डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपले शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना विचार करायला कसे शिकता येईल यांवर भर न देता, शिकलेले ज्ञान परीक्षेत कसे इमानदारीने लिहिता येईल, यांवर अधिक भर देते. हाच दृष्टिकोन महाविद्यालयीन शिक्षणातदेखील तसाच पुढे चालू राहतो. उच्च शिक्षणातील सुधारणांवरील चर्चा, शिक्षकांची गुणवत्ता व त्यांचे शैक्षणिक दायित्व यांवर केंद्रित झाली पाहिजे. त्याचबरोबर या चर्चेमध्ये शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विचार करायला उत्तेजित कसे करता येईल, यांवर विचारमंथन अपेक्षित आहे.

गेली साठ वर्ष आपल्या देशात शिक्षणातल्या सुधारणांसाठी प्रयत्न चालले आहेत. पंचवार्षिक योजना झाल्या, विविध समित्या स्थापन झाल्या. त्यांचे अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाले. ते सरकारसमोर ठेवले गेले. नागरिकांपर्यंत पोचले. त्यावर थोड्याफार चर्चा झडल्या. परंतु शिक्षणात फार बदल झाला नाही.

'शिक्षण मिळणं हा मुलांचा मूलभूत हक्क आहे', या विधानावर भारताने सही देखील केलेली आहे. पण तरीही सर्व मुलांपर्यंत शिक्षण पोचलेले नाही, हे वास्तव आहे. ते आपल्याला माहिती आहेच. अजूनही समाजाच्या काही घटकांपर्यंत शिक्षण पोचलेले नाही, तर चांगलं शिक्षण देण्याच्या गोष्टी आपण कशा करणार? मुळात चांगलं शिक्षण म्हणायचं कशाला, इथपासूनचे प्रश्न आपल्यासमोर आहेत.

शाळा प्रवेशासाठी पहाटेपासून रांगा लावल्या जातात, ती शाळा चांगलं शिक्षण देते का? जी शाळा भरपूर फी घेते, ती शाळा चांगलं शिक्षण देते का? कडक शिस्तीची म्हणून प्रसिद्ध असलेली शाळा चांगली असते का? यावरच किमान एकवाक्यता झाली पाहिजे. जी शाळा मुलांना विचारप्रवृत्त करते, मुलांच्यातल्या नैसर्गिक वृत्तींना प्रकट व्हायची संधी देते, ती शाळा चांगली असं आपल्याला म्हणता येतं. मग हा निकष लावला तर चांगल्या शाळा आपल्याकडे आहेत का?

आपल्याकडे शाळांमध्ये वर्तनवादी विचारसरणीवर आधारित शिक्षणपद्धती आहे. म्हणजे काय तर मुलांच्या वर्तनात अपेक्षित बदल करण्याचं काम ही शिक्षणपद्धती घडवून आणते. मुलाचं मन ही कोरी पाटी असते, असं समजून त्यावर आपल्याला हवी ती अक्षरं उमटवण्याचं काम ही शिक्षणपद्धती करत असते. किंवा मग नेहमीचंच लाडकं उदाहरण मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी घडत जातात. ही दोन्ही उदाहरणं शिक्षणातली साचेबद्धता स्पष्ट करतात.

थोडक्यात, मोठ्या माणसांनी सांगायचं आणि मुलांनी ते जसंच्या तसं ऐकायचं. मुलं नाठाळच असतात, मस्तीखोर असतात, त्यांना अभ्यास करायला मुळीच आवडत नाही. मग करा त्यांना शिक्षा. मुलं नीट वठणीवर येतात. आणि गुरुजनांचा- मोठ्या माणसांचा मान वगैरे ठेवतात. मुलांच्या नैसर्गिक वृत्तींना ठाकून-ठोकून आकार दिला की आपलं शिक्षणाचं ध्येय सफल होतं. ही झाली वर्तनवादी विचारसरणी.

'नवशिक्षण' याच्या नेमकं उलट सांगतं. नवशिक्षणात शिक्षकाला स्थान आहे ते मार्गदर्शकाचं. असा मार्गदर्शक; जो मुलांना शिकायला मदत करेल, मुलं आपणहून शिकतील. त्यांनी मोकळ्या वातावरणात शिकावं यासाठी मार्गदर्शक संधी देईल. मुलांच्या मनात उत्सुकता निर्माण होईल असं वातावरण तिथं तयार करील. त्यातूनच मुलं आपल्या गतीनुसार तिथं शिकतील. प्रत्येक मुलाचा मेंदू शिकण्यासाठी उत्सुक असतोच. मात्र त्यांना अनुभवांच्या संधी मिळायला हव्यात. त्यांना समृद्ध करणारे, बुद्धीला चालना देणारे अनुभव दिले तर मुलं कोणत्याही दडपणाशिवाय शिकतात.

इथे कसोटी असते ती शिक्षकाची. मुलांना शिक्षणाच्या संधी म्हणजेच विविध उपक्रम, या मार्गदर्शकानं पुरवायचे असतात. यातून मुलांचं शिक्षण नीट होतं. त्यांना शिकण्याचं, शिक्षकांचं दडपण येत नाही. त्यांना शंका विचारताना अडचण येत नाही. या पद्धतीत मूल आणि शिक्षकाचं नातं प्रेमाचं असतं. दरारा वाटेल, वचक बसेल अशा शिक्षकाला नवशिक्षणात स्थान नाही. पूर्णपणे बालकेंद्री शिक्षण ही या पद्धतीची खरी ओळख. अन्यथा 'राममूर्ती समिती'च्या अहवालात असं सांगितलं आहे की, 1/3 मुलांना शाळा कंटाळवाणी आणि भीतीदायक वाटते. ज्या शाळांबद्दल मुलांच्या मनात अशी भीती आहे, त्या शाळेत जाऊन मुलं शिकण्यासारखी सर्जनशील गोष्ट करणार कशी? यासाठी मुलांना शाळेत निर्भय वाटलं पाहिजे. यातून मुलाला खऱ्या अर्थानं शिकण्यासाठी प्रेरणा मिळतील.

एरवी मुलं शाळेत जातात, तेव्हा त्यांच्यावर नकळतपणे कितीतरी गोष्टींचं ओझं असतं. 'यशपाल समिती'नं अशा घटकांचा अभ्यास करून ओझ्याविना अध्ययन हवं, असं अहवालात मांडलं. यात त्यांनी अडीच वर्षांच्या मुलाला शाळेत घालणं, हे त्याच्यासाठी एक ओझंच असतं असं सांगितलं. त्याच प्रमाणे निरस अभ्यास, वृक्ष भाषेत पाठ्यपुस्तकं याचं ओझं मुलांवर असतं, त्यांना परीक्षेची भीती वाटत असते. दिवसभर शाळेत शिकून पुन्हा तेच शिकण्यासाठी क्लासेसना जावं लागतं, तेही एक ओझंच; असं सांगितलं आहे. याशिवाय मुलांना पाठीवर जड दप्तराचं ओझं वाहून न्यावं लागतं. अशी विविध ओझी घेऊन शिकणाऱ्या मुलांचं शिक्षण कसं होईल? असा प्रश्न ते उपस्थित करतात. मात्र हेही तितकंच खरं आहे की हे प्रश्न सुटत नाहीत. ते कसे सोडवायचे? याच्या उत्तराची दिशा नवशिक्षणाकडे जाते.

नवशिक्षणात भर आहे तो आनंदमय शिक्षणावर. मुलांना प्रत्येक कृती करताना आनंद वाटला पाहिजे. हा आनंद नवशिक्षणाच्या विविध पद्धतीतून मुलांना येतो. मुलांना खेळण्यातून आनंद मिळतो. म्हणून त्यांना साधनांद्वारा शिकवायचे. ही शैक्षणिक साधनं त्यांना आवडतील अशी असतात. आकर्षक असतात, मुलांना ती खेळणीच वाटतात. की खेळणी त्यांना काही शिकवताहेत, याची त्यांना जाणीवही नसते. प्रत्यक्षात ही साधनं त्यांची भाषेची तयारी करून घेत असतात, भाषेचे वेगवेगळे नियम सांगत असतात. शब्दसंपत्ती वाढवत असतात. कधी गणित शिकवतात. बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार आपण शिकतो आहोत याची त्यांना कल्पनाही नसते. पुढे त्यांची पूर्ण तयारी झाल्यावर त्यांना मूर्त संकल्पनेकडून अमूर्त संकल्पनेकडे आणलं जातं. एरवी आपल्या पठडीबद्ध शिक्षणपद्धतीत हाच भाग केवळ खडू फळा यांच्या साहाय्याने शिकवला जातो. शिक्षक हा भाग शिकवून मोकळे होतात. पण आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला तो समजला आहे की नाही, हे शिक्षकाला कधीच कळत नाही. किंवा कळला तरी थेट परीक्षेतच. त्यामुळे या न समजण्यावर काहीच उपाययोजना होत नाही. साधनांवर एखादी संकल्पना सांगितली जाते, तेव्हा शिक्षक-विद्यार्थी परस्परसंबंध निर्माण होतात. यातून प्रत्येक मुलाची अडचण शिक्षकाला अगदी नीट समजते. त्यावर उपाययोजनाही लगेच करता येते. त्यामुळे मूल मागे पडत नाही आणि नापासांची गर्दीही होत नाही.

नवशिक्षणाचं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे मुलाने स्वत:चं स्वतः शिकत जायचं आहे. शैक्षणिक साधनांवर खेळून त्यांना स्वयं अध्ययनाची संधी मिळते. अशीच संधी प्रकल्प पद्धतीतून मिळते. प्रकल्प पद्धतीत एखादा परिसरातला विषय अभ्यासासाठी निवडला जातो. या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करायची जबाबदारी मुलांवर असते. इथे शिक्षक केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. या विषयाच्या अभ्यासासाठी मुलं प्रश्न काढतात. या प्रश्नांची उत्तरं कुठून मिळवायची हे ठरवतात. या विषयाशी संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारणं, त्यासाठी प्रश्न काढणं, त्याची उत्तरं मिळवून ती लिहून ठेवणं.

याशिवाय काही माहिती पुस्तकांतून मिळवणं, त्यासाठी वाचनालयात जाणं या गोष्टी मुलंच करतात. त्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागते. इथे शिक्षक वरून ज्ञान ओतत नाही, तर मुलांनाच ते मिळवावं लागतं. अशा प्रकारे मिळालेलं ज्ञान कायमस्वरूपी राहतं. पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा प्रकार होत नाही.

नवशिक्षणाचा गाभा असा की, यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक भूमिका असते. तो केवळ श्रवणभक्ती करायला शाळेच्या पायऱ्या चढत नाही, तसंच त्याच्या नैसर्गिक वर्तनपद्धतीत कोणी बाहेरचा माणूस बदल करायला इथे नेमलेला नसतो. त्याउलट विद्यार्थ्याचा कल समजून घेतला जातो. आणि शास्त्रीय पद्धतीनं शिक्षणाची संधी त्यांना दिली जाते. या शास्त्रीय पद्धतीला बळकट असा पाया आहे. अनेक विचारवंतांचं, संशोधकांचं, शास्त्रज्ञांचं योगदान यामागे आहे.

सोळाव्या शतकातील कोमेनिअस यांनी सर्वात प्रथम शास्त्रीय बालशिक्षणाचा पाया रचला. यानंतर रुसो,पेस्टॉलॉजी, फ्रेडरिक फ्रोबेल, मादाम मॉन्टेसरी, जीन पियाजे, गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक यांच्यापासून ते हॉवर्ड गार्डनर पर्यंत अनेकांनी नवशिक्षणाला सशक्त केलं आहे. मेंदूच्या अभ्यासावर आधारित डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 साली मांडलेला बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत देखील नवशिक्षणातला महत्त्वाचा आधार आहे. अशा प्रकारचे शास्त्रीय शिक्षण शाळा-शाळांतून सुरू केले तर सध्याच्या शिक्षणातले अनेक प्रश्न सुटतील.

शाळा आवडत नाही, शिक्षक समजून घेत नाहीत, या कारणांसाठी शाळेपर्यंत आलेली मुलंदेखील शाळेतून गळतात. मुलांना जर चांगलं - त्यांना समजून घेणारं शिक्षण मिळालं तर त्यांच्यासाठी शाळा हे आनंदाचं स्थान होईल.

Tags: श्रुती पानसे शिक्षण ताराबाई मोडक गिजुभाई बधेका जीन पियाजे मादाम मॉन्टेसरी फ्रेडरिक फ्रोबेल पेस्टॉलॉजी रुसो weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके