डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्मिता किंवा शुभ्रा या फक्त आजच्या रेडिओ चॅनल्सच्या प्रातिनिधिक आरजेज; जुन्य़ा,जाणत्या, अनुभवी. असे अनेक नवे चेहरे, नवे आवाज आवाजाच्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पहात आहेत, स्वत:चे स्थान निर्माण करत आहेत. स्पर्धा तर आहेच; पण आव्हानेही खुणावत आहेत. मनोरंजनाची एक मोठी इंडस्ट्री अनेकांना सामावून घेण्यास उत्सुक आहे.

‘आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे...’ ह्या एकमेव आवाजाची मक्तेदारी पुण्यातच काम, अवघ्या महाराष्ट्रभर होती. साधारण 2000 सालापर्यंत. 2000 सालानंतर आपल्या एकूणच भवतालात खूप बदल झाले. पुण्याचा चेहरा बदलला तो याच काळात. याच  काळात आयटी क्षेत्र पुण्यात विस्तारलं. जागतिकीकरण स्थिरावू लागलं. तसं भारतातही याच  2000सालात सरकारने 108FM फ्रिक्वेन्सीज जाहीर केल्या. त्यानंतर टाइम्स ग्रुपने प्रथम FM चॅनेल सुरू केलं. यामागचा हेतू असा होता, की ‘या रेडिओ चॅनेलद्वारे आपण एका मोठ्या परिसरात लोकांशी संवाद साधू शकू. जाहिरातदारांना आकर्षित करू शकू.’ नंतरच्या काळात सरकारने हे कॉन्ट्रॅट काही कारणाने रद्द केलं; मात्र टाइम्सचा रेडिओ चॅनेल सुरू राहिला.

2001-2002 च्या आसपास एकीकडे रडिओ- ऑल इंडिया रेडिओ- आकाशवाणी आपला आब राखून निश्चिंतपणे आपला आवाज पोहचवत असतानाच, रेडिओ मिर्चीचे आगमन पुण्यात झाले. त्याची सुरुवातच होती... ‘93.3 FM रेडिओ मिर्ची Its hot…’ या नव्या आवाजाविषयी सुरुवातीच्या काळात प्रचंड उत्सुकता होती... कुतुहल होते.  आवाजातला नवेपणा, फ्रेशनेस आकर्षित करणारा होता. प्रतिक्रिया अर्थातच संमिश्र होत्या, पण...’Radio Mirchi…its hot’ असं काहीसं ऑड, मॉड, पुणेरी संस्कृती बाहेरचं स्लोगन पाहता पाहता परिचयाचं झालं. हवेत तरंगणारे हे आवाज शेवटी रुळले. स्थिरावले. सुरुवातीला क्वचित उथळ वाटणारी ही बडबड, बक्‌बक्‌ वाटावी अशी हिंग्लीश भाषा...जाहिरातीच्या फोडणीसह बॉलिवूड गाण्याचं म्युझिक सतत कानावर आदळणारं हे चॅनेल अखेर टीनएजपासून पस्तीशीपर्यंतच्या तरुणाईला आपलसं करू लागलं. तरुणाईची बोलीभाषा बनून गेलं.

रेडिओ मिर्ची मुळात टाइम्स एम.एम. म्हणून अवतरली.भारतात इंदौरला पहिलं मिर्ची प्रसारण सुरू झालं 1993 साली. आणि आज सहा मेट्रो शहरांसह भारतात केवळ रेडिओ मिर्चीची 33 स्टेशन्स सुरू आहेत; आणि आज प्रायव्हेट चॅनेल्सच्या तुलनेत जाहिरात दराच्या दृष्टीने पाहता सगळ्यात महागडं स्टेशन म्हणून प्रस्थापित झालं आहे.

पुण्यात अर्थात 2000-2001 मध्ये रेडिओ मिर्ची सुरू झालं. एखादं रेडिओ स्टेशन लोकप्रिय होण्यासाठी रेडिओचा चेहरा असतो तो रेडिओचा आवाज. हा आवाजच लोकांपर्यंत पोहोचतो. रुजतो. संवाद साधतो. एफएम. चॅनेल्समध्ये आवाजासाठी निवेदक ही संकल्पनाच नाही. तिथल्या स्टुडिओत असतो ‘आर.जे.’ (रेडिओ जॉकीज).

पुण्यातल्या रेडिओ चॅनेल्सला आवाज असणाऱ्या निवडक आरजेंपैकी काही जुन्या, लोकप्रिय, मॅच्युअर अशा आरजेंची भेट घेतली. या आरजेंच्या कामाबरोबरच त्यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घ्यावं या उत्सुकतेतून. त्यापैकी एक लोकप्रिय आरजे म्हणजे ‘शुभ्रा’...आठवतेय? रेडिओ मिर्ची नव्यानं सुरू झाली, त्यावेळी सक्काळी सक्काळी चहा पिताना, पेपर वाचताना, ब्रेकफास्ट घेताना एका बाजूला शुभ्राचा शो सुरू असायचा ‘दिन हुवा बिगीन’. रेडिओवर ऐकू येणारा तो ‘कार्यक्रम’ आणि थिएटरमध्ये जाऊन बघता येणारा तो ‘शो’. अशा आमच्या सगळ्याच्या स्पष्ट संकल्पना असताना, शुभ्राचा ‘शो’ असायचा. तिचा आवाज आमच्यासाठी नवीन होता. आमची सकाळी एकीकडे कामांची घाई असताना, ती सतत छान गप्पा मारायची, किस्से ऐकवायची, ट्रॅफिक, हवा, ठळक घडामोडी सगळं ऐकवत आम्हांला आपोआप सहज अपडेट करायची...याशिवाय गाणीही असायचीच.

शुभ्रा परवा भेटली ती ‘रेडिओ वन’च्या स्टुडिओत. कॅम्पातल्या गर्दीच्या परिसरात शुभ्र रंगाची ‘रेडिओ-वन्‌ मिडडे’ ची बिल्डींग. तिथे सध्या दुपारी 2 ते 4 या वेळात ती पुणेकरांशी गप्पा मारते. एसएमएस मागवते, गाणी ऐकवते.  मजेत असते.

शुभ्रा मूळची चंदिगढची. साधारण 2001 सालापासून पुण्यात आली आणि इथलीच झाली. त्याचं कारण सांगताना ती म्हणते, ‘यहाँ का मोसम... और एक बात है, स्त्रियांसाठी इथं फार सुरक्षित वातावरण आहे.’

शुभ्रा आज जरी लोकप्रिय आरजे असली तरी ती मूळची शिक्षिका होती. ‘लाईफ में जितने भी एक्सपीरियन्स है... लेना चाहिए...’ ती ठामपणे म्हणते. आणि एक अनुभव म्हणूनच तिने 2002 साली रेडिओ मिर्चीची ऑडिशन (आवाज चाचणी) दिली. आणि अर्थात पहिला शो सुरू केला, ‘दिन हुवा बिगीन.’ या पहिल्या कार्यक्रमाच्या अनुभवाविषयी ती सांगते, ‘सुबह का टाइम था... तो अच्छी अच्छी बाते करती थी। पॉझिटिव्ह थिंकींग के बारे में बोलना था। बहुत छोटी छोटी कहानियां, किस्से ढूंढना पडता था। रोज का कार्यक्रम था। और इसमे हर वक्त एक ताजगी रखना,यही चॅलेंज था।’

‘दिन हुवा बिगीन’बद्दल आणखी बोलताना शुभ्रा म्हणते, ‘हा कार्यक्रम माझ्यासाठीही फार वेगळा अनुभव होता. माणूस म्हणून माझ्यातही काही सकारात्मक बदल झाले.’ त्यानंतर ती रात्रीचा ‘पुरानी जीन्स’ हा कार्यक्रमही करायची. ह्या कार्यक्रमात जुनी हिंदी गाणी, हिंदी सिनेमे, त्यातले पडद्यामागचे किस्से,गॉसिप्स... आपल्या बहारदार संवादाने शुभ्राने हाही कार्यक्रम लोकप्रिय बनवला. ती सेलिब्रिटी बनली ती याच  काळात. रेडिओच्मा माध्यमात केवळ आवाजानं, संवादानं मिळणारं ग्लॅमर तिला अनुभवता आलं.

‘टाईमलेस क्लासिक्स’ असाही एक शो तिने केला आणि नंतर मात्र ती पुन्हा एकदा शिक्षकी पेशाकडे वळली. ‘दिल्ली पब्लिक स्कूल’मध्ये पुन्हा मुलांना शिकवू लागली. साधारण 2003 पासून 2006 पर्यंत ती दिल्लीला होती. मुलांबरोबर काम करण्याचा वेगळाच आनंद तिला मिळाला.

आणि 2006 मध्ये ती पुन्हा एकदा मिर्चीत आरजे म्हणून जॉइन झाली. या वेळी तिचा शो होता ‘टोटल फिल्मी.’ याच काळात पुण्यात रेडिओ सिटी, रेड एफएम. सारखी नवी चॅनेल्स सुरू होत होती. 24 तास मनोरंजन, गाणी, माहिती, संवाद, आवाजाच्या क्षेत्रात गर्दी होत होती. आरजेंसमोर प्रचंड स्पर्धा होती, सतत नवं देण्याची. नव्या नव्या आवाजांना वाव मिळत होता आणि आता हातोहाती असणाऱ्या मोबाईल्समुळे एकूणच या क्षेत्रातल्या क्रांतीमुळे रेडिओ नव्यानं लोकप्रिय होत होता. एकूण वातावरणच बदललं होतं. आरजेंना केवळ शो नव्हे तर इतर बॅकस्टेजची कामही बघावी लागतात. त्यानुसार शुभ्रा नव्या आरजेंना ट्रेनिंग देण्याचं काम करायची; शिवाय इतर 32 रेडिओ मिर्ची स्टेशन्सच्या समन्वयाचं कामही पहायची. जवळपास दोन वर्षांनंतर कामात सॅच्युरेशन जाणवायला लागलं. एक स्त्री म्हणून असणाऱ्या सांसारिक जबाबदाऱ्याही होत्याच. शिवाय, कलाकार म्हणून सतत नव्या नव्या अनुभवांची उत्सुकता होतीच. त्यामुळे तिने तडकाफडकीच मिर्चीला ‘बाय’ म्हटलं.

पडद्यामागे राहून तिची काही कामं चालू होतीच; पण अँक्टिव्ह रेडिओतल्या कामाचं आकर्षण टिकून होतंच.‘मिडडे’च्या रेडिओ वन्‌ला ती डिसेंबरपासून नव्याने जॉईन झाली. ‘मॅक्सिमम म्युझिक फटाफट’ अशी कॅचलाईन असणाऱ्या रेडिओ वनमध्ये ती दुपारचा शो करते.

रेडिओच्या एकूणच कामाविषयी सांगताना ती म्हणते, ‘इथंचालणारं सगळंच काम एक टीमवर्क आहे. इथं स्ट्रेस आहे, पण मदतीला धावून येणारी टीम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘24 तास चालणारं म्युझिक’ आहे.  संगीताची साथ तुमचा मूड सतत फ्रेश ठेवू शकते. घरातला आणि ऑफिसमधला कुठलाही ताण घेऊन तुम्ही एकदा स्टुडिओत गेलात, म्युझिक ऑन केलं, की मूड बदलतोच. इथं काम करताना- खास करून आरजे म्हणून काम करताना सहा वर्षांपासून साठ वर्षांपर्यंत कुणाशीही, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तीशी सतत संवाद साधण्याचं कौशल्य हवं. समोरच्या व्यक्तीला समजावून घेण्यासाठी पेशन्स हवा. गप्पा मारण्यासाठी भाषेत चटपटीतपणा असणंही आवश्यक; पण त्यासाठी तुम्ही मुळात ‘चांगलं माणूस’, ‘चांगली व्यक्ती’ असणं आवश्यक आहे. बोलण्यात माणुसकी तर असायलाच हवी. माझ्या आईवडिलांचे संस्कार इथं उपयोगी पडतात. तुमचा आवाज मुळात चांगला असणं हा एक भाग आहे. शिवाय, तुमचे विचार,व्यक्तिमत्त्व तुमच्या आवाजातून जाणवायला हवं. फ्रेंडली पर्सनॅलिटी हवी. ‘अगर बंदा अच्छा हो, तो आवाज अच्छीही लगती है’, शुभ्रा आवर्जून सांगते.

पुण्यातल्या सदाशिवपेठी मध्यमवर्गी मराठी पुणेकरांपासून कँपमधल्या जुन्या अमराठी पुणेकरांपर्यंत आणि कोथरुडपासूनपलीकडे पसरलेल्या नव्या श्रीमंत पुणेकरांपासून औंध, बाणेर,हिंजवडीकडच्या आयटी पुणेकरांपर्यंत सर्वांना अतिशय आपला वाटणारा आवाज आरजे स्मिताचा. तिचा आवाज ‘ऑथेन्टिक’वाटतो. इंग्लिश, मराठी, हिंदी भाषेपलीकडे जाऊन संवाद साधणारा आवाज!

स्मिता मूळची नाशिकची, पण शिक्षण मात्र पुण्यातच झालं. एम.एस्‌सी. करताना (मॉडर्न कॉलेज) तिने टाइम्स एफ्‌एम्‌ची ऑडिशन दिली. 3500 जणांतून तिची निवड झाली. याचं कारण त्याआधी ती नाशिकच्या लोकल स्टेशनवर अँकरिंग करायची. रेडिओ ऐकत असायची. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तीनही भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. शिवाय, तिचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास होता; पण तरीही मुंबईला ट्रेनिंगला गेल्यावर इतर अमराठी ट्रेनीजमध्ये तिचं मराठी असणं अवघड गेलंच. पण या अवघडलेपणावर मात करून ती रेडिओ मिर्चीत जॉईन झाली, आरजे म्हणून. सुरुवातीला ‘आलाप’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ती करायची. पण पुणेकरांना हा ‘आलाप’ आपला वाटला नाही. पत्रांअभावी हा कार्यक्रम आठ-नऊ महिन्यात बंद झाला. (हो, मिर्चीतही श्रोत्यांच्या पत्रांची दखल घेतात.)

मग स्मिताने ‘खूबसुरत’ शो सुरू केला. खास पुणेकर स्त्रियांसाठी, तरुणींसाठी. काय नव्हतं यात? स्त्रियांचं आरोग्य,योग, सौंदर्य, रेसिपीज, समुपदेशन, फॅशन्स, नातेसंबंध, सल्ला, गाणी, गप्पा, गॉसिप्स. हा शो म्हणजे एक मासिकच असायचं स्त्रियांसाठी आणि स्त्रिया दुपारच्या फावल्या वेळी निवांत ऐकत रहायच्या.

स्मिता या अनुभवाविषयी भरभरून बोलते, ‘‘ह्या शोनं मला नाव दिलं. पुण्यातल्या अनेक तरुणींशी मला जोडून घेता आलं. अनेक कुटुंबातली मी सदस्य बनले. मला घराघरात पोहोचता आलं. खूप वेगवेगळे अनुभव दिले. ‘खुबसूरत’मध्ये मी कसलीच तडजोड केली नाही. माझ्यातलं ‘बेस्ट’ दिलं. पुणेरी मुलींसाठी ऐश्वर्या राय ते सोनाली कुलकर्णी अशा साधारण 350 च्या आसपास जणींशी संवाद साधला. रुटीन कामापलीकडे जाऊन काही वेगळे अनुभव घेतले. एका दिवाळीत पुण्यातल्या महापौरांच्या घरी 300 मुलांसह दिवाळी साजरी केली. त्या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. अगदी दिवाळीचा फराळही होता. आणि हा सगळा कार्यक्रम मी एन्जॉय करत असताना रेडिओवर लाईव्ह ऐकला जात होता. अशीच एकदा राखीपौर्णिमेला ‘प्रीतमंदिरातल्या मुलांना राखी बांधायला जातेय’ असं रेडिओवरून श्रोत्यांना सांगितलं, तर त्यावेळी खरोखरच अनेकजण प्रीतमंदिरात आले. राख्या बांधल्या, मिठाई वाटली लोकांनी. हा सगळा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे.’’

‘आरजे बनण्यासाठी तुमच्यामध्ये मुळातच का असावं लागतं’ यावर बोलताना ती म्हणते, ‘केवळ चांगला आवाज पुरत नाही, व्यक्तिमत्त्व असावं लागतं. व्यक्तिमत्त्वातला खरेपणा आवाजातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा काही लगेच तयार होत नाही. लहानपणापासूनचे संस्कारच हवेत. वाचन हवं, विचार हवेत. मुळात तुम्ही कसे डेव्हलप होता, कोणकोणती माणसं तुम्हांला भेटतात, तुम्ही त्यांना कसं समजावून घेता, यातूनच तुमचं व्यक्तिमत्त्व घडतं. माणूस वाचता येणं महत्त्वाचं आणि लोकांना वाचत राहणं ही सतत चालणारी प्रोसेस आहे. यासाठी खूप पेशन्स असायला हवा...’

आरजे बोलतात... खूप बोलतात... बोलतच राहतात...याविषयी ती म्हणते, की ‘‘हो आम्ही बोलतो... दोन मित्र खूपकाळाने भेटले, की जसे बोलत राहतात तसे बोलत राहतो. लोकांना वाटतं की 10 शब्द इंग्लिश बोलले, 10 हिंदी आणि 10मराठी शब्द टाकले की झाली भाषा तयार. पण तसं नाही. हिंदी,मराठी आणि इंग्लिश भाषा आणि त्यातले बारकावे समजून घेणं महत्त्वाचं. म्हणजे, ‘मै बताऊंगी तुम्हे ट्रॅफिक का हाल...’ तेव्हा हिंदी ‘हाल’ आणि मराठी ‘हाल... हाल’ समजायलाच हवं. शिवाय भाषा काहीही असली तरी, न दिसणाऱ्या लोकांशी सतत संवाद साधायचा आहे हे भान असणंही आवश्यक असतं. आपण कुणाला दुखवत नाही ना, हे महत्त्वाचं. कुणी स्मोकिंग करत असेल, हेल्मेट न वापरता गाडी चालवत असेल... तर बोलेन मी पण आदब जपणं आवश्यक.’’

इथं बोलताना कुठलीच चूक करून चालत नाही. त्यामुळे तयारी करताना ती परफेक्ट असावी लागते. एक तासाचा शो असला तरी तीन तास तयारीत जातात. रोजचं कामच 9 तासांपासून 12तासांपर्यंत आणि एक आरजे म्हणून तर 24 तास प्रोसेस सुरू राहते.

स्मिता किंवा शुभ्रा या फक्त आजच्या रेडिओ चॅनल्सच्या प्रातिनिधिक आरजेज. जुन्या, जाणत्या, अनुभवी. असे अनेक नवे चेहरे, नवे आवाज आवाजाच्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पहात आहेत. स्वत:चे स्थान निर्माण करत आहेत. स्पर्धा तर आहेच; पण आव्हानेही खुणावत आहेत. मनोरंजनाची एक मोठी इंडस्ट्री अनेकांना सामावून घेण्यास उत्सुक आहे.

 

(पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अंतर्नाद’ मा वाङ्‌मयीन मासिकात काही वर्षे संपादन सहाय्यकाचे काम केल्यानंतर स्नेहा अवसरीकर सध्या पुणे आकाशवाणीसाठी काम करीत आहे.)

 

Tags: खासगी आकाशवाणी. संवाद कौशल्य अनुभव शिक्षण अधुनिक रेडिओ जॉकी रेडिओ निवेदक रेडिओ जॉकी खास शो माहिती गाणी गप्पा श्रोत्यांशी संवाद संवाद श्रोते अधुनिक शो अधुनिक निवेदक आवाजाची दुनिया रेडिओ वन रेडिओ सिटी खासगी चॅनेल रेडिओ आरजे शुभ्रा आरजे स्मिता Radio Rj Voice cultur New Avenue Personality Knowledge Diction Marathi Hindi language listener communication challenges New FM Channels Radio One Radio Mirchi RJ Shubhra RJ Smita Radio Jokey weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके