डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अभय जोशी यांच्यासोबतची अकरा वर्षे

अभय जोशी यांची ओळख मी निवृत्त विंग कमांडर म्हणून करून दिलीय. विंग कमांडर म्हणून अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धात सहभाग घेतला होता, ही गौरवाची बाब आहे. पण अभय जोशी हे ख्यातनाम समाजवादी नेते श्रद्धेय एस.एम.जोशी यांचे धाकटे चिरंजीव होत. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील एस.एम. यांच्या त्यागमय व प्रेरक योगदानाबद्दल अभय जोशी यांना रास्त अभिमान होता. पण एस.एम.चे धाकटे चिरंजीव ही आपली ओळख त्यांनी कधीही वापरली नाही. माझे वडील किती महान होते, हेही त्यांनी मुद्दाम कधी कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. एस.एम. अण्णांबद्दल समाजवादी वर्तुळात आणि समाजवादी वर्तुळाच्या बाहेर आजही कमालीचा आदर आहे. तो वेळोवेळी व्यक्तही होत असतो. जे नैसर्गिकपणे घडायला हवे ते ओढून-ताणून करण्याची गरज नसते, असे ते म्हणायचे. 

निवृत्त विंग कमांडर अभय जोशी आता आपल्यासोबत नाहीत. मला खरे तर माझ्यासोबत नाहीत, असं म्हणायचंय. अकरा वर्षे आम्ही एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनमध्ये सहकारी म्हणून काम करत होतो. आम्हा दोघांच्या क्षमता वेगवेगळ्या आणि जबाबदारीही वेगवेगळी, तरीही आमची वाटचाल मात्र परस्परपूरक ठरली. साथी अभय जोशी यांच्याशी माझा पहिला संपर्क 2004 मध्ये फोनवरून झाला. मी तेव्हा राष्ट्र सेवादलाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. आम्ही सर्व सेवादल सैनिक तेव्हा साथी एस.एम.जोशी जन्मशताब्दी कार्यक्रमांमध्ये व्यग्र होतो. आम्ही काय काय कार्यक्रम करत आहोत आणि त्या कार्यक्रमांमधून काय साध्य होणार, असा त्यांच्या फोनवरील संभाषणाचा केंद्रबिंदू होता. मी एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सचिवपदाची जबाबदारी 2007 पासून स्वीकारली आणि 2009 मध्ये अभय जोशी पुण्यात राहायला आल्यावर त्यांनी फाउंडेशनच्या खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. मग आमचं एकत्रित काम सुरू झालं. त्या फोनवरील 2004 च्या पहिल्या संभाषणात आणि नंतर 2009 मध्ये आम्ही सोबत काम करू लागल्यावरचे पहिले वर्ष मला त्यांच्या या अशा प्रश्न विचारण्यामध्ये एका बाजूला अनेक गोष्टी नव्याने जाणून घेण्याऱ्या लहान मुलाची उत्सुकता दिसायची आणि त्याच वेळी कुठल्याही प्रश्नाचे बारीक-सारीक तपशील विचारत त्या मुद्याच्या तळाशी जाण्याची सवय जाणवली. अनेक सामाजिक प्रश्न आणि सामाजिक परिवर्तनाबाबतचे त्यांचे प्रश्न कधी कधी एखाद्या तपास अधिकाऱ्यासारखे वाटायचे. ती जी एक गोष्ट आहे ना- ज्यात एक माणूस दुसऱ्याला विचारतो की, वाघ तुझ्या मागे लागला तर तू काय करशील? मी जोरात पळीन, असं समोरच्याने उत्तर दिलं की पुढचा प्रश्न येतो- वाघ तुझ्यापेक्षा जोरात पळाला तर काय करशील? मग मी झाडावर चढीन, या उत्तराला लगेच पुढचा प्रश्न की- वाघही तुझ्या मागोमाग झाडावर चढला तर काय करशील? एखाद्या सामाजिक उपक्रमाबद्दल आणि त्याच्या उपयुक्ततेबद्दल अभय जोशींची प्रश्नांची मालिका अशा रीतीने थांबतच नसे. 

सुरुवातीला मी जरा विचारात पडायचो. हा विशिष्ट उपक्रम आपण करू नये, असा तर असे प्रश्न विचारायचा यांचा उद्देश नसेल ना, असे मला वाटून जायचे. पण वर्षभराच्या आत त्यांचा वेगळा दृष्टिकोन माझ्या लक्षात आला. मला जाणवलं की, आपण गेली अनेक वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता आहोत. वेगवेगळ्या संघटनांची जबाबदारी आपण सांभाळलेली आहे. कुठल्याही प्रश्नाकडे, मुद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक संघटक म्हणून विकसित झालाय. दुसऱ्या बाजूला अभय जोशी हे गेली अनेक वर्षे भारतीय वायुदलात वैमानिक होते. पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. भारतीय वायुदलातून निवृत्ती घेतल्यावर व्यावसायिक विमान उड्डाणक्षेत्रात वैमानिक म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. विशिष्ट प्रश्नाकडे अथवा मुद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा व्यवस्थापकीय अंगाने विकसित झाला आहे. 

विमान उड्डाण करण्यापूर्वी बारीकसारीक तपशील नक्की करावा लागतो. युद्धात बाँम्ब अचूकपणे लक्ष्यावर पडावा लागतो. व्यावसायिक विमान उड्डाण करतानाही शेकडो प्रवाशांच्या आणि आपल्याही जीवाचा प्रश्न असतो. सामाजिक उपक्रम राबवतानाही अनेक बारकावे आधीच लक्षात घेऊन, त्याप्रमाणे तपशीलवार नियोजन करून आपला उपक्रम अधिकाधिक यशस्वी कसा होईल, असा विचार करण्याचा माझा स्वभाव आहे. पण तरीही सामाजिक क्षेत्रातले नियोजन हे अनेक अशा घटकांवर अवलंबून असते, जे अनिश्चित असतात. सतत बदलते असतात. दुसरं म्हणजे- व्यावसायिक जगतात ज्यांची सर्व अर्थाने व्यवस्थित काळजी घेतली जाते, अशा सहकाऱ्यांबरोबर तुम्ही काम करत असता तर सामाजिक क्षेत्रात कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता केवळ ध्येयवादाने काम करत राहिलेल्या सहकाऱ्यांबरोबर तुम्ही काम करत असता; व्यावसायिक जगतात जबाबदाऱ्यांची उतरंडीप्रमाणे एक रचना असते. तिथे आदेश पाळण्याचे संकेत आपोआप तयार झालेले असतात. सामाजिक क्षेत्रात पदांची उतरंड असली तरी प्रत्येक व्यक्ती समान आणि प्रत्येक व्यक्तीचं मत महत्त्वाचं, हा संकेत रूढ झालेला असतो. तो सांभाळण्याचा प्रयत्न व कसरत असते. तिथे आदेशापेक्षा विश्वास ठेवत काम करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सामाजिक चळवळीतील अनुभवातून बनलेला माझा संघटकीय दृष्टिकोन आणि व्यावसायिक जगतातील त्यांचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन यातला फरक हा आमच्या चर्चेत घर्षण तयार करायचा. पण हे फक्त पहिल्या वर्षात झालं. 

पुढे दहा वर्षे मात्र आमच्या तारा अशा काही जुळल्या की, त्यातून एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनचं आजचं जे तरुणाईसोबतच एक आश्वासक चित्र आहे, ते उभं राहिलं. समाजवादी चळवळीसोबतच पुरोगामी चळवळीतील अनेक छटांच्या वेगवेगळ्या जनसंघटनांना आपलं वाटणारं एक जिवंत केंद्र फाउंडेशनच्या रूपाने आकाराला आलं. या आश्वासक चित्राच श्रेय जसे पुढाकार घेऊन काम करणाऱ्या आम्हा दोघांचं, तसंच ते एका बाजूला फाउंडेशनचे अध्यक्ष जी.जी.पारिख व सर्व विश्वस्त मंडळ आणि दुसऱ्या बाजूला फाउंडेशनचा सतत उत्साही असलेला तसेच सेवाभावी कर्मचारी वर्ग यांचं आहे. या सर्वांच्या उल्लेखाशिवाय ते चित्र परिपूर्ण होत नाही. फाउंडेशनने अनेक संस्था-संघटनांना सोबत घेऊन सुरू केलेले संविधान साक्षरता अभियान, दर वर्षीची नानासाहेब गोरे व्याख्यानमाला, प्रा.मधु दंडवते ग्रंथालय आणि अभ्यासिका, निवासी प्रशिक्षण केंद्रातून त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या विषयांवर होणारे प्रशिक्षण कार्यक्रम, अनेक संघटनांसोबत फाउंडेशनही ज्यात सहभागी असते असा लोकशाही उत्सव- अशा अनेक कार्यक्रमांत तरुणाईचा वाढता सहभाग आहे. त्याचे मनापासून कौतुक अभय जोशींना होते. 

सुरुवातीला ते आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस फाउंडेशनवर यायचे. सकाळी दहाच्या ठोक्याला फाउंडेशनवर हजर असायचे. दुपारचा एक वाजला की निघायचे. मी येईपर्यंत त्यांनी फाउंडेशनच्या परिसराचा फेरफटका मारून झालेला असायचा. व्यवस्थापक राहुल भोसलेंसोबत हिशोब तपासून झालेले असायचे. इमारतींची काही दुरुस्ती वगैरे असेल तर त्याबाबत त्यांचा प्रस्ताव तयार असायचा. फाउंडेशनच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खरेदीसाठी ते चार ठिकाणी चौकशी करायचे, मित्रांकडून माहिती घ्यायचे आणि फाउंडेशनची खरेदी अथवा एखादी सेवा चांगल्या गुणवत्तेची व कमीत कमी पैसे देऊन कशी करायची ही त्यांची हातोटी असायची. ते काम आवडीने व मनापासून करायचे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने माझी सतत फिरती असायची. मी बिनधास्त असायचो, कारण त्यांच्या नेतृत्वात आणि कर्मचाऱ्यांच्या उत्तम सहकार्याने फाउंडेशनच्या दैनंदिन कामाची उत्कृष्ट घडी बसली होती आणि आजही बसलेली आहे.

अनुभव किंवा दोन व्यक्तींच्या पार्श्वभूमीच्या फरकामुळे बनलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांतील घर्षणाचा मी मोकळेपणाने उल्लेख केला, कारण तो नैसर्गिक आहे. सामाजिक क्षेत्रातीलही दोन व्यक्ती जेव्हा एकत्र काम करायला सुरुवात करतात, तेव्हाही असे घर्षण होतेच. पण एकमेकांच्या हेतूंविषयी शंका नसेल, माझंच खरं हा दुराग्रह नसेल आणि आपल्या अनुभवांपेक्षा वेगळ्या अनुभवातून आलेल्या व्यक्तीकडून आपणही काही तरी शिकू शकतो, ही मनापासून तयारी असेल, तर मग हे घर्षण गतिरोधक म्हणून काम करत नाही, तर उलट ते दोन्हीकडील स्वभावा’चे कंगोरे तासतं आणि मग ते गती वाढवायला पूरक ठरते. मला अभय जोशींकडून खूप शिकायला मिळालं. तसंच त्यांचंही असणार, हे त्यांच्या प्रतिसादावरून मी सांगू शकतो. मी विस्ताराने याचा उल्लेख केला, कारण आज सामाजिक चळवळींना एकांड्या शिलेदारीतून उभ्या राहणाऱ्या कर्तृत्वाच्या उंच शिखरापेक्षाही सामूहिक वाटचालीतून उभ्या राहणाऱ्या कर्तृत्वाच्या अनेक छोट्या डोंगरांची गरज आहे. एकत्र काम करताना वर उल्लेखिलेली सामूहिकतेची पथ्ये जर पाळली, तर सामूहिक कृती यशस्वी होऊ शकतात. तसा प्रयत्न सर्वांकडून व्हायला हवा.

जाहीर कार्यक्रमात बोलण्याची अभय जोशींची फार तयारी नसायची. आग्रह केला तरी ते टाळायचे. लिखाण करणं त्यांना आवडायचं, पण आवडीचं काम असूनही त्याही कामात ते फार रस घ्यायचे नाहीत. त्यांना प्रवासाचा, पंख्याच्या हवेचा आणि वातानुकूलित थंड हवेचा खूप त्रास व्हायचा. या सर्व गोष्टींचा त्यांनी एक प्रकारे धसका घेतला होता. त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी स्वतःला इतकं सुरक्षित राखलं होत’ की, एप्रिल महिन्याच्या तापलेल्या उन्हात ते गाडीच्या काचा बंद करून आणि एसी न लावता कार्यालयातून घरी जायचे. या त्रासामुळे सार्वजनिक कार्याबाबत आपल्या मर्यादा त्यांनी आखून घेतल्या होत्या. मलाही अभय जोशी तोच सल्ला सातत्याने द्यायचे, कारण माझेही प्रकृतीचे तेच आणि तसेच प्रश्न आहेत. अडचणी आहेत, पण अजून तरी मी कार्यरत आहे.

देशात हिंदुत्ववादी संघटनांची वाढत चाललेली मुजोरी आणि त्यातून उभी राहत असलेली बहुसंख्याकवादाची गंभीर समस्या हा अभय जोशींच्या सततच्या काळजीचा विषय होता. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा प्रभाव पुसून टाकण्यासाठी हिंदुत्ववाद्यांचे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, देशाला मनुवादी व्यवस्थेकडे घेऊन जाण्याची शिकस्त ते लोक करत आहेत. हे रोखण्यासाठी राष्ट्र सेवादलाकडे काय कार्यक्रम आहे आणि कोणती रणनीती आहे, असा त्यांचा सतत प्रश्न असायचा. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्यांच्या प्रश्नांच्या मालिकेला हाच संदर्भ असायचा. धार्मिक कट्टरतावादाबद्दल ते लोकसत्तेत लिहायचे. लेखाला जागा मिळणार नसेल, तर मी लिहिलेलं वाचकांच्या पत्रात तरी छापा- असा आग्रह लोकसत्ताकारांना करायचे. त्यांचे एक-दोन लेख आणि वाचकांचा प्रतिसाद या सदरात दोन पत्रे छापून आल्याचं मला आठवतंय. भारतीय संविधानातील पंचविसाव्या कलमाने भारतीय नागरिकांना काही मर्यादा घालून धर्मस्वातंत्र्य बहाल केलेले आहे. नागरिकांना व्यक्तिगत जीवनात हे धर्मस्वातंत्र्य बहाल करताना संविधानाने सार्वजनिक जीवनातील धर्माच्या मर्यादाही स्पष्ट केलेल्या आहेत. सर्व धर्मीयांनी संविधानाने घातलेल्या या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत, यावर आम्ही बोलायचो. मुस्लिम धर्माच्या नागरिकांनीसुद्धा संविधानातील हा विचार समजून घ्यावा, यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा विचार मुस्लिम समाजात रुजला पाहिजे, याबाबत ते सतत बोलायचे. मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी आणि सहकाऱ्यांशी त्यांचा सतत संवाद असायचा. सच्चर अहवालाने उपस्थित केलेल्या मुस्लिम समाजातील तरुणाईच्या शिक्षण आणि रोजगाराबाबतच्या प्रश्नांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अधिक ताकदीने हात घातला पाहिजे, समाजातील कामाची सुरुवात शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नावर सुरू होऊन मग पुढील टप्प्यावर आपण समाजाच्या प्रबोधनाकडे वळल पाहिजे, असे आम्हा दोघांचं सामाईक मत होत आणि आम्ही शमसुद्दीन तांबोळींच्या कानांवर ते सतत घालायचो. या देशात संविधानविरोधी शक्तींचे वाढत चाललेले कारनामे हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटायचा. म्हणूनच एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनने सुरू केलेल्या संविधान साक्षरता अभियानाचे त्यांनी मनापासून स्वागत केले आणि त्याला शक्य ती मदतही त्यांनी केली. 

सार्वजनिक कार्यक्रमात वक्ता किंवा पाहुणा म्हणून बोलणं ते टाळायचे, मात्र समोरासमोरच्या चर्चांसाठी ते प्रचंड उत्साही असायचे. फोनवर बराच वेळ बोलायचे. अशा चर्चेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे प्रमुख विषय आवर्जून यायचे. माझे इंग्रजी वाचन कमी आहे. अभय जोशी सातत्याने इंग्रजी वर्तमानपत्र व नियतकालिके वाचायचे. त्यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विषय निघाले की, माझ्याकडे समजून घेणाऱ्या श्रोत्याची भूमिका असायची. त्यांचे जे काही मर्यादित मित्र होते, ते त्यांनी अशा विषयांवरच्या गप्पांमधूनच मिळवलेले होते. या बाबतीत त्यांनी जाहीर संभाषण अथवा लिखाण केले असते, तर त्याचा पुरोगामी चळवळीला नक्की फायदा झाला असता. अर्थात या जर-तरला आता काहीच अर्थ नाही.

अभय जोशी यांनी स्वकष्टार्जित संपत्तीतून गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणाकरता मदत करण्यासाठी आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या आजारपणात उपचारांसाठी आर्थिक साह्य करण्याच्या कामी मोठे काम केले. वैयक्तिक जीवनात ते अत्यंत काटकसरी, गरजा कमी राखण्याबाबत सतत आग्रही असायचे. फाउंडेशनच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. ही जबाबदारी सांभाळताना त्यांच्या काटकसरी स्वभावाचा खूप फायदा झाला. आपल्या वैयक्तिक गरजा कमी करणे समाजवादी धारणेसाठी आवश्यक आहे, असे ते म्हणायचे. आम्हा दोघांचं इथे शंभर टक्के एकमत असायचे.

त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातला जास्तीत जास्त वाटा ते विद्यार्थी व कार्यकर्त्यांसाठी द्यायचे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी निवडताना ते शोषित समूहातले, अल्पसंख्याक समुदायातले असावेत, हा त्यांचा आग्रह असायचा. कमी कालावधीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आम्ही निवडायचो, जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो किंवा ती काही ना काही कमवायला लागतील आणि स्वतःच्या हिमतीवर पुढचे शिक्षण पूर्ण करतील, असा आमचा दृष्टिकोन होता. त्याचा उपयोग झाला. त्यांच्या आदरांजली सभेत शिष्यवृत्ती मिळालेल्यांपैकी तन्वीर इनामदार आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी संबंधित विद्यार्थ्यांची मनोगते ऐकण्यासारखी होती. डॉ.नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर आणि विवेक सावंत यांच्या उपस्थितीत एस.एम.जोशी शिक्षण आणि आरोग्य निधीची सुरुवात 2012 मध्ये झाली. अभय जोशी, मी, शमसुद्दीन तांबोळी आणि राहुल भोसले हे संयोजक म्हणून होतोच. आयटीआय, डी.एड., नर्सिंग, पॉलिटेक्निक असे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड व्हायची. सुरुवातीला एस.एम.जोशींच्या जयंतीदिनी- 12 नोव्हेंबर रोजी शिष्यवृत्ती दिली जायची. नरेंद्र दाभोलकर यांची 2013 मध्ये हत्या झाली. त्यानंतर दाभोलकरांच्या स्मृतिदिनी आणि 12 नोव्हेंबर असे वर्षातून दोन दिवस दोन टप्प्यांत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम होत असे. त्यातील एक दिवस या विद्यार्थ्यांसाठी संविधानातील पंचसूत्रीबद्दल किंवा व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल संवाद कार्यक्रम आयोजित केला जायचा. हा आग्रह अभय जोशी यांचा होता. 

2012-13 मध्ये 29 (17 मुले +12 मुली) रु. चार लाख वीस हजार
2013-14 मध्ये 38 (20 मुले +18 मुली) विद्यार्थ्यांना रु. तीन लाख पस्तीस हजार
2014-15 मध्ये 29 (21 मुले + 8 मुली) विद्यार्थ्यांना रु. दोन लाख पंच्याऐंशी हजार
2015-16 मध्ये 30 (15 मुले + 15 मुली) विद्यार्थ्यांना रु. तीन लाख चौदा हजार
2016-17 मध्ये 32 (17 मुले +15 मुली) रु. दोन लाख सत्तर हजार
2017-18 मध्ये 35 (19 मुले + 16 मुली) विद्यार्थ्यांना रु. तीन लाख पाच हजार आणि
2018-19 मध्ये 31 (17 मुले+14 मुली) विद्यार्थ्यांना रु. एक लाख पंचावन्न हजार

एवढी शिष्यवृत्ती या योजनेतून दिली गेली. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील महत्त्वाची अडचण दूर होण्याच्या दृष्टीने या संवेदनशीलतेची मोठी मदत झालेली आहे. याच काळात कार्यकर्त्यांच्या आजारपणात वैद्यकीय साह्यासाठी रु. एक लाख नव्वद हजारांचा निधी दिला गेला.

आपण कष्टाने मिळवलेल्या पैशावरसुद्धा आपल्या मूलभूत गरजा भागवण्यापुरताच आपला अधिकार असतो आणि बाकीचा पैसा हा समाजाचा असतो, हा उदात्त विचार यामागे आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात मी नेहमी म्हणायचो की- म.गांधींनी मांडलेल्या विश्वस्त संकल्पनेला किंवा तुकोबारायांच्या अभंगातील

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे,
उदास विचारे वेच करी!

या उक्तीला आपल्या आयुष्यात सार्थपणे उतरवण्याचे काम अभय जोशी आणि ज्योती जोशी यांनी केलेले आहे.
दि.29 नोव्हेंबर रोजी झालेल्या आदरांजली सभेस अभय जोशीसरांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारतीय वायुदलाचे निवृत्त अधिकारी उपस्थित होते. चळवळीतील ज्येष्ठ साथी होते, तसे तरुण कार्यकर्तेही होते. आदरांजली सभेच्या सुरुवातीला भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी सरांच्या पत्नी ज्योतीताई यांच्याकडे भारतीय वायुदलाचा ध्वज जेव्हा सन्मानपूर्वक सुपूर्द केला, तो क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद होता. ज्योतीताई व त्यांची दोन्ही मुले हरीश आणि राहुल हे तिथे बोलले नाहीत. पण अभय जोशीसरांनी सुरू केलेले गरजू मुला-मुलींसाठी शैक्षणिक सहकार्याचे कार्य आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे पुढेही चालूच ठेवू, या त्यांच्या भावना उपस्थितांपर्यंत पोहोचवा, हे त्यांनी मला आवर्जून सांगितले, हे विशेष आहे. श्रद्धेय एस.एम.जोशींचा संवेदनशीलतेचा वारसा अभय जोशींनी चालवला आणि तोच वारसा पुढे त्यांचे कुटुंबीय चालवू इच्छितात, हे कौतुकास्पद आहे.

लेखाच्या सुरुवातीला अभय जोशी यांची ओळख मी निवृत्त विंग कमांडर म्हणून करून दिलीय. विंग कमांडर म्हणून अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धांत सहभाग घेतला होता ही गौरवाची बाब आहे. पण अभय जोशी हे ख्यातनाम समाजवादी नेते श्रद्धेय एस.एम.जोशी यांचे धाकटे चिरंजीव होते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील एस.एम. यांच्या त्यागमय व प्रेरक योगदानाबद्दल अभय जोशी यांना रास्त अभिमान होता. अभय जोशी यांनी आपली ओळख एस.एम. यांचा मुलगा म्हणून कधीही, कुठेही वापरली नाही. माझे वडील किती महान होते, हेही त्यांनी मुद्दाम कधी कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. एस.एम. अण्णांबद्दल समाजवादी वर्तुळात आणि समाजवादी वर्तुळाबाहेर आजही कमालीचा आदर आहे. तो वेळोवेळी व्यक्तही होत असतो. जे नैसर्गिकपणे घडायला हवे ते ओढून-ताणून करण्याची गरज नसते, असे ते म्हणायचे. भारतीय वायुदलात वैमानिक असताना विमानप्रवासाच्या निमित्ताने सांविधानिक पदांवरील मान्यवर व्यक्तींसोबत प्रवासाची संधी त्यांना मिळाली, तशीच ती नंतर व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करताना देशातील त्या वेळच्या आघाडीच्या उद्योगपतींसोबत वावरण्याचीही त्यांना संधी मिळाली. ती आपली ओळखही ते कधी आवर्जून प्रदर्शित करायचे नाहीत. त्यांचा तो स्वभावच नव्हता. 

अभय जोशींच्या जाण्याने जोशी कुटुंबीयांना दुःख होणे स्वाभाविक आहे. पण अकरा वर्षे सतत एकत्रित काम करताना जे स्नेहबंध निर्माण झाले आणि परस्परविश्वासाचे नाते तयार झाले होते ते आता संपले आहे, हे आमच्यासाठीही तितकंच त्रासदायक आहे. त्यांच्या स्मृती मात्र आमच्यासोबत आहेत व कायम सोबत राहतील. अभय जोशी यांच्या स्नेहमय स्मृतींना विनम्र अभिवादन!


(26 नोव्हेंबरच्या रात्री अभय जोशी यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांना अभिवादन करणारा हा लेख लिहिणारे सुभाष वारे, सध्या एस.एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनचे सचिव असून, पूर्वी राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.)

Tags: सुभाष वारे स्मृतीलेख एस.एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशन राष्ट्रसेवा दल अभय जोशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके