डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्मिता पाटील महोत्सवाच्या निमित्ताने...

१४ डिसेंबर २०१४ रोजी, पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात, तिसरा स्मिता पाटील लघु-माहितीपट महोत्सव पार पडला. ‘आरोग्य सेना’ या संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ६० लघुपट/माहितीपट या स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेच्या परीक्षक श्यामला वनारसे यांचे हे मनोगत.  

यंदाच्या महोत्सवात अंतिम फेरीत दहा अनुबोधपट होते. त्यात परीक्षक म्हणून काम करताना काही प्रश्न उभे राहतात. अशा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा नव्या उत्साहाने काम करणारे तरुण, काही उमेद आणि आकांक्षा मनाशी धरून सहभागी होतात. स्पर्धेसाठी येताना आपली फिल्म वेळेत तयार ठेवताना त्यांची खूप धडपड झालेली असते. सध्याच्या वातावरणात अनेक ताण आहेत आणि त्या सगळ्यांचे अपार औत्सुक्य माझ्या मन:चक्षूसमोर होते. आता काहीही निर्णय दिला तरी काही जण फारच नाराज होणार आणि त्यांचा अपेक्षाभंग होणार याचीही जाणीव जागी होती. म्हणून प्रथम बघताना सगळे समान धरून बघायला सुरुवात केली. 

पाहता पाहता एक गोष्ट लक्षात आली की सर्वांची या माध्यमाविषयीची समज आणि तांत्रिक पकड सारख्या पातळीची नाही. काहींनी कल्पना सुचल्याबरोबर थेट करायला सुरुवात केली असावी, तर काहींनी आपल्या फिल्ममध्ये आपण काय दाखवणार याचे शब्द सापडल्याबरोबर करायला घेतली. शब्द आणि दृक्‌श्राव्य प्रतिमा यांच्या संगमातून कोणती समृद्ध भाषा निर्माण करता येते याकडे लक्ष तसे कमीच दिसले. 

असे का होत असावे, याविषयी माझ्या मनात विचार चक्र चालू झाले. एकतर आजवर पाहिलेल्या अनुबोधपटांचा अनुभव. पूर्वी मुख्य चित्रपट सुरू होण्याआधी काही अनुबोधपट दाखवले जात. त्यापैकी अनेकांची पद्धत सरधोपट असे. उदा. पडद्यावर एक शाळकरी मुलगा चालताना दिसे आणि शब्द ऐकू येत, हा पहा गोपू. याला रोज शाळेत पोचण्यासाठी पायपीट करावी लागते... इत्यादी हे बघताना आपल्याला कंटाळा येतो, पण या मुलाचा प्रश्न कसा मांडला म्हणजे तो केवळ शाब्दिक वाटला नसता? या प्रश्नाकडे आपण सहसा वळत नाही. आज ज्याला चित्रपट बनवायचा आहे त्याला बघण्याच्या अनेक संधी नव्या आणि सोप्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष प्रशिक्षण संस्थेत जाऊन शिकण्याची शक्यता नसते तेव्हा जास्तीत जास्त आणि आपल्या योजनेशी संबंधित चित्रपट बघणं ही तर साधी अट म्हणता येईल. 

असे आपण कितीही चित्रपट पहिले तरी आपल्याला कारायचा असलेला, आपल्या मनातला चित्रपट वेगळाच असणार. त्यासाठी मला काय म्हणायचे आहे, ते मी कोणत्या दृश्यांचा वापर करून म्हणणार, कोणत्या ध्वनींचा वापर करणार, याची जुळवाजुळव करावी लागेल. याच वेळी कदाचित ही योजना आपण प्रत्यक्षात आणली तर त्यातून आपले ‘सांगणे’ पोचेल का याचाही विचार करण्याचा टप्पा येतो. यात एक धाडस असल्यामुळे कोणी हमी देऊ शकत नाही, तरी ज्याला व्यवसायाच्या भाषेत हिशोबी जोखीम म्हणतात, तो हिशोब गाठीशी हवा! अनेक वेळा असं होतं की कल्पना भन्नाट वाटते, ग्रेट वाटते. कारण त्यावरून कोणी काही, कोणी काही प्रतिसाद देतात. यात आपल्या दृश्य-श्राव्याने आलेला भाग कोणता आणि त्या त्या माणसाने स्वत:च्या विचारविश्वात चढलेल्या श्रेणी कोणत्या यात फरक करता येणे गरजेचे आहे. कल्पनेला आलेला प्रतिसाद आणि प्रत्यक्षात पदरी आलेली हिरमोड करणारी प्रतिक्रिया याच्या मागे अनेकदा पडद्यावर काय दिसले आणि मला काय वाटले यातला फरक लक्षात न घेण्याची चूक झालेली असते. 

वास्तवाचे चित्रण हा या प्रकारातला मुख्य भाग. त्यासाठी वास्तवाचे जे तुकडे निवडले आणि त्याबरोबर जे शब्द आले त्यातून मला जे म्हणायचे होते ते झाले की परत हा पहा गोपू असंच झालं? असा प्रश्न विचारण्याची सवय असली तर स्वत:च्या कामाचे इतरांनी परीक्षण करण्यापूर्वीच स्वत:जवळ ‘आपली यत्ता कुठली?’ याचं उत्तर पुसटपणे का होईना पण तयार झालेलं असतं. 

वास्तवाचे चित्रण करताना मोठ्या प्रमाणात मुलाखती आणि जागेवर जाऊन केलेलं चित्रण यांचे मिश्रण केलेले असते. यातली माणसे आपापल्या कामात खंदी असली तरी कॅमेरा आणि त्यासमोर बोलणे बहुधा त्यांच्या परिचयाचे नसते. त्यांचे विचार आपल्याला पोचवायचे असल्यास त्यांचे बोलके अर्धपुतळे उपयुक्त ठरतात की वेगळी सिनेमटिक तंत्रे निवडावीत? हा प्रश्नच मनात येतच नसावा असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. जागेवर जाऊन चित्रण करताना प्रकाश, तेथील कामाच्या वेळा आणि वातावरण यांचे समावेश आपतत: येतात की त्यांच्यामार्फत काही सांगितले जात असते? जाणीवपूर्वक? की तिथेही पुन्हा बोलणारे चेहरे पकडण्यातच लक्ष राहते?

 कॅमेरा हे नोंद करणारे, अंकन करणारे यंत्र आहे. त्यामुळे अनेकदा जुने फोटो हेही एक महत्त्वाचे कलम होते. काळाचा बोध या प्रतिमांची शैलीही देत असते. चित्रपटभाषा मूर्त तपशील वापरत असते. त्यामुळे सामान्य बोध घडवताना काय करावे किंवा काही करावे लागेल याविषयी काळजी घेतलेली दिसली नाही. काही विषय दृश्य म्हणून जे सांगतात ते फारसे पदर उलगडत जाणारे नसते. पण कथनात तर अनेक पदर जाणवून देण्याची इच्छा व्यक्त होते. मग तेच ते घुमे दृश्य आणि ऐकू येणारे बोलणे मात्र एकदम विचाराच्या वेगळ्या पातळीवर हे रसायन कंटाळवाणे किंवा एकसुरी वाटू लागते. एखादे दृश्य एखादा मुद्दा किती वेळ निभावू शकेल याचे हिशोब चुकले की फसगत होते. 

चित्रपट बनवताना एक संपूर्ण विचार आणि अभिव्यक्ती सादर करायची आहे याचे भानही काही वेळा सुटते. आता कळलं, अजून कशाला चालू आहे? असं वाटणं किंवा हे काय? काहीच न सांगता संपला सिनेमा? असे प्रश्न निर्माण झाले की हे दुखणे पुढे येते. 

सुरुवात, मध्य आणि शेवट यांचा संपूर्णभाव निर्माणच झाला नाही तर वेगळीच फसगत होते. कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाची ‘शाळा’ घेण्यासाठी या लेखाचा प्रपंच केलेला नाही. काही सर्वसामान्य निरीक्षणे नोंदवली आहेत. मलाही परीक्षक म्हणून काम करताना काही मुद्दे स्पष्ट झाले. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारा चित्रपट होता, ‘कॅफे इराणी चाय’ मुंबईच्या जीवनात ‘कोपऱ्यावरचा इराणी’ ही एकेकाळी अविभाज्य चीज होती. तिची निर्मिती, तिचे कोणाकोणाच्या जीवनात ‘अविभाज्य’ स्थान कसे निर्माण झाले आणि तिचे आजचे पालटलेले रूप कसे घडत गेले याचे चित्रण त्यात होते. त्यासाठी ऐतिहासिक घटनांची कल्पनाचित्रे, जुने फोटो, वयस्क माणसांच्या मुलाखती आणि ‘सेलेब्रिटी’ मंडळींचे कालचे आणि आजचे अनुभव अशा गोष्टींचा समावेश होता. त्यात तिथे बसून चहा पिणे गप्पांचा अड्डा जमवणे, भेटी घेणे आणि रेडिओ ऐकणे अशा अगदी जुन्या काळाच्या युक्त्याही होत्या आणि वडिलांनी किंवा एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने राजरोस हॉटेलात नेल्याचा अपरूपाचा भाग होता आणि जुना काळ कसा बदलत गेला याचे दर्शनही होत होते. शिवाय इराणी लोक इतर आक्रमक टोळीवाले आले तसे न येता, ‘दुधातल्या साखरे’प्रमाणे इथे विरघळून राहिलेले भारतीय आहेत आणि या इतिहासाबद्दल कृतज्ञही आहेत ही महत्त्वाची गोष्टही या चित्रपटाची गुणवत्ता वाढवणारी ठरली. इराणी हॉटेलात संस्कृतिसंगम कसा चालू होता त्याचे एक हृद्य चित्रण बघायला मिळाले. स्पर्धेतील यशाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कलाकाराला स्वत:मधला समीक्षक सतर्क ठेवायला मदत हे या स्पर्धेचे अधिक उपयुक्त फलित होईल.
 

Tags: अनुबोधपट श्यामला वनारसे स्मिता पाटील महोत्सव smita patil shyamala vanarase smita patil film festival weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्यामला वनारसे
svanarase75@gmail.com

मानसोपचारतज्ज्ञ. पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाच्या संस्थेच्या संचालक.  पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके