डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्या ज्या ठिकाणी सत्त्वाचा नि स्वत्वाचा मुद्दा असेल त्या त्या ठिकाणी श्रम आणि समता, सहकार्य आणि स्नेह, अविश्रांत कष्ट आणि लढाऊ वृत्ती यांचे सूत्र ते सांगत राहतात. त्यांचे पोवाडे तीन प्रकारचे आहेत. त्यामध्ये वैयक्तिक बलिदान करणारे हुतात्मे (भाई कोतवाल, वसंत दाते, हेमू कलाणी, मकबूल शेरवाणी यांचे बलिदान), स्वातंत्र्य लढ्याचे नेते (लोकमान्य टिळक, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, गांधीजी), आणि जनआंदोलने (संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम, काश्मीरवरचा हल्ला) या सर्व ठिकाणी ते जीवनमूल्ये सांगतात, त्याग आणि कष्टाची महती सांगतात, तसेच वैचारिक बैठकदेखील विशद करतात. पोवाड्यांच्या रचनेची लय, डफावरची थाप, तुणतुण्याचा स्वर आणि बाज आणि शब्दांची लय यांचा मेळ भवताल व्यापून राहतो आणि लक्ष देऊन ऐकायला प्रवृत्त झालेल्या श्रोत्यांना अस्सल मराठीचा बाज राष्ट्रीय भानाचे संस्कार देत जातो.

 

वसंत बापट यांची कविता म्हणजे एक शतकिरण उधळणारा लोलक आहे. या लोलकाने मराठी कवितेचा प्रांत नुसता शोभिवंत केला नाही; तर त्याला एक सळसळती ऊर्जा बहाल केली. बापटांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्या उजळ दिवसांचे स्मरण अपरिहार्यपणे होते. भारताच्या राष्ट्रकल्पनेची घडण ज्या समावेशक इतिहासातून झाली, तिच्यामधील उणिवा काढून टाकून सुसंस्कृत परंपरेचा आणि आधुनिक प्रगतिशीलतेचा कणा असलेला भारत घडविणे हे नवस्वतंत्र भारताचे स्वप्न होते. स्वातंत्र्याचा लढा चालू असताना अनेक कवी आणि कलावंत या स्वप्नाचे रंग भरत एक मनोमनी उज्ज्वल भारत बघत होते आणि घडवत होते. या कवींबद्दल ‘कवी तो होता कसा आननी?’ या प्रश्नापेक्षा ‘कवी तो भिनला कसा मनोमनी?’ हा प्रश्न प्रस्तुत आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने याच प्रश्नाचा वेध घेते.

1920 च्या दशकात जन्मलेली बापटांची पिढी भारतीय इतिहासाला मिळणाऱ्या वळणाची नुसती साक्षी नव्हे तर ते वळण देण्यात सहभागी होती. इंग्रजी सत्तेचे स्वरूप ओळखणे, भारताची पृथगात्मता स्पष्ट करणे आणि पुढच्या वाटचालीसाठी रस्ता खोदणे हे अवघड काम राजकीय आणि सामाजिक नेत्यांपुढे ठाकलेले होते. त्या अनुषंगाने चाललेल्या आंदोलनाचे वैचारिक आणि कृतिशील रूप हा या राष्ट्रकवीचा परिसर होता. त्यात राजकीय आधी की सामाजिक आधी, असा ऊहापोह होता, सत्तेचा अर्थ लावण्याची शिकस्त होती आणि ब्रिटिशांनी जे  आव्हान उभे केले त्याचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक जगाचे दरवाजे उघडून नव्या दिशाही खोलून दाखवल्या होत्या. त्याकडे फक्त 

साहेबाचा पोऱ्या मोठा अकली रं

बिन बैलानं गाडी कशी ढकली

अशा नवलाने थक्क झालेल्या दृष्टीने पाहून पुरणार नव्हते. त्यासाठी रवींद्रनाथांसारखे व्यापक विचार करणारे तत्त्वज्ञ हवे होते, राजा राममोहन राय यांच्यासारखे, महर्षी कर्व्यांसारखे कर्ते करविते सुधारक हवे होते आणि जगदीशचंद्र बोसांसारखे वैज्ञानिकदेखील हवेच होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणात टिळकयुग संपून गांधीजींचे युग सुरू झाले. जगभरातील पारतंत्र्यात अडकलेल्या नि:शस्त्र जनसमूहांना नवा नैतिक पर्याय उभा राहत होता. याची ऊर्जा बापटांच्या पिढीमध्ये संक्रमित झाली. भारतीय समाज एकात्म व्हावा, समतेवर आधारलेला असावा, त्याचे नैतिक मूल्य सत्य आणि अहिंसा यांवर निष्ठा ठेवणारे असावे आणि परकी सरकारने कितीही जुलूम केला तरी त्याचा अहिंसक प्रतिकार करण्याचा मानवी हक्क आपण बजावायचा आहे ही धारणा त्या पिढीच्या नवतरुणांना घडवत होती. बापट या स्वप्नात, या लढ्यात सर्वार्थाने सहभागी झाले आणि त्यांच्या संवेदनशील कविप्रतिभेने त्याचीच गाणी रचली आणि कविता लिहिल्या.

‘बिजली’पासून सुरू झालेले कवितासंग्रह क्रमाक्रमाने वर उल्लेख केलेल्या गाभ्यात मूळ धरून अनेक वाटा चालताना दिसतात. त्यांची सत्य-सुंदर-मंगलाची आराधना चालूच  राहिली.

स्वातंत्र्याची गीते राष्ट्र सेवा दलाच्या शाखांवर म्हणण्यासाठी, सभांमध्ये आरंभ करण्यासाठी आणि कलापथकाच्या कार्यक्रमासाठी लिहिली गेली. त्यात ध्येयगीते आहेत, एखाद्या आंदोलनासाठी लिहिलेली गीते आहेत आणि नेत्यांच्या जीवनातून स्फूर्ती देणारी गीतेही आहेत. यांपैकी एक महत्त्वाचे गीत म्हणजे

‘सदैव सैनिका पुढेच जायचे

न मागुती तुवां कधी फिरायचे’

या गीतात नवभारताच्या उभारणीसाठी सिद्ध झालेल्या सैनिकाने काय तयारी ठेवायची आहे हे स्पष्ट केले आहे.  त्याचे आयुष्य खडतर असणार. त्याला अपार कष्टाची तयारी ठेवावी लागणार. सुख आणि मोह यांना झुगारून आपली वाट चालायची आहे.

‘सदा तुझ्यापुढे उभी असे निशा

सदैव काजळी दिसायच्या दिशा’

हे पत्करूनच ही वाट चालायची आहे; कशाचीही क्षिती न बाळगता पुढे जायचे आहे. आणि पुढे म्हणजे कुठवर? तर

‘नभात सैनिका प्रभात येऊ दे

खगांसवे जगा सुखात गाऊ दे ...’ आणि

‘न पाय तोवरी तुझे ठरायचे’

हे एकच गीत उचलले तर स्वातंत्र्यसैनिक म्हणवून घेण्याच्या पूर्व अटी लक्षात येतात. सार्वजनिक कामात पडतानादेखील अशीच वृत्ती ही त्या नैष्ठिक स्वातंत्र्यलढ्याची मागणी होती.

‘मानव तितुका एकची आहे उच्च न कोणी नीच न कोणी,

हाच आपुला धर्म खरोखर हीच आपुली शाश्वत वाणी’

यासारखे गीत जितक्या सहजपणे  जिभेवर रुळत असे, तितकेच ते मनात झिरपून विचारांना खाद्य पुरवत असे. सेवा दलात यांच्या बरोबरीने ‘सारे जहां से अच्छा’ असे किंवा ‘नौजवान  वीरता की है कसौटी आज, तुम शेर हो दिलेर हो रखो वतन की लाज’ अशी इतर याच कुळातील गीतेही असत. यांचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला की ब्रिटिशांच्या काळात सरकारने अनेक कवींच्या कविता जप्त केल्या होत्या. त्या सगळ्या कवींचे एक राष्ट्रकुल होते. बापट त्यात मराठीचे सरदार होते.

या कुळातील गीतांचा वैचारिक आणि स्फूर्तीचा गाभा एकाच होता. त्यात इक्बाल होते, सुभद्राकुमारी चौहान होत्या, जांनिसार अख्तर होते, सर्व भाषा आणि प्रांत या कुळात सामील होते. सगळ्यांना ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ हा अदम्य विश्वास होता. आंदोलनाच्या काळातील जनमानस हे कवी घडवत होते. (आज शेतकरी आंदोलनातील स्त्रिया आपापली गीते गात आहेतच!) याचा पाया देशभक्ती आहे तसा सत्याग्रही आणि शिस्तीचाही आहे. (या दृष्टीने ग्रंथालीने प्रसिद्ध केलेले ‘स्वातंत्र्याची ऊर्मी’ हे पुस्तक वाचनीय आहे.)

श्रमप्रतिष्ठा हेही मूल्य या सगळ्या विचारव्यूहात अनुस्यूत होते. जयप्रकाश नारायण यांच्या ‘देशासाठी एक तास’ या योजनेच्या वेळी बापटांनी ‘एक तास, एक तास, द्या देशाला एक तास, हाच असू दे घोष मुखी हाच असू दे सकलां ध्यास’ असे गीत लिहिले होते आणि सेवा दलाच्या सेवा पथकाने महाराष्ट्रात श्रमदानाचे एक सत्र चालवले होते. बापटांच्या या प्रकारच्या गीतांचे वर्णन करायचे तर ही सामूहिक मूल्यभानाची गीते होती, असे म्हणता येईल.

‘तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकंल सोन्याचं रान

चल उचल हत्यार गड्या होऊन हुश्शार तुला नव्या जगाची आण’

हे गीत नुसते आवाहक नाही, तर त्यात साफल्याची भावना आणि स्वप्नपूर्तीची आशा- अशा भावबंधांचाही समावेश आहे. अशा गीतांचा मुद्दाम वेगळा विचार केला की लक्षात येते की त्यातून मूल्य, कृती आणि भावनिक सार्थक असे तिन्ही पदर विणलेले आहेत.

राष्ट्रकाव्य असण्याचा खास मराठी मान पोवाड्याचा. या बाबतीत बापट भाषेचे जे लावण्य वीरश्रीच्या बरोबरीने व्यक्त करतात ते पाहून मन थक्क होते. मी अगदी लहानपणी त्यांचा शिरीषकुमारचा पोवाडा पहिली-दुसरीच्या वर्गात म्हटला होता. त्याचे पूर्ण हस्तलिखित पुढे पोवाड्यांचे पुस्तक छापले तेव्हा मिळू शकले नाही याचा मला स्वत:ला फार खेद झाला. मला त्यातला काही भाग आठवला ‘खानदेशी गाव टुमदार, नाव नंदुरबार’ अशी सुरुवात, ‘आली आली मिरवणूक आली, मुले अन्‌ मुली होती इवलाली उत्साहाला भरती आली अनिवार’...असा मधला भाग आणि ‘धन्य धन्य शिरीष कुमार, वीर अन्‌ धीर, गाई शाहीर पोवाडा त्याचा स्फूर्तिदायी, बोध घ्या बंधू त्यात काही, बिदागी हीच आम्हां भाई’ असा शेवट एवढाच माझ्याजवळ शिल्लक आहे, पण त्या वेळचा जोश मात्र अवर्णनीय असे!  बापट रचनेचे प्रभू होते. पोवाडा रचनेतला भाषेचा जोश आणि मनोवृत्तीची रग, वर्ण्य विषयाचे मर्मस्थान असलेले गुण आणि सादरीकरणाचा बाज याची पथ्ये पाळून त्यांच्या रचना कंठगत करायला सोप्या जातात.  खरे तर बापटांचे पोवाडे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ऐतिहासिक काळात स्फूर्ती देणारी ही रचना काही काळ पूर्वजगौरवात रमली. बापट तत्कालीन वर्तमानातले स्फूर्तिदायक विषय घेऊन त्यांचा आशय जनमानसात रुजवत गेले. महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्राची अस्मिता भारतीय अस्मितेला नाकारणारी नाही, तर तिची अंतर्गत विविधता खुलवणारी आहे हे प्रतिपादन ते करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी

‘आम्ही नेक मराठे हिंदभूमीचे पुत्र

आम्ही सर्व मानतो एकच हिंदी छत्र

आमुचे आम्हांला घर राहू दे मात्र’

अशी भूमिका ते मांडतात आणि ज्या ज्या ठिकाणी सत्त्वाचा नि स्वत्वाचा मुद्दा असेल त्या त्या ठिकाणी श्रम आणि समता, सहकार्य आणि स्नेह, अविश्रांत कष्ट आणि लढाऊ वृत्ती यांचे सूत्र ते सांगत राहतात. त्यांचे पोवाडे तीन प्रकारचे आहेत. त्यामध्ये वैयक्तिक बलिदान करणारे हुतात्मे (भाई कोतवाल, वसंत दाते, हेमू कलाणी, मकबूल शेरवाणी यांचे बलिदान), स्वातंत्र्य लढ्याचे नेते (लोकमान्य टिळक, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, गांधीजी), आणि जनआंदोलने (संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम, काश्मीरवरचा हल्ला) या सर्व ठिकाणी ते जीवनमूल्ये सांगतात, त्याग आणि कष्टाची महती सांगतात, तसेच वैचारिक बैठकदेखील विशद करतात. पोवाड्यांच्या रचनेची लय, डफावरची थाप, तुणतुण्याचा स्वर आणि बाज आणि शब्दांची लय यांचा मेळ भवताल व्यापून राहतो आणि लक्ष देऊन ऐकायला प्रवृत्त झालेल्या श्रोत्यांना अस्सल मराठीचा बाज राष्ट्रीय भानाचे संस्कार देत जातो. (या कामात शाहीर लीलाधर हेगडे यांची जोड आठवल्याशिवाय बापटांचे ‘पोवाडा’ हे कर्तृत्व पूर्ण होत नाही.) आंदोलनातील सहभाग या पोवाड्यांनी आणि गीतांनी भरून जात असे.  पोवाडे रचण्यात कटाव, असावा - नसावा आणि आवेशपूर्ण कथन हे सर्व अनुभवताना श्रोता अभिरुचिसंपन्न होत जाई.

बापटांची गीते एकंदरीने  सहज गाता येण्याजोगी होती आणि भाषेचे सौष्ठव आपोआप जिभेवर रुळत होते. वेगवेगळे छंद, छोट्या छोट्या ओळी, आणि गेयतेत यतिभंग नाही ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची गीते गाताना कधीही ओढाताण होत नाही. अगदी कवायत करताना तालावर म्हणता येतील अशी ‘जय सुभाष जय सुभाष’, किंवा ‘मानव तितुका एकच आहे...’ सारख्या गाण्यांच्या प्रकारातही एक वेगळी रचना गायलेली आठवते.

‘लाभू दे-परतुनी हरवले-हरपले जे श्रेय ते

नेते---- जे भले----लाभले-

त्यांच्या सत्कृति-संप्रति-

चित्ती-आठवू-साठवू-

यत्नाने फिरुनिया मिळवू या जननीचे स्वातंत्र्य ते...’

याची चाल ऐकत असतानाच ड्रमचा ताल ऐकू येतो. सेवा दल शाखेवर, मिरवणुकीत, निदर्शनात म्हणायची त्यांची गीते ज्यांनी गायली त्यांच्या मनात ती रुजली.

यातून कवित्वाच्या उंचीवर गेलेल्या अनेक कविता आहेत. सर्वांत प्रसिद्ध म्हणता येईल ती संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी सादर केलेली ‘केवळ माझा सह्यकडा’ ही कविता त्यांच्या सादरीकरणाचा एक उच्च बिंदू होता. त्यांच्या वाणीतून

‘औट हात देहात अचानक वादळ घुसमटूनी जाते

उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते’

या ओळी ऐकताना ऐकणाराला भरून येत असे! गीते ही जशी गाण्यासाठी सुलभ, तशाच सामाजिक आशयाच्या कविता सादरीकरण करताना लयीचा आनंद देणाऱ्या. यात गाजलेल्या ‘दख्खनच्या राणी’चा वरचा क्रमांक आहे. त्यामधील सामाजिक भानावरची टिप्पणी सहज मनात उतरते. छदाम जिंकण्यात रमलेले निसर्गाला दुरावतात आणि त्यांच्या भोवती संपूर्ण प्रवासभर ‘एकच बोगदा, अंधार दाटून असतो’ याचे ऐकणाऱ्याला भान येते. त्यांचे ‘काव्य दर्शन’ हा कला पथकाच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचा आकर्षणविषय होता. श्रोत्यांना कवितेचे शब्द थेट भावानुभव देत. पहाटेचे स्वप्न ही फाळणीची उदासी रंगवणारी कविता, झेलमचे अश्रू ही फाळणीच्या वेदनेचे चित्र रंगवणारी कविता किंवा ‘स्वातंत्र्य! कुठे स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य?’ ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात कठीण झालेले परिवर्तनाचे काम तपशिलात रंगवणारी कविता भान देते, ‘कुंपणापल्याडही नाही अपुली धाव’ आणि कारण सांगते, ‘रे कोनाड्यातहि  बिळे बिळातच पडली’! त्यातच शेवटी बजावते,

‘जोवरी सुखाचा घास नसे सर्वांना

जोवरी न उन्नत झाल्या अवघ्या माना,

जरी निघून गेले परके अपुल्या देशी

आम्हीच आमुचे गुलाम हिंदुस्थानां!’

सतत सामाजिक वास्तवाचे भान देत राहणारी बापटांची  कविता बदलत्या वास्तवाचा वेध घेते. महानगरी वाढीबरोबरच आलेली विषमता दाखविणारी एक डोळा आणि एक डोळा, बांधू नका गांधींचे मंदिरसारखी दैवतीकरणाची सवय घालवून त्याची जागा जागरूक चिकित्सेने घ्यायला हवी हे सांगणारी कविता, हा एकूण नवभारताच्या घडणीत महत्त्वाचा होता. विनोबांच्या भूदान यात्रेच्या वेळी अनेकदा त्यांचे ‘दर्शन’ घेण्यासाठी गर्दी लोटे. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जे काम करावे लागते त्यावरून हे दुखणे कसे खोलवर पोचलेले होते हे लक्षात येते. बापट या कठीण व्रताच्या जागा दाखवत गेले. शब्द आणि कृती यांच्यातली दरी मोठी होत गेलेली देशाने अनुभवली. त्यातच एके काळी स्वातंत्र्य लढ्यात ध्येयवादी विचाराने प्रेरित झालेला, नंतरच्या स्वप्नभंगात अधोगतीच्या अवस्थेत दिसे. ती वेदना ‘सामंत’शी संवाद करणारी कविता व्यक्त करते. सामाजिक वास्तवातील अध:पाताला प्रतिसाद देत असतानाच कला पथकाच्या ‘महाराष्ट्र दर्शन’, भारत दर्शन’, ‘शिव दर्शन’ आणि ‘आजादी की जंग’ या कार्यक्रमांत ते राष्ट्रकवी म्हणून आपले काम करतच होते. या भव्य निर्मिती आणि त्या त्या काळात सहभागी झालेल्यांवर झालेले संस्कार यात बापट भाषाप्रभू म्हणून जशी घडण करत होते, तसेच कलेबरोबरच ‘पथक’ या सामूहिक प्रयत्नाचे उज्ज्वल रूप घडवत होते. मोठा ताफा, मोठे प्रवास, अनेक संकटे, अडचणी सोसत सर्वांना एका नवसमाजरीतीचा भाग बनत जाण्याचे शिक्षण ते देत होते. कवीच्या ध्येयवादाशी सुसंगत वागणूक अनुभवास आल्याने मिळणारा संस्कार अर्थातच अधिक खोल आणि दीर्घकालीन होत गेला.

पण कवी म्हणून त्यांचे आत्मभान अधिक व्यापक होते. त्यांना त्याची जाणीव अगदी सुरुवातीच्या काळापासून होती असे लक्षात येते. कवी हा ‘निरंकुश’ असतो हे त्यांना बहुधा अनुभवत: लहान वयातच जाणवले होते. ‘बिजली’ या पहिल्या संग्रहातच त्यांची कविता आहे,

‘उल्लंघून कक्षा कारा मी निखळून पडलो तारा

मज नव्हता आणिक नको कधीच किनारा’

हे आत्मभान सर्व काळ विकसित होत होते, कविता नवी रूपे घेत होती. पण भारतीय भान आणि भाषेचे मराठी वळण अगदी अमेरिकेच्या प्रवासातील कवितांमध्येही व्यक्त होते. अमेरिकेच्या व्हिसा मिळण्यावर त्यांनी ‘बये दार उघड’ असे भारूड लिहिले आणि त्यात अमेरिकेला वॉशिंग्टनचंडी, हॉलीवुडरंडी, हिटलरनाशिनी, स्टालिनमर्दिनी म्हटले! हा मराठीचा अवतार अजब होता.

त्यांची प्रेमकविता तर ‘वादळवाऱ्यापरी सखे तो आला माझ्या घरी’ अशा किशोरवयीन रूपापासून ती ‘तुझियामाझ्यामध्ये तर ही पहाट झाली सेतू’ अशा खोल रूपकापर्यंत अनेक हळुवार खुणा स्पर्शत गेली. महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय अस्मितेचे रूप अधोरेखित करताना भारत या राष्ट्राचा भौगोलिक सांस्कृतिक एकात्म भाव व्यक्त केला. त्यांची लावणी अशीच लावण्यवती. आणि अधिक व्यापक होणारीही! निरोपाची लावणी गाऊन त्यांनी माणसांच्या परम  स्नेहाचा आणि मैत्रीच्या खुशीचा ललकारा दिला. ती ऐकताना गळ्यात आवंढा दाटला तरी मैत्र अभंग राहण्याचा दिलासा तिने दिला.

सरतेशेवटी तेच निरंकुश आत्मभान आणि सामाजिक वास्तवाला भिडून त्यांनी अभिव्यक्ती केली,

‘पंख जरी जळलेले, नील नवे पाहीन मी, मृत्युंजय मुक्तीचे, गीत नवे गाईन मी’

या कवितेत जो स्वप्नभंग आहे, त्यात ‘सिंहासन जनतेचे राहिले नाही, न्यायासन समतेचे पाठीराखे राहिले नाही आणि ममतेचे अधिराज्य अस्तास गेले’, ते सर्व दिसत असूनही

‘राखेतून उंच उडून, गगनशिरी जाईन मी’ असे म्हणून त्यांची जीवननिष्ठा अतिशय स्पष्टपणे व्यक्त केली.

सत्तेचे सिंहासन जनतेचे, न्यायासन समतेचे आणि अधिराज्य ममतेचे असे वर्णन त्यांनी केले होते. आज त्याची तीव्रतेने आठवण पावलोपावली येते आहे! त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सतत जागरूकता हाच एकमेव मंत्र उरतो.

या अशांतीचे वरदान देणाऱ्या कवीला आणि गीतकाराला साष्टांग प्रणाम!        

Tags: janmshatabdi visheshank vasant bapat श्यामला वनारसे जन्मशताब्दी विशेषांक वसंत बापट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्यामला वनारसे
svanarase75@gmail.com

मानसोपचारतज्ज्ञ. पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाच्या संस्थेच्या संचालक.  पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके