डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

श्री. मधु मंगेश कर्णिक यांची 'भाकरी आणि फूल' ही कादंबरी दलित-महार समाजावर आधारलेली, कोकणच्या खेड्याची पार्श्वभूमी असलेली शेवटपर्यंत चित्ताकर्षक वाटणारी कथा आहे. त्यात गावाच्या टोकाला बसलेला महारवाडा, माणसांचे अत्यंतिक दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, समाजाकडून लाभलेली अवहेलना इ.चे हृदयभेदक वर्णन आढळते. कथेचा काळ स्वातंत्र्यप्राप्तीपासून पुढच्या पंचवीस वर्षांचा आहे. एका अस्पृश्य कुटुंबाचा ह्या काळातील आलेख काढून सबंध त्या समाजाची स्थिती दर्शविलेली आहे.

श्री. मधु मंगेश कर्णिक यांची 'भाकरी आणि फूल' ही कादंबरी दलित-महार समाजावर आधारलेली, कोकणच्या खेड्याची पार्श्वभूमी असलेली शेवटपर्यंत चित्ताकर्षक वाटणारी कथा आहे. त्यात गावाच्या टोकाला बसलेला महारवाडा, माणसांचे अत्यंतिक दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, समाजाकडून लाभलेली अवहेलना इ.चे हृदयभेदक वर्णन आढळते. कथेचा काळ स्वातंत्र्यप्राप्तीपासून पुढच्या पंचवीस वर्षांचा आहे. एका अस्पृश्य कुटुंबाचा ह्या काळातील आलेख काढून सबंध त्या समाजाची स्थिती दर्शविलेली आहे.

सामान्यतः दलित किंवा झोपडपट्टीवरील प्रसिद्ध पुस्तकांतून अस्वच्छ परिसर, गलिच्छ भाषा, घाणेरडे वागणे, बीभत्सता जाणि दारिद्र्याचे वर्णन असते. मध्यमवर्गीय सहिष्णु वृत्तीच्या माणसांना ते वर्णन वाचताना शहारते. पुढे वाचू नये, असेही क्षणभर वाटते. पण या कादंबरीत दारिद्र्याचे, लाचारीचे वर्णन असले तरी त्यात बीभत्सता नाही. गलिच्छ वर्णने नाहीत आणि म्हणूनच की काय, सत्य परिस्थितीवरील ही कथा एका बैठकीत वाचून संपवता येते. लेखक स्वतः सवर्ण उच्च समाजातीक असल्यामुळे लेखनातील तोल राखला गेला आहे.   

'महारडा' म्हटल्या जाणाऱ्यांना सुद्धा गावात विशिष्ट काम आहे. सणासुदीला स्पृश्यांकडून काही तरी देण्याची रीत आहे. पारंपारिक पद्धतीने अस्पृश्यांनी आपली पायरी सांभाळावी तर स्पृश्यांनी थोरवी मिरवावी हेच योग्य असे मत एका पात्राच्या तोंडी आहे.

शिवनाक महार (कदम) याच्या कुटुंबाची ही कथा एकूण महारांची प्रातिनिधीक बनलेली आहे. शिवनाक स्पृश्यांच्या भटा-खोतांच्या दडपणाखालील एक दरिद्री महार. त्याचे तीन मुलगे गोपाळ, पांडुरंग आणि आनंद ही स्पर्धेतील प्रमुख पात्रे आहेत. तिथेही नवविचारांनी भारलेले, धडपडणारे तरुण आहेत. पैकी गोपाळ मोठा. मुंबईत गिरणीमध्ये कामाला असलेला. पांढरे स्वच्छ कपडे घालणारा. शुद्ध भाषा बोलणारा. घराला आणि समाजाला सुधारण्याची तळमळ असलेला आंबेडकरांचा भक्त. पांडुरंग हा कथेच्या प्रारंभी लहान शाळकरी मुलगा गोपाळदादावर श्रद्धा असलेला आणि त्याच वर्षी जन्मलेला आनंद ज्याच्यावर मोठ्या भावांचा प्रभाव पडत जातो असा. 

कथेतील अनेक पात्रांच्या तोंडी अशुद्ध कोकणी भाषा आहे. वातावरण दारिद्र्यपूर्ण आहे. लोकांकडे अन्न नाही. सरपणाचे हाल आहेत. वस्त्रे लाज राखण्यापुरतीच. ताई बामणीणीबाईसारखी एखादी सवर्ण स्त्री स्वाभाविक दयाळूपणाने म्हारवाड्यात जाऊन शिवनाकाच्या बायकोचे बाळंतपण करते आणि आनंदाचा जन्म होतो. हा प्रसंग फार हृदयस्पर्शी आहे. पुस्तकाचे परीक्षण करताना असे वाटू लागते की, यातील चित्रस्वरूप प्रसंगांची थोडक्यात ओळख करून द्यावी, इतके ते प्रसंग सरस उतरले आहेत. तशीच व्यक्तिचित्रेही जाता जाता रेखाटलेली पण मनस्वी आहेत. उदाहरणार्थ, म्हातारी जिजी महारोगी मुलाची आई, शिवनाकाच्या मुलांवर प्रेम करणारी. गोपाळची सुशिक्षित, नोकरी करणारी बायको नलिनी, म्हातारा मोन्या इ. शाळिग्रामची बहीण सुनंदा ही पांडुरंगाशी मैत्री करते. तिचे मन शुद्ध असेल पण पांडुरंगाच्या मनात तिच्याशी लग्न व्हावे, ही इच्छा अंकुरते. नलिनीच्या म्हणण्याप्रमाणे दलित सवर्ण विवाहाचे गोड स्वप्न तो रंगवू लागतो आणि निराश होतो. पण सुनंदा मात्र त्याच्याशी शेवटपर्यंत आपलेपणाने वागत राहते. गोपाळाची नोकरी, शिक्षण घेता घेता पांडुरंगाचीही नोकरी, लग्न आणि त्यातून समाजाला बाहेर काढण्याची धडपड! आंबेडकरांचा धर्मांतराचा मार्गही ही मंडळी स्वीकारतात पण आंबेडकरांच्या मृत्यूनंतर खंतावतात. ख्रिश्चन झालेले लोक प्रतिष्ठित जीवन जगू शकतात पण बौद्ध हे तसेच मागास जीवन घालवतात, हाही एक चर्चात्मक प्रश्न लेखकाने स्पर्शिला आहे. आंबेडकरांचा भक्त गोपाळ त्यांचे कार्य चालविण्याची धडपड करतो; भावना, प्रेरणा देतो पण अखेर स्वतःच निष्क्रिय होतो. पांडुरंग दलितोद्धाराचे काम करतो पण स्वतःचा संसार, नोकरी यात गर्क होतो. तरीही आनंदाच्या ध्येयवादाकडे कौतुकाने बघतात. आनंद हा तरुण नवविचार लेखन करतो. दलित महार समाजात जन्मल्याचे काहीसे कौतुक मानतो! 

कादंबरीच्या शेवटी आनंदाला त्याच्या पुस्तकाला मिळालेल्या राज्य पारितोषिक वितरण समारंभात तो पोटतिडकीचे भाषण करतो आणि त्याहीनंतर शिवनाकाच्या दहाव्या दिवसाचे विधी पार पाडण्यासाठी आलेल्या पांडुरंगाने वर्तमानपत्रात वाचलेली बातमी-दलित बंडखोर तरुण लेखक व कवी आनंद कदमने काळा झेंडा घेऊन विधानसभेवर मोर्चा नेला त्यावेळी तरुणांच्या हातात शिळ्या भाकरीचे तुकडे व कोमेजलेली फुले होती. 

आता लेखकाचे सुरवातीचे निवेदन पुन्हा वाचावेसे वाटते. त्यांचे गाव करुळ! तेथील करप्या महार त्याचे 'मोगरशिंग' वाजवणे आणि स्वातंत्र्याच्या पंचवीस वर्षांच्या कार्यक्रमाचा विचार करायला जमलेल्या मुख्यमंत्र्यासमवेत चर्चेचा प्रसंग-सुरेख चित्रपट काढावा. चित्रपटाचे नाव ठेवावे 'भाकरी व फुल'. जे आठराशे सत्तावणची आठवण देईल. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करताना भाकरी आणि शुभ्र कमळाचे फूल ही परवलीची खूण होती. ही सारी कथा ऐकताना शेवटी कथेच्या नावाचा संदर्भ लागतो तो तेथेच!

'भाकरी आणि फूल'
लेखक - मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक - केशव विष्णू कोठावळे
मुद्रणालय,
मुल्य -  25 रु. पृष्ठे - 144

Tags: स्वातंत्र्य. बाबासाहेब आंबेडकर महारवाडा सुधा डेंगळे भाकरी आणि फूल Freedom. #मधू मंगेश कर्णिक Babasaheb Ambedkar Maharwada Sudha Dengale Bhakari Aani Phool #Madhu Mangesh Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके