डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मनमोहनांची कविता आपल्याला कोणत्या कारणांसाठी महत्त्वाची व अर्थपूर्ण वाटते हे सांगताना शंकर वैद्य यांनी म्हटले आहे, ‘ज्ञानेश्वरानंतरच्या काव्यातील प्रस्थापित कालनियमांचा छेद देत तुकाराम-रामदास प्रकटावेत यात जे औचित्य आहे, तेच फडके-खांडेकर यांच्या कादंबरीच्या काळाला बिलगून केतकर-जोशी असावेत यामध्येही आहे. केशवसुत ते मर्ढेकर या मधल्या काळात त्या औचित्याच्या तालाचा एक ठेका मोजावचा राहूनच जात होता. तो ठेका म्हणजेच मनमोहनांची कविता आहे.

जयवंत दळवी म्हणायचे, ‘प्रत्येक पुस्तक आपल्याबरोबर नशीब घेऊन येत असतं. परिणामी, एखादं सुमार पुस्तक विलक्षण गाजतं आणि एखाद्या दर्जेदार पुस्तकाकडे वाचकाचं लक्षही जात नाही!’ पुस्तकाच्या बाबतीत हे जितकं खरं, तितकं लेखकांच्या बाबतीतही खरं.. साहित्यक्षेत्रात अनेकदा गुणवत्ता असलेल्या लेखकाकडे समीक्षकांचं, सर्वसामान्य वाचकांचं दुर्लक्ष होतं. चमकदार प्रतिभा असूनही तो विस्मृतीच्या पडद्याआड जातो. नव्या पिढीला त्याचं नावही ठाऊक नसतं. कधी नाव कानावरून गेलं असलं तरी त्याचं साहित्याला नेमकं योगदान काय, याची कल्पना नसते.

अफाट कल्पनाशक्ती असलेल्या कवी मनमोहन यांची आठवण झाली की मला मनोमन अचंबा वाटतो. क्षीण प्रतिभाशक्ती असलेले कवी मानानं मिरवतात आणि ‘युगायुगांचे सहप्रवासी’ यासारखं अचाट प्रतिभाशक्तीनं भारावलेलं दीर्घकाव्य शब्दबद्ध करणाच्या, अविस्मरणीय स्फुट कविता लिहिणाऱ्या मनमोहन या बंडखोर कवीची उपेक्षा होते. यामधील विरोधाभास कसा समजून घ्यायचा ? रविकिरण मंडळाच्या नंतरच्या काळात, मराठी कवितेत सांकेतिकतेला ऊत आला होता. नावीन्याचा अभाव, तत्कालीन कवींची आत्मसंतुष्ट वृत्ती याचा उपहास करणारी कविता मनमोहन यांनी प्रारंभीच्या काळात लिहिली. त्यावेळी अनेक कवींना ‘राजकवी’ पद मिळालं होतं. राजेरजवाड्यांना खूष करण्यासाठी कवींनी आपली लेखणी झिजवू नये असं त्यांचं मत होतं. म्हणून स्वत:ला ते ‘लोककवी मनमोहन’ म्हणवून घेऊ लागले. (मूळचं नाव गोपाळ नरहर नातू) खांडेकरांसारख्या लेखकानं ‘अमुक कवी श्रेष्ठ’ असं म्हटलं की विभूतिपूजक मराठी रसिक त्या सामान्य कबीला डोक्यावर घेतात, असं मनमोहन बोलत. ते कडवटपणे म्हणतात, ‘अशा मराठीत महाकवी जन्माला येणारच कसा ? महाकवी जन्माला याया मराठीचे गर्भाशय कोते!’ अशा या महाराष्ट्रात आपण कवी म्हणून जन्माला आलो याची त्यांना खंत वाटते. ‘माझ्या कच्च्या बच्चांनो’ या एका कवितेत त्यांनी आपल्या मुलांना उद्देशून म्हटलं आहे.

सदुसष्ट जन्मांचे पाप माझे, फेडले मी ‘कवी’ इथे होऊन ना मान! ना धन! ना लौकिक! मुलांनो, कवी नका होऊ. कविता हा तरल आणि महान साहित्यप्रकार आहे, याची त्यांना जाण आहे. आपल्या विपूल काव्यलेखनातून चार ओळी जगतील की नाही, याची त्यांची त्यांनाच शंका वाटते.

कवितेचा गौरव करताना ते नम्रपणे म्हणतात ‘मी मोठा शिल्पकार नाही; मी एक वडारी आहे. या सारस्वताच्या नदीला छोटा घाट बांधण्यासाठी मी तिच्या किनाऱ्यावरचीच दगडमाती घेतली आहे. यात मी केले ते एवढेच की या मातीचा चिखल व्हावा म्हणून मी अंत:करणात ओलावलो’. संतकवी सोहिराबनाथ अंबिये म्हणतात, ‘अनुभवावीण मान डोलवू नको रे’. अनुभवाचे महत्त्व मनमोहन कवींना ठाऊक होते. ‘प्रारंभी डोंगर हवा. मग अजंठा कोरता येईल’ असं ते म्हणतात.

‘राजहंस माझा निजला’ या सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेल्या कवितेमुळे ते एकदम प्रकाशात आले. या दीर्घकाव्याचा हिंदी अनुवाद ‘मार्शल की सलामी’ या नावानं प्रसिद्ध आहे. 1926 ते 1936 या दहा वर्षांत त्यांचे नऊ संग्रह प्रसिद्ध झाले. विपुल लेखन मोठ्या उत्साहानं करीत असताना नऊ वर्षे त्यांनी लेखन थांबवल्याचे दिसतं. ‘युगायुगांचे सहप्रवासी’ हे त्यांचं दीर्घकाव्य मुंबईत होणाऱ्या हिंदू-मुसलमानांच्या दंग्यातले भीषण नाट्य टिपणारं आहे. ‘कविता वर्तमानात समरसली पाहिजे’ ही मनमोहनांची भूमिका त्या काव्यामुळे स्पष्ट झाली असून ‘संज्ञाप्रवाहाचे चित्रण करणारे मराठीतील हे पहिलेच काव्य असल्याने ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे’ असं प्रा.शंकर वैद्य म्हणतात. मनमोहनांच्या निवडक स्फुट कवितांचा संग्रह ‘आदित्य’ 1971 मध्ये प्रकाशित झाला. या संग्रहाला शंकर वैद्य यांची दीर्घ प्रस्तावना आहे.

मनमोहनांनी आपल्या कवितेत सामाजिक क्षेत्र आणि काव्यक्षेत्र यातील दोषांविरुद्ध नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. सुभाषचंद्र बोस, सावरकर यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांमुळे ते भारावलेले दिसतात, त्याचप्रमाणे गांधीजींच्या व्यक्तित्वातील आध्यात्मिक गुणांचे त्यांना आकर्षण वाटते. त्यावेळी प्रचलित असलेल्या गांधी-सावरकर साम्यवादी अशा सर्वच विचारसरणीतील पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर बसल्याचे दिसते. उद्बोधनाबरोबरच रंजन करणारी मनमोहनांची कविता, चमकदार कल्पनांनी लक्ष वेधून घेते. वाचनीयता हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे असं म्हणता येईल.

मी पुण्याला एम.ए. करीत होतो, त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरे होत असत. रात्री नऊनंतर पुण्याच्या अनेक चौकात नामवंत कलावंत संगीत, नृत्य, नकला असा करणमुकीचा कार्यक्रम सादर करीत. भीमसेन जोशी, हिराबाई, माणिक वर्मा, बिसमिल्ला खान यांसारखे दिग्गज मंडपासमोरच्या व्यासपीठावर शास्त्रीय संगीत, नाट्यगीतं, भावगीतं पेश करीत. आम्ही काही मित्रमंडळी तीनचार ठिकाणी आपली हजेरी लावत असू. लोकप्रिय भावगीतगायक गजानन वाटवे यांच्या कार्यक्रमाच्या जागी आमची पावलं अंमळ अधिक वेळ रेंगाळत. मनमोहनांची दोन भावगीते ते हमखास म्हणत. दोन्ही गाणी वेगळ्या धर्तीची, अगदी वेगळ्या विषयांवरची.

पहिलं होतं, ‘कसा ग गडे आला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा ?’ त्या काळात ते अत्यंत गाजलेलं गीत.
पुढल्या पंक्ती अशा...
पृथ्वीच्या पेल्यात गाळिली रजनीच्या बागेतील द्राक्षे 
भुलवून तुजला वनात नेली 
रसरसलेली रात्र रंगली - 
वाजविता बासरी, कचपाशाचा नाग उलगडा फणा ।
त्यानंतर पुढं वाटवे मनमोहनांची दुसरी रचना म्हणत...

ती पहा, ती पहा, बापूजींची प्राणज्योती 
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती

वाटवे यांनीच या गीतांना चाली दिल्या होत्या. दोन्ही गीत ते तन्मयतेनं म्हणत.

झुंजला राजासवे हा, रंगला रंकासवे हा 
पेटता देहेही आता, दिव्यता दाबून जाती 
नाव ज्याचे ऐकुनिया थरकली सिंहासने 
ना धरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी

अशा या सहजसुंदर पंक्ती अनेकांना त्या काळी मुखोद्गत होत्या.

पुण्याच्या ‘वसंत व्याख्यानमाले’ त मनमोहनांचे ‘कवी आणि काव्य’ या विषयावर भाषण ऐकायचा एकदा योग आला. त्यापूर्वी काही दिवस त्यांची पत्नी निवर्तली होती. केवळ घोतर नेसून, धोतराचा सोगा छातीभोवती गुंडाळून ते आले होते. कवी हा टाळूवरील जखमेसाठी तेलाची याचना करीत फिरणाऱ्या अश्वत्थाम्यासारखा असतो, असं ते सांगत होते. कविता ही अशी तरल, सौंदर्यपूर्ण असते की तिला शीर्षक चिकटवणं म्हणजे कवितेच्या डोक्यावर हातोडा हाणून तिला टेंगूळ आणण्यासारखं आहे. असं गंमतीदार विधान त्यांनी केल्याचे आठवतं. काव्यनिर्मिती करणारा कवी हलाखीच्या अवस्थेत दिवस काढतो आणि प्रकाशक मात्र गाड्या उडवत असतात, असं सांगून ते त्यांच्या विशिष्ट शैलीत म्हणाले, ‘नवरा मुलगा फिरे नागडा । बँडवाला सूटात हिंडे । 

पुढल्या दोन ओळी म्हणून त्यांनी भाषण संपवलं...
शव हे कविचे जाळु नका हो । जन्मभरी तो जळतच होता 
फुलेहि त्यावरि उधळू नका हो । जन्मभरी तो फुलतच होता

मनमोहनांची कविता आपल्याला कोणत्या कारणांसाठी महत्त्वाची व अर्थपूर्ण वाटते हे सांगताना शंकर वैद्य यांनी म्हटले आहे, ‘ज्ञानेश्वरानंतरच्या काव्यातील प्रस्थापित कालनियमांचा छेद देत तुकाराम-रामदास प्रकटावेत यात जे औचित्य आहे, तेच फडके-खांडेकर यांच्या कादंबरीच्या काळाला बिलगून केतकर-जोशी असावेत यामध्येही आहे. केशवसुत ते मर्ढेकर या मधल्या काळात त्या औचित्याच्या तालाचा एक ठेका मोजावचा राहूनच जात होता. तो ठेका म्हणजेच मनमोहनांची कविता आहे.

Tags: बिसमिल्ला खान माणिक वर्मा हिराबाई भीमसेन जोशी रामदास तुकाराम मर्ढेकर केशवसुत मनमोहन साहित्य मराठी कविता marathi poetry marathi kavita subhash bhende manmohan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुभाष भेण्डे

लेखक, कादंबरीकार, नाटककार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके