डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अलक्ष्यरूप : दासी ते स्वामिनी

मुळात त्यांनी चरित्र लिहून ठेवलंय हे तरी कुठे घराण्यातील कोणाला ज्ञात होते! मराठी संशोधन मंडळाच्या प्रयत्नांमुळे हे चरित्र तरी प्रकाशात येत आहे. आमच्या घरात पत्रकारितेचे जे वलय आलंय त्याचं उगमस्थान परशुरामपंतांमध्ये आहे, हे आज माझ्या लक्षात आले आणि ऊर भरून आला. माझ्या पणजीचे हे चरित्र, त्यांचा संसार, पणजोबांचे चरित्र आमच्यासाठी तर बहुमोल ठेवा आहेच; पण सामान्य वाचकांना ‘काळाचा इतिहास’ म्हणूनही हा ठेवा लाभणार आहे.

यदुनाथ थत्ते यांच्या रक्तात पत्रकारितेचा ऋणानुबंध निर्माण करणारे त्यांचे आजोबा आणि माझे पणजोबा यांना मी मनोमन नमस्कार आणि पणजी-आजीच्या कार्याला सलाम करते. माझ्या पणजोबांची ‘साधना’ माझ्या वडिलांच्या हातात आली, हे आमच्या घराचे केवढे मोठे भाग्य!
 

दासी ते ‘स्वामिनी’ झालेल्या माझ्या या पणजी-आजीचे, लक्ष्मीबाई थत्ते यांचे चरित्र. माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे यदुनाथ थत्ते यांचे आजे आणि माझे पणजे परशुरामपंत हरी थत्ते यांनी शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे सौ.लक्ष्मीबाई थत्ते यांचे आणि दोघांच्या संसाराचे चरित्र लिहून ठेवले होते. ते आजवर अप्रकाशित अवस्थेत थत्ते यांच्या घरात पडून होते. त्याचा शोध माझी वहिनी डॉ. शुभा थत्ते हिने घेतला आणि डॉ.प्रदीप कर्णिक यांच्या सहकार्याने ते प्रकाशात आणण्याचे ठरवले. आज 31 जानेवारी रोजी ते पुस्तक आले. मुंबईच्या मराठी संशोधन मंडळातर्फे ही त्या दोघांच्या संसाराची अप्रकाशित चरित्रगाथा उजेडात येत आहे, याचा मला परशुरामपंतांची पणती म्हणून खूप आनंद होत आहे.

कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे/आत्मचरित्रे मराठीत अनेक आहेत, परंतु सामान्य गृहिणीचे चरित्र, तिचा संसार, तिच्या वाट्याला आलेला भोग, छळ, कष्ट यांचे वर्णन फारच अल्प सापडत असेल... एका सामान्य गृहिणीचे हे मराठीतील एकमेव चरित्र असावे.

परशुरामपंतांचा जन्म 1856 मध्ये चिपळूण येथे झाला. त्यांच्या वयाच्या 11 व्या वर्षी त्यांचे लग्न त्यांच्या पत्नीशी, लक्ष्मीशी तिच्या वयाच्या सहाव्या वर्षी झाले.. ती सून घरात यायला व आणि एकामागून एक संकटे घरावर यायला एकाच गाठ पडली आणि या केवळ सहा वर्षांच्या चिमुरडीवर ‘हतभागीपणा’चा शिक्का बसला. टोमणे खात खात, तिच्या वाट्याला घरादाराचे सोडाच, साधे नवऱ्याचेही प्रेम न येता केवळ दुर्भाग्यच आले. नवरा शिक्षणासाठी थोरल्या भावाकडे धुळ्याला निघून गेला आणि ‘नवरा येईल’ या आशेवर घरातल्या साऱ्यांचे काबाडकष्ट उपसत राहिली. तिची जाऊ तिचा जाच करी, शिळेपाके पानात पडे. ती अगदी अस्थिपंजर होऊन तग धरून होती. 

लक्ष्मीचा नवरा शिकतो, खरे तर त्याला डॉक्टर व्हायचे असते, पण घरातून सहकार्य मिळत नाही. मग तो मास्तर होतो. भुसावळला त्याला नोकरी मिळते. तो तिथे रुजू होतो. शाळा भरभराटीला येते इतकी तो मेहनत घेतो. मात्र बायकोला न्यायचे नाव घेत नाही. ‘‘ऋतुमती होऊनही मला माझा नवरा नेत नाही, आता मी जीव देते’’ अशा तिच्या निर्वाणीच्या शब्दांनी घर ‘जागे’ होते. आणि तिची मोट नवऱ्याच्या पदरात बांधून तिला भुसावळला पाठवण्यात येते. ते दोघे भुसावळला येतात, ‘संसार’ सुरू होतो. पण संसार चालविण्याचे कुठलेच ज्ञान सासरी न मिळाल्यामुळे, किंबहुना स्वयंपाक करण्याच्या कामापासून सर्वच कामांच्या ज्ञानाला वंचित ठेवलेल्या आपल्या पत्नीस तिचा नवरा व्यवहारज्ञानापासून, स्वयंपाकापर्यंत सर्व शिकविण्याचे ठरवतो. आणि तिला इतके तरबेज करतो की, ती शेवटी नर्सिंगचे ज्ञान घेऊन उभी राहते. परशुरामपंतांचा ओढगस्तीचा संसार लीलया आपल्या खांद्यावर तोलून धरते आणि नावारूपालाही आणते.

ही झाली माझ्या पणजीची गोष्ट! याच चरित्रात माझे पणजे परशुरामपंत यांचीही गोष्ट येते. ते शिक्षणात हुशार. काही शिष्यवृत्त्याही त्यांना मिळाल्या. इंग्रजी हस्ताक्षर इतके सुंदर की, सारे चिपळूण त्यांचे हस्ताक्षर पाहून थक्क होत असे. त्यांना रत्नागिरीला पुढील शिक्षणासाठी जायचे असते, मात्र वडील पोराला परवानगीच देत नाहीत. हे वडिलांच्या मागे रोज भुणभुण लावतात, शेवटी वडील इतके मारतात की तो आजारीच पडतो. पण त्याचे शिक्षणाचे वेड संपत नाही. तो धुळ्याला भावाकडे जातो, व अनेक प्रकारचे त्रास सहन करत उत्तम मार्कांनी मॅट्रिक पास होतो. पण पुन्हा पुढच्या शिक्षणाला घरचे सहकार्य मिळतच नाही. मग तो मास्तर होतो. पण या शिक्षणाच्या काळात त्याला वाचनाचे जबरदस्त वेड लागते, ते मरेपर्यंत सुटत नाही. हेच वाचन त्याला उत्तम शिक्षक बनवते.

भुसावळची शाळा त्याच्या येण्याने विस्तारत जाते. मुलांची संख्या वाढते. हा मुख्याध्यापक होतो, साहाय्यक शिक्षक वाढतात. गावात त्याच्या येण्याची/असण्याची चर्चा होते, तोही सक्रिय होतो. इंग्रज दप्तरी अर्ज-विनंत्या करतो. शाळेची स्वतंत्र इमारत उभी राहते, पूर्व-पश्चिम जाण्या-येण्यासाठी पूल असावा म्हणून तो अर्ज-विनंत्या करतो, पूलही बांधला जातो, विद्यार्थी खूश असतात, पालक निर्धास्त होतात आणि शिक्षणव्यवस्था लोकल बोर्डाकडे सोपवली जाते. राजकारणाला रंग चढतो. स्थानिक नेत्यांच्या राजकारणात तो भरडला जातो. शेवटी कंटाळून सोलापूरला बदली स्वीकारतो. मग सोलापूर, नंतर अहमदाबाद व नंतर मुंबईत येतो. मुंबईत यायला व प्लेगची साथ सुरू व्हायला एकच ‘गाठ’ पडते. तीन मुलांना प्लेगची लागण होते; पण वैद्यकीय ग्रंथांचे वाचन व जवळचे डॉक्टर मित्र यांच्या मदतीने तीनही मुले सुखरूप बाहेर येतात.

‘अष्टपुत्रां’चा आशीर्वाद मिळाल्याने लक्ष्मीस एक मुलगी व आठ पुत्र होतात. या आठ मुलांपैकी एक लहानपणीच जातो. आठ मुलांचा संसार एका 35 रुपयांच्या शिक्षकास कसा करता येणार! ओढग्रस्तीत वाटचाल चालू असतानाही वाचनाचे व्यसन सुटत नाही. शेवटी ते पोलीसखात्यात अध्यापक होऊन निवृत्त होतात.

त्यांच्या या कहाणीत येतो तो त्या त्या काळाचा समाजइतिहास, कुटुंबव्यवस्था, एकत्र कुटुंबाची न टाळता येणारी जबाबदारी, नातेसंबंधांना आलेला व्यावहारिकपणा, आई-मुलांचे संबंध संपत्तीच्या वाटण्या आणि फसवणूक, सोलापूर, भुसावळ, अहमदाबाद येथील जीवन, इतिहास, सामाजिक पद्धती, रीतिरिवाज, परमुलुखातले जीवन, इंग्रज अधिकारी, त्यांचा रुबाब, कामाची पद्धत, कचेरीतील एकमेकांचे हेवेदावे, राग-लोभ, कुरघोडीचे प्रयत्न, चुगल्या, लावालाव्या- अशी अनेक मनोरंजक माहिती वाचताना आपणही स्तिमित होतो.

‘मुंबई’चे 1892 पासून पुढे दहा-बारा वर्षांचे चित्र थक्क करणारे आहे. मुंबईच्या चाळी, चाळींचे जग, त्यातील कुटुंबे, त्यांचे आयुष्य यांचा आलेख परशुरामपंत मांडतात. मुंबईचे रस्ते, गोद्या, दाणेबंदर, बॅकबे, समुद्रकिनारा, मुंबईची देवळे, नव्याने आलेले सायकल नावाचे वाहन, मुंबईच्या शाळा, कारखाने, वस्त्या, प्लेगचे हेल्थ कॅम्प, हाफकीन संस्थेला दिलेली भेट, परळ वर्कशॉपच्या भेटीचा वृत्तान्त, व्ही.जे.टी.आय.ची भेट, लसनिर्मिती, त्याचे प्रयोग, सरकारला केलेल्या सूचना- अशा अनेकानेक नोंदींमुळे आपल्याला मुंबईचा 12 वर्षांचा ताजा इतिहास समजतो. परशुराम हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे अहमदाबाद, वसई, मुंबईचे प्राचीन, अर्वाचीन इतिहासही ते सांगत राहतात. आणि या सर्वांत केंद्रस्थानी असते पत्नी लक्ष्मीबाई. तिचे मौखिक शिक्षण सुरूच असते. त्या काळात ते बायको-मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला जातात. मुंबईचा स्वतः तयार केलेला नकाशा घेऊन मुंबईचा इतिहास आणि इंग्रज सरकार त्या वेळी करीत असलेला मुंबईचा विस्तार कसा आहे, कसा होतोय याची हकिकत सांगतात. हे चित्र तर माझा ठावच घेते! मुलांशी धड बोलायची पद्धत कित्येक घरांत त्या काळी नसताना हे इतके मोकळे कसे वागू शकले?

जी बायको ‘हतभागीपणा’चा शिक्का घेऊन वावरली, जिने केवळ नवऱ्याची ‘दासी’ होणेच गृहीत धरले होते, ती बायको  नवऱ्याची ‘स्वामिनी’ होते हे आपण वाचतो, तेव्हा एका ‘पुरुषा’चा झालेला विकास आपण अनुभवत असतो. आणि हेच या चरित्राचे खरे गमक आहे. हतभागी, दासी ते ‘स्वामिनी’ झालेल्या लक्ष्मीबार्इंचे, माझ्या पणजी-आजीचे हे चरित्र मला हेलावून टाकते.

आणखीन एका विशेष गोष्टीने मला खिळवून ठेवले आणि त्या गोष्टीचे माझ्या घराशी, माझ्या वडिलांशी, सख्ख्या काकांशी, चुलत भावांशी अगदी जवळचे नाते आहे ती गोष्ट आहे परशुरामपंतांच्या लेखक असण्याची!

ते लेखक होते. भुसावळमध्ये असताना पुणे, अकोल्याच्या वृत्तपत्रांतून ते लेख लिहीत असत, सभेतून निबंध वाचत असत. अहमदाबादला असताना ठाण्याच्या ‘अरुणोदय’ पत्रातून त्यांनी क्रमश: तीन पुस्तकांची भाषांतरे केली. शिवाय त्याच पत्रांतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले. त्यांपैकी एकही पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले नाही. मुंबईत असताना त्यांनी राजारामशास्त्री भागवत यांच्या अंकात लिहिले, इतरही अंकांतून लिहिले. त्यांचा वैद्यकीय अभ्यास इतका दांडगा होता की डॉ. गोखले यांच्या अनेक पुस्तकांचे लेखन, भाषांतर, संपादन परशुरामपंतांनी विनामोबदला करून दिले आहे. ना नावाची फिकीर ना प्रसिद्धीची! केवळ ज्ञानावर प्रेम. बस, बाकी काही नाही! शेती, रसायन, विज्ञान, वैद्यक अशा अनेक विषयांत त्यांना कमालीचा रस होता. त्यात त्यांनी लेखन केलंय. पण आज संग्रही काहीही नाही. निवृत्त झाल्यावर त्यांनी अनेक विषयांवर ग्रंथलेखन केले. त्यांपैकी फक्त दोन पुस्तके प्रकाशित झाली. बाकी सर्व हस्तलिखित स्वरूपात पडून होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने ती सर्व बाडे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत देऊन ठेवली म्हणून ती किमान शिल्लक राहिली असावीत.

त्यांच्या दोन प्रकाशित पुस्तकांपैकी एका भाषांतरित (उपनिषदपरमामृतम) आणि दुसरे होते ‘वेदांच्या काळाचा इतिहास’. या पुस्तकाच्या प्रकाशनार्थ म्हणे, लोकमान्य टिळकांनी त्यांना शिफारसपत्र दिले होते जे पाहून श्रीमंत होळकर संस्थानाने त्यांना पुस्तक छपाईसाठी पैसेही दिले होते. ही दोन प्रकाशित पुस्तकेही पुढच्या पिढीला किती माहीत असतील कोण जाणे! मुळात त्यांनी चरित्र लिहून ठेवलंय हे तरी कुठे घराण्यातील कोणाला ज्ञात होते! मराठी संशोधन मंडळाच्या प्रयत्नांमुळे हे चरित्र तरी प्रकाशात येत आहे.

आमच्या घरात पत्रकारितेचे जे वलय आलंय त्याचं उगमस्थान परशुरामपंतांमध्ये आहे, हे आज माझ्या लक्षात आले आणि ऊर भरून आला. माझ्या पणजीचे हे चरित्र, त्यांचा संसार, पणजोबांचे चरित्र आमच्यासाठी तर बहुमोल ठेवा आहेच; पण सामान्य वाचकांना ‘काळाचा इतिहास’ म्हणूनही हा ठेवा लाभणार आहे.

यदुनाथ थत्ते यांच्या रक्तात पत्रकारितेचा ऋणानुबंध निर्माण करणारे त्यांचे आजोबा आणि माझे पणजोबा यांना मी मनोमन नमस्कार आणि पणजी-आजीच्या कार्याला सलाम करते. माझ्या पणजोबांची ‘साधना’ माझ्या वडिलांच्या हातात आली, हे आमच्या घराचे केवढे मोठे भाग्य!

अलक्ष्यरूप

लेखक : परशुराम हरी थत्ते

पृष्ठे 448 (हार्डबाऊंड)

किंमत 500 रुपये

(साधना मीडिया सेंटर फोन 020-24459635 येथे हे पुस्तक उपलब्ध आहे.)

शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे अप्रकाशित चरित्र मुंबईच्या मराठी संशोधन मंडळातर्फे दि.31 जानेवारी 2021 रोजी ‘अलक्ष्यरूप, सौ. लक्ष्मीबाई व परशुराम थत्ते यांचे चरित्र व संसार’ या नावाने त्यांचे नातू भास्कर यशवंत थत्ते, वय वर्षे 94 यांच्या हस्ते ऑनलाइन प्रकाशित झाले.

Tags: अलक्ष्यरूप परशुराम हरी थत्ते नवे पुस्तक मराठी पुस्तक यदुनाथ थत्ते weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके