डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

किशोर पवार यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, हैदराबाद मुक्तिलढा आणि गोवा स्वतंत्रता संग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता, संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी तर ते सर्व अर्थांनी जोडले होते आणि आणीबाणीविरोधी सत्याग्रहात त्यांनी अठरा महिने तुरुंगवास भोगला. आपल्या या वाटचालीचा स्वातंत्र्यसैनिक असा गाजावाजा त्यांनी कधीच केला नाही तसाच त्यांनी स्वत:च्या जीवनात जपलेल्या जातिधर्मनिरपेक्ष संस्कारांचाही कधी गाजावाजा केला नाही. स्वत: आंतरजातीय विवाह केलेल्या किशोर पवार यांच्या घरात अनेक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाले. दर वर्षी पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करताना... ‘विष्णुय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।’ हा संत तुकारामांचा दाखला देणाऱ्या किशोर पवारांनी स्वत:च्या आयुष्यात कृतीने तो निर्माण केला. 

साथी किशोर पवार यांची सार्वजनिक जीवनातील पहिली ओळख राष्ट्र सेवादल सैनिक म्हणून राहिली आणि त्यानंतरची त्यांची सर्वांत ठसठशीत ओळख होती, ती म्हणजे साखर कामगारांचे नेते अशी. राष्ट्र सेवादल सैनिक या नात्याने समाजवादी परिवारातील सर्वच संस्था-संघटनांचे पालकत्व त्यांनी निभावले. साखर कामगार नेते म्हणून कोपरगाव तालुका साखर कामगार सभा आणि बारामती तालुका सभेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि राष्ट्रीय साखर कामगार संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व विचारांच्या सर्व स्तरांवरील साखर कामगारांच्या प्रश्नांशी त्यांनी आपली बांधिलकी मानली. 

पाच फुटांपेक्षा थोडीशी जास्त उंची. मजबूत आणि दणकट शरीरयष्टी. अंगावर सतत खादीचे पण स्वच्छ आणि परीटघडीचे कपडे. कोणीही भेटल्याबरोबर स्वभावातील उत्स्फूर्त मनमोकळेपणा दाखविणारे तितकेच उत्स्फूर्त स्वागत करून संवाद सुरू करण्याची पद्धत. चर्चेत आपला मुद्दा आर्जवी पण तितक्याच आग्रही पद्धतीने मांडण्याची अनोखी हातोटी. 

किशोर पवारांनी राष्ट्र सेवादल या बिनभिंतींच्या शाळेतून समाजवादाचे, जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे संस्कार आत्मसात केले आणि वारकरी संप्रदायातून उदारमतवादाचे संस्कार मिळविले. रावसाहेब पटवर्धन यांनी त्यांना साखर कामगारांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायला सांगितले आणि त्यांनी ते काम स्वत:ची नोकरी सोडून स्वीकारले. कुठल्याही कामात अर्धवट लक्ष घालण्याची त्यांना सवय नव्हती. जे करायचे ते मनापासून आणि पूर्ण ताकद लावून. साखर कामगारांच्या प्रश्नाचा त्यांनी असाच मुळापासून वेध घेतला आणि म्हणूनच त्या प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या शब्दाला वजन आले. किशोर पवारांनी साखर कामगारांच्या प्रश्नात लक्ष घातले तेव्हा साखर व्यवसाय मूठभर खाजगी भांडवलदारांच्या हातात एकवटला होता. मधल्या काळात महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीने मूळ धरले. ग्रामीण भागाची, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली आणि जोडीला सहकारातील नेतृत्वाची घराणेशाहीही. भ्रष्टाचार, भाई-भतीजावाद आणि गैरव्यवस्थापनाने सहकार क्षेत्र बदनाम झाले. कोलमडून पडले आणि बंद पडलेले सहकारी साखर कारखाने राजकारणातून निर्माण झालेल्या सरंजामदारांनी पुन्हा विकत घ्यायला सुरुवात केली. आता पुन्हा खाजगी साखर कारखानदारी फोफावत आहे. साखर व्यवसायाबरोबरच साखर कामगारांच्या प्रश्नांचेही एक वर्तुळ पूर्ण झाले. बदलत्या परिस्थितीत साखर कामगारांच्याही बदलणाऱ्या प्रश्नांचा आणि आव्हानांचा वेध घेऊन मुकाबला करण्यासाठी किशोर पवार मात्र आज हयात नाहीत. 

किशोर पवार यांनी साखर कामगारांसाठी अनेक लढे लढवले. पगारवाढ मिळविली. बोनस वाढवून घेतला. साखर कारखाना बंद असतानाही साखर कामगारांना निम्मा पगार सुरू राहील ही व्यवस्था करून घेतली आणि साखर कामगारांना सुस्थितीत आणले. पण हे करताना समाजाप्रतीची आपली बांधिलकी साखर कामगार विसरणार नाहीत याची त्यांनी सतत काळजी घेतली. म्हणूनच भाववाढविरोधी आंदोलनापासून ते आणीबाणीविरोधी सत्याग्रहापर्यंत साखर कामगार सभेचा सहभाग लक्षणीय आणि महत्त्वाचा राहिला. समाजातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर साखर कामगार सभेचा सहभाग लक्षणीय आणि महत्त्वाचा राहिला. समाजातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी साखर कामगारांना सजग आणि संवेदनशील बनविण्याचा प्रयत्न केला. 

अहमदनगर जिल्हा जन्मभूमी असलेल्या किशोर पवारांनी कोकणातील कार्यकर्त्यांशी जी नाळ जुळविली होती ती अशीच होती. राजापूर मतदारसंघाशी तर त्यांचे खास असे नाते होते. बॅ.नाथ पै आणि प्रा.मधु दंडवते यांच्या लोकसभेच्या निवडणुकांचा भार ते एकहाती पेलीत असत. नाथ पै आणि नाना दंडवते त्याबाबत निर्धास्त असत. माझ्या माहितीप्रमाणे किशोर पवार यांच्या नावावर लेखक- संपादक म्हणून एकच पुस्तक जमा आहे आणि ते आहे बॅ.नाथ पै यांच्याबद्दलचे. 

स्वत:च्या घराला नाथ पै असे नाव देणाऱ्या किशोर पवारांनी स्वत:च्या मनात नाथ पै यांच्याबद्दल कायम एक हळुवार कोपरा जपला होता. नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांच्याबरोबरच इतर अनेकांना निवडणुकांध्ये जिंकून येण्यास मदत करणाऱ्या किशोर पवारांना स्वत:च्या निवडणुकांचे गणित मात्र कधीच यशस्वीपणे सोडविता आले नाही. त्या बाबत त्यांची वेळ आणि जागा नेहमीच चुकत गेली. मात्र या अपयशाचा बाऊ न करता समाजवादी पक्ष ते जनता दल या प्रवासात पक्ष आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला की किशोर पवारांनी धावून जायचे हे समीकरण मात्र कधीच चुकले नाही.

नाथ पै यांच्याबद्दल मनात सतत एक हळवा कोपरा बाळगणाऱ्या किशोर पवारांनी नाथ पै यांच्यामुळेच सीमाभागातील मराठी बांधवांविषयी आणि त्यांच्या वेदनेविषयी सतत एक प्रकारची बांधिलकी मानली. सीमावासीयांच्या प्रत्येक लढ्याशी ते मनाने एकरूप असत, त्यासाठी जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करीत असत.

किशोर पवार यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, हैदराबाद मुक्तिलढा आणि गोवा स्वतंत्रता संग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता, संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी तर ते सर्व अर्थांनी जोडले होते आणि आणीबाणीविरोधी सत्याग्रहात त्यांनी अठरा महिने तुरुंगवास भोगला. आपल्या या वाटचालीचा स्वातंत्र्यसैनिक असा गाजावाजा त्यांनी कधीच केला नाही तसाच त्यांनी स्वत:च्या जीवनात जपलेल्या जातिधर्मनिरपेक्ष संस्कारांचाही कधी गाजावाजा केला नाही. स्वत: आंतरजातीय विवाह केलेल्या किशोर पवार यांच्या घरात अनेक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाले. दर वर्षी पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करताना... ‘विष्णुय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।’ हा संत तुकारामांचा दाखला देणाऱ्या किशोर पवारांनी स्वत:च्या आयुष्यात कृतीने तो निर्माण केला. 

एस.एम.जोशी आणि नानासाहेब गोरे ही किशोर पवारांची दोन श्रद्धास्थाने. या दोघांच्या विचारांचे कृतिशील स्मारक म्हणून ते पुण्यातील एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि नानासाहेब गोरे अकादमीकडे पाहात असत. प्रथम फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी या संस्थेला स्थिरता मिळवून देण्यासाठी सतत सर्व बाजूंनी प्रयत्न केले. कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर सहजपणे संवाद साधू शकतात असा समाजवादी नेता ही प्रतिमा असलेले किशोर पवार कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला सतत त्यांच्याबरोबर राहिले. कार्यकर्त्याच्या भावविश्वात स्वत:साठी हक्काची जागा मिळविण्याची त्यांची अनोखी शैली होती. अशा लढाऊ समाजवाद्याच्या, वारकरी समाजवाद्याच्या जाण्याने अनेक संस्था-संघटनांतील कार्यकर्त्यांचे हळवे होणे स्वाभाविक आहे. 

Tags: समाजवादी मधु दंडवते नाथ पै राष्ट्र सेवा दल नानासाहेब गोरे एस.एम. जोशी साखर कामगार किशोर पवार सुभाष वारे Samajaadi Madhu Dandvate Nath Pai Rashtr Seva Dal Nanasaheb Gore S.M.Joshi Sakhar Kamgar Kishor Pawar Subhash Ware weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके