डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रविशंकरांना भारतरत्न मिळाल्यानंतर पंडित जसराज यांनी वर्तमानपत्रांतून जाहीर टीकेचे प्रदर्शन केले. त्या दिवशी भीमसेनजी मला म्हणाले, 'अरे, आत्ता कुठे कलावंतांना मानसन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागला आहे. पूर्वसूरींनी आंब्याचे झाड लावले, आज आपण त्याची फळे चाखतो आहोत. इतरांना मिळालेल्या सन्मानामुळे आपल्याला आनंद झाला नाही, तर आपण कलावंत कसले? अशा पोटदुखीवर अजून औषध सापडलेले नाही!

1947 साली माझी आणि भीमसेन यांची पहिली भेट झाली, त्यावेळी मी दयानंद कॉलेजात बी.ए. च्या वर्गात शिकत होतो. कन्नड महाकवी डॉ. द. रा. बेंद्रे हे कानडीचे प्रोफेसर म्हणून दयानंद कॉलेजात नोकरीस होते. माझा व त्यांचा फारच घरोबा होता. ते आमचे सांस्कृतिक गुरू होते. त्यांनी मला बोलावून 'भीमसेन जोशी इथे आला आहे. त्याचे एक गाणे कर,' असे सांगितले. भीमसेन जोशींचे वडील गुरुराज जोशी हे कविवर्य बेंद्रे यांचे घनिष्ट मित्र होते. गुरुराज जोशी हे संस्कृतचे महापंडित होते. गदगजवळच्या एका गावात, शिरहट्टीत, ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते. भीमसेन हा त्यांचा पहिला मुलगा. भीमसेनने पुष्कळ शिकावे आणि विद्वान व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गाणे शिकणे त्या काळी म्हणजे 1920-30-40 साली तवायफी मानले जात होते. आपल्या मुलाने अगर मुलीने गाणे शिकू नये, असा मध्यमवर्गीयांचा दंडक होता. गवई पुष्कळ होते. पण त्यांचे कार्यक्रम फार क्वचितप्रसंगी होत. मोठमोठ्या गवयांचे वर्षाला आठ-दहा कार्यक्रम झाले तरी पुष्कळच वाटायचे. त्या गवयांची बिदागीही अल्पस्वल्पच होती. अब्दुल करीमखाँ, रामभाऊ कुंदगोळकर, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, गंगूबाई हनगल, मल्लिकार्जुन मन्सूर अशा थोर गवयांनाही शंभर दोनशे रुपयां-पलीकडे बिदागी मिळत नसे. अशा काळात गुरुराज जोशींच्या या पहिल्या मुलाने गाणे शिकायचा हट्ट धरला. भीमसेनच्या घरात त्याचे आई-वडील व त्याचे दोन काका यांनी कडाडून विरोध केला. त्या वेळच्या लहानग्या भीमसेनला आपल्याला गाणे शिकणे इथे जमणार नाही, हे कळून चुकले. एके दिवशी, वयाच्या तेराव्या वर्षी त्याने घर सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. हाती पैसा नाही कुणाची ओळख नाही; कानडीशिवाय जुजबी मराठी, एवढ्याच भाषा बोलता येत. पण त्या काळीही भीमसेन 'निश्चयाचा महामेरू' होता. तिकिटाशिवाय गाडीत बसायचे, मिळेल ते खायचे, तिकिट कलेक्टरने गाडीतून उतरविले की, पुढच्या गाडीत बसून प्रवास करायचा. अत्यंत हालअपेष्टा सोशीत त्यांनी लखनौ गाठले. थोडेसे गाणे येतच होते. त्यात काही भजनांची भर टाकली. सूरदास, तुलसीदास, कबीर यांची भजने ऐकवून कशीतरी पोटाची खळगी भरत गाणे शिकण्यासाठी गुरूचा शोध चालला होता. लखनौला रेडिओत एक छोटीशी नोकरी मिळाली. त्या पगारात थोडेफार भागू लागले. त्यावेळचा एक प्रसंग सांगण्याजोगा आहे. तो प्रसंग असा :

अख्तरी फैजाबादी (बेगम अख्तर) लखनौ रेडिओवर गायला आल्या. त्यावेळी भारतभर त्यांचा नावलौकिक होता. त्यांची राहणीही फार रुबाबदार असे. त्या काळी त्या पॅंट-बुशकोटही घालत होत्या. त्यांची आणि भीमसेनजींची गाठ आकाशवाणी लखनौ केंद्रावर पडली. भीमसेन म्हणाले, 'मला गाणे शिकायचेय. अख्तरबाई म्हणाल्या, 'तुझा आवाज फार चांगला आहे. एके दिवशी तू मोठा गवई होशील. इंदूरला माझे गुरू वहिदखाँसाहेब राहतात. त्यांना विचारू या.' हे बोलणे इथेच थांबले. ग्वाल्हेर, इंदूर, दिल्ली इथे काही विद्या मिळते का म्हणून भीमसेनजींनी अपार प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नांतून एक दिवस असा उजाडला की, पं. विनायकबुवा पटवर्धन यांची गाठ त्यांच्या गाण्याच्या निमित्ताने पडली. भीमसेनजींनी आपली व्यथा त्यांना सांगितली. विनायकबुवा म्हणाले, 'अरे, तुझ्या गावाजवळच कुंदगोळला सवाई गंधर्व- रामभाऊ कुंदगोळकर राहतात. त्यांच्याकडे तू का जात नाहीस? वाटल्यास मीही त्यांना सांगतो.' या भेटीमुळे भीमसेनजीच्या आयुष्याचा सांधाच बदलला. भीमसेनजी परत आले. तोपर्यंत घरच्या लोकांचा रागही निवळला होता. एका शुभदिनी भीमसेनना घेऊन त्यांचे कुटुंबीय कुंदगोळला गेले आणि भीमसेनजींना त्यांनी सवाई गंधर्वांच्या स्वाधीन केले.

रामभाऊ कुंदगोळकरांच्या घरी भीमसेनजी राहिले; ते त्या घरातीलच एक होऊन गेले. सवाई गंधर्वांचे शिष्य गंगूबाई हनगल, बसवराज, फिरोज दस्तूर यांनी गायनाच्या क्षेत्रात चांगले नाव मिळविले होते. तेथे रामभाऊंच्या घरी भीमसेनजींना उत्तम तालीम मिळाली. वर्षभर रामभाऊ एकच राग शिकवीत होते. भीमसेनजींना वाटे की, आपल्याला हे आणखी राग का शिकवीत नाहीत? रामभाऊ त्यांना सांगत, 'एक राग संपूर्ण आला ना, की मग इतर राग त्याच्या पाठोपाठ यायला लागतात.’ या काळात भीमसेननी आपल्या गुरूची पुष्कळ सेवा केली. मोठमोठ्या घागरी भरून लांबून पाणी आणून भरले. घरची सर्व कामे मनापासून केली. रामभाऊंचा पत्रव्यवहारही भीमसेनजीच बघत. कुंदगोळला भीमसेनजींना रियाझ करण्यासाठी पुष्कळ वेळ मिळे. या सात आठ वर्षांच्या काळात रामभाऊंनी भीमसेनजींना पक्के घडविले. आवाजाचा लगाव, गमक, बिलंपतगायकीचा प्रचंड आवाका, किराणा घराण्याच्या तानप्रक्रिया, किराणा घराण्याचे विशिष्ट राग अनेक चीजांच्याबरोबर भीमसेनजींच्या गळ्यावर इतके उत्तम चढले की, हा कसोटीचा काळ त्यांच्या पुढच्या आयुष्यातील प्रचंड यशाचा पाया ठरला. आजही भीमसेनजी या काळाचा कृतज्ञतेने उल्लेख करतात. हळूहळू भीमसेनजींनी कानडी भजने आणि भावगीते म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या मैफली होऊ लागल्या. पुरंदरदासांच्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाल्या. 'दय माडो रंगा', 'भाग्यद लक्ष्मी बारम्मा', 'हंग माको रंगा' ही भजने आणि महाकवी बेंद्रे यांचे 'उत्तर ध्रुवकु दक्षिण ध्रुवकु' या भावगीताने गायक म्हणून भीमसेनजींना प्रतिष्ठा मिळाली. भारतीय संगीताच्या वटवृक्षाची ही झाली आरंभीची कहाणी. 

1947 सालची गोष्ट. भीमसेनजींची माझी पहिली भेट झाली तेव्हाची. त्यावेळी मी दयानंद कॉलेजात होतो. डॉ.द. रा. बेंद्रे यांचा माझ्यावर अनुग्रह होता. भीमसेनजी एक तंबोरा घेऊन 'माझे गाणे करा' असे सांगत आले. आमच्या कॉलेजात एक मोडकेतोडके म्युझिक सर्कल होते. त्यात आम्ही मुलांनी त्यांचे गाणे केले. गाण्याला 40-50 विद्यार्थी आले. पहिला यमनच तासभर चालला. नंतर 'चंद्रिका ही जणू', मालकंस, भैरवी अशी मांडणी होती. सुमारे चार तास मैफल चालली होती. गाणे सुभग होते; पण दर्शन अक्राळविक्राळ होते. जोरकसपणा प्राधान्याने जाणवत होता. अंगविक्षेप आणि मुद्राभिनय ऐकणाऱ्यांना आवडणारा नव्हता. ऐकण्यासारखे असलेले गाणे पाहणे फार कष्टाचे होई. या मैफलीची बिदागी म्हणून आम्ही त्यांना पंचवीस रुपये दिले. आजही मला हे आठवून खजिल झाल्यासारखे होते. एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे भीमसेनजींची मैत्री मला कायमची लाभली. योगायोगाने मी शिक्षकाची नोकरी करण्यासाठी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, नानावाडा, येथे दाखल झालो. नेमक्या याच वेळी भीमसेन जोशी 'जुगार' या मुक्ताबाई दीक्षित यांच्या नाटकात काम करण्यासाठी पुण्याला आले. भीमसेनजींना या काळात नाटकांत काम करण्याची खूपच हौस होती. कर्नाटकात त्यांनी अनेक नाटकांत कामे केली. त्यांतील एक नाटक त्यांनी पुण्यात भानुविलास थिएटरमध्ये केले. या नाटकात भीमसेनच्या दुसऱ्या पत्नी सौ. वत्सलाबाई यांनीही काम केले होते. त्यांना कानडी येत नसल्याने त्यांच्याकडून त्यांनी काम करवून घेतले ही विशेष आश्चर्याची गोष्ट आहे. या नाटकाला मी उपस्थित होतो. पुण्याला भीमसेनजी आले. त्यांनी एक खोली घेऊन पुण्यातच मुक्काम केला. ही खोली जिमखान्यावर संभाजी उद्यानासमोरच्या गल्लीत प्रा. रा. श्री. जोगांच्या घराशेजारी होती. आम्ही दोघे त्या काळी नेहमी एकत्रच हिंडत असू. सायकलवर भटकणे, मिसळपाव खाणे, एवढाच आनंद आम्ही घेऊ शकू अशी आर्थिक परिस्थिती होती. टिळक रोडवरच्या बादशाही बोर्डिंगमध्ये आम्ही दोघे जेवत असू. या काळात भीमसेनजींनी प्रचंड रियाझ केला. पहाटे चारपासून सकाळी दहापर्यंत, अकरापर्यंत हा रियाझ अखंड चालू असे. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जायला आणि परत पहिल्या स्वरावर यायला कसून मेहनत घेऊन शुद्ध सुरांचा आनंद त्या काळी मी पुष्कळच घेतला. पुण्यातला या खोलीतला रियाझ हा भीमशक्तीचा एक अनोखा अनुभव होता. याच खोलीत पुढे वत्सलाबाई भीमसेनजींच्याकडे गाणे शिकायला यायला लागल्या. वर्ष दोन वर्ष ही शिकवणी चालू होती. त्यातूनच पुढे त्यांचा नागपूरला विवाह झाला. या काळातच पं. भीमसेनजींचे गाणे मी पु.ल.देशपांडे यांच्या घरी (डेक्कन जिमखान्यावरले) घडवून आणले. या मैफलीला पुलं.च्या घरी गप्पा मारण्यासाठी रोजच्या बैठकीत असणारे मधुकर गोळवलकर, मधुकर ठाणेदार, वसंतराव देशपांडे, राम गवाले, मधुकर तिजगावकर, राम पुजारी, पु.ल. व सुनीता देशपांडे ही मंडळी तर होतीच; पण शाहू मोडक, कविवर्य बेंद्रे, विठ्ठलराव दीक्षित, इत्यादी काही बुजुर्ग मंडळीही हजर होती. मधुकर ठाणेदार तबल्यावर होते. तर वसंतराव देशपांडे हार्मोनियमवर होते. तसे म्हटले तर हे पंडितजींचे पहिले जाहीर, दर्जेदार, गायन. सुमारे सहा तास ही मैफल चालली. या मैफलीत पूर्वांगाला यमनने आणि नंतर 'चंद्रिका ही जणू' या गाण्याने रसिकांना आनंदवनात नेले. इतकी सुंदर आलापी इतक्या संथ लयीत क्वचितच ऐकावयास मिळे. मैफल रंगत चालली.

मध्यंतरानंतर पंडितजींनी मियामल्हार सुरू केला. या मियामल्हाराचे वर्णन करायला आजही माझ्याजवळ शब्द नाहीत. सुमारे सव्वा तास मियामल्हारची बढत चालली होती. 'करीम नाम तेरो’ ने सर्व वातावरण चिंब भिजून गेलेले होते. या गाण्याला दाद द्यावी म्हणून की काय, बाहेर निसर्गाने पावसाचे भीषण तांडव उभे केले. 'घुमड़ घुमडकर बदरिया' थैमान घालत होती. बिजली कडाडत होती आणि त्याच वेळी भीमसेन द्रुतलयीत शिरून मल्हाराचे विराट दर्शन घडवीत होते. ही जुगलबंदी ज्यांनी ऐकली ते धन्य! 'बाबुल मोरा'ने मैफल संपली. तंबोरे थांबले. तरी सारे चुपचाप. विलक्षण सन्नाटा आलेला. वाहव्वा, म्हणायचाही धीर होईना. आतल्या आत सुखाची कारंजी झेलत आम्ही सर्व सूरसंगत रागविद्येत पार बुडून गेलो होतो. या मैफलीने उद्याच्या एका मोठ्या गायकाची ओळख पुणेकरांना झाली. एक सुरांचा बादशहा शास्त्रीय संगीताच्या रंगभूमीवर अवतीर्ण झाला. 

भीमण्णांची गाणी हळूहळू पुण्यात आणि पुण्याबाहेर व्हायला लागली. गाण्याचे साथीदारही ठरले होते. बिदागीत फार मोठी वाढ झाली, अशातला भाग नाही, पण संसार करण्याजोगे मानधन मिळू लागले. या काळातल्या मैफलीत भीमसेनजींच्या गाण्याचा एक पॅटर्न होता. आरंभी यमन, शुद्ध कल्याण, यमन कल्याण, पूरिया, यांपैकी एक राग; एक ठुमरी; एक नाट्यगी असा पूर्वरंग. तर मालकंस, दरबारी कानडा, मिया मल्हार, बिहाग, बागेश्री यांपैकी एखादा राग, सुहाकानडासारखा एखादा छोटासा राग आणि भैरवी असा थाट असे. पाचसहा तास मैफल ही चालायचीच. सकाळच्या रागांत तोडी, तोडीचे प्रकार, ललत, अहीरभैरव, कोमल ऋषभ आसावरी, हे राग गळ्यावर उत्तम चढलेले. शुद्ध सारंग, गौडसारंग, देशी हेही यायचे. संध्याकाळी भीमपलासवर फार भर असे. मुलतानी, पटदीप, मारवा, पूर्वा कल्याण, यांचाही अभ्यास चांगला होता, ठुमर्या थोड्याच गात. 'पानी भरे ली', 'पिया तो मानत नाही’, आणि भैरवीतील एकदोन ठुमर्या एवढ्याच गायच्या. नाट्यसंगीतात खूप विविधता होती. 'चंद्रिका ही जणू', 'रामरंगी रंगले', 'मजला घरावी ही सेवा', दे हाता शरणागता' ….वास्तविक 'अभंगवाणी'च्या अपूर्व यशानंतर 'रंगवाणी' या नावाचा कार्यक्रम म्हणजे नाट्यसंगीताचा कार्यक्रम त्यांना मोठ्या प्रमाणावर करावयाचा होता. अलीकडे त्याचा एकच प्रयोग झाला. ही 'रंगवाणी' गायची राहूनच गेली. महाराष्ट्रभर गाणी होता होता एक दिवस 1954 मध्ये पंडितजींना कलकत्त्याच्या संगीत संमेलनाचे बोलावणे आले. त्या गाण्याला जाताना भीमसेनजींनी विलक्षण तयारी केली होती. आत्मविश्वास मोठा होता. ते कलकत्त्याला गेले आणि तेथील संगीत संमेलनात दरबारी कानडा, दीड तास रंगतदारपणाने मांडला. 'पानी भरेली' ही ठुमरी म्हणून अण्णांनी ती मैफल संपविली.


आकाशवाणीवर रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही पुण्यात बसून ही मैफल ऐकली. शागीरुद्दिन सारंगीला, करामतुल्ला तबल्याच्या साथीला होते. या एका गाण्याने पं. भीमसेन जोशी एका रात्रीत भारताचे मोठे गवई झाले. कलकत्त्याची सारखी निमंत्रणे मग येऊ लागली. पाटणा, दिल्ली, भोपाळ, जालंदर, इंदौर, हैद्राबाद, बेंगलोर या मोठमोठ्या गावांतून भीमसेन जोशींच्या मैफली झडू लागल्या. सुखाचे दिवस येऊ लागले. टिळक रोडच्या बादशाही बोर्डिंगच्या बोळात किर्लोस्करांच्या बंगल्यात दोन खोल्यांत मग भीमसेनजींनी आपला संसार थाटला. 'आम्हांला गाणं शिकवा' असे सांगत शिष्यमंडळी आली, तरी भीमसेनना शिकवायला वेळ नव्हता. सारखे दौरे चालूच असत. महाराष्ट्र सोडून भीमसेन जेव्हा बाहेर जाऊ लागले तेव्हा त्यांच्या गाण्याचे स्वरूप हळूहळू बदलू लागले. समकालीन मोठ्या गायकांची गाणी त्यांनी जवळून ऐकली. त्यांचा कसून अभ्यास केला. आपल्या गाण्यातील उणीवा काय आहेत, याचाही विचार त्यांनी जाणीवपूर्वक केला. अनेक वेगवेगळ्या साथीदारांबरोबर गायल्यामुळे गाणे कसे मांडावे, हे विचारचक्र सुरू झाले. हिंदुस्थानातल्या सर्व नामवंत तबलियांबरोबर त्यांना गायला मिळाले. करामतुल्ला, तिरखवाँ, शेख दाऊद, इबिबुद्दिन, कंठे महाराज, किशन महाराज, अनोखेलाल, सामता प्रसाद इत्यादी अनेक नामवंत तबलियांनी पंडितजींना अनेक वेळा साथ केली आहे. किराणा घराण्यात तालाशी झुंज देणे ही गोष्ट अपरिचितच. चांगला ठेका एवढेच किराणावाले मागत. पुष्कळ वेळा सम ही अध्येमध्ये सोडलेली. पण भीमण्णांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून आपले गाणे बदलले. अनेक मोठ्या गायकांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या गाण्यात सामावून घेतल्या. त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे की, 'चांगला कलावंत हा चांगला चोर असला पाहिजे.’ आपल्याला काय योग्य आहे, याचा विचार करून आपल्या गाण्यात त्या गोष्टी सामावून घेतल्या पाहिजेत; आणि गाण्याला मोठं केले पाहिजे.’ हे भान किती कलावंतांच्या ठिकाणी आहे? अमीरखाँ साहेबांचे गाणे ऐकून त्यातला काही भाग आपल्या गाण्यात कसा बसविता येईल. त्यातळी आलापी आपल्या आवाजाला योग्य आहे काय, याचा विचार करून योग्य त्या गोष्टींचा समावेश त्यांनी आपल्या गाण्यात केला. त्यांनी आपले गाणे मध्यम लयीत आणले. बारीक-सारीक रागांतल्या छटा आपल्या स्वरांमध्ये गुंफून टाकल्या. हे जसे त्यांनी अमीरखाँच्या गाण्यातून घेतले, तसे बडे गुलामअली खाँ यांचे गाणे लोकप्रिय असूनही त्यातील काहीही भाग त्यांनी आपल्या गाण्यात घेतला नाही. गुलाम अली खाँच्या गाण्यातील मुरक्या आणि स्वरमेळ विलक्षण ताकदीचा होता. पण भीमसेन यांनी हे आपल्या कामाचे नाही, असा विचार केला. याच काळात अंगविक्षेप आणि मुद्राभिनय यांतील आपल्या गुरूचे प्रतिरोपण त्यांनी बाजूला सारले. या सर्व गोष्टींमुळे भीमसेनजी हे जरी किराणा घराण्याचे मूर्धन्य गायक असले तरी ते आज छापाचे गणपती राहिले नाहीत- गुरूकडून विद्या घेणे आणि गुरूसारखे गाणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. पुष्कळ शिष्यांना ही गोष्ट कळत नाही. कळेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. मधल्या काही काळात भीमसेनजींनी जयपूर घराण्याचे राग गाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थोडासा उसनवारीचा होता. जयपुरी लयकारी करायचीही कोशिश त्यांनी काही काळ केली. एके दिवशी त्यांना 'इदं न मम' हा साक्षात्कार झाला. आणि मग पुन्हा ते आपल्या गाण्यातच रंगून गेले. हा शुभशकुनच होता.

एक नामवंत गायक म्हणून मान्यता पावत असतानाच दोन मोठी संकटे त्यांच्यासमोर उभी राहिली. एक म्हणजे त्यांनी एक सेकंडहँड फोर्ड मोटार विकत घेतली. गाडीसाठी ड्रायव्हर ठेवला. गाडीवर मेणकापडाचे आच्छादन होते. एकदा बेळगावचा कार्यक्रम करून पुण्याला परत जात असताना साताऱ्याजवळ ही गाडी पन्नास फूट खोल खड्डयात घरंगळत पडली. वरती चाके करून ती स्थिरावली. तंबोऱ्याचा चक्काचूर झाला. बरोबरच्या एक-दोघांना जखमा झाल्या. पण पं. भीमसेन जोशी काहीही न होता त्या गाडीतून बाहेर पडले. हे जिवावरचे एक संकटच येऊन गेले. मी पुण्याला त्यांना भेटायला गेलो आणि म्हणालो, ‘भीमण्णा, हे मोटार प्रकरण कशासाठी?' त्यावर ते म्हणाले, 'गाडीचा काय दोष आहे? यापुढे मी ड्रायव्हर ठेवणार नाही.’ खरेच तसे झाले. पंडितजींनी पुढील तीस वर्षांत सर्व देशभर प्रवास केला आणि मोटार स्वतःच चालविली. मी त्या मोटारीतून कलकत्त्यापासून मद्रासपर्यंत आणि दिल्लीपासून बेंगलोर-मेंगलोरपर्यंत पुष्कळदा प्रवास केला. बडोद्याच्या राजेसाहेबांची एक पॅकार्ड नावाची गाडी भीमण्णांनी विकत घेतली. प्रचंड मोठी मोटार होती ती. एकदा आम्ही मेंगलोरला जायला निघालो, कराडजवळ गाडी बंद पडली. प्रचंड पाऊस पडत होता. शेवटी ओगलेवाडीला व्यंकटराव ओगलेंच्याकडे कसेबसे जाऊन पोहोचलो. दुसऱ्या दिवशी गाडी दुरुस्त झाली आणि आम्ही मेंगलोरला जाऊन पोहोचलो. त्यावेळी शिमोगा कारकलवरून अधुंबीच्या घाटातून मेंगलोरला जावे लागे. हा अवघड घाट त्यांनी कौशल्याने पार केला. त्या प्रवासात दोन अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली. एक गाणे लक्ष्मीनृसिंह मंदिरात झाले. आप्पा जळगावकर पेटीला आणि गुलाम रसूल तबला साथीला नेहमीच असत. त्या मंदिरात मुसलमान तबलजीला प्रवेश नव्हता. पण भीमण्णांनी सफाईने त्याला घोतर नेसायला लावून साथीला नेले. शुद्ध कल्याण व मालकंस हे दोन राग त्यांनी विलक्षण ताकदीने मांडले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका महाविद्यालयात मैफल झाली. त्यांनी तिथे ऐकविलेला मुलतानी मी आयुष्यभरात विसरू शकणार नाही.

एकदा आम्ही 1960 साली जबलपूरकडे मोटारीने गेलो. सोलापूरला मला घेऊन अप्पा व गुलाम रसूल यांच्यासह जालना, बुलढाणा करीत अमरावतीला डॉ. मदन गोपाळ यांच्याकडे मुक्काम केला. भीमसेनजींवर त्यांचे विलक्षण प्रेम. पुढचा मुक्काम नागपूरला होता. श्रीमंत बाबूराव देशमुख यांच्या इतवारीतील महाप्रचंड घरात एक दिवस थांबलो होतो. श्रीमंतीचे इतके वेगळे दर्शन कधीच घडले नव्हते. चांदीचे पाट, सोन्याची ताट-वाटी, समया असा घाट होता. एकाच वेळी चार-चार पक्कान्ने केलेली होती. जेवणापूर्वी भीमसेननी मला कानमंत्र दिला होता. 'अर्ध पोट भरल्यावर पुरे म्हण. नाही तर मोठी पंचाईत होईल.' बाबूराव देशमुख हे सवाई गंधर्वांचे धनिष्ठ मित्र होते. पुढे गांधर्व महाविद्यालयात श्री. एस. बी. देशपांडे यांनी ठरविलेल्या जबलपूरच्या कार्यक्रमाला गेलो. आमची उतरण्याची व्यवस्था डॉ. हर्षे यांच्या बंगल्यात केली होती. डॉ. हर्षे यांची पत्नी ही गंगूबाई हनगलांची शिष्या होती. त्यामुळे स्वागत फार आपुलकीने केले गेले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात तशी आम्हा बाकीच्यांचीही यात्रा आनंदाची झाली. रात्री 9 वाजता भीमसेनजी तयार होऊन हॉलमध्ये आले. साडेनऊ वाजता गाणे होते. श्री. देशपांडे, भीमण्णांना म्हणाले, 'आपण दहा वाजेपर्यंत थांबू. रसिकांना यायला इथे थोडा वेळ द्यावा लागतो.’ त्यावर भीमसेन म्हणाले, 'बिदागीची रक्कम जमली आहे ना! गाणे ऐकायला मी सोलापूरहून मनुष्य घेऊन आलो आहे.’ रात्री दहापासून पहाटे चारपर्यंत गाणे झाले. त्यांच्या गाण्याला एक विलक्षण आक्रमकता आली होती. ताना, बोलताना त्यांचे विलक्षण दर्शन घडू लागले होते. चीजेच्या मांडणीतही आणि विस्तारातही एक अनोखे लाडलेपण आले होते. दरवेळेस एका नव्या वळणावर राजसपणे ते आपले गाणे मांडू लागले. चीजांच्या ठेवणीतही बदल करून नव्या सौंदर्याची खोज ते या काळात करू लागले. 'पग लागन दे' या मालकंसमधल्या चीजेची ठेवण याच काळात त्यांनी बदलून आकर्षकपणे गझलच्या स्वरावर आणून ठेवली. 

रात्रीच्या प्रवासात आमच्या खूप गप्पा चालत. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. अनेक गायकांच्या लकबी आणि त्यांच्या खासियती यावर भरपूर बोलणे होई. अशाच एका संभाषणात त्यांनी माझी विकेट घेतली. या काळात त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. त्या लोकप्रियही झाल्या. शुद्ध कल्याण रागातील 'बतिया तोरा' अशी एक चीज त्यांनी छोट्या तबकडीवर गायिली आहे. मी बऱ्याच लोकांना विचारून 'बतिया तोरा' या चीजेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला- शेवटी मला एका मोठ्या गायकाने 'बतिया दौरावत दै’ अशी ती चीज असल्याचे सांगितले. मी मोठ्या उत्साहाने भीमण्णांना ही माहिती पुरवली. तेव्हा तो मला म्हणाला, 'हे बघ, तू आहेस मास्तर. शुद्धलेखन बघण्याशिवाय तुम्हांला उद्योग नाही. चीजेचे काय शब्द आहेत, ते मला काय करायचे आहेत? तुझ्या घरचा पत्ता दिलास तर तोही मी गाण्यात गाऊन दाखवीन.' यावर मी काय बोलणार?

मेंगलोरहून येताना हुबळीला आम्ही गंगूबाईंच्या घरी दोन दिवस थांबलो. त्यांचा पाहुणचार घेणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. यावेळचा एक प्रसंग सांगितला पाहिजे. तो प्रसंग असा; गंगूबाईचा मुलगा बाबू भीमसेनजींना म्हणाला, 'भीमण्णा, उद्या रात्री तुझं गाणं करू या. फार दिवसांत तुझं गाणं झालं नाही.' सात वर्षांत भीमसेनजींचे हुबळीला गाणे झाले नव्हते. त्यालाही एक कारण घडले होते. सात वर्षांपूर्वी झालेल्या मैफलीत मध्यंतरानंतर त्यांना एका रसिकाने 'वचन' म्हणण्यास सांगितले. 'वचन' म्हणजे कानडीतील शैवपंथीय भजन, बसवेश्वरांनी लिहिलेली वचने कर्नाटकातील बहुतेक गायक गात. वैष्णव पुरंदरदासाची पदे गात. शेव-वैष्णवांची तेढ कर्नाटकात पूर्वीपासूनच होती. भीमसेनने 'मला वचन म्हणता येत नाही' असे सांगितल्यावर प्रेक्षकांनी त्यांचे गाणे बंद पाडले. त्यानंतर ते हुबळीला गाणे गायिले नाहीत.

बाबूच्या म्हणण्याला गंगूबाईंनीही होकार भरला. मीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. दुसऱ्या दिवशी पंडितजींचे गाणे झाले. त्या गाण्याला हुबळी-धारवाडची प्रमुख कलावंत मंडळी आणि सवाई गंधर्वांच्या गायकीचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे गाणे अथपासून इतिपर्यंत रामभाऊ कुंदगोळकरांचे गाणे होते. गंगूबाई हनगल, कृष्णाबाई रामदुर्गकर या रामभाऊंच्या शिष्या गाणे ऐकायला समोरच बसल्या होत्या. या गाण्याचे वर्णन करणे माझ्या ताकदीच्या बाहेरचे आहे. आरंभीपासूनच आवाजाचा लगाव भीमसेननी असा काही लावला की, सर्वांना क्षणोक्षणी रामभाऊंची आठवण होऊ लागली. पुढे गमक करणे सुरू झाले. जीवाच्या आकांताने अण्णा गमक करत होते. खालचे स्वर पिंजून काढताना एक विलक्षण भीती मनात तरळून जाई. आलापीने असे काही रंग दाखविले की त्या स्वरांची बांधणी लयीच्या अंगाने समेवर वेगाने येऊन पोहोचत होती. भीमण्णाला साथ करताना अप्पा जळगावकरांनीही कमाल केली. एक जागा अप्पांनी सोडली नाही. गुलाम रसूल यांचा ठेका दमदारपणे मध्ये काहीही गडबड न करता बरोबरीने जात होता. पुढे पेचदार बोल-तानांची पखरण सुरू झाली. लयीला बांधलेल्या बोल-ताना सहजपणे समेवर येत होत्या. बिलंपत संपवून द्रुतात शिरताना तानांची बरसात सुरू झाली. त्या दिवशी केवळ रामभाऊंच्याच ताना दर्शन द्यायला आल्या होत्या. अभूतपूर्व शुद्धकल्याण झाला. 'रामरंगी रंगले' हे रामभाऊंचे पद त्याच शैलीत सादर करून त्यांनी मध्यंतर केले. मध्यंतरानंतर दरबारी कानडा सुरू झाला. त्याचाही विस्तार त्यांनी गुरुजींच्या गाण्याप्रमाणे डौलदारपणे केला. दरबारी कानडा हा पंडितजींचा विशेष प्रिय राग आहे. ते निर्वाणीचे अस्त्र आहे. या गाण्याच्या वेळी गंगूबाई आणि कृष्णाबाई या दोघींच्याही डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. एकीकडे गुरुजींची आठवण होत होती. आणि दुसरीकडे आपल्या गुरुबंधूंचे अपार कौतुक होते. गाणे संपल्यावर गंगूबाई मला म्हणाल्या, 'बघ, माझ्या भावाने मैफल कशी सुरेख मांडली.’ माझ्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय मैफल आहे.

भीमसेनजींवर दुसरे संकट आले ते हैद्राबादला. तेथे त्यांचे ठरलेले गाणे संपल्यावर गॅस्ट्रोच्या आजारपणाने त्यांना गाठले. पहिले दोन दिवस किरकोळ औषधे घेऊन त्यांनी दुखणे अंगावरच काढले. शेवटी त्यांना दवाखान्यात हलवावे लागले. दुखणे अत्यंत विकोपाला गेलेले. डॉ. नायडूंनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. शेवटी हा आजार इतका बळावला होता की, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. डॉ. नायडूंनी अपार कष्ट घेतले. रात्ररात्र ते दवाखान्यात बसून होते. त्यांनी अनेक प्रकारचे उपचार सुरू केले. हा काळ तर मोठा कठीण होता. हैद्राबादच्या कमलाबाई पोतदार, त्यांचे पती आणि कालिदास मोहोळकर या तिघांनी या काळात प्रचंड धावपळ करून आपली सेवा रुजू केली. या दुखण्यातून भीमसेनजी थोड्या उशिरानेच बाहेर पडले. पुन्हा पूर्वपदावर यायला त्यांना थोडा वेळ गेला. गाणे बंदच होते. पण विश्वास अमर्याद होता. त्यांच्या ठिकाणी असलेली जिद्द जगात फार थोड्या लोकांच्या ठिकाणी आहे. असे माझे स्पष्ट मत आहे. या आजारानंतर पुढे 27-26 वर्षे त्यांना साधा आजारही कधी आला नाही. पुन्हा मैफलींचा दणका सुरू झाला. गणेशोत्सवात दहा दहा गाणी केली. दिवसा मोटारचा प्रवास व रात्री गाणे हे नेहमीचेच होऊन गेले. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. तो असा, भीमसेनजींचे रायपूरला गाणे होते. पुण्याहून निघून मला सोलापुरातून घेऊन गाडी रायपूरकडे निघाली. तेथे जायला त्यावेळी जवळचा रस्ता नव्हता. बराच प्रवास करून रात्री आठ वाजता कसेबसे आम्ही रायपूरला जाऊन पोहोचलो. कार्यकर्ती मंडळी नेहमीप्रमाणे चिंतेतच होती. दिवसभराच्या ड्रायव्हिंगने भीमसेनही फार थकून केले होते. हातपाय, तोंड धुवून चहा पिऊन ते मला म्हणाले, 'मी थोडी झोप घेतो.' त्यांची झोप ही कुंभकर्णाच्या घराण्यातील आहे. साडेआठला झोपल्यावर ते लवकर उठेनात. अकरा वाजले. हॉल तुडुंब भरलेला. मला काय करावे, हे सुचेना. शेवटी मी बादलीभर पाणी त्यांच्या अंगा-तोंडावर ओतले आणि ते खडबडून जागे झाले. त्यांच्या आंघोळीनंतर साडेअकरा वाजता गाणे सुरू झाले. मोटारीतून हिडताहिंडता ते मध्येच म्हणत, 'गाडी बाजूला लावू या. आपण बाजूला झोपूया.' अक्षरश: दोन मिनिटांत ते गाढ झोपी जात. अशा प्रवासात पुष्कळदा धोकेही निर्माण झाले. एकदा गाडी घेऊन मोतिहारीहून येताना संध्याकाळी रायपूरजवळ आम्ही रस्ता चुकलो. पुढे सारे अरण्य लागले. माणसांची वर्दळ नाहीशी झाली. क्रूर श्वापदांचे आवाज येऊ लागले. आपण कुठे आहोत हे न कळता त्या अरण्यात एका अज्ञातस्थळी गाडी थांबली. पेट्रोल संपले होते. अन्न नाही, पाणी नाही, अशा अवस्थेत त्या रात्री आम्ही काचा वर करून गाडीत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा-अकराच्या सुमारास एक मोटारसायकलस्वार आला. त्याला आम्ही थांबविले. आमची कहाणी सांगितली. तो म्हणाला, 'येथून अकरा मैलावर एक गाव आहे. तेथे पेट्रोल मिळेल. गाडीवर बसा. पुन्हा मी आणून सोडतो.’ त्या भल्या माणसाने आमच्यावर फार मोठे उपकार केले. अण्णा त्याचे मागे बसून पेट्रोल कॅन भरून घेऊन आले. पेट्रोल भरून परतीच्या प्रवासाला निघालो. रायपूरपासून आम्ही ऐंशी मैल दूर होती. संकटसमयी बिलकुल न डगमगणाऱ्या माझ्या मित्राचे धैर्य खरोखरच अलौकिक आहे.

सवाई गंधर्व पुण्यतिथी आरंभी जेव्हा सुरू झाली, त्याची कथा सांगण्याजोगी आहे. ती अशी; आरंभी केवळ एक दिवस ही पुण्यतिथी साजरी होत होती. रामभाऊ कुंदगोळकरांचे निधन भाद्रपदात अविधवानवमीच्या दिवशी झाले. पहिल्या पाच वर्षात भाद्रपदाच्या अखेरच्या पर्वात शनिवारी अगर रविवारी पुण्यतिथी साजरी व्हायची. पहिली पाच वर्षे या उत्सवाला तिकीट नव्हते. भीमसेन आपले एक गाणे करीत. टिळक रोडवर राम एजन्सीत हे गाणे होई. तीन रुपयांची तिकिटे घेऊन आम्ही- मी व भीमसेन सायकलवर हिंडत तिकिटे विकत असू. नानावाड्याच्या शाळेत ते येत व आमची भ्रमंती होई. तीन रुपयांचे तिकीटही पुष्कळ पुणेकर नाक मुरडीत विकत घेत. पुष्कळजण नकारच देत. या गाण्यामधून चार पाचशे रुपये जमा व्हायचे. कोणत्याही गायक, वादकाला मानधन दिले जात नव्हतेच. हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, संगमेश्वर गुरव आदी मंडळी केव्हाही गायला बसत... आणि सेवा करीत. अलीकडच्या काळात निर्माण झालेली मोठेपणाची उतरंड त्यावेळी नव्हती. आपण आपली सेवा रुजू करावी असे अनेक कलावंतांना वाटे. हजार बाराशे रुपये एकूण खर्च होई. सवाई गंधर्वांचे जामात डॉ. नानासाहेब देशपांडे उरलेले पैसे घालत.

या पुण्यतिथीच्या तिसऱ्याच वर्षी पावसाने प्रचंड घुमाकूळ घातला. गाराही पडल्या. हॉलवर पत्रे असल्याने प्रचंड आवाज निर्माण होई. हॉलमध्ये उकाडा सहन न होण्याजोगा होता. श्रोत्यांना धड बाहेरही जाता येत नव्हते आणि आतही बसवत नव्हते. एकमागून एक गाणी कोसळत होती. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नव्हते. पहाटे चारच्या सुमारास पाऊस थांबला. मध्यंत्तर झाले. रसिक मंडळी ताजीतवानी झाली. मग भीमसेन जोशी व्यासपीठावर आले. ज्या वातावरणात पूर्वरात्री वाद्ये सुराला सोडून जात होती, त्या ठिकाणी भीमसेनजींनी तानपुरे सुरेख मिळविले. भरदार आवाजात ‘रैन का सपना' या ललतच्या ख्यालाला आवाहन सुरू केले. पहिल्या दहा मिनिटांतच मैफल काबूमध्ये आली. मग पुढच्या दीड तासात ललतच्या स्वरांनी सर्व वातावरण भारून गेले. पु. ल. देशपांडे, प्रल्हादबुवा जोशी, नानासाहेब देशपांडे, अशी जाणकार मंडळी आनंदाने दाद देऊ लागली. ललतला इतक्या वेगळ्या दृष्टीने पाहता येते. हे पुष्कळ जाणकारांना नवेच होते. सुमारे तासभर सुंदर आलापी त्यांनी केली. लयीचे दर्शन मोठ्या नाजूकपणे आणि कल्पकतेने त्यांनी घडविले. जिद्दीने भीमसेन प्रतिभेच्या अंगणावर लीलया विहार करीत होते. मैफल गच्च एकवटली होती. मग तानप्रक्रिया सुरू झाली. किराणा घराण्याच्या मुद्रेचे ते लोभसवाणे दर्शन होते. अब्दुल करीमखाँ, रामभाऊ कुंदगोळकर आणि थोडेफार सुरेश बाबू माने यांच्या गाण्याचे एकत्र गुंफलेले हे स्वरांचे धागे होते. 'भवदा यारदा जोबना’ ही द्रुत चीज सुरु झाली. मध्यलयीत सुरुवात करून हळूहळू लय वाढवीत या चीजेची खासियत रसिकांच्या समोर आत्मविश्वासपूर्वक अप्पांनी ठेवली. द्रुत लयीतले तानांचे सट्टे पूर्वरात्रीच्या पावसाची आठवण देऊन गेले. पावसाळ्यात सवाई गंधर्व पुण्यतिथी करू नये, हा धडा या प्रसंगातून आम्ही घ्यायला हवा होता. पण तो आम्ही घेतला नाही. पुढच्या पुण्यतिथीला जागा बदलली. मोतीबागेत दोन वर्षे पुण्यतिथी साजरी केली. पहिल्या वर्षी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला. यावेळी आकाशवाणीवर दोन तास थेट प्रक्षेपण सुरू होते. पुढेही ते होत राहिले. मोगुबाई कुर्डीकरांचे गाणे झाले ते एकदाच; आणि तेही मोतीबागेत. संगमेश्वर गुरव गात असताना पावसाने गायकासहित प्रेक्षकांवरही बरसात केली. संगमेश्वरचे गाणे वाद्यांवर पाऊस पडून अवेळी थांबवावे लागले. सवाई गंधर्व पुण्यतिथीबद्दल पुष्कळच लिहिता येण्याजोगे आहे. भीमसेनजींचे देशभर गाण्यासाठी जाणे ही गोष्ट या पुण्यतिथीला फारच उपकारक ठरली. त्यांच्या प्रेमासाठी थोर थोर गायक-वादक पुण्यात हजेरी लावू लागले. महोत्सवाला विराट स्वरूप प्राप्त झाले ते केवळ पंडित भीमसेन जोशी यांच्यामुळेच! आजही हा गोवर्धन उचलला जातो तो पंडितजींमुळेच!! बाकीचे आम्ही सर्व निमित्तमात्र आहोत. आज हिंदुस्थानात सवाई गंधर्व पुण्यतिथीला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पुष्कळ गायकांचे मोठेपण इथूनच उदयाला आले आहे. सवाई गंधर्व पुण्यतिथी ही महाराष्ट्राच्या संगीताची गौरवगाथा आहे.

या वाटचालीत भीमसेनना भारतात सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून सर्वमान्यता मिळाली. त्यांच्या गाण्याशिवाय भारतातील कुठलीही संगीतपरिषद पुरी होत नाही. मोतीहारीच्या संगीत संमेलनाला जातानाची एक विलक्षण गोष्ट सांगितली पाहिजे, ती अशी; मुंबईहून सूरश्री केसरबाई केरकर आणि पं. गजाननबुवा जोशी पहिल्या वर्गाच्या एका डब्यातून मोतीहारीच्या संगीत संमेलनात जात होते. मध्यरात्री पं. भीमसेन जोशी मोतीहारीला जाण्यासाठीच नागपूरला डब्यात चढले आणि झोपी गेले. सकाळ झाली. केसरबाई आपल्या जागेवर बसून गजाननबुवांना म्हणाल्या, 'अरे बुवा, चहाची व्यवस्था कर.' समोरच्या स्थानावर भीमसेनजीही उठून बसले. जुन्या फर्स्टक्लासच्या डब्यात चारच जागा असायच्या. केसरबाईंनी समोर बसलेल्या भीमसेनजींना विचारले, 'काय हो, नाव काय तुमचं? मराठी येतं का?" भीमसेनजी नम्रतेने म्हणाले, 'हो! माझं आडनाव जोशी. केसरबाई सहजपणे उद्गारल्या, 'आज डब्यात जोश्यांची गर्दी झालीय. आपण काय करता?' भीमसेनजी म्हणाले, 'थोडंफार गातो.’ केसरबाई आश्चर्यचकित झाल्या. 'कुणाकडे गाणे शिकलात?’ त्यांनी विचारले. भीमसेनजी म्हणाले, 'सवाई गंधर्वांकडून. माझं नाव भीमसेन जोशी.' हे ऐकताच केसरबाईंचा नूरच बदलला. त्यांनी त्यांना जवळ बसवून घेतले. म्हणाल्या, 'अरे, रामभाऊंचा आणि माझा खूप ऋणानुबंध होता. तू चांगला गातोस. असेच गाणे वाढव माझा तुला आशीर्वाद आहे. इतर गायकांच्यासारखे ओरडू नकोस.’ मोतीहारीला भीमसेनजी गव्हर्नर रंगराव दिवाकर यांच्याकडे उतरणार होते. पण केसरबाईंनी भीमण्णाला आपल्याबरोबर नेले. हा जयपुरी प्रसाद पुढच्या जीवनात भीमसेनजींना खूप उपयोगी पडला. जीवनाच्या प्रवाहात पुढच्या काळात अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. सरकारी, निमसरकारी आणि रसिकांनी दिलेल्या सन्मानाची दाद एवढी मोठी आहे की, त्याची मोजदाद करणे केवळ अशक्यच आहे. त्यांचे घर सन्मानचिन्हांनी भरून गेले आहे. राजमान्यतेपेक्षा लोकमान्यता अधिक महत्त्वाची आहे, असे भीमसेनजी नेहमीच मानत आले आहे. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. मैफलीत हिंदुस्थानात कुठेही भेटलेले रसिक ते सहजपणे ओळखतात. त्यांचे बोलणेही पुढच्या काळात दाद घेऊन जाऊ लागले. त्यांच्या स्पष्ट बोलण्याने अनेकांची तारांबळ उडाली. दिल्लीला राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी (आकाशवाणीच्या) पुढच्या रांगेत दोन-तीन आय. ए. एस. अधिकारी झोपले होते. त्यांना उद्देशून भीमसेनजी म्हणाले, 'आपण घरी जाऊन झोपलात तर तुम्हांलाही आराम मिळेल आणि मलाही गाण्याला उत्साह येईल.' दिल्लीच्या दुसऱ्या एका गाण्याच्या वेळी आकाशवाणीचे प्रमुख निर्माते श्री बृहस्पती यांनी गाण्याच्या आधी 'भीमसेनजी, तुम्ही अभोगी कानडा गाऊ नका. तो कर्नाटकी राग आहे', असे सांगितले. भीमसेनजी म्हणाले, 'आपण गाणे लिहिणारे आहात. मी गाणारा आहे. काय गायचे हे मला चांगले कळते.’ सर्व कलावंतांबद्दल प्रेम आणि त्या कलावंतांचे मोठेपण भीमसेनजी मनोमनी जाणतात. कोणाही कलावंताबद्दल ते कधीही वाईट बोलत नाहीत. कलावंतांचा गौरव झाला तर त्यांना खूप आनंद होतो. रविशंकरांना भारतरत्न मिळाल्यानंतर पंडित जसराज यांनी वर्तमानपत्रांतून जाहीर टीकेचे प्रदर्शन केले. त्या दिवशी भीमसेनजी मला म्हणाले, 'अरे, आत्ता कुठे कलावंतांना मानसन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागला आहे. पूर्वसूरींनी आंब्याचे झाड लावले, आज आपण त्याची फळे चाखतो आहोत. इतरांना मिळालेल्या सन्मानामुळे आपल्याला आनंद झाला नाही, तर आपण कलावंत कसले? अशा पोटदुखीवर अजून औषध सापडलेले नाही! नव्या कलावंतांना उत्तेजन देण्यात भीमसेनजी परीक्षा घेऊन मगच आपले मत देतात. तरुण कलावंतांमध्ये ते आपपरभाव ठेवीत नाहीत. तसेच घराण्याचा पीळ मानत नाहीत. कलकत्त्याच्या रशीदखाँचे गाणे त्यांना आवडले. घराण्याची बंधने तोडून 'हा तरुण गायक उद्याचा मोठा गायक होईल' असे प्रशस्तिपत्र त्यांनी दिले. चांगल्या मुलाला अनेक सूचना त्यांनी प्रेमाने केलेल्या मी पाहिल्या आहेत. आजची मुले लवकर बनचुके होतात, अशी त्यांची तक्रारही आहे. गाणे ऐकणे हेच गाणे शिकण्याचे पहिले लक्षण आहे. सौंदर्याची नजर असली पाहिजे. आपल्या गळ्याला आणि आपल्या कल्पनाशक्तीला काय झेपेल, याचा विचार तरुण गायकांनी केला पाहिजे.

जशी जशी मैफलीची श्रीमंती वाढत गेली, तशी तशी ऐहिक सुबत्ताही सहजपणे घरात आली. विमानांचा प्रवास सुरू झाला. पुढे साथीदारांसह विमानांचा प्रवास सुरू झाला. युरोप, अमेरिकेच्या वार्या दरवर्षी होऊ लागल्या. पूर्वेकडे जपानपर्यंत त्यांची गाणी यशस्वी झाली. पं. भीमसेन जोशी हे केवळ भारताचेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गायक म्हणून ख्यातकीर्त झाले. येथपर्यंत आमच्या मैत्रीचा धागा अतूट होता. पण यालाही एका प्रसंगाने काही काळ तडा गेला. 1986 मध्ये मी युरोप, अमेरिकेचा व्याख्यानदौरा केला. विशेषतः अमेरिकेत मी संगीतावर 35-40 व्याख्याने दिली. इंग्रजी, मराठी या भाषांचा आधार घेतला. न्यू जर्सीमध्ये श्री. देशपांडे यांच्या घरी माझे सुमारे दोन तासांचे संगीतावर एक भाषण झाले. त्यात मी संगीताचे अनेक विचार मांडताना घराणी ही संकल्पना जाचक आणि कालबाह्य झाल्याचे प्रतिपादिले. घराण्यांना मी छापाचे गणपती बनविणारे कारखानदार असे म्हणालो. गुरूसारखाच आवाज लावणे, आलाप, ताना, चीजांची मांडणी ही जशीच्या तशी करणे, हे बरोबर नाही. गंगूबाईंनी रामभाऊंच्यासारखा आवाज लावणे आणि रामभाऊंनी अब्दुल करीमखाँ साहेबांच्यासारखा आवाज लावण्यासाठी कष्ट उपसणे हे विचाराला पटणारे नाही, असे मी म्हणालो. 'छापाचे गणपती' ही प्रतिमा कलेला पुढे नेणारी नाही. प्रत्येक फुलाने स्वतःच उमलायला पाहिजे.

गायक आत्मरंगी रंगला पाहिजे, असे विचार मी या भाषणात व्यक्त केले. या भाषणाच्या दोन ध्वनिफिती एका रसिकाने भीमसेनजींच्याकडे पाठविल्या ती ऐकून भीमसेनजी थोडेफार रागावले. गंगूबाई आणि सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निषेधाचा सूर लावला. भीमण्णा आणि आक्का गंगूबाई या मनातून रुष्ट आहेत हे ऐकून मलाही वाईट वाटले. जवळजवळ एक वर्ष हा रुसवाफुगवा चालूच होता. एकदा कुमार गंधर्व मैफलीसाठी पुण्यात आले. माझ्याविरुद्धची तक्रार कुमार गंधर्वांच्या न्यायालयात प्रविष्ट झाली. नानासाहेब देशपांड्यांच्या घरी कुमारजींना चहांसाठी बोलावले. या ठिकाणी भीमण्णा, गंगूबाई, नानासाहेबांची मुले, डॉ. गोखले, आदी मंडळी होती. कुमारजींना सर्वांनी सांगितले की, 'रामभाऊ आपले असूनही आपल्यावर टीका करतात.’ न्यू जर्सीची टेप कुमारजींना ऐकविण्यात आली. शेवटी कुमारजी म्हणाले, 'राम आपल्याविरुद्ध बोलत असेल, तर त्याला ठोकून काढू. पण या सर्व भाषणात राम चुकीचे काय बोलला, याचा आपण तपास घेऊ. आधीच संगीतावर विचार करणार्यांची संख्या कमी. त्यात खरं काय, हे शोधून काढलं पाहिजे. मग माझी बाजू घेऊन माझी मते मान्य करीत जमलेल्यांना शांत करून म्हणाले, 'गाण्यावरचे विचार समजून घ्या. विचार चुकीचे असले तर विरोध करू. पण विचारांचे आदानप्रदान झालेच पाहिजेत, संगीत पुढे जाते ते विचाराने. केवळ रियाझाने नव्हे.' भीमसेनजींना बाजूला नेऊन कुमारांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या. ‘अरे भीमण्णा, माझ्यापेक्षा राम तुझा पूर्वीचा मित्र आहे. तुझ्या गाण्याबद्दल त्याने अनेकांशी वाद घातले आहेत. दिल्लीत त्याने अनेकांचा मुखभंग केला, त्यावेळी मी हजर होतो.' कुमारजींनी मला किराणा न्यायालयातून निर्दोष मुक्त केले.

या प्रसंगाला एक 'उत्तरार्ध' आहे. हैद्राबाद शहराला चारशे वर्षे पूर्ण होत होती. मुख्य कार्यक्रम पं. भीमसेनजींच्या गायनाचा होता. प्रचंड तयारी झाली होती. संध्याकाळी सिकंदराबाद एक्स्प्रेसने भीमसेनजी आणि त्यांचे पाच साथीदार वातानुकूलित डब्यातून हैद्राबादकडे निघाले. भरत कामत, पुरुषोत्तम वालावलकर, माऊली इत्यादी मंडळी होती. रात्री साडे दहा वाजता सिकंदराबाद एक्सप्रेस सोलापूरला आली. सोलापूरचे स्टेशन पाहिल्यावर भीमसेनजी सर्वांना म्हणाले, 'चला, उतरा खाली.' साथीदार म्हणाले, 'इथे कशासाठी उतरायचे?’ भीमसेनजी म्हणाले, 'मला रामभाऊ पुजारींना भेटायचे आहे.' बरीच गडबड उडाली. स्टेशनमास्तर आले. ते भीमसेनजींना ओळखत होते. ते म्हणाले, 'अण्णा, मी गाडी अर्धा तास थांबवून धरतो. पुजारी सर जवळच राहतात. आपण त्यांना भेटून परत या.’ त्यांनी नकार दिला आणि साथीदारांसह रात्री अकरा वाजता ते माझ्या घरी आले. नुकतीच दिवाळी संपली होती. मी आणि माझी पत्नी त्याच दिवशी संध्याकाळी सोलापूरला गेलो होतो. उराउरी भेटणे झाले. सारी किल्मिषं-जळून गेली. डोळ्यांतले पाणी थांबेचना. मग दडपे पोहे, चकली, यांची फर्माईश झाली. पिठले आले. भाकर्या आल्या. शेंगदाण्याची चटणी आली. सारे आनंदाचे वातावरण उत्तररात्रीपर्यंत भरून राहिले होते. हैद्राबादहून चौकशीचे फोनवर फोन येत होते. पहाटे पाच वाजता एक भली मोठी गाडी हैद्राबादला जाण्यासाठी मिळवली. त्यातून त्या सर्वांना प्रेमाने पाठवून दिले. जाताना शेवटचे एकच वाक्य ते मला म्हणाले, 'रामभाऊ, पुण्यतिथीच्या माझ्या गाण्याला पहिल्या समेला समोर तू मला दिसला पाहिजेस. वाट पाहतो.’ भीमसेनजींची गाडी गेली आणि मी या थोर गायकाच्या प्रचंड प्रेमाखाली पार दडपून गेलो. असे देणे आपल्या आयुष्यात येते ही परमभाग्याची गोष्ट आहे.

बदामीची देवी शाकंबरी ही त्यांची कुलदेवता. मंत्रालयाचे राघवेंद्रस्वामी ही त्यांची गुरुदेवता. या स्थानांना आम्ही अनेकदा मिळून गेलो. कृष्णेच्या काठावर भाकरी, वांग्याची भाजी, दही, शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी कित्येकदा थांबलो. त्यांना ज्वारीची भाकरी अतिशय प्रिय आहे. पन्नास वर्षांपूर्वी आहारही बर्यापैकी होता. जेवताना हिरवी मिरची हवीच. हल्लीच्या मिरच्या पूर्वीइतक्या तिखट राहिल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे. आरंभी गायच्यावेळी धोतर, शेरवानी, असा त्यांचा कपड्यांचा बेत असे. पुढे पायजमा, नेहरू शर्ट घालून मैफलीला जाऊ लागले. सांगायचा उद्देश असा की, त्यांचे जगणे अगदी सामान्यांसारखे होते. आवडी-निवडीही फारशा नव्हत्या. पंचवीस वेळा दिल्लीला जाऊन आले, तरी ताजमहाल पाहिला नाही. जबलपूरला धुवाँधार आणि मार्बलरॉक्स पाहण्यासाठी आम्ही त्यांना आग्रहाने नेले. सामाजिक कार्याला मदत करण्याची वृत्ती भीमण्णाच्या अंगी आरंभापासूनच आहे. अनेक संस्थांना आपले गाणे देऊन त्यांनी मदत केली आहे. प्रत्यक्ष सवाई गंधर्व पुण्यतिथीत आपल्या कुटुंबियांची तिकिटे ते आवर्जून काढतात. माझ्या नावाने माझ्या विद्यार्थ्यांनी एक प्रतिष्ठान स्थापून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. आरंभी कुमार गंधर्व या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. कुमारांच्या मृत्यूनंतर 1992 पासून पं. भीमसेन जोशी हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पं. जसराज या माझ्या मित्रांनी विनामूल्य गाणी देऊन या प्रतिष्ठानला आर्थिक हातभार लावला.

प्रतिष्ठानच्या वार्षिक बैठकीत प्रतिष्ठानचा कारभार कसा चालला आहे, याची ते जातीने दखल घेतात. ‘माझी काय मदत हवी असेल, ती मी केव्हाही यायला तयार आहे’, असा आशीर्वाद कायमचा आमच्या पाठीशी आहे. पुट्टपर्तीच्या सत्यसाईबाबांच्या दर्शनालाही ते अधूनमधून जातात. माझ्या पन्नासाव्या वाढदिवसादिवशी कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांची गाणी झाली. पुट्टपर्तीहून पं. भीमसेन जोशी आपल्या मोटारीतून निघाले आणि सतत ड्रायव्हिंग करीत तेरा तासांनी सोलापूरला पोहोचले. पावसाने ओढेनाले भरून वाहात असताना त्यांत गाडी घालून ते धावतपळत सोलापूरला आले. आमच्या वहिनी सौ. वत्सलाबाईही बरोबर होत्या. संध्याकाळी येऊन पोहोचल्यावर आंघोळ करून ते हॉलवर आले. त्यावेळी कुमार गंधर्व गात होते. पंडितजींना पाहून कुमारजी मोठ्याने म्हणाले, 'भीमण्णा आलास का, राम काळजीत होता.' कुमारांचे संपूर्ण गाणे समोर बसून दाद देत त्यांनी ऐकले. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमण्णांचे गाणे होते. त्यांच्या समोर कुमारजी बसले होते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, रणजित देसाई, श्री. पु. भागवत, राजाध्यक्ष दांपत्य, अशी अनेक मान्यवर मंडळी समोर बसली होती. त्या दिवशी भीमण्णांनी गुजरी तोडी आणि गौड सारंग हे दोन राग बहारीने सादर केले. सर्व मैफल भीमसेनजींच्या या अप्रतिम गायनाने सुखावून गेली. मित्रासाठी एवढे कष्ट घेऊन आपली कला सामर्थ्याने सादर करणारे पं. भीमसेनजीसारखे कलावंत फारच थोडे.

भीमसेनजींची शिष्यपरंपरा बरीच मोठी आहे. त्यांच्या शिष्यांना त्यांच्या सहवासातून, त्यांच्या मैफलीतून आणि अलीकडे निघालेल्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती यांतून त्यांचे गाणे आत्मसात करायला मिळते आहे. माधव गुडी, पटवर्धन, देशपांडे (मुंबई) या शिष्यांना तंबोर्यावर बसून बसून बरेच शिक्षण मिळाले. माधव गुडी तर घरीच राहात होता. नानासाहेबांचा मुलगा श्रीकांत देशपांडे, सवाई गंधर्वांचा नातू यांनाही थोडीफार विद्या मिळाली. आपल्या शिष्यांना ठराविक वेळी ठराविक पद्धतीने शिक्षण देणे हे भीमसेनजींच्यासारख्या विश्वविख्यात गायकाला अशक्य आहे. मैफलींसाठी सारखे बाहेर हिंडावे लागणाऱ्या गुरूला अशा प्रकारचे शिक्षण शिष्यांना देणे अवघड आहे. त्यांच्या इतक्या मैफली होत की स्वतःलाच रियाझाला वेळ नसे आणि अशा रियाझाची गरजही नसे. गेल्या पन्नास वर्षांत यंत्रानेही गुरुची जागा घेतली आहे. गाणे ऐकून बरेच एकलव्य गायक व्हायला निघाले आहेत. गुरु-शिष्य परंपरा कितीही चांगली असली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात ती मोडकळीला आली आहे. पंडितजींचा मुलगा श्रीनिवास गेल्या काही वर्षांत गाण्याचे शिक्षण घेत आहे. थोड्याफार मैफली त्याच्याही होत आहेत. उपेंद्र भट हाही बऱ्यापैकी गातो आहे. श्रीकांत देशपांडे यांच्या मैफली महाराष्ट्रातून होत आहेत. माधव गुडीने कर्नाटकात चांगले नाव मिळविले आहे. पण भीमसेनजींचे गाणे पुढच्या पिढीत आपल्या ताकदीने गाईल असा कोण आहे? माझ्याजवळ तरी या प्रश्नाचे उत्तर नाही.

सौ. वत्सलाबाईंनी अपार कष्ट करून भीमसेनजींच्या घराला भक्कम आधार दिला. मुलांचे उत्तम संगोपन केले. वास्तविक त्या गाणाऱ्या. सवाई गंधर्व पुण्यतिथीत त्यांचे गाणेही झालेले. गाण्यावर त्यांचे विलक्षण प्रेम. भीमसेनजींच्या घरासाठी त्यांनी आपले गाणे सोडले. पाहुण्यांचा पसारा आणि वर्दळ रोजचीच होती. हसतमुखाने सर्वांचे स्वागत त्या करीत. सुखाचे दिवस आल्यावरही आमच्या वहिनींची वृत्ती कधी बदलली नाही. भीमसेनांची साठी, पंच्याहत्तरी, थाटात साजरी झाली. नौशाद यांच्याहस्ते पंच्याहत्तरीचा प्रचंड मोठा सत्कार झाला. अटलबिहारी वाजपेयी भाषण करण्यासाठी मुद्दाम पुण्याला आले होते. पुणेकरांनी प्रचंड संख्येने रमणबागेत हजेरी लावली. अनेकांची गाणी झाली. पण भीमसेनजी स्वतः गायले नाहीत. 'माझ्या सत्कारात मीच कशाला गाऊ?’ असे त्यांचे म्हणणे. ऐंशी वर्षे झाल्यावर भीमसेनजींच्या शिष्यांनी आपल्या गुरूचा संस्मरणीय सत्कार केला. असे अनेक आनंदाचे क्षण आम्ही मित्रांनी डोळे भरून पाहिले. आम्ही आनंदाचे साक्षीदार झालो.

मग आजारीपणाचे नवे पर्व सुरू झाले. एका वर्षात तीन मोठी ऑपरेशन्स झाली. पाय मोडला म्हणून दोन महिने प्लॅस्टरमध्ये पाय घालून त्यांना झोपवून ठेवले. पाय बरा झाला आणि आतड्यातील अल्सर फुटला. हे जीवावरचे दुखणे होते. के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशननंतर मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनीच मला धीर दिला. 'आठ दिवसांत घरी येतो. मग गप्पा मारू.' असे त्यांचे बोलणे. डोक्यात काही अनावश्यक वाढ झाली, म्हणून डोक्याचे ऑपरेशन केले आणि बराचसा भाग काढून टाकला. त्यातूनही ते खडखडीत बरे झाले. आता त्यांना दुसर्यांच्या आधाराने जावे लागते. पण या सर्व संकटांतून बाहेर आल्यावर त्यांची जिद्द अधिकच उजळून निघाली. आजही पूर्वीसारख्या गप्पा रंगतात. स्नेहभावाने घरच्या गोष्टी निघतात. जुन्या मित्रांच्या आठवणी निघतात. त्यांचे बोलणे ऐकून आजही आपल्या जीवनाची उभारी नव्याने घेऊन आम्ही बाहेर पडतो. भारतीय संगीताच्या इतिहासात गाणे घराघरांतून रुजविणारा, फुलविणारा एवढा मोठा गायक दुसरा झाला नाही. कीर्तीच्या शिखरावर असतानाही सामान्यांची जवळीक त्यांनी कधी सोडली नाही. सूरसंगत, रागविद्येची बरसात या सर्व रसिकांवर करणारा सर्वसामान्यजनांचा प्रिय गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी. असा खेळिया पुन्हा होणे नाही.

[शब्दांकन : प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे, सोलापूर. ]
 

Tags: कर्नाटक सोलापूर रणजीत देसाई विदा करंदीकर वसंत बापट मंगेश पाडगावकर पु.ल.देशपांडे श्रीराम पुजारी वसंतराव देशपांडे कुमार गंधर्व सवाई गंधर्व Karnataka पंडित भीमसेन जोशी Solapur Ranjit Desai Vida Karandikar Vasant Bapat Mangesh Padgaonkar P.L. Deshpande Shriram Pujari Vasantrao Deshpande Kumar Gandharva Sawai Gandharva Pandit Bhimsen Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके