डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कांदा बाजारपेठांची अवस्था

लासलगाव ही देशातील मोठी कांदा बाजारपेठ आहे. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाहीत, हे वास्तव असले तरी, येथे निर्यातीला पूरक ठरणारी व्यवस्था उभारण्यात आली आहे. मालाचा मुबलक पुरवठा होत असताना त्याला पूरक व्यवस्था येथे आहे. या बाजारपेठेत नाशिक जिल्ह्याप्रमाणे धुळे, चाळीसगाव, जळगाव या भागातील माल विक्रीसाठी आणला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर लासलगावच्या कांद्याला मागणी असते. लाल कांदा असल्याने चवीला तिखट असतो. म्हणून या कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. कांदा निर्यात करणाऱ्या अलाना, बुखारी, जोब्सन्स, हिंदुस्थान अशा कंपन्या कांदा निर्यात करतात. आज जवळपास 76 देशांमध्ये हा कांदा निर्यात होतो, असे व्यापारी सांगतात.  

भारताची अर्थव्यवस्था कृषिव्यवस्थेवर अवलंबून आहे. आता त्यात हळूहळू बदल होत असून, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत आहे. दळणवळणाच्या आधुनिक सोई- सुविधांमुळे देशातील व्यापार दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यातून जगातील राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आलीत. भारतातला माल जलद गतीने परदेशात पाठवला जातो. त्याचा परिणाम कृषिक्षेत्रावर झालेला दिसतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सेवांच्या माध्यमातून देवाण-घेवाण होत आहे. त्यालाच पूरक म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रांत व्यापारी करार घडून येत आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजार एकाच वेळी जगभरातील राष्ट्रांना खुला झालेला आहे. शेतीतून निघणारा माल परदेशात पाठवला जात आहे. कृषिक्षेत्राला त्यामुळे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. वरवर पाहता, हे चित्र गोड दिसते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे चित्र मात्र स्थानिक बाजारपेठांच्या आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने फसवे ठरते. ते कसे आणि त्याला असलेले बाजारपेठीय पदर कोणकोणते, याचा आढावा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

व्यापारी, बाजार आणि शेतकरी 

नाशिक जिल्ह्यात अधिकृत नोंदणी केलेल्या लहान- मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या शंभरच्या आसपास आहे. या व्यापाऱ्यांच्या हातात बाजारपेठांचे धागेदोरे आहेत. शेतकरी म्हणतात, बाजारात आणलेल्या कांद्याचे भाव काही सेकंदांत बदलत जातात. सकाळी मिळालेला भाव दुपारी मिळत नाही. त्यात व्यापारी वर्ग दरात अडचणी निर्माण करतो. लासलगाव बाजारपेठेला भेट दिली, तेव्हा जिल्ह्यातील कांद्याचे गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यापारी वाल्मिक जाधव सांगतात, ‘‘कांद्याची साठेबाजी करता येत नाही. जशी अडचण शेतकऱ्यांना भेडसावते, तीच आमची अडचण आहे. कांद्याची साठेबाजी करायची असा विचार केला तरी ‘कांदा नेमका ठेवायचा कुठे?’ हा प्रश्न राहतोच. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांत कांदासाठवणूक व्यापारी करत नाहीत. शेतकऱ्यांकडून घेतलेला माल ताबडतोब विकून टाकावा लागतो, अन्यथा आमचाच तोटा होतो.’’ 

शेतकरी आणि व्यापारी यांच्यात एक प्रकारे द्वंद दिसून येते. कांद्याला मिळणारा भाव पुरेसा नसतो, तो व्यापारी ठरवतात, असं शेतकरी सांगतात. दुसरीकडे लासलगावचे व्यापारी म्हणतात, ‘‘कांद्याचे भाव वाढले की, नेहमीच व्यापाऱ्याला टार्गेट केलं जातं. खरी परिस्थिती अशी आहे की, कांद्याचे दर वाढवणे व्यापाऱ्यांच्या हातात असते तर नुकसान झालेले व्यापारी तुम्हाला दिसलेच नसते. बाजारपेठ चांगली आहे हे कशावरून ठरतं? तर, ज्या बाजारपेठेत शेतकरी माल घेऊन येतात, तो माल विक्री होतो की नाही यावरून. लासलगावच्या बाजारात आवक कितीही झाली ना तरीसुद्धा कांद्याची विक्री होत असतेच. 

‘‘एक हजार बैलगाड्या वा चारशे ट्रक कांदा आला, तरीदेखील कांदाखरेदी करून त्यांचे पैसे देण्याची ताकद या व्यापाऱ्यांत आहे. यात वाढ करायची असेल आणि बाजार टिकून ठेवायचा असेल, तर व्यापारी महत्त्वाचा असतो. शेतकरी किंवा व्यापारी कांद्याचं भवितव्य ठरवत नाही, ते काम निसर्ग करतो. साठेबाजी करून ठेवलेला कांदा दर कोसळलेल्या काळात विकावा लागतो. म्हणजे तो खराब होत असेल, तर बेभाव विकावा लागतो. अशा कठीण काळात फायदा किंवा तोटा न पाहता कांद्याची विक्री करावी लागते. व्यापाऱ्यांत कांद्याचे दर वाढवण्याची ताकद असती, तर तुम्हाला ते तोट्यात कधीच दिसले नसते.’’ 

कांदा हा नाशवंत भाजीपाला आहे आणि नगदी पीक असल्यामुळे बहुतांश शेतकरी कांदा बाजारात तातडीने विकून टाकतात. नगदी पैसे हातात येतात आणि साठवण करायची भानगड राहत नाही. शेतातून काढलेला माल गाडीत भरून थेट बाजारपेठ गाठली जाते. तिथे जो भाव मिळेल, त्या भावात कांदा विकला जातो. कांद्याला ज्या वेळी भाव नसतो, त्या वेळी तर वाहतुकीचा खर्चसुद्धा वसूल होत नाही. अशा वेळी शेतकरी स्वतःच्या खिशातून पैसे घालून व्यवहार पूर्ण करतात. 

व्यापारी वाल्मिक जाधव सांगतात, ‘‘कांद्याच्या जोरावर श्रीमंत झालेले अनेक शेतकरी आहेत. एक वर्ष कमी भावात गेलं आणि दुसऱ्या वर्षात चांगला भाव मिळाला की, शेतकरी नफ्यात राहतो.’’ त्याचं कारण सांगताना ते म्हणतात, ‘‘कांदा हे परवडणारं पीक आहे. शेतकरी कांदालागवड करताना शक्यतो दराचा विचार करत नाहीत. त्यांना माहिती असते की, कांद्याला किमान दर मिळाला तरी पैसे वसूल होतात. खर्च कमी आणि चांगला दर मिळाला की, मेहनतीचं सोनं होतं.’’ वाल्मिक जाधव हे लासलगाव येथील बाजारपेठेतले व्यापारी आहेत. ते व्यापारात जवळपास 30 वर्षे सक्रिय आहेत. 

‘डिसेंबर 2019’- जेव्हा भाव वाढतात 

लासलगावच्या जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबर महिन्यात मोठी उलाढाल होत होती. चांगल्या कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये होते. डिसेंबर महिन्यात भाव वधारले होते. साधारणतः कांद्याचे भाव याच काळात वाढलेले दिसतात. याबाबत शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण म्हणतात, ‘‘फेब्रुवारी 2019 मध्ये कांद्याचा दर 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटलच्या नीचांकापर्यंत घटला होता, तर नोव्हेंबर 2019 मध्ये चांगल्या मालाचा सर्वसाधारण दर 8 ते 10 हजार प्रतिक्विंटलच्या उच्चांकावर पोचला. एकाच वर्षात इतकी अस्थिरता, हे काही चांगले लक्षण नाही. यामागे जशी नैसर्गिक परिस्थिती जबाबदार आहे, तशी सरकारी धोरणेही. निर्यातबंदी आणि आयातीच्या धोरणामुळे कांद्यात मंदी येते. शेतकरी कांदालागवडीस प्रवृत्त होत नाही. परिणामी, उत्पादन घटून सध्यासारखी तुटवड्याची परिस्थिती निर्माण होते. यावर डॅमेज कंट्रोल म्हणून, स्टोअरेज स्ट्रक्चरमध्ये जी पायाभूत गुंतवणूक केली पाहिजे, ती होत नाही. बाजार सुधारणाही होत नाही. फॉर्म ते फोर्क- व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूकवाढीसाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्याही होत नाहीत.’’ 

या वर्षभरात डिसेंबर 2019 मध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असली, तरी त्यामागचे प्रमुख कारण हे नैसर्गिक तुटवडा असल्याचे समोर येते. याच काळात लासलगावमध्ये सडलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 3,000 हजार रुपये इतका दर मिळत होता. या नैसर्गिक तुटवड्यामुळे लासलगावहून मुंबईच्या आठवडी बाजारात हा माल पाठवला जात होता. विशेष म्हणजे, या मालाला अपरिहार्यतेतून ग्राहक खरेदी करत होते. इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. तो म्हणजे, या नैसर्गिक तुटवड्यामुळे सरकारने कांद्याचे शिल्लक साठेसुद्धा बाजारात आणले होते. त्यामागे ही दर वाढ रोखण्याचा सरकारचा उद्देश होता. अर्थात अशा प्रकारचे अपरिणामकारक उद्योग सरकारी पातळीवर होत असतात. त्याला ना काँग्रेस अपवाद असते, ना भाजप. कारण शहरी मध्यमवर्गीयांचा या राजकीय पक्षांनी मतदाराच्या पातळीवर धसका घेतलेला आहे. म्हणून असे उद्योग करणे हे जणू प्रत्येक सरकारचे कर्तव्य ठरत आहे. 

लासलगावची कांदा बाजारपेठ 

लासलगावचा कांदा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत लासलगावची बाजारपेठ सुरू आहे. शेतकरी लगबगीने गाड्या भरून कांदा बाजारात घेऊन येतात. सकाळी 9 वाजता सुरू झालेला लिलाव दुपारी एक पर्यंत सुरू असतो. दुपारी 1 ते 3 लिलाव प्रक्रिया बंद असते. 3 ते 6-30 यात दुसऱ्या टप्प्यातील लिलाव सुरू होतात. महमूदभाई सांगतात, ‘‘50 गोणींच्या वरचा माल तत्काळ मुंबईला पाठवला जातो. भारतातील बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतसुद्धा लासलगावचा कांदा पाठवला जातो.’’ लासलगाव ही देशातील मोठी कांदा बाजारपेठ आहे. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाहीत, हे वास्तव असले तरी, येथे निर्यातीला पूरक ठरणारी व्यवस्था उभारण्यात आली आहे. मालाचा मुबलक पुरवठा होत असताना त्याला पूरक व्यवस्था येथे आहे. या बाजारपेठेत नाशिक जिल्ह्याप्रमाणे धुळे, चाळीसगाव, जळगाव या भागातील माल विक्रीसाठी आणला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर लासलगावच्या कांद्याला मागणी असते. लाल कांदा असल्याने चवीला तिखट असतो. म्हणून या कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. कांदा निर्यात करणाऱ्या अलाना, बुखारी, जोब्सन्स, हिंदुस्थान अशा कंपन्या कांदा निर्यात करतात. आज जवळपास 76 देशांमध्ये हा कांदा निर्यात होतो, असे व्यापारी सांगतात. 

अर्थशास्त्रीय दृष्टिकोन 

अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठा यांना फार महत्त्व देण्यात येते. त्याचे कारण मागणी आणि पुरवठा यांच्यात उणे-अधिक झाले, तर कुठल्याही क्षेत्रातील वस्तूंच्या दरात घट वा वाढ होते. हा सरळ नियम कांद्याच्या बाजारपेठांना लागू होतो. मागणी वाढली तर भाव वाढतात आणि मागणी कमी तर भाव कमी. मागच्या दोन महिन्यांत कांद्याने सर्वसामान्यांना डोळ्याला पाणी आणले होते, तर केंद्र सरकारला हैराण करून सोडले होते. उत्पादन घटले म्हणून नैसर्गिक तुटवडा जाणवत होता, परिणामी भाव वाढले होते. लासलगावमध्ये 2018 च्या डिसेंबरमध्ये कांदा एक रुपया किलोने विकला जात होता. तेव्हा पुरवठा वाढला होता. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात असमतोल आला की, कांदाचे भाव पडतात किंवा चढतात. 

डॉ.गिरधर पाटील लिहितात, ‘‘भारतीय कांदापिकाचे अर्थकारण एवढे जबरदस्त आहे की, त्यावर देशाचे सारे सत्तेचे राजकारण चालते. त्याच्या उलाढालीची कल्पना करता येत नाही. कांदा हे पीक आपल्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे नगदी पिकांत अत्यंत बाजारस्नेही ठरले आहे. बाजारस्नेही म्हणण्याचे कारण- त्याची बारमाही उपलब्धता, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात खपाची निश्चिती, टिकाऊ व साठवणुकीची सुलभता, वाहतूकसुलभ व बाजारी हस्तक्षेपाला धार्जिणे असे कायदे आणि सरकारी धोरणे यामुळे कांद्याच्या व्यापारात एक स्वतंत्र अशी व्यवस्था तयार झाली असून, त्यात होणारी उलाढाल शोधता आली तर आजवरचे सारे आर्थिक घोटाळे फिके पडावेत, अशी स्थिती आहे.  कांद्याच्या अर्थकारणावर सरकारी धोरणांपासून ते छोट्या घटकापर्यंत अनेक घटक कमी-अधिक प्रमाणात अवलंबून आहेत. यातल्या प्रत्येक घटकाचा थेट संबंध येत नसला, तरीदेखील कांद्याच्या अर्थकारणामुळे या घटकांवर परिणाम होतो, हे मात्र लक्षात घ्यावे लागते. 

काय करणे अपेक्षित? 

सर्वच बाजारपेठेत प्रचंड अस्थिरता दिसून येते. अशा स्थितीत बाजारपेठांना स्थिरता प्रदान करून विकास करावयाचा असेल, तर एक बाजारपेठीय मार्ग स्वीकारणे आवश्यक असते. म्हणजे बाजारपेठांवर ज्या पद्धतीने सद्य:स्थितीत बाह्य घटकांचा परिणाम होतो, तो कमी करणे महत्त्वाचे असते. राजकीय दबावामुळे होणारे कारभार रोखले पाहिजेत. उपयुक्त माल म्हणून शेतमालाचे स्थान निर्माण करणे आवश्यक असते. त्यातून येणाऱ्या काळातले व्यवहार लक्षात घेऊन त्याची आखणी करावी लागते. भविष्यातले व्यवहार आताच केले गेले तर त्याकडे संशयाने पाहिले जाते, हा खरं तर यातला मोठा अडथळा आहे. बाजारपेठांची क्षमता वाढवण्यासाठी असे पर्याय पुढे आले पाहिजेत. शेतमालाची साठेबाजी होईल किंवा मालाचे भाव वाढतील, म्हणून नव्या पर्यायांचा अवलंब केला जात नाही. 

ग्रामीण भागातील आठवडी बाजार हे ग्रामव्यवस्थेच्या आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. गावातले काही शेतकरी याच बाजारपेठांत आपला माल विकायला घेऊन जातात. देशभरात किमान चाळीस हजार आठवडी बाजार असतील. कांद्याच्या अनुषंगाने विचार करता, या स्थानिक बाजारपेठांचा विकास घडून आणणे फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कार्यरत होऊ शकते. 

भारतातील ग्रामीण भाग आजही कच्च्या रस्त्याने जोडलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील भागातून फिरताना कच्च्या रस्त्यांची समस्या लक्षात आली. शेतकरी भरघोस उप्तन्न काढतात. पण माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवताना त्यांची प्रचंड ओढाताण होत असते. पावसाळ्यात अशा रस्त्याने माल नेणे जिकरीचे असते. अशा रस्त्याने कांदा हे नाशवंत पीक घेऊन जाताना त्यातला बराच माल दबून खराब होतो. अनेक अडचणींना तोंड देत शेवटी बाजारपेठेत माल पोहोचवला जातो. पण तिथे कुठल्याच प्रकारची सोय नसते. भर उन्हाळ्याच्या दिवसांत माल विक्रीसाठी आणला जातो. शेतकरी उन्हात दिवसभर उभे असतात. आठवडी बाजारात असो वा बाजार समित्यांमध्ये- आमच्या या अवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेल्याचे शेतकरी सांगतात. 

सारांश 

कांदा हे नगदी पीक आहे. त्यामुळे त्याचे बाजारपेठीय दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. शेतकऱ्यांचा स्थानिक बाजारपेठाशी थेट संबंध असतो. प्राथमिक स्तरावरून हळूहळू वर जाताना बाजारपेठांची रचना बदलत जाते. आठवडी बाजारापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंतची रचना शेतकऱ्यांना नियंत्रित ठेवणारी असते. व्यापारी आणि छोटे-मोठे दलाल यांचे हितसंबंध प्राथमिक स्तरावर गुंतलेले असतात. त्यामुळे या स्तरावर कमी-अधिक शेतकऱ्यांचे शोषण होते. 

ठरावीक काळात कांद्याला तेजी असते. हा कालावधी अगदीच एक महिना किंवा फार तर दोन महिन्यांचा असतो. अशा वेळी शेतकऱ्यांचे भले होईल, अशी आशा असते. पण बाजारपेठांवर सरकारी नियंत्रण असल्यामुळे भाव पाडण्यासाठी सरकार पावले उचलत असते. लासलगाव ही भारतातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ आहे. निर्यातक्षम अशी बाजारपेठ असल्यामुळे मोठी उलाढाल इथे होत असते. मात्र यात शेतकऱ्यांऐवजी व्यापारी वर्गाला त्याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसते. 

एकूण, सरकारी धोरणांच्या पातळीवर बाजारपेठांविषयी अशाच प्रकारची उदासीनता दिसून येते. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचे एकहाती नियंत्रण आहे. त्याला अर्थातच सरकारी धोरणे जबाबदार आहेत. कांदा लिलाव करायचा की नाही आणि कांद्याला किती भाव द्यायचा, अशा अनेक मुद्यांवर व्यापारी अरेरावी करतात. कांद्याचे अर्थकारण लक्षात घेता, तिथेही मागणी आणि पुरवठ्यांची समीकरणे बहुतांश जुळत नाहीत. एकूणच या संपूर्ण साखळीत शेतकरी पिळला जातो. शेतकरी आणि शेती प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणे, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. 

(‘कांद्याची कैफियत’ हा पाच भागांतील दीर्घ लेख क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. हा लेख ‘रानडे इन्स्टिट्यूट, पुणे’ यांच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाला सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे. - संपादक)     

Tags: निर्यातबंदी कांदा शेती कांद्याची कैफियत धनंजय सानप कांद्याचा इतिहास महाराष्ट्र कृषी history of onion Maharashtra and onion farming agriculture Dhananjay sanap on kanda onion साधनासाप्ताहिक साधना विकलीसाधना Sadhana Sadhanasaptahik weeklysadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

धनंजय सानप
dhananjaysanap1@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके