डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजची अवस्था पाहून मनाला वेदना होतात!

आपण संपादकीयात 'साहित्य संस्कृती मंडळा’ची दखल घेतलेली दिसत नाही. मंडळाची 'दशा आणि दिशा' याहून वेगळी नाही. प्रा. रा. रं. बोराडे यांना ज्या अवमानकारक रीतीनं अध्यक्षपद सोडावं लागलं त्याचा निषेध वृत्तपत्रांनी केल्याचे मला आठवत नाही.

‘मराठीच्या कक्षा रुंदावणार तरी कशा?' या 4 फेब्रुवारीच्या 'साधना'तील अतिथी संपादकांच्या 'संपादकीया'त आपण मराठीच्या शिलेदारांच्या नैतिक बलांचा परामर्श घेतला आहे. 

प्रा. रा. ग. जाधव यांनी 'विश्वकोश’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा साहित्य- संस्कृतीचे ओझे वाहणाऱ्यानी शासनाला जाब विचारायला हवा होता असं आपण नमूद केलं आहे. म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं? निषेध करून भागलं असतं? प्रा. जाधव यांनी 'सुस्तावलेल्या शासनयंत्रणेला हलवू शकत नाही' म्हणून कंटाळून राजीनामा दिला. आमच्यासारख्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निषेध व्यक्त केल्यावर शासनयंत्रणा खडबडून जागी झाली असती, असं आपल्याला वाटतं काय? श्रीकांत जिचकार यांचं निधन झाल्यावर दोन वर्ष विश्वकोशच्या अध्यक्षपदी कोणीही नव्हतं. या संदर्भात मी स्वतः दोन पत्रे वृत्तपत्रांत लिहिली - अनेक अग्रलेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. पण लक्षात कोण घेतो?

विजया वाड यांच्या नेमणुकीनंतर चोहोकडून वादळ उठलं. दरम्यान 'जी.आर.' निघाला होता. अशा नियुक्त्यांमागे एक तर वैयक्तिक संबंध असतात; वा राजकारणी समीकरणं असतात. त्यांच्या नेमणुकीविरुद्ध टीका झाली म्हणून शासन तडकाफडकी ती रद्द करील, इतकं शासन संवेदनशील आहे असा गैरसमज करून घेऊ नका. लागेबांधे अधिक महत्त्वाचे ठरतात. शासन इतकं कोडगं की संमती न घेता 'विश्वकोश मंडळा’च्या सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली.

माझे काही मित्र म्हणाले, 'आमची सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचं वृत्तपत्रांत वाचलं! आम्हांला अधिकृत पत्र आलेले नाही. त्यामुळे राजीनामा पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून महाराष्ट्रातील तमाम विचारवंत लालचावलेले असतात, असं शासनानं का गृहीत धरावं? अनेकांनी राजीनामे दिले ते शासनाच्या या दृष्टिकोनाचा निषेध म्हणूनच.

आपण संपादकीयात 'साहित्य संस्कृती मंडळा’ची दखल घेतलेली दिसत नाही. मंडळाची 'दशा आणि दिशा' याहून वेगळी नाही. प्रा. रा. रं. बोराडे यांना ज्या अवमानकारक रीतीनं अध्यक्षपद सोडावं लागलं त्याचा निषेध वृत्तपत्रांनी केल्याचे मला आठवत नाही. ('साधना'नं केला होता का, हे स्मरत नाही.) मंडळाचं अध्यक्षपद दोन वर्ष रिक्त ठेवल्यावर डॉ. यू. म. पठाण यांची दीड-दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली. दोन वर्ष मंडळाचं काम ठप्प होतं. (विश्वकोश कार्यालयाची हीच अवस्था.)

मी डॉ. पठाणांना अभिनंदनाचा दूरध्वनी केला, तर त्यांना अधिकृतरीत्या काहीच कळवलं गेलं नव्हतं! मी मागील आठवड्यात मंडळाच्या कार्यालयात दूरध्वनी करून 'डॉ. पठाण कधी येणार आहेत?' असं सचिवांना विचारलं, तर त्यांना काहीही माहिती नव्हती. त्यानंतर दोन दिवसांनी डॉ. पठाणांनी राजीनामा दिला. मंडळाच्या सदस्यपदी ज्यांच्या नियुक्त्या झाल्या, त्यांच्यापैकी कोणी पद स्वीकारली, कोणी नाकारली, याची माहिती कुणाकडेच नाही! नव्या अध्यक्षाची शोधाशोध किती वर्ष चालू राहणार हे सुस्त शासनच जाणे!

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या साहित्यसंस्कृतीचे संवर्धन व्हावे. मराठी माणसाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध व्हावे या उदात्त हेतूने यशवंतरावांनी मंडळाची निर्मिती केली. विद्वान, सव्यसाची बुजुर्गाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संस्कृती मंडळाची, विश्वकोशाची वाटचाल चालू राहिली. मात्र गेली दोन वर्ष दोन्ही संस्थांची कामं कुंठितावस्थेत आहेत.

अध्यक्ष आणि सल्लागार समिती नसल्यामुळे साहित्य संस्कृती मंडळाच्या योजना अपूर्णावस्थेत आहेत. शासनाला साहित्य संस्कृतीच्या जपणुकीची आच असती तर या सांस्कृतिक कार्यांना निर्नायकी अवस्थेत निपचित पडावे लागले नसते. सत्ताधाऱ्यांचे अग्रक्रम वेगळे असतात, त्यांच्या आस्थेचे विषय निराळे असतात. सदैव दिल्लीकडे कान देऊन असलेल्या शासनाच्या दृष्टीने आमच्यासारख्यांनी जाब विचारणं, निषेध व्यक्त करणं वगैरे अरण्यरुदनच ठरणार...

‘विश्वकोश सल्लागार मंडळा'वर सहा वर्ष सदस्य म्हणून काम केलं. वाईला वास्तव्य करून अनेक वर्ष अर्थशास्त्राच्या नोंदी लिहिल्या. साहित्य संस्कृती मंडळाशीही जवळून संबंध आला. आजची अवस्था पाहून मनाला वेदना होतात. म्हणून या दीर्घ पत्राचा हा प्रपंच.

Tags: यशवंतराव चव्हाण यु. म. पठाण रा.ग. जाधव साहित्य मंडळ विश्वकोश मराठी yashwantrao chavhan encliclopedia vishwakosh marathi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुभाष भेण्डे

लेखक, कादंबरीकार, नाटककार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके