डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'सापेक्षतावाद' सिद्धांताच्या ज्ञानमीमांसीय निष्पत्ती

अठराव्या शतकातील श्रेष्ठ जर्मन तत्त्वज्ञ इम्पॅन्युअल कांट यांचे सदस्तुमीमांसा व ज्ञानमीमांसा यांस फार मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनुभववाद व बुद्धिवाद यांच्यात समन्वय साधून ज्ञानमीमांसेचा विकास केला. अनुभववाद व बुद्धिवाद या दोन्ही भूमिका सत्तत्त्वाचे दर्शन करून देणान्या ज्ञानभूमिका असल्या तरी त्यांनी सत्तत्त्वाचे आंशिकच दर्शन होते. या आंशिक दर्शनातील दरी भरून काढून सत्तत्त्वाचे समग्र दर्शन प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने कांट यांनी ज्ञानमीमांसेची योजना केली.

आपल्या जाणिवेमधून माणूस भोवतालच्या जगाशी आणि वैश्विक अस्तित्वाशी संपर्क साधून त्याच्या सान्निध्यात येतो. इंद्रियांनी जाणिवेचे विशिष्ट आकृतिबंध निर्धारित केले जात असतात. ज्ञानेंद्रियांमार्फत कार्यान्वित जाणीव ज्ञानाच्या स्वरूपात प्रकट होते. या ज्ञानाच्या माध्यमातून माणसाला सत्तत्त्वाची प्राप्ती होते. सत्तत्त्व अनंत असून माणूस व त्याच्या क्षमता मर्यादित असतात. माणूस व सत्तत्त्व यांमध्ये काही संबंध असतो. माणूस सत्तत्त्वाशी अनेकविध प्रकारे संबंधित असू शकतो. मात्र प्रत्यक्षात एकावेळी तो एकाच निश्चित संबंधाने सत्तत्त्याशी जोडला गेलेला असतो. यामुळे माणसाला सत्तत्त्वाच्या सापेक्ष एक अवस्था प्राप्त होते, जी एखाद्या भूमिकेसारखी असते. पण अशा कोणत्याही एका विशिष्ट भूमिकेतून माणसाला सत्तत्त्वाचे आकलन साकल्याने व पूर्णत्वाने होऊ शकत नाही. यातूनच असाही एक प्रश्न निर्माण होतो की विशिष्ट भूमिकेमुळे माणसाला सत्तत्त्वाचे यथार्थ दर्शन घडू शकते काय? एका विशिष्ट भूमिकेमुळे सत्तत्वाच्या एखाया अंशाचे दर्शन घडते. अशी अनंत आंशिक दर्शने घडू शकतात. त्यांपैकी कोणते दर्शन प्रमाणित मानावे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर असाही एक विचार येतो की, माणसाच्या मर्यादित क्षमतांमध्ये सत्तत्त्वाचे प्रमाणित आंशिक दर्शन घडविणाऱ्या काही किमान माफक क्षमता सांगता याव्यात. ज्ञाता म्हणून माणूस सत्तत्वाशी संबंधित असतो. तेव्हा त्याची भूमिका निर्धारित करण्यासाठी काही मापदंडांचा विचार करावा लागतो. अशा मापदंडांचे विस्तृत विवरण देणे आपणास शक्य आहे काय? आणि जे मापदंड आपण व्यवहारतः वापरतो ते सत्तत्त्वाचे प्रमाणित दर्शन घडविण्यास पुरेसे आहेत असे आपण म्हणू शकतो का? ज्या संवेदनेंद्रियांनी आपणास सत्तत्त्वाचे दर्शन होते, त्यांच्या क्षमता असे प्रमाणित दर्शन करून देण्यास पुरेशा आहेत का? आणि या क्षमता पुरेशा आहेत किंवा नाहीत हे कसे ठरवायचे? एखादे इंद्रिय ज्ञान कसे व कितपत ग्रहण करते है त्याच्या रचनाबंधावरून आणि क्षमतेवरून ठरते.

समजा, आपल्या डोळ्यांची रचना आणि क्षमता वेगळ्या प्रकारची असती तर त्यांपासून प्राप्त होणान्या दर्शनाचा आकृतिबंधही वेगळा असू शकेल. अशा परिस्थितीत सत्तत्त्वाचे कोणते दर्शन, कशा प्रकारची रचना व क्षमता असलेल्या संवेदनेंद्रियांपासून प्राप्त होणारे दर्शन हे प्रमाणित व प्रामाणिक मानावयाचे? या प्रश्नाचाही विचार होणे आवश्यक ठरते. 'प्रमाणित' व "प्रामाणिक' म्हणजे संबंध, भूमिका व क्षमता यांच्या निरपेक्ष असणे अभिप्रेत आहे. यावरून असेही सूचित होऊ शकते की, जर ज्ञाता आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकला, तर तो सत्तत्त्वाचे प्रमाणित दर्शन प्राप्त करू शकेल. अशावेळी या दोन्ही प्रकारच्या दर्शनांचा तौलनिक विचार करणे इष्ट ठरेल. अशा विचारांसाठी ज्ञानमीमांसीय ऊहापोह आवश्यक आहे. सत्तत्त्वाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी ज्ञाना दादा knowledge claim केला जातो. कोणत्या परिस्थितीत ज्ञानाचे दावे सत्तत्त्वाचे आंशिक वा पूर्ण दर्शन प्राप्त करून देण्याची खात्री देतात? ज्ञानाचा दावा प्रस्थापित होण्यासाठी ज्ञात्याला ज्ञेयापासून अंतर निर्माण करावे लागते आणि सत्तत्त्वाशी संबंध प्रस्यापित करण्यासाठी हे अंतर इतके कमी करावे लागते की, ज्ञाता व क्षेय यांमध्ये तादात्म्य निर्माण व्हावे. ही गोष्ट कशी साध्य होऊ शकेल याचा विचार करण्यासाठी सापेक्षतावादाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानमीमांसेने काही प्रमेयांचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

अठराव्या शतकातील श्रेष्ठ जर्मन तत्त्वज्ञ इम्पॅन्युअल कांट यांचे सदस्तुमीमांसा व ज्ञानमीमांसा यांस फार मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनुभववाद व बुद्धिवाद यांच्यात समन्वय साधून ज्ञानमीमांसेचा विकास केला. अनुभववाद व बुद्धिवाद या दोन्ही भूमिका सत्तत्त्वाचे दर्शन करून देणान्या ज्ञानभूमिका असल्या तरी त्यांनी सत्तत्त्वाचे आंशिकच दर्शन होते. या आंशिक दर्शनातील दरी भरून काढून सत्तत्त्वाचे समग्र दर्शन प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने कांट यांनी ज्ञानमीमांसेची योजना केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांत सत्तत्त्वाची प्राप्ती मानवी बौद्धिक क्षमतेच्या आवाक्याबाहेरच राहिली. त्यांच्या अशा प्रकारच्या अज्ञेयवादाने ज्ञानमीमांसेच्या कार्याविषयीच मोठे आव्हान निर्माण झाले. यातून एक महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास येते ती अशी की, विशिष्ट संबंधाने निश्चित होणारी ज्ञात्याची भूमिका ही ज्ञेयाचे स्वरूप जाणण्यास व ठरविण्यास महत्त्वाची ठरते. ज्ञानाचा दावा निश्चित ठरण्यासाठी तो वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे. परंतु ज्ञाता विशिष्ट भूमिकेने येणाऱ्या वैशिष्ट्यामुळे मर्यादित असल्यामुळे ज्ञात्याच्या स्थलकालविशिष्ट ज्ञानामुळे त्याची भूमिका स्थिर व अचल राहू शकत नाही असे म्हणावे लागेल काय? स्थल म्हणजे अवकाश आणि काल है अनंत असल्यामुळे त्यांच्या अक्षांनी साधले जाणारे स्थानबिंदूही अनंतच राहतील. त्यामुळे सत्तत्त्वाची दर्शनेही अनंत ठरतील. त्यांतील कोणते दर्शन प्रमाणित ठरवायचे? कसे प्रमाणित ठरवायचे ? अज्ञेयवादाच्या निष्कर्षाप्रत नेणारी कोणतीही भूमिका संशयवादी असते आणि संशयवादामागे सापेक्षतेची. पार्श्वभूमी असते. अशा प्रकारे तत्त्वज्ञानास बाधक व अस्वीकारार्ह ठरणारा अज्ञेयवादही सापेक्षतेची एक महत्त्वाची निष्पत्ती ठरते आणि तिचे निराकरण करण्याचे आव्हान ज्ञानमीमांसेपुढे असते. श्ञानमीमांसेचे मुख्य कार्य, सद्स्तुमीमांसा सिद्ध करणे असून सद्वस्तूचे यथार्थ व प्रमाणित दर्शन प्राप्त करून देणे असते.

सद्यस्तूच्या व्यावहारिक अंगांमध्ये जगताचे ज्ञान येते व ते प्रायः विज्ञानावलंबी असते, तर सद्वस्तूच्या पारमार्थिक स्वरूपामध्ये शुद्ध अस्तित्वाचे ज्ञान असते आणि त्याचा ऊहापोह सद्वस्तुमीमांसेमध्ये केला जातो. विज्ञानात अभ्यासिल्या जाणाऱ्या ज्ञेय विषयांची स्थाननिश्चिती अवकाश व काल यांच्या मितीना केली जाते. न्यूटन या शास्त्रज्ञाने अवकाश व काल यांचे विशिष्ट स्वरूप गृहीत धरून जगताच्या ज्ञानावर प्रकाश टाकला. परंतु अवकाश व काल यांचे न्यूटन यांना अभिप्रेत असलेल्या स्वरूपाच्या आधारे जगतातील सर्वच जञेय-विषयांचे समाधानकारक स्वरूप व स्पष्टीकरण मिळत नाही, असे काही निरीक्षणात व अभ्यासावरून दिसून आले. या पार्श्वभूमीवर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी अवकाश व काल यांच्या स्वरूपाविषयी मांडलेला सिद्धांत अधिक महत्त्वाचा, उपयुक्त आणि अनुत्तरित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणारा ठरला. हा सिद्धांत सापेक्षतावाद म्हणून ओळखला जातो. ज्ञात्याची भूमिका निरपेक्ष नसून सापेक्ष असते कारण ज्या स्थलकालबंधाने ती निर्धारित केली जाते ते स्थल, काल व स्थलकालबंध हेच मुळात निरपेक्ष नसून सापेक्ष असतात. त्यामुळे भिन्न संदर्भवंधांतील ज्ञात्यांची एकाच क्षेय- विषयाविषयीची दर्शने एकसारखी मिळतीजुळती न राहता एकेमकांपासून अगदी भिन्न असतात. विज्ञानाने मांडलेली ही भूमिका सहस्तुमीमांसा अधिक परिष्कृत करण्यास उपकारक आहे, कारण या भूमिकेमुळे ज्ञानमीमांसेचा अभ्यास अधिक विवेचकपणे होण्यास मदत होते. वस्तुतः विज्ञान व सद्वस्तुमीमांसा यांस आवश्यक असणारी ज्ञानमीमांसा वेगवेगळी नसून एकच असते. या दोन्ही ज्ञानशाखांचे व्यवहार भिन्न पातळ्यांवरून होत असतात व त्यानुसार ज्ञानमीमांसेचा अन्वय संदर्भानुसार लावून ज्ञेय-विषयाच्या ज्ञानाबद्दल दावे व विधाने करावयाची असतात आणि केलेली विधाने समजून घ्यायची असतात. 

तत्त्वज्ञानाच्या विभिन्न शाखांमध्ये अवकाश व काल यांचे स्वरूप वेगवेगळे सांगितल्याचे दिसून येते. भौतिक जग बा त्यातील वस्तू घनीभूत द्रव्यस्वरूप आहेत पण अवकाश व काल है मात्र घनीभूत द्रव्यात्मक नाहीत. काही तत्त्वज्ञ अवकाश व काल यांस सत् मानतात, पण घनीभूत द्रव्यात्मक मानीत नाहीत. जर अवकाश व काल घनीभूत द्रव्यात्मक नाहीत, तर त्यांचे नेमके स्वरूप व दर्जा काय मानावयाचा? ते अमूर्त आहेत का? ते कल्पनारूप आहेत का? ते काल्पनिक आहेत का? ती केवळ गृहीतके आहेत का? काही तत्त्वज्ञ कालास सत्य मानीत नाहीत. भारतीय परंपरेतील न्यायदर्शनानुसार अवकाश व काल ही द्रव्ये असून काल हे सर्वाधार द्रव्य आहे. दिक व काल यांच्यामुळे स्थान, परिवर्तन इत्यादीविषयीचे व्यवहार संभवतात. पण वेदांतासारखे दर्शन कालाला सत् मानीत नाही. ज्या एकतत्त्ववादी सद्वस्तुमीमांसेत परिवर्तन असत्त म्हटले जाते, त्या सदूस्तुमीमांसेत काल असत् ठरतो. काही प्रकारच्या सद्वस्तुमीमांसेमध्ये अवकाश आणि काल हे विकल्पात्मक मानले असून त्यांचा वापर व्यवहारतः ज्ञेय-विषय ग्रहणासाठी असतो तर परमार्थतः ते अनस्तित्वाचा अस्तिरूप भास घडविण्यास प्रमाद करणारे मनुष्यकल्पित घटक असतात. जेव्हा ज्ञेय-विषय एक विशिष्ट म्हणून जाणणे आणि समग्रतेने जाणणे यात मोठा फरक आहे. या दोन्हींसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानसाधनांची संगती योग्य असणे अपेक्षित आहे. या ज्ञानसाधनांमध्ये फक्त विविध ग्रहण क्षमता व त्यांची कार्ये एवढ्याच गोष्टी अंतर्भूत नसून ज्ञानग्रहणाच्या व ग्रहण केलेल्या ज्ञानावर करावयाच्या विविध बौद्धिक प्रक्रियांच्या पद्धती. क्षेयविषयाच्या ग्रहणास उपयोजिकेल्या पदार्थसंहती इत्यादी गोष्टीही समाविष्ट असतात. त्यामुळे आपल्या विचारांना सामोरे येणारे काही प्रश्न असे असतात की, जशा अवकाश व काल यांच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पना बदलतात तसे शेयवस्तूंचे मूळ स्वरूपही बदलते का? अवकाश-काल-बंध हा कितपत सद्वस्तूचे ज्ञान व आकलन निर्धारित करतो? सद्वस्तूचे स्वरूप हे अवकाश- काल-बंधाचे स्वरूप व आकलन कितपत निर्धारित करते ? यांच्यातील परस्परसंबंध ज्ञानमीमांसीय निष्पत्तींच्या बाबतीत कितपत महत्त्वाचा असतो? इत्यादी....

सापेक्षतावादाच्या सिद्धांताने प्रामुख्याने काल आणि गतीच्या संदर्भात कालज्ञान याविषयी मांडलेल्या दृष्टिकोनामुळे विज्ञानाच्या प्रगतीला एक वेगळी दिशा मिळाली. ज्ञात्याच्या अनुपस्थितीत कालाचे अस्तित्व नसते आणि ज्ञात्याच्या विशिष्ट भूमिकेनुसार कालाचे स्वरूप निश्चित होते. स्थल किंवा अवकाश आणि काल यांस आइन्स्टाईनपूर्व विज्ञानात स्वतंत्र व वेगळे अस्तित्व होते. त्यात बदल होऊन अवकाश-काल- बंध या स्वतंत्र मितीची कल्पना उदयास आली आणि त्यामुळे विज्ञानातील अनेक निरीक्षणांची योग्य संगती लागू शकली. माणसाला अनुभवात जे मिळते, त्यांस तो तुकडे समजून त्यांना जोडून त्यांपासून एक दीर्धक किंवा वितान निर्माण करतो. या वितानामधून तो सातत्य आणि पुढे नित्यत्व या कल्पना निर्माण करतो. यातूनच अवकाश आणि काल यांचीही विताने निर्माण केली जातात. कोणत्याही अवकाशास आणि कालास तत्त्वतः आरंभ कोठेही असतो, पण व्यवहारतः तो विशिष्ट बिंदूने दर्शविला जातो. तत्त्वतः त्यास आरंभ व अंत दाखविता येत नसल्याने अवकाश व काल हे अनंत ठरतात. सर्व मूर्त ज्ञेयविषय या अवकाश- काल-वितानामध्ये असतात. वस्तुतः अवकाश व काल यांची विताने स्वतंत्र वेगळी नसतात, पण वैचारिक स्पष्टीकरणाच्या व्यवहारासाठी ती तशी मानली जातात. सर्व ज्ञेयवस्तू व त्यांचे ज्ञान हे अवकाश-काल-बंधाच्या संदर्भ चौकटीत आपणास मिळते व तसाच त्यांचा व्यवहार केला जातो.

गती किंवा बदल असताना कालाची संवेदना जागृत होते. बदलाची संवेदना होण्यासाठी एक घटक स्थिर व दुसरा चल असणे आवश्यक असते. सद्वस्तूचे दर्शन होण्यासाठी विभिन्न पर्यायी प्रणाली असू शकतात. यांतील दर्शनेही अर्थात भिन्न राहतील. पण एका प्रणालीतील दर्शकाला जेव्हा दुसऱ्या प्रणालीत डोकावता येऊ शकेल तेव्हाच त्याला वेगळ्या दर्शनाची शक्यता प्रत्यक्षात उत्तरतांना जाणवू शकेल. प्रत्येक प्रणालीत सद्वस्तूचे आंशिक दर्शनच प्राप्त होत असते. जेव्हा दर्शक या प्रणालींच्या पलीकडे जाऊन 'भूमिका' ग्रहण करेल तेव्हा त्याला सद्यस्तूच्या सकल स्वरूपाचे ग्रहण शक्य होईल. पण है प्रत्यक्ष व्यवहारतः संभवत नसल्याने विज्ञानाच्या कक्षेत ते कितपत व कसे बसू शकेल याविषयी दाट शंका राहते. सद्यस्तूचे समग्रतेने ज्ञान प्राप्त करणे यापेक्षा विश्वातील सर्व वस्तूंना लागू होऊ शकणाऱ्या नियमांना शोधून काढणे याकडे विज्ञानाचे लक्ष केंद्रित असते. तत्त्वज्ञानामध्ये मात्र सद्वस्तूचे सामग्ग्राने ज्ञान ग्रहण करणे हे उद्दिष्ट असते. त्यामुळे सद्वस्तूचा बेध घेणार्या पर्यायी विभिन्न प्रणालीचा उपयोग विज्ञान व तत्त्वज्ञान या दोहोंत केला जात असला तरी विज्ञान त्या सर्व संभाव्य प्रणालींमधील समान सूत्र शोधण्याचा प्रयत्न करते, तर तत्त्वज्ञान विशिष्ट असलेल्या सर्वच प्रणालींच्या पलीकडे जाऊन सद्वस्तूच्या समग्रतेचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करीत असते. दोन्हींच्या प्रयत्नांत सापेक्षतेचा मोठा अडसर असतो खरा; पण ते आपापल्या परींनी तो अडसर दूर करीत असतात. दोहोंचे उद्दिष्ट सद्वस्तूचे मूलग्राही ज्ञान हेच असले तरी 'मूल' म्हणून एकच रूप दोहोंना अभिप्रेत नसते. त्यामुळे दोन्ही ज्ञानक्षेत्रांत सापेक्षतेच्या निष्पत्ती आणि सापेक्षतेच्या अतीत जाऊन सद्वस्तूचा वेध घेण्याची परिणती वेगवेगळ्या असतात.

Tags: सुभाषचंद्र भेलके सापेक्षतावाद तत्त्वज्ञान बुद्धिवाद ज्ञानमीमांसा सदस्तुमीमांसा जर्मन तत्त्वज्ञ इम्पॅन्युअल कांट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके