डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

संशोधक निर्माण करू पाहणारा - संशोधक : टेनिथ आदित्य (तामिळनाडू)

वयाचं दहावं वर्ष त्याच्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. केळीची पानं टिकवण्याची पद्धत त्याला सापडली. दरम्यान, प्रोग्रामिंगच्या सहा भाषा त्याला अवगत झाल्या होत्या. आणखी एक कल्पना त्याला या काळात सुचली. निरनिराळ्या ठिकाणी स्वतःच्या प्रेरणेने संशोधन करणाऱ्या मुलांना व्यासपीठ मिळावं, तरुणांना संशोधन करण्याची आणि नवं काही तरी निर्माण करण्यासाठीची प्रेरणा मिळावी- याकरता एक चळवळ त्याने सुरू केली. तिचं नाव होतं, ‘लेट्‌स इनोव्हेट यूथ’.

रस्त्यांच्या कडेला हिरवीगार-डौलदार झाडं आहेत, निरनिराळ्या रंगांच्या फुलांचे सडे रस्त्यांवर-फुटपाथवर अंथरले आहेत. पहाटे येऊन स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना फक्त झाडांची गळून पडलेली, वाळलेली फुलं-पानं बाजूला करणं- एवढंच काम आहे. अशा ठिकाणी राहायला मिळावं, असं कुणाला वाटणार नाही? पण आपण आज ज्या गावात-शहरात राहतो, तिथे असं चित्र दिसतं का? आपल्या आसपास तर याच्या उलट चित्र असतं. रस्तोरस्ती प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या, कदाचित आपणही टाकलेली वेफर्सची पाकिटं, चॉकलेटची रॅपर्स असं काय काय पडलेलं असतं. असल्याच कचऱ्याने आजूबाजूच्या कचराकुंड्या ओसंडून वाहत असतात. रस्त्याखालच्या गटारात कुठे तरी प्लॅस्टिकचे बोळे अडकून ती तुंबलेली असतात. आपल्या आई-बाबांच्याच वयाची काही माणसं येऊन आपण करून ठेवलेला हा सगळा कचरा स्वच्छ करत असतात. हे सगळं पाहताना आपल्या मनात काय विचार येतो? आपण प्लॅस्टिक वापरणं कमी करायला हवं. कचरा नेहमी कुंडीतच टाकायला हवा.

पण तमिळनाडूमधल्या एका मुलाने आपल्या गावात असे कचऱ्याचे ढीग पाहिले, तेव्हा त्याच्या मनात वेगळीच कल्पना आली. त्याला असं वाटलं की, रोजच्या वापरातल्या किती साध्यासुध्या गोष्टी प्लॅस्टिकच्या बनलेल्या असतात. आपल्या देशात सतत काही तरी सण-समारंभ असतातच. त्यानिमित्ताने मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना बोलावून पार्टी करायला सगळ्यांनाच आवडतं. प्लॅस्टिक, थर्माकोल हे स्वस्तही असतात आणि टिकाऊही. त्यामुळे तिथे प्लॅस्टिक-थर्माकोलच्या वस्तू वापरणं सगळ्यांनाच परवडतं. पण या सगळ्यातून जो प्रचंड कचरा तयार होतो, त्याचं करायचं काय? आपला एवढा मोठा देश, त्यात सगळ्यांच्या लाईफस्टाईल इतक्या वेगवेगळ्या! दिवसाकाठी प्लॅस्टिकचे डोंगर तयार होत असतील. आपण जरी आपल्याकडचा कचरा व्यवस्थित कुंडीत टाकला, तरी कुठे तरी जाऊन तो शिल्लक राहणारच. प्लॅस्टिक मातीत थोडंच मिसळतं? रोज इतक्या प्लॅस्टिकचं विघटन- म्हणजे त्याला मातीत मिसळण्यायोग्य करण्यासाठी किंवा त्याच्यापासून पुन्हा नव्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आपल्या देशात पुरेशा प्रमाणात नाही. मग ‘या सगळ्यात मी काय करू शकतो?’ असा विचार या दहा वर्षांच्या मुलाने केला आणि तो कामाला लागला. 

तसा लहानपणापासून तो भलताच ‘उपद्‌व्यापी’ होता. आपल्या घरातली एक खोली त्याने प्रयोगशाळाच करून ठेवली होती. त्याला सतत काही ना काही प्रश्न पडायचे. मग या सगळ्यात मला काय करता येईल, अशा विचाराला तो लागायचा. तो आपल्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकांमध्ये शोधायचा. पण तो ज्या गावात राहायचा, तिथे त्याला मिळून-मिळून अशी किती पुस्तकं मिळणार? कारण याच्यासमोरचे प्रश्नच मोठे अवघड असायचे. म्हणजे उदाहरणार्थ- त्याला प्रयोगशाळेमध्ये काम करताना विजेवर चालणारी वेगवेगळी उपकरणं वापरायला लागायची. आणि त्याच्यासाठी भरपूर प्लग पॉइंट्‌सही लागायचे. अशा वेळी आपण एक्सटेन्शन बोर्ड्‌स वापरतो. पण असे किती बोर्ड्‌स वापरणार? इतक्या वायर्स हाताळायच्या म्हणजे कटकटीचं काम आणि धोकादायकही. त्यावर या पठ्ठ्याने शक्कल लढवली, एक ॲडजस्टेबल इलेक्ट्रिसिटी एक्सटेंशन बनवलं. त्यावर त्याला बरीच उपकरणं वापरता येऊ लागली.

काहीही काम करताना साधीशीही अडचण आली तरी तिच्या अगदी मुळाशी जायचं आणि उत्तर सापडेपर्यंत डोक्यात तो प्रश्न सतत घोळवत राहायचं, अशी त्या मुलाची सवय होती. सहाव्या वर्षापासूनच त्याने संगणकाशी मैत्री करून टाकली होती. त्यामुळे पुस्तकांत न सापडणारी उत्तरं तो इंटरनेटवर शोधायचा. 

बराच काथ्याकूट केल्यानंतर त्याला प्लॅस्टिक वापराला पर्याय म्हणून एक भन्नाट कल्पना सुचली. आपल्याकडे सणासुदीला चांगले-चुंगले पदार्थ बनवून केळीच्या पानात जेवायला वाढायची पद्धत असते. पूर्वी लग्नसमारंभांत पानांच्या पत्रावळी असायच्या. दक्षिण भारतात तर केळीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. केळीच्या पानात अन्न वाढणं, हा तिथल्या लोकांच्या सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. या मुलाच्या मनात आलं की, आपण केळीचं पान प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वापरलं तर? त्याने दोन गोष्टी साध्य होतील : प्लॅस्टिकसारखा पर्यावरण दूषित करणारा कचरा केळीच्या पानांनी होणार नाही, कारण ते निसर्गतःच विघटनशील आहे. शिवाय आपल्या लोकांची परंपरागत पद्धत, संस्कृतीही जपली जाईल. पण मुख्य अडचण अशी की, शेवटी ते केळीचं पान. झाडावरून काढल्यानंतर काही दिवसांतच ते वाळायला सुरुवात होणार. त्यावर काय करायचं? हा पुढचा प्रश्न त्याच्यासमोर तयारच होता. मग आपल्या प्रयोगशाळेत तासन्‌तास खटाटोप केल्यानंतर, निरनिराळ्या प्रयोगांतून त्याला केळीच्या पानाचं आयुष्य वाढवण्याची पद्धत सापडली. त्याचा हा शोध केवळ केळीच्या पानापुरताच महत्त्वाचा नव्हता. कारण इतरही जैविक पदार्थ टिकवण्यासाठी तो वापरला जाऊ शकत होता. त्यामुळे त्याने त्या पद्धतीचं पेटंट घ्यायचं ठरवलं. या तंत्रज्ञानाला त्याने नाव दिलं- ‘बनाना लीफ टेक्नॉलॉजी.’

केळीचं पान वाळतं म्हणजे त्याच्यातील पेशी मरण पावतात. या तंत्रज्ञानामुळे केळीच्या पानांमध्ये असणाऱ्या पेशींचं आयुष्य वाढतं. ही पानं तब्बल तीन वर्षांपर्यंत टिकू शकतात. या तंत्रज्ञानाने पानाचं आयुष्य तर वाढतंच, शिवाय थोड्या अधिक वजनाचा व गरम पदार्थही त्यात ठेवता येऊ शकतो. प्लॅस्टिक, कागद आणि धातू अशा तिन्ही पदार्थांचे गुण त्या केळीच्या पानांपासून बनणाऱ्या वस्तूंमध्ये असावेत, असा या मुलाचा प्रयत्न होता. पण यासाठी त्याच्यावर कुठल्याही रसायनाचा वापर केला जात नसल्यामुळे त्याच्यात अन्नपदार्थ ठेवणंही शक्य होतं. त्यामुळे त्याने अशा पानांपासून ग्लासेस, प्लेट्‌स, बॉक्स अशा निरनिराळ्या वस्तू तयार केल्या. या त्याच्या संशोधनामुळे त्याला पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि नेदरलँडच्या संसदेकडून आमंत्रित केले गेले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून संशोधनाच्या क्षेत्रात अशी चमक दाखवणाऱ्या या मुलाचं नाव टेनिथ आदित्य मावेल राजन. टेनिथच्या नावावर आज 19 संशोधनं आहेत. एक गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आहे, 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, 10 राष्ट्रीय आणि 14 राज्य पुरस्कार आहेत.    
 
तमिळनाडूमधील श्रीविल्लीपुतुर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात टेनिथचा जन्म 11 फेब्रुवारी 1998 या दिवशी झाला. टेनिथ म्हणजे दहा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये संचार करणारा आणि आदित्य म्हणजे सूर्याप्रमाणे ऊर्जावान. हे त्याचं नावच जणू भविष्यात तो सार्थ करणार होता. जन्मानंतर वर्षभर तो आईपाशी राहिला आणि नंतर पुदुपट्टीला त्याच्या आजी-आजोबांकडे राहायला गेला. त्यानंतरची दहा वर्षं त्याला सांभाळलं आजीनेच. म्हणून आईहूनही त्याच्या मनात आजीविषयी थोडी अधिकच माया आहे. त्याची आजी इतिहासाची शिक्षिका होती.

आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक टेनिथने लहान वयातच दाखवायला सुरुवात केली. तिसऱ्या वर्षापर्यंत आजीने त्याला तमिळ आणि इंग्रजी भाषांमध्ये बोलायला शिकवलं. तो बुद्धिमान असला तरी काहीसा आळशी होता. त्यामुळे दर वेळी त्याची आजी नाना शकला लढवून त्याला उत्साही ठेवत असे. टेनिथला इतर मुलांप्रमाणे निरनिराळ्या खेळण्यांसोबत खेळायचा नाद तर होताच; पण त्याला ती खेळणी उघडून आत काय आहे, ते बघायलाच जास्त आवडायचं. पण आजीच्या धाकाने तो पुन्हा ती खेळणी पूर्ववत्‌ जोडून ठेवायचा. त्याला शिंपले जमवायचाही छंद होता. पाच वर्षांचा होईपर्यंत त्याने जवळपास हजारभर शिंपले जमवून ठेवले होते. त्याच्या आईने ते एका दिवशी पाहिले आणि कचरा समजून फेकून दिले. पण टेनिथने त्याचा हा छंद सोडला नाही. जुन्या नोटा, नाणी, अँटिक्स म्हणजे जुन्या दुर्मिळ वस्तू तो गोळा करतच राहिला. आज त्याच्यापाशी हा मोठा खजिना आहे. 

आजी त्याला रोज छान-छान पदार्थ करून खाऊ घालायची. आजीच्या हातचा वेलची घातलेला चहा त्याला विशेष आवडायचा. घरात आजीच त्याच्याशी गप्पा मारायची. त्याला कोडी सोडवायला द्यायची. लहानपणी तिने सांगितलेल्या गोष्टी, तिने लावलेल्या सवयी यांमुळे आपण काही तरी वेगळं करायला हवं आणि फक्त स्वतःपुरतंच नाही तर लोकांच्याही उपयोगी पडेल असं काम करायला हवं, असं त्याला वाटू लागलं. दरम्यान तो शाळेत जाऊ लागला होता. त्याला अक्षरओळख होऊ लागली होती. थोडंफार कळू लागल्यानंतर स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायची सवय त्याला आपसूकच लागली. 

आजूबाजूच्या जगाबद्दल त्याला प्रचंड उत्सुकता होती. पाळीव प्राणी आणि पक्षी त्याला खूप आवडायचे. त्यांच्या बारीक-सारीक हालचाली तो कुतूहलाने न्याहाळायचा. बसल्या-बसल्या तो एनसायक्लोपीडिया चाळत असायचा. त्याने स्वतःच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तो मागून घेतला होता.

सहा-सात वर्षांचा असतानाच तो स्वतःच धडपडत सायकल शिकला. लहान-सहान यंत्रं मोडून पुन्हा जोडण्याच्या त्याच्या उद्योगामुळे त्यांच्या आत असणारी रचना आणि यंत्रणा त्याला माहीत होऊ लागली. त्यामुळे विज्ञान, संशोधन, निर्मिती या शब्दांचे अर्थ नीटसे कळण्याच्याही आधी त्याला या गोष्टींमध्ये आवड निर्माण होऊ लागली. यादरम्यान त्याने आणखी एक गमतीशीर उद्योग करून पाहिला. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे संकर करायचा त्याने प्रयत्न केला. पण काही केल्या त्याला ते साधलं नाही. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांतच रमतो आणि इथून पुढे आपल्याला याच विषयांत अधिक खोल जायचं आहे, याची त्याला जाणीव झाली. या वेळी तो होता फक्त सात वर्षांचा!

संगणकाशी त्याची मैत्री लवकर झाली होतीच, पण त्याने लगेच प्रोग्रामिंग शिकायचं ठरवलं. आपण मोबाईलमध्ये जे ॲप्स वापरतो, ज्या वेबसाईट्‌स पाहतो; त्या तयार करण्यासाठी संगणकाला काही सूचना द्याव्या लागतात, त्या संगणकाला समजणाऱ्या भाषेमध्ये द्याव्या लागतात. म्हणून त्या भाषा आणि सूचना देण्याची पद्धत म्हणजे प्रोग्रामिंग शिकून घ्यावं लागतं. त्यासाठी तो प्रोग्रामिंग शिकवणाऱ्या वर्गांमध्ये जाऊन त्यांना विनंती करू लागला. पूर्वी इंजिनिअरिंगला असणारी किंवा जाऊ इच्छिणारी मोठ्या वर्गांतली मुलंच ते शिकायची. तेव्हा हा जेमतेम दुसरीत गेलेला मुलगा म्हणाला- मला प्रोग्रामिंग शिकवा! अर्थातच त्याला तिथे प्रवेशच मिळाला नाही. पण हा बहाद्दर त्याला बधला नाही. त्याने वर्षभर वाट पाहिली. शेवटी त्याची विनंती मान्य केली गेली. याच काळात आणखी एक सवय त्याने स्वतःला लावून घेतली- ती म्हणजे, दिवसाकाठी किमान 26 पानं तरी वाचायचीच. 

वयाचं दहावं वर्ष त्याच्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. केळीची पानं टिकवण्याची पद्धत त्याला सापडली. दरम्यान, प्रोग्रामिंगच्या सहा भाषा त्याला अवगत झाल्या होत्या. आणखी एक कल्पना त्याला या काळात सुचली. निरनिराळ्या ठिकाणी स्वतःच्या प्रेरणेने संशोधन करणाऱ्या मुलांना व्यासपीठ मिळावं, तरुणांना संशोधन करण्याची आणि नवं काही तरी निर्माण करण्यासाठीची प्रेरणा मिळावी- याकरता एक चळवळ त्याने सुरू केली. तिचं नाव होतं, ‘लेट्‌स इनोव्हेट यूथ’. या अंतर्गत त्याने पहिलं शिबिर 2009 मध्ये घेतलं. त्यात त्याच्याहून वयाने मोठी असणारी, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणारी 120 मुलं सहभागी झाली होती. आजतागायत या उपक्रमांतर्गत त्याने 178 शिबिरांतून, कार्यशाळांतून जगभरातील जवळपास 90 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि या उपक्रमांतून 22 इनोव्हेशन्स झाली आहेत. 

या सगळ्यात त्याचं शाळेकडे काहीसं दुर्लक्ष होत होतं. हे सगळे उद्योग आपल्याला करता यावेत म्हणून तो अभ्यास चटकन उरकून टाकायचा. त्यामुळे परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळायचे. पण एकदा तो रात्री प्रयोगशाळेत शिरला की, पहाटे तीन-साडेतीन वाजेपर्यंत त्याला वेळेचं भान राहत नसे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेत पोचायला उशीर होई. बऱ्याचदा त्याला पहिल्या तासाला वर्गाबाहेरच उभं राहावं लागत असे. या सगळ्यामुळे त्याची आई मात्र त्याच्यावर नाराज असे. तिला वाटायचं, या उपद्‌व्यापी मुलाचं पुढे कसं व्हायचं? अभ्यास सोडून बाकी सगळं करतो हा! त्याच्या अंगी असणाऱ्या अचाट क्षमता तिला बिचारीला कुठून कळणार? तिला वाटायचं- आपल्या मुलाने सर्वसामान्य मुलांसारखा अभ्यास करावा, वेळेत शाळेत जावं, पहिल्या नंबराने पास व्हावं. त्यामुळे टेनिथ आणि त्याच्या आईमध्ये सतत खटके उडायचे. केवळ आईला समाधान वाटावं म्हणून टेनिथने पदवी घ्यायचं ठरवलं. आणि कोइमतूरच्या ‘एस व्ही सी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’ला प्रवेश घेतला.

टेनिथच्या आयुष्यात आणखी एक संस्मरणीय प्रसंग घडला. भारतीय विज्ञान काँग्रेस संघ या वैज्ञानिकांच्या संघटनेतर्फे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय विज्ञान काँग्रेस या भव्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. जम्मू विद्यापीठात 2014 च्या जानेवारीमध्ये 101 वी भारतीय विज्ञान काँग्रेस भरली होती. या संमेलनात दहा ते सतरा वयोगटातील निर्मितिशील मुलांसाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनही असतं. त्यासाठी टेनिथलाही आमंत्रण होतं. त्या संमेलनाचं उद्‌घाटन भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार होतं. डॉ.कलाम हे भारतातील बहुसंख्य मुलांसाठी, युवकांसाठी प्रेरणास्थान असतात, तसेच ते टेनिथसाठीही होते. आपल्या उद्‌घाटनपर भाषणात डॉ.कलाम यांनी टेनिथचा, त्याच्या संशोधनांचा उल्लेख केला. प्रेक्षकांत बसलेल्या टेनिथला डॉ. कलाम यांच्या तोंडून अनपेक्षितपणे स्वतःचं नाव ऐकताना कोण आनंद झाला! पुढे त्याची त्यांच्याशी भेट झाली, तेव्हा ‘इग्नायटेड माइंड’ हे त्यांचं पुस्तक त्यांनी त्याला भेट दिलं.  

विज्ञानाइतकाच टेनिथला खेळातही रस आहे. रिओ इथे 2016 मध्ये झालेल्या ‘ऑलिम्पिक’मधली भारताची सुमार दर्जाची कामगिरी पाहून टेनिथने थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. आपल्याकडे इतके उत्साही आणि उच्च क्षमता असणारे तरुण खेळाडू असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला खेळ पूर्ण ताकदीनिशी पोहोचू नये, याबद्दल त्याने त्यात खंत व्यक्त केली. खेडोपाडी भरलेल्या गुणवत्तावान मुलांना आर्थिक अडचणींमुळे खेळ वाढवण्याकडे पूर्ण लक्ष देणं शक्य होत नाही; त्यामुळे त्यांना पुढे कसं आणता येईल, त्यांच्या आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याविषयी त्याने काही मुद्देसूद सूचनाही केल्या. एवढंच नव्हे, तर मलेशियाला नुकत्याच झालेल्या एका प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी तो गेलेला असताना तिथे बक्षीस स्वरूपात मिळालेले पैसे त्याने अशा खेळाडूंसाठी पत्रासोबत पाठवून दिले. त्या पत्रात त्याने असं नमूद केलं की- वास्तविक ही रक्कम माझ्या पुढच्या गिनिज ॲवॉर्डसाठी साठवून ठेवणार होतो, पण ती काय मला नंतरही साठवता येईल. माझ्या देशाला माझं प्राधान्य आहे. 

टेथिनच्या 19 इनोव्हेशन्सपैकी केवळ पाचच त्याने सध्या बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. याचं कारण तो असं सांगतो की, ‘‘मला माझी निर्मिती परदेशी कंपन्यांना विकायची नाही. कारण ते माझ्याकडून कमी किमतीला विकत घेतील आणि आपल्याच लोकांना वाढीव किमतीने विकतील. इथल्या लोकांसाठी केलेली संशोधनं त्यांनाच परवडणार नसतील, तर त्याचा काय उपयोग? माझं शिक्षण पूर्ण झालं की, ‘टेनिथ इनोव्हेशन्स’ या माझ्या कंपनीद्वारेच माझ्या संशोधनांचं उत्पादन मी सुरू करेन. त्यातून माझ्या देशातल्या लोकांसाठी काही रोजगार निर्माण करण्यातही हातभार लागेल.’’

आज टेथिन 22 वर्षांचा आहे. त्याने केलेले उपक्रम, त्याची संशोधनं, त्याला मिळालेले लहान-मोठे पुरस्कार, त्याने सुरू केलेले प्रकल्प, कॅम्पेन्स यांचा पसारा मोठा आहे. वेळोवेळी सुचणाऱ्या लहान-मोठ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चाललेली त्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. ‘गिनिज बुक’पासून आपल्या राष्ट्रपती भवनातून खास आमंत्रण येण्यापर्यंत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या कामाची दखल घेतली गेली आहे. दर सहा महिन्यांनी काही तरी नवी गोष्ट शिकायची, असा त्याचा निश्चय आहे. तो कायम राहिला, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आणखी विस्तारत जाणार आहेत. त्याच्या बौद्धिक क्षमता एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला अद्‌भुत वाटाव्या अशा असल्या, तरीही आपल्याकडे असणाऱ्या क्षमतांचा वापर आणि विकास प्रयत्नपूर्वक करत राहिलं पाहिजे, ही त्याच्याकडे पाहून मिळणारी शिकवण अगदी कुणालाही उपयोगी पडणारी आहे.

Tags: बनाना लीफ टेक्नोलॉजी तामिळनाडू टेनिथ आदित्य सुहास पाटील tamilnadu tenith aditya suhas patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पाटील,  पुणे
suhas.horizon@gmail.com

उपसंपादक, साधना डिजिटल 


Comments

  1. prakash Kamble- 29 Nov 2020

    केवळ अलौकिक असलेल्या टेनीथला सॅल्यूट...

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके