डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तरीही शेषप्रश्न (मेरी बहने मांगे आजादी)

बाह्य परिसराबरोबरच आंतरिक शोध हा या कादंबरीचा महत्त्वाचा धागा आहे. बलात्कार आणि त्या गुन्ह्याला शिक्षा हा विषय चर्चेला आल्यानंतर प्रत्येकीने स्वत:चा घेतलेला धांडोळा मुळातूनच पाहावा असा आहे. बलात्कार व रतिप्रेरणा या दोन्ही मुद्यांबाबत किती खोलात उतरावे लागते आणि त्यातून कायदा एक साधन म्हणून किती तुटपुंजा ठरतो, हेही समोर येते. या विषयाच्या निमित्ताने स्त्रियांनी प्रथमच स्वत:बद्दल काही तपशील शब्दबद्ध केले आहेत. ही अबोल संवेदना व्यक्त करण्याची प्रक्रिया वैचारिक स्पष्टतेला फार मदत करणारी आहे. हा धागा पकडून वाचक मित्र- मैत्रिणी चर्चेसाठी आणि वादविवादासाठी या पुस्तकाचा वापर करतील, अशी आशा लेखिकेने तिच्या मनोगतात व्यक्त केली आहे; त्याला ही ‘बोलतं’ होण्याची प्रक्रिया निश्चितच मदत करू शकेल.

ग्रंथालीची पुस्तके ही एक ओळख आता तयार झाली आहे. स्त्रियांच्या चळवळी हा मराठी समाजातील एक अग्रक्रम झाला, त्याला आंतरराष्ट्रीय महिला वर्षापूर्वीही समाजसुधारणेच्या क्षेत्रात स्थान होते. या पार्श्वभूमीवर छाया दातार यांचे हे पुस्तक- त्यांनीच म्हटल्याप्रमाणे- ‘डॉक्यू नॉव्हेल’ या नव्या प्रायोगिक रूपबंधात आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गेल्या चाळीस वर्षांतील (1973 ते 2013 या काळातील) स्त्रियांच्या चळवळीचा हा आलेख आहे, पण प्रबंध नव्हे आणि सहभागी व्यक्तींचे व्यक्तिगत अनुभव व आठवणींचे कथन असले तरी ती चरित्रे किंवा लेखिकेचे आत्मचरित्रही नव्हे. यामुळे एक चर्चाविश्व हेच ललितविश्व झाले आहे, त्यात दस्तावेज कथनाचे घटक म्हणून अवतरले आहेत. यात जशी एक सोय अन्‌ मोकळीक मिळाली आहे, तशीच चर्चेला आणि कथनाला एक वस्तुनिष्ठ परिप्रेक्ष्यही प्राप्त झाला आहे. कथन कालदृष्ट्या सहज पुढे-मागे नेता आले आहे आणि घटनांची गती व वैचारिक मंथन यांच्या वेगवेगळ्या चलनाला वाव राहिला आहे.

सुधा, निर्मला, ललिता, चारू आणि साधना हा मैत्रिणींचा एक गट आहे. त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे; पण स्त्रीप्रश्नाच्या आस्थेने, काही तरी निश्चित प्रगतीचे पाऊल पडले पाहिजे या कर्तेपणाच्या ओढीने त्या एकत्र आल्या आहेत. हा गट औपचारिक संस्थेचे रूप घेत नाही, सहविचार आणि सहमती यावर विसंबून चालतो. अभ्यास करतो, वाचन अखंड चालू ठेवतो आणि प्रत्यक्ष कृतीतही दाखल होतो, नेतेपदाची जबाबदारी स्वीकारतो. या गटाचे बनणे, घडणे, वाढणे, फुटणे, पुन्हा नव्याने चालू राहणे आणि अखेरीस नव्या पिढीने जुन्या गटाला बाजूला होण्याची विनंती करून आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सज्ज होणे- ही सर्व प्रक्रिया व्यक्तिगत विचार आणि मर्यादांच्या तपशिलासह यात आली आहे. स्त्री चळवळीच्या दृष्टीने भारतीय महिलांच्या सामाजिक स्थानाचा पहिला अहवाल, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व दशक, जागतिक पातळीवरील चळवळीशी संपर्क व नाते, हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार याविषयीच्या कायद्यासाठी लढा आणि स्त्रियांना राजकीय व्यवस्थेत स्थान देणारे निर्णय आणि न संपणारा पुरुषी वर्चस्वाविरुद्ध लढा, ‘निर्भया’ प्रकरणानंतरचा लैंगिक हिंसाचाराचा शस्त्र म्हणून होत असलेला वापर येथपर्यंत हे कथन आपल्याला घेऊन येते.  

यातला एक विशेष असा की, यातील पात्रे अत्यंत विचारशील आहेत. आपली भूमिका घेताना स्वत:ला घासून-पुसून, तपासून व प्रत्यक्ष कृतीत उतरणारी आहेत. अनेक वेळा ‘आवाज उठवणे’ महत्त्वाचे आहे, कधी कायदेशीर अभ्यास महत्त्वाचा आहे. कधी स्वत: जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचा आणि पीडित महिलांना धीर देण्याचा मुद्दा आहे, तर कधी संस्थांच्या कारभारातील तपशील लक्षात घेण्याचा आहे. चळवळीतील कार्यकर्त्या आपली मूळ सांस्कृतिक पठडी सोडून जेव्हा स्वत:चा असा स्वतंत्र विचार करू लागल्या, तेव्हा त्यातील टप्पे सूक्ष्म पातळीवर व प्रांजळपणे मांडलेले दिसतात. या घडमोडी एरवी इतिहासात नमूद होत नाहीत, परंतु सामाजिक प्रक्रिया म्हणून त्या परिवर्तनाच्या खुणा असतात.

विचारशीलतेच्या या चित्रणामुळे स्त्रियांच्या समूहातील एक महत्त्वाचा पट समोर येतो. सर्वसाधारणपणे ‘बायका’ हा उल्लेख सरसकट केला जातो व ‘बायकांची अक्कल चुलीपुढे’ वगैरे वळणाची नजर बायकांच्या प्रश्नाकडे बघताना नेहमी लक्षात येते. या कादंबरीत स्त्री स्वत:चा विचार करू लागली की तिच्यासमोर उघडू शकणारे पर्याय, तिचे स्वत:विषयीचे व परिस्थितीचे आकलन, तिच्या प्रेरणा व निर्णय या प्रत्येक वैशिष्ट्यागणिक ‘बायका’ हा एकगठ्ठा सामूह राहत नाही; तो विविध वैशिष्ट्ये असणाऱ्या उपगटांत विभागलेल्या व्यक्तींचा समूह म्हणून दिसू लागतो. आणखीही एक गोष्ट जाणवते की- पीडित स्त्रिया आणि या स्वयंसेवी कार्यकर्त्या यांचे नाते कधी प्रशिक्षकाचे तर कधी मैत्रिणीचे, तर कधी ‘तारक’ हात देणारीचे असते. बाकीचा समाज त्यांच्याविषयी गैरसमज करून घेण्यात, पसरविण्यात किंवा दुर्लक्ष करण्यात आपला प्रतिसाद बसवत असतो. अनेकदा समानतेचे आणि स्वातंत्र्याचे वारे ज्यांना सहन होत नाही, असे लोक सरळसरळ यांच्यावर चिखलफेक करून पायातली वहाण पायात ठेवण्याचे नवे धडे तयार करत असतात. एक आणखी बोचरी गोष्ट यात पुढे येते, ती म्हणजे- स्त्रिया एकमेकींना वेगवेगळ्या गटांत समाविष्ट करतात आणि त्यामुळे स्त्रीला इतर अस्मितांचे पदर बाजूला ठेवून नागरी मुद्दे साध्य करण्यासाठीही एकजुटीने जोर लावता येत नाही. जे जाती- अंताचे, तेच नारीमुक्तीचे. गेल्या काही काळात अस्मितेचे केलेले संकोच आणि प्रागतिक विचारातही झालेली जातीय अस्मितेची लागण. पांढरपेशा सवर्ण स्त्रिया आणि दलित किंवा मुस्लिम स्त्रिया यांचे एकाच ध्येयासाठी झगडताना पडणारे सवतेसुभे ही एक वेदना याच तपशिलाचा भाग बनते. यामुळे राजकारणात स्त्रियांचा म्हणून वेगळा एकजुटीचा आवाज उठत नाही. या सर्व उलाढाली आणि त्यातली तगमग या कथनांमध्ये व्यक्त झाली आहे.

बाह्य परिसराबरोबरच आंतरिक शोध हा या कादंबरीचा महत्त्वाचा धागा आहे. बलात्कार आणि त्या गुन्ह्याला शिक्षा हा विषय चर्चेला आल्यानंतर प्रत्येकीने स्वत:चा घेतलेला धांडोळा मुळातूनच पाहावा असा आहे. बलात्कार व रतिप्रेरणा या दोन्ही मुद्यांबाबत किती खोलात उतरावे लागते आणि त्यातून कायदा एक साधन म्हणून किती तुटपुंजा ठरतो, हेही समोर येते. या विषयाच्या निमित्ताने स्त्रियांनी प्रथमच स्वत:बद्दल काही तपशील शब्दबद्ध केले आहेत. ही अबोल संवेदना व्यक्त करण्याची प्रक्रिया वैचारिक स्पष्टतेला फार मदत करणारी आहे. हा धागा पकडून वाचक मित्र-मैत्रिणी चर्चेसाठी आणि वादविवादासाठी या पुस्तकाचा वापर करतील, अशी आशा लेखिकेने तिच्या मनोगतात व्यक्त केली आहे; त्याला ही ‘बोलतं’ होण्याची प्रक्रिया निश्चितच मदत करू शकेल.

कादंबरीचे नाव शरदबाबूंच्या गाजलेल्या बंगाली कादंबरीत मांडलेल्या स्त्रीप्रश्नावरून घेतले आहे. कादंबरीत अनेक साहित्यिक कृतींचा संदर्भ, उल्लेख, चर्चा आहेत. ‘स्वतंत्र स्त्री’ हे समाजाला न पेलणारे प्रकरण आता थेटपणे समोर येऊन उभे आहे. आर्थिक आणि राजकीय सत्ताकारणात ते पाय रोवू इच्छिते आहे, कधी कधी यशही मिळवत आहे. समाजाच्या चौकटी स्त्रीला स्वतंत्र ठेवून कशा बांधल्या जाऊ शकतील, हा प्रश्न किती काळ ‘शेष’ राहील याचे भाकीत आज तरी वर्तवणे कठीण आहे.

सरतेशेवटी हे चर्चाविश्व समाजाच्या सर्व स्तरांना कवेत घेत असले, तरी तो बौद्धिक आवाका आणि त्या वैचारिक आस्था या जगण्याच्या भ्रांतीतून मोकळा असणारा वर्गच अंगावर घेईल अशा आहेत. कृतीच्या प्रत्यक्ष पातळीवर चालणारे काम आणि हा प्रांत यांची मैत्री जितकी दृढ व गाढ असेल, तेवढे चळवळीचे व सामाजिक कामाचे एकसंध रूप आकाराला येईल आणि अधिक परिणामकारक ठरेल. तसे होवो, अशी शुभेच्छा द्यावीशी वाटते.

तरीही शेषप्रश्न (मेरी बहने मांगे आजादी) 
लेखिका : छाया दातार 
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई. 
मूल्य : 300 रुपये   
 

Tags: श्यामला वनारसे ग्रंथाली छाया दातार तरीही शेषप्रश्न Shyamla Vanarase Granthali Chaya Datar Tarihi Sheshprashna weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्यामला वनारसे
svanarase75@gmail.com

मानसोपचारतज्ज्ञ. पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाच्या संस्थेच्या संचालक.  पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके