डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुरुजी म्हणाले, ‘तुम्ही कुटुंबासह जलालपूरला चला, नाहीतर आम्ही मुलांना घेऊन जातो. जलालपूरजवळ मांडवा शिवारात बाबूरावांचा भाऊ राहत होता. त्याच्याकडे मुलं ठेवायची असं ठरलं. मुलांच्या पोटापाण्याची सोय काय? या तीन मुलांचा भार भावाला सोसणारा नव्हता. मुलं राहण्यापुरती, झोपण्यासाठी तिथं जातील. बाकी गुरुजी बघतील असं ठरलं. मुलं गुरुजींबरोबर आली. शाळेत रमली. मांडवा शिवारात चुलत्यांच्या घरात राहायचं. तिथून मुलं मांडवा जलालपूर फाट्यावर यायची. गुरुजी ऑटोतून जलालपूरहून यायचे. फाट्यावर मुलांना ऑटोमध्ये घ्यायचे. शाळा सुटल्यावर जाताना मुलांना फाट्यावर सोडायचे. हंसकुमार आडते, सुरेखा जाधव, मीरा मारवाडे, रवींद्र फाळके हे चार शिक्षक घरून शाळेत येताना जादा डबा आणायचे. आपल्या डब्यातले मुलांना खाऊ घालायचे. रात्रीच्या जेवणाचा डबा भरायचे. दप्तर, वह्या, पुस्तकं, साबण, सोडा इत्यादींचा खर्च करायचे. दिवाळीच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न पडला. गावकऱ्यांनी भार उचलला. धान्य दिलं. एक घास काऊचा, एक घास चिऊचा. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे शाळेतल्या मुलांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं असेल, नाही का?  

सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, परभणी, नंदुरबार या जिल्ह्यांतील शाळा गेल्या दीड वर्षांत बघितल्या. साधारणपणे कवायत, पाठांतराचे उपक्रम, कविता गायन, मानवी मनोरे, लेझीम पथक, झांजपथक, बोलके वर्ग, वृक्षारोपण, बाग बगीचा, हस्ताक्षर प्रकल्प, वाढदिवस साजरा करणे, गटपद्धतीचा वापर, स्वाध्याय कार्डस्‌चा वापर यांसारखे उपक्रम सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात. 

आणखी काही चांगल्या शाळा माझ्या बघण्यात आल्या. मिरज तालुक्यातील विकासनगरची शाळा. मनोज बनकर या शिक्षकानं सामान्यज्ञान वृद्धी, इंग्रजी शब्द समृद्धी, शुभेच्छा पत्रलेखन, कविता गायन, रोपवाटिका, पाखरांची शाळा हे उपक्रम राबविले आहेत. नंदुरबारमधील काळंबा शाळेतील वृक्षारोपण आणि स्वच्छता, परभणी जिल्ह्यातील माळीवाडा शाळेतील शुभेच्छापत्र, रात्रीची अभ्यासिका, वासंतिक शिबिर, कुंडी शाळेचा मुलाखतीचा उपक्रम- असे चांगले उपक्रम शाळांध्ये दिसले. परंतु उपक्रमांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे या शाळांच्यावर लिहिले नाही. काही शाळांमध्ये एखादा वेगळा उपक्रम दिसला; या शाळांतील शिक्षकांची धडपड, समाजभान दर्शविणाऱ्या घटना, कृती नोंदविणे आवश्यक वाटते म्हणून हा प्रपंच. 

झाडे आणि रद्दीला जिवंतपणा देणारी अवसरेनगर

पुणे जिल्ह्यात खेडशिवापूरच्या पश्चिमेस कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याला अवसरेनगरची शाळा आहे. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. झाडं तर जगली पाहिजेत. धुण्याभांड्याचं खरकटं पाणी आयाबाया साठवून ठेवतात. मुलं ते पाणी शाळेत घेऊन येतात. झाडाला घालतात. या मुलांना पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसाक्षरता वेगळी शिकवण्याची आवश्यकता नाही. झाडं जिवंत राहिली ही गोष्ट वेगळीच. इतक्या कष्टातून जगवलेल्या, वाढवलेल्या झाडांविषयी मुलांच्या मनात नक्कीच प्रेम निर्माण होईल. शिवरायांच्या आज्ञापत्राचा अर्थ समजावून सांगावा लागणार नाही. 

इथला हस्ताक्षर सुधारप्रकल्प तर जिल्ह्यानं स्वीकारलाय. सर्व मुलांची अक्षरं टपोरी आहेत. इथं अक्षर सुधारण्यासाठी दोनरेघी वह्यांऐवजी तीनरेघी वह्या वापरल्या जातात. अक्षराची उंची समान राखण्यासाठी या ओळींचा वापर केला जातो. वेलांटी आणि उकार शिकण्यासाठी, त्यांची उंची मर्यादित ठेवण्यासाठी या ओळींचा वेगळा वापर केलाय. उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, अक्षरांच्या वाट्या, रफाराच्या वाट्या, उकार, अर्धचंद्र या अवयवांचा प्रथम सराव केला जातो. नंतर पूर्ण अक्षर. शेवटी वेलांटी, उकार, मात्रा, रफार इत्यादींसह अक्षर. प्रत्येक मुलाजवळ शाईचा पेन आहे. सुरुवातीला कटनिबचा पेन वापरतात. त्यामुळे निब इकडे तिकडे वळत नाही. निबचा आकार अक्षराचे वळण ठरवतो. त्यानुसार बोटांची हालचाल होते. हाताला, बोटांना वळण लागते. आपोआपच अक्षरे वळणदार येतात. मुलांना मी श्रुतलेखनासाठी एक वाक्य दिलं. मुलं अत्यंत शांतपणानं लिखाण करत होती. घाई नाही, गडबड नाही, धांदरटपणा नाही. अक्षराच्या वळणाबरोबर मुलांनाही वळण लागत असेल काय? 

मग गुरुजींनीच एक अनुभव सांगितला. गणेशचं अक्षर सुधारत नव्हतं. तो राहायचाही अव्यवस्थित, अस्वच्छ. मग गुरुजींनी पहिल्यांदा त्याच्या राहण्या-वागण्यात सुधारणा घडवून आणली. त्यासाठी पालकांची मदत घेतली. आज गणेशचं अक्षर त्याच्याइतकंच सुंदर आहे. आपल्या मन:स्थितीप्रमाणे अक्षर बदलतं. गोंधळलेल्या अवस्थेत अक्षरही गिचमीड असणार, नाही का! 

आणखी एक गोष्ट. अवसरेनगरची विविध विषयांवर कात्रणपुस्तकं. मी संग्रहांऐवजी पुस्तक असं म्हटलं. याचं कारण या पुस्तकांची बांधणी वेगळ्या प्रकारची आहे. वहीऐवजी खोक्यांच्या पुठ्‌ठ्याला बॉक्सफाईलसारखा आकार दिला जातो. आत पुठ्‌ठ्याच्या मापाचे कागद चिकटवले जातात. हे वापरलेले कागद असतात. जुन्या लग्नपत्रिकांचा, सेलोटेपचा मजबुतीसाठी आणि सौंदर्य वाढविण्यास उपयोग केला जातो. विज्ञानविश्व, आकड्यांची किमया, एक तरी छंद जोपासावा, ऐका माझा विनोद, माझी फजिती असे चाळीस संग्रह रॅकमध्ये आहेत. या कोपऱ्याला वाचनकोपरा असं नाव दिलंय. इथं वाचनविषयक सुविचार पट्‌ट्या लावल्या आहेत. ‘वाचन हा स्वयंअध्ययनाचा आत्मा आहे, त्याला टाळून ज्ञानमार्गाची वाटचाल कशी होणार?’ ही पुस्तके शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून केली आहेत. या पुस्तकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहेच, शिवाय शब्दसंपत्ती वाढणार आहे. मनोरंजन होतंय, अध्ययन अध्यापनही आनंददायी होतंय.

या वाचनकोपऱ्यात आणखी एक गोष्ट आहे, घडीचित्र. रद्दीतील चित्रे. एका एका विषयावरील चित्रांची मालिका. स्कूल चले हम, झेंडा राहो नभी भिडणारा अशा वर्तानपत्रातील मालिकांच्या फोटोंचा अभ्यासासाठी आणि शिकण्यासाठी गुरुजींनी छान वापर केलाय. Look, Read, Learn हे घडीचित्र उत्तम नमुना आहे. वर्तमानपत्रातील उत्तम, आकर्षक चित्रांचा गुरुजींनी खुबीने वापर केलाय. चित्रं जिवंत होतात. चित्रांखाली गुरुजींनी समर्पक शब्द, वाक्ये लिहिली आहेत. I am playing football, Hands up, Crying, Sad. बघणाऱ्याच्या मनामध्ये आपोआप भाव उमटतात. चित्रं जिवंत होऊन बघणाऱ्याशी बोलू लागतात. चित्र म्हणजे बिनशब्दांची कविता असं का म्हणतात ते इथं समजतं. मनात मराठीमध्ये, मातृभाषेत विचार सुरू होतो. चित्राखालील शब्द, वाक्य आपला विचार इंग्रजीकडे वळवते. रद्दी, थोडासा डिंक आणि स्केचपेनचाच काय तो खर्च. 

कृष्णा कुदळे आणि जगदाळे या मावळ्यांनी कोंढाण्याच्या पायथ्याला झाडा-फुलांबरोबर मुलांची मनंही फुलवली आहेत. आसपासच्या शाळांमध्येही कृष्णा कुदळे मुलांचे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी धडपडतात. सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवलेली मुले गुरुजींना आपल्या सुंदर हस्ताक्षरात पत्र पाठवतात. कुदळे गुरुजींच्या मुलांनी जि.प.अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या देखण्या, टपोऱ्या, कोरीव अक्षरात पत्रं पाठविली आहेत. शाबासकीची थाप मिळविली आहे. 

कला, कार्यानुभवाने सजलेली मोरावळे 

जावळी तालुक्यातील ही हिरवी शाळा. बालसभा, नाट्यीकरण, भारतीयम्‌, साहित्य कवायत, वर्गाप्रमाणे. आणि बोलकी, हसरी, नाचरी मुले आणि प्रेमळ शिक्षक ही या शाळेची वैशिष्ट्ये. या शाळेत परिपाठाला पुस्तकाचं क्रमश: वाचन केलं जातं. आजपर्यंत एक होता कार्व्हर, श्यामची आई, शाहू महाराजांच्या कथा, महर्षी बाबा आमटे या पुस्तकांचं वाचन झालेय. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला 200 पुस्तके भेट मिळाली आहेत. 


या शाळेतल्या वर्गखोल्या शैक्षणिक साहित्यांनी भरल्या आहेत. विकत आणलेलं किंवा गोळा केलेलं साहित्य नव्हे. शिक्षक आणि अगदी पहिली दुसरीपासूनच्या विद्यार्थ्यांची नवनिर्मिती आहे ही. वर्गखोल्यातले कट्टे आणि कोपरे कला, कार्यानुभवाचे साहित्य आणि शैक्षणिक साधनांनी भरले आहेत. कागदी प्लेटांपासून शैक्षणिक चेंडू, आकाशकंदील केले आहेत. कोणत्या महिन्यात कोणते साहित्य करायचे याचे नियोजन आहे. जूनमध्ये हातरुमाल, जुलैमध्ये कागदी पिशव्या, सप्टेंबरमध्ये शिकेकाई शाम्पू, ऑक्टोबरमध्ये अक्षता, डिसेंबरमध्ये की चेन, जानेवारीमध्ये फ्लॉवर पॉट, ऑगस्टमध्ये राख्या, याशिवाय जुन्या साड्यांपासून पायपुसणी. कलाकुसर इतकी चांगली की पायपुसणीवर पाय ठेवावे की नको वाटावं, समारंभात खिशाला लावण्याचे बिल्ले, मुखवटे, आईस्क्रीम कांड्यापासून शोभेच्या वस्तू, काय काय केलंय मुलांनी! दैनंदिन वापरामध्ये लागणाऱ्या वस्तू बाजारातून विकत आणल्या जातात. त्या वस्तू आपण स्वत: करू शकतो. तेसुद्धा अगदी कमी किंमतीत. पुन्हा टाकाऊ वाटणाऱ्या, निरुपयोगी वाटणाऱ्या रद्दी कागद, जुन्या साड्या या वस्तू वापरून. स्वनिर्मितीचा आनंद वेगळाच. उद्याच्या जगातले छोटे कारागीर, कलाकार, उद्योजक या शाळेत घडत आहेत.

शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला जातो. त्याला मुलांनी केलेल्या राख्या वापरल्या जातात. वाढदिवसाला भेटकार्डं दिली जातात. शाळेस भेट देणाऱ्या पाहुण्यांना विद्यार्थ्यांनी केलेले बुके दिले जातात. 

मुलांना आणि गावाला जीव लावणारी जलालपूर

परभणी जिल्ह्यातील जलालपूरची शाळा. डिसेंबर 2011 मध्ये या शाळेला भेट दिली. इयत्ता पहिली ते सातवीची शाळा. पटसंख्या 132, शिक्षक चार. लेखन, वाचन, विषय तयारी या बाबी उत्तम. याचं कारण इथं मुलं गटात शिकवतात. शाळेतून घरी गेल्यानंतर अभ्यास करण्यासाठी वेगळे गट आहेत. हे गट ठरलेल्या घरात अभ्यासाला बसतात. त्यावर पालक लक्ष ठेवतात. 

गुरुजी वेगळ्या कामात असताना गटप्रमुख अभ्यास घेतो. लेखन, वाचन, गणितक्रिया इत्यादी. गुरुजी शाळेत नसताना मॉनिटर गुरुजी होतो. गुरुजी शिकवतात तसा शिकवलेला भाग परत शिकवतो. निवडणुकीचा आदला दिवस. गटशिक्षण अधिकारी झोनल ऑफिसर होते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी शाळेला सुट्टी असते. साहेब निवडणुकीच्या कामासाठी शाळेत गेले तर शाळा सुरू. गुरुजी शाळेत सापडेनात. मग लक्षात आलं, इथं शाळा चालवायला छोटे गुरुजी समर्थ आहेत. 

शाब्दिक खेळ, इंग्रजी-गणित पेटीतले खेळ, कविता गायन यांत मुलं खूपच उत्साही दिसली. बेंदराला केलेले बैल लॉफ्टवरून मुलांच्याकडे बघत होते. कदाचित बैलांनाही वाटत असणार की, आपणही मूल होऊन नाचावं. 

शिवाय मानवी मनोरे पथक, योगासन पथक, लेझीम पथक, सूर्यनमस्कार पथक, रोपवाटिका आणि महत्त्वाचे म्हणजे इथले बँडपथक. शेरेवाडीच्या बंटीसारखा या शाळेतला पांडू बँड साहित्य वाजवण्यात रमतो. ही दिसायला छोटी गोष्ट वाटत असली तरी ती तेवढी साधी नाही. मूल अपंग असणं म्हणजे काय? ते मतिमंद असलं तर काय वाटतं? आई-वडिलांना काय यातना भोगाव्या लागतात? याचा बारकाईनं विचार केला की, ही छोटी वाटणारी गोष्ट किती मोठी आहे हे समजतं. काही वेळा असं मूल आई-वडिलांनाही नकोसं झालेलं असतं. अशा मुलाच्या आयुष्यात आनंद भरतात गुरुजी. बेरंग झालेलं आयुष्य रंगीबेरंगी करतात. निसर्गानं हिरावलेलं बालपण त्याला परत देतात. अशी अपंग मुलं शाळेत आली नाहीत तर स्वत:ला माणसं समजणाऱ्या गावातल्या जनावरांची शिकार होतात. त्यांची टोकाची चेष्टा केली जाते. त्यांना वेडं ठरवलं जातं. त्यांना माणसात आणण्याचं काम गुरुजी आणि शाळेतील छोटी मुलं करतात. ही मुलं कृतीतून संवेदना, सहवेदना, सहकार्य, प्रेम, माया शिकतात. जलालपुरातील लेझीम पथकातील मुलं नाचतात त्या वेळी पांडूचा स्वतंत्र नाच सुरू असतो. तो मतिमंद आहे, पण त्याच्या मानसिक क्षमतांचा गुरुजी 100 टक्के वापर करत आहेत. पांडूही उत्तम प्रतिसाद देतो. त्याला 100 पैकी 100 गुण का देऊ नयेत?

इथलं बँडपथक आणखी वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. गणेशउत्सव, नवरात्र, गावाचा सप्ताह, जनजागृती फेऱ्या यांमध्ये शाळेचा बँड वाजतो, यात काही नवल नाही. परंतु एखाद्या गरिबाच्या घरी लग्नकार्य असतं. बँडपथकाला पैसे देऊन लग्नात बेंडबाजा वाजविण्याची ताकद नसते. अशा वेळी शाळेचं पथक तिथे हजर असतं. ढोल, साईड ड्रम, तडम ताशा, बासरी, मोरॅकस, हलगी, घेऊन मुलं हजर होतात. अर्धा पाऊण तास आपली कला सादर करतात. लग्न साजरं होतं. मिळेल ते बक्षीस स्वीकारून मुलं परत शाळेत रमतात. 

शाळेत बचत बँक आहे. तिथे मुलं पैसे साठवतात. शाळेत साहित्य भांडार आहे. इतर ठिकाणांपेक्षा इथं शालेय साहित्य स्वस्त मिळतं. ना नफा ना तोटा, या तत्त्वावर साहित्य भांडार चालतं. स्वत:च्या हाताने साहित्य घ्यायचं आणि पैसे डब्यात टाकायचे. प्रामाणिकपणा शिकविण्यासाठी वेगळा पाठ घेण्याची गरज नाही. एखाद्याकडे पैसे नसतील तर बचत बँक मदतीला आहेच. 

मला या शाळेची वेगळीच गोष्ट सांगायची आहे. दारूचा धंदा बंद केल्याची गुरुजींची करामत. गावात तंटामुक्ती समिती गठित करायची होती. बैठक सुरू झाली. गावातल्या काही महिला तिथे आल्या. त्या म्हणाल्या- ‘गावातला दारूचा धंदा बंद करा, त्याशिवाय तंटा बंद होणार नाही.’ खरं होतं महिलाचं. शेतातून पुरुष घरी आले की त्यांचे पाय वासाचा शोध घेत जायचे. जेवायला ताटावर बसलं की, हात धुवून आलोच असं म्हणून उठलेला पुरुष घोटभर घ्यायला जायचा. हे गुरुजींना पटलं. गुरुजी पुढे झाले. निर्णय झाला. दारूचा धंदा बंद. पण दारू विकणारे गृहस्थ गरीब. थोडंसं अंधत्व. बाहेरून आणून दारू विकायचे. त्यांच्या पोटावर पाय आला, पण गावापुढे इलाज चालेना. तो गुरुजींच्याकडे आला. म्हणाला, ‘माझ्या मुलाचा दाखला द्या. पोरांना कसं शिकवू? माझं पोट कसं भरू? हंसकुमार आडते. मुलांचे पालक गुरुजी. म्हणाले, ‘किती दिवस झाले धंदा करताय? या अगोदर कसं जगत होता? काय फरक पडला जगण्यात? मुलांच्या शिकण्याची काळजी करू नका. आजपासून तुमचा मुलगा आमचा झालाय. आज मुलगा तुमच्या घरी येणार नाही.’ अर्थातच मुलाच्या आईची संमती गुरुजींनी घेतली होती. गुरुजी मुलाला आपल्या घरी परभणीला घेऊन गेले. तो सोमवारचा दिवस. त्या दिवशी मुलाच्या वडिलांचा उपवास होता. रात्री त्यांनी उपवास सोडला नाही. उपाशी झोपले. दुसऱ्या दिवशी शाळेत आले. मुलगा परत द्या म्हणाले. या गुरुजींशी वाद घातलेल्या पालकांनी पाच सप्टेंबरला स्वत: शिक्षकांचा सत्कार केला. आज संतोष इटोलीच्या आश्रमशाळेत शिकतोय. त्याच पालकांची मुलगी मतिमंद. तिलाही गुरुजींनी मतिमंदांच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. 

मी गुरुजींना म्हटलं, ‘हे सगळं करताना तुम्हाला आपल्या अंगावर काहीतरी बालंट येईल. दारुडे त्रास देतील असं वाटलं नाही का? भीती वाटली नाही का?’

गुरुजी म्हणाले, ‘गावकऱ्यांशी आमची इतकी जवळीक आहे, की एखाद्याशी वाद झाला तरी गावकरी आमचीच बाजू घेतात. आम्ही त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. गावात कोणी आजारी पडलं तर आम्ही सर्वजण त्यांना भेटायला जातो. या गावाच्या रोहिदास टेकाळेंना परभणीला अँडमिट केलं. त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलवावं लागलं. नंतर नांदेडच्या दवाखान्यात नेलं. आडते गुरुजी प्रत्येक ठिकाणी गेले. धडपड केली. मदत केली. गावात ग्रामस्वच्छता अभियान सुरू झालं. गुरुजींनी सांगताच रोहिदास टेकाळ्यांनी प्रथम संडास बांधला.

गावाच्या प्रसंगात गावकरी गुरुजींना बोलावतात. गुरुजी तुम्ही  यात लक्ष घाला म्हणतात. आजच्या काळात अविश्वसनीय, काल्पनिक वाटावं असं हे सारं आहे. सर्व शिक्षकांची एकजूट आणि तळमळ यामुळे हे शक्य झालंय. 

दुसरं उदाहरण- बाबूराव गायकवाड. भिल्ल माणूस. मुक्त, भटका. आज इथं उद्या तिथं. पोट नेईल तिकडे पाय जातात. कुटुंब जलालपुरात नदीकाठाला उतरलं. मिळेल ते काम आणि शिकार यांवर गुजराण. भरत, शत्रुघ्न आणि गीता ही त्यांची तीन मुलं गुरुजींनी शाळेत आणली. रानावनात भटकणारी, उघडीवाघडी फिरणारी मुलं स्वच्छ राहू लागली. शाळेचा गणवेश घालू लागली. छान छान दिसू लागली. कविता गाऊ लागली. मुलं तिसरीत गेली आणि कुटुंबाचं अचानक स्थलांतर झालं. गुरुजी शोधाशोध करू लागले. माहिती मिळेल त्या गावाला जाऊ लागले. एकदाचा ठावठिकाणा लागला. जलालपूरपासून तीस किलोमीटरवर कौसडी गाव. गावापासून तीन किलोमीटर बाबूराव गायकवाडांचे झोपडे. मुलांचा अवतार बदललेला, कपडे मळकटलेले, फाटलेले, केस वाढलेले. 

गुरुजी म्हणाले, ‘तुम्ही कुटुंबासह जलालपूरला चला, नाहीतर आम्ही मुलांना घेऊन जातो. जलालपूरजवळ मांडवा शिवारात बाबूरावांचा भाऊ राहत होता. त्याच्याकडे मुलं ठेवायची असं ठरलं. मुलांच्या पोटापाण्याची सोय काय? या तीन मुलांचा भार भावाला सोसणारा नव्हता. मुलं राहण्यापुरती, झोपण्यासाठी तिथं जातील. बाकी गुरुजी बघतील असं ठरलं. मुलं गुरुजींबरोबर आली. शाळेत रमली. मांडवा शिवारात चुलत्यांच्या घरात राहायचं. तिथून मुलं मांडवा जलालपूर फाट्यावर यायची. गुरुजी ऑटोतून जलालपूरहून यायचे. फाट्यावर मुलांना ऑटोमध्ये घ्यायचे. शाळा सुटल्यावर जाताना मुलांना फाट्यावर सोडायचे. हंसकुमार आडते, सुरेखा जाधव, मीरा मारवाडे, रवींद्र फाळके हे चार शिक्षक घरून शाळेत येताना जादा डबा आणायचे. आपल्या डब्यातले मुलांना खाऊ घालायचे. रात्रीच्या जेवणाचा डबा भरायचे. दप्तर, वह्या, पुस्तकं, साबण, सोडा इत्यादींचा खर्च करायचे. दिवाळीच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न पडला. गावकऱ्यांनी भार उचलला. धान्य दिलं. एक घास काऊचा, एक घास चिऊचा. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे शाळेतल्या मुलांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं असेल, नाही का? 

मुलांचा वनवास संपला नाही. बाबूरावाचं पुन्हा त्याच्या मूळ गावी स्थलांतर झालं. बाबूराव भरकटत आपल्या गावी 150 कि.मी.वर जालना जिल्ह्यात गेले. कधी ऊसतोड तर कधी मजुरी. मुलांचीही भटकंती झाली. आज परत ते जलालपूरमध्ये आलेत. मुलांचं शिक्षण सुरू आहे. 

जे शाळेत येऊ शकतात त्यांना शिकवणं सोपं, पण जे येऊ शकत नाहीत त्यांना शाळेत आणणं, आलेल्यांना शिकवणं आणि शिकणाऱ्याला शाळेत टिकवणं महत्त्वाचं. त्यासाठी जीव लावावा लागतो. 

सांगली जिल्ह्यातील (तालुका मिरज) गुंडेवाडी, आरग, मालगाव, एरंडोली, डोंगरवाडीसारख्या शाळांमध्ये शिक्षक, पारधी मुलांना असाच लळा लावत आहेत. समाजाने यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारलाय, सरकारने यांना राहण्यासाठी गावं नेमून दिली, पण गावानं यांना स्वीकारायला हवं ना! जे हाल धरणग्रस्तांचे त्यापेक्षा जास्त पारध्यांचे. यांना पाणी मिळायचं बंद केलं की आपोआपच गाव सोडतात. घोटभर पाण्यासाठी झगडा. मग डोंगरात, कड्याकपारीत चुळकाभर पाणी शोधण्यासाठी वणवण भटकणं. पुन्हा गाव सोडणं. डोकं टेकायला हक्काची जागा हवी. राहण्यासाठी घर हवं. रेशनकार्ड हवं, मतदारयादीत नाव हवं. भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा हवा. यासाठी धरणं, आंदोलनं सुरू असतात. आणि शाळेत त्यांची मुलं मोडक्यातोडक्या मराठीत प्रतिज्ञा म्हणतात. शाळेनं मुलांना घट्ट पकडलंय. डोंगरवाडीच्या मुलांना शाळेला रोज येणं होत नाही. तरीही चार-पाच किलोमीटर वाट तुडवत शाळा गाठतात कधीमधी. 

एकेकाळी मद्यपी गुरुजींना वैतागून गावानं डोंगरवाडी शाळेला कुलुपं घातली होती. तीच शाळा आज डिजिटल झालीय, हिरवीगार झालीय. गावाला शाळेचा लळा लागलाय. शाळेच्या नावाने गावाची ओळख होतेय. आज जिल्हा परिषदेच्या शाळांध्ये अनाथ मुलं, महिला सेक्स वर्कर्सची मुलं, एडस्‌ग्रस्त पालकांची तसेच एच.आय.व्ही. बाधित मुलंही शिकत आहेत. 

शेरेवाडीचे बंटीचे गुरुजी आता वीटभट्टीवरच्या मुलांना आपल्या गाडीवरून रोज शाळेत आणतात. बंटी आता गावातल्या भजनीमंडळात तबल्याचा ठेका धरतोय. मोरावळेच्या शाळेतला मूकबधिर असणारा सुनिल ढोकळे सातवीतून आठवीत गेलाय. तो हायस्कूलमध्ये शिकतोय. सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतोय. शाबासकी मिळवतोय. धावण्याच्या शर्यतीत विजेता होतोय. तुंगच्या शाळेतील रजनी आपल्या गोड गळ्याने मंत्रमुग्ध करतेय. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे व्यंग विसरून आनंदाचे क्षण मुठीत पकडायला शिकताहेत ही बाळं. 

असा शाळेचा लळा मुलांइतकाच गावालाही लागायला हवा. असं झालं तर मुलेच काय, पण गावकरीही आचार्य अत्रे यांची कविता आनंदाने गातील.

ही आवडते मज मनापासूनी शाळा 
लावीते लळा जसा माऊली बाळा. 

(या लेखाबरोबरच ‘शाळा भेट’ ही लेखमाला समाप्त झाली आहे.) 

Tags: ध्येयवादी शिक्षक उत्तम शिक्षक प्रयोगशील शाळा प्रयोगशील शिक्षक विविध शाळा लेखमाला शाळा भेट नामदेव माळी Teachers Experiments experimental school dedicated Teachers Primary school Rural Area Remote Area Different school Series of Article Shala Bhet Namdeo Mali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


Comments

  1. Shankar Dattatray bhanage- 12 Nov 2020

    खूप छान सर.आज अशा शाळांची अधिक गरज आहे.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके