डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आगामी शतकातील मनुष्याच्या जगण्याच्या कसरतीची कल्पना करताना मला डिस्नेचा मिकी माऊस आठवतो. मिकी माऊसला नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा करून सगळ्या दृश्य आणि अदृश्य शक्ती आपल्या असुर शक्तीसहित त्यांचा पाठलाग करीत असतील किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचा घात करायला टपलेल्या असतील, पण मिकी माऊस मरणार नाहीत. वेगवेगळ्या कसरती करण्यात उस्ताद असलेल्या चाप्लिनला नतमस्तक व्हावं लागेल अशा कल्पनेपलीकडच्या कसरती मिकी माऊसला शिकाव्या लागतील. आणि तो त्या शिकेल, पण मिकी माऊस जगेल. नष्ट कधीच होणार नाही. राक्षसी शक्तींच्या गदारोळात तो पावलापावलाने मरणाच्या दाढेपर्यंत जाईल, तो शक्तींच्या जबड्यापर्यंत जाईल, पण त्या शक्ती त्याला गिळंकृत करू शकणार नाहीत. मिकी माऊस पायदळी तुडवले जातील, पण पुन्हा उठून धावायला लागतील.

साहित्याच्या वाटेवरून चालायला सुरुवात करण्यापूर्वी, खरं म्हणजे शब्दांना काही अर्थ असतो हे लक्षात येण्याअगोदरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. जोरजोरात रडलं की, पाहिजे ते मिळतं. 

फक्त आवाज मोठा हवा. खरं म्हणजे त्यात आक्रमकता हवी. झक्‌ मारून लोक तुमच्याकडे लक्ष देतात. लवकरच अजून एक गोष्ट लक्षात आली. रडणं-ओरडणं, गोंधळ घालणं इतकंच आवश्यक आहे असं नाही, तर दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे वागलं, तर बक्षीस मिळतं. अर्थात, ते प्रत्येकवेळी मिळतंच असं नाही. पण बहुतेक वेळा मिळतं. 

कधीकधी यातील हुशारी समजणाराही कुणी न कुणी भेटत असे. पण तेव्हा काही फायदा झाला नाही तरी तोटाही होत नसे. प्रशंसाच होत असे. ‘हुशार आहे, नाटक करतोय’ असं सर्टिफिकेट मिळे. ‘बघितलंत? कुणाला कसं खूष करावं हे याला आत्तापासून कळतंय.’ 

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळण्याइतकं तेव्हा माझं वयही नव्हतं. शब्द शिकण्यापूर्वी माणसात हुशारी आलेली असते. पुढे जाऊन या जन्मजात हुशारीमध्ये वाढ होत गेली. उदाहरणार्थ, थोडासा अभ्यास करून परीक्षेत पास होता येऊ शकतं. परीक्षेत पास होत गेलं तर मोठी माणसं फारसा त्रास देत नाहीत. जास्तीत जास्त कधी तरी बडबडतात- ‘त्याला दुसऱ्या मुलांसारखे मार्क्स मिळवता येत नाहीत...’ जर तुम्ही याचं वाईट वाटून घेतलं नाही तर मग काहीच होत नाही. 

एकदा कधीतरी... कधी हे माहिती नाही, पण लक्षात आलं की, अभ्यास करायची गरजच नसते. अभ्यास न करताही पास होण्याचे मार्ग आहेत. अशा तऱ्हेने पास होणारेही आहेत. पण जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा माझं शिक्षण संपलेलं होतं. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या. त्याने माझं शिक्षण संपवून टाकलं ही गोष्ट त्यातच घडली. 

‘संपवून टाकलं’ याचा अर्थ असा की, माझं शालेय शिक्षण थांबलं. अर्थात जगण्याचं शिक्षण चालूच राहिलं. खरं म्हणजे त्यानंतरच ते जोरात सुरू झालं. 

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि परिस्थितीत खूप वेगाने बदल होत गेला. एकामागून एक बदल घडत गेले. ज्या वेगाने हे बदल घडत होते ते बघून हैराण व्हायला होत होतं. पायाखालची जमीन वेगाने सरकत गेली. जे काही ‘आहे’ आणि ‘राहील’ असं मानलं होतं, तेदेखील वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळलं. अशी पडझड केवळ आपल्या देशातच झाली असं नाही, तर सगळ्या जगात झाली. 

जणू मानवप्राणी नष्ट झालाय आणि केवळ त्याच्या सावल्याच मागे राहिल्यात. मूल्यंच उरलेली नाहीत आणि त्यांचे संस्कार एक प्रकारच्या अर्थहीनतेसहित मागे उरलेले आहेत. त्यांचा आधार वाटेनासा झाला होता. उलट पावलापावलावर त्यांची अडचणच वाटू लागली. याचं काय करावं हेच लक्षात येत नव्हतं. मग आम्ही संस्कार आणि आमचं आचरण यात फरक करायला सुरुवात केली. संस्कारांच्या आम्ही कथा बनवल्या आणि आचरण आम्ही परिस्थितीप्रमाणे बदलणारे असे करायला सुरुवात केली. हेही सहज सोपं काम नव्हतं. खूप त्रास झाला. आमच्या वागण्याचं समर्थन करता करता आमची खूप ओढाताण झाली. जगण्याचं संतुलन राखताना तऱ्हेतऱ्हेच्या कसरती कराव्या लागल्या. 

पण आम्ही जन्मजात हुशार होतो. हे सगळं करूनही आम्ही टिकून राहिलो. जगण्याच्या या कसरतीत आमच्यातील काहीजण खूप मोठे झाले. त्यांनी नाव कमावलं. अजूनही खूप काही केलं. देशातील या पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. हे सगळं बघत बघतच मी मोठा झालोय. हेच जगलो. हेच केलं. पण या कालखंडात देशात फक्त आम्ही होतो असं नाही. अजूनही बरंच काही घडलं. तेच महत्त्वाचं आहे. बघता बघता साम्राज्यं लयाला गेली. हुकूमशाह्या नष्ट झाल्या. राजाचे रंक झाले. नवीन विचारप्रणाली लादल्या गेल्या. तयार उत्तरं हरवली आणि प्रश्नांचा गुंता तसाच राहिला. तंत्रज्ञानाचा मारा एकामागून एक असा आमच्यावर होत राहिला. उत्पात होत राहिले. 

हे सगळं घडत होतं आणि आम्ही चित्रपटात चाप्लिन जशी ढगळ गळणारी पँट सावरण्याचा प्रयत्न करतो, तसा प्रयत्न करीत राहिलो... स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी... वरवर तरी हुशार आणि माहीतगार दिसण्यासाठी आम्ही जिवाच्या आकांताने कसरती करीत जगत होतो. पायाखालची जमीन सरकत होती. आणि आम्ही असं दाखवत होतो की, आम्हीच पुढे पुढे जात आहोत. पण पुढे म्हणजे कुठे? हे मात्र आम्हाला माहिती नव्हतं. कारण खटाटोप होता तो. आणि पायाखालची जमीन मात्र सरकतच जात होती. ती अजूनही सरकते आहे. पायाखालची वाळू आजही घसरतेय. आणि आधार घ्यावा असं काहीही दिसत नाहीये. 

चाप्लिनची गोष्टच वेगळी होती. चित्रपटातील दृश्याचं चित्रीकरण समाप्त होताच त्याची एका स्थिरसंपन्न जगाशी, शांत जगाशी गाठ पडे. ज्या जगाकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं होती. त्याच्या चित्रपटांची निर्मितिसंबंधातील धावपळ हेच आमचं वास्तविक जीवन बनलेलं आहे. आणि ते जगताना आमच्या नाकात दम आलेला आहे. छातीची चाळणी होण्याची वेळ आलेली आहे. न घसरता, न पडता दिशाहीन धावपळ करण्याच्या प्रयत्नात कोणकोण पायदळी तुडवला जातोय हेच कळत नाहीये. तुडवल्या गेलेल्यामध्ये कुणीतरी आपल्या मस्तकावर घेऊन मिरवण्यासारखाही असू शकेल, आपल्या काळजाजवळ घेण्यासारखाही असू शकेल... असू शकेल असं नाही तर होताच... पण खाली वाकून पाहण्याइतकाही वेळ होता कुणाजवळ? आम्ही धावत होतो. कुठेही न पोहोचण्यासाठी केलेली प्राणघातक स्पर्धा सुरू होती. 

ती स्पर्धा आजतर अजूनच प्राणघातक बनलेली आहे. आपण ज्याचा सन्मान करीत आहात तो अशाच कोणत्या तरी स्पर्धेमध्ये धावणाऱ्या, जीवघेण्या कसरती करणाऱ्या पिढीचा एक प्रतिनिधी आहे. 

सन्मानासाठी आपण ज्या साहित्यकृतीची निवड केलेली आहे, त्यातील कथानकाला या पिढीच्या युगाचा संदर्भ आहे. ती पराक्रमाची विजयगाथा नाहीये. ती पराजयाची आणि वैचारिक गोंधळाची स्वीकृती आहे. ती एका वेडेपणाचे आणि दारुण पराजयाच्या एका खोलवर रुतलेल्या काट्याचे आणि त्यापासून निर्माण झालेल्या दु:खाचे दर्शन घडवते आहे. 

पराजयाचा सन्मान? वैचारिक गोंधळाचा सन्मान? वेडं स्वप्नरंजन आणि त्यातून उत्पन्न झालेल्या भ्रभंगाचा सन्मान? जो गोंधळलेल्या अवस्थेत धावतो आहे आणि ज्याला थांबणंही शक्य नाही अशा व्यक्तीचा सन्मान? सन्मान केला जातो पराक्रमाचा, विजयाचा, यशाचा, जिंकण्याच्या उद्देशाने जे हुशारीने स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि जिंकतात त्यांच्या महत्वाकांक्षेचा आणि चतुराईचा सन्मान केला जातो. त्यांच्या स्फूर्तिदायक कथांची प्रशंसा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. 

यामुळेच या सन्मानाने मी जरा गोंधळात पडलेलो आहे. सन्मान करण्यासारखं मी नक्की काय केलंय, माझ्या हातून असं काय घडलंय याचा मी शोध घेतोय. हे खरंच की, जे मी जगलो आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्यांना मी जसं जगताना पाहिलं, त्यासंबंधी लिहिताना मी खूप प्रामाणिक राहिलो. मी माझ्या युगाशी बेइमानी केली नाही. नाटकासारखं दर्शक-सापेक्ष, रंजनप्रधान आणि सुबोध माध्यम हातात असल्यावर मी आपल्या युगातील जगण्याचे डावपेच, अडचणी यांना प्रेक्षकांसमोर खूप सोप्या आणि खोट्या पद्धतीने सादर केलेलं नाही. 

मी जे लिहिलं ते कधीकधी माझ्या समाजाला धक्के देणारं, प्रक्षोभ निर्माण करणारंदेखील होतं आणि त्या त्या वेळी त्यासाठी मला समाजाने शिक्षादेखील दिलेली आहे. मी ते भोगलंदेखील. पण मी लिहिलेल्या साहित्यकृतीसाठी मी कधीही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. 

पण जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की, त्यात माझा काही शूरपणा नव्हता. मी खूप धैर्यवान होतो असंही नव्हतं. एक जिद्द होती... पण त्याची संगती मी लावू शकत नाही. कुणी विरोध केला तर तेच तेच पुन्हा करण्याची माझी ही खोड खूप जुनी आहे. मी जे काही आणि जसं काही लिहिलं त्यापेक्षा वेगळं मी काहीही लिहू शकत नव्हतो. मला तेच आणि तसंच दिसत होतं. आणि जे मला पटत नसे तसं लिहिण्याचं कौशल्य माझ्यापाशी नव्हतं. 

मी जे लिहिलं... आणि सतत लिहिलं, तेही माझं कर्तृत्व नाही. मला कळतंय तेव्हापासून काही ना काही लिहीत राहण्याची सवयच मला आहे. खरं हेच आहे की, लिहिण्याव्यतिरिक्त माझ्याकडून अजून काही होणं शक्यच नव्हतं. जर शक्य असतं तर मी चित्रं काढली असती. गायलो असतो, किंवा कोणतं तरी वाद्य वाजवलं असतं. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट अथवा मॅनेजमेंट एक्सपर्ट बनलो असतो. या सगळ्यांचा मला वेगवेगळ्या कारणांनी त्रास होतो. माझं बेहिशेबी वागणं, बेशिस्त वागणं, संगीताच्याविषयी प्रेम वाटणं आणि विश्वातील महान चित्रकारांच्या कलाकृतींच्या संबंधात प्रत्येकवेळी वाटणारा आश्चर्ययुक्त आदर ही काही या संबंधांतली कारणं आहेत.

लेखक बनणं हीच माझी नियती होती आणि मी ज्या प्रकारचा लेखक बनलो तसाच लेखक बनणं हा माझ्या नियतीचा एक अंश असावा. नाहीतर पहिलं नाटक सपाटून आपटल्यावर आणि पुन्हा नाटक न लिहिण्याचा निश्चय केल्यानंतरही मी नाटकं का लिहीत राहिलो असतो? एका नाटकावर जबरदस्त टीका झाल्यावर, त्यामुळे खूप निंदानालस्ती आणि मानसिक संताप वाट्याला आल्यावरही मी दुसरं वादग्रस्त नाटक का लिहिलं असतं? 

नियती... याचं दुसरं उत्तर मला तरी सुचत नाही. नियतीचा एक खेळ मानून मी एका योगायोगाचा उल्लेख करतो. ज्या नाटकासाठी तुम्ही मला सन्मानित करीत आहात, त्या नाटकासाठीच मला यापूर्वी एका समारंभात चप्पल फेकून मारण्यात आली होती. 

ती चप्पल आणि हा सरस्वती सन्मान ही त्या नाटकाची एकत्रित नियती असावी. त्या नाटकाचा जन्मदाता म्हणून मी दोन्हीही गोष्टींचा मनापासून आदर करतो. 

खरं म्हणजे हा सन्मान मला खूप लवकर मिळाला आहे असं काही लोकांना वाटतं. त्यांना वाटतं की, इतका मोठा सन्मान मिळण्यासाठी जितकं वय व्हायला हवं तितकं काही माझं वय झालेलं नाही. असे महान सन्मान दिले जातात, त्या वेळी लेखकाची सृजनक्षमता थांबून काही वर्षं उलटलेली असतात. कधी त्याचा बहर ओसरलेला असतो. त्याच्या साहित्यसृजनाच्या प्रांतात शिशिर ऋतूंचं आगमन झालेलं असतं. आणि त्या ऋतूतील थंड हवेमुळे त्याची प्रतिभा गारठलेली असते, असा अनेकांचा अनुभव आहे. 

मला अजून तरी त्या थंडीची चाहूल लागलेली नाही. मला रोज नवीन विषय सुचताहेत. अजूनपर्यंत तरी पार्किन्‌स किंवा मोतीबिंदूसारखे आजार मला शिवलेले नाहीत. त्यामुळे लिहिण्यात काही अडचण निर्माण झालेली नाही. त्यामुळे हा सन्मान प्राप्त झाल्यावरही मी लिहीत राहीन अशी भीती आहे- हे मी या ठिकाणी नोंदवत आहे. 

शेवटी मनात असलेला एक विचार व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. आमच्या महाराष्ट्रात मराठी भाषेच्या भविष्याच्या संदर्भात अनेकांना खूप काळजी वाटते आहे. तांत्रिक ज्ञानाने निर्मित नव्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या या काळात साहित्याचं काय होईल हा देखील चर्चेचा विषय आहे. तुमच्या हिंदी भाषेत किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये हा काळजीचा विषय आहे की नाही याची मला कल्पना नाही. 

भाषा आणि साहित्याविषयी इतरांसारखीच मला आत्मीयता वाटत असतानाही ही चिंता मला छळत नाही. जर भाषा आणि साहित्याच्या तळाशी मनुष्याची सर्वकालीन उत्सुकता आणि अभिव्यक्तीची आवश्यकता असेल तर भाषा आणि साहित्य अमर आहे. जोपर्यंत जगण्याचं आव्हान मनुष्याच्या समोर उभं असेल तोपर्यंत जाणून घेण्यासंबंधीची उत्सुकता आणि अभिव्यक्तीची गरज टिकून राहील आणि ही गरज तो भाषेच्या साहाय्यानेच पूर्ण करेल. हे खरंच की, भविष्यात त्याची भाषा कदाचित खूप वेगळी आणि एकदम नवी असेल. पण त्याने काय बिघडतं? महत्त्वाची गोष्ट आहे, उत्सुकता आणि अभिव्यक्ती ही मनुष्यत्वाची दोन महत्त्वाची आणि सुंदर लक्षणं आहेत. ती कोणत्या भाषेत अवतीर्ण होतील याची चिंता का करायची? ती अवतीर्ण होण्याशी आपण संबंध ठेवला पाहिजे. 

एकविसावं शतक उंबऱ्याच्या बाहेर उभं आहे. जगण्याची अतर्क्य आणि अनपेक्षित आव्हानं घेऊन ते येईल. या अस्ताला जाणाऱ्या शतकाचा प्रतिनिधी या नात्याने मी आजकाल विचार करीत राहतो की, पुढच्या शतकातील मानव कसा असेल? तो कसा जगेल? 

माझ्या युगातला माणूस हा माझ्यासारख्या चाप्लिनची आणि त्याच्या धडपडीची आठवण देतो. तसेच आगामी शतकातील मनुष्याच्या जगण्याच्या कसरतीची कल्पना करताना मला डिस्नेचा मिकी माऊस आठवतो. मिकी माऊसला नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा करून सगळ्या दृश्य आणि अदृश्य शक्ती आपल्या असुर शक्तीसहित त्यांचा पाठलाग करीत असतील किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचा घात करायला टपलेल्या असतील, पण मिकी माऊस मरणार नाहीत. वेगवेगळ्या कसरती करण्यात उस्ताद असलेल्या चाप्लिनला नतमस्तक व्हावं लागेल अशा कल्पनेपलीकडच्या कसरती मिकी माऊसला शिकाव्या लागतील. आणि तो त्या शिकेल, पण मिकी माऊस जगेल. नष्ट कधीच होणार नाही. राक्षसी शक्तींच्या गदारोळात तो पावलापावलाने मरणाच्या दाढेपर्यंत जाईल, तो शक्तींच्या जबड्यापर्यंत जाईल, पण त्या शक्ती त्याला गिळंकृत करू शकणार नाहीत. मिकी माऊस पायदळी तुडवले जातील, पण पुन्हा उठून धावायला लागतील. आगामी शतक आणि मानवाच्या भविष्याची चाहूल घेताना मला तेव्हाच्या मानवाची ही अवस्था दिसू लागते. 

मला वाटतं की, स्वयंनिर्मित व्यवस्थेच्या राक्षसी कारवायां- समोर आणि आपल्या आतील काही प्रवृत्तींच्या विरुद्ध त्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी रोज जीव तोडून संघर्ष करावा लागेल. लेखका हा द्रष्टा, वैज्ञानिक नाही हे तर खरंच आहे. तो साधा ज्योतिषीही नाही. तो गणित मांडून उत्तर काढत नाही. त्याला फक्त ‘वाटतं’ किंवा ‘जाणवतं’ आणि असं जाणवल्यामुळेच तो बेचैन होतो. मी आज तसाच बेचैन आहे. 

अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ 

(1993 सालचा तिसरा ‘सरस्वती’ सन्मान स्वीकारताना 3 मार्च 1994 रोजी विजय तेंडुलकर यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद के.के.बिर्ला फाऊंडेशनच्या सौजन्याने प्रसिद्ध करीत आहोत; 7 जानेवारी या तेंडुलकरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने...)

Tags: नाटक लेखक मराठी भाषा मिकी माउस चार्ली चाप्लीन सरस्वती सन्मान चंद्रकांत भोंजाळ विजय तेंडुलकर Drama Natak Writer Lekhak Marathi Bhasha Micky Mouse Charli Chaplin Sarswati Snaman Chandrkant Bhonjal Vijay Tendulakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय तेंडुलकर

विजय तेंडूलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, निबंधकार, पटकथा लेखक व पत्रकार होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके