डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सामाजिक जाणीवेचे अधिक संमिश्र स्वरूप 'यंत्रावतार', 'ती जनता अमर आहे' या कवितांमध्ये आहे. 'तेच ते' सारखी विनोदगर्भ उपहासिका किंवा 'धृपद' संग्रहातील 'आततायी अभंग सारख्या उपहासगर्भ कविता या सामाजिक जाणीवेचीच अधिक प्रगत अवस्था. विदांची कविता म्हणजे शंभर नंबरी सोने. परंपरा आणि नवता यांची सुरेख सांधेजोड त्यांच्या काव्यरचनेत दिसते. त्यांच्या कवितेत जाणवणारा जोश, विमुक्तपणा, अवखळपणा, मिस्किलपणा तिचा स्वत:चा आहे. 'उथळ व उठवळ' असे त्यांनी काही लिहिले नाही. स्वत:च्या निर्मितीकडे कठोरपणे, अलिप्तपणे पाहून जे कमी दर्जाचे वाटले ते त्यांनी बाजूला ठेवले. 'विरुपिका', 'तारुचित्रे', 'मुक्त सुनिता' सारखे वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार त्यांनी निर्माण केले.

विदांनी २३ ऑगस्ट रोजी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली. कोल्हापूरला इंग्रजी पाचवीत असताना विंदा करंदीकर कविता लिहायला लागले. खिशात मावण्याएवढ्या छोट्या वहीत काही स्फुट कविता त्यांनी लिहिल्या होत्या. एका कवितेत त्यांनी लिहिलं होतं; 'गरीब बिचारा शेतकरी । करी शिळी चत्कोर भाकरी । घेउनि मेरेवरी बैसला । अश्रू ढाळीत।'

कोवळ्या वयात प्रगट झालेली ही सामाजिक जाणीव त्यांच्यानंतरच्या काव्यलेखनातून सतत प्रगट झालेली दिसते. मृदगंध' या त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहातील 'माझ्या मना बन दगड या गाजलेल्या कवितेत ते म्हणतात..

हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, 
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय, 
कुडकुडणारे हे जीव 
पाहू नको! डोळे शीव! 
नको पाहू जिणे भकास; 
ऐन रात्री होतील भास; 
छातीमध्ये अडेल श्वास, 
विसर त्याना, दाब कढ; 
माझ्या मना बन दगड!

सामाजिक जाणीवेचे अधिक संमिश्र स्वरूप 'यंत्रावतार', 'ती जनता अमर आहे' या कवितांमध्ये आहे. 'तेच ते' सारखी विनोदगर्भ उपहासिका किंवा 'धृपद' संग्रहातील 'आततायी अभंग सारख्या उपहासगर्भ कविता या सामाजिक जाणीवेचीच अधिक प्रगत अवस्था. विदांची कविता म्हणजे शंभर नंबरी सोने. परंपरा आणि नवता यांची सुरेख सांधेजोड त्यांच्या काव्यरचनेत दिसते. त्यांच्या कवितेत जाणवणारा जोश, विमुक्तपणा, अवखळपणा, मिस्किलपणा तिचा स्वत:चा आहे. 'उथळ व उठवळ' असे त्यांनी काही लिहिले नाही. स्वत:च्या निर्मितीकडे कठोरपणे, अलिप्तपणे पाहून जे कमी दर्जाचे वाटले ते त्यांनी बाजूला ठेवले. 'विरुपिका', 'तारुचित्रे', 'मुक्त सुनिता' सारखे वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार त्यांनी निर्माण केले. अन्य कवींनी रूढ केलेले अभिव्यक्तीचे प्रकार यशस्वीपणे वापरून झाल्यावर विंदांनी 'अजिबात वेगळे अनुभव, अजिबात वेगळी हत्यारे' यांचा स्वतंत्र शोध घेतला. त्यांच्या कवितेने 'रिस्क' घ्यायला कधी मागे-पुढे पाहिले नाही, उडी मारताना ती पेलेल की नाही याचा सावध हिशेब कधी केला नाही. 'प्रयोगशील अपयशाला सराईत यशापेक्षा अधिक तेज असते' ही खूणगाठ सदैव मनाशी बाळगली. 

विंदांचे मोठेपण असे की १९८१ साली 'विरुपिका' हा पाचवा संग्रह असताना त्यांनी काव्यक्षेत्रातील निवृत्तीबाबत घोषणा केली. त्यांनी नमूद केले, 'कवीप्रमाणेच कवीची प्रतिभाही मर्त्य असते... कधी तो आधी जातो, कधी ती आधी जाते.' पस्तीसएक वर्षे एका मस्तीत काव्यनिर्मिती करणाऱ्या विंदांना प्रकर्षाने वाटू लागले, 'काव्याच्या क्षेत्रात माझ्या हातून थोडंफार होण्यासारखं आहे ते होऊन गेलं, आजवर जे लिहिलं त्याहून अर्थवाही मूल्यगर्भ जे मलाच केले पाहिजे असं माझ्या हातून काहीही होईल असं मला वाटत नाही.' तेव्हा त्यांनी शांतपणे लेखणी खाली ठेवली. कसलेही मोठे आकर्षण, कसलाही जबरदस्त मोह त्यांना त्यांच्या या निश्चयापासून परावृत्त करू शकला नाही. अपवाद चार वर्षांपूर्वी प्रकाशित असलेल्या 'अष्टदर्शने' या छोट्या पुस्तकाचा. मराठी वाचकांना देकार्त, स्पिनोझा, कान्ट, हेगेल, शोपनेर, नित्से आणि बर्गसा या सात पाश्चात्य आणि चार्वाक या भारतीय तत्त्वज्ञान आणि त्यांच्या विचारांची ओळख करून देण्याच्या हेतूने विंदांनी 'अभंग रचनाप्रकाराचा अवलंब करून 'अष्टदर्शने' निर्मिले. आशयदृष्ट्या सखोल असा हा उपक्रम. 

विंदांसारखे मोठे कवी वाचकसापेक्ष व समूहसापेक्ष अशा दोन्ही यशाची सारखीच कदर करत असल्याने मराठी कविता सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोचली. विजया राजाध्यक्ष यांनी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखत ते म्हणतात, 'काव्य वाचकांपर्यंत पोचवण्याचा मार्ग म्हणजे कविता मासिकात छापणे, पण संपादकाचा काही भरवंसा नसतो. 'स्वेदगंगा' ही माझी सुरुवातीची एक गाजलेली कविता ते माक्क्सिस्ट आहे या सबबीखाली 'किर्लोस्कर ने परत पाठविली होती. दुसरं उदाहरण 'दातापासून दाताकडे' या पुढील प्रगत अवस्थेत लिहिलेल्या कवितेचं, ती 'सत्यकथे'कडून परत आली! आपली नवी कविता मासिकांमार्फत लोकांपर्यंत पोहोचेलच असा विश्वास या अनुभवांमुळे नव्हता!' काव्यवाचनाद्वारे लोकांपर्यंत कविता पोचवण्याचा वसा त्यांनी, पाडगावकर आणि बापट यांनी घेतला. महाराष्ट्रातील दूरदूरच्या खेडोपाडी, शहरात त्यांनी आपल्या कविता पोचवल्या आणि मराठी समाजात सांस्कृतिक चैतन्य निर्माण करण्याच्या कामी फार मोठं योगदान केलं.

'ज्ञानपीठ' हा विंदांना मिळालेल्या संख्या पुरस्कारांचा परमोच्च बिंदू. त्यापूर्वी त्यांना लाख, दीड लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले. त्या सर्व रकमा त्यांनी शांतपणे, गाजावाजा न करता सेवाभावी संस्थांना, भूकंपग्रस्तांना वाटून टाकल्या. उत्कृष्ट अनुवादाचे पारितोषिक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ठेवले. मराठी लेखकाने एकतरी पुस्तक अनुवादित करून मराठीत आणायला हवे असे 'फाऊस्ट', 'किंग लियर' या ग्रंथांचे अनुवाद करणाऱ्या विंदांना मनापासून वाटते. 

विंदा ‘ज्ञाता दशसहस्त्रेषु' नव्हे, दशलक्षेषु आहे, असे वसंत बापट यांनी म्हटले आहे. बापट पुढे म्हणतात, 'आपल्या जीवनात तो कधी सरपटला नाही, बुळबुळीत अंगात निसटला नाही, स्वार्थानं चळला नाही आणि भयानं थरथरला नाही.' विंदा नऊ दशके आपला आब राखून जगले. ते शतायु होवोत अशी प्रार्थना प्रत्येक मराठी माणूस करील .

Tags: मराठी साहित्यिक कविता तेच ते' विंदा करंदीकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुभाष भेण्डे

लेखक, कादंबरीकार, नाटककार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके