डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

नव्या अध्यक्षांच्या हाती सूत्रे देताना आपण वर्षभरात काय केले, याचा आढावा माजी अध्यक्षांनी घेतला पाहिजे. वर्षभरात झालेल्या साहित्यिक घडामोडींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असली पाहिजे. तशी कुवत व इच्छा असणाऱ्यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे.

मागे मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली होती. त्यामागची माझी काय भूमिका होती; आणि यापुढे मी अध्यक्ष झालो, तर माझ्यापुढे कोणत्या योजना आहेत, असे प्रश्न संपादकांनी विचारले आहेत. त्या अनुषंगाने माझे काही विचार मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच.

गेली 45 वर्षे मी पुस्तकांच्या जगात वावरतो आहे. महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे नेकीने अध्यापन करताना आणि प्राचार्यपद सचोटीने सांभाळताना साहित्यावर अपरंपार प्रेम करीत आलो. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे' ही समर्थांची शिकवण निष्ठेने जपली. जोपासली. साने गुरुजींपासून जी.ए.नि केशवसुतांपासून नारायण सुर्वेंपर्यंत, सर्व आवडत्या लेखकांची पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय ठेवली. कुवतीनुसार लेखन केले. अनेक पुरस्कार मिळाले. एकविसावे ‘गोमंतक मराठी साहित्य संमेलन', 'ठाणे जिल्हा साहित्य संमेलन' यांची अध्यक्षपदे लाभली. अखिल भारतीय पातळीवर भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याशिवाय मनात घोळणाऱ्या अनेक योजना पार पाडता येणार नाहीत, अशी माझी खात्री झाली. हे पद भूषविण्यात सन्मान तर आहेच; त्याचबरोबर काही भरीव सांस्कृतिक कार्य करण्याच्या दृष्टीने ती फार मोठी संधीही आहे.

याच भूमिकेतून मी नगरला भरणाऱ्या संमेलनासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले. वास्तविक श्री. दया पवार यांची अध्यक्षपदासाठी मी सूचक म्हणून शिफारस केली होती. दुर्दैवाने त्यांचे अकस्मात निधन झाले आणि नगरच्या मंडळींच्या आग्रहामुळे मी ऐन वेळी उभा राहिलो. अगदी थोड्या मतांनी यश हुकले खरे, पण त्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया मला जवळून न्याहाळता आली.  'संमेलनाध्यक्ष म्हणजे अडीच दिवसांचा गणपती' असा प्रवाद आहे आणि तो अधिकाधिक पसरावा, यासाठी खुद्द अध्यक्ष कसोशीने प्रयत्न करत असतात! खुल्या अधिवेशनानंतर संमेलनाचे सूप वाजले की नव्या अध्यक्षाच्या हाती (नसलेली) सूत्रे देईपर्यंत संमेलनाध्यक्ष सत्काराचा स्वीकार करीत, शाली गोळा करीत फिरत असतात. मराठी साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन व्हावे म्हणून ज्या ज्या चळवळी होतात, तिकडे अध्यक्ष फिरकतसुद्धा नाहीत. साहित्याचा एक उपासक या नात्याने प्रथमपासून अशा चळवळीत माझा सक्रिय सहभाग असतो. 'सखाराम बाईंडर', 'वासना कांड' नाटकांसंबंधाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार असो; पुलंचा जाहीररीत्या अधिक्षेप केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचा निषेध असो; किंवा मराठीला माहिती तंत्रज्ञान विषयाचा पर्याय देण्यास विरोध असो, मी उघडपणे मराठी भूमिका मांडली आहे. अध्यक्ष झालो म्हणजे तत्सम चळवळीत अधिक नेटाने भाग घेता येईल असे मला वाटते. मराठी अस्मितेला जेव्हा धक्का लागत असतो तेव्हा त्याची जागरूकपणे दखल घेणे, हे अध्यक्षाचे आद्य कर्तव्य आहे, असे माझे मत आहे.

संमेलनावर होणाऱ्या खर्चात गेल्या काही वर्षांत भरमसाट वाढ झाली. साहजिकच भरघोस शासकीय अनुदान मिळविण्यासाठी आयोजकांना लाचार व्हावे लागते; भिक्षुकी वृत्ती अंगी बाणवावी लागते. खरे पाहता महामंडळाचे अध्यक्ष डॉ.गं.ना.जोगळेकर यांचा आग्रह झुगारून देऊन, 'खाष्ट सासू' अशी त्यांची संभावना करून शिक्षणमंत्र्यांनी मराठीला माहिती तंत्रज्ञान विषय पर्याय म्हणून ठेवण्याचा आपला हट्ट कायम ठेवला आहे. निषेध म्हणून शासकीय अनुदान नाकारण्याचा 'बाणेदारपणा' महामंडळाला परवडणारा नाही. कारण संमेलनाचा अतोनात खर्च. मोठा गाजावाजा करून निर्माण केलेल्या महाकोषात तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे. एकीकडे अधिकाधिक रक्कम गोळा करत असताना दुसरीकडे संमेलनात अनेक बाबींवर निष्कारण होणाऱ्या खर्चाला कात्री लावली पाहिजे. 1981 साली भरलेल्या समांतर संमेलनाचा मी कोषाध्यक्ष होतो. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संमेलन आजच्या इतक्याच थाटामाटात कसे साजरे करता येईल याविषयीच्या त्यावेळी संकल्पिलेल्या माझ्या काही योजना अध्यक्ष झाल्यास मला प्रत्यक्षात आणता येतील. शासनावर फारसे विसंबून न राहणे अंतिमतः दूरदर्शीपणाचे ठरणार आहे. आपल्या वागण्या-बोलण्यातील कणखरपणा यामुळे शाबूत ठेवता येतो.

बरीच वर्षे एक गोष्ट माझ्या मनात रेंगाळत आहे. 'छंद', अभिरुची', 'सत्यकथा' यांनी सुरू केलेली वाङ्मयीन नियतकालिकांची उज्ज्वल परंपरा गेली अनेक वर्षे खंडित झाली आहे. सांस्कृतिक अभिवृद्धीसाठी अशा नियतकालिकांची नितांत गरज आहे. नव्या वाङ्मयीन प्रवाहांचे स्वागत करणारे, नवनिर्मितीला पोषक असणाऱ्या चिकित्सक समीक्षेला वाव देणारे, वाङ्मयीन नियतकालिक महामंडळाने सुरू करावे, असे मला नेहमीच वाटते. संमेलनानंतर जी शिल्लक रक्कम राहील तिचा विनियोग या कामासाठी करता येईल. त्या त्या वर्षाचा अध्यक्ष संपादक म्हणून काम पाहील वा सल्लागार म्हणून राहील. असे नियतकालिक निघू लागले तर संमेलनाचे ते चिरस्थायी योगदान ठरेल.

शासन प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मितीला पुरस्कार देते आणि लेखकांचा गौरव करते, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. (शासनाकडून अनुदान घेताना सावध राहिले पाहिजे. पुरस्कार घेण्यात गैर काही नाही. तज्ज्ञांच्या शिफारशींनुसार पुरस्कार दिले जातात आणि ते दर्जेदार पुस्तकांसाठी असतात, हे महत्त्वाचे. ) लेखकांचा गौरव करताना प्रकाशकांचीही दखल घेतली पाहिजे. चांगली पुस्तके प्रकाशित करणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. एक मार्ग मला सुचतो. पुरस्कारप्राप्त पुस्तकाच्या दोन-तीनशे प्रती शासनाने आपल्या ग्रंथालयासाठी खरेदी करायला हव्यात. त्यामुळे प्रकाशकांचा सन्मान होईल आणि वाचकांनाही उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळतील. संमेलनाध्यक्षांची निवड ज्या पद्धतीने होते, त्यावर नेहमीच टीका होते. सध्या अंदाजे 480 मतदार मतदान करतात आणि अखिल भारतीय संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. ही सर्वच प्रक्रिया अशा तऱ्हेने हाताळली जाते की निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होऊच शकत नाही. आरोपप्रत्यारोपांना ऊत येतो आणि उमेदवारांच्या मनात एकमेकांविषयी कटुता निर्माण होते. हे सर्व टाळावयाचे असेल तर एखादी पर्यायी पद्धत शोधून काढायला हवी. दहा वर्षांपूर्वी महामंडळाने अनेक साहित्यिकांकडून या विषयावर सूचना मागवल्या होत्या. पुढे त्याचे काय झाले याची कुणालाच कल्पना नाही! या महत्त्वाच्या मुद्यांचा पुनर्विचार झाला पाहिजे. साहित्यबाह्य कारणांमुळे बुजुर्ग व्यक्तींची मने दुखावणार असतील तर संमेलनाचा खटाटोप करायचा तरी कशासाठी?

'कोकण मराठी साहित्य परिषद' आपल्याला स्वतंत्र अस्तित्व मिळावे, यासाठी सातत्याने मागणी करत आहे. आज 480 मतदारांपैकी एक-दोन मतदारच कोकण भागातील आहेत. कोकणाला मोठे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. या संदर्भात काही करता येईल काय, हे पाहिले पाहिजे.

कधी अध्यक्षपद मिळाले तर ही सर्व वा यांपैकी बरीच कामे हाती घेण्याचा माझा मानस आहे. रसिकांनी आणखी काही सूचना केल्या तर त्यांचाही विचार करता येईल. नव्या अध्यक्षांच्या हाती सूत्रे देताना आपण वर्षभरात काय केले याचा आढावा माजी अध्यक्षांनी घेतला पाहिजे. वर्षभरात झालेल्या साहित्यिक घडामोडींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असली पाहिजे. तशी कुवत व इच्छा असणाऱ्यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, असे माझे स्पष्ट व प्रांजळ मत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, उद्घाटक यांच्यापेक्षा संमेलनाध्यक्षांचे स्थान मोठे व अधिक महत्त्वाचे आहे यावी जाण त्यांना असायला हवी की नको?

Tags: दया पवार गोमंतक मराठी साहित्य संमेलन सुभाष भेंडे Daya Pawar gomantak Marathi Sahitya Sammelan Subhash bhende weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुभाष भेण्डे

लेखक, कादंबरीकार, नाटककार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके