व्यक्ती इतक्या तत्परतेने सरकारकडून कृती नेहमीच घडते असे नाही; पण सरकार मदतीची योजना अधिक चांगल्या प्रकारे आणि पुरेशा प्रमाणात करू शकते. व्यक्तीची मदत उत्स्फूर्त, पण तात्कालिक स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे. पण व्यक्ती उमाळयाने जे करतात तेही महत्त्वाचे आहे, आणि ह्या उमाळयाला काही संस्थात्मक आकार देता आला तर त्याचाही निश्चितच उपयोग आहे.
खासदार श्री. नानासाहेब गोरे यांनी दिल्लीहून नोव्हेंबर अखेर डॉ. बाबा आढाव यांच्या नावे पत्र पाठवले ते असे : “साधनेतील सौ. जानकीबाई धायगुडे यांचे पत्र (साधना, ता. 24-11) वाचून वाटले की, आपण आपल्या भावनेचे प्रतीक म्हणून काही रक्कम तुमच्याकडे पाठवावी. तुमच्याकडे पाठवली तर चालेल का म्हणून पत्राने चौकशी करत आहे. मला असे सुचवावेसे वाटते की, साधनेने आवाहन केले तर समाजक्रांतिकारकांच्या साहाय्याकरता पन्नास हजारचा निधी गोळा करणे अशक्य होऊ नये. पटते का पाहा.”
सहृदयांचे उत्स्फूर्त साह्य
श्री. नानासाहेबांचे हे पत्र हाती पडले, तत्पूर्वी आमदार चारुदत्त शहा, सांगली यांनी पत्रास रुपयांचा चेक रवानाही केला. नाशिकच्या सौ. सुधा माळी ( उपाध्ये ) यांनी स्वतःच्या विवाहानिमित्त मिळालेल्या भेटीतून पन्नास रुपये डॉ. बाबा आढाव यांच्या हाती दिले. नागपूरचे डॉ. वसंतराम वामकर यांनी एक रग प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या हाती रवाना केला. श्री. एस. एम्. जोशी यानी लेख वाचताच फोन केला आणि आपल्याकडे समाजसेवकांना साह्य करण्यासाठी एका मित्राने उपलब्ध करून दिलेले जे शंभर रुपये आहेत ते पाठवत असल्याचे कळवले. समाजक्रांतीसाठी निरंतर धडपडणाऱ्या व वृद्धापकाळामुळे आता हालअपेष्टा भोगणाऱ्या मंडळींचे गाऱ्हाणे श्री. धायगुडे यांच्या निमित्ताने लोकांच्या कानी गेले आणि सहृदय माणसे सरकार काय करते त्याची वाट न पाहता मदतीसाठी पुढे झाली. व्यक्ती इतक्या तत्परतेने सरकारकडून कृती नेहमीच घडते असे नाही; पण सरकार मदतीची योजना अधिक चांगल्या प्रकारे आणि पुरेशा प्रमाणात करू शकते. व्यक्तीची मदत उत्स्फूर्त, पण तात्कालिक स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे. पण व्यक्ती उमाळयाने जे करतात तेही महत्त्वाचे आहे, आणि ह्या उमाळयाला काही संस्थात्मक आकार देता आला तर त्याचाही निश्चितच उपयोग आहे.
पहिले पाऊल
डॉ. बाबा आढाव व रा.प. नेने लोकांनी उत्स्फूर्तपणे दिलेले हे दोनशे रुपये आणि ऊबदार रग घेऊन बारामतीला श्री. हरी पिराजी धायगुडे यांना भेटायला गेले. त्यांची स्थिती अनुकंपनीय आहे. पण त्यांनी दीनवाणीचा एकही शब्द उच्चारला नाही. आपल्या निमित्ताने समाजक्रांतीसाठी धडपडणाऱ्या आणि वृद्धापकाळामुळे अगतिकता आलेल्या मंडळींचे गाऱ्हाणे समाजापुढे मांडले गेले याचे त्यांना समाधान होते, आणि ज्यांनी तत्परतेने मदत पाठवली त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याचे दारिद्रय पराकोटीचे होते. लाकडाची वखार चालवून त्यांच्या पत्नी घरसंसार सांभाळत होत्या. अद्यापही वखारर चालवण्याची उमेद त्या बाळगून आहेत. पण धायगुड्यांच्या आजाराने वखार रिती झाली आहे.
हजारभर रुपये त्यांना देता आले तर त्यांची वखार पुन्हा सुरू होऊ शकेल, आणि आपला संसार त्या कसाबसा चालवू शकतील असे डॉ. बाबा आढाव यांना वाटते. म्हणून हजार रुपये तरी त्वरेने जमवता यावे व या समाजक्रांतिकारकाची तात्कालिक अडचण तरी दूर करावी असे योजले आहे. हे झाले पहिले पाऊल.
योजनेचे स्वरूप
समाजक्रांतीसाठी अशाच जिद्दीने धडपडलेली आणि वृद्धापकाळामुळे अगतिक बनलेली आणखीही काही माणसे आहेत. त्यांच्याही तात्कालिक अडचणीत काही साह्य करता यावे असे स्वाभाविकच वाटते. तात्कालिक आणि तीव्र अडचणींच्या वेळी मर्यादित साह्याची काही योजना करता आली पाहिजे. खासदार नानासाहेब गोरे यांनी पत्रात व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे 50 हजार रुपयांचा निधी जमवता आला तर उत्तम, पण तेवढा जमवता आला नाही तरी शक्य तेवढा तरी निधी जमवावा असे ठरवले आहे, व त्याच दृष्टीने हे आवाहन केले आहे. समाजक्रांतिकारक कृतज्ञता निधी म्हणून येणाऱ्या रकमा जमा केल्या जातील, व वेळोवेळी गरजेप्रमाणे तात्कालिक पण तीव्र अडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने या निधीचा विनियोग केला जाईल. कोणत्याही रकमेचा अव्हेर केला जाणार ते नाही. कृतज्ञतेचे जे काही फलपुष्प मिळेल ते स्वीकारले जाईल. चेक वा मनिऑर्डर्स ‘सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधी’ या नावाने पाठवावा. पाच रुपयांहून अधिक रक्कम पाठणाऱ्यांना पावती पाठवली जाईल. त्यापेक्षा लहान रक्कम जमा करून बँकेत भरणा केल्या जातील. दहा हजार रुपयांचा निधी जमला, आणि आणखी जमण्याची शक्यता दिसली तर त्यासाठी एक विश्वस्त निधी नोंदवण्यात येईल.
लोकमत तयार करण्याचे काम चालू राहील
समाजक्रांतीसाठी ज्यांनी जिद्दीने झुंज दिली, त्यांच्या तीव्र आणि तात्कालिक अडचणीचे निवारण करण्याचा मर्यादित हेतू निधीसमोर आहे. या समाजक्रांतिकारकांची नित्याची सोय सरकारने लावली पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच त्यांना मानवेतन देऊन त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखावह करण्याची जबाबदारी सरकारच घेऊ शकेल आणि त्याने ती घ्यावी या दृष्टीने लोकमत तयार करण्याचे कार्य चालूच राहिले पाहिजे.
सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधीचे संयोजन करण्यासाठी तिघांची एक अस्थायी संयोजन समिती बनवण्यात आली असून ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रवर्तक डॉ. बाबा आढाव, आंतरभारतीचे सचिव यदुनाथ थत्ते, आणि शंकर ब्रह्मे, समाजविज्ञान ग्रंथालयाचे रा. प. नेने हे अस्थायी समितीचे संयोजक म्हणून काम करतील. सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधीचे कार्यालय, साधना, ४३० शनिवार पेठ पुणे ३०, या ठिकाणी राहील.
Tags: Yadunath Thatte Shri. Hari Piraji Dhaygude Mr. S. M. Joshi G. P. Pradhan Pra Dr. Vasantrao Vamkar Dr. Baba Aadhav Shri. Nanasaheb Gore यदुनाथ थत्ते श्री. हरी पिराजी धायगुडे प्रा. ग. प्र. प्रधान श्री. एस. एम्. जोशी डॉ. वसंतराम वामकर डॉ. बाबा आढाव श्री. नानासाहेब गोरे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या