डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनुताई म्हणाल्या, ‘तू शिक्षक झाल्यावर गावाला जाऊन नोकरी करणार असशील ना? त्यावर एकदम तो म्हणाला, 'छा छा, गावाला कोण जातोय. नोकरी इथेच मिळवणार.

गेली कित्येक वर्षे नाथ पै संस्कार केंद्रातर्फे बाल अभिनय गीतांच्या स्पर्धा सेवादल अत्यंत यशस्वीपणे पुण्यात घेत आले आहे. उत्तम स्पर्धा म्हणून पुण्यात त्यांचा नावलौकिक झालेला आहे. 

दरवर्षी यानिमित्ताने शिक्षिका एकत्र येत असतात. त्यांच्या मागणीमुळे बाल अभिनय गीते कशी म्हणावीत व कशी बसवावीत यासाठी या शिबिराची कल्पना सुचली, झपाटल्यासारखे कामाला लागलो. यासाठी अनुताई पंडित यांच्याशिवाय दुसरी व्यक्ती कोण असणार? 

विचारणा केल्यावर अनुताईंनी तात्काळ संमती दिली. कारण ते तर त्यांचे अत्यंत आवडते काम. खरे तर त्यांचा पिंड कलाकाराचा. पण अनुताई वाघांच्या संस्कारामुळे हे सर्व सोडून त्या शिक्षकी पेशाकडे वळल्या, आणि छोटयांच्या गळ्यातील ताईत बनल्या. अशा या शिबिराला 28 शाळांमधून 85 बालवाडीच्या शिक्षिका आलेल्या होत्या.

3 व 4 फेब्रुवारी रोजी साने गुरुजी स्मारक पर्वती येथील नाथ पै हॉलमध्ये शिबिराला सुरुवात अत्यंत गंभीरपणे दबलेल्या स्वरूपात झाली. पण अनुताई उभ्या राहिल्या, पेटीवर सूर धरला आणि धडाक्यात बडबड गीत गाऊ लागल्या आणि चमत्कार घडावा तसे वातावरण एकदम मोकळे होऊन शिक्षिकांचे बालांच्यात कधी रूपांतर झाले कळलेच नाही. 

मोठेपण फेकून देऊन त्या नाचू, हसू, गाऊ लागल्या. जसजशा अनुताई आविर्भावात गीत गात, आवाजात चढउतार करीत नाचत, तसतसा शिक्षिकांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद बघण्यासारखा होता. बालांची निरागसता त्यांच्याही चेहऱ्यावर जाणवू लागली. खेळत- धक्काबुक्की, हातवारे, हसणे-खेळणे, काय वर्णन करावे? या सर्व तायांनी धमाल उडवून दिली. अनुताई एक एक अभिनयाचा बुरुज खुला करीत होत्या, आणि शिक्षिका दिलखुलासपणे त्यात हुंदडत होत्या.

ऊन-वारा-पाऊस, झुकझुक गाडी, टांगेवाला, आजी-आजोबा, किती विषय म्हणून निवडावेत अनुताईंनी? सर्व तायांकडून त्यांनी अभिनय करून घेतला, आपण जमिनीवरच आहोत का, याची जाणीवच उरली नव्हती इतक्या दोन दिवस सर्व शिक्षिका स्वतःला पार विसरून गेल्या होत्या. हे शिकविता शिकविता ताईंनी काही अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, ‘शाळेतील अभिजितसारखा हुशार मुलगा - ताई, आज तुम्ही सांगितलेले गाणे मला आवडत नाही आणि म्हणून मी म्हणणार नाही… असे म्हणाल्यावर मी त्याला विचारले अभिजित तुला कोणते गाणे हवे? तर स्वारी खुशीत येऊन म्हणतेय कशी, दादा कोंडके यांचे ढगाला लागली कळ हे गाणे सांगा. मी उडालेच एकदम. क्षणभर काही सुचेना. मी त्याला सांगितले की हे गाणे सांगणार नाही आणि मी ठरवलेले गीतच सांगणार. अभिजित रुसला व मागे जाऊन बसला.’ 

‘माझ्यामागे सरलाताई देवधर उभ्या होत्या. ताबडतोब प्रसंगानुरुप बाल अभिनय गीते व बडबड गीते तयार करण्यात सरलाताईंचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून तास संपल्यावर मला भेटा, सांगून त्या निघून गेल्या. मी मनातून तर घाबरलेच होते, माझी काही चूक झाली का? याचा मी शोध घेऊ लागले. सरलाताईंना भेटताच त्यांनी ‘शाळेला झाली वेळ, तू लवकर पळ,’ हे गीत माझ्या हातात दिले.’ 
मी ‘ढगाला लागली कळ’ याच चालीवर गाणे सांगितले आणि काय जादू झाली, आख्खी शळा डीएडच्या विद्यार्थ्यांसकट एक तालासुरात गाणे गाऊ लागली. धम्माल उडवून दिली या गाण्याने. 

यावर अभिजित पुन्हा म्हणतो, ‘दादा कोंडके पापा घेतो, तसे कराना.’ मीही तोंडाचा चंबू करून ती कृती केली. सारे खुष. मुलांना ‘ढगाला लागली कळ’ याचा अर्थ कळत नव्हता, पण ताल, लय, ठेका, सूर या आवडीपायी त्यांनी तो आग्रह धरला होता. 

असाच एक सूरज नावाचा मुलगा जवळ आला आणि म्हणाला ताई, तुम्ही मला मुळीच आवडत नाही. मी म्हटले, कारे बाबा? ‘तुम्ही आमच्या बाईंना वर्गातच चुकले तर सांगत असता. मला माझ्या बाईंना रागावलेले किंवा दुसऱ्याने शिकवलेले मुळीच आवडत नाही.’ मी त्याला त्यामागील भूमिका समजावून सांगितल्यावर स्वारी खुषीत येऊन म्हणते, ‘अनुताई तुम्ही खूप आवडता…कशी निष्पाप मुले असतात, नाही?’ 

ही नवीन पिढी टीव्हीमुळे खूपच जनरल नॉलेज वाढलेली, त्यांना घडवणारा शिक्षक हा खूप ताकदीचा हवा असे मला सारखे वाटत आहे. ताईंनी एक विद्यार्थी शिक्षकाचा अनुभव सांगितला, तो आपल्याला बरेच काही सांगून जातो. तो राहणारा परभणीचा, प्रवेश घेतला डी. एड.ला, मुंबईचा पत्ता दिला. मुंबईला राहतो फूटपाथवर, जेवतो गायवाल्याच्या घरी. हे कोणाला सांगू नका असे वर म्हणतो. 

अनुताई म्हणाल्या, ‘तू शिक्षक झाल्यावर गावाला जाऊन नोकरी करणार असशील ना? त्यावर एकदम तो म्हणाला, 'छा छा, गावाला कोण जातोय. नोकरी इथेच मिळवणार. शक्यतो कॉर्पोरेशनमध्ये. एकदा तेथे नोकरी मिळाली की आरामच आराम, शिवाय दुसरा उद्योग म्हणा, उचापती म्हणा... करायला मी मोकळा.’ असा शिक्षक अभिजित म्हणा, सूरज म्हणा, यांसारख्या मुलांना कसे आणि काय घडवणार?

मुले बोबडी बोलतात. त्याचे शिक्षकांनी अनुकरण न करता शुद्ध बोलावे. कधी कधी ह्याहीबाबत खूप मजा येते. असाच एक अभिमन्यू म्हणाला, ‘ताई! आमच्या बाईंनी खूप रांडा गेल्या!!’ मी अवाक्क झाले. नंतर कळले की, त्याला ग म्हणता येत नाही. आम्ही सर्व हसू लागलो आणि तो पण दिलखुलास हसू लागला. 

आपणही मुलांकडून पुष्कळ शिकण्यासारखे असते, अक्षरज्ञान, स्पर्शज्ञान, वस्तूचे ज्ञान, रंगज्ञान, इत्यादींची जाणीव व्हावी अशी कितीतरी बडबड गीते व अभिनय गीते त्यांनी शिक्षिकांकडून गाऊन व बसवून घेतली. सोप्या भाषेत मुलांना समजतील अशी ती असावीत, बालमंदिर शिक्षणाचा पाया म्हणून इथला शिक्षक परिपूर्ण असावा, त्याची रहन-सहन, उद्गार, वागणे, यांचे नकळत ती अनुकरण करीत असतात. 
शिक्षकांवर त्यांचे अमाप प्रेम असते. त्यांना नावे ठेवलेली त्यांना मुळीच आवडत नाही. म्हणून मुलांपुढे फार जपून वागले पाहिजे, असे अनुताईंनी अनुभवाद्वारे पटवून दिले. 

त्या स्वतः पेटी वाजवतात. सर्व शिक्षिकांना वाटायचे. ताई, येथेच न थांबता पुढच्या वर्षीही तुम्ही आम्हांला भेटायला, शिकवायला या. आमच्यात नक्कीच फरक पडलेला तुम्हाला जाणवेल ही खात्री त्यांनी अनुताईंना दिली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके