डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पुस्तक वाचून झाल्यावर कधीही ताईने लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करू नये किंवा स्वत:चं मतही सांगू नये. पुस्तकातला आशय प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनंही भिडू शकतो. मुलांना तो आशय आपल्या अनुभवांशी जोडून बघण्याचा अवकाश मिळायला हवा, आपण होऊन मुलं बोलायची वाट पहावी. फारतर ‘काय वाटलं?’ एवढंच विचारणं. मोठ्या माणसांना ताबडतोब त्यातनं निष्कर्ष काढून त्याचं बोधात रूपांतर करण्याची घाई असते. तो मोह आवरण्याचं पथ्य फार महत्त्वाचं असते, नाहीतर मुलं पुस्तकं ऐकायलाच थांबणार नाहीत.

मला आठवतं, शालेय वयात मला अजिबात वाचनाची गोडी नव्हती. वाचन म्हणजे पाठ्यपुस्तकांचं तेही परीक्षेपुरतं, बाकी आयुष्याशी त्याचा काही संबंध नव्हता.

कुमारवयात रहस्यकथा, नंतर प्रेमकथा हातात पडल्या नि प्रसंगी अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये ठेऊनही वाचायला लागले. तो एक झपाटा होता. पुस्तक सुरू करायचीही घाई नि संपवायचीही. पण ह्या करमणूकप्रधान वाचनातून लवकरच बाहेर पडले.

विशीनंतर ‘अमृता प्रितम’ भेटली नि वाचणं हा काही वेगळाच आतून हलवणारा अनुभव आहे, याचा प्रत्यय आला. त्याच सुमारास गौरी देशपांडे नि मेघना पेठे यांच्या लेखनातून मनातल्या स्त्रीवादाला आकार मिळाल्यागत वाटलं. ‘स्वत:ला काय मिळवायचं आहे नि काय अजिबात चालवून घ्यायचं नाहीये’ या विचाराला एक दिशा मिळाली.

तिशीच्या पुढे पालकत्व आणि शिक्षण यांचा पठडीबाहेरचा विचार नि काम करणाऱ्या लोकांशी संपर्क आला. मग स्वत:च्या वाढीमध्ये वाचनाला असणाऱ्या अनन्यसाधारण महत्त्वाचा प्रत्यय आला. दिवास्वप्न, डायरी ऑफ अॅन फ्रॅक, तोत्तोचान, टिचर, मुलांची भाषा आणि शिक्षक, राज समाज और सत्ता, व्होल्गासे गंगा... अशी यादी बरीच लांब जाईल. पण यातल्या प्रत्येक पुस्तकांचं नि माझं एक विशिष्ट नातं आहे. माझ्यातल्या बदलाचा एकेक टप्पा त्या त्या पुस्तकाशी संलग्न आहे. आजच्या माझ्या कामामध्ये (खरं तर माझ्या जगण्यामध्येच) पुस्तकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे असं जाणवतं.
‘पालकनीती’ मासिकाचं काम करताना, आपण नि आपलं कुटुंब यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक पालकत्वाच्या संकल्पनेचा सखोल विचार झाला. विचारांनी कृतीला दिशा दिली. झोपडवस्तीतल्या मुलांना आपलं दुसरं घरच वाटेल अशा खेळघराची सुरूवात झाली. मुलांना शिकण्यातला आनंद समजावा, शिकण्यासाठीच्या क्षमतांचा त्यांच्यात विकास व्हावा यासाठी काय करायला हवं, याचा शोध सुरू झाला.

माझं जगणं समृद्ध करणाऱ्या पुस्तकांबद्दल मनात अमर्याद प्रेम आहे. त्यामुळेच (खेळघरातल्या) माझ्या मुलांनाही तो आनंद, प्रत्यय लाभावा असं वाटायचं. जीवनात मला मिळालेले सगळे आनंद त्यांना मिळणार नव्हतेच, पण वाचन ही त्यांची आनंदाच्या पलीकडे गरज आहे. वाचन हे सरळ रेषेत त्यांच्या विचार करण्याशी आणि शालेय शिक्षणाशी जोडलेलं आहे. म्हणून त्यांच्या विकासात वाचनाचं फार महत्त्वाचं स्थान आहे, हे सारं समजत होतं. पण परिस्थिती मात्र अगदी विरुद्ध होती. खेळघरातल्या मुलांना वाचनातली गोडी वगैरे तर सोडाच, नीट वाचतादेखील येत नव्हतं. (अगदी सातवी-आठवीतल्या मुलांनाही) प्रयत्न करायचे तर अगदी मुळापासून करायला हवे होते. ते एकटीचं कामही नव्हतं. हळूहळू गट जमला. साथ मिळाली तसा हुरूपही वाढला. खेळघरात मुलांनी वाचावं, अर्थापर्यंत पोचावं, वाचलेलं स्वत:च्या अनुभवांशी जोडावं, त्याबद्दल बोलावं, यासाठी आम्ही खूप काम केलं. आमच्या कामातून, अनुभवांतून आम्हाला काय मिळालं ते सांगायचा प्रयत्न करते.

खेळघरात आम्ही खेळ, कला आणि संवाद हे शिकवण्याचं माध्यम ठरवून आखणी करतो. त्यातूनच वैयक्तिक आणि गटाच्या पातळीवर जबाबदार वर्तनाकडे मुलांना न्यायचं असतं. सगळ्याच गोष्टींची आखणी मुलांबरोबरच्या चर्चेतूनच होते.

खेळायला, दंगा घालायला, हातानं काही करायला मुलांना खूप आवडतं. पण बसून काही बोलायला- ऐकायला त्यांचा विरोध असतो. वाचन तर पुढची पायरी, त्याआधी ऐकणं, बघणं नि बोलणं रसपूर्ण व्हायला हवं. त्यासाठी त्यांची-आमची मैत्री जमायला हवी.

मुलांचा विश्वास कमावणं, त्यांच्या भावविश्वात असलेल्या गोष्टींवर गप्पा मारणं, वळण/शिस्त यांचा बाऊ न करता आमच्याबरोबर कामांत त्यांचा सहभाग मिळवणं, मजेचे खेळ, अनुभव नि त्यावर बोलणं, सण-समारंभ-दिन अशा उत्सवांचं साजरीकरण (लोकशाही पद्धतीनं त्यांची आखणी, कार्यवाही, मूल्यमापन) हे सारं करता करता हळूहळू आमचे नि त्यांचे बंध जुळले. संवाद साधू लागलो... ऐकणं नि बोलणं तर जमायला लागलं.

पण खरी कसोटी होती ‘वाचनाच्या’ संदर्भात. अगदी आजही मी असे म्हणू शकत नाही, की ‘मुलांना वाचनाची छान गोडी लागलीय हं.’ मुलांना वाचनाची आवड नव्हती, इच्छा नव्हती याची कारणंही तशीच होती.

शहरी झोपडवस्तीतील ही शिकणारी पहिली किंवा फार तर दुसरी पिढी. त्यांनी त्यांच्या घरी, वस्तीत, शाळेत कधी कुणाला वाचताना, अभ्यास करताना पाहिलंच नाही. घरात पुस्तकं सोडा, मासिकं, वर्तमानपत्रदेखील नाहीत. समजायला लागल्यापासून त्यांनी वाचणारी माणसं फारशी पाहिलीच नाहीत.

दुसरं म्हणजे कुटुंबाची गरज म्हणून मुलं लहानपणापासूनच काहींना- काही कामात गुंतलेली असतात. त्यामुळे हाताला कामाची सवय असते. पण डोक्याला विचारांची नसते. भावना नि त्यांच्या प्रभावाखाली डायरेक्ट कृती हेच ते आजूबाजूलाही पहात असतात. त्यामुळे जरा थांबणं, विचार करणं... हे कठीण जातं.

सर्वच जीवनावश्यक गोष्टींची वंचितता पाचवीला पूजलेली. करमणुकीसाठी पैसा, नि वेळ दोन्ही अभावानंच. त्यामुळे हातात दोन पैसे येतात तेव्हाच उधळले जातात. पुढचा विचार वगैरे परवडतच नाही.

कधीकधी मला वाटतं आपल्या सामाजिक/कौटुंबिक जीवनात माणसाला एकटेपणा मिळणं अवघडच जातं. स्वतःच्या विचारात असलेला माणूस आत्मकेंद्री गणला जातो. स्त्रियांना तर अशी मुभाच नाही. त्यांनी सगळ्यांशी जोडून-जमवून घ्यायलाच हवं. यातूनंही स्वत:साठी स्वत:च्या विचारांसाठी... वाचनासाठी वेळ काढणं कठीणच.

मुलांच्या आयुष्यात पुस्तकं येतात ती शाळेच्या निमित्तानंच. शाळेत मिळणाऱ्या वागणुकीमुळे एकंदर शाळेबद्दलच नावड निर्माण होते. खेरीज ही पाठ्यपुस्तकंही संवादी, आयुष्याशी जोडलेली नसतात. ‘कोरडं ज्ञान’ देणारी ही पुस्तकं यांच्याबद्दल गोडी निर्माण कशी व्हावी?

एवढ्यानंतरही समजा वाचावं वाटलंच तर जागा, प्रकाश, शांतता या साऱ्या गोष्टीचीही वानवाच. कारणं लक्षात येत होती तरीही त्यांनी वाचावं, त्यांना वाचनातला आनंद कळावा ही असोशीही कमी नव्हती. वाचणं त्यातला आशय समजणं, तो आपल्या अनुभवांशी, जीवनाशी जोडून बघून त्यावर विचार करणं, विविध गोष्टींशी त्याची संगती लावून पाहणं, या विश्लेषणातून हाती लागलेल्या नवनीतावर आधारित कृतींना दिशा मिळणं एवढा व्यापक विचार मनात होता. प्रयत्न सुरू केले नि त्यातून नवंनवं सुचत, उलगडतही गेलं. पहिला अभ्यास! आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीत, परिस्थितीत वाढलेल्या मुलांसाठी भाषा शिक्षणात सिल्वीया अॅस्टन वॉर्नर यांनी केलेले प्रयोग, बालमनाचा सखोल विचार करणारे गिजुभाई बधेका. भाषेकडे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन जीवनशिक्षण म्हणून कसं बघायचं, हे सांगणारे कृष्णकुमार यांच्या पुस्तकांचा अभ्यास, पुण्याची ‘अक्षरनंदन’, बंगलोरच्या जेन साहींची ‘सीता स्कूल’ इथले प्रत्यक्ष अनुभव अशा कितीतरी गोष्टी. त्यातून सुरू झाले आमचे प्रयत्न.

मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांची लिपी शिकविण्यासाठी आम्ही बघणं, नि त्यावर विचार करणं ह्याला महत्त्व देतो. मुलांच्या मनातल्या, जीवनातल्या शब्दांपासून सुरूवात केली, (आई, भूक, पापी इत्यादी) नंतर मुलांची नावं, वस्तूंची नावं यांसारख्या शब्दांचे अर्थ नि दृश्य प्रतिमा जोडीनं मुलांसमोर ठेवतो. यासाठी कार्डस्, तक्ते, वाचनपाठ, अनुभवकथा अशा अनेक प्रकारच्या साहित्याचा उपयोग करतो. मुलं प्रथम शब्द वाचायला शिकतात नि नंतर लिहायला.

या पद्धतीत चित्र वाचनाला अर्थातच खूप महत्त्व आहे. चित्र त्यातल्या वस्तूंची नावं, पुस्तकं, त्यांची मुखपृष्ठ, आतली चित्र ती वाचून कथेचा अंदाज करणं, मग कथा वाचून दाखवणं, पुन्हा पुन्हा वाचणं, पुस्तकाच्या प्रती प्रत्येक मुलांकडे असणं, ताईनं वाचताना त्यांची नजर त्या ओळींवरून फिरणं अशा कितीतरी गोष्टी.

मुलांच्या अनुभवातून गोष्टी तयार होणं, त्यातनं त्यांची स्वत:ची पुस्तक बनणं, ती त्यांनी वारंवार वाचणं, वर्गातल्या गमतीजमतींचेच वाचन पाठ बनणं. ते पुन्हा पुन्हा वाचणं, अशा अनेक कृतींतून, अनुभवांतून मूल वाचायला लागतं. आपण जे वाचतोय ते आपलं आहे, आपल्याच अनुभवांतून आलंय, हे आपल्याला समजतंय, एवढंच नाहीतर लिहिण्यातून आपण हे दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतोय ही अनुभूती वाचन आणि आशय यांची जोड मनात पक्की व्हायला खूप मदत करते. नि मूल कोऱ्या-कोरड्या छापील शब्दांमध्ये डोकावून पाहू लागतं- अनुभवांशी जोडून घेऊ लागतं नि शिकण्याचं एक नवं दालन उघडतं.

एकदा खेळघरात आल्यानंतर तऱ्हेतऱ्हेचे वाचन अनुभव मुलांना उपलब्ध असतील. असा आमचा प्रयत्न असतो. इथे एक फळा विनोद आणि कोट्यांसाठीच असतो. मुलं-ताई त्यांवर विनोद लिहितात, ग्राफिटीसारख्या माध्यमांतून विनोद निवडायची चुरस लागते.

दुसरा फळा निरोप, सूचना, वगैरेंसाठी इथेही कल्पकतेला भरपूर वाव असतो. कात्रणं, चित्रं, मुलांची लिखाणं, जागोजागी पिनपबोर्डवर लावून ठेवलेली असतात. खेळघरातले नियम, वेळापत्रक, कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप हेही भिंतीवर विराजमान. पुस्तकं कपाटात बंदिस्त न राहता रॅक्समधून साईड टेबलांवर सहज हाताला लागतील अशी ठेवलेली असतात.

पुस्तकांची निवड मुलांना आवडेल अशी असते. मग चांदोबा, चाचा चौधरी ही व्यर्ज नसतात. आकर्षक चित्र, मांडणी नि आशय असलेली पुस्तकं मुलं चटकन उचलतात. मोठ्यांनी मुलांना पुस्तकं वाचून दाखवणं, आवडलेल्या पुस्तकाबद्दल प्रेमानं सांगणं, पुस्तकांमुळे झालेल्या बदलांबद्दल बोलणं हे सारं सहज जातायेता घडायला हवं.

आम्ही सुट्ट्यांमध्ये पुस्तकांचे कोपरे सजवतो, त्यांच्यासोबत वाचत बसतो. ‘मला आवडलेलं पुस्तक’ यांवर सादरीकरण ठेवतो. या तयारीसाठी मुलांना मदत करतो. पुस्तक खरेदीसाठी मुलांना बरोबर घेऊन जाणं, शाळा किंवा खेळघरासारख्या केंद्रात हे खरंतर अवघडच, पण शक्य असेल तर का नेऊ नये? गटागटाने का होईना, मुलांनी काय वाचायचं हे नेहमी आपणच का ठरवायचं? त्याला आवडलेलं पुस्तक विकत घेणं शक्य असणं, हे पुस्तक प्रेमात भर घालणारंच.

पुस्तक वाचून झाल्यावर कधीही ताईने लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करू नये किंवा स्वत:चं मतही सांगू नये. पुस्तकातला आशय प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनंही भिडू शकतो. मुलांना तो आशय आपल्या अनुभवांशी जोडून बघण्याचा अवकाश मिळायला हवा, आपण होऊन मुलं बोलायची वाट पहावी. फारतर ‘काय वाटलं?’ एवढंच विचारणं. मोठ्या माणसांना ताबडतोब त्यातनं निष्कर्ष काढून त्याचं बोधात रूपांतर करण्याची घाई असते. तो मोह आवरण्याचं पथ्य फार महत्त्वाचं असते, नाहीतर मुलं पुस्तकं ऐकायलाच थांबणार नाहीत.

अनेक कल्पना, अनेक प्रयोग केले तरी ‘मुलं लागली बुवा वाचायला’ असं आम्हाला आजही ठामपणे म्हणता येत नाही. कारण ‘खेळघर’ हा त्यांच्या जीवनाचा एक छोटासा भाग आहे. प्रत्यक्ष जीवन फार फार वेगळं आहे. वंचितांनी व्यापलेलं आहे. हिंसक अनुभवांनी भरलेलं आहे. ते सारं बाजूला सारून या शब्दांच्या, अमूर्त दुनियेत शिरणं त्यांच्यासाठी सोपं नाही, ह्याची कल्पना आम्हाला आहे.

आमची एक मैत्रीण म्हणते, पुस्तकं नसतील तर जीवनात केवढा रखरखाट होईल. विहिरीत तिच्या तळातून झरे नसतील तर ती कोरडी पडणार नाही का? वाचनातनं असं काही तहान भागवणारं मिळतं, त्यानं मन तृप्त होतं, न्हाऊन निघतं. जगायला उभारी मिळते, हे मुलांना जर समजलं तर ती वाचनाकडे तर झुकतीलच पण एकूण जगण्यासाठी प्रगल्भतेनं विचार करायला लागतील.

Tags: वाचन शुभदा जोशी वाचक चळवळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके