आरोगामी, क्रफ्ट्स, वस्त्र नक्षी काम यातही मुलं आवडीने काम करीत होती. आणखी एका कोपऱ्यात एक वेगळाच तंबू दिसला म्हणून पुढे जाऊन पाहिले तर तो होता ‘नॉन्सेन्स टेन्ट- वेड्यांचा बाजार!’ काही समजेना, आहे तरी काय? जाऊन एक पाटी वाचते तो हसून हसून पुरेवाट! चोरांच्या संमेलनात फुलनदेवींची पर्स गायब. ‘औरंगाबाद येथे आलू व बटाटा यांच्या भीषण टकरीत अनेक ठार.’ असा भित्तिपत्रकांनी तो तंबू शोभत होता. चित्रकला विभागात मुले मोकळेपणी रंगांची उधळण करीत होती. कागद घ्यायचा रंग घ्यायचे व मनात येईल ते चित्रं काढायचे, असा मनसोक्त कारभार चालू होता.
दिवाळीची तयारी सुरू झाली. तऱ्हेतऱ्हेच्या भेटवस्तू, कार्ड, रंगीबेरंगी आकाशदिवे, यांनी भरलेल्या दुकानांकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. कपड्यांच्या दुकानांतून नवनवीन फॅशनचे कपडे व पातळांच्या दुकानांतून विविध तऱ्हेच्या साड्यांचे रोज बदलणारे नमूने तरुणांना व स्त्रियांना आकर्षित करू लागले. गृहिणी दिवाळीच्या सामानाची यादी करू लागल्या, बालमंडळी फटाके व आकाश दिव्यांच्या तयारीला लागली! अशाच वातावरणात स्थानिक वृत्तपत्रांत व शाळांत आंतर भारतीचे उत्साही कार्यकर्ते मुलांना व पालकांना बाल आनंद महोत्सवाचे आवाहन करू लागले. सगळ्या घरांतून या महोत्सवाची चर्चा होऊ लागली. मुलंमुली आपापल्या मित्रमैत्रिणींना आनंदाने सांगू लागली, ‘आमच्याकडे एक अनोळखी, माझ्याएवढा पाहुणा येणार आहे!’ त्यांचे आई-वडीलही इथल्या आंतर भारतीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करू लागले. एवढ्या मोठ्या महोत्सवाला आपला हातभार लावू लागले.
हाडाचे कार्यकर्ते कोणत्याही कामात पुढेच असतात व आपल्या कामाने इतरांना प्रेरणा देतात. अखंड कामात गुंतलेले असूनही शांतपणाने व प्रसन्नपणाने वावरणारे प्रा. न्यायाधीश स्वयंसेवकांना फार मोठा दिलासा देत होते. त्यांनी आपल्याबरोबर तरुण मुला मुलींना स्फूर्ती देऊन कामाला जुंपले. ही जुंपणी मनापासूनची असल्याने काही वेळा या स्वयंसेवकांचे मार्गदर्शकही त्यांची काम पार पाडण्याचा वेग पाहून आश्चर्यचकित होत! हल्लीच्या मुलांना बेशिस्त, विक्षिप्त म्हणून नाव ठेवणारांना, या मुलांच्या सुप्त शक्तीला योग्य वाव दिला तर ते काय करून दाखवतात, याचं उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमातील त्यांची कामगिरी म्हणावी लागेल. एवढ्या मोठ्या उपक्रमाला पैशांचीही तशीच मोठी गरज. काही कार्यकर्ते या कामगिरीवर निघाले. नित्यनेमाने येणाऱ्या सणावारांप्रमाणे फंडही आपल्याला अपरिचित नाहीत, तेव्हा ही वर्गणी जमवताना आनंद महोत्सवाचे वेगळेपण सांगून पैसा जमा केला. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वांनी आपला वाटा उचलला आणि या सोहळ्याला हातभार लावला.
हा हा म्हणता 19 तारीख उजाडली. इथली राष्ट्रभाषा सभा कार्यालय लग्नघर झालं होतं. स्वयंसेवकांची कामं पद्धतशीर सुरू होती. मार्गदर्शनासाठी जवळ जवळ रोज सभा घेतली जाई व श्री. चंदूभाई शहा आणि अब्दुलभाई कामाचे नियोजन करत. एक दिवस आधीच तामिळनाडूहून पहिल्या पाहुण्यांची तुकडी येऊन थडकली. एकच धांदल उडाली. लगेच त्यांची व्यवस्था लावायला सुरवात झाली. मग शारदा मंदिर कन्याशाळेत त्यांची सोय केली. कारण एक दिवस आधी आल्याने त्यांच्या यजमान मित्राकडे जायला त्यांना अवकाश होता. इतका लांबचा प्रवास करूनही ही पाहुणी मुलं अगदी उत्साही दिसत होती. दुसऱ्या दिवसापासून एकामागून एक गुजरात, राजस्थान, मध्य भारत, कर्नाटक व महाराष्ट्रातूनही पाहुणे यायला लागले. रिक्षा, टांगे, एस. टी. च्या बसेस एका पाठोपाठ बालक पाहुणे व त्यांचे शिक्षक येऊन थडकायला सुरुवात झाली. कार्य कर्त्यांना व स्वयंसेवकांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळेना. या गावात हा पहिलाच अनुभव असल्याने काही वेळ गडबडल्यासारखे वाटले, थोडासा गोंधळही झाला तरी कमीत कमी वेळात पाहुणा- मुलगा व त्याचा यजमान मुलगा यांची गाठ घालून देण्यात यायला लागली. दोघेही हातात हात घालून जायला लागले.
काही यजमान बालकांना यायला उशीर झाला. काही आले नाहीत. मग पाहुणी मुलं जरा कावरीबावरी झाली, पण स्वयंसेवकांनी यजमान मुलांचे पत्ते मोहल्लावार मिळवून पर्वत- महंमद न्यायाने पाहुण्यांना यजमान मुलांच्या घरी अक्षरक्ष: तंगडेतोड करून पोचवले! यावेळी स्वयंसेवकांना मनुष्य स्वभावाचे विविध रंग दिसले. काही प्रेमळ पालकांनी पाहुण्या मुलांचं स्वागत इतकं आपुलकीनं केलं की, सोडायला गेलेला कार्यकर्ताही आनंदाने परतला. सगळ्या समारंभात कडू-गोड अनुभव येतात. विहिणींची रुसणी- फुगणी, उणीदुणी बोलणी झाल्याशिवाय जसा लग्नसमारंभ नाही, तसा पहिला आनंदाचा अनुभव घेतलेल्या कार्यकला काही ठिकाणी घराला कुलूप पाहून तोंडात बोट घालावं लागलं तर काही ठिकाणी पाहुण्यामुलांची वधू-परीक्षेसारखी रंग-रूप-जात-गोन अशी कसून परीक्षा सुरू झाल्यावर त्यांनी काढता पाय घेतला. पण काही उत्साही मंडळींनी तीन तीन, चार चार पाहुण्यांनाही आनंदाने ठेऊन घेतले. 21 नोव्हेंबर रविवार सकाळपासून घरच्या मुलांची व पाहुण्या मुलांची समारंभाला जाण्यासाठी स्वतःच आवरायची गडबड सुरू झाली. चांगले कपडे घालून व्यवस्थित वावरून मूल तयार झाली व शेजारच्या मुलांबरोबर सांस्कृतिक मंडळाकडे निघाली. 10-10॥ वाजल्यापासूनच हा परिसर बाल पाहुण्यांनी गजबजू लागला. मुलांबरोबर त्यांचे आईबाबा सोडायच्या निमित्तानं बालमहोत्सव समारंभ बघायला आले होते व संयोजकांनीही सर्वांना मुलांचा आनंद बघू दिला.
आत जाऊन पाहावे तर प्रवेशद्वारच इतके आकर्षक सजवलेलं की पहात रहावं. तऱ्हेतऱ्हेचे फुगे, माळा, पताका यांनी नटवलेले, पुढे गेल्यावर विस्तीर्ण पटांगणात शामियान्यानं वेढलेलं. ‘इतके तंबू? काय करणार मुलं इतक्या तंबूत?’ असा विचार करणाऱ्या पालकांना या पटांगणांत मध्यभागी मुलं एकत्र जमलेली दिसली. ठीक 11-30 वाजता महोत्सवाला प्रारंभ झाला. तर भारतीचे उत्साही कार्यकर्ते श्री. चंदूभाई शहा यांनी या मुलांना वैशिष्ट्यपूर्ण घोषणा देऊन उत्तेजित केले. त्या घोषणा होत्या ‘देशकी दौलत हम सच बच्चे,’ ‘देशकी रक्षा कौन करेंगे?- हम करेंगे!’ ‘औरंगाबाद हो या कोहिमा भारत हमारी एक मॉं’ देशभक्ती, देशप्रेम या भावना त्यांच्या मनात रुजवण्यासाठी व ठसवण्यासाठी त्यांना 2|3 गाणी म्हणायला शिकवली, एकाच वेळी हजारो मुलं एका सुरात एका तालात जोशभरी गाणी म्हणत असताना ऐकणं म्हणजे खराच आनंद महोत्सव होता!
अर्ध्या तासानंतर मुलांना वेगवेगळ्या तंबूत जायला सांगितले. मुले इकडे तिकडे पांगली. पहिला तंबू होता राष्ट्रीय एकात्मता दालन नावाचा. सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण मराठवाड्यातील सेलू या गावचे एक उत्साही व कल्पक शिक्षक श्री. गंगाधर गळंगे. अखंड व अविरत परिश्रमाने काय साध्य करता येते, याचे चालते बोलते उदाहरण! भारतातील प्रत्येक राज्याची त्या त्या राज्याच्या वैशिष्ट्यांसह अनेक चित्रांच्याद्वारा ओळख. तिथल्या नामवंत व्यक्ती व प्रसिद्ध स्थळ यांची चित्रे व त्या भाषेतील स्वागतपर वाक्य! याद्वारे बालकांना आपल्या देशांतील विविध भागांचे व संस्कृतीचे दर्शन होत होते. विज्ञान तंबूत ‘रागावू नका’ या फलकाने प्रेक्षकांचे स्वागत होत होते. ‘हे काय आहे?’ असा विचार करणाऱ्या मुलाच्या अंगावर अचानक रंगाची पिचकारी उडायची व तो रागवता रागवता इतरांच्या हसण्याने खजील व्हायचा प्रयोग दाखवणाऱ्या स्वयंसेवकांना स्वतःचे हसू दाबत त्यांचा राग चालवावा लागे. ज्वालामुखी, कुक्कटपालन, ट्रान्समीटर असे अनेक प्रयोग तिथे होते.
इथं होता कठपुतलीचा खेळ. खूप गर्दी जमली होती व खेळाशी समरस होऊन हसत होती. मुलांचा निखळ आनंद इथे प्रत्येक ठिकाणी अनुभवास आला. नाट्यविभागात तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे, चष्मे घालून हातवारे करत प्रत्येक जण अभिनयाचा श्रीगणेशा करीत होता. ‘इथे काय आहे?’ असे संगीत विभागाकडे जाताना विचारायचे कारणच नव्हते. वेगवेगळे सूर, ताल ‘इथे संगीत आहे’ असे सांगत होते. खूपशी मुले हाताला येईल ते वाद्य हाताने, तोंडाने वाजवत होती. गायन वर्गापेक्षाही जास्त कल्लोळ होता. पण ते वाजवताना त्यांची एकतानता व समाधान केवढे होते! ‘मनोरंजक बैठे खेळ’ या तंबूत काही मुले खेळात रमली होती. पण सर्वात आवडता तंबू कोणता असेल तर ‘पुस्तक घ्या व वाचा’ या पुस्तक विभागात विभागीय ग्रंथसंग्रहालयाने मुलांना वाचनाचे मुक्तद्वार खुले केले होते व तूषार्तासारखे बालवाचक पुस्तकांवर तुटून पडले होते! खेळण्यांचा तंबू ठेवणाऱ्या संयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुख्य म्हणजे या संपूर्ण उपक्रमात मुलांना इथे हात लावू नको, ते घेऊ नको, असा ‘नको’ चा जप ऐकू येत नव्हता!’ डमी बँक हेही मुलांना मोठेच आकर्षण होते. नोटा हातात उघडायचा बॅंकेचा व्यवहार करायचा आपल्या बाबांच्या थाटात मुलं वागत होती!
आरोगामी, क्रफ्ट्स, वस्त्र नक्षी काम यातही मुलं आवडीने काम करीत होती. आणखी एका कोपऱ्यात एक वेगळाच तंबू दिसला म्हणून पुढे जाऊन पाहिले तर तो होता ‘नॉन्सेन्स टेन्ट- वेड्यांचा बाजार!’ काही समजेना, आहे तरी काय? जाऊन एक पाटी वाचते तो हसून हसून पुरेवाट! चोरांच्या संमेलनात फुलनदेवींची पर्स गायब. ‘औरंगाबाद येथे आलू व बटाटा यांच्या भीषण टकरीत अनेक ठार.’ असा भित्तिपत्रकांनी तो तंबू शोभत होता. चित्रकला विभागात मुले मोकळेपणी रंगांची उधळण करीत होती. कागद घ्यायचा रंग घ्यायचे व मनात येईल ते चित्रं काढायचे, असा मनसोक्त कारभार चालू होता. आणि 2 केव्हा वाजले ते कळलेच नाही. घोषणा झाली: आपापल्या तंबूजवळच्या टेबलासमोर मुलांनी रांगा कराव्यात! एरवी दंगामस्ती करणारी मुले आज शहाण्यासारखी रांगा लावून खाऊ घ्यायला उभी राहिली होती. सर्वांना नाश्ता मिळाला व आपल्या पाहुण्याबरोबर, नव्या मित्र- मैत्रिणींबरोबर मुले खाऊ खायला लागली. नाश्ता खाऊन झाला व मुलांना एकत्र जमवून गाणी सांगितली गोष्ट झाली, गोष्ट झाली, पुनः घोषणा, अन पहिला दिवस संपला. दुसराही दिवस अशाच कार्यक्रमांनी पार पडला!
पुढचे आकर्षण होते शोभायात्रेचे. या सर्व मुलांना स्टेट बँक ऑफ हैद्राबादने टोप्या दिल्या होत्या. मुलगे आनंदाने टोपी घालीत होते तर मुली लाजत होत्या. मिरवणुकीच्या सुरुवातीलाच गजराज आपली सोंड उंचावून सर्वांचे स्वागत करीत होता. सर्वांत पुढे होते तामीळनाडूचे पथक. मुलेमुली उत्साहाने हातात झेंडे घेऊन, कोणी हातात फलक घेऊन घोषणा देत पुढे चालली होती. रस्त्यांवर घराघरांतून गॅलरीत, गच्चीवर सगळीकडे लोक कमालीच्या उत्सुकतेने उभे होते. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य व कौतुक दिसत होते. राजस्थानी वेषभूषेत चालणारी मुले वृक्षदिंडी मिरवीत होती. गुजराती पेहरावातल्या पाहुण्या ऐटीत होत्या. त्यांचे फोटो घेताना फोटोग्राफरांची धांदल उडाली. मिरवणुकीच्या मध्यभागी मुखवटे घातलेली काही मुले चालली होती. त्यात पुढे होते अप्पू, अस्वल व इतर काही. सगळ्यांना त्यांची मोठी गंमत वाटत होती! शहरभर विविध भागांत फिरून लेजीम खेळत, टिपऱ्या खेळत मिरवणूक आली सरस्वती भुवन प्रांगणात. पाहुणी व यजमान मुले यांची घरी जाण्याची गर्दी सुरू झाली. आता उद्याचाच दिवस राहिला अशी चुटपुट दोघांनाही वाटत होती. दोघांनी मिळून गंमत केली होती. वेरुळ पाहिले बालशिवाजी पाहिला व इतर सगळेच कार्यक्रम बरोबर! आई-बाबाही या चार दिवसांत बाळू बेबीचा काही हट्ट नाही म्हणून खुश!
समारोपाचा दिवस आला. बाळू-बेबीने सकाळीच बाबांच्या कानात सांगितले होते की आम्हा दोघांनाही गंमत आणा; बाबांनाही आपल्या मनातलेच ऐकून गंमत वाटली; कोणी पेन आणले, कोणी पुस्तक, तर कोणी पोषाख, मज्जाच मज्जा आली! आज आल्याबरोबर पटांगणांतील भारताच्या नकाशावर उभे करून श्री. चंदूभाईंनी गाणी सांगितली घोषणा दिल्या व लगेच मुले पळालीही तंबूकडे! आणि हे काय- इतक्यात नाश्ट्याची वेळही झाली. स्वयंसेवक खाऊच्या टोपल्या हातात घेऊन धावपळ करू लागले. टेबलासमोर मुलेही जमली. तीन वाजता भल्या मोठ्या शामियान्यात पालक व मुले जमू लागली. प्रत्येकाला जवळून नाटक पाहायचे होते, गाणी म्हणायची होती. पण इथे सगळे होते शिस्तीत. मुलांना मोठ्यांनाही व्यवस्थित बसवले. खूप कार्यक्रम झाले. प्रतिष्ठित नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे निरनिराळ्या छोट्या पाहुण्यांकडून स्वागत झाले. सर्व भाषातून देशाची महती सांगणारे खूप मोठे 13 कडव्यांचे गाणे तीन धुरीणांनी गाऊन दाखवले. मुलांनीही त्याच्या हिंदी पालुपदात आपला आवाज मिसळला. अखेर ‘जनगणमन’ झाले व जड पावलांनी सगळे घरोपरी परतले.
पटांगण रिकामे झाले, पण स्वयंसेवकांची मनं भारावलेलीच होती. त्यांना आता घरी जायला मन घेईना. यापूर्वीचा आठवडा सूर्य केव्हा उगवतो व केव्हा मावळतो हे त्यांना समजतही नव्हते. पण आता पुढे काय करायचे?. आमच्या सुप्त शक्तींचा साक्षात्कार या निमित्ताने आम्हाला झाला. त्याला आता पुढे काय वाव? पण प्रेरणा देणारांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनाही जाणवले की, ही प्रज्वलित झालेली स्फूर्तीची ज्योत कायम तेवत राहील व आपण तो अखंड कामाने तशीच तेवती ठेऊ.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या