डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एखाद्या पुस्तकामुळे आणखी किती तरंग उमटतात आपल्या थंड, शांत सामाजिक जगण्यामध्ये! परंतु तरीही एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतोच. पत्रकारितेला ‘राम राम’ करताना ‘आपणच प्रश्नांवर उत्तरं शोधायचा प्रयत्न करायला हवा,’ असं जे अमिता म्हणाली होती; त्याचं आज दहा वर्षांनंतर काय झालं? या काळात ती कधी या संस्थेसोबत, तर कधी त्या संस्थेसोबत काम करत राहिली. त्या कामाच्या अनुभवातून तिने हे पुस्तक लिहिलं. ती पुढेही लिहीत राहील; पण आपल्या पद्धतीने प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी तिला मोकळ्या विचारांच्या एखाद्या संस्थेची गरज आहे. अशा संस्थेची साथ तिला अद्याप मिळालेली नाही. 

अमिता नायडू यांच्या ‘प्लॅटफॉर्म नंबर झीरो’ या पुस्तकाशी माझा किमान तिहेरी संबंध आहे. एक- या पुस्तकाचा मी प्रकाशक आहे. दोन- या पुस्तकाचा मी संपादक आहे. तीन- लेखिकेचा मी किमान पंचवीस वर्षांपासूनचा मित्र आहे. त्यामुळे यांतील कोणत्या भूमिकेत शिरून या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या लेखिकेबद्दल लिहावं, अशा संभ्रमात मी आहे. त्यामुळे या तीनही भूमिकांत एकदमच शिरून लिहिण्याचा पर्याय मी इथे निवडतो आहे. कारण हे पुस्तक आज ज्या स्वरूपात वाचकांसमोर आहे, त्याला या तीनही भूमिका कारणीभूत आहेत. कसं, ते सांगतो. 

अमिता आणि मी कॉलेजपासूनचे मित्र. दोघांचीही कॉलेजेस वेगवेगळी, पण पत्रकारिता करण्याच्या वेडाने पछाडलेलो असल्याने कुठून तरी एकत्र भेटलेलो. काही काळ एका ठिकाणी एकत्र कामही केलं. ते दिवस ऐन तारुण्यातले, त्यामुळे ‘हे करायला पाहिजे’ आणि ‘ते करायला पाहिजे’- अशा गप्पांनी भारलेले. पुढे मी ‘किर्लोस्कर’ मासिकांमध्ये रुजू झालो तरी आमच्यातील मैत्र कायम राहिलं. पुढे तीनच वर्षांनी मी माझ्या सहकाऱ्यांसह ‘युनिक फीचर्स’ ही समांतर पत्रकारिता करू इच्छिणारी माध्यम संस्था काढली आणि पाठोपाठ अमिता तिथे रुजू झाली.      

एकीकडे नानाविध विषयांवर लिखाण चाललेलं असताना तिच्या डोक्यात लहान मुलांचा विचार सतत चालू असे. त्यामुळे ती मुलांसाठी लिही, मुलांच्या प्रश्नांसंबंधी लिही. वंचित मुलांच्या प्रश्नांबद्दल तिला सुरुवातीपासूनच ओढा फार. पण हा ओढा तिला स्वस्थ बसू देईना, तेव्हा तिने पत्रकारितेला ‘बाय-बाय’ करायचं ठरवलं. ‘प्रश्नांवर फक्त लिहून काय उपयोग होणार आहे? प्रश्नांवर आपणच उत्तरं शोधायला पाहिजेत,’ अशा निष्कर्षापर्यंत ती आली आणि तिने सामाजिक कार्यात शिरायचं ठरवलं. निराधार स्त्रियांच्या आधारगृहाची आधी सुपरिटेंडेंट आणि नंतर प्रमुख अशी जबाबदारी तिने तीन-चार वर्षं पार पाडली. हे काम करत असतानाच तिने स्टेशनवर बेवारस आयुष्य जगणाऱ्या मुलांमध्ये वेळ घालवायला सुरुवात केली. ‘स्पॅरो’ या संस्थेमार्फत ती तिथे जाऊ लागली, मुलांशी बोलू लागली आणि त्यांना विविध कामात मदत करू लागली. तिचं हे काम सहाएक वर्षं चाललं होतं. या काळात (आणि कामात) अमिता बदलली, तिचं व्यक्तिमत्त्व बदललं, समज बदलली. ती मुळातच बेधडक स्वभावाची. जबरदस्त आत्मविश्वास बाळगून असलेली. पण स्टेशनवरच्या मुलांच्या सहवासाने ती आणखी निडर बनली. तिचं हे बदलणं मी बघत होतो. तिच्याशी बोलत होतो.    

पुढे कुठल्या तरी कारणाने अमिताचं ते काम थांबलं. मग ती मुलांच्याच अन्य प्रश्नांवर काम करू लागली. दरम्यान, ‘युनिक फीचर्स’ने प्रकाशनविश्वात पाऊल टाकलं होतं. मराठीत जी पुस्तकं सहजी निघत नाहीत ती पुस्तकं आपण काढायची, असा त्यामागचा विचार होता. ‘युनिक फीचर्स’ची शोधक वृत्ती पुस्तक प्रकाशनातही रुजवता येईल का, असा प्रयत्न त्यामागे होता. मला अमिताचं मुलांमधलं काम आतून-बाहेरून माहीत होतं. त्यामुळे स्टेशनवरील मुलांमध्ये घालवलेल्या त्या दिवसांबद्दल, त्या मुलांच्या जगण्याबद्दल तिने लिहावं, असं मी तिला म्हटलं. आधी तिला ते पटत नव्हतं. मी आता ते काम थांबवलंय, माझा त्या मुलांशी आता संपर्क उरलेला नाही, असा नकारात्मक सूर तिने काढला. पण तिने आयुष्याची जी सहा वर्षं त्या मुलांसाठी दिली होती, ती वाया जाऊ नयेत, असं तिचा मित्र म्हणून माझं म्हणणं होतं. दुसरीकडे, तिने पुस्तक लिहिलं तर भारतभरातील स्टेशनच्या आडोशाने राहणाऱ्या लाखो मुलांचं जगणं प्रातिनिधिक रूपात का होईना, प्रकाशात येईल, असं पत्रकार-संपादक या नात्याने मला जाणवत होतं. तिसरीकडे, या पुस्तकामार्फत एक अस्पर्शित विषय आपण वाचकांसमोर आणू शकू, असं प्रकाशक या नात्याने वाटत होतं. 

अखेरीस अमिताने पुस्तक लिहायचं ठरवलं; आणि चर्चा-दुरुस्त्या-बदलाबदली-संपादन या सर्व प्रक्रियांतून जाऊन वाचकाला हादरवून टाकणारं, त्याचं अनुभवविश्व विस्तारणारं अन्‌ एका दुर्लक्षित प्रश्नाकडे भेदकपणे लक्ष वेधणारं ‘प्लॅटफॉर्म नंबर झीरो’ हे पुस्तक तयार झालं. मराठीतलं या प्रकारचं हे एकमेव पुस्तक असावं. 

आपल्याकडे कथा, कादंबरी, कविता, ललित, वैचारिक आणि समीक्षात्मक वगैरे प्रकारच्या लेखनाचा बराच विकास झाला आहे. मात्र समाजात घुसून, समकालीन प्रश्नांना भिडून वाचकांना खडबडून जागं करण्याचा प्रवाह पुरेसा विस्तारलेला नाही. अनिल अवचट, निळू दामले वगैरे मंडळींनी असं खणखणीत लेखन केलं आहे. आम्हीही ‘युनिक फीचर्स’मधील मित्रांनी मिळून ‘अर्धी मुंबई’ हे त्यांच्या परंपरेतील पुस्तक लिहिलं आहे. अमिताचं ‘प्लॅटफॉर्म नंबर झीरो’ हेही त्याच परंपरेतलं. अवचटांनी दीर्घ काळ जे पत्रकारी रिपोर्ताज शैलीतलं लेखन केलं, त्यापेक्षा अमिताचं लेखन वेगळं असलं; तरी हा प्रवाह पुढे नेणारं अमिताचं हे पुस्तक आहे. पत्रकारांच्या येणाऱ्या पिढ्यांना या पुस्तकातून समकालीन विषयांवर लिहिण्याची प्रेरणा मिळावी!

अमिताच्या या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायलाच हवं. एरवी लेखकाला एखादा विषय सुचतो आणि मग तो त्या विषयाचा माग वगैरे काढायला लागतो. बऱ्याचदा जेवढी माहिती हवी होती तेवढी मिळाली असं वाटलं की, लेखक थांबतो आणि लिहिता होतो. या प्रक्रियेत लेखकाची समज, त्याची दृष्टी, त्याचा दमसास यावर पुस्तकाची खोली ठरते. विषयाचा आवाका पुस्तकात किती प्रतिबिंबित होणार, हेही ठरतं. अनेकदा विषय वाचायलाच हवा असा असतो, पण ते पुस्तक वाचून वाचकाचं समाधान होतंच असं नाही. अमिताच्या पुस्तकाबाबत असं होत नाही. कारण अमुक एका विषयावर पुस्तक लिहायला हवं, या ‘लेखकीय’ गरजेतून हे पुस्तक लिहिलं गेलेलं नाही. आपल्या ‘आतल्या आवाजा’ला स्मरून अमिताने स्टेशनवरील मुलांमध्ये सहा वर्षं घालवली, तेव्हा त्यामागचा हेतू पुस्तक लिहिणे हा नव्हता. आपण जे सर्व अनुभवतो आहोत ते पुस्तकात लिहायचं आहे, याची कोणतीही जाणीव तेव्हा अमितामध्ये नव्हती. त्यामुळे ‘माहिती मिळाली, चला लिहून टाकू या’ या दृष्टिकोनाची मर्यादा तिला पडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच हे पुस्तक वाचताना आपण एक धगधगीत वास्तव अनुभवत आहोत याची जाणीव होत राहते. वाचकाला अस्वस्थ करून सोडते. अमितामधील सामाजिक कार्यकर्तीची कळकळ आणि पत्रकारातील सहज-सोपी चित्रमय शैली यांच्या मिलाफामुळे हे पुस्तक वाचकाच्या डोक्यात जसं घुसतंच!     

हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तिला (व प्रकाशक या नात्याने आम्हाला) वाचकांकडून जो प्रतिसाद मिळाला, त्यात याच अनुभवाचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. ‘आम्हाला या मुलांचं हे दीनवाणं आणि उघडंवाघडं जगणं माहीतच नव्हतं. आम्ही आमच्या जागेवर या मुलांसाठी काही करू शकू की नाही माहीत नाही, परंतु या मुलांबद्दलचा आमचा दूषित दृष्टिकोन या पुस्तकामुळे बदलला’, असं वाचक कळवत होते.     

एखाद्या पुस्तकामुळे आणखी किती तरंग उमटतात आपल्या थंड, शांत सामाजिक जगण्यामध्ये! परंतु तरीही एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतोच. पत्रकारितेला ‘राम राम’ करताना ‘आपणच प्रश्नांवर उत्तरं शोधायचा प्रयत्न करायला हवा,’ असं जे अमिता म्हणाली होती; त्याचं आज दहा वर्षांनंतर काय झालं? या काळात ती कधी या संस्थेसोबत, तर कधी त्या संस्थेसोबत काम करत राहिली. त्या कामाच्या अनुभवातून तिने हे पुस्तक लिहिलं. ती पुढेही लिहीत राहील; पण आपल्या पद्धतीने प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी तिला मोकळ्या विचारांच्या एखाद्या संस्थेची गरज आहे. अशा संस्थेची साथ तिला अद्याप मिळालेली नाही. 

अशी एखादी संस्था पुढे येईल का आणि आज विधिसंघर्षग्रस्त मुलांमध्ये काम करणाऱ्या अमिताला एखादा आश्वासक ‘प्लॅटफॉर्म’ मिळेल का, हा तो प्रश्न! हल्ली ज्या रीतीने पुरस्कार अपसंस्कृती फोफावली आहे, ती पाहता, आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळू नये अशी मनोमन प्रार्थना करण्याचे आजचे दिवस आहेत. त्यामुळे अमिताच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याचं जेव्हा कळलं, तेव्हा अमिताला म्हटलं, ‘नशीबवान आहेस तू! कोणताही अर्ज, विनंती न करता तुला पुरस्कार मिळाला. पुरस्काराचं सोड; पण या पुरस्कारामुळे तुझी पुढील वाट सुकर होईल कदाचित!’

Tags: युनिक फीचर्स सुहास कुलकर्णी प्लॅटफॉर्म नंबर झिरो अमिता नायडू Unique Features Suhas Kulkrani Platform No. Zero Amita Naidu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास कुलकर्णी

संपादक - युनिक फीचर्स 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके