डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर (काव्य आणि) तोडगा

मी आता सत्तर वर्षांचा आहे. नदीजोड प्रकल्प अमलात आणला जाऊ लागेल तेव्हा मी नसेन, हा मोठा दिलासा देणारा विचार आहे. महत्त्वाकांक्षा आणि मूखर्पणा याला विभागणारी रेषा काढणे कठीण असते. प्लंबरचा विचार कुठवर मोठा करायचा याला काही मर्यादा असावी, असे मला वाटते. इथे मोठा पैसा आहे आणि राजकारण आहे. या चेतना देणाऱ्या बाबी आहेत- विशेषतः ‘लोक प्रतिनिधीं’ना. अर्थात हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जे करावे लागेल ते महत्त्वाकांक्षी आणि मोठेच असणार आहे. त्याची व्याप्ती व स्वरूप याचा विचार करताना पर्यावरण, जीवसृष्टी इत्यादी बाबी (राजकारण्यांना किरकोळ वाटत असल्या तरी) विचारात घ्यायला हव्यात, हे उघड आहे. कदाचित मी सुचवत असलेला विचारही कमी महत्त्वाकांक्षी नसेल, पण तो नक्कीच कमी विनाशक असावा असे वाटते आणि कमी खर्चिकदेखील.

दरवर्षी पावसाळा आला की, त्याचे कौतुक सुरू होते. विशेषतः कविमंडळींना ऊत येतो असे दिसते. किंवा कदाचित वर्तमानपत्रवाल्यांची मने या काळात द्रवतात आणि ते (परंपरेला धरून का होईना) कविता खपायला उद्युक्त होतात, असे असावे. पावसावर कविता लिहिण्याचा उद्योग महाराष्ट्रात जुना आहे. जूनमध्ये याला सुरुवात होते. महिना-दोन महिने हा उद्योग चालतो. मग पुराच्या आणि पावसाने जमीन धसण्याच्या, लोहमार्गावर दरडी कोसळल्याच्या बातम्या येतात. सप्टेंबरमध्ये धरणे भरली, न भरल्याच्या बातम्या येतात. ऑक्टोबरमध्ये ‘उन्हाळा’ जाणवू लागतो. नोव्हेंबरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याबद्दल, पिण्याच्या पाण्याचे काय होणार याबद्दल आणि पाणीप्रश्न ‘पेटल्या’बद्दल मीडिया शंख करू लागते. या वर्षी उन्हाळा कसा पार पाडायचा, याबद्दल सर्व जण विचारात पडतात. इथवर येता-येता पावसाळी कविता वगैरे पार आटून जातात. 
तरी एकंदरीने बघता, कविमंडळींनी पूर्वीपासून केलेले महाराष्ट्राचे व तेथील पावसाळ्याचे वर्णन पाहण्यासारखे आहे. गडकरी (म्हणजे राम गणेश बरं का!) महाराष्ट्राला ‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’’ असे म्हणतात. ‘‘अंजन, कांचन करवंदीच्या काटेरी देशा’’ असेही म्हणतात. पुढे म्हणतात  
 ‘‘सह्याद्रीच्या सख्या! जिवलगा! महाराष्ट्र देशा!
 पाषाणाच्या देहीवरिसी तू हिरव्या वेषा 
गोदा कृष्णा भीमा तुझिया ललाटीच्या रेषा।’’ 

हे काव्य अतिशय सुंदर आहे. एडिट करून लिहितानाही अंगावर रोमांच येतात. पण त्यामागे एक भयावह सत्य दडलेले आहे. त्याचा परामर्श घेण्याचा माझा इथे विचार आहे आणि त्यात महाराष्ट्राचा पाणीप्रश्न आहे. पण त्यापूर्वी आणखी एका (आणि एकाच) कवितेचा उल्लेख करण्याचा माझा विचार आहे. तेवढी या लेखाकरता पुरेशी आहे, बाकी हिरवा शालू आणि ‘अग बाई किती छान!’ रानफुले खूप *** आहेत. ती असोत. वि. म. कुलकर्णी यांनी ‘आले नवे नवे पाणी’ ही कविता लिहिली आहे. ती इतकी छान आहे की, आज पन्नास-साठ वर्षांनंतर पावसाळ्यात तीच आठवते. त्यातील ‘‘समतेची जणू नवध्वजा ही राही फडफडूनी’’ ही एक बेसुरी ओळ सोडली, तर इतकी सुंदर कविता शोधून सापडणे कठीण आहे. त्या काळच्या कवींचा समग्र विचार केला तर कदाचित ती ओळ क्षम्यसुद्धा म्हणता येईल! ती कविता म्हणते, ‘‘आले नवे नवे पाणी, उसळत घुसळत फेसाळत,जळ धावे दाही दिशांनी, आले नवे नवे पाणी’’  त्यानंतर मधला मजकूर येतो, जो काव्य म्हणून आणि पावसाचे चित्रण म्हणून अतुल्य आहे; तो जिज्ञासूंनी जरूर वाचावा. कवितेचा प्रवाह मग पोचतो.
‘‘नदी-नाल्यांना पूर लोटला, 
तुडुंब चाले जळ, तयाची 
अवखळ हो खळखळ 
दुथडी भरल्या गोकुळातल्या त्या यमुनेवाणी 
आले नवेनवे पाणी... 
हे नव जीवन, हे संजीवन येई इहलोकात 
नवतीची नवी ऋचा गात 
मृत्युलोकची कळा पालटे पृथ्वी हो तरुणी 
आले नवे नवे पाणी. 
पायदळीची दडली बीजे 
येतील तरतरूनी धुमारे तणावे ही फुटुनी, 
सश्य श्यामलाम्‌, सुजलाम्‌, सुफलाम्‌ 
होईल हो धरणी, 
इथं कवी म्हणतो, 

‘‘आले नवे नवे पाणी! आणि ‘होईल हो’ काय हिरवीगार, आणि सुजलाम्‌ तरी होतेच ही धरणी--’’ पण मग पुढे होते काय? सुफलाम्‌चे काय झाले? दुष्काळ नेमाने येतो, तो कसा काय? आधी वरती मी एका भयावह सत्याचा उल्लेख केला आहे ते सत्य आहे याचे उत्तर. 
‘राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे गडकरी म्हणतात, ते अक्षरशः खरे आहे. त्यांना वेगळाच अर्थ अभिप्रेत असावा; पण नकळत का होईना, त्यांनी पाणीप्रश्नावर नेमकेच बोट ठेवले आहे. स्वतःच्याही नकळत सत्य सांगून जाणे कवींच्या बाबतीत अनेकदा घडते. उदा. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ ही कविता लिहिताना वसंत बापट या कवीला आपण मुंबई- पुण्यातील वाहन-चालकांना उपदेश करीत आहोत, असे लक्षात आले असेल, असे मला वाटत नाही. 

तर सांगायचा मुद्दा काय की, महाराष्ट्रातला दगड (किंवा त्याचे स्वरूप) ही खरी समस्या आहे. दगड हा खास मराठी शब्द आहे. तो आपल्याकडच्या भूस्तराचे अगदी नेमके वर्णन करतो. खडक शब्दाचंसुद्धा तसंच आहे. इतके चपखल ‘ऑनोमोटोपोएटिक’ शब्द मराठीमध्ये काही चुकून स्फुरलेले वाटत नाही. ती वस्तू पाहून, तिला स्पर्श करून, तिच्या ठेचा खाऊन, त्यावर आपटल्याने आणि डोक्याला टेंगळे आल्यानेच एखाद्या प्रतिभावान व्यक्तीला सहजगत्या स्फुरतील असेच हे शब्द आहेत. फत्तर हा उर्दू शब्ददेखील मोगलांना ते महाराष्ट्रात आले तेव्हाच सुचला असावा, असे मला खात्रीने वाटते. 

सांगायचा मुद्दा काय की, या महाराष्ट्रातल्या दगडांच्या आणि खडकांच्या गुणधर्मामध्ये महाराष्ट्रातल्या पाणीप्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. मात्र कवी काय, शेतकरी काय आणि इतर शिकली-सवरली माणसेच काय- पण तंत्रज्ञ लोकांनाही याबाबत फारशी जाण आहे, असे लक्षात येत नाही. तशी जाण असती तर महाराष्ट्रातील खडकांमधली ‘भूजल पातळी’ असा शब्दप्रयोग केला गेला नसता. तसेच ‘पाझर तलाव’ तयार केले नसते, तसेच दोनशे फूट खोल बोअर विहीर ‘फेल’ गेली म्हणून कोणी ती चारशे फूट करायला गेले नसते. एकूणच असे लक्षात येते की, महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाबद्दल जिऑलॉजिस्ट किंवा जिओहायड्रॉलॉजिस्ट बोलताना-लिहिताना आढळत नाहीत. त्यांना फारसे कोणी विचारतच नाहीत. 

त्यातही एक भानगड आहे. एक नाही, निदान दोन भानगडी आहेत. महाराष्ट्रातील फत्तराची  फारशी जाण उत्तर हिंदुस्थानी जिऑलॉजिस्टांना नसते. ते आपले त्यांच्या ‘तिकडच्या’ अनुभवाप्रमाणे इथले खडक पाहतात. महाराष्ट्रातले जिऑलॉजिस्ट काय करतात माहिती नाही; परंतु त्यांना खडकांच्या अभियांत्रिकी गुणधर्माबद्दल किती माहिती असते, ते सांगता येणे कठीण आहे. एकूणच इथं आवश्यक असणारे ज्ञान व माहिती जिऑलॉजी, इंजिनिअरिंग, हायड्रॉलॉजी, जीवशास्त्र, इकॉलॉजी अशा अनेक क्षेत्रांतील आहे आणि ती कुठे एकत्र येणे जरा दुरापास्तच आहे. के.आर. दात्यांसारखा एखादाच कोणी विरळा माणूस असा असू शकतो. दुर्दैवाने आता तेही नाहीत. त्यात आपले सर्वज्ञ राजकारणी कायमचे आहेत. जायकवाडीसारखे धरण भलतीकडे बांधणे हे त्याशिवाय घडू शकत नाही आणि राजकारण्यांपुढे तंत्रज्ञ वगैरे मंडळी अगदीच फालतू ठरतात. 

महाराष्ट्रातील दगड आणि खडक कसा आहे, ते आधी पाहणे आवश्यक आहे आणि मग त्याचा परिणाम नद्यांवर काय होतो, ते दिसेल. तो लक्षात घेता, महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईच्या प्रश्नावर काय (मूलगामी) विचार होऊ शकतो ते पाहता येईल. महाराष्ट्रातील खडक हा बव्हंशी ‘इंपर्व्हिअस’ आहे, म्हणजे काचेसारखा आहे. विटेसारखा नाही. या दगडातून पाणी आरपार जाऊ शकत नाही. हे महाप्रचंड खडक आपल्याला विशेषतः पश्चिमेकडे दिसतात. कवी वसंत बापट यांनी ‘दख्खनची राणी’ या कवितेत त्याचे उत्तम वर्णन केले आहे. ‘ड्यूकचे नाकाड सरळ अजस्र राहिले उभे हे शतके सहस्र’ असे ते वर्णन आहे. असे हे शेकडो फुटांचे कडे वर्षानुवर्षे उभे राहू शकतात, ही बाब बरेच काही सांगते. सह्याद्रीचे कडे मोठे आहेत आणि त्यावर येणारी झाडे मात्र खुरटी आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. 

‘अंजन कांचन करवंदी’ सोडता इथे काही वाढत नाही. इथं मुख्यतः काटेरी झुडपेच येतात. याचे मुख्य आणि उघड कारण असे की, आपल्या खडकांवर मातीचा थर फार कमी आहे. जो आहे तोही पावसात वाहून जातो. त्यात आपण फार कर्तृत्ववान आहोत. म्हणजे होती नव्हती ती जंगले व झाडे-झुडपे आपण तोडून टाकली आहेत आणि तोडून टाकीत आहोत. त्यामुळे आपण पाणीप्रश्न अधिकच बिकट केला आहे. महाराष्ट्राचे वाळवंट होत नाही याला एकच कारण आहे. महाराष्ट्रात वाळू नाही. एरवी वाळवंट नाही तर ‘खडकवंट’ झालेला आहेच आपला देश. मुसलमान लोक हजच्या वाळवंटात देव शोधायला जातात. त्र्यंबकेश्वरला गेले की, आता साधारण तसाच अनुभव हिंदू लोकांना येऊ लागला आहे, हे कोणीही मान्य करील. पण महाराष्ट्रातील पाणीप्रश्न आणि म्हणून शेती-भातीचा प्रश्न पूर्णपणे मानवनिर्मित नाही, हे मान्य आहे. 

‘गावगाडा’ या प्र.ना. अत्र्यांच्या पुस्तकात त्यांनी अशा अर्थाचे काही म्हटले आहे की, ‘मराठ्यांना जेव्हा शोध लागला की, शेती करण्यापेक्षा युद्ध करणे सोपे आहे, तेव्हाच त्यांची खरी प्रगती झाली. शिवाजीमहाराजांबद्दल लोक इतकं काय काय बोलतात, पण महाराजांना हा शोध अमलात आणण्याचे श्रेय दिले गेल्याचे मला तरी माहिती नाही.’ 

महाराष्ट्राच्या भूमीच्या पसाऱ्याचा विचार करू लागल्यावर लक्षात येते ती तिची वैशिष्ट्यपूर्ण रचना. पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत आहे. म्हणजेच दात आहेत तिथे चणे नाहीत आणि चणे आहेत तिथे दात नाहीत, ही स्थिती आहे. त्यामुळे तिथे पाऊस पडतो आणि पूर्व बाजूला सपाटी आहे. तिथे मातीचे थर आहेत. तिथे थोडा पाऊस पडला तर उत्तम पीक येते. पण तोही इथे पडत नाही. पश्चिमेकडे कितीही पाऊस पडला तरी पिकाची वानवाच असते. हा काय प्रकार आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. पश्चिमेकडील भूभाग पाणीच धरत नाही. पाणी धरायला तिथे पुरेशी माती नाही. ते पाणी नुसतेच वाहून जाते. ‘उसळत घुसळत फेसाळत जळ धावे दाही दिशांनी’ कवी म्हणतो, ‘आले नवे नवे पाणी!’... ‘तप्तगिरीवर तप्तदरीवर शिडकावा होता तोषंली वसुंधरा माता!’ असेही कवी म्हणतो. या वसुंधरामातेला इथे पोटच नाही, ही मोठी भानगड आहे. तिला तोषायला वेळच लागत नाही. 

इगतपुरीला खूप पाऊस पडतो. तिथे ऑक्टोबरपासून पाणीटंचाई येते. पाणी येते, पण ते ठेवायचे कुठे? आमच्या जमिनीला पोटच नाही. ‘किल्मिष कंटक चिखल माजला पात्रांच्या ठाई’ त्याला हे पाणी ते कवी म्हणे देई गती. आहे ती माती निघून जाते. पुन्हा खडक आपले कोरडे ते कोरडेच. त्याचा चटका बसून सप्टेंबरमध्ये पायाला फोड येऊ शकतात. या तुलनेत गंगेच्या खोऱ्याचा विचार केला तर ढेरी आहे. महाप्रचंड ढेरी. तिथे शेकडो फूट माती आहे. आपल्याकडे मातीचा थर काही इंच असला तर असतो आणि लगेच मुरूम असतो आणि मग खडक!

‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशी प्रास जुळणारी सरकारी मोहीम मध्यंतरी सुरू झाली. शासनाच्या कार्यालयातील जमीनदेखील कर्मचाऱ्यांना खणायला लावली गेली. म्हणे, पाणी जिरवायचे आहे. पण पाणी जिरणार कशात? मुळात ही कल्पना चूक नव्हती, पण पाणी आपल्या खडकांत जिरत नाही याची दखल कोणी घेतली नाही. मग ती योजना हळूहळू विरून गेली. यामुळे काही ठिकाणी थोडेफार पाणी वाढले, पण दात कोरून पोट भरणे याच्या फार पुढे हे जाणार नाही, हे उघड आहे. 

पाणीप्रश्न सोडवण्याच्या नादात एक नद्याजोड प्रकल्प होऊ घातला आहे. मी आता सत्तर वर्षांचा आहे. नदीजोड प्रकल्प अमलात आणला जाऊ लागेल तेव्हा मी नसेन, हा मोठा दिलासा देणारा विचार आहे. महत्त्वाकांक्षा आणि मूखर्पणा याला विभागणारी रेषा काढणे कठीण असते. प्लंबरचा विचार कुठवर मोठा करायचा याला काही मर्यादा असावी, असे मला वाटते. नदी आणि प्लॅस्टिकची पाणी नेणारी नळी यात फरक असतो, असे माझे मत आहे. म्हणून त्याचा विचारही वेगळ्या तऱ्हेने करायला हवा. पण इथे मोठा पैसा आहे आणि राजकारण आहे. या चेतना देणाऱ्या बाबी आहेत- विशेषतः ‘लोक प्रतिनिधीं’ना. अर्थात हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जे करावे लागेल ते महत्त्वाकांक्षी आणि मोठेच असणार आहे. त्याची व्याप्ती व स्वरूप याचा विचार करताना पर्यावरण, जीवसृष्टी इत्यादी बाबी (राजकारण्यांना किरकोळ वाटत असल्या तरी) विचारात घ्यायला हव्यात, हे उघड आहे. कदाचित मी सुचवत असलेला विचारही कमी महत्त्वाकांक्षी नसेल, पण तो नक्कीच कमी विनाशक असावा असे वाटते आणि कमी खर्चिकदेखील. 

तो मांडण्यापूर्वी महाराष्ट्रातील नद्यांचे वेगळेपण मांडणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ‘वरून’ येते. म्हणजे उत्तरेकडून, दिल्लीकडून. दिल्ली दरवाजा प्रत्येक ठिकाणी असतोच. तिकडच्या नद्या वेगळ्या आहेत. त्यामुळे तिकडून येणारी माहिती आपल्याकडे लागू करताना बरेच काही विचारात घेतले पाहिजे, हे उघड आहे. नद्यांचे मुख्यतः दोन प्रकार असतात. इंग्रजी शब्द ‘इनफ्ल्युअंट’ आणि ‘एनफ्ल्युअंट’ असे आहेत. उत्तर भारतातील नद्या इनफ्ल्युअंट आहेत व महाराष्ट्रातील आणि दक्षिणेतील बव्हंशी एनफ्ल्युव्हंट आहेत. ही बाब फार महत्त्वाची आहे आणि त्याला आपल्याकडील खडक, बेसाल्ट कारणीभूत आहे. 

पाणी हे सर्वांनाच ओळखीचे असल्याने त्याबद्दल सर्व जण बोलतात, पण त्यांना नद्यांचे प्रकार वगैरे ठावूक नसतात. ते तसे अनपेक्षित नाही, पण माहिती नाही म्हणून कोणी बोलायचे राहात नाही. राजकारणी आणि शासक तर नाहीतच. (पुढील दोन चित्रे नद्यांचे उपरोक्त प्रकार दर्शवितात.) पहिल्या प्रकारच्या नद्यांना ‘आत वाहणाऱ्या’, तर दुसऱ्या प्रकाराला बाहेर स्रवणाऱ्या किंवा वाहणाऱ्या असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील नद्या दुसऱ्या प्रकारात मोडतात. म्हणजेच जमिनीतून पाणी या नद्यांच्या पात्रात जाते आणि तीच पुढे ‘नदी’ होते. 

पहिल्या प्रकारात जिथे नद्यांना हिमालयातून पाणीपुरवठा होतो त्या मोडतात. पंच + आप अर्थात पंजाबमधील नद्या गंगा, यमुना या तशा नद्या आहेत. यामुळे मुख्य फरक पडतो तो असा की, पहिल्या प्रकारात नदीचे पाणी भूजल पातळीच्या वर असते. (नदीचा पृष्ठभाग भूजल पातळीच्या खाली असतो तेव्हा) जमिनीतून चित्रात दाखविल्याप्रमाणे नदीपात्रात प्रवाहाने म्हणजे तिच्या वाहण्याने यांच्यात पाणी हिमालयातून येते व ते पात्रात वाहते आणि तेथील नदीने भूजल पातळी वाढू शकते. 

दुसऱ्या प्रकारात नदीचा पृष्ठभाग भूजल पातळीच्या खाली असतो. त्यात- म्हणजे महाराष्ट्रात- पाणी (असेल तेव्हा) जमिनीतून चित्रात दाखविल्याप्रमाणे नदीपात्रात उतरते. येथील भूजल पातळी नदी प्रवाहाने म्हणजे तिच्या वाहण्याने कमी-कमी होत असते. अर्थात याचा खरा अर्थ असा असतो की, पावसाळ्यानंतर जमिनीत इथे फारसे पाणीच नसते आणि म्हणून नदीतही पाणी नसते! गंगापूर धरण अस्तित्वात येण्याआधीची नाशिकची नदी कशी दिसे, ते आताचे लोक विसरले आहेत. नदीचे पात्र तेव्हा उडी मारून ओलांडता येई. आताच्या पात्रातील शंभर फूट रुंद पाणी आभासी आहे. त्यातील पाच टक्के वाहते पाणी असते, इतर फक्त तुंबा आहे. मात्र त्या न वाहणाऱ्या पाण्याने नदीचा काठ खूप बदलला आहे. आता अशा ठिकाणी, म्हणजे बाह्यस्रावी किंवा एनफ्ल्युअंट नदीवर जर धरण बांधले असेल तर काय होते, ते पाहू. 

उदाहरणार्थ- नाशिकचे गंगापूर धरण. यातून आवश्यकतेनुसार पाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. हे पाणी मुख्यतः नदीच्या तळच्या भागातून वाहते. हा भाग दगडी असतो व आहे. यातून पाणी जमिनीत शिरू शकत नाही. त्यामुळे हे पाणी वरचे वर राहते. शेतकरी, कारखाने इत्यादी ग्राहक ते पाणी पंप लावून उचलून घेतात. शेतात पाणी दिल्यावर ते त्या जमिनीच्या पृष्ठभागावर पसरते आणि हळूहळू आत जिरते. मधल्या काळात पाण्याचा पृष्ठभाग प्रचंड वाढतो. तसेच वनस्पती (पिके व इतर) ते पाणी शोषतात. प्रत्येक पान पाणी बाहेर टाकते. परिणामतः अत्यंत वेगाने बाष्पीभवन होऊन किती तरी पाणी हवेत निघून जाते. या नदीतून पाणी जमिनीत शिरून भूजल पातळी वाढण्याची काहीच शक्यता राहत नाही. वर दर्शविलेल्या दोन प्रकारच्या नद्यांनी पाण्याची विल्हेवाट लागते ती अशी. 

काही दशकांपूर्वी महाराष्ट्रामध्ये पाझर तलाव बांधले गेले. त्यांची दशा अशीच झाली. ते पाझरणे फारच कठीण होते, कारण त्यांच्या तळाशी खडक होता. ‘इंपर्व्हिअस’ अपारगम्य खडक. परिणामतः ते तलाव फक्त बाष्पीभवन तलाव ठरले. भूपृष्ठावर पाणी साठवण्याच्या महाराष्ट्रातील सोईच्या जागा आता फार कमी उरल्या आहेत. आता असे दिसते की, या लेखात वर्णन केलेली खडकरचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात भूपृष्ठाखाली पाणीसाठा कुठे आणि कसा करता येईल याचा अंदाज आता घेतला पाहिजे. ही बाब माझ्या लक्षात येऊन अनेक वर्षे झाली, पण त्यावर वैयक्तिकरीत्या काही कृती करणे कठीण होते. लोकसहभागाने, सरकार/ शासनाच्या इच्छाशक्तीने काही होऊ शकते. महाराष्ट्रातील- विशेषतः पश्चिम भागातील- डोंगरांचा उपयोग याकरता करून घेता येईल असे वाटते.
 
महाराष्ट्रातील खडक पाण्याला अपारगम्य आणि कठीण असला तरी त्यामध्ये असंख्य तडे व चिरा, भेगा इत्यादी आहेत. यामध्ये पाणीसाठा होऊ शकतो. कित्येक डोंगरांवरील भूस्तरामध्ये पाणीसाठा होऊ शकतो. यांना ॲक्विफर म्हणतात. त्या कारणानेच आपल्या किल्ल्यांवरील टाक्यांमध्ये पाणी आहे. हे पाणी मात्र फार नाही. गावाची पिण्याच्या पाण्याची सोय कदाचित येथे होऊ शकेल. तथापि, डोंगरांना असलेले तडे, भेगा आणि चिरा- ज्यांना इंग्रजीत आणि जिऑलॉजी शास्त्रात जॉइंट्‌स म्हणतात, त्यामध्ये खूप पाणीसाठा होऊ शकतो. कारण त्या खूप आहेत, पण आता त्या रिकाम्या फटी आहेत. याव्यतिरिक्त बेसाल्टमध्ये लाव्हाच्या थरांमध्ये पोकळी असते, तसेच त्यामध्ये लाव्हाच्याच उभ्या भिंती किंवा पडद्या असतात. यामुळेही बेसाल्टमध्ये पोकळ्या तयार होतात. या पडद्यांना डाईक असे म्हणतात. 

हा लेख वाचून कोणाला प्रश्न पडेल की- आपल्या बेसाल्टला जर छिद्रे नाहीत, तर महाराष्ट्रात बोअरवेलला पाणी लागते ते कसे काय? तर त्याचे उत्तर इथे आहे. ते असे की, वर जो चिरा आणि तडे तसेच जॉइंट्‌सचा उल्लेख आला आहे, तो काही डोंगरांपुरता मर्यादित नाही. आपल्याकडील जमिनीमध्येदेखील कुठे कुठे चिरा व भेगा आहेत, डाइक्स आहेत. यात तुमचे बोअर खणणारे पाते नशिबाने शिरले तर कुठे तरी पाणी लागते, एवढेच. यावरून ‘भूजल पातळी’ ठरू शकत नाही. कारण इथे पाणी सलग नसते. एक ‘वॉटर बॉडी’ अशी नसते. या चिरा, भेगा जेव्हा सपाटीवर असतात, तेव्हा त्या ‘उघड्या’ नसतात; बंद, चेंबलेल्या असतात. त्यांच्या सर्व बाजूंनी जमीन असते. डोंगरामधील चिरा व तडे फाकू शकतात आणि त्यांची धूपही होते. त्यामुळे त्यांचे आकार- विशेषतः रुंदी वाढत जाते. कित्येक गड-किल्ल्यांवर जाण्याचे मार्ग या अशा चिरा-तड्यांमधून आहेत. 

इथे अंजनेरी या गडाचे उदाहरण घेता येईल. या गडावर जाणारे मार्ग अशा खडकांना पडलेल्या चिरा, भेगांमधूनच तयार झाले आहेत. तसेच इथे डाइक्स म्हणजे लाव्हाच्या उभ्या भिंतीदेखील आहेत. त्या वेगाने झिजतात आणि मोठ्या रुंद फटी त्यामुळे तयार होतात. या गडाच्या वर मोठे पठार आहे आणि त्यात मोठे असे चर तयार झाले आहेत. हे चर खालीपर्यंत पोचतात. हेच ते वर उल्लेखलेले जॉइंट्‌स आणि डाइक्स. (याचे कल्पनाचित्र दिलेले आहे.) 

माझी कल्पना अशी आहे की, डोंगरमाथ्यावर जाऊन हे तडे (बुलडोझर किंवा जेसीबीच्या साह्याने) भरून टाकावेत. तसेच त्याच्या डोंगराच्या कड्याच्या ठिकाणी भिंती बांधून ती दगड-माती हलणार नाही अशी सोय करावी. पावसाचे पाणी या मातीच्या चरांमध्ये शिरेल. मात्र ते सध्या धो-धो वाहून जाते, तसे निघून जाणार नाही. ते इथल्या मातीतून सावकाश झिरपत राहील. यामुळे खालच्या गावांच्या पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची सोय होऊ शकेल. तसेच हे पाणी मुळात जमिनीपेक्षा जास्त उंचीवर असल्याने ते वीज किंवा तत्सम ऊर्जा न वापरता खाली येईल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

मुळात माझी कल्पना अशी होती की, गावाजवळील टेकडी, डोंगरांमध्ये योग्य जागा हेरून, खोलवर सुरूंग लावून, दगडामध्ये चिरा-भेगा निर्माण कराव्यात किंवा आहेत त्या रुंद कराव्यात आणि त्यात माती-मुरूम वगैरे भरून त्यामध्ये पाणी साठवण्याची सोय करावी. हे पाणी दीर्घ काळ झिरपत राहील आणि माणसांची, गुराढोरांची, प्राणिमात्रांची पाण्याची सोय होईल. जिऑलॉजी या शास्त्राला म्हणजेच जिऑलॉजिस्टांना आता जास्त कार्यशील होणे आवश्यक आहे. असे काही तरी केल्याशिवाय पाणीटंचाई दूर होणे कठीण आहे आणि नद्याजोड प्रकल्पासारखे भयावह आणि पर्यावरणसंहारक उपक्रम राबविण्याची वेळ येणार नाही. येथवर आल्यावर मुळातला विचार काय आहे, ते ध्यानात येईल. आपल्याकडील पाणीप्रश्न असा आहे की- पाणी उसळत घुसळत जे वाहून जाते, त्याची गती कमी करायला हवी आणि जमिनीत पाणी धरण्याचा गुणधर्म नाही, तो निर्माण कसा करता येईल याचा विचार केला जायला हवा. वर मांडलेला विचार त्यातला एक आहे. 

एकूण असे दिसते की, पावसाच्या पाच टक्के पाणी ‘ग्राऊंड वॉटर’ म्हणून जमिनीत शिरते. त्याचे प्रमाण वाढले पाहिजे, तरच आपली भूमी ‘सुजलाम्‌’ होईल. नाही तर पावसाचा परिणाम धबधबे तयार होऊन जमीन धुपून जाणे यापलीकडे होणार नाही. (अर्थात न केलेल्या एका उपक्रमाबद्दल किंवा प्रयोगाबद्दल मी बोलत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि, शक्य कोटीतील गोष्ट वाटल्याने मी ही कल्पना मांडीत आहे.) महाराष्ट्रातील जमीन थोड्या वेळाकरता सुजलाम्‌ झाली तरी सुफलाम्‌ होत नाही, यावर वर सुचविलेला इलाज योग्य वाटतो. इति.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके