डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आनंदाने शिकण्याच्या दिशेने...

मुलांना शिकण्यातला आनंद समजावा, त्यांना आपण होऊन शिकावेसे वाटावे म्हणून काम करणारा ‘खेळघर’ हा पालकनीती परिवार या संस्थेचा प्रकल्प! पुण्यातल्या कोथरूडमधील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील मुला-पालकांबरोबर खेळघर गेली 23 वर्षे काम करत आहे. खेळघर या उपक्रमाच्या माध्यमातून ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने...’ हे शिकण्या-शिकवण्याच्या संकल्पना आणि प्रक्रियेसंदर्भातले पुस्तक तयार झाले आहे. अलीकडेच या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. 
या निमित्ताने खेळघर प्रकल्पाच्या समन्वयक आणि या पुस्तकाच्या लेखन-संपादनाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या शुभदा जोशी लिहीत आहेत.
 

‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’... या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे काम करत असताना, या सर्जनशील शोधप्रक्रियेची बीजे माझ्या शालेय जीवनातल्या अनुभवांमध्ये आहेत, असे माझ्या लक्षात आले.

लहानपणची शाळा म्हटले की, मला आठवतो तो ‘कंटाळा’! कंटाळून वाट पाहत राहणे... तास संपण्याची, मधली सुट्टी होण्याची, शाळा सुटण्याची! वर्गात बाई शिकवत असायच्या, त्याचा संदर्भच लक्षात यायचा नाही. खिडकीतून बाहेर बघत बसलेले, शेजारणीशी बोललेले, जांभया दिलेल्या चालायच्या नाहीत. शिस्त मोडली तर शिक्षा दिल्या जायच्या. शाळेची चाकोरी अतिशय घट्ट होती. शिक्षक तास घ्यायचे, गृहपाठ द्यायचे आणि जायचे. त्यांचे मुलांशी काही देणे-घेणे नसायचे.

शाळेतले आनंदाचे क्षण कोणते होते? शाळा भरायच्या आधी, मधल्या सुट्टीमध्ये आणि शाळा संपल्यावरच्या वेळात खेळणे, तासांच्या मधे-मधे गप्पा मारणे आणि डबा खाणे. बाकी माझ्या आवडी-निवडींचा, आनंदाचा आणि शालेय शिक्षणाचा अजिबात संबंध नव्हता.

मात्र शाळेत जायलाच हवे, आपले लक्ष लागत नाही ही आपली चूक आहे, आपण शिकलो नाही तर आपल्याला काही भविष्य नाही- हे मनात अगदी पुरेपूर ठसले होते. त्यामुळे शाळा बुडवावी, शाळेतून पळून जावे, असे कधीच मनात आले नाही. चौथ्या इयत्तेत ओतूरसारख्या खेडेगावातून पुण्यात आले. पुण्यातल्या प्रसिद्ध मराठी माध्यमाच्या शाळेत मला घातले गेले. वय लहान होते. भाषेत ग्रामीण हेल होता. गाव ते शहर हा मोठा बदल आत्मसात करणे माझ्यासाठी आव्हानच होते. पण मला सामावून घेण्याचा कुणी प्रयत्न केला, असे आठवत नाही. सुरुवातीची चार-पाच वर्षे मला मैत्रिणीच नव्हत्या. वर्गात स्पर्धा असे. वर्गातल्या शहरी, इस्त्रीचे कपडे घालणाऱ्या, वर्गात हात वर करून फाडफाड उत्तरे देणाऱ्या, चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलींबद्दल मला असूया वाटत असे.

या सगळ्यातून मला आयुष्यभर पुरून उरेल अशा अनेक गोष्टी मिळाल्या- न्यूनगंड, आपल्याकडून जे अपेक्षित आहे तिथे आपण पोचू शकत नाही अशी सातत्याने वाटणारी कमीपणाची भावना, प्रेम-आस्था-मैत्रविहीन एकटेपणाची भावना, परीक्षेची भीती, ताण!

यातूनही मी शिकले, architect  झाले, स्वतःची practice  करू लागले. लग्न झाले, मूल झाले आणि नकळत मीदेखील लहानपणी अनुभवलेल्या मोठ्या माणसांसारखीच वागू लागले. करिअर, पैसे, प्रतिष्ठा मिळवणे हे आयुष्याचे ध्येय बनले होते; मात्र आयुष्य कोरडे बनले होते. मी स्वतःला तपासात होते, आयुष्यातल्या अर्थपूर्णतेचा शोध घेत होते. वाचत होते. काहीबाही करून पाहत होते. या टप्प्यावर माझ्या आयुष्याला एक वेगळे, सुंदर वळण मिळाले. माझी मुले लहान असताना पालकनीती मासिक आणि अक्षरनंदन शाळा या दोन गोष्टींशी माझा परिचय झाला. या निमित्ताने विचारांचे एक वेगळेच दालन माझ्यासाठी खुले झाले.

असेही असू शकते? मुलांचा विचार केंद्रस्थानी असणारी, मुलांचे आनंदात असणे महत्त्वाचे वाटणारी, मुलांचा आदर करणारी मोठी माणसे खरेच प्रत्यक्षात असतात? आणि जर खरेच असे प्रत्यक्षात असेल, तर जग किती सुंदर बनेल! एक आशेचे फूल माझ्या मनात फुलले. मुलांना उत्साहाने शिकावेसे वाटेल असे वातावरण घडवण्याचा प्रयत्न करणारी अक्षरनंदन शाळा माझ्या मुलांना मिळाली आणि मुलांबरोबर माझेही शिक्षण सुरू झाले. मी माझा व्यवसाय थांबवून पालकनीती मासिकाच्या संपादक मंडळात सामील झाले. लेखन हा माझा प्रांत कधीच नव्हता, पण मासिकाच्या निमित्ताने होणारे वाचन आणि चर्चा विचार करायला प्रवृत्त करत होत्या. स्वतःच्या धारणांना, वृत्तींना तपासून पाहायला भाग पाडत होत्या. याबरोबरच भल्याच्या दिशेने नेणाऱ्या बदलासाठी आवश्यक असलेला आधार आणि प्रोत्साहनदेखील मिळत होते.

आता हे नवे शिकणे फक्त पुस्तकी नव्हते, तर त्यानुसार प्रत्यक्ष बदल स्वतःमध्ये घडवायचे होते. आता माझे काम आणि जगणे एकच झाले. प्रत्येक क्षणाला शिकणे रुजू झाले होते. आम्ही पालकनीती मासिकासाठी काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी 1996 मध्ये एकत्र येऊन ‘पालकनीती परिवार’ ही संस्था स्थापन केली. याबरोबरच मी आणखी एक पुढचे पाऊल उचलले. माझ्या राहत्या घरातच ‘खेळघर’ हा संस्थेचा आणखी एक उपक्रम सुरू केला. माझ्या मुलांचे बालपण आनंदाचे जावे म्हणून जसा शाळेत आणि घरी प्रयत्न केला जातो आहे, तशी संधी आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्त्यांमधल्या मुला-मुलींनादेखील मिळावी, अशा इच्छेतून ‘खेळघर’ या नव्या कल्पनेची रुजवात झाली. मुलांना कंटाळा यायला नको आणि जे करू त्यात मुलांचा सक्रिय सहभाग असायला हवा, एवढ्या दोन गोष्टी मनात घेऊन कामाला सुरुवात झाली.

मुले आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असलेली मोठी माणसे यांची संख्या हळूहळू वाढू लागली. मुले दररोज शाळा सुटल्यावर दोन-अडीच तासांसाठी खेळघरात येऊ लागली. मुलांच्या क्षमतेनुसार आणि वयानुसार गट तयार झाले. कार्यकर्त्यांनादेखील आनंदाने शिकण्याला गती मिळेल असे खेळघरातले वातावरण आवडत होते. जागा, माणसे, साधनसामग्री, निधी असे काम विस्तारू लागले.

आम्ही सगळे मिळून एक स्वप्न विणत होतो...

- लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, हुशार-ढ, शहरी- ग्रामीण, जात-धर्म अशा सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या मनापर्यंत पोचता येईल का?

- मोठ्यांनी बेतलेल्या ह्या रचनेत मुलांच्या मतांना, निवडीला जागा मिळू शकेल का?

- मुलांना मनात येईल ते मोकळेपणाने बोलता येईल असे आश्वासक वातावरण आपल्याला घडवता येईल का?

- मुलांवर विश्वास ठेवता येईल का? त्यांची परिस्थित समजावून घेऊन त्यांचा स्वीकार करता येईल का?

- आपल्या हातातली सत्ता सोडून देता येईल का?

अशी अनेक आव्हाने आणि त्या जोडीला सर्जनशील कृतिकार्यक्रम आखण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी मनापासून खांद्यावर घेतली.

एका विधायक ध्येयासाठी करत असलेले हे काम आणि जगणे आता एक होऊन गेले होते. शाळेत असताना जे विषय अजिबात समजले नव्हते, आवडले नव्हते, त्यांचा अभ्यास करून आम्ही आता मुलांना शिकवत होतो. आता त्या आशयातली गम्मत नव्याने लक्षात येत होती. विषय तेच, पण आता पद्धत वेगळी होती. मुलांच्या भावविश्वाशी, जीवनाशी जोडून घेऊन शिकवायचे होते. मुलांनी विषयात रमणे हे आमचे यश होते. 

आमच्या प्रयोगांना अभ्यासाची जोड होती आणि कृतीला सहृदयतेची! आम्ही जीवनकौशल्ये, भाषा आणि गणित या विषयांसंदर्भात काम करायचे ठरवले. काम करता-करता अनुभवातून या विषयांचा अभ्यासक्रम, कृतिकार्यक्रम आणि मूल्यमापनाची पद्धती विकसित होत गेली. आम्ही खेळ, कला आणि संवाद ही खेळघराची माध्यमे ठरवली. आता खेळघरात 7 गटांमध्ये पहिली ते दहावीच्या सुमारे 125 मुलांबरोबर रोज काम चालू होते. याशिवाय युवक गटाच्या माध्यमातून मुलांना पुढील शिक्षणासाठी मदत करत होतो. पालकांबरोबरदेखील नियमित काम होत होते.

खेळघराची पहिल्या-दुसऱ्या वर्षांतील मुले 2006-7 च्या सुमारास दहावी पास झाली. ही मुले विचार करणारी होती. आपले म्हणणे योग्य शब्दांत मांडण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात दिसत होता. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती होती. पुढचे शिक्षण घेण्याची आस होती... ही अनुभूती मिळाल्यानंतर आपल्याला हे काम जमते आहे, असे वाटू लागले आणि आम्ही आणखी पुढे जाण्याचे ठरवले.

ज्या व्यक्ती/संस्थांना त्यांच्या परिसरात आमच्यासारखे खेळघर सुरू करावेसे वाटत असेल त्यांना मदत करायची, असा निश्चित हेतू मनात धरून कामाला सुरुवात झाली. या कामाला टाटा ट्रस्टने पुढील दहा वर्षे सातत्याने आर्थिक मदत केली.

‘नवी खेळघरे सुरू व्हावीत म्हणून...’ दर वर्षी पाच दिवसांची निवासी कार्यशाळा घ्यायची ठरवले. आनंदाने, मनापासून शिकण्याची अनुभूती सहभागींना प्रत्यक्ष मिळावी आणि आपणही वंचित समाजाकरिता काही काम करावे अशी इच्छा रुजावी, अशी या कार्यशाळेची रचना असे.

तऱ्हेतऱ्हेच्या धारणा/समज-गैरसमज मनात घेऊन आलेल्या, ‘समोरच्याला आवडेल असेच बोलणे योग्य’ समजणाऱ्या मोठ्या माणसांबरोबर काम करणे  मुलांपेक्षा अधिक अवघड होते. अगदी थोड्या वेळातच त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आव्हान समोर होते.

इथे खेळ, कला आणि संवाद ही खेळघराची माध्यमे मदतीला आली. खेळाच्या माध्यमातून सारे ताणतणाव मागे टाकून सहभागी  व्यक्ती शरीर, मन आणि बुद्धीने मोकळ्या घेऊन नवे शिकण्यासाठी उत्सुक बनतात. कलेच्या आणि संवादाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनानुभवांबद्दल मोकळेपणाने अभिव्यक्त होऊ लागतात आणि शिकण्या-शिकवण्याची सुरेल प्रक्रिया आकार घेते. नव्याने शिकलेले पूर्व-अनुभवांशी जोडून घेऊन, जुन्या धारणा तपासून पाहण्याचे धाडस करायला जमले की शिकण्याचा प्रवाह मोकळा होतो...

गेल्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 15 संस्थांबरोबर काम केले आणि महाराष्ट्रभरात सुमारे 70 ठिकाणी नवी खेळघरे सुरू झाली. आजही त्यातली 40 खेळघरे वंचित मुलांबरोबर काम करत आहेत.

प्रशिक्षणातून शिकण्याची सुरुवात तर होते; पण रोज मुलांबरोबर काम करताना असंख्य प्रश्न पडतात, वाट खुंटल्यासारखी वाटते, एकटे वाटते- हे आम्हाला आमच्या अनुभवांमधून माहीत होते. तेव्हा हाताशी असावी म्हणून आम्ही ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने...’ हे पुस्तक लिहायला घेतले. टाटा ट्रस्टने 2011 मध्ये अर्थसाह्य आणि प्रोत्साहन दिले म्हणूनच हे काम शक्य झाले. खेळघर गटातले आम्ही सगळेच या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. प्रत्यक्ष लेखन आणि संपादनाची जबाबदारी माझ्याबरोबरीने माधुरी यादवाडकर ह्यांनी घेतली. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे 400 पानांचे हे सर्वसमावेशक पुस्तक तयार झाले.

सुरुवातीला जरी नव्या खेळघराच्या कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक लिहायचे मनात होते, तरी लिहिताना असा मर्यादित उद्देश मनात ठेवून लिहिणे शक्य झाले नाही. आजही अनेकांच्या वाट्याला ज्या प्रकारचे नीरस शिक्षण येते आहे, त्याला विधायक पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या खेळघराच्या कामाच्या प्रत्येक पैलूचे प्रतिबिंब या पुस्तकात पडणे अपरिहार्य होते. खेळघर संकल्पना, खेळघराची कार्यपद्धती, त्यामागचा विचार, आपल्या वृत्तिविकासाची गरज याची सविस्तर मांडणी पुस्तकात केली आहे. मूल कसे शिकते, त्याच्या शिक्षणात आपण काय मदत करू शकतो- या ज्ञानरचनावादी पद्धतीची उदाहरणांसह मांडणी केली आहे.

वस्तीपातळीवरच्या खेळघराच्या कामात पालकांबरोबरचे कामही खूप महत्त्वाचे आहे. आपल्या कामाला पाठिंबा मिळावा- मदत मिळावी, हा उद्देश तर आहेच; त्याबरोबरच मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत पालकांनाही सक्रिय सहभाग घेता यावा, हाही उद्देश आहे. 

जीवनकौशल्यांचा विकास हा या पुस्तकाचा गाभा आहे. मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदनक्षमतेने जगण्यासाठी सक्षम व्हावे, हे जीवन-कौशल्यांच्या शिक्षणाचे ध्येय! विचार करणे, संवाद-कौशल्ये, भावनांचे समायोजन करू शकणे, निर्णय घेणे- निर्णयांची जबाबदारी घेणे अशी अनेक जीवनकौशल्ये आणि त्याबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा  यासाठी खेळघर काम करते. गम्मत म्हणजे जीवनकौशल्ये तर शिकवता येत नाहीत, मुलाला मिळालेल्या सभोवतालच्या वातावरणातून ती विकसित होत जातात. या शिक्षणात मोठ्या माणसांची दोन गोष्टींमधून मदत होऊ शकते. एक म्हणजे- मुले जशी बनावीत असे आपल्याला वाटते, तसे आपण बनायचा सातत्याने प्रयत्न करायचा. मुले त्यांच्याही नकळत सभोवतालच्या माणसांच्या वागण्यातून अनेक गोष्टी शिकत असतात. आणि दुसरे म्हणजे, मुलांमध्ये जीवनकौशल्ये विकसित व्हावीत म्हणून वातावरण तयार करून त्यांच्यासाठी अशा संधी जाणीवपूर्वक निर्माण करणे, ही मोठ्यांची जबाबदारी आहे. खेळघराचा कृतिकार्यक्रम यानुसारच तयार झाला आहे. संवादगट, सहली, प्रकल्प, कृतीतून शिक्षण, वाचनालय, विशेष कार्यक्रम, सण-समारंभांचे साजरीकरण असे अनेक उपक्रम आखले जातात. या कार्यक्रमांची आखणी संवादगटात होते. सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहाने पार पडतात आणि नंतर त्यावर साधक-बाधक चर्चा होते.

या संपूर्ण प्रक्रियेबद्दल पुस्तकामध्ये सविस्तर मांडणी आहे. मुलांना शिकवता-शिकवता आपण स्वतःदेखील शिकत जाणे, ही एक प्रवाही आणि जिवंत प्रक्रिया आहे. आपल्यासमोर येणारे प्रत्येक मूल हे वेगळे असते. त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार मुलांपर्यंत कसे पोचायचे, त्यांना विचारप्रवृत्त कसे करायचे हे त्या-त्या परिस्थितीनुसार ठरवावे लागते. योग्य वेळी योग्य पद्धत निवडायची कशी, हे समजण्यासाठी ह्या पुस्तकाची आपल्याला निश्चितच मदत होईल, असा विश्वास वाटतो.

खेरीज, जीवन भाषाशिक्षण आणि गणिताचा ताळमेळ अशी सविस्तर प्रकरणे आहेत. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चार भाषिक क्षमता कशा विकसित होतील, याबद्दल अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मांडणी केली आहे. मुलांना भाषा शिकवताना आपण लक्षात घ्यायला हव्यात अशा अगदी मूलभूत मुद्यांसंदर्भात वर्षा सहस्रबुद्धे यांचा लेख आहे. मुलांच्या मनात गणिताची भीती असते. ती टाळण्यासाठी मूर्त गोष्टींची मदत घेऊन टप्प्याटप्प्याने अमूर्त संकल्पनांकडे कसे जाता येईल याबद्दल ‘गणिताचा ताळमेळ’ या प्रकरणात विस्ताराने मांडणी केली आहे. 

हाती घेतलेले काम परिणामकारक व्हावे म्हणून हेतूंची स्पष्टता हवी आणि ठरावीक काळाने ते तपासून पाहायला हवे. त्यासाठी खेळघराने अजिबात ताण न देणारी, तरीही नेमकेपणाने दिशा दाखवणारी मूल्यमापनाची पद्धत विकसित केली आहे. या पुस्तकात या ‘मूल्यमापन’ विषयावर सुमित्रा मराठे यांनी लिहिलेले एक स्वतंत्र प्रकरण आहे.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचे लक्ष वेधून घेणारे चित्र म्हणजे रमाकांत धनोकर यांच्या समवेत खेळघरातल्या शिक्षकांनी  काढलेले भित्तिचित्र! हे पुस्तक फक्त शब्दांनी बोलत नाही तर त्यातल्या चित्रांच्या, छायाचित्रांच्या आणि मांडणीच्या माध्यमातूनदेखील बोलते. प्रत्येक प्रकरण सुरू होते एका सुंदर व समर्पक कवितेने आणि छायाचित्राने! जागोजागी वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांची अवतरणे दिली आहेत. महत्त्वाच्या मुद्यांच्या/उदाहरणांच्या चौकटी आहेत. प्रक्रिया समजावून सांगणाऱ्या आकृत्या आहेत. पुस्तकातील सुंदर चित्रे आणि समर्पक मांडणी पालकनीती परिवारचे विश्वस्त व चित्रकार रमाकांत धनोकर यांनी केली आहे.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2015 मध्ये आणि पाठोपाठ दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्यानंतर पाच वर्षांनी प्रकाशित होणाऱ्या या तिसऱ्या आवृत्तीत मधल्या काळात नव्याने शिकलेल्या अनेक गोष्टींची भर घातली आहे. अनेक ठिकाणी थोडी व्यामिश्र मांडणी सोपी केली आहे. पुस्तक अधिक अर्थपूर्ण आणि देखणे व्हावे याचा प्रयत्न केला आहे.

शैक्षणिक पुस्तकाच्या रूढ कल्पनांमध्ये हे पुस्तक बसत नाही, कारण हे पुस्तक फक्त शिकण्याबद्दल बोलत नाही तर जगण्याबद्दल बोलते. इथे जगणे आणि शिकणे एकात्म बनले आहे. या पुस्तकाची भाषा ही अनुभवकथनाची आहे. साधी, सरळ, प्रवाही... पुस्तक वाचले नाही, फक्त चाळले किंवा कोणतेही पान उघडून वाचले, तरी काहीएक हाती लागणार हे निश्चित! सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे पुस्तक वाचणे हा एक समृद्ध बनवणारा अनुभव असेल.

माझ्यासारख्या उच्चजातीय, शहरी, मध्यमवर्गात जन्मलेल्या मुलीला जर शालेय शिक्षणात एवढ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम घडू शकतो, तर खालच्या मानल्या गेलेल्या जातीतल्या, ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेल्या गरीब घरातल्या मुला-मुलींचे या शिक्षणप्रवाहात किती नुकसान होत असेल याची आपण कल्पना करू शकतो.

कितीएक मुले शाळा सोडून देतात, लहान वयात कामाला लागतात, मुलींची लवकर लग्ने होतात, मुलगे गैरमार्गाला लागतात- अशी कितीतरी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर असतात.

आपल्या सभोवतालच्या मुलांसाठी एक चांगला माणूस घडण्याची संधी निर्माण करण्याचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. त्यांच्या सभोवतालचे वातावरण सर्जनशील आणि आनंदाचे बनवायचे आहे. ह्या कामात ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ हे पुस्तक आपल्याला खचितच साथ देईल.

कुठलेही काम स्वयंभू नसते, स्वयंपूर्ण नसते. खेळघराचे काम करताना आम्हीदेखील अनेक व्यक्ती, संस्था आणि पुस्तकांमधून अनेक गोष्टी शिकत गेलो. ‘अक्षरनंदन’चे काम तर सतत मार्गदर्शक म्हणून डोळ्यांसमोर होते. भाषेसंदर्भात वर्षा सहस्रबुद्धे तसेच ‘क्वेस्ट’चे नीलेश निमकर आणि गणितासंदर्भात ‘नवनिर्मिती’च्या कामातून भरपूर शिकायला मिळाले. काही व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही. मोहन देशपांडे, जेन साही, माधुरी पुरंदरे, लीलाताई पाटील, जेन नेल्सन (सकारात्मक शिस्त या पुस्तकाच्या लेखिका) यांचे लेखन आणि त्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातले आणि देशभरातले सर्जनशील उपक्रम यांचा आम्ही अभ्यास केला.

वर्षा सहस्रबुद्धे यांनी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीआधी लेखन वाचून त्यात अनेक सुधारणा सुचवल्या. पालकनीतीच्या संजीवनी कुलकर्णी या तीनही आवृत्त्यांच्या दरम्यान सातत्याने बरोबर होत्या. लेखन, पुनर्लेखन अशा 7-8 कच्चे खर्डे पुन्हा वाचून त्याबद्दल चर्चा करण्याचा त्यांनी कधीही कंटाळा केला नाही.

आनंदाने शिकण्याच्या दिशेने
पालकनीती परिवार प्रकाशन, पुणे
Mob. 9822878096
पृष्ठे (खंड 1 : 380, खंड 2 : 208)
किंमत : 850 रुपये (दोन खंड)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके