरामचिन्हे वाटू लागली! त्यांचे फतकल मारून बसणे, मचामचा खाणे, बसल्या जागी थुंकणे- सारे मूर्तिमंत गिधाडी! दीपालाही माणिक प्रथम कठीण जायची. माणिकचा बकाल निब्बरपणा, सवंग बाजारी थिल्लरपणा, चैनीची आणि भोगाची अदम्य तृष्णा हे सारे तिला फार भारी जायचे. पण तिनेही खूप परिश्रम घेऊन खणखणीत माणिक उभी केली. 

गिधाडांच्या बाबतीत दुसरा एक धोका होता. तोही टाळणे अशक्य होते. आपल्याकडे, नाटकातली पात्रे शिव्या देऊ लागली आणि रानटी वागू लागली की प्रेक्षक हसतात आणि मग ती पात्रेही स्वतःची भूमिका विसरून, नकळत विनोदी होऊ लागतात. ते टाळणे या नाटकात फारच आवश्यक होते. ही गिधाडे शेवटपर्यंत क्रूर, भोगलोलुप, रक्तपिपासू वाटत राहणे, ही नाटकाची महत्त्वाची गरज होती. नाहीतर ती शोकांतिका म्हणून अंगावर आली नसती. आणि नाटक पार फसले असते. सर्व नटसंचाच्या मनावर हे ठसवणे महत्त्वाचे होतेच, पण प्रकाशयोजनेचाही याकरता खूप उपयोग होणार होता. हे सारे नाट्य एका अंधाऱ्या ढोलीत, प्रकाश टाळून, बाहेरच्या जगापासून लपून छपून, एखाद्या रहस्यकथेसारख्या थरारक वातावरणात चालले आहे. बाहेरच्या जगाच्या प्रकाशालाही या जगात प्रवेश करायला मज्जाव आहे. अशा तऱ्हेची धूसर प्रकाशयोजना केली म्हणजे प्रत्येक प्रसंगातले, प्रत्येक गिधाडाचे क्रौर्य अधोरेखित होणार होते. अशोक साठेने हे सर्व जाणून (फार समजदारीने) प्रकाशयोजना केली आणि राम मुंगीने अत्यंत तत्परतेने आणि कसोशीने प्रत्येक प्रयोगात तिचा आव राखला. शोकात्म परिणामाचा गडदपणा कुठेही, कधीही गमावला नाही. गिधाडांच्या बाबतीत जसे धोके होते तसे रजनीनाथ-रमाच्या बाबतीत वेगळेच धोके होते. गिधाडांच्या तावडीत सापडलेल्या या सुसंस्कारित माणसांचे दुःख हे वरवरचे, हळवे, सवंग, चार अश्रू ढाळून हलके होणारे नाही. तर ती अगदी गाभ्यापर्यंत चिरत जाणारी सखोल वेदना आहे. हे प्रकर्षाने जाणवणे जरूर होते. ही माणसे भावविवश न वाटता काळ्याकुट्ट दुःखाच्या जंगलात हरवलेली वाटायला हवीत.

प्रेक्षकांची सहानुभूती खेचून घेण्याकरता उमाळे, उसासे टाकणे; ‘मी दुःखी, मी दुःखी' करीत अश्रूंचा पूर वाहणे याने प्रेक्षक ढसढसा रडू शकतो- पण आतल्या आत फुटू-तुटू शकत नाही. खऱ्या अर्थाने सखोल शोकात्म परिणाम साधायचा असेल, तर प्रेक्षकांचे हे आतल्या आत फुटणे महत्त्वाचे आहे. रजनीनाथ आणि रमा या दोघांचेच जे प्रवेश आहेत, त्यांत दोघेही भावविवशतेच्या आहारी जाण्याचा धोका आहे. दोघांच्या तोंडची भाषा काही ठिकाणी थोडी भावविवश आहे ही. पण त्या भाषेतले काव्य आणि त्यातल्या वेदनेची सखोलता नीट समजावून घेतली; दुःख भडाभडा व्यक्त करण्याकरता नव्हे, तर ते झाकण्याकरता ती भाषा वापरली आहे हे भान ठेवले, तर धोका नक्कीच टाळता येण्यासारखा आहे. अशोकला ते जरा जड गेले; पण मीनाच्या अभिनयाची ताकद मोठी आहे. तिने ते चटकन् आत्मसात केले. नटनटींनी रंगमंचावर शरीर-स्पर्शाला बुजणे हा आपल्या रंगभूमीच्या डोक्यावर असलेल्या अनेक शापांपैकी एक मोठा शाप आहे. (तो तसा आपल्या भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे!) आज थोडा मोकळेपणा आलेला आहे. तीस वर्षांपूर्वी तेवढाही नव्हता. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी विजयाबाई आणि मी अशा दोघांनी ‘मादी’ नावाची तेंडुलकरांची एकांकिका केली होती. तेव्हा तर समीक्षकांतल्या काही दुढ्ढाचार्यांनी, ती आशयघन एकांकिका बाजूला टाकून, मोकळ्या शरीरस्पर्शावरच झोड उठवली होती! ‘गिधाडे’ मध्ये रजनीनाथ आणि रमा यांच्या एका प्रवेशात रजनीनाथ उघड्या अंगाने, नुस्ती पँट घालून वावरतो आहे. प्रवेशाच्या शेवटी दोघे एकमेकांना अत्यंत आवेगाने आलिंगन देतात. पुरुष आणि प्रकृतीच्या आवेगाचे ते आलिंगन आहे!  अख्ख्या स्त्रीत्वाचे अख्ख्या पुरुषत्वाला दिलेले ते आलिंगन आहे. लक्षावधी वर्षाच्या स्त्रीने लक्षावधी वर्षाच्या पुरुषाला दिलेले ते आलिंगन आहे. केवळ एका रमाने एका रजनीनाथला दिलेले ते आलिंगन नव्हे. मीना सुखटणकर नावाच्या एका शालीन कुमारीनेअशोक साठे नावाच्या एका बुजन्या तरुणब्रह्मचान्याला दिलेले तर नव्हेच नव्हे! मीना आणि अशोक, दोघांनाही शेवटपर्यंत ते अवघडच गेले. त्या दोघांनी अगदी मनापासून प्रयत्न केला, यात शंकाच नाही. प्रत्यक्षात जे घडले ते प्रेक्षकांच्या दृष्टीने पुरेसे असावे.. पण माझ्या दृष्टीने नव्हते. आशयाच्या अभिव्यक्तीत मोठी उणीव राहून गेलीशी वाटते. मध्यंतरी पुण्यात एक परिसंवाद झाला होता. ‘मराठी नाटक आणि मनोविकृती’ अशा अर्थाचा विषय होता. त्यात ‘गिधाडे’ नाटकाचा समावेश केलेला होता. गिधाडे मधील माणसे ही मनोरुग्ण आहेत, असे जणू त्यात गृहीत धरले होते. मला मात्र तसे वाटत नाही. जन्मतः काही मनोविकृती घेऊन आलेली ही माणसे नाहीत; समाजातल्या सांस्कृतिक ऱ्हासाचे हे बळी आहेत. सत्ता, संपत्ती, भोगलालसा यांच्यापोटी अटळपणे येणाऱ्या हिंस्त्रपणाने या माणसांची शिकार साधलेली आहे. कुसंस्कृतीने या माणसांचा केलेला विनाश हा फार भयानक आणि दारूण आहे. कारण त्यातून त्यांना मुक्तीच नाही. रमा आणि रजनीनाथ यांची शोकांतिका उघडच आहे. मन उदास करणारी आहे. सुसंस्कारित माणसे आजच्या निर्घृण जगात भरडून  निघतात, हे सत्य उदास करणारे आहेच- पण केवळ ‘तुळशी-वृंदावनी’ संस्कारांनी माणसाचा निभाव लागणार नाही. याची सूचनाही या नाटकात आहे. (रमा आणि तिचे तुळशी- वृंदावन!) केवळ सुसंस्कारित असून भागणार नाही; सबळही असायला हवे. आणि हे बळ शारीरिक किंवा शस्त्रबळ असून भागणार नाही, तर ते नैतिक बळ असावे लागेल. कुसंस्कार रोखून सुसंस्कार घडवून आणण्याचे सामर्थ्य त्या बळात असावे लागेल. तरच गिधाडांची निर्मिती थांबेल आणि सुसंस्कृत माणसांचे जिणे सुसह्य होईल. नाहीतर रमा-रजनीनाथ पायदळी तुडवले जातील आणि जगात गिधाडेच फक्त राहतील, असे काहीसे विचार नाटक संपल्यानंतर मनात घोंघावत राहतात. 

गिधाडेचा पहिला प्रयोग 30 मे 1970 रोजी तेजपाल थिएटरमध्ये झाला. प्रेक्षकांना तो खूपच आवडल्याचे लक्षात आले. पुढच्या प्रयोगांना गर्दी वाढतच गेली. ठरलेले पाच प्रयोग पार पडेपर्यंत या नाटकाने महाराष्ट्रात एक वादळच उठवून दिले. प्रचंड स्तुती करणारी आणि कडाडून शिव्या घालणारी समीक्षणे लिहून आली. जिकडे-तिकडे ‘गिधाडे’ ची चर्चा सुरू झाली. सेन्सॉरबोर्डाने जोरदार आक्षेप घेतले. सेन्सॉरशी जवळजवळ दीड वर्ष युद्ध झाले. गिरीश कर्नाडांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त लिहिले, “गिधाडे चा प्रयोग झाला. आणि एखाद्या शांत माणसांनी गजबजलेल्या बाजारात अचानक बाँब पडावा तशी महाराष्ट्राची अवस्था झाली.” आम्ही ठरवले. ‘गिधाडे' तेंडुलकरांनी जसे लिहिले आहे, तसे करायचे; आणि आम्ही ते नाटक केले. सेन्सॉरनी सांगितल्यापैकी काही एक कट्स न पाळता केले. त्याचे काहीतरी आठ, दहा प्रयोग झाले, त्याच्यावर खूप चांगले व वाईट असे लिहिले गेले. पुष्कळ चर्चा झाली. आणि एक दिवस आम्हांला सेन्सॉरबोर्डाचे बोलावणे आले. त्यात त्यांनी म्हटले होते की, तुम्ही एकही कट न पाळता नाटक करत आहात, अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यावर तुमचे म्हणणे काय? आम्ही म्हणालो, खरे आहे ते. तुम्ही घालून दिलेला एकही कट आम्ही पाळला नाही. ‘का पाळत नाही आहात?’ त्यांनी विचारले. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला तुमचे कट्स मंजूर नाहीत. हे कट्स घेऊन नाटक केले तर ते गिधाडांचे नाटक होत नाही वगैरे.... 

त्यावर ते म्हणाले की, असे जर असेल तर तुम्ही आम्हांला तसे का कळवले नाही? आम्ही तुम्हाला बोलावले असते. आपण चर्चा केली असती. तुम्ही आम्हाला तुमचे म्हणणे पटवून द्यायचे होते, आम्ही तुम्हाला आमचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला असता. 

आम्ही प्रामाणिकपणे त्यांना सांगितले की, काय कार्यपद्धती आहे, ती आम्हांला माहीत नव्हती. माहीत असती तर तसा अर्ज आम्ही जरूर केला असता.

मग त्यावर ते म्हणाले की, मग आता असे करा, तुम्ही एक अर्ज लिहून घ्या. त्यात तुमचे म्हणणे मांडा. 

आम्ही तसा अर्ज तिथल्या तिथे बसून त्यांना लिहून दिला. त्यावर ते म्हणाले की, ठीक आहे. आपण आता यावर चर्चा करू. आम्ही तुम्हांला बोलावूच. यापुढची मंडळाची बैठक तीन एक महिन्यानंतर मुंबईस भरेल, तिला तुम्हांला बोलावले जाईल. 

पण आमच्यापुढे दुसरीच एक अडचण होती. या तीन महिन्यांत ‘गिधाडे’चे जवळजवळ पंधरा-वीस प्रयोग ठरलेले होते. आम्ही त्यांना विचारले, या प्रयोगांचे काय? ते म्हणाले, हरकत नाही. या मधल्या काळात प्रयोग करत राहा, परंतु बैठकीत निर्णय झाल्याशिवाय तुम्हांला फायनल सर्टिफिकेट मिळणार नाही. म्हणजे गंमतच. आम्ही सारेच्या सारे कट्स न जुमानता प्रयोग करत होतो व ते प्रयोग चालू ठेवा, असे हेच आम्हांला सांगत होते. 

दरम्यान प्रयोग चालूच 

त्यानंतर आम्ही आमंत्रणानुसार बैठकीस गेलो. दुबे, तेंडुलकर आणि मी असे आमच्या बाजूचे होतो. आम्ही त्यांना आमचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण या सर्वांतून निष्पन्न एवढेच झाले की, सेन्सॉर बोर्डाच्या बऱ्याचशा सभासदांनी तो प्रयोग पाहिलाच नव्हता! तो प्रयोग त्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या सभासदांनी पहायचा; आणि मग फायनल सर्टिफिकेट द्यायचे. कारण आमचे महत्त्वाचे प्रतिपादन असे होते की, तुम्हांला या शिव्या वाचताना आणि विशेषतः त्याच्याभोवती लाल वर्तुळ केले म्हणजे फारच वाईट दिसतात. परंतु त्या बोलण्याच्या ओघामध्ये, ज्या तऱ्हेने ती पात्रे ते शब्द उच्चारतात, ते ऐकल्यावर, त्या शिव्या वाटतच नाहीत. विरामचिन्हे वाटतात. वाक्यामध्ये जसे स्वल्पविराम, अर्धविराम असतात, तशा त्या वाटतात. उदाहरण म्हणून मी एका वाक्याचा संदर्भ दिला. ‘कामाची सदा भांचोद टाळाटाळ’ आता या वाक्यात ‘भांचोद’ ही शिवी कोणाला दिलेली आहे? त्या शब्दाभोवती तांबडे वर्तुळ केले की, मग ती शिवी वाटते. पण ‘कामाची सदा भांचोद टाळाटाळ’ आता या वाक्यात ती शिवी, शिवी राहत नाही. ती त्याच्या बोलण्याच्या पद्धतीचा एक भाग होऊन बसते.. तो शब्द काढून टाकल्यास, वाक्याचा संपूर्ण तोलच जातो. प्रत्येक वाक्याचे स्वत:चे म्हणून एक वजन असते. ते वजनच नाहीसे झाल्याचे लक्षात येईल. हे सर्व आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून वरीलप्रमाणे निर्णय झाला; आणि मधल्या काळात प्रयोग चालू ठेवण्यास त्यांनी आम्हाला परवानगी दिली. 

नंतर सेन्सॉरबोर्ड सभासद आले. त्यांनी प्रयोग पाहिला. त्यानंतर पहिला दीड महिन्याचा काळ तसाच निघून गेला आणि मग पुन्हा त्यांनी आम्हाला बोलावले. आम्ही गेलो. यावेळी सरळ दोन गट झालेले होते. काही सभासदांचे म्हणणे आमच्या बाजूचे होते. इतरांचे नव्हते. त्यांना ते नाटक भयंकर घाण, ओंगळ वाटत होते. त्यांपैकी एक सभासद तर म्हणाले की, प्रयोगाच्या वेळेला मी पहात होतो. प्रत्येक वेळी शिवीचा उच्चार झाला की, माझ्या आसपासच्या बायका लाजेने मान खाली घालत होत्या. 

मी गंमतीने त्यांना म्हणालो, ‘तुम्ही आमचा प्रयोग बघत होता की, आसपासच्या बायका?’ त्याबरोबर ते भयंकर संतापले आणि चक्क बैठकीतून उठून निघून गेले. अर्थात जाताजाता ते म्हणाले, ‘तुम्ही लोक स्वतःला फार शहाणे समजता...’


अध्यक्षांचे निर्णायक मत 

अशा रीतीने दोन उघडउघड गट पडल्यामुळे, त्या बैठकीत निर्णय असा झाला की, बोर्डाच्या अध्यक्षांनीच हा प्रयोग पाहून (त्यांनी आत्तापर्यंत प्रयोग पाहिला नव्हता!) आपले निर्णायक मत द्यावे. आम्ही ते मान्य केले. कारण त्यात वावगे काहीच नव्हते. प्रयोग चालूच होते. पुन्हा सहा महिन्यांचा काळ गेला. अध्यक्ष महोदय अतिशय कामात असल्यामुळे त्यांना प्रयोग पहायला वेळ मिळत नव्हता. कधीतरी त्यांनी सवड काढली व प्रयोग पाहिला. अत्यंत सज्जन व रसिक गृहस्थ म्हणून त्यांची ख्याती. कारण प्रयोगानंतर अत्यंत मोकळ्या मनाने ते आत आले व म्हणाले की, प्रयोग खूप आवडला. इतक्या विलक्षण ताकदीचे मराठी थिएटरमध्ये मी फारसे काही पाहिलेले नाही. पण अर्थातच हे माझे व्यक्तिगत मत आहे. सेन्सॉरबोर्डाच्या अध्यक्षांचे नव्हे. तेव्हा तुम्ही ठरवल्याप्रमाणे मिटींगला या व तिथे आपण चर्चा करून, निर्णय घेऊ. 

रक्ताचा भडक डाग 

आम्ही पुन्हा चर्चेला गेलो. त्या बैठकीला त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या काही सभासदांना बोलावले नव्हते. सगळ्या सभासदांना का बोलावले नाही, हे आम्हाला कळले नाही. मी, तेंडुलकर, दुबे आमच्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने, सेन्सॉर बोर्डामधल्या स्त्री- सदस्या शांता शेळके, सरोजिनी वैद्य, कुमुद मेहता होत्या. आणि चौथे अध्यक्ष. ही अशी शेवटी बैठक झाली. त्यात त्यांनी प्रांजळपणाने सांगितले की, त्यांना आमचे म्हणणे पटलेले आहे. नाटकातल्या शिव्या, शिव्या वाटत नाहीत; आणि म्हणूनच त्या सर्व शिव्या वापरायला परवानगी देतो. फक्त दोन गोष्टी खटकतात; त्या तेवढ्या काढा, ‘एक त्या बेडरूमच्या प्रसंगात रमाकांत माणिकला उद्देशून ‘रांड’ हा शब्द वापरतो. तिथला ‘रांड’ हा शब्द नको. भाऊ बहिणीला रांड म्हणतो हे आमच्या संस्कृतीत नाही. मला पटत नाही. आणि दुसरा म्हणजे, त्या मारामारीच्या प्रसंगात उमाकांत एकदा ‘च्या मायला तुझ्या...’ वगैरे म्हणतो, तेही खटकते. असे दोन कट्स पाळायला पाहिजेत. तिसरे म्हणजे त्या तांबड्या डागाच्या दृश्याविषयी. या प्रसंगात माणिक रक्ताळलेली साडी नेसून रंगमंचावर येते. ते फार भडक वाटते. माणिक फार पुढे येते. प्रेक्षकांच्या फार जवळ येते. तेव्हा तिला पुढे येऊ न देता मागच्या मागे, म्हणजेच बॅकग्राऊंडलाच घालवली पाहिजे. मी तिथल्या तिये अध्यक्षांना रंगमंचाचे चित्र काढून दाखवले, व त्यावर पेन्सिलने रेघ मारून तिचा मार्ग त्यांनी सुचवला. त्या वेळेला मला त्यात वावगे काही वाटले नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने माणिक गेली व जाण्यासाठी क्षणिक वळली तरी प्रेक्षकांच्यावर आम्हांला हवा तो परिणाम होईल याची मला खात्री वाटली होती. 

हे एवढेच पाळण्याचे आम्ही मान्य केले. कारण दीडशेपैकी एकशे सत्तेचाळीस कट्स त्यांनी परत घेतले होते. आम्ही तिथे वाटाघाटीसाठी गेलो होतो, भांडण्याला वा लढण्याला नव्हे. सेन्सॉरवाल्यांनी सुरुवातीला डोळ्यांना झापडे लावून जे केले होते, ते चूक आहे, हे त्यांना कळले. हा आम्ही आमचा विजय मानला. 

घरी येऊन पाहतो तो काय? गंमतीचा प्रकार म्हणजे हे तिन्ही कट्स पूर्वीच्या दीडशे कट्सपैकी नव्हतेच. भावाने बहिणीला ‘रांड’ म्हणणे, हे आता सेन्सॉरला भयंकर पाहण्याच्या लायकीचे आहे की नाही, हे खटकणारे प्रकरण पूर्वी आम्हांला वापरायला परवानगी होती. हे आम्ही त्यांच्याकडून कशासाठी सहन करायचे? एकूण समाजाच्या नीतिमत्तेची जबाबदारी यांची आहे; आम्ही लोक अनैतिक आहोत, अश्लील आहोत, आम्ही ओंगळ आहोत, आम्ही बीभत्स आहोत, श्लीलतेचा सगळा मक्ता यांच्याकडे आहे, आम्हांला सभ्यता नावाचा पदार्थच माहीत नाही. आम्हांला समाजाच्या नीतिमत्तेची काही एक चाड नाही, हे सारे ते सुचवत होते, ते आम्ही काय म्हणून सहन करायचे? सेन्सारबोर्डाचा हा नमुना. 

त्यांच्या बुद्धीचा आणखी नमुना दिसला ‘सखाराम बाईंडर’ प्रकरणात. 

सखाराम बाईंडरचे प्रकरण बरेच गाजले व वाजले. समाजाच्या नीतिमत्तेची रखवाली पत्करलेल्या शासनाने त्या नाटकावर बंदी पातली. एखाद्या नाटकाच्या प्रसंगांनी समाजाच्या नीतिमत्तेवर भयंकर परिणाम होऊ शकतो, या गृहीत तत्त्वामुळे सखारामला वनवासात जावे लागले. म्हणजे समाजाच्या नीतिमत्तेची संपूर्ण जबाबदारी या शासनाने आपल्या शिरावर घेतली आहे. सखाराम बाईंडरवर बंदी आली. कारण त्यांच्या मते हे नाटक पाहून विवाहसंस्थेचे पावित्र्य बिघडत आहे! 

हा आरोप या नाटककारावर केला गेला, तेव्हा प्रथम मी असे विचारले की, तुमच्या विवाहसंस्थेचे पावित्र्य ही इतकी तकलादू गोष्ट आहे का, की जी एका नाटकामुळे नष्ट होऊ शकते? जर ती इतकी तकलादू असेल तर ते नष्ट होते आहे. तेच बरे आहे! 

नाटकावर ‘सेन्सॉरशिप’ असते. नाटक सेन्सॉर बोर्डाने संमत केल्याशिवाय रंगमंचावर साकारू शकत नाही, माणजे काय? ‘सेन्सॉरशिप’ याचा अर्थ नाटक का संमत करावे? 

अमुक एक नाटक करण्याच्या लायकीचे आहे की नाही; म्हणजेच ते नाटक प्रेक्षकांनी ठरवणे म्हणजे सेन्सॉरयंत्रणा निर्माण करणे होय. कुठलेही नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनावर एक विशिष्ट परिणाम होतो, असे सेन्सॉर बोर्ड गृहीत धरते आणि त्या अनुषंगाने सारे नियम केले जातात. नाटकाला सेन्सॉरशिप हवी. का? तर तेंडुलकरांच्या लिखाणपद्धतीत काही बदल व्हावा. अशी बोर्डाची अपेक्षा नसते. अपेक्षा अशी असते की, नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर जो परिणाम होत असतो, तो नियंत्रित असावा. या परिणामावर काही नियंत्रण घालता यावे. असे का? तर समाजाचे स्वास्थ्य व स्थैर्य ही मुळातच शासनाची जबाबदारी आहे. असे शासन मानते. म्हणजे वाहतुकीमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून काही एक यंत्रणा असते. पोलिस असतात, विशिष्ट खुणा असतात, विशिष्ट नियम असतात, की जेणेकरून वाहतुकीमध्ये गोंधळ माजवला जाऊ नये; किंवा चोरी, दरोडेखोरी यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासन काही खास यंत्रणा उभारते. तसे या सेन्सॉरशिपमध्ये एक गृहीततत्त्व असे आहे की, समाजाची नीतिमत्ता राखणे, ही जबाबदारीसुद्धा शासनाची आहे. आणि दुसरे गृहीततत्त्व म्हणजे एखादे नाटक बघून ही नीतिमत्ता बिघडू शकते. या दोन गृहिततत्त्वावर सेन्सॉरशिपची यंत्रणा उभारलेली आहे. 

मग्रूर गृहीत तत्त्व 

वरवर पाहिले तर वाटते की, हे खरे आहे ही फार चांगली गोष्ट आहे. समाजाच्या नीतिमत्तेची रखवाली करण्याची जबाबदारी शासनाने स्वतःवर घेतली, ही एक व दुसरी गोष्ट म्हणजे, एखादे नाटक पाहून लोकांची नीतिमत्ता जर बिघडणार असेल तर, त्यांनी ती नाटके बंद करायला पाहिजेत. वरवर पाहता मनाला हे पटते.

माझ्या मते यातले पहिले गृहीततत्त्व फार मग्रूरपणाचे आहे. शासनाची जबाबदारी समाजाच्या स्थैर्याची आहे, त्याच्या ऐहिक जीवनावस्तूची आहे. परंतु त्याच्या नीतिमत्तेची जबाबदारीसुद्धा शासनाने आपल्या शिरावर घेणे अयोग्य आहे. कारण नीति-अनीती याचा विचार तत्त्वज्ञानाच्या प्रांतात केला जातो. अनैतिक काय? नैतिक काय? हे ठरवण्याचा अधिकार तत्त्ववेत्यांचा आहे, असे मला वाटते. हे तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून ठरवू शकत नाही. कारण नीती, अनीतीच्या कल्पना ह्या सापेक्ष असतात. त्या काळाबरोबर बदलणाऱ्या असतात. प्रत्येक समाजात वेगवेगळ्या असतात. असे असतानासुद्धा तुम्ही निखालस नीतिमत्ता ठरवू शकता कसे? आणि अशा नीतीच्या रखवालीची जबाबदारी आपल्या डोक्यावर तुम्ही घेऊ कसे शकता? एवढे मग्रूर तुम्ही होता कसे? आणि म्हणूनच मी हे गृहीततत्त्व मानत नाही.

त्यानंतरचे गृहीततत्त्व तर भयंकर फसवे व धादांत खोटे आहे! म्हणे नाटक पाहून नीतिमत्ता बिघडते! आता या सर्वांमध्ये एक गंमत आहे. शासन ही जी सारी बंधने आपल्यावर लादत आहे, त्याला जबाबदार आपणच आहोत! आपण त्यांना हे गृहीत तत्त्व स्वीकारायला भाग पाडतो. नाटकाचे कार्य लोकशिक्षण व लोकरंजन असते. अशी खुळचट कल्पना आपण मानलेली आहे. ही कल्पना अगदी पुरातन काळापासून मान्य पावलेली आहे. आणि मुळामध्ये हेच खोटे आहे! नाटकाचे, वाङ्मयाचे वा कोठल्याही कलाकृतीचे कार्य लोकरंजन या लोकशिक्षण असूच शकत नाही. कोठल्याही महान कलाकृतीने कोठलाही महान संदेश जगाला दिलेला नाही. शेक्सपियर, कालिदास यांना आपण महान कलाकार का मानतो? त्यांनी कोठले नीतितत्त्व सांगितले आहे? आणि त्यामुळे समाजाची नीति किती सुधारली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतात, कारण हे खरे नसतेच. आणि तसा त्या कलाकाराचा दावा नसतोच. शेक्सपियर, इब्सेन, शॉ हे महान नाटककार होते, असे आपण एकमुखाने म्हणतो, त्यांच्या शताब्द्या साजऱ्या करतो आणि त्याचवेळी लोकशिक्षण हे साहित्याचे कार्य मानतो. ही गफलत समजावून घ्यायला हवी. 

समाजाची नीतिमत्ता ही कोठल्याही कलाकृतीने सुधारत वा बिघडत नाही. लोकरंजन, लोकशिक्षण हे कलाकृतीचे कार्य असूच शकत नाही. कलाकृतीचे कार्य फार वेगळे असते. तुमची मानवी आयुष्याबद्दलची जी जाण आहे. जी जाणीव आहे, नुसती मानवी आयुष्याबद्दल कशाला, सबंध विश्वासंबंधीची- हा जो सबंध विश्वाचा पसारा मांडला गेलेला आहे, याची जी जाण आहे. आणि त्या संदर्भात मानवी आयुष्याचे स्थान काय, याची जी जाणीव आहे. त्याला आत्मशोध असे आपण म्हणतो. हा आत्मशोध माणसाला जास्तीत जास्त घ्यायला लावणे, हेच कलाकृतीचे एकमेव कार्य होय. कलाकृतीचे कार्य केवळ करमणूक असूच शकत नाही, करमणूक करण्याचे माझे मार्ग फार वेगळे आहेत. त्यासाठी मी दूर एखाद्या समुद्रकिनारी जाऊन लोळत पडेन वा ओढयाकडे बघत सिगारेटी ओढत बसेन. ही हलकीफुलकी करमणूक झाली की मी वाङ्मय फार गंभीरपणाने वाचतो. कोठलीही कादंबरी वाचताना माझी करमणूक व्हावी, किंवा त्यामधून मला एखादा संदेश मिळावा, हा माझा हेतूच नसतो. माझ्या जाणिवेच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत जाव्यात, अतिशय विविधांगांनी समृद्ध असे जे मानवी जीवन माझ्यासमोर आहे. त्याचे स्वरूप मला जास्तीत जास्त उलगडत जावे, म्हणजेच मी ‘मी’ चे स्वरूप उलगडत जावे, जास्तीत जास्त स्वतःचा शोध मला घेता यावा म्हणून मी कलाकृतींचा आस्वाद घेत असतो, म्हणून मी नाटक पाहत असतो. 

कलाकृतीचे एवढे थोर कार्य असताना, आपण मात्र लोकशिक्षणासारख्या अत्यंत हलक्या प्रतीच्या तत्त्वालाच मिठी मारून बसतो आहोत! ‘एकच प्याला’ सारखे समर्थ नाटक गडकऱ्यांनी दारुबंदीवर लिहिले. त्यानंतर दारुबंदी कधीच व्हायला पाहिजे होती. इतके प्रचंड संदेश देणारे नाटक असताना, कायद्याची आवश्यकताच काय? लोकशिक्षण हे जर नाटकाचे कार्य असेल. तर एव्हाना दारुबंदी व्हायला पाहिजे होती. ती होत नाही आणि तरीसुद्धा ‘एकच प्याला’ हे नाटक श्रेष्ठ आहे. असे आपण म्हणतो. अगदी दारू पीत असतानासुद्धा आपण तसे म्हणतो. ‘पुण्यप्रभाव’ गडकऱ्यांनी लिहिल्यानंतरसुद्धा वसुंधरांच्यावर बलात्कार करणारे समाजातले वृंदावन होते, ते कमी झाले नाहीत, तर ते तसेच राहिले आहेत. मग नाटक पाहून नीतिमत्ता बिघडते हे गृहीत तत्त्व किती फसवे आहे, याचा प्रत्यय आपणास येतो, म्हणजेच सेन्सॉरशिप ज्या गृहीत तत्त्वांवर आधारित आहे, त्यांतील फोलपणा लक्षात येतो.

एखादे नाटक चांगले आहे की नाही इतरांनी ते पहावे की नाही, म्हणजेच नाटक लोकांनी पाहण्याच्या लायकीचे आहे की नाही, हे ठरवणार कोण? मी सेन्सॉर बोर्डाला (म्हणजे त्यातल्या सभासदांना व्यक्तिशः) विरोध करत नाही. माझा विरोध आहे सेन्सॉरशिपच्या कल्पनेला. एखाद्या सर्जनशील कलावंताने ‘आपल्या रक्ताचे पाणी कर’ असे एक नाटक लिहिले, तर त्याचा प्रयोग व्हावा की होऊ नये हे ठरवणार कोण? शासनाने नेमलेले हे दहा-बारा जण? 

हे फार संतापजनक तर आहे. पण भयंकर अपमानास्पदही आहे! कलावंतांचा हा अपमान आहेच पण प्रेक्षकांचासुद्धा! सरकार लोकशाहीचा टेंभा मिरवते. हे सरकार आपल्या देशात प्रौढ मतदारांनी नाटक कोठले पाहावे, हे मात्र ते ठरवू शकत नाहीत, असे मानते. ही फसवणूक आहे. हा खोटेपणा आहे. नाटक चांगले आहे की वाईट हे ठरविण्याचा अधिकार प्रेक्षकांचा आहे. त्यांना एखादं नाटक चांगले वाटले, तर ते त्याला चांगले म्हणतील; नाही वाटले. तर तिकडे फिरकणार नाहीत. त्यांना त्यांचा अधिकार वापरायला या लोकशाही देशामध्ये मुभा मिळणार आहे की नाही? शासन हा त्यांचा अधिकार का हिरावून घेत आहे? 

सेन्सॉरशिपला आम्ही का विरोध करतो. याचे अनेकजण निरनिराळे तर्क करतात. एखादे नाटक बंद पडतेय म्हणून या आम्हाला जे करायचे आहे, ते करू दिले जात नाही, म्हणून आम्ही सेन्सॉरशिपला विरोध करतो का? नाही; यापेक्षाही अधिक महत्त्वाचे कारण आहे व ते अतिशय मूलभूत असे आहे. ते म्हणजे कलावंतांच्या आविष्कार स्वातंत्र्याचे आहे. यात दुसऱ्या कोणीही गडबड करू नये, असे आमचे म्हणणे आहे. 

आपलेही काही चुकत असेल 

आज सारी जीवनमूल्ये बदलत आहेत. या बदलाची चाहूल लागते. पण ही मूल्ये आज पूर्णपणे कोणासही आकलन होत नाहीत, हे सत्य आहे. आपण मात्र आडमुठेपणाने हेच घोकत राहायचे की, ‘नाही, हे सारं मला समजतंय, उमजतय’ आणि कोणाच्या तरी स्वातंत्र्यावर घाला घालायचा! पण असे करत असताना, एखाद्या तेंडुलकराचे तोंड बंद करत असताना किमान एक शक्यता डावलता उपयोगी नाही की, कदाचित आपलेही चुकत असेल. आपण असा विचार करत नाही की, मला हे वाईट वाटतंय; पण मुळात ते तसं नसण्याची शक्यता आहे. तर मग मी हे का बंद करू? लेट पीपल डिसाईड! 

माझे सरकार एवढे मग्रूर का आहे. तर मी असंस्कृत आहे म्हणून? लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे शासनकर्ते मिळतात. असा राज्यशास्त्राचा मूलभूत सिद्धांतच आहे. तेव्हा या सर्व कटकटीतून मार्ग काढायचा असेल, तर त्यासाठी मी प्रथम सुसंस्कृत, अधिक सूज व्हायला पाहिजे. म्हणजे सुरुवात माझ्यापासूनच करायला पाहिजे. हा सर्वात बलवान असा व कायमचाच असा उपाय आहे! तो फार लांबच्या पल्ल्याचा आहे; व बराचसा तात्त्विक आहे. आदर्शवादी दृष्टिकोनातला आहे. तरी पण हाच अंतिम उपाय होय. 

पण मग आजचा प्रेक्षक वर्ग असंस्कृत आहे का? मागासलेला आहे का? माझ्यासारखा मनुष्य जेव्हा सेन्सॉरशिप रद्द व्हावी असे म्हणतो, तेव्हा प्रेक्षकांची काही एक किमान सांस्कृतिक पातळी असते; किंवा प्रेक्षक हा किमान सुसंस्कृत आहे, असे मानत असतो. ज्या समाजाने ती किमान पातळीदेखील गाठली नाही, तेथील सेन्सॉरशिप काढून टाकून जबरदस्तीने त्यांना काही दाखवणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. तेव्हा मी आमच्या प्रेक्षकांची ही किमान पातळी गृहीत धरतोच आहे. आज आमचा समाज इतका मागासलेला नाही, जितका 200 वर्षांपूर्वी इंग्रज समाज होता. आज तो त्यांच्याइतका सुज्ञ नाही हेही मान्य. 52 वर्षांपूर्वी पूर्वी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हे अंतर 100 वर्षांचे होते असे मानले तर आज ते किमान 80 वर्षांनी कमी झाले आहे. असेच म्हणावे लागेल. 

आमची अस्सल सेन्सॉरिंग ताकद ही लेखन आहे. कलाकृती निर्माण करणारा स्वतःवर जी बंधने घालून घेतो, तीच खरी सेन्सॉरशिप होय. नाटकाच्या संदर्भात दुसरी सेन्सॉरशिप (जी सर्वात महत्त्वाची) म्हणजे प्रेक्षक. कारण कोठले चांगले, कोठले वाईट, काय पहायचे, काय पहायचे नाही, हे प्रेक्षकांना कळते. 

कलावंत हा जितक्या मोकळ्या वातावरणामध्ये कार्यरत होईल, आपली कलाकृती निर्माण करू शकेल, त्याच्या कलेचा आविष्कार करू शकेल, तितक्या प्रमाणात देशाची कला समृद्ध होईल, म्हणजेच रंगभूमीची प्रकृती सुधारेल, म्हणजेच सबंध देशाचे मानसिक आरोग्य समृद्ध होईल, आणि म्हणूनच ज्या पातळीवरून तुम्ही युद्धाचा विचार करता, त्याच पातळीवरून या प्रश्नाचा विचार करावयास हवा. 

हा विचारच आजपर्यंत केलेला नाही. भले तुम्ही विचार करून ठरवा की, नाही. या देशातल्या कलावंताला संपूर्ण आविष्कारस्वातंत्र्य देता कामा नये. पण तुम्ही ते तिथे, पार्लमेंटमध्ये ठरवा. 50 वर्षापूर्वी राजकीय स्वातंत्र्य मिळालं. प्रगतीची दारं खुली झाली. आता तुम्ही आम्हांला स्वातंत्र्य देणार आहात की नाहीत? त्याचा विचार तरी करणार आहात का? माणसाच्या मूलभूत गरजा या भागवल्या गेल्याच पाहिजेत. ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा जितक्या महत्त्वाची, तितकीच 'सेन्सॉरशिप हटाओ' ही घोषणा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण कलाकाराचे आविष्कारस्वातंत्र्य ही एक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे. माणसाच्या पोटाची भूक तुम्ही जितक्या महत्त्वाची मानता तितक्याच, किंबहुना त्याहून जास्तच मी सांस्कृतिक भूक मानतो. आणि ती भागविण्याकरिता ‘सेन्सॉरशिप हटाओ’ ही घोषणा मी देतो.

काही लोक असे म्हणतात की, तेंडुलकर वगैरे नाटककारांच्या बाबतीत फारसा प्रश्न नाही. पण इतरांचे काय? पण ही भीती फोल आहे. सखाराम बाईंडरसारखं नाटक लिहिणं म्हणजे पोरखेळ नव्हे. यासारखं नाटक लिहायला एखादा तेंडुलकर जन्माला यावा लागतो व तोही ते नाटक रोज लिहू शकत नाही. पंधरा-वीस वर्षांत एकदा तो हे लिहू शकतो! ‘सखाराम बाईडर’ सारखी नाटके गल्लीगल्लीत निर्माण होऊ लागली तर मराठी रंगभूमीला फार चांगले दिवस आले असेच म्हणायला हवे. पण ही ताकदीची नाटके वगळली आणि अश्लील, बीभत्स व ओंगळ अशी नाटके भरपूर निर्माण झाली तरी काय बिघडले? समाजातील काही व्यक्तीची अशी वृत्ती असतेच, अश्लील, बीभत्स बाजारात चालतंय, मग तसंच लिहा. आणखी भडक लिहा; असे काही लेखक करतीलही. त्यांचा हा उद्योग काही दिवस चालेल देखील चांगला चालेल! पण किती दिवस? सुरुवातीला जे कौतुक आहे. ते फार काळ टिकणार नाही. एक उदाहरण स्कॅंडेनेव्हियन देशांमधील आहे. त्यांनी पोर्नोग्राफिक साहित्यावरील सर्व बंधने काढून टाकली. लगेच सर्वच्या सर्व पुस्तकांची दुकाने त्या साहित्याने खचाखच भरून गेली. आठवडा दोन आठवडे लोकांना कुतूहल होते. नंतर गर्दी ओसरू लागली.

खाजगी नाट्यप्रयोग

या साऱ्या व्यावहारिक उपायांचा विचार करत असता माझ्या डोक्यात आणखी एक कल्पना येते. माझा सेन्सॉरशिपवरती विश्वास नाही. तो मी कसा व्यक्त करू शकेन? मी जे नाटक करेन, ते मी सेन्सॉर बोर्डाला सादरच करणार नाही. म्हणजे मग काय होईल? मला तुरुंगात जावे लागेल. तर त्याच्याकरता मी सत्याग्रह करू शकेन. हा मार्ग अंतिम विजयाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे; पण लगेच फलदायी हा उपायच नव्हे. मग काय? 

तर कायद्यानेच आम्हाला काही पळवाटा दिल्या आहेत. त्यांचा उपयोग करून, हा सारा कायदा पोखरून काढणे शक्य आहे. अभिरुची तर्फे सखाराम बाईंडरचा प्रयोग करण्यास कोर्टाने परवानगी दिली. याचा अर्थ नाटकाचा प्रयोग जर खाजगी असेल तर सेन्सॉर बोर्डाची आडकाठी होऊ शकत नाही. मग अशी एक संस्थाच का काढू नये, की जी केवळ तात्त्विक विरोध म्हणून आपल्या कुठल्याही नाटकाचे स्क्रिप्ट सेन्सॉर बोर्डाला सादर करणार नाही? म्हणजे मग पास-नापासाचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडे अत्यंत सोज्वळ, घरंदाज कौटुंबिक वगैरे वगैरे नाटक आहे. पण तत्त्व म्हणून मी ते सेन्सॉर बोर्डाला सादर करणार नाही. यामुळे एका नाटकाचे फार तर दहा-पंधराच प्रयोग होतील. पण तरी हरकत नाही. अर्थात ही संस्था काही या प्रश्नाचे अंतिम उत्तर नव्हे; परंतु लोकमत जागृत करण्याच्या दृष्टीने हा एक चांगला उपाय ठरेल! 

याचवेळी लोकसभेत खासदारांनी पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, या मुद्यावर विचार तरी केला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न सखोल समजून घ्यायला हवा; आणि जर त्यांना हे पटलं, तर त्यांनी आपलं म्हणणं लोकसभेपुढे मांडलं पाहिजे. हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरून सोडवला गेला पाहिजे. त्यांनी लोकसभेत ठराव सादर केले पाहिजेत की, आमच्या सर्जनशील कलावंतांना ही सेन्सॉरशिप जाचक होते आहे. तेव्हा ती रद्द झाली पाहिजे. सत्ताधारी पक्षाने वा इतर राजकीय पक्षांनी या ठरावाच्या वेळी पक्षशिस्त मध्ये आणू नये. सारे राजकीय विचार एवढ्या बिलापुरते बाजूस ठेवावे व आपापल्या खासदारांना मतस्वातंत्र्य द्यावे. सत्ताधारी पक्षाने स्वतःच असा ठराव मांडला तर मग फारच आनंद, परंतु त्याच्या पक्षाच्या ध्येयधोरणात असा ठराव बसत नसेल तर निदान दुसऱ्या कोणी मांडलेल्या या अशा ठरावाच्या वेळी सभासदांना पूर्ण मतस्वातंत्र्य द्यावे. कदाचित ठराव कोलमडेल, नापास होईल. हरकत नाही, आम्ही त्याचाही स्वीकार करू.

बुद्धिवादयांना आवाहन

या प्रकरणी महाराष्ट्राची जबाबदारी जास्त आहे, कारण महाराष्ट्रास याची खरी झळ लागलेली आहे. म्हणूनच सारा पुढाकार महाराष्ट्राने घ्यावयास हवा! महाराष्ट्रात जे बुद्धिवादी आहेत, लेखक आहेत. कलावंत आहेत, किंवा मी तरी असं म्हणेन की, ज्या ज्या महाराष्ट्रीयनाला ‘संस्कृती’ या शब्दाबद्दल आदर आहे, जो जो स्वतःला सुसंस्कृत समजतो, त्या प्रत्येकाने याबद्दल चिंता केली पाहिजे. 

या बुद्धिवाद्यांनी काही तरी एक नकी करावे. आपल्याला न झेपणारी मते त्यांनी बदलून दाखवता उपयोगी नाही. त्यांना जो पक्ष आवडेल, जे तत्त्व आवडेल त्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी झटायला हवं. त्यांना जर सेन्सॉरशिप हवी असेल तर त्यांनी ते ठासून सांगावं, त्यामुळे आम्हाला तरी आमचं कोण आहे. त्याचा पत्ता लागेल. उक्ती आणि कृती यांचा संवाद हवा; विसंवाद नको. म्हणूनच माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी आपले कातडीबचावू धोरण टाकून द्यावे. आमची मते पटत असतील त्या सर्वांनी एक होऊन कलावंतांच्या आविष्कारस्वातंत्र्यासाठी झगडायला तयार व्हावं. 
 

Tags: नाटक. थिएटर रंगायन नाट्यप्रयोग सेन्सॉरबोर्ड गिधाडे दूबे naatak श्रीराम लागू theatre rangayan natyaprayog sensor board gidhade dube shriram lagoo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके