डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःसाठी जेव्हा सुख मिळवायला व्यक्ती धडपडते, तेव्हा त्या सुखाला नेहमीच काळी झालर असते आणि ते सुख कधीही निखालस आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच बालकवी आनंदाची कल्पना करताना साऱ्या चराचरात आनंद भरलेला बघतात.

आनंद हा विषय चिंतनाचा होऊ शकतो का ? चिंतन म्हणजे गंभीरपणे विचार करणं. एखादा विचार घेऊन मनातल्या मनात त्याला चारी अंगांनी तपासणं. आनंद कधी केवळ मनात मावत नाही. आनंदाला मनात कोंडून ठेवणं मुष्किल होतं. तो चारही अंगांनी आपल्या मनाच्या बाहेर उसळी मारून येऊ बघतो आणि म्हणूनच बालकवींनी म्हटलं 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे । वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे । आपल्या चारही बाजूस जेव्हा आनंद भरलेला दिसतो, तेव्हाच आपण खरे आनंदी होतो. आनंद ही गोष्ट दुसऱ्याबरोबर भोगण्याची, लुटण्याची आहे. जगात अनेक धर्म उदयाला आले, अनेक तत्त्वज्ञानं जन्माला आली. 

तत्त्वविचाराने अनेक वाद उदयाला आले. समाजवाद, साम्यवाद, मानवतावाद, अगदी गांधीवादही निघाला. स्वतः गांधीजींना ठाऊकच नव्हतं की आपल्या चिंतनातून, विचार प्रकटनातून पुढे गांधीवाद म्हणून काही निघेल. पण महत्त्वाची गोष्ट ही की ज्यांनी ज्यांनी जगापुढे धर्माच्या नावाने, तत्त्वज्ञानाच्या नावाने किंवा वादांच्या नावाने काही विचार मांडले त्या सर्व महात्म्यांच्या, विचारवंतांच्या मनात तेव्हा काय भावना होती ती आपण समजून घेतली पाहिजे. सर्वांच्या मनात एकच भावना होती की आपण सांगतो त्या मार्गाने गेले तर सर्व जग सुखी होईल आणि आपण तर नित्यच अनुभवतो की आपण सुखी असलो म्हणजे आनंदात असतो. म्हणजे पहा, हा आनंद किती महत्त्वाचा आहे !

आनंदवाद असावा की नसावा अशी चर्चाच मुळी कधी कुणी केली नाही. आनंद ही जीवनातली एक अत्यंत महत्त्वाची आवश्यक गोष्ट आहे. चिंतनाचा विषय होऊ शकतो तो, म्हणजे आनंद कशाला म्हणायचे ? चारचौघांबरोबर बसून गप्पा मारता मारता पोटभर हसणं हा आनंद मोठा की आपल्या खोलीत दारं बंद करून आपली खरी वा खोटी कमाई मोजत बसणं हा मोठा आनंद ? आनंद ही सर्वांबरोबर वाटून घेण्याची गोष्ट आहे की एकट्यानं भोगण्याची गोष्ट आहे याचा विचार झाला पाहिजे. काही आनंद असा असतो की जो एकट्यानं भोगता येतो. उदा. संगीत ऐकणं, पुस्तकं वाचणं. 

कलेचा आविष्कार हा व्यक्तीला आनंद देतो पण हे सर्व व्यक्तीला मोहरून टाकणारे आनंद समुदायालाही आनंद देऊ शकतात. पण कधी कधी व्यक्तिगत आनंदाची कल्पनाही विकृत बनते व दुसऱ्याचा आनंद हिरावून घेऊन स्वतःला सुख घेण्यातच आनंद मानला जातो. याचे प्रकार अनंत होऊ शकतात. एखादा पुरुष आपल्या विषय सुखासाठी एखाद्या स्त्रीवर बलात्कार करतो. तो तात्पुरतं सुख मिळवतो पण चिरकालीन आनंद मिळवू शकत नाही. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःसाठी जेव्हा सुख मिळवायला व्यक्ती धडपडते, तेव्हा त्या सुखाला नेहमीच काळी झालर असते आणि ते सुख कधीही निखालस आनंद देऊ शकत नाही.

म्हणूनच बालकवी आनंदाची कल्पना करताना साऱ्या चराचरात आनंद भरलेला बघतात. यावरून आठवलं, बिहारमधल्या एका महिला शिबिरात एकदा पाच मिनिटं फक्त खो खो मोठ्यानं हसण्याचा कार्यक्रम ठेवला. या सर्व महिला अत्यंत मागासलेल्या, गरीब व दलित मागास जातीच्या. त्यांच्या आयुष्यात आनंद नावाची चीजच नाही, दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात 5 मिनिटं हसण्याचा कार्यक्रम ठेवला नव्हता. सायंकाळी तीन-चार जणी माझ्याकडे आल्या व म्हणाल्या, 'आज आपने हसाया नही ? हमे रोज हसाना. हम सब साथ हसेंगे. इतना आनंद हमे जिंदगी में कभी मिला नही. हे वाक्य मला तरी बरंच काही सांगून गेलं.

(सौजन्य : मुंबई आकाशवाणी)

Tags: बिहार  दलित तत्वज्ञान गांधी बालकवी आनंद सुधा वर्दे Bihar Dalit Philosophy Gandhi Balakavi Happiness Sudha warde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके