डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिका उग्रवादींचे अत्याचार सहन करणार नाही. पण त्याबरोबरच स्वतःच्या तत्त्वांमध्ये फेरफार करणार नाही. 11सप्टेंबरच्या घटनेचा आमच्या देशावर जबरदस्त आघात झाला होता. त्यातून उफाळून आलेलं भय, तसाच संताप समजण्यासारखा होता. पण त्यामुळे कुठेतरी आमच्या तत्त्वांना सोडून वागण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण होत होती. पण आता हा मार्ग बदलण्यासाठी आम्ही ठोस उपाय करीत आहोत.

अल अझहर हे स्थान गेली 1000 वर्षे इस्लामचे ज्ञानकेंद्र आहे आणि कैरो विश्वविद्यालय गेली 100 वर्षे इजिप्त देशाच्या प्रगतीचे उगमस्थान बनून राहिलेले आहे. अशा तऱ्हेने आज रूढी-परंपरा व प्रगती या दोन्ही प्रवाहांचा या ठिकाणी सुंदर मिलाफ झालेला आहे. अस्सलाम आलेकुम.

अमेरिका आणि जगातील मुस्लिम समुदाय यांच्यामध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे, अशावेळी आपण भेटत आहोत. ह्या तणावाची पाळेमुळे सध्या चालू असलेल्या धोरणांच्या व वादाच्या मुद्यांच्या पलीकडे ऐतिहासिक काळामध्ये रुतलेली आहेत. शेकडो वर्षे आपण एकमेकांच्या सहवासामध्ये सहकाराने आणि गुण्यागोविंदाने राहिलेलो आहोत तसेच आपल्यामध्ये अनेक तंटे आणि धर्मयुद्धेही झालेली आहेत. अलीकडच्या काळात वसाहतवादामुळे तणाव निर्माण झाला आहे. मुस्लिमांना त्यांचे अधिकार व संधी नाकारल्या गेल्या. तसेच शीतयुद्धामुळे अनेक मुस्लिम बहुसंख्य देशांचा त्यांच्या आशा आकांक्षांना पायदळी तुडवून प्याद्यांसारखा वापर केला गेला. त्यात भर पडली आधुनिकीकरण व जागतिकीकरणाची. त्यामुळे बरेच मुस्लिम पश्चिमी देशांकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहतात.

हिंसक उग्रवादींनी या तणावाचा फायदा घेतला. हे लोक अगदी थोडे आहेत पण फार प्रभावी आहेत. त्यांनी 11 सप्टेंबरचा हल्ला केला आणि तसेच हे करण्याचे (मानवी सभ्यतेच्या विरुद्ध कारवाया करण्याचे) त्यांचे प्रयत्न अजून चालूच आहेत. त्यामुळे माझ्या देशामध्ये इस्लाम केवळ अमेरिकेच्या व पश्चिमी देशांच्याच नव्हे तर मानवी अधिकारांच्याच विरुद्ध आहे (अगदी अटळपणे) असा समज पसरला आहे; इथे लोकांना मुस्लिमांबद्दल संशय आणि दहशत वाटते.

अशा स्थितीत आपले आपसातील संबंध जोपर्यंत केवळ आपल्या मधल्या भेदाने, वेगळेपणाने ओळखले जातात तोपर्यंत आपण द्वेषाचीच बीजे पेरत राहू; शांतीची नव्हे. एकमेकांशी सहकाराने वागून न्याय व समृद्धीऐवजी झगडेच वाढवीत राहू. संशय आणि संघर्षाचे हे चक्र थांबवायला हवे.

मी इथे आलो आहे एका नव्या जगाची सुरुवात करण्याच्या शोधात- असे जग जे अमेरिका व मुस्लिम देश व जगातील सर्व मुस्लिम जनतेच्या परस्पर हितसंबंधांवर, एकमेकांविषयाच्या आदरावर आणि सत्यावर आधारित असेल; अमेरिका आणि इस्लाम एकमेकांपासून अलिप्त नाहीत तसेच एकमेकांचे स्पर्धकही नाहीत; उलटपक्षी ते बरेच एकमेकांत समाविष्ट आहेत आणि दोहोंचीही न्याय व प्रगती, सहिष्णुता व सर्व मानवांची प्रतिष्ठा यावर निष्ठा आहे, हे ते सत्य.

एका रात्रीत बदल होणे अशक्य आहे हे मी जाणतो. वर्षानुवर्षांचे दुराग्रह एका भाषणाने नाहीसे होणार नाहीत, तसेच मला मिळणाऱ्या काळाच्या मर्यादेमध्ये आपल्या समोरच्या क्लिष्ट समस्यांचे निराकरणही मी करू शकत नाही. पण मला खात्री आहे की इथून पुढे प्रगती होऊ शकेल. आपल्या मनात असलेल्या सर्व गोष्टी आपण खुलेपणाने सांगाव्यात. या गोष्टी बऱ्याच वेळा बंद दरवाजाच्या आडच बोलल्या जातात. पण आपण एकमेकांचे ऐकून घेण्याचे प्रयत्न चिकाटीने करू. एकमेकांपासून शिकण्याचे, परस्परांचा आदर करण्याचे आणि आपणामधील समान मुद्दे शोधण्याचे प्रयत्न करूया. पवित्र कुराण म्हणते, ‘देवाला स्मरा आणि नेहमी खरे बोला.’ आज मी तेच करण्याचा- शक्य तेवढं खरं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे; समोर असलेल्या प्रचंड आव्हानांपुढे नम्रतेने परंतु निष्ठेने- मानव म्हणून असलेले आपले हितसंबंध आपल्यामध्ये दुही पाडणाऱ्या ताकदींपेक्षा जास्त सशक्त आहेत या खंबीर निष्ठेने. या निष्ठेचे मूळ काही प्रमाणात माझ्या अनुभवात सापडते. मी स्वत: ख्रिश्चन आहे. माझे वडील अनेक पिढ्या मुस्लिम असलेल्या कुळातले. पोरवयात मी इंडोनेशियामध्ये होतो. तिथे सकाळ संध्याकाळ आजान ऐकायचो. तरुणपणी मुस्लिम धर्मामध्ये प्रतिष्ठा व शांती शोधणाऱ्या शिकागो शहरात मी कामाला लागलो.

इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे अल अझहरसारख्या विश्वविद्यालयाने व इस्लामने मानवी सभ्यतेला दिलेले योगदान मी जाणतो. अनेक शतके इस्लामने ज्ञानाचा उजेड पसरविला आहे. त्यातूनच युरोपमधील पुनरुज्जीवनाला व प्रबोधनाला चालना मिळाली. इस्लामी समाजात नवनवीन उपक्रम निर्माण होत असत. बीजगणित, चुंबकीय कंपास, नौकानयनाची अनेक साधनेही इस्लामचीच देणगी आहे.

सभ्यतेचे ज्ञान इस्लाममुळे वाढले. लेखण्या व छपाई; रोग कसे पसरतात आणि कसे बरे करता येतात याचे ज्ञान, हीही इस्लामचीच देणगी. इस्लाम संस्कृतीचे केंद्र बनले होते. भव्य कमानी, आकाशाला भिडणारे मनोरे, चिरकाल टिकणारे काव्य, मधुर संगीत, सुडौल लेखनशैली आणि शांतपणे चिंतन करण्याची स्थळे हे मोठेच योगदान आहे. संपूर्ण इतिहासात इस्लामने शब्दातून व कृतीतून धर्मसहिष्णुता आणि वांशिक समता शक्य आहे हेच दाखवून दिले आहे.

इस्लाम हा अमेरिकेच्या कथानकाचाही भाग आहे. माझ्या देशाला सर्वप्रथम मान्यता दिली ती मोरोक्कोने. त्रिपोली येथील समझोत्यावर स्वाक्षरी करताना 1796 साली अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन ॲडॅम्स लिहितात, ‘अमेरिकेमध्ये मुस्लिमांच्या कायदा, धर्म किंवा स्थिरचित्त वृत्तीविरुद्ध काहीही आकसाची भावना नाही.’ अमेरिकेच्या जन्मापासून तिचा पाया घालताना मुस्लिमांनी अमेरिकेचे वैभव वाढविले आहे. ते आमच्या बरोबर युद्धामध्ये लढले आहेत, शासनात भाग घेतला आहे, नागरी हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी इथे व्यापार धंदे सुरू केले, विश्वविद्यालयांमध्ये शिकविले, खेळांमध्ये भव्य कामगिरी केली, नोबेल पारितोषिके मिळविली, उंच उंच इमारती बांधल्., ऑलिंपिकची ज्योत पेटविली; आणि जेव्हा पहिला मुस्लिम अमेरिकन अलीकडेच काँग्रेसमध्ये निवडून आला तेव्हा त्याने आमचे राष्ट्रपिता असलेले थॉमस जेफरसन यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहातील पवित्र कुराणावर हात ठेवून शपथ घेतली.

तेव्हा, मी असा तीन खंडांमधून इस्लाम जाणतो. जिथे इस्लामचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला त्या ह्या देशात येण्यापूर्वी मिळालेल्या अनुभवातून माझी खात्री झाली आहे की अमेरिका व इस्लाम यांची भागीदारी ‘इस्लाम काय आहे’ यावर अवलंबून आहे; ‘काम नाही’ यावर नाही. अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी हीच असेल; जिथे जिथे इस्लामबाबत नकारात्मक पूर्वग्रह दिसून येतील तिथे तिथे त्यांचा प्रतिकार करायचा.

परंतु हेच तत्त्व मुस्लिमांच्या अमेरिकेबाबतच्या पूर्वग्रहांना, परिप्रेक्षालाही लागू पडते. अमेरिका केवळ स्वार्थी साम्राज्म नाही. उलट जगाला आज दिसणाऱ्या प्रगतीचा मोठा स्रोत अमेरिका आहे. एका साम्राज्याविरुद्ध केलेल्या क्रांतीतून तिचा जन्म झाला आहे. आमची ध्येये आहेत- सर्व मानव समान आहेत; आम्ही रक्त सांडलं आणि निकरानं लढलो ते या शब्दांना अर्थ देण्यासाठी; केवळ आमच्या देशातीलच नव्हे तर सर्व जगातील मानवांसाठी. पृथ्वीच्या सर्व कानाकोपऱ्यातील प्रत्येक संस्कृतीचे आमच्या जडणघडणीत योगदान आहे. अनेकत्वात एकत्व ही आमची सरळ सोपी धारणा आहे.

बराक ओबामा या नावाचा एक आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतो याचं अप्रूप सगळ्यांनाच वाटलं. परंतु माझी आत्मकथा एवढी अनुपम नाही. अमेरिकेतील प्रत्येकाचं योग्य संधी मिळण्याचं स्वप्न अजून साकारलेलं नाही.पण ते साकारण्याची वेळ जवळ आली आहे याची खात्री वाटू लागली आहे. त्यामध्ये सात दशलक्ष मुस्लिम सर्वसामान्म अमेरिकनांपेक्षा जास्त कमावतात व जास्त उच्च शिक्षण घेऊ शकतात या वस्तुस्थितीचाही समावेश आहे.

शिवाय अमेरिकेत सर्वांना सारखेच स्वातंत्र्य आहे. आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक प्रांतात मशिदी आहेत. एकूण 12000 मशिदी. अमेरिकन शासनाने स्त्रियांच्या हिजाब वापरण्याच्या हक्कासाठी व जे त्यावर बंदी आणतील त्यांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

तेव्हा आता इस्लाम अमेरिकेचा भाग आहे याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. आणि माझी खात्री आहे की वंश, धर्म किंवा जीवनातील स्थान काहीही असो, आम्हा सर्वांना सारखीच आकांक्षा आहे: शांतता आणि सुरक्षिततेत जीवन व्यतीत करण्याची; आत्मप्रतिष्ठा राखून काम करता यावे म्हणून आवश्यक असलेल्या शिक्षणाची; आणि आमच्या कुटुंबावर, आमच्या समाजावर आणि आमच्या ईश्वरावर प्रेम करण्याच्या संधीची. या गोष्टी आम्ही इतरांशी वाटतो. अखिल मानवजातीची हीच आशा आहे.

अर्थात, ही समान मानवतेची जाणीव ही केवळ आमच्या समोरील कार्याची सुरुवात आहे. नुसते शब्द काही आमच्या लोकांच्या गरजा भागवू शकणार नाहीत; त्या भागवायला आम्हाला धडाडीने कामाला लागायला हवं. आणि हेही समजायला हवं की आपल्या समोर असलेल्या आव्हानांना आम्ही सहकार्याने सामोरं जायला हवं; ते करण्यात अपयश आलं तर ते सर्वांनाच भोगावं लागेल. अलीकडेच आपल्याला अनुभव आलेला आहे, जेव्हा एखाद्या देशातील अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा त्याचा फटका सगळीकडे बसतो. जेव्हा एखादा नवीन फ्लूचा विषाणू एका व्यक्तीला ग्रासतो तेव्हा सर्वच माणसांना धोका उत्पन्न होतो. जेव्हा एखादं राष्ट्र अण्वस्त्र निर्माण करण्याच्या मागे लागतं तेव्हा अण्वस्त्र हल्ल्याचा धोका सर्वच राष्ट्रांना वाटू लागतो. जेव्हा एखाद्या पर्वतराशीमध्ये हिंसक उग्रवादी आपल्या कारवाया सुरू करतात तेव्हा सागराच्या पलीकडच्या लोकांच्याही जिवाला धोका असतो. बोस्निया आणि डार्फूरमध्ये झालेला नरसंहार हा अखिल मानवजातीच्या सद्सद्विवेकबुद्धीला लांछन आहे. 21व्या शतकातील या जगामध्ये साऱ्यांचा सहभाग आहे हाच ह्या सर्व घटनांचा अर्थ आहे. मानव म्हणून हीच आपली एकमेकांबद्दलची जबाबदारी आहे.

ही जबाबदारी पेलवणं कठीण गोष्ट आहे. कारण मानवी इतिहास देशादेशांमधील आणि जमातीजमातींमधील दुसऱ्या जमातीला वा देशाला नमविण्यासाठी आणि आपल्या स्वार्थासाठी लढलेल्या लढायांनी भरलेला आहे. आणि तरीही आता नवं युग अवतरलं आहे. ही लढाऊ वृत्ती स्वतःतचाच पराभव करणारी आहे. आपल्या परस्परांवर अवलंबून असण्यामुळे एका राष्ट्राला अगर समूहाला वर्चस्व देणारी कोणतीही जागतिक व्यवस्था मोडीतच निघणार. तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल कितीही प्रेम असलं तरी आपण त्या भूतकाळाचे बंदिवान होता कामा नये. आपल्या समस्या एकमेकांच्या सहभागाने, भागीदारीने सोडवायला हव्यात; होणाऱ्या प्रगतीतही भागीदारी असायला हवी.

पण म्हणून आपल्याला सध्या अस्तित्वात असलेल्या तणावांकडे दुर्लक्ष मुळीच करता येणार नाही. उलट जास्तच लक्ष द्यायला हवं त्या तणावांकडे, त्यांना सरळ सरळ सामोरं जायला हवं. ज्यांना सामूहिकपणे सामोरं जायलाच हवं अशा काही विशिष्ट विषयांबाबत मी शक्य तेवढं सरळ आणि स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो.

कोणत्याही स्वरूपातला हिंसक उग्रवाद हा आजचा मोठा तणाव आहे. मी अंकारा येथे माझ्या भाषणात स्पष्ट सांगितलं की अमेरिका इस्लामच्या विरुद्ध कधीच लढत नाही व भविष्यात लढणारही नाही. पण आमच्या सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या हिंसक उग्रवादाचा मात्र आम्ही निकराने मुकाबला करू. ह्यामध्ये वेगळे काय आहे? कोणत्याही श्रद्धेचे लोक जे नाकारतात तेच आम्हीही नाकारत आहोत. ते म्हणजे निरपराध स्त्रिया, पुरुष आणि बालकांचा बळी घेणं. आणि राष्ट्राध्यक्ष या नात्याने सर्व लोकांचे संरक्षण करणे हे माझे पहिले कर्तव्य ठरते.

अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती ही इतरांच्या सहकार्याने काम करण्याच्या आमच्या गरजेची द्योतक आहे. सात वर्षांपूर्वी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवून अल् कायदा आणि तालिबान यांचा पाठलाग सुरू केला. गरज म्हणून आम्हाला हे करावंच लागलं. दुसरा पर्यायच नव्हता. काही जण11 सप्टेंबरच्या हल्ल्याबाबत प्रश्न उभा करतात तर काही त्या हल्ल्याचं समर्थनही करतात हे मी जाणतो. पण हे स्पष्ट करायला हवं की अल् कायदा या संघटनेने 3000 माणसं त्या एका दिवशी मारली. बळी गेलेले सर्वजण अमेरिकेचे व इतर देशांचे निरपराध पुरुष, स्त्रिया व बालके होती. त्यांनी कोणाचेही काहीही वाकडे केलेले नव्हते. आणि तरीही अल् कायदाने निर्घृणपणे त्यांची कत्तल केली, आणि त्या हल्ल्याचे श्रेय घेतले; एवढेच नव्हे तर अजूनही असाच नरसंहार करण्याचा निर्धार ते जाहीर करीत आहेत. अनेक देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत आणि ते आपले हात आणखी दूरवर पसरण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्व गोष्टी म्हणजे आमची मते नाहीत. हे ढळढळीत सत्य आहे, वस्तुस्थिती आहे, जिचा मुकाबला करायलाच हवा.

गैरसमज करून घेऊ नका. आमचं सैन्य अफगाणिस्तानात ठेवण्याची आमची मनापासून इच्छा नाही. तिथे आमचे तरुण व तरुणी कामी येत आहेत याचं अमेरिकेला अतीव दुखच आहे. हा लढा चालू ठेवणं आर्थिक व राजकीय दृष्ट्याही फार कठीण आहे. आम्ही आमचा प्रत्येक सैनिक अगदी आनंदाने पुन्हा मायदेशी बोलावून घेऊ; अर्थात अफगाणिस्तानात व पाकिस्तानात अमेरिकन लोक मारण्यासाठी टपून बसलेले हिंसक उग्रवादी आता राहिले नाहीत असा भरवसा वाटला तर! पण अजून तरी असं झालेलं नाही.

म्हणून आम्ही 46 देशांशी युती केली आहे. आणि कितीही पैसा ओतावा लागला तरी अमेरिकेची याबाबतची बांधिलकी कमकुवत होणार नाही. खरं तर आपण कोणीही या उग्रवादींना थारा द्यायला नको. त्यांनी अनेक देशांत थैमान घातले आहे; सर्व धर्मांचे लोक त्यांनी मारले आहेत. एवढेच नव्हे तर सगळ्यात जास्त मुस्लिमांची कत्तल त्यांनीच केली आहे. मानवी अधिकार, देशांची प्रगती, आणि इस्लामची श्रद्धा या कशाशीही त्यांच्या कृत्यांचा धरबंध नाही. पवित्र कुराण आपल्याला शिकवते की कोणीही एखाद्या निरपराध माणसाला मारलं तर ते साऱ्या मानवजातीला मारल्यासारखे दुष्कृत्य ठरेल. एक अब्जापेक्षा जास्त लोकांच्या मनातील ही अढळ श्रद्धा मूठभर लोकांच्या मनातील द्वेषापेक्षा कितीतरी प्रचंड आहे. हिंसक उग्रवादींचा मुकाबला करण्याच्या समस्येतील हा भाग नाही. हा आहे शांती प्रस्थापित करण्यातील मोठा वाटा.

केवळ सैन्यबळाने अफगाणिस्तान व पाकिस्तानातील ही समस्या सुटणार नाही हे आम्ही जाणतो. म्हणूनच तर आम्ही दरवर्षी 1.5 अब्ज डॉलर्स एवढी रक्कम पाच वर्षे ह्यात गुंतवणार आहोत. त्यातून आम्ही पाकिस्तानच्या सहयोगाने शाळा आणि रुग्णालये, रस्ते आणि व्यवसाय बांधणार आहोत आणि करोडो विस्थापितांना मदत करणार आहोत. आम्ही अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व लोकांना हव्या असलेल्या सेवा पुरविण्यासाठी 2.8 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.

इराकच्या समस्येबाबतही मला इथे बोलायचे आहे. आम्ही स्वेच्छेने इराकची लढाई सुरू केली. त्याविषयी माझ्या देशात व इतरत्र खूप विरोधी प्रतिसाद उमटले. इराकी जनता सद्दामच्या जुलुमातून सुटल्याने अखेरीस काहीशी बऱ्या स्थितीत आहे, असे मला मनोमन वाटत असले तरी इराकमधील घटनांनी अमेरिकेला वाटाघाटी करून व आंतरराष्ट्रीय संमती मिळवूनच समस्मा सोडवायला हव्यात याची जाणीव करून दिली, हेही मला पटले आहे. इथे थॉमस जेफरसन यांचे शब्द आठवतात, ‘मला अशी आशा आहे की आमच्या वाढत्या सत्तेबरोबर आमचं शहाणपणही वाढेल आणि आम्हाला हे शिकवेल की आपण आपल्या सत्तेचा वापर जेवढा कमी करू तेवढी ती वाढेल.’

आज अमेरिकेची दुहेरी जबाबदारी आहे: इराकला अधिक चांगलं भविष्य बनविण्यात मदत करणे आणि इराकला इराकी लोकांच्या हाती सुपूर्द करणे.  इराकमध्ये आम्हाला सैन्याचे तळ किंवा भूपृष्ठाचा ताबा किंवा त्यांच्या साधनसंपत्तीचा काही हिस्सा यापैकी कशाचीच अपेक्षा नाही व ते मिळविण्याचे आमचे प्रयत्नही नाहीत हे मी इराकी लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे. इराक हे एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे. म्हणून आमची लढावू सैन्यदले ऑगस्ट महिन्यापर्यंत काढून घेण्याचे आदेश मी दिले आहेत. इराकच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शासनाशी जुलै महिन्यामध्ये केलेला इराकच्या शहरांतून सैन्य हटविण्याचा आणि सर्व सैन्य 2012 सालापर्यंत काढून घेण्याचा करार आम्ही पाळू. इराकला स्वत:च्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी तसेच अर्थव्यवस्था उभारण्यासाठी आम्ही मदत करू. इराकला आम्ही मदत करू ती एक सुरक्षित व संघटित इराक म्हणून, आमचा साथीदार म्हणून; आम्ही त्याचे आश्रयदाते म्हणून कदापि नाही.

अमेरिका उग्रवादींचे अत्याचार सहन करणार नाही. पण त्याबरोबरच स्वतःच्या तत्त्वांमध्ये फेरफार करणार नाही.11सप्टेंबरच्या घटनेचा आमच्या देशावर जबरदस्त आघात झाला होता. त्यातून उफाळून आलेलं भय, तसाच संताप समजण्यासारखा होता. पण त्यामुळे कुठेतरी आमच्या तत्त्वांना सोडून वागण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण होत होती. पण आता हा मार्ग बदलण्यासाठी आम्ही ठोस उपाय करीत आहोत. अमेरिकेकडून होत असलेला छळाचा वापर मी सर्वार्थाने बंद केलेला आहे. तसेच ग्वॅन्टानामो बे येथील तुरुंग पुढच्या वर्षापर्यंत बंद करण्याचा आदेशही दिलेला आहे.

आता इतर देशांच्या स्वायत्ततेचा आदर राखून, कायद्याच्या चौकटीत राहूनच अमेरिका स्वतःचे संरक्षण करील. आणि हे सर्व आम्ही आमच्यासारखाच धोका असलेल्या मुस्लिम समाजाच्या सहकार्यानेच करू. जितक्या लवकर उग्रवादी अलग अलग पाडले जातील आणि मुस्लिम समाजाला नकोसे होतील तेवढ्या लवकर आपण सारे सुरक्षित बनू शकू.

दुसरी तणाव निर्माण करणारी समस्या आहे इस्रायल, पॅलेस्टाईन व अरब जगतामधली. अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये अतिशय घनिष्ट संबंध आहेत. त्यामध्ये काहीही बाधा येणे शक्य नाही. हे संबंध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहेत. ज्यूंची स्वतःची मायभूमी असावी ही रास्त अपेक्षा आणि त्याचे मूळ त्यांच्या अत्यंत दुःखद इतिहासात आहे, ही मान्यता आमच्या संबंधांचा आधार आहे. ज्यू धर्मियांचा जगभर छळ झालेला आहे. अनेक शतके. आणि या ज्यू द्वेषाची परिणती न भूतो न भविष्यति अशा निर्घृण नरसंहारात झाली आहे. उद्या मी बुचेनवल्ड येथे जाणार आहे. हे स्थळ ज्यूंच्या छळछावण्यांच्या जाळ्याचा एक भाग आहे. ‘थर्ड राइशने’ तिथे ज्यू गुलाम म्हणून आणले, त्यांचा छळ केला, त्यांना गोळ्या घातल्या आणि ते मरेपावेतो विषारी वायू पाजला. आता ज्यूंच्या देशात आहेत त्यापेक्षा जास्त ज्यूंना, म्हणजे सहा दशलक्ष ज्यूंना इथे मारण्यात आले. ही वस्तुस्थिती नाकारताच येत नाही. तसं करणं ही घृणास्पद गोष्ट आहे. तसेच इस्रायलला धमक्या देणं किंवा ज्यूंची पूर्वग्रहदूषित शब्दांमध्ये हेटाळणी करणंही घृणास्पदच. ते निखालस चुकीचं आहे आणि त्यामुळे इस्रायली लोकांच्या मनात अत्यंत दुःखद आठवणी जाग्या होतात, त्यामुळे या भागात जी शांतता या लोकांना मिळायला पाहिजे त्यामध्ये अडथळा उत्पन्न होतो.

पण त्याबरोबरच दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाइन मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचीही मायभूमी मिळविण्याची अपेक्षा रास्तच आहे. ते 60 पेक्षाही अधिक काळ विस्थापितांचे दुख भोगीत आहेत; वेस्ट बँक, गाझा आणि जवळच्या भूभागामध्ये. शांतता आणि सुरक्षेचे जीवन मिळावं म्हणून, पण ते त्यांना या काळात कधीच मिळालेलं नाही. रोजचं अपमानित जिणं ते जगत आहेत. तेव्हा पॅलेस्टाइनच्या लोकांची परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे गेलेली आहे यात काही शंका नाही. त्यांच्याकडे आम्ही पाठ फिरविणार नाही. प्रतिष्ठा आणि संधी तसेच स्वतःची मायभूमी मिळविण्याची रास्त अपेक्षा आम्ही नाकारीत नाही.

अनेक दशके हे घोंगडे भिजत पडलेले आहे. दोन जनसमुदाय आपापल्या रास्त आकांक्षा आणि पूर्वेतिहास बाळगून असल्याने त्यांच्यामध्ये समझोता होणं फार कठीण होऊन बसलं आहे. पॅलेस्टाइन इस्रायलींकडे, त्यांच्यामुळे झालेल्या आपल्या विपन्नावस्थेकडे बोट दाखवितात तर इस्रायली पॅलेस्टिनियांच्या सततच्या द्वेष आणि देशाच्या सरहद्दीच्या आतून तसेच बाहेरून सतत होत असलेल्या हल्ल्यांकडे बोट दाखवितात. असं बोट दाखविणं फार सोपं असतं. पण आपण या संघर्षाकडे केवळ पॅलेस्टाइन वा इस्रामली अशा एकाच बाजूने पाहिले तर आपल्याला सत्य दिसणारच नाही. या समस्येचं निराकरण एकच असू शकतं. इस्रायली आणि पॅलेस्टाइन या दोघांच्या रास्त आकांक्षा पुऱ्या करू शकतील व शांतता आणि सुरक्षिततेची हमी देऊ शकतील अशी दोन वेगळी राज्ये स्थापन करणे. इस्रायल, पॅलेस्टाइन, अमेरिका आणि सारं जग यांचं हित यातच आहे. त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे व समस्येच्या निराकरणासाठी चिकाटीने व लागतील तेवढे कष्ट घेणार आहे.‘रोड मॅप’ या समझोत्यामध्ये दोन्ही पक्षांनी ज्या अटी मान्य केल्या त्या स्पष्ट आहेत. त्यानुसार त्यांची व आपलीही जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे.

पॅलेस्टाइनने घातपाती कृत्ये बंद केली पाहिजेत. हत्या व घातपाताने प्रतिकार करणे साफ चुकीचे आहे आणि त्यातून काहीही साध्य होणार नाही. अमेरिकेत कैक शतके काळ्या लोकांना चाबकाचे फटके खात गुलामांचे जीवन जगावे लागले, अलग राहावे लागले. पण इतरांच्या बरोबरीने सारे हक्क त्यांना मिळविता आले ते हिंसेतून नव्हे. तर शांतता, निर्धार आणि चिकाटीने अमेरिकेच्या केन्द्रस्थानी असलेल्या ध्येयांचा आग्रह धरूनच हे साध्य झालं. हीच हिंसाचार कुचकामी असल्याची कथा दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया आणि पूर्व युरोपमधील लोकांनी पुनःपुन्हा उगाळली. झोपलेल्या लेकरांवर क्षेपणास्त्रे डागण्मामध्ये किंवा बसमधून जात असलेल्या वयोवृद्ध स्त्रियांच्या चिंधड्या उडविण्यामध्ये काही शक्ती किंवा निधडेपणा लागत नाही. यातून कोणताही नैतिक अधिकार मिळत नाही, उलट त्यावर पाणी सोडावे लागते.

हीच वेळ आहे पॅलेस्टाइनच्या लोकांनी आपण काय उभारू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करण्याची. तेथील अधिकाऱ्यांनी आपली शासनक्षमता वाढविली पाहिजे, लोकांच्या गरजा भागविणाऱ्या संस्था निर्माण केल्या पाहिजेत. तिथे हमास या संघटनेला बराच पाठिंबा आहे. पण त्याबरोबर त्यांच्यावर जबाबदारीही आहे- पॅलेस्टिनी लोकांच्या आकांक्षा पुऱ्या करण्याची व त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याची. हमासने हिंसेचा मार्ग सोडून द्यायला हवा, पूर्वी केलेल्या करारांची अमलबजावणी केली पाहिजे आणि इस्रायलचा स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा अधिकार मान्य केला पाहिजे. त्याचबरोबर इस्रायलनेही हे मान्य केले पाहिजे की जसे इस्रायलचे अस्तित्व नाकारता येत नाही तसेच पॅलेस्टाइनचेही नाकारता येणार नाही. इस्रायलचे सतत नवीन वसाहती निर्माण करणे अमेरिकेला मान्य नाही. या नवीन वसाहतींमुळे पूर्वी केलेले करार रद्दबातल होतात आणि शांततेच्या प्रक्रिमेमध्ये अडसर घातले जातात. हे थांबलेच पाहिजे.

इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांना जगण्याचा, काम करण्याचा व स्वतःच्या समाजाची प्रगती करण्याचा मान्य केलेला हक्क अंमलात आणण्याची आपली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. पॅलेस्टिनी कुटुंबे उद्‌ध्वस्त करण्याने व गाझामध्ये मानवी पेचप्रसंग निर्माण करण्याने इस्रायलला सुरक्षा मिळणे अशक्य आहे. तसेच वेस्ट बँकमधील लोकांना जगण्याच्या संधी नाकारण्याने सुरक्षितता अशक्य आहे. शांततेच्या मार्गातला पॅलेस्टिनींचा रोजच्या चरितार्थाचा अधिकार व प्रगती साध्य करणे हा एक टप्पा आहे. आणि इस्रायलने हे साध्य करण्यासाठी ठोस पावले उचललीच पाहिजेत.

अरब राष्ट्रांनीसुद्धा हे ध्यानात घेतले पाहिजे की ‘अरब शांतता प्रस्ताव’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, पण ही केवळ सुरुवात आहे; त्यातून त्यांची जबाबदारी संपत नाही. आपल्या लोकांचे लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून इतरत्र वळविण्यासाठी अरब-इस्रायली संघर्षाचा उपयोग अरबांनी करू नये. उलट पॅलेस्टिनी लोकांना उपयुक्त संस्था स्थापन करण्यास मदत करावी,जेणे करून पॅलेस्टिनी राज्य टिकेल. तसेच इस्रायलला मान्यता द्यावी व हार पदरात पाडणाऱ्या गतकाळावर नजर खिळवून ठेवण्याऐवजी प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करायला लागावं.

जे शांततेचा मार्ग अंगिकारतात त्यांच्याशी अमेरिका सख्य करील आणि जे आम्ही खाजगीत इस्रायल, पॅलेस्टाइन आणि अरबांना सांगत असतो ते जाहीरपणे बोलेल. आम्ही शांतता लादू शकत नाही. परंतु खाजगीमध्ये बरेच मुस्लिम लोक इस्रायल नाहीसे करता येणार नाही हे कबूल करतात. तसेच अनेक इस्रायली पॅलेस्टाइनचे राज्य स्थापन होण्याची गरज आहे हे मान्य करतात. सर्वच जण जे जाणतात, ते वास्तव साकारण्यासाठी कृती करण्याची हीच वेळ आहे.

खूप अश्रू आणि खूप रक्त वाहून गेलं आहे. पण एक दिवस असा असेल जेव्हा इस्रायली व पॅलेस्टिनी आया आपल्या मुलांना निर्भयपणे वाढवू शकतील; जेव्हा तीन धर्मांचे उगमस्थान असलेली पवित्र भूमी ईश्वराला मान्य असलेले शांतीस्थळ बनेल; जेव्हा जेरुसलेम ज्युइश, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मांचे सुरक्षित आणि नित्याचे आगर बनेल आणि तिथे अब्राहमची सर्व लेकरे इस्रायलच्या गोष्टीमध्ये सांगितल्यानुसार गुण्यागोविंदाने नांदतील; आणि जेव्हा मोझेस, जीझस आणि महम्मद एकत्र प्रार्थना करतील. पण तो दिवस खेचून जवळ आणण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे.

तणाव उत्पन्न करणारी अण्वस्त्रे ही तिसरी बाब आहे. त्याबाबतचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांमध्ये सर्वच देशांना रस आहे. अमेरिका आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या दोन देशांमध्ये यामुळे एक समस्या निर्माण झाली आहे. अनेक वर्षे इराण अमेरिकेला ती आपल्या किती विरोधात आहे ह्या दृष्टिकोनातूनच जोखत होता. आमच्या दोन देशांतील परस्पर संबंधांचा इतिहास तसा खळबळजनकच राहिला आहे. शीतयुद्ध चालू असताना इराणच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शासनाला उलथवून टाकण्यामध्ये अमेरिकेने भाग घेतला होता. इस्लामिक क्रांतीनंतर इराणने अमेरिकन लोकांना पकडून ओलिस ठेवण्याचा व अमेरिकन नागरिक व सैनिकांवर हल्ले करण्याचा सपाटा लावला होता. हे सर्वांना माहीत आहे. परंतु ह्या पूर्वीच्या इतिहासामध्ये गुंतून न पडता, मी इराणच्या नेत्यांना व लोकांना माझा देश पुढचे पाऊल उचलण्यास तयार आहे असे स्पष्ट सांगितले. इराण कशाच्या विरुद्ध आहे ही महत्त्वाची बाब नसून, इराणला काय भविष्य घडवायचे आहे हे महत्त्वाचे आहे.

अनेक दशकांचा एकमेकांविषयीचा अविश्वास नाहीसा करणे फार कठीण आहे. पण आम्ही धैर्याने, नेकीने व निर्धाराने वाटचाल करू. दोन्ही देशांतील वादाचे, चर्चेचे मुद्दे खूप असतील. पण कोणत्याही पूर्व अटी न घालता एकमेकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचे आम्ही ठरविले आहे. पण हे सर्वांनाच माहीत आहे की अण्वस्त्रांच्या मुद्यावर आम्ही एका निर्धारित टप्प्यावर आलेलो आहोत. आणि हे केवळ अमेरिकेच्या हिताचेच नाही; हा मुद्दा आहे जिच्यामुळे मध्य आशिया आणि जग एका भयानक मार्गावर खेचले जाईल अशा अण्वस्त्रांच्या चढाओढीला थांबविण्याचा.

काही देशांकडे अण्वस्त्रे आधीच आहेत तर काहींच्याकडे नाहीत. याबाबतची तक्रार मी समजू शकतो. कोणत्याच देशाला इतर कोणत्या देशांनी अण्वस्त्रे बाळगावीत हे ठरविण्याचा अधिकार असू नये. म्हणून अमेरिकेच्या संपूर्ण जगच अण्वस्त्रविरहित बनविण्याच्या बांधिलकीचा मी मोठ्या जोमाने पाठपुरावा करतो. तसेच कोणत्याही देशाला, त्मामध्ये इराणही आलाच, आण्विक उर्जेचा शांततापूर्ण वापर करण्याचा अधिकार असायला हवा; मात्र त्या देशाने न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन कराराबाबतची आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. ही बांधिलकी या कराराचा गाभा आहे. आणि मला आशा आहे की या भागातील सर्व देश आपली ही जबाबदारी पार पाडतील.

चौथी तणाव उत्पन्न करणारी गोष्ट म्हणजे लोकशाहीचा पुरस्कार. लोकशाहीचा पुरस्कार करण्याबाबत अलीकडे फार मतभेद आहेत हे मी जाणतो. आणि या मतभेदाचा बराचसा हिस्सा इराकशी निगडित आहे. याबाबतीत माझं स्पष्ट मत आहे की कोणतीही शासनपद्धती कोणत्याही एका राष्ट्राने कोणत्याही दुसऱ्या राष्ट्रावर लादू नये.

पण या मतामुळे ज्या शासनांमध्ये आपल्या जनतेच्या इच्छा प्रतिबिंबित होतात त्यांच्या बाबतची माझी बांधिलकी जराही कमी होत नाही. प्रत्येक देश हे तत्त्व आपल्या परंपरेनुसार आपल्या तऱ्हेने साकारतो. जसा कोणत्याही निवडणुकीचा निकाल ठरविणं आपल्या हातात नसतं तसंच इतर प्रत्येक देशासाठी काय चांगलं आहे हे आम्हीच जाणतो असा अमेरिका आव आणत नाही. पण माझी अशी ठाम समजूत आहे की सगळ्याच लोकांना काही विशिष्ट गोष्टींची आस असतेच; आपले मत मांडण्याची क्षमता आणि शासनाने कशा प्रकारे आपलं नियंत्रण करावं हे ठरविण्यातील आपलं योगदान; शासनाच्या कायदेशीरपणाबद्दल खात्री आणि समान न्याय; लोकांना न लुबाडणारं एक स्वच्छ पारदर्शी शासन आणि आपल्याला हवं तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य या त्या गोष्टी. या काही केवळ अमेरिकन कल्पना नव्हेत. हे मानवी अधिकार आहेत आणि म्हणूनच आम्ही त्यांचा सर्वत्र पुरस्कार करीत राहू.

परंतु हे वचन पूर्ण करण्याचा कोणताही सरळ सोपा मार्ग नाही. पण एवढं नक्की की जे शासन ह्या अधिकारांचं रक्षण करतं ते शासनच शेवटी टिकू शकतं, यशस्वी आणि सुरक्षित होतं. लोकांच्या कल्पना दाबून टाकण्याने त्या नाहीशा होत नाहीत. अमेरिका सर्व शांतता राखणाऱ्या आणि कामद्याचा आदर करणाऱ्या जगभरातील ‘आवाजांना’ लक्षपूर्वक ऐकते; हे आवाज कधी कधी आम्हाला पटण्यासारखे नसले तरीही! आणि सर्व निवडून आलेल्या शांतताप्रिय शासनांचं आम्ही स्वागतच करतो. पण आमची एवढीच अपेक्षा असते की या शासकांनी आपल्या जनतेचा आदर राखून शासन करावे.

हा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण काही लोक लोकशाहीचा पुरस्कार फक्त आपण सत्तेबाहेर असू तेव्हाच करतात; पण एकदा का त्यांना सत्ता मिळाली की इतरांचे हक्क ते निर्दयपणे पायदळी तुडवितात. पण लोकांचे व लोकांनी चालविलेले शासन जिथे कुठे असेल तिथे सर्व सत्ताधारकांना एकच प्रमाण, एकच आदर्श लागू होतो: तुम्ही आपली सत्ता इतरांच्या अनुमतीतूनच राबवू शकता, सक्ती करून नव्हे; तुम्ही अल्पसंख्यकांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे आणि सहिष्णुतेने व सामोपचाराने कारभार सांभाळला पाहिजे; तुमच्या पक्षाच्या हितापेक्षा तुम्ही लोकांचे हित जास्त जपले पाहिजे व राजकीय प्रक्रियांचा रास्त वापर केला पाहिजे. या गोष्टी नसतील तर केवळ निवडणुका घेऊन सरकार बनविण्यामध्ये खरी लोकशाही नाही.

पाचवे तणावाचे कारण आहे धर्मश्रद्धेचे स्वातंत्र्य. इस्लामची सहिष्णुतेची मोठी अभिमानास्पद परंपरा आहे. अंडालुशिया आणि कोर्डोबा यांच्या ‘इंक्विझिशन’च्या काळातील इतिहासात ही परंपरा स्पष्ट दिसते. मी स्वतः तर तिचा माझ्या बालपणी प्रत्यक्षच अनुभव घेतला आहे. इंडोनेशिया या देशामध्ये मुस्लिमांचे प्रमाण खूपच जास्त आहे. पण तिथे ख्रिश्चन लोक अगदी खुलेपणाने आपल्या देवाची पूजा-प्रार्थना करतात. हीच वृत्ती आज सर्वत्र असायला हवी आहे. आपल्या बुद्धीला, मनाला आणि हृदयाला रुचेल त्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक देशातील सर्व नागरिकांना असले पाहिजे. धर्मसंस्था जिवंत राहण्यासाठी अशा सहिष्णुतेची गरज आहे. पण याच सहिष्णुतेला आणि स्वातंत्र्याला जिथे तिथे आव्हान दिले जात आहे.

काही मुस्लिमांमध्ये इतरांच्या श्रद्धांना नाकारण्यातून स्वतःच्या श्रद्धेची महती ठरविण्याची (आपल्याला अस्वस्थ करून टाकणारी) प्रवृत्ती वाढलेली दिसते. धर्मश्रद्धांच्या विविधतेचं ऐश्वर्य जपायला हवं. मग ती लेबनॉनमधल्या मॅरोनाइटची श्रद्धा असो की इजिप्तमधल्या कॉप्ट्‌सची. तसेच मुस्लिमांच्यातल्या ‘फॉल्ट लाइन्स’ (दुही माजविणाऱ्या उद्रेकाच्या दरी) सुद्धा बुजविल्या पाहिजेत. सुन्नी आणि शिया यांच्यातल्या दरीने विशेषतः इराकमध्ये भयानक हिंसेचे स्वरूप धारण केले आहे.

लोकांनी गुण्यागोविंदाने राहण्यासाठी धार्मिक स्वातंत्र्य असणं हा कळीचा मुद्दा आहे. हे स्वातंत्र्य आपण कसे जपत आहोत याचे आपण सतत परीक्षण केले पाहिजे. उदा: अमेरिकेमध्ये मुस्लिमांच्या जकात देण्यावर- दानधर्मातून धर्माचरण करण्यावर- बंदी घातली गेली होती. म्हणून मी मुस्लिम जनतेच्या सहकार्याने त्यांना जकात देण्याचा हक्क बजावता यावा यासाठी प्रयत्न करीत आहे.

तसेच पश्चिमी देशांनी आपल्या मुस्लिम देशबांधवांवर स्वतःच्या धर्माचे आचरण करण्यावर मर्यादा घालू नयेत. उदा: मुस्लिम स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत वा घालू नयेत हे ठरवू नये. दुसऱ्या धर्मियांबाबतचा आपल्या मनात असलेला आकस उदारमतवादाच्या पडद्याआड आपण लपवू शकत नाही.

खरं तर श्रद्धेमुळे आपण एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. म्हणून आम्ही अमेरिकेमध्ये एक (धार्मिक) सेवा प्रकल्प उभा करीत आहोत. त्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू एकत्र येतील. आणि म्हणूनच आम्ही सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचा ‘आंतरधर्मीय संवाद’ आणि तुर्की नेत्यांनी बांधलेली ‘अलायन्स ऑफ सिव्हिलिझेशन्स ऑफ द वर्ल्ड’ ही संघटना यांचे जोरदार समर्थन करतो. आपण संवादातून आंतरधर्मीय सेवा सुरू करू शकतो. लोकांमधल्या अशा सेतूंच्या सहाय्याने आपल्याला ठोस कृती करता येईल;आव्हानांना तोंड देता येईल. मग ते आव्हान आफ्रिकेतील मलेरियाच्या उच्चाटनाचे असो की एखाद्या आस्मानी संकटातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे असो.

सहावा मुद्दा आहे महिलांच्या हक्कांचा. यावर खूप चर्चा होत आहे. काही पाश्चिमात्य समजतात की ज्या स्त्रिया आपले केस झाकतात त्या इतरांच्या तुलनेत कमी पडतात. मी या मताशी बिलकूल सहमत नाही. मी असेही आग्रहपूर्वक सांगेन की ज्या स्त्रियांना शिक्षण नाकारण्यात येते त्यांना समताही नाकारली जाते. ज्या देशातील स्त्रिया चांगले शिक्षण घेतात त्या देशांची प्रगती झालेली दिसते हा काही योगायोग नव्हे.

मला इथे हे स्पष्ट करायचे आहे की हा स्त्री-पुरुष समतेचा प्रश्न केवळ इस्लामचाच प्रश्न नाही. तुर्कस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया ह्या मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये देशाचे नेतृत्व करायला जनतेने महिलांना निवडून आणले आहे. आणि त्याचवेळी अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या अनेक प्रश्नांबाबत समता प्रस्थापित करण्यासाठी अजूनही आंदोलने करावी लागत आहेत. जगात अनेक देशांमध्ये अशी आंदोलने चालू आहेत.

आमचे मुलगे समाजाला जेवढे योगदान देतात तेवढे आमच्या मुलीही देऊ शकतात आणि आपणा सर्वांनाच- पुरुषांना व स्त्रियांनाही-स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा पूर्ण विकास करण्याची संधी मिळाल्यास सर्वांची सामाजिक सुबत्ता अनेक पटीने वाढेल. पुरुषांची बरोबरी करण्यासाठी स्त्रियांची निवड पुरुषांसारखीच असली पाहिजे असे मला मुळीच वाटत नाही. परंपरागत आयुष्य ज्यांना हवं असेल अशा स्त्रियांचादेखील मी आदरच करतो. पण ही निवड त्या स्त्रियांनी स्वतःच केलेली असली पाहिजे, त्यांच्यावर लादली जाता कामा नये. त्यासाठी अमेरिका कोणत्याही मुस्लिम बहुसंख्य देशाशी सहकार्य करण्यास तयार आहे. मुलींच्या सार्वजनिक शिक्षणाला हातभार लावायला, आणि तरुण महिलांना व्यवसाय अथवा नोकरी करण्यास सक्षम करण्यासाठी ‘मायक्रो फामनान्सिंग’ची योजना राबविण्यास उत्सुक आहे. यातून सर्वांना आपली स्वप्ने साकारता येतील.

तणावाचा आणखी एक मुद्दा आहे, आर्थिक विकास आणि संधींचा अभाव. बऱ्याच लोकांना जागतिकीकरणामध्ये विरोधाभास दिसतो. इंटरनेट आणि टीव्ही यांच्यामुळे ज्ञान आणि माहिती मिळाली तरी या सुविधा ज्ञान व माहितीबरोबर घृणास्पद लैंगिकता आणि निर्घृण हिंसक प्रवृत्तीही जोपासतात. व्यापारामुळे भरभराट होते व संधीही मिळतात, पण त्याबरोबर समाजव्यवस्था आणि लोकसमुदाय अस्ताव्यस्त होतात. सगळ्या राष्ट्रांमध्ये- माझे राष्ट्रही त्यास अपवाद नाही- या उलथापालथींमुळे भीती उत्पन्न होते. आधुनिकतेची भीती; आपली आपल्या अर्थव्यवस्थेवरील पकड घालवून बसण्याची भीती; आपली निवड, आपले राजकारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली अस्मिता हरविण्याची भीती; आपल्या समाजाच्या, कुटुंबाच्या, परंपरांच्या आणि श्रद्धेच्या ज्या ज्या गोष्टी आपण उराशी बाळगून ठेवतो त्या सर्व नष्ट होण्याची भीती.

असं असलं तरी मानवाची प्रगती नाकारता येत नाही. विकास आणि परंपरा यामध्ये खरेतर विरोध असण्याचे कारण नाही. जपान, दक्षिण कोरिया हे देश आर्थिक प्रगतीबरोबर आपली स्वतंत्र संस्कृतीही जतन करू शकले आहेत. क्वाललांपूर, दुबई यांसारख्या मुस्लिम बहुसंख्य देशांमधली स्थितीही अशीच आहे. पौराणिक काळात तसेच आजही मुस्लिम समाज शिक्षण व नवनवीन आविष्कार साकारण्यामध्ये आघाडीवर आहे.

आणि हे महत्त्वाचे आहे, कारण जमिनीतून जे काही उपजते त्यावरच विकासाच्या योजनेची मदार ठेवून चालणार नाही. तसेच तरुणांच्या हातांना काम न पुरविता विकास होत राहणार नाही. तेलाच्या साठ्यांमुळे अनेक आखाती देश श्रीमंत झाले, पण आता त्यांचे लक्ष जास्त विस्तृत विकासाकडे वळले आहे.

आपणा सर्वांनीच हे लक्षात घेतले पाहिजे की शिक्षण आणि नवनवीन आविष्कारांची क्षमता हेच 21व्या शतकातील चलन असेल. आणि अनेक मुस्लिम समाजामध्ये या दोन क्षेत्रांमध्ये आज अत्यल्प गुंतवणूक होताना दिसते. माझ्या स्वतःच्या देशामध्ये मी अशा गुंतवणुकीवर भर देत आहे. पूर्वी अमेरिका जगाच्या या भागातील तेल व इंधनवायू यांच्यावरच लक्ष केंद्रित करीत असला तरी आता आमची गुंतवणूक बऱ्याच विस्तृत क्षेत्रात पसरत आहे.

शिक्षणक्षेत्रात आम्ही देवाणघेवाणीचे प्रकल्प राबवणार आहोत, शिष्यवृत्त्या वाढविणार आहोत. अशाच शिष्यवृत्तीमुळे माझे वडील अमेरिकेत गेले. अमेरिकन मुलांना मुस्लिम देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत ‘इंटर्नशिप’ देणार आहोत. जगभरांतल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन लर्निंग’ची सोय उपलब्ध करून देणार आहोत. पौगंडावस्थेतील मुलामुलींना एक नवीन ऑनलाइन नेटवर्क उपलब्ध करून द्यायचं आहे, ज्यामुळे कॅन्सासमधील मुलगा वा मुलगी कैरोमधील मुलाशी क्षणात संपर्क साधू शकेल.

आर्थिक प्रगतीसाठी आम्ही एक व्यावसायिक स्वयंसेवकांचे दल उभारणार आहोत, या स्वयंसेवकांच्याच सारखे युवक मुस्लिम बहुसंख्य देशांमधून निवडले जातील. अमेरिका व मुस्लिम देशांतील व्यवसायक्षेत्रातील नेत्यांशी आणि संस्थांशी परस्परसंबंध कसे प्रस्थापित करायचे आणि सामाजिक उपक्रम कसे राबवायचे ह्यांचा विचार करण्यासाठी मी या वर्षी एक शिखर बैठक बोलावतो आहे.

मुस्लिम देशांत तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी व नवीन कल्पना बाजारात आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही एक नवीन निधी उभारणार आहोत. त्यातून रोजगार उपलब्ध होतील. आफ्रिकेत आणि मध्यपूर्वेत तसेच दक्षिणपूर्व आशियात वैज्ञानिक उत्कृष्टतेची केन्द्रे उभारून तेथे नवे विज्ञानाचे दूत पाठवून उर्जेचे नवीन स्रोत शोधण्यासाठी, प्रदूषणविरहित रोजगारासाठी व हरित शेतीसाठी सामायिक कार्यक्रम आखायचे आहेत. ‘इस्लामिक कॉन्फरन्स’ या संस्थेच्या मदतीने मी आज एका नवीन जागतिक पोलिओ उच्चाटनाच्या कार्यक्रमाची घोषणा करीत आहे. तसेच माता व बालके यांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी मुस्लिम समाजाच्या मदतीने केन्द्रे उभारायची आहेत.

ह्या सर्व गोष्टी सहकार्यानेच करायला हव्यात. जगभरातील मुस्लिम नागरिक व शासने, सामाजिक संस्था, धार्मिक नेते,आणि व्यावसायिक यांच्या हातांत हात घालून जीवन सुंदर करण्यासाठी अमेरिकन लोक तयार आहेत.

मी वर्णन केलेल्या समस्यांचे निराकरण करणे सोपे मुळीच नाही. पण साऱ्या जगाच्या वतीने आपल्यावर एकत्र येऊन काम करण्याची जबाबदारी आहे. आम्हाला अशा जगाची अपेक्षा आहे जिथे उग्रवादी लोकांना भयभीत करू शकणार नाहीत; अमेरिकन सैनिक मायदेशी परतलेले असतील; जिथे इस्रायली व पॅलेस्टिनी दोघेही स्वतःला आपापल्या मायभूमीमध्ये सुरक्षित मानू शकतील; जिथे अणुऊर्जा शांततेच्या उपक्रमांसाठीच वापरली जाईल; जिथे शासने आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतील; आणि जिथे ईश्वराच्या सर्व लेकरांच्या हक्कांचा आदर केला जाईल असं जग! हे सर्वांच्याच हिताचं आहे. परंतु असं जग हे सर्वांच्या मदतीनेच बनवणं शक्य आहे.

अनेक मुस्लिम आणि इतर धर्मीय आपण अशी काही सुरुवात करू शकू याबद्दल साशंक आहेत. त्यातील काही तर संघर्षाच्या आगीत तेल ओतायला आणि प्रगतीमध्ये अडथळे आणायला टपलेले आहेत. काहींचं म्हणणं असं की हे सारे प्रयत्न व्यर्थ आहेत; आपल्यातील मतभेद अटळ आहेत व दोन वेगवेगळ्या सभ्यतांमधला संघर्षही अटळच आहे. काहींना असा काही बदल होऊ शकेल याचीच शंका आहे. जिकडेतिकडे भीती, अविश्वास पसरलेला आहे. परंतु आपण जर आपल्या भूतकाळालाच कवटाळून बसायचं ठरवलं तर आपण पुढे पाऊल टाकू शकणारच नाही. आणि मला तर देशोदेशीच्या सर्व धर्मांच्या तरुण मंडळींना हे आवर्जून सांगायचं आहे की,‘तुमच्यातच इतर कोणाहीपेक्षा हे जग नव्याने घडविण्याची ताकद आहे.’

आपलं या जगातील वास्तव्य क्षणभंगूर आहे. पण प्रश्न आहे: आपण हा अल्प वेळ आपल्याला एकमेकांपासून वेगळं करणाऱ्या गोष्टींवर खर्च करणार आहोत की आपल्यामध्ये कुठे कुठे साम्य आहे ते शोधण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहोत; आपल्या मुलांसाठी आपण पाहिलेल्या भवितव्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत की सर्व मानवांच्या प्रतिष्ठेचा आदर करणार आहोत.

युद्ध छेडणं सोपं असतं, पण ते थांबविणं सोपं नसतं. दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं; स्वतःच्या मनात डोकावणं फार कठीण. दुसरा कोणी आपल्यापेक्षा किती निराळा आहे ते चटकन दिसतं, पण त्याच्यात व आपल्यात असलेली साम्यस्थळे हुडकून काढणं महाकठीण. पण आपल्याला योग्य मार्ग निवडायचा आहे; सोपा मार्ग पत्करून चालणार नाही. प्रत्येक धर्माच्या गाभ्यामध्ये एक नियम असतो, ‘दुसऱ्याशी असंच वागावं जसं त्याने आपल्याशी वागावं असं आपल्याला वाटतं.’ हे त्रिकालाबाधित सत्य लोकांच्या आणि देशांच्या पलीकडे पोचणारं आहे. हा विश्वास काही नवा नाही. तो काळे, गोरे किंवा ब्राऊन, ख्रिश्चन, मुस्लिम किंवा ज्यू प्रत्येकाला वाटतो. सभ्यतेच्या पाळण्यातच तो धुगधुगू लागला आणि आजही त्याचे ठोके कोटी कोटी हृदयांमध्ये ऐकू येत आहेत. इतर माणसांविषयी वाटणारा हा विश्वासच आज मला इथे तुमच्यामध्ये घेऊन आला.

आपण ज्याची अपेक्षा करतो ते जग निर्माण करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे; पण जर आपल्यामध्ये एक नवीन सुरुवात करण्याची हिंमत असेल तरच; (धर्मग्रंथांमध्ये) काय लिहिलं गेलं आहे ते ध्यानात ठेवूनच.

पवित्र कुराण आपल्याला सांगतं, ‘हे मानवा, आम्ही तुला निर्माण केलं आहे पुरुष आणि स्त्री; आणि तुम्हाला राष्ट्रांमध्ये आणि जमातींमध्ये घडविलं जेणे करून तुम्ही एकमेकांना जाणाल.’

पवित्र बायबल आपल्याला सांगतं, ‘शांतता प्रस्थापित करणारेच खरे भाग्यवान आहेत; कारण त्यांनाच ईश्वराचे पुत्र म्हटलं जाईल.’

साऱ्या जगाचे लोक शांततेत एकत्र राहू शकतात. आणि आपण जाणतो की हेच ईश्वराचे दर्शन आहे. आणि आता हेच आपलं या भूतलावरील कार्य असलं पाहिजे. धन्यवाद आणि ईश्वर तुम्हांला शांती देवो!

(अनुवाद : सुमन ओक)

Tags: अल अझहर बराक ओबामा सुमन ओक इस्लामी देश-अमेरिका संबंध कैरो विद्यापीठ इजिप्त Suman Oak Islamic Countries-America Relationship Cairo University Egypt Barak Obama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बराक ओबामा

माजी अध्यक्ष- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके