महिलांना सर्व क्षेत्रांत त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे असे प्रयत्न सध्या चालू असले तरी अशिक्षित आणि अज्ञानी अशा स्त्रीला एकदम एका राज्याचे मुख्यमंत्रिपद बहाल करणे म्हणजे जरा अतिरेकी गोष्टच आहे. कोणत्याही राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा अनुभव तर सोडाच पण ज्यांना त्या क्षेत्रांची साधी माहितीही नाही अशा राबडीदेवी बिहारसारखे मोठे राज्य कसे सांभाळणार हा एक यक्षप्रश्नच आहे.
पशुचारा घोटाळ्यात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले लालूप्रसाद यादव यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा शेवटी द्यावाच लागला. गेल्या दोन तीन महिन्यांपासून लालूप्रसाद प्रसिद्धीच्या झोतात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याइतकी मोठ्या प्रमाणात आणि सातत्यपूर्ण प्रसिद्धी अलीकडच्या काळात तरी निदान देशभरात अन्य कोणत्याही नेत्याला मिळालेली नाही. लालूना काही प्रमाणात प्रसिद्धी मिळत गेली, तर काही प्रमाणात ते प्रसिद्धी मिळवीत गेले. प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्र तर त्यांना फार पूर्वीपासूनच अवगत आहे. जनता दलाच्या अध्यक्षपदाचा वाद, त्यातून निर्माण झालेली न्यायालयीन लढाई. शेवटी निवडणुकीवर बहिष्कार आणि मग स्वतंत्र 'राष्ट्रीय जनता दल' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना अशी त्यांची अलीकडची वाटचाल.
नवीन पक्ष स्थापून बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याच्या कामी त्यांनी काँग्रेसचे अप्रत्यक्षपणे सहकार्य घेतले तर 'व्यवहारासाठी' प्रसिद्ध असलेल्या 'झारखंड मुक्ती मोर्चा' या पक्षाशी त्यांनी 'राजकीय व्यवहार' पूर्ण करून विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला. मात्र या दरम्यान चारा घोटाळ्याची न्यायालयीन कारवाई सुरूच होती आणि पाटणा उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली तरी तेथीलही 'निकाल' त्यांच्या नजरेसमोर दिसू लागला आणि 'तुरुंगातून कारभार करेन' अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्या लालूंना शेवटी राजीनामा द्यावा लागला. मात्र राजीनामा देऊन त्यांनी आपली पत्नी श्रीमती राबडीदेवी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आपण आणखी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. लालूप्रसाद यादव यांनी आजपर्यंत जे जे कमावले होते ते ते त्यांनी घालविले आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रान्तीच्या चळवळीतून, भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनातून निर्माण झालेल्या ह्या नेतृत्वावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आयुष्यभर काँग्रेसविरोधाचे राजकारण करणाच्या लालूना विश्वासदर्शक ठरावासाठी काँग्रेसचेच सहकार्य घ्यावे लागले. नेहरू-गांधी घराण्याच्या घराणेशाहीच्या विरोधात सतत बोलणाऱ्या लालूंनाही शेवटी आपल्या पत्नीलाच मुख्यमंत्रिपदी बसवून घराणेशाहीचाच मार्ग चोखाळावा लागला हे लालूप्रसादांचे दुर्दैवच होय. इतिहासाने त्यांच्यावर उगविलेला हा सूड होय. कुठलीही पात्रता नसताना आपल्या पत्नीला मुख्यमंत्रिपदी बसवून त्यांनी फार मोठा राजकीय भ्रष्टाचार केला आहे. केवळ अशिक्षितच नव्हे तर अज्ञानी असलेल्या राबडीदेवी ह्या बिहार च्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना शपथेच्या चार ओळी वाचतानाही त्या अडखळत होत्या. शपथविधीनंतर राष्ट्रगीत सुरू झाल्यावर डोळे मिटून, हात जोडून त्या उभ्या राहिल्या. या प्रकारावरूनच या बाईची पात्रता दिसून येते. या ठिकाणी राबडीदेवींचा उपमर्द करणे हा उद्देश नाही. मात्र वस्तुस्थितीचा विचार करण्याची गरज आहे.
राबडीदेवी केवळ निमित्तमात्र आहेत. या प्रकारातून भारतीय राजकारणाची झालेली अधोगती प्रकर्षाने नजरेसमोर येते. राबडीदेवींनी पाटण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातच बारा गायींचा गोठा उभा केला होता. शेती व गोठा सांभाळण्याचे काम मुख्यमंत्र्यांची पत्नी असूनही त्यांनी केले आहे. तसेच मीसादेवी, रोहिणी आचरी, चन्दाकुमारी, हेमाकुमारी आदी सात कन्याररत्नांसह दोन कुलदीपकांना सांभाळण्याचे काम करणाऱ्या राबडीदेवींना आज सारा बिहार सांभाळावा लागत आहे. अगदी परवापर्यंत सी. बी.आय. म्हणजे काय त्यांना माहीत नव्हते. तरीही बदलते राजकीय वारे त्यांना समजू लागले होते. आज ना उद्या आपल्या पतीला - लालूना - राजीनामा द्यावा लागणार आणि मग मुख्यमंत्रिपदी लालूंच्या अनुयायी श्रीमती कांती सिंग यांची वर्णी लागू नये म्हणून राबडीदेवींनी आपल्या थोरल्या मुलीला - मीसादेवीला तयार केले होते. मात्र मीसादेवी ऐवजी त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हावे लागले आहे.
राबडीदेवी ह्या काही घराणेशाहीचा आरोप होणाऱ्या पहिल्याच व्यक्ती नाहीत. तामीळनाडूत एम. जी. आर नंतर जानकी रामचंद्रनना मुख्यमंत्रिपदी बसविले गेले, त्याही केवळ गृहिणीच होत्या. गांधी-नेहरू घराण्याचीही हीच परंपरा आहे. इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर काँग्रेस सांसदीय पार्टीची बैठकही न होता राजीव गांधींना सांसदीय पक्षाचा नेता निवडले गेले होते. इतर सर्व पक्षांमध्ये आणि राज्या-राज्यांमध्ये मुलगा, पुतण्या, जावई, भाऊ, मेव्हणा, बहीण, पत्नी यांना लहान मोठी सत्तापदे मिळतच गेली आहेत, हे विसरता येणार नाही आणि असे असले तरी राबडीदेवींना आणि तेही एकदम मुख्यमंत्रिपदच म्हणजे जरा जास्तच होते. कोणत्याही राजकीय-सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग नाहीच, एवढेच नव्हे तर या क्षेत्रांची साधी माहितीही त्यांना नाही. लालूवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्यानंतर राबडीदेवींनी जनता दलाच्या महिला आघाडीच्या 'नंग्या तलवारीनिशी' निघालेल्या मोर्च्याचे नेतृत्व केले होते.
या प्रसंगीच त्यांना घराबाहेरचे जग पाहावयाला मिळाले आहे आणि नंतर लगेचच त्या मुख्यमंत्री झाल्या. पंचाहत्तर जणांचे जम्बो मंत्रिमंडळ तयार करून अनेक असंतुष्ट आत्म्यांना समाधानी करत राज्याचा शकट त्या कशा प्रकारे हाकतात हे तर येणारा काळच आपणास दाखवील. महिलांना सर्वच क्षेत्रांत त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याच्या मुद्याचे समर्थन करीत असतानाही राबडीदेवीच्या मुख्यमंत्रिपदाचे कोणालाही समर्थन करता येणार नाही. मुख्यमंत्री करून त्यांनी लोकशाहीची क्रूर अशी थट्टाच केली आहे. आज लालू ही एक व्यक्ती राहिलेली नाही तर ती एक प्रवृत्ती झालेली आहे. भारतीय राजकारणातील आणि विशेषतः 1970 नंतरच्या राजकारणाचे स्पष्ट चित्र आपणास लालूप्रवृत्तीमध्ये दिसून येते.
सत्ता मिळविण्यासाठी पैसा आणि पैसा मिळविण्यासाठी सत्तेचा करण्यात येत असलेला वापर. प्रथम स्वतः, नंतर स्वतःचे कुटुंब, नंतर इतर नातलग आणि शेवटी जात. या स्वघटकांचे हित जोपासण्याची वृत्ती आज वाढत चाललेली आहे. बिहार च्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची लालूंनी आपल्या पत्नीला भेट म्हणून दिली. तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय इतर पात्र महिला बिहार च्या राजकारणात लालूंच्या पक्षात असतानाही जनतेला भारतातील बदलत्या राजकीय नेतृत्वाकडून मिळालेली भेट त्यांनी आपल्या पत्नीलाच मुख्यमंत्रिपदी बसविले आहे आपल्या पत्नीला म्हणजेच राबडीदेवी!
Tags: मुख्यमंत्री भ्रष्टाचार बिहार घोटाळा जनता दल लालूप्रसाद यादव राबडी देवी सुभाष वैरागकर CM Corruption Bihar Scam Janta Dal Laluprasad Yadav Rabadi Devi Subhash Vairagakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या