डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी स्वतः एकदा तासगाव (जि.सांगली) स्थानकावर एका प्रवाशाला एका महिला कंडक्टरला शिवीगाळ करताना पाहिले आहे. श्रीमती हसीना यांना याबाबत विचारले, ‘‘अशा तक्रारी येतात का आताच्या नव्या मुलींकडून?’’. तर त्या म्हणाल्या, ‘‘हो, असे काही तुरळक प्रकार घडतात. पण आता मुली एवढ्या हुशार झाल्या आहेत की, त्या तिथल्या तिथे त्या प्रवाशाला सरळ करतात. पुढे तक्रार करण्याची वेळच आणत नाहीत.’’ कुर्डुवाडी आगारातील अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा वेळी गाडी सरळ पोलीस स्टेशनला न्यायचे अधिकार महिला कंडक्टरला आहेत.  

एसटी आपला अडुसष्टावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. सन 1948 मध्ये स्थापन झालेली बीएसआरटीसी BSRTC आता एमएसआरटीसी MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन) किंवा साध्या भाषेत एसटी या नावाने राज्यभर आणि राज्याबाहेरील काही शहरांत सेवा देत आहे. 18500 बसेसमधून दररोज जवळपास सत्तर लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वीचा काळ पाहिला, तर तेव्हाच्या आणि आताच्या आपल्या जगण्यात सर्वच क्षेत्रांत प्रचंड बदल झालेले आहेत. गुणात्मक पातळीवर झालेले बदल किती चांगले, किती वाईट हा संशोधनाचा मुद्दा असू शकेल. पण एक सामाजिक परिवर्तन आपल्या सर्वांच्या कळतनकळत आपल्या आजूबाजूला घडते आहे, ते म्हणजे- एसटीमध्ये कंडक्टर्स फक्त पुरुषच असतात या गृहीतकाला फाटा देत आता महिला कंडक्टर्सचे प्रमाण वाढत आहे. हा निश्चितच एक स्वागतार्ह बदल आहे आणि मुख्य म्हणजे, कोणतेही विशेष प्रयत्न न करता सध्या राज्यात 4354 महिला वाहक कार्यरत आहेत. सर्वांत जास्त महिला वाहक सध्या पुणे विभागात आहेत. मला वाटते, ही गोष्ट कंडक्टर या नोकरीतील एकेकाळाच्या पुरुषांच्या एकाधिकाराला मुळातून छेद देणारी आहे, त्यामुळे विशेष महत्त्वाची आहे. 

श्रीमती हसीना शाहनवाज फराज नावाच्या महिलेने पहिल्यांदा या क्षेत्रात यायचे ठरवले. डिसेंबर 2000 मध्ये त्या राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर म्हणून एमएसआरटीसीच्या फलटण (जि.सातारा) डेपोमध्ये रुजू झाल्या आणि तेव्हापासून आतापर्यंत महिलांचे या व्यवसायामध्ये येण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. कंडक्टर या पदासाठी नावे नोंदवणाऱ्या महिलांच्या प्रमाणात तब्बल 200 टक्क्यांची घसघशीत वाढ गेल्या काही वर्षांत झाली आहे! (संदर्भ : डीएनए, 27 नोव्हेंबर 2010). 

या संदर्भात श्रीमती हसीना फराज यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्या सध्या फलटण डेपोला ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून काम करत आहेत. जेमतेम दहावी झाल्यावर एसटीमध्ये अधिकारी असणाऱ्या मुलाशी त्यांचा विवाह झाला. लग्न झाल्यावर काही दिवसांतच त्यांच्या पतीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. हसीना पुन्हा माहेरी आल्या आणि घरच्या लोकांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. एमएसआरटीसी अनुकंपा तत्त्वावर हसीना यांना नोकरी द्यायला तर तयार होती, पण त्यासाठी त्यांचे शिक्षण अपुरे असल्याने त्यांनी आधी बारावी आणि मग पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण तेव्हा ट्रॅफिक कंट्रोलरच्या जागा रिकाम्या नव्हत्या. म्हणून एसटीतर्फे त्याना कंडक्टर या पदाची ऑफर देण्यात आली. श्रीमती हसीना यांच्या मते, एसटी व्यवस्थापनाला ही खात्री होती की, ही ऑफर स्वीकारली जाणार नाही. पण पतीच्या मृत्यूला सहा वर्षे उलटून गेली होती आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे होते. मग घरच्यांनी- विशेषतः वडील आणि भावाने हिम्मत दिली की, ‘तू ही ऑफर स्वीकार. बघू काय होते ते.’ मग त्यांनी ही ऑफर स्वीकारली. 

श्रीमती हसीना यांच्या मते, याचे श्रेय त्यांच्या घरच्यांनी दिलेल्या विश्वासाला आहे. एकदा रुजू झाल्यानंतर मात्र महामंडळाकडून, प्रवाशांकडून त्यांना खूप कौतुक मिळाले- हरखून जावे इतके कौतुक. एक अनुभव सांगताना हसीना म्हणाल्या की, त्या जेव्हा गाडीत तिकिटे काढत असत तेव्हा काही वृद्ध लोकांचा विश्वास बसत नसे की, ही मुलगी कंडक्टर आहे. ते लोक म्हणत, ‘कंडक्टरला पाठवा’. तेव्हा बाकीचे शिकलेले प्रवासी आणि ड्रायव्हर समजावून सांगत, हीच नवी कंडक्टर आहे. मग एखादी वृद्ध महिला प्रेमाने हात हातात घेऊन चौकशी करायची. ‘

‘एसटी खात्यातील अधिकाऱ्यांनीसुद्धा खूप चांगले सहकार्य केले. मला फलटण-सातारा या नॉनस्टॉप बससाठी सलग ड्युटी लावण्यात आली. त्याबद्दल बाकीच्यांची तक्रार नव्हती. सहकारी ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सही खूप चांगले होते. एकंदर कौतुकाच्या वातावरणात कंडक्टरच्या कामाचा मला कधी त्रास झाला नाही. कुठले भांडण नाही, की काही तक्रार नाही. आता प्रमोशन मिळाले आहे.’’ हसीना सांगत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी मला कसे बोलावे तेही धड कळत नव्हते. मग बाकीचे लोक समजावून सांगत- कसे बोलावे, कसे बोलू नये. आता मी आत्मविश्वासाने कुणाशीही बोलू शकते.’’ 

त्या आता युनियनचेही थोडेफार काम बघतात. मी त्यांना विचारले, ‘2000 मध्ये फक्त एक कंडक्टर आणि आता या क्षेत्रात हजारो महिला येत आहेत. हा बदल व्हायला नक्की कारण काय?’ त्या म्हणाल्या, ‘‘आताच्या मुली फार हुशार झाल्या आहेत. काय चांगले, काय वाईट हे त्यांना कळते. म्हणून त्या नवनवीन गोष्टी करू इच्छितात आणि परिस्थिती हळूहळू बदलते आहे. एसटीसुद्धा महिलांना सामावून घेताना आतून बरेच बदल करून घेत आहे. उदाहरणार्थ- सगळ्या मोठ्या स्थानकांवर महिलांसाठी स्वतंत्र रेस्टरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे.’’ 

डॉ.रेश्मा काबुगडे यांनी Work-Life Balance of Lady Bus conductors हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून अलीकडेच पीएच.डी. संपादन केलेली आहे आणि सध्या त्या मॅनेजमेंट या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे इथे कार्यरत आहेत. ‘वडिलांच्या मृत्यूनंतर, जेमतेम शिक्षण झालेल्या आईने गावातील थोड्याशा शेतीचा सांभाळ करीत मला वाढवले, एवढेच नाही तर उच्च शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन व बळ दिले,’ असा उल्लेख त्यांच्या या प्रबंधाच्या प्रस्तावनेत ठळकपणे आलेला आहे. त्यांच्याशी या विषयाबाबत बोलणे झाले असता त्यांनी सांगितले, ‘‘मुली ही नोकरी निवडतात, कारण बारावीनंतर निम-सरकारी क्षेत्रात येण्याची ही एक चांगली संधी आहे. बाकीच्या ठिकाणी सरकारी नोकरी आणि गणवेश पाहिजे असेल, तर पदवी गरजेची असते. मात्र कंडक्टर होण्यासाठी फक्त बारावी आणि नंतर एमएसआरटीसीची एक मामुली परीक्षा पास करावी लागते. मग तुम्हाला एक चांगली नोकरी मिळते. शिवाय 33 टक्के जागा आरक्षित आहेत, तो अनुशेष भरण्यासाठी बऱ्याच जागा महिलांना जातात. अशा तऱ्हेने एक चांगली संधी म्हणून अविवाहित आणि विवाहित मुली या नोकरीकडे पाहतात. शिवाय निम-सरकारी असल्याने नोकरीला संरक्षणही मिळते.’’ 

यातील बऱ्याच जणी बससेवेत असलेल्या आप्तांच्या आकस्मिक मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर या नोकरीकडे वळल्या. श्रीमती सुजाता भुजबळ ही 34 वर्षीय महिला आपल्या ड्रायव्हर असलेल्या नवऱ्याच्या (हृदयविकाराने झालेल्या) मृत्यूनंतर बेस्टमध्ये आली आणि मग या नोकरीमुळे तिला आपण अधिक सक्षम झाल्याचे जाणवले, असे ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतेय. (दि. 8 मार्च 2013, सोमित सेन) सुजाताबरोबर बेस्टमध्येच कार्यरत असणारी श्रीमती सुषमा खंकाळ ही 34 वर्षीय महिला स्वतः बी.कॉम. आहे या नोकरीच्या अगोदर ती एका फायनान्शियल फर्मसाठी काम करत होती. पण आधीच्या नोकरीपेक्षा तिला ही निम- सरकारी नोकरी जास्त पसंत आहे. 

डॉ.रेश्मा काबुगडे म्हणाल्या, ‘‘त्यांच्या या विषयाच्या अभ्यासादरम्यान त्यांना खूप उच्चशिक्षित मुली भेटल्या. एक मुलगी तर एम.फिल. झाली होती. याला काय  म्हणावे- कौतुक की बेकारी?’’ नोकरीमुळे या मुलींना आत्मविश्वास, जगण्याची ताकद आणि जगाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य मिळते, हे तर खरेच आहे आणि नोकरीबद्दलची आत्मीयता, समाधान व अभिमानही. ही बाब मला कुर्डुवाडी बस डेपोमधील महिला कंडक्टर्सशी बोलताना लक्षात आलीच. हसीना फराज यांच्यासारख्या स्त्रिया त्यांची कृतज्ञता बोलून दाखवतात. पण दुसऱ्या बाजूला कामाशी संबंधित इतर अडचणींमुळे त्या कमालीचा त्रासही सहन करतात. (संदर्भ : Indian journal of research, Vol. 4, Issue 3 March 2015 : Studies on implications of health issues  and work stress on work-life balance of Lady Bus conductors : Reshma R. Kabugade) 

यातली पहिली अडचण म्हणजे, अनियमित आणि जास्त कामाचे तास. तसेच दोन फेऱ्यांमध्ये पुरेसा वेळ नसणे, हेही बऱ्याच अडचणींचे कारण आहे. सतत प्रवास आणि प्रवाशांशी बोलत राहणे यामुळे त्यांना डोकेदुखी, पाठदुखी तसेच घसादुखी असे त्रास जाणवतात. सतत उभे राहिल्यामुळे पाय दुखणे हीसुद्धा बऱ्याच जणींची तक्रार आहे. तसेच हे काम बऱ्याच ताणतणावाचे आहे. सततच्या प्रवासामुळे येणारा ताण, कामाच्या वेळी पैसे हाताळण्याचा ताण, प्रवाशांशी सुट्‌ट्या पैशांवरून होणारी बाचाबाची- भांडणे, पैसे जमा करताना लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींचा ताण असतो. शिवाय पगारसुद्धा कमी आहेत. काही प्रमाणात महिलांच्यात स्त्री-आजारासंबंधित तक्रारीही निदर्शनास आल्या आहेत. एमएसआरटीसीने कामगारांसाठी आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, असे म्हणावे लागेल. परंतु त्याची माहिती फार कमी महिलांना आहे, असे डॉ.रेश्मा यांच्या लक्षात आले आहे. 

व्यवसायजन्य आजार हे प्रत्येक व्यवसायाबरोबर कमी- जास्त प्रमाणात येतातच. तर मग प्रश्न असा पडतो की, एवढ्या समस्या असताना मुली किंवा महिला या क्षेत्राकडे का वळतात? याचे सर्वसाधारण पहिले कारण असेच आहे की, ही नोकरी त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवते आणि त्यातून जो आत्मविश्वास मिळतो, त्याची अनुभूती त्या महिला रोजच्या रोज घेत असतात. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशाने त्यांचे जीवनमान उंचावायला मदत झाली आहे. किंवा ही नोकरी काहीजणींच्या बाबतीत आर्थिक अपरिहार्यता असते. कुटुंबातील एखाद्या कमावत्या पुरुषाच्या मृत्यूनंतर खांद्यावर पडलेली कुटुंबाची गरज असते. याचे एक उदाहरण म्हणजे नागपूर विभागात आदिवासी समाजातून बऱ्याच मुली कंडक्टर म्हणून कामाला लागल्या आहेत. 

पत्रकार मित्र निकेश तर असे म्हणतो, ‘‘विदर्भातल्या आदिवासी मुलींना दोनच नोकऱ्या माहीत आहेत. एक तर पोलीस हवालदार किंवा कंडक्टर. आणि या नोकऱ्यांमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र म्हणावा असा बदल झालेला आहे. हक्काची निमसरकारी नोकरी असल्याने लग्नासाठी मुलींना स्थळेसुद्धा चांगली मिळतात, हाही फायदाच आहे. शिवाय महिलांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एसटी आता बऱ्याच ठिकाणी पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळ्या रेस्टरूम्स उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे महिला कंडक्टर्सना अधिक सुरक्षितता वाटू लागली आहे, त्यांचा मोकळेपणा विस्तारतो आहे. त्यांचा कम्फर्ट झोन विस्तारतो आहे.’’ हसीना फराज यांनी एकदा कोंडी फोडून रस्ता मोकळा केल्यावर महिलांनी या क्षेत्रात येण्यात अगदी उत्स्फूर्त म्हणावी अशी वाढ झाली आहे. याचे श्रेय एसटीला तर द्यायलाच हवे, पण दुसरे श्रेय जाते स्वतः या महिलांना ज्या आजवर केवळ पुरुषांच्या समजल्या गेलेल्या या नोकरीमध्ये स्वयंप्रेरणेने येत आहेत. 

एक काळ असा होता की, महिला नोकरी करणार म्हणजे दोन-तीनच पर्याय समोर असायचे. एक तर शिक्षिका किंवा नर्स अथवा बँकेत नोकरी. आता सर्व क्षेत्रे महिलांनी हळूहळू पादाक्रांत केली आहेत, यात वाद नाही. पण हे बदल जेव्हा समाजात तळापर्यंत झिरपतात आणि मोठ्या संख्येने दिसतात, तेव्हाच आपण म्हणू शकतो की, समाज बदलतो आहे. कंडक्टर म्हणून नोकरी करणाऱ्या महिला अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आहेत. मुख्य म्हणजे, ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या बदलाला विशेष महत्त्व आहे. तिसरे श्रेय महाराष्ट्रातील प्रवाशांनाही द्यायला हवे- जे प्रवासात महिला बस कंडक्टर्सना कोणत्याही मोठ्या विरोधाशिवाय स्वीकारू शकतात. ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असे अजूनही काही बाबतीत आपण निश्चितपणे अभिमानाने म्हणवून घेऊ शकतो ते यामुळेच. 

पण, प्रवाशांकडून त्रासही होतोच. काही जणी म्हणाल्या की, पुरुष विनाकारण असंबद्ध विषय काढून बोलू पाहतात किंवा ‘गाडी कधी पोहोचणार’ असे वारंवार विचारत राहतात. हा लगट करण्याचा एक प्रकार. कुर्डुवाडीमधील श्रीमती शिंदे या कंडक्टरने तर अशी तक्रार केली की, सुशिक्षित लोकच विनाकारण वाद घालतात, अरेरावीने बोलतात. याउलट अडाणी, अशिक्षित माणसे सांगितलेले शांतपणे ऐकून घेतात. मला याची थोडीशी गंमत वाटली. शिक्षणाने आत्मविश्वास वाढतो हे खरे आहे. पण आपण आत्मविश्वास आणि उर्मटपणा या दोन गोष्टींमध्ये गफलत तर नाही ना करत? आक्रमकता सगळ्याच ठिकाणी जाणवण्याइतपत वाढली आहे, असे म्हणावेसे वाटते. ‘विद्या विनयेन शोभते’ हा शाळेत घोकलेला सुविचार शाळेच्या पाटीवरच सोडून देतात बरेच लोक. 

श्रीमती मडीवाले या कुर्डुवाडीतील महिलेने तर वेगळीच तक्रार केली. सुट्‌ट्या पैशांवरून कंडक्टरला जवळपास रोजच घसेफोड करावी लागते. अशा वेळी पुरुषांपेक्षा महिला जास्त आक्रमकपणे भांडतात. पुरुष कंडक्टर असताना मात्र याच महिला काहीही बोलत नाहीत. म्हणजेच निरीक्षणातून त्यांच्या असे लक्षात आले की- महिला महिलांशी भांडतात, मात्र त्याच मुद्‌द्यावरून त्या पुरुषांशी तितक्याच आक्रमकतेने भांडू शकत नाहीत. तर ही आहेत, पुरुषसत्तेची मुळे. ही आपल्या मनात इतकी खोलवर रुजली आहेत असे म्हणावे का? 

ड्रायव्हर लोकांशी मी जेव्हा बोलले, तेव्हा आणखी काही गोष्टी लक्षात आल्या... माझा प्रश्न असा होता की, महिला आणि पुरुष कंडक्टर सोबत असताना काही फरक जाणवतो का? तर आधी काही ड्रायव्हर म्हणाले की, त्यांचे आणि आमचे काम पूर्णत: वेगळे आहे. कामाचा संबंध फक्त बेल मारण्यापुरता. त्यात जास्त फरक नाही. पण जेव्हा गाडीची समस्या असते, चाक पंक्चर होते किंवा गाडी बंद पडते; तेव्हा मात्र असे वाटते की, सोबत महिला नसून पुरुष कंडक्टर असता तर बरे झाले असते. अर्थात, कंडक्टरच्या ट्रेनिंगच्या वेळी महिलांनाही गाडीच्या प्राथमिक दुरुस्तीचे ट्रेनिंग दिलेले असतेच. पण तरीही जड वस्तू उचलणे किंवा दुरुस्तीमध्ये मदत करणे अशा कामांमध्ये महिलांची फारशी मदत होत नाही किंवा होऊ शकत नाही. अशा वेळी ‘गड्याला गडी’ असेल तर बरे पडते. यात अविर्भाव असा की, ही कामे बायका करूच शकत नाहीत. 

शिवाय गाडीची दुरुस्ती लवकर होणार नसेल, तर महिला कंडक्टरला सुरक्षित मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवणे ही आणखी एक जास्तीची जबाबदारी असते. याचबरोबर काही महिला बस कंडक्टर्स फलाटावरून गाडी काढायच्या वेळी खाली उतरून नव्हे, तर गाडीत बसूनच शिट्टी वाजवतात. अशा वेळी गाडीच्या मागे एखादे लहान मूल वगैरे असेल, तर अपघात होण्याची भीती असते. शिवाय अनेक महिला कामाकडे लक्ष न देता फोनवर बोलत बसतात. ड्रायव्हर लोकांच्या महिला कंडक्टर्सबद्दलच्या अशाही तक्रारी आहेत. 

एसटीच्या ट्रॅफिक कंट्रोलर विभागाच्या महिला कंडक्टर्सबाबत मात्र वेगळ्याच तक्रारी आहेत. पहिले म्हणजे, यांना रात्रपाळी किंवा मुक्कामी फेरी शक्यतो द्यायची नाही, असा अलिखित नियम आहे. शिवाय रात्री नऊच्या आत सर्व महिलांना मोकळे करायचे, असा लिखित नियम आहे. म्हणजे तुम्ही महिला वाहकांना फक्त रात्री नऊपर्यंत काम देऊ शकता. मात्र त्यानंतर संबंधित अधिकारी आणि ती महिला कंडक्टर यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर पुढील फेरी योजावी लागते. तसे पत्र त्या महिलेकडून लिहून घेतले जाते. शक्यतो वाढीव कामाला महिला उत्सुक नसतात. 

पण प्रसंगोपात्त कधी जास्त वेळ काम करावे लागले, तर त्यांची कुरकूर असते. सकाळी लवकर यायचे झाले तरी अनेक महिला उशिरा येतात आणि त्यांना लवकर जायचे असते. अशा वेळी उरलेल्या उपलब्ध पुरुष कंडक्टर्समध्ये काम वाटून द्यावे लागते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन जो करत असतो, त्याची तारांबळ उडते. उशिरा येण्यामुळे ड्रायव्हर, बससाठी जागोजागी थांबलेले प्रवासी या सर्वांचा खोळंबा होतो. तसेच एसटीच्या भाषेत समांतर route चे प्रमाण वाढल्याने उत्पन्नात घट होते. म्हणजे एका मार्गावर एकाच वेळी दोन बसेस धावतात, कारण पहिल्या बसला उशीर झालेला असतो. 

शिवाय, कामाच्या बाबतीत महिला पुरुषांएवढ्या काटेकोर आणि नियमित नाहीत. उशिरा येणे, रजा घेणे, घरगुती तक्रारी, आजारपणे, बाळाची आजारपणे, सासूसासऱ्यांची आजारपणे- अशा कारणांसाठी महिला वारंवार रजा मागतात किंवा ऐन वेळी दांडी मारतात. अशा स्थितीत कामाचे नियोजन करणे ही डोकेदुखी होऊन बसते. ‘हे खरेच खरे आहे का?’ असे मी इथल्या श्रीमती शिंदे या महिला वाहकाला विचारले; तर त्यांनी हे कबूल केले की, खरेच असे होते. मग मी विचारले की- असे पुरुषांबाबत का नाही होत? तर त्या म्हणाल्या, ‘‘त्यांना काय कामे असतात होय?’’ ‘कामे’ म्हणजे घरची कामे! कामात महिला कमी शिस्तबद्ध असतात आणि नियमित नसतात, ही तक्रार मला वाटते सार्वत्रिक आहे. महिलांचे कामात लक्ष कमी असते, अशी तक्रार अगदी देश- काळाच्या सीमा ओलांडूनसुद्धा सगळीकडे ऐकायला मिळते. फक्त एसटीमधलेच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतले अधिकारी कदाचित ही तक्रार करतील. 

मला वाटते, याचे मुख्य कारण म्हणजे महिलांचे (त्यातल्या त्यात विवाहित महिलांचे) निम्म्याहून जास्त लक्ष घरात असते. याला कारण आव्हान म्हणून किंवा गरज म्हणून किंवा अपरिहार्यता म्हणून बाई घराबाहेर पडली असली तरी ‘चूल - मूल’ हे जोखड मात्र ती अजूनही उतरवून ठेवू शकली नाही. या कमतरतेचे मला कुठेही समर्थन करायचे नाही. तुम्ही जे काम हातात घेतले आहे, ज्याचे तुम्ही पैसे घेता, त्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असलेच पाहिजे, असे माझे मत आहे. पण एकंदर व्यवस्था मात्र महिलांसाठी अन्यायकारक आहे, हेही खरे आहे. अर्थात या परिस्थितीला काही सन्मान्य अपवादही आहेत. हसीना फराज सांगत होत्या की, त्यांच्या कंडक्टरच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी एकही दांडी मारलेली नाही. शिवाय कुर्डुवाडी डेपोमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही जणींच्या अजिबात तक्रारी नसतात. त्या कामाला चोख असतात. उलट, काही जणींच्या मात्र कायम काही ना काही अडचणी असतात. चालायचेच... 

आता एक उदाहरण पाहा. सकाळी सहाची बस असेल, तर त्यांना साडेपाचला हजर राहावे लागते. त्याच्या आधी अर्धा तास घर सोडायचे म्हटले तर सकाळी पाचला घरातील सर्वांचा स्वयंपाक करून, स्वतःसाठी डबा भरून बाहेर पडायचे, म्हणजे तीन वाजता उठणे आले. अर्थात, बरेच लोक अशा नोकऱ्या वर्षानुवर्षे करतातच. पण महिलांना घरची जबाबदारी अधिक असल्याने त्यांना ते अधिक कष्टाचे होते. अशात पुन्हा एखादीचे तान्हे मूल घरी असेल, तर तिचे पूर्ण लक्ष कामात कसे असेल? शिवाय, ग्रामीण भागात पाळणाघरे नसतात. खरे म्हणजे, महिलांच्या या प्रश्नावर रामबाण असे उत्तरच नाही. करिअर करणाऱ्या महिलांना, नाही म्हटले तरी तीन-चार वर्षे मुलांसाठी द्यावी लागतात. मग शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा चार आघाड्यांवर लढता-लढता महिला थकून जाते. अशा परिस्थितीत तिची कामात प्रगती करण्याची इच्छा मरून गेली, तर नवल वाटायला नको. पण यातूनही काही बायका कॉर्पोरेट विश्वातल्या गळेकापू स्पर्धेतून मार्ग काढत वरपर्यंत जातात, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच! 

कौटुंबिक आघाडीवर आणखी वेगळी युद्धे. मघाशी मी स्वयंपाकाचे उदाहरण सांगितलेच. त्याचबरोबर काही सासरवाले सुनांनी नोकरीवर जाताना साडीच नेसली पाहिजे, असा हट्ट करतात. हट्ट कसला, आदेशच! तर साडी नेसून रोजचा दगदगीचा प्रवास आणि त्यात चालत्या बसमध्ये उभे राहून तोल सावरत, सुट्ट्या पैशांचा हिशेब लावत प्रवाशांशी बोलणे हे निश्चितच सोईचे नाही. पण म्हातारे लोक ऐकत नाहीत. डॉ.रेश्मा काबुगडे यांनी यासाठी त्यांच्या थिसिसमध्ये कंडक्टर्सच्या ट्रेनिंगबरोबर त्यांच्या कुटुंबासाठीही एक फॅमिलीचा orientation प्रोग्राम असावा, अशी सूचना केलेली आहे, जी मलाही रास्त वाटते. Implications of family accountabilities on work life balance of lady bus conductors `m Trans Asian journal of marketing and management research (vol. 4, issue 3 March 2015) मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये डॉ. रेश्मा यांनी या गोष्टींचा चांगला ऊहापोह केलेला आहे.  

याबाबत मी माझ्या मर्यादेबाहेर जाऊन श्रीमती हसीना यांना प्रश्न विचारला, ‘‘मुस्लिम असतानाही तुम्ही असा वेगळा विचार करू शकलात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण हा धर्म स्त्रियांच्या बाबतीत बराच कट्टर आहे. उदाहरणार्थ- बुरखा वापरणे. तर, यासंदर्भात कधी कुटुंबाचा दबाव जाणवला का?’’ त्या म्हणाल्या, ‘‘असा कोणताही दबाव जाणवला नाही. आजकालच्या मुली सलवार-कमीझ घालून त्यावर खाकी कोट घालतात. पण मी नोकरीला सुरुवात केली तेव्हा खाकी शर्ट आणि पँट शिवून घेतले होते. ते घालूनच मी कामावर जात असे.’’ 

आणखी एक विचित्र तक्रार मला ऐकायला मिळाली की, ‘एसटीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भ्रष्टाचार महिला करतात.’ भ्रष्टाचार म्हणजे काय- तर उरलेले सुट्टे एक-दोन रुपये परत न देणे किंवा पैसे घेऊन तिकीट न देणे असे प्रकार. म्हणजे महिला कंडक्टर्स अशा पैशाला जास्त ‘सोकावल्या’ आहेत. एकदा करून बघायचे आणि मग चालून जाते असा विश्वास आला की, बिनदिक्कत करायचे. मी काही प्रवाशांशी या विषयावर बोलले, तेव्हा त्यांनी सांगितले की- ‘असे काही नाहीये. महिला आणि पुरुष दोघेही भ्रष्टाचार करतात.’ दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणे काम करणारेही स्त्री-पुरुष आहेतच. पण जर खरोखर काही लोकांची अशी तक्रार असेल की- महिला जास्त भ्रष्टाचार करतात, तर माझ्या मते हा वेगळ्या संशोधनाचा मुद्दा राहील. 

श्रीमती शिंदे यांचे पती मला कुर्डुवाडी डेपोला अनायासे भेटले. त्याआधी श्रीमती शिंदे बोलता-बोलता म्हणाल्या होत्या, ‘‘आजूबाजूच्या लोकांचा महिला कंडक्टर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन तितकासा चांगला नाही. म्हणजे काही लोक सरळ हेटाळणीच्या सुरात म्हणतात की- अरे, तुझी बायको कंडक्टर आहे?’ म्हणजे अजूनही ही म्हणावी तेवढी सन्मानाची नोकरी नाहीच महिलांसाठी.’’ अरविंद आडिगा यांच्या White Tiger ला लहानपणी कंडक्टर व्हायचे असते, ही गोष्ट मला उगीचच आठवली. कारण कंडक्टरची पूर्ण बसवर सत्ता चालते. बेल मारली की बस थांबते आणि बेल मारली की चालू होते. लोकांचा दृष्टिकोन स्थल- काल-व्यक्तिपरत्वे (यालाच सोबत लिंग जोडून द्यायला हरकत नसावी) बदलतात ते असे. श्रीमती शिंदे यांचे पती मात्र म्हणाले, ‘‘मला अभिमान आहे की माझी पत्नी कंडक्टर म्हणून काम करते. लोक काय म्हणतात त्याकडे मी लक्ष देत नाही. आज बायको कमावते, चार पैसे घरात आणते आणि त्यावर घर चालते- ही माझ्यासाठी मोठ्या समाधानाची गोष्ट आहे.’’ हे ऐकून मलाही समाधान वाटले. याउलट, इथल्याच दुसऱ्या एका महिला कंडक्टरवर सासरच्या लोकांचा नोकरी सोडण्यासाठी प्रचंड दबाव आहे. 

गंमत म्हणजे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जशा महिला कंडक्टर्स रूळल्या तसे महानगर परिवहनमध्ये मात्र झाले नाही. मुंबईच्या बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून लागलेल्या काही महिलांनी एसटीमध्ये बदली करून घेतली. याचे कारण म्हणजे, दोन्ही ठिकाणच्या कामाच्या स्वरूपात बराच फरक आहे. एक तर महानगरात गर्दी जास्त असते आणि बस खूप छोट्या-छोट्या अंतरावर थांबते. त्यामुळे चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांचा ओघ सारखा चालू असतो. म्हणजे कंडक्टरला बसच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सारखी ये-जा करावी लागते. 

शिवाय, एसटीमध्ये असते तशी कंडक्टरसाठी बसण्याची राखीव जागा महानगर बसमध्ये नसते. त्यामुळे हे काम जास्त थकवणारे ठरते. हेच कारण आहे की, महिलांची पसंती एसटीला अधिक आहे. (संदर्भ : बातमी ‘टाइम्स ऑफ इंडिया’, 27 ऑक्टोबर 2008) आणि कोणत्या सामाजिक स्तरातून या महिला येतात हेही पहायला हवे. ही नोकरी सोफिस्टीकेटेड किंवा पांढरपेशी नक्कीचा समजली जात नाही. त्यातही महिलांसाठी म्हणजे, ‘ते त्यांचे कामच नव्हे’ असे अजूनही काहीजण म्हणतात. एक साहेब तर असे म्हणाले की, ‘यांच्या जागी एखाद्या बाप्याला नोकरी मिळाली असती तर एक घर चालले असते.’ म्हणजे बायका नोकरी करतात ते फक्त ‘एक्स्ट्रा इन्कम’साठी? की त्या घर चालवत नाहीत, की त्यांना घर नसते?’ 

आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, लग्न न झालेल्या आणि लग्न झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मुली यामध्ये आहेत. काही आधी नोकरीला लागल्या आणि नंतर त्यांची लग्ने झाली. पण विवाहित आणि अविवाहित आयुष्यात खूप फरक असतो, असे मला काहींनी सांगितले. आईच्या घरी असताना सकाळी उठून आपापले आवरून तयार डबा घेऊन बाहेर पडायचे, असे केले तरी चालते. कसली जबाबदारी नसते. तेच लग्न झाल्यानंतर नवरा, सासू-सासरे, मुले यांचा स्वयंपाक, नातेवाईक, आजारपणे ही सगळी लटांबरे मागे लागतात. मग नोकरी खूप जास्त त्रासाची वाटू लागते. पण त्रास होऊनही नोकरी सोडायचा विचार कुणी करत नाही. परंतु काही कंडक्टर्स असेही सांगतात की, ही नोकरी अतिशय दगदगीची असल्याने त्यांना याव्यतिरिक्त दुसऱ्या नोकरीची संधी मिळाली तर त्या नक्कीच स्वीकारतील. उदाहरणार्थ- शिक्षिकेची नोकरी फार चांगली असते, असे काहींचे मत आहे. 

छेडछाडीचे तुरळक प्रकार महिला बस कंडक्टर्सबाबत होतात, नाही असे नाही. मघाशी मी भांडणाचा आणि मुद्दाम लगट करण्याचा उल्लेख केला होता, त्याचबरोबर काही महिला कंडक्टर्सनी प्रवासी लोक विनाकारण टोमणे मारत राहतात अशी तक्रार केली. विशेषतः कॉलेजची अप- डाऊन करणारी मुले काही वेळा घोळक्यात असल्यावर त्रासदायक ठरतात. मुली ज्या बसमध्ये चढतील त्या बसमध्ये मुले गर्दी करतात. त्याच वेळी त्याच मार्गावर दुसरी बस असेल, तर त्यात न जाता एकाच बसमध्ये जास्त गर्दी करतात. अशा वेळी गर्दीमध्ये तिकिटे देताना कंडक्टरला त्रास होतो. पण मुले घोळक्याने असल्याने जुमानत नाहीत. हीच मुले काही वेळा दोन्ही बाजूंना उभे राहून महिलांना मधून यायला भाग पाडतात, असे मला काही कंडक्टर्सनी सांगितले. हा किती अपमानजनक आणि किळसवाणा प्रकार आहे! पण असे घडू शकते महिला कंडक्टर्सच्या बाबतीत. हे अपप्रकार कधी संपतील, कोण जाणे! 

मी स्वतः एकदा तासगाव स्थानकावर एका प्रवाशाला एका महिला कंडक्टरला शिवीगाळ करताना पाहिले आहे. श्रीमती हसीना यांना याबाबत विचारले, ‘‘अशा तक्रारी येतात का आताच्या नव्या मुलींकडून?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘हो, असे काही तुरळक प्रकार घडतात. पण आता मुली एवढ्या हुशार झाल्या आहेत की, त्या तिथल्या तिथे त्या प्रवाशाला सरळ करतात. पुढे तक्रार करण्याची वेळच आणत नाहीत.’’ कुर्डुवाडी आगारातील अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा वेळी गाडी सरळ पोलीस स्टेशनला न्यायचे अधिकार महिला कंडक्टरला आहेत. शिवाय तिने तक्रार केली, तर सरकारी कर्मचाऱ्याला त्रास दिल्याचा गुन्हा संबंधितावर दाखल होऊ शकतो आणि अशा केसेसमध्ये तपास लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. ‘‘महिला कंडक्टर झाल्या, तशा ड्रायव्हर होऊ शकतात का?’’ असे मी इथल्या ड्रायव्हर लोकांना विचारले, तर काही म्हणाले, ‘‘हो, का नाही? नक्कीच होऊ शकतात!’’ 

मग मी विचारले की, मग अजून का नाहीत? तर मला नवी माहिती समजली की, एसटीमध्ये ड्रायव्हर या पदासाठीही महिलांना राखीव जागा आहेत, पण अजून कुणीही तिकडे अर्ज करत नाहीत. म्हणजे महिलांसाठी नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत तर, एसटीमध्ये अजूनही! किंवा मग अजूनही एक क्षेत्र पादाक्रांत करायचे बाकी आहे? कंडक्टर म्हणून काम करणे किती त्रासाचे आहे, हे आपण पाहिलेच. त्यामुळे कंडक्टर म्हणून नोकरीला लागलेल्या महिला काही दिवसांनी कार्यालयीन कामाची मागणी करतात. एखादे डेस्क रिकामे असेल तर किंवा कर्मचारी कमी असतील तर त्यांना ते कार्यालयीन काम मिळतेही. पण अन्यथा त्यांना प्रमोशन मिळेपर्यंत कंडक्टरचेच काम करावे लागते. पण महिलांची मागणी मात्र कार्यालयीन कामाची असते. 

रात्रपाळी किंवा मुक्कामी फेरी हा एसटीमध्ये कायम एक अंतर्गत वादाचा मुद्दा आहे. श्रीमती हसीना म्हणाल्या, ‘‘जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा एकटी असल्याने खूप चांगल्या गाड्यांच्या फेऱ्या माझ्यासाठी ठेवल्या गेल्या. जसे की, सातारा-फलटण नॉनस्टॉप बस किंवा फलटण-पुणे ही बस. या गाड्या कमी त्रासाच्या असत. पण जशी महिलांची संख्या वाढत गेली तसे पुरुष कंडक्टर्स तक्रार करू लागले की, कष्टाची कामे कायम आम्ही घ्यायची आणि तुलनेने हलकी (soft) कामे त्यांना का द्यायची? पण आजकालच्या मुली ही गोष्ट आव्हान म्हणून घेतात. आता किती तरी महिला कंडक्टर्स मुक्कामी फेऱ्यांना जातात आणि लांबलचक फेऱ्या किंवा शटललाही जातात. रात्रपाळी अजून कुणाला शक्यतो दिली जात नाही; कारण प्रश्न सुरक्षेचा असतो, जो व्यवस्थापनाला पूर्णत: सोडवता आलेला नाही.’’ 

श्रीमती मडीवाले म्हणाल्या, ‘‘ड्रायव्हरवर महिलांचा पूर्ण विश्वास असतोच. तो आपला माणूस असतो. गाडीच्या आत असताना रात्रपाळी असतानाही घाबरायची गरज नाही. पण गाडी बंद वगैरे पडली तर मात्र भीती वाटते. शिवाय गाडी सांगून बंद पडत नाही. कुठेही आडमार्गात, घाटात गाडी बंद पडली तर भीती वाटते म्हणून रात्रपाळी घ्यावीशी वाटत नाही.’’ कुर्डुवाडी डेपोचे श्री.मनता आणि श्री.फड म्हणाले की, महिलांना शक्यतो रात्रपाळी दिलीच जात नाही. पण एखाद्या वेळी दिलीच तर तसे त्या संबंधित महिलेकडून लिहून घेतले जाते की, ‘मी माझ्या जबाबदारीवर जात आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी माझी राहण्याची सोय (नातेवाईक वगैरे) आहे.’ गाडी एखाद्या ठिकाणी बंद पडली तर मागून येणारी गाडी त्या ठिकाणी पाठवून त्या महिलेला तिथून जवळच्या डेपोमध्ये सुरक्षित पोहोचवण्याची सोय करण्याची आमची जबाबदारी असते. एखाद्या खूप आडमार्गावर गाडी बंद पडली असेल तर आणि पाठीमागून त्या मार्गावर गाडी जाणार नसेल, तर त्या ठिकाणावर दुचाकी पाठवून महिलेला तिथून सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. 

पण ही एकंदर डोकेदुखीच ना? त्या जागी पुरुष असता, तर गाडीमध्ये झोपून रात्र काढली तरी चालून जाते. खरेच- फक्त महिला कंडक्टर्सच नाही, तर भारतातल्या सर्व महिलांना घरातून बाहेर पडताना ही भीती असतेच, नाही? अतिप्रसंग झाला तर? किती भिऊन राहायचं? ज्या दिवशी आम्ही सगळ्या निर्भय बनून पाहिजे त्या वेळी घराच्या बाहेर पडू शकू, तो खरा आमचा स्वातंत्र्यदिन! 

ऋणनिर्देश : 
या लेखाची मूळ कल्पना संपादक श्री. विनोद शिरसाठ यांची होती. त्या कल्पनेला ‘महिला कंडक्टर्स’ हा विषय घेऊन मी फक्त दृश्य स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. लेखाच्या दृष्टीने माहिती मिळवण्यासाठी माझे कुर्डुवाडी आगारात येणे-जाणे वारंवार होत होते, तेव्हा मला येथे अतिशय चांगली वागणूक मिळाली. बस कंडक्टर्सच्या मुलाखती घेण्यासाठी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात मला तेथील सर्वांनी सहकार्य केले आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे उत्साहाने दिली. तसेच श्रीमती हसीना फराज यांनीही अतिशय उत्साहाने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. डॉ.रेश्मा काबुगडे यांनी फोनवर पाहिजे तेव्हा लागेल ती सर्व माहिती दिली. श्री.अतुल सुलाखे यांनी काही बातम्यांची कात्रणे पाठवली आणि निकेश जिल्थे या पत्रकार मित्राने काही संपर्क क्रमांक व माहिती हातासरशी मिळवून दिली. स्वाती गायकवाड या मैत्रिणीने मोलाची सोबत केली, तसेच श्री.संदीप कलभंडे याच्याशी झालेल्या चर्चेचा फायदा झाला. या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

Tags: एस. टी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्नेहलता जाधव रिपोर्ताज स्त्री कंडक्टर स्त्रिया report maharashtra state snehalata jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Yogesh- 27 Mar 2021

    खूपच विस्तृत लेख होता, वाचून महिला कंडक्टर हा विषय खोलपर्यंत समजला असे लेख अश्या विषयांवरती लिहिले जातात म्हणून लोकांना असे विषय सखोल समजतात नाहीतर एवढं समजून घेणं अवघड झालं असत. लेखिका आणि साधना या दोघांचा मी आभारी आहे.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके