डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1983-84 या काळात भारतातील विवेकवादी चळवळीचे प्रणेते बी. प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत जाऊन त्यांनी चमत्कार व बुवाबाबा यांची भांडाफोड करणारे अनेक प्रयोग केले. त्यापासूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू झाली. महाराष्ट्र अंनिस 20 वर्षे पूर्ण करीतअसताना अलीकडेच निधन झालेल्या बी. प्रेमानंदांचे स्मरण प्रेरणादायी ठरावे.

4 ऑक्टोबर 2009 ला दुपारी बी.प्रेमानंद नावाचं चैतन्य निवान्त झालं. ‘मृत्यू ही एक अटळ पण नैसर्गिक घटना असल्याने माझ्या मृत्यूनंतर कोणीही शोकसभेचे कार्यक्रम आयोजित करण्यात वेळ वाया न घालविता आपापली नित्याची कामे विना व्यत्यय चालू ठेवावीत, असे या चैतन्ममूर्तीने (व्हायटॅलिटि) आपल्या असंख्य मित्रांना, चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना बजावले होते. ह्या घटनेला त्यांच्या सर्व बुद्धिप्रामाण्यवादी मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी अत्यंत संयमाने तोंड दिले. त्यांची अखेरची यात्रा आणि त्यावेळेचे दुःख प्रदर्शन, त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव किंवा त्यांच्या पार्थीव देहाचे अंत्यदर्शन इत्यादि सर्व टाळून त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला.

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. ब्रिटिशांनी या पोरसवदा स्वातंत्र्यसेनानीला अटक वगैरे केली नाही. परंतु त्यांच्या शाळेच्या भ्याड प्राचार्यांनी ‘उगाच नसती ब्याद नको’ म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकले. शालेय शिक्षण संपुष्टात आल्याने त्यांच्या खऱ्या शिक्षणाला घरीच सुरुवात झाली. 1940 साली चळवळीत उतरणाऱ्या या निरागस मुलाची देशभक्ती कालांतराने अधिक प्रगल्भ झाली आणि मानवाची अंधविश्वासातून सुटका करून त्याच्यात बुद्धिप्रामाण्य रुजविण्याचे ध्येय त्यांनी स्वत:समोर ठेवले. त्यासाठी ते भारतातील खेड्यापाड्यांमधे तर गेलेच, पण परदेशातही त्यांनी खूप दौरे केले.

ज्ञानपिपासा (सत्य जाणून घेण्याची प्रबळ इच्छा) या मानवी प्रेरणेने ते झपाटले होते. वडील ईश्वरनिष्ठ (थिऑसॉफिस्ट) असल्याने सुरुवातीस त्यांना योग व इतर गूढ विद्या जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांच्यापुढे आदर्श होता स्वामी रामदास यांचा. रामदासांप्रमाणेच प्रेमानंदांनीही स्वतजवळ काहीही पैसे न बाळगता भारतभ्रमण केले. ते जिथे जिथे गेले तिथे लोकांनी त्यांना सढळ हाताने मदत केली, म्हणून आपल्या भारत भ्रमणाचे श्रेय ते त्या सर्व माणसांना देतात; स्वामीजींसारखे ईश्वराला देत नाहीत. ईश्वर आणि आध्यात्मिकतेच्या शोधात त्यांनी अनेक साधू, संन्यासी आणि गुरू यांच्या भेटी घेतल्या. पण त्यापैकी कोणाचेही त्यांनी आंधळेपणाने अनुकरण केले नाही. उलट, अनेक साधू-स्वामींचा ढोंगीपणा त्यांच्या नजरेतून सुटला नाही. स्वामी शिवानंद कुंडलिनी जागृत करण्याचे अफाट महत्त्व सांगत असत, स्वत: मात्र मधुयेहासारख्या चिवट आजाराने पछाडलेले होते. त्याचे कारण ते सांगायचे, ‘दुखणी ही गतजन्मांच्या कर्माची फळे असल्याने ती टाळण्यापेक्षा या जन्मामधे भोगून टाकणंच जास्त श्रेयस्कर वाटतं.’  स्वामी नारायणानंदांच्या बाबतीतही त्यांचा भ्रमनिरास झाला. हे स्वामी ब्रह्मचर्याचे सतत गोडवे गात, पण आश्रयाच्या यजमानीण बाईशी मात्र त्यांची फार जवळीक होती. एक दिवस प्रेमानंद अनपेक्षितपणे लवकर आश्रमात परतले तेव्हा स्वामी व या बाई प्रणयक्रीडा करीत असल्याचे त्यांना आढळून आले. हे स्वामी कोऱ्या कागदावर जळते लाकूड फिरवून ऊँ हे अक्षर काढण्याचा चमत्कार करीत. चमत्कारांना भुलून न जाण्याचा मूळ स्वभाव असल्याने प्रेमानंदांनी थोड्याच दिवसांत त्यांच्या चमत्काराचे बिंग उघडकीस आणले.

मोगी, संन्यासी यांच्या असल्या अनेक अनुभवातून त्यांची खात्री झाली की, या बाबा-बुवांच्या योग आणि तांत्रिक ज्ञानाला काहीही वैज्ञानिक आधार नाही. त्यानंतर प्रेमानंदांनी ईश्वराचा आणि चमत्कारांचा शोध घेणे सोडून दिले. योग्यांसारखी अलौकिक व चमत्कार करण्याची शक्ति प्राप्त करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रेमानंदांनी योगी व त्यांच्या तथाकथित चमत्कारांमागचे गूढ उकलण्याचा, सत्य जाणून घेण्याचा मार्ग धरला. त्यांच्यामते चमत्कार (हातचलाखी, रासायनिक संयुगं वापरून, काही मांत्रिक उपकरणं वापरून किंवा मानवी शरीराबाबत लोकांना माहीत नसलेल्या काही गुणधर्मांचा वापर करून - अशा) चार मुख्य पद्धतीने करता येतात. कुठेही चमत्कार झाल्याचे समजताच प्रेमानंद त्याचा मागोवा घेत व चमत्कार करणारे भोंदू बाबाबुवा व त्यांची चालाखी उघड करीत असत. त्यांनी यावर भरपूर लिहिले आहे; अनेक चमत्कार स्वतः करून दाखविले आहेत आणि चमत्कार करून दाखवणारे अनेक कार्यकर्ते प्रशिक्षित केले आहेत. त्यांच्या या कामातील महत्वाचा भाग म्हणजे चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेल्या लोकांना त्यांच्यामागील वैज्ञानिक तथ्ये समजावून सांगायची व चमत्कारांचे खरे रूप उघड करायचे. त्यासाठी त्यांना अशा घटनांची प्रात्यक्षिके दाखवून त्यांचे स्पष्टीकरण देता येईल आणि धर्म, चमत्कार किंवा जादू आणि विज्ञान या विषयांवरील एक समृद्ध ग्रंथालय असेल असे एक संशोधन केन्द्र उभारायचे होते. परंतु बुवाबाबांचे सारे चमत्कार करून दाखविणाऱ्या या बुद्धिवाद्याला त्यासाठी लागणारा पैसा हवेमधे हात फिरवून थोडाच मिळणार होता?

श्रीलंकेचे निरीश्वरवादी डॉ. अब्राहम कोवूर 1969 साली ‘चमत्कारांचा भांडाफोड’ करण्याच्या मोहिमेवर भारतात आले होते. समाजसुधारणेच्या कार्याला वाहून घेतलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या मनावर त्यांच्या भाषणांचा प्रभाव पडला. त्यातूनच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळही निर्माण झाली. त्यांच्या प्रभावामुळे प्रेमानंदांनी ‘अध्यात्मिक बुवाबाजीचा पर्दाफाश’ करण्याचा चंग बांधला आणि तेच त्यांचे जीवितकार्य झाले. अनेक जणांनी चमत्कार दाखवून भोळ्या गरीब लोकांना लुबाडणाऱ्या बाबाबुवांचे खरे रूप उघडे करण्याचा धडाका लावला. पण सत्यसाईबाबाच्या वाटेला जाण्याचे धाडस केवळ प्रेमानंदांनी दाखविले आणि त्यांच्याशी एकाकी झुंज देत राहिले. प्रेमानंदांनी या ‘पावरफुल’ बाबाविरुद्ध त्यांच्या आश्रमात 6/6/93 रोजी झालेल्या सहा तरुण शिष्यांच्या हत्येविरुद्ध व ‘सुवर्णनिमंत्रण’ कायद्याखाली कोर्टात खटला दाखल केला. या बाबांची सर्व दुष्कृत्मे प्रेमानंदांनी आपल्या ‘स्केप्टिक’ या मासिकातून लोकांसमोर मांडली.

कपटनिरोधक वैज्ञानिक देखरेखीखाली जो कोणी चमत्कार करून दाखवील त्याला डॉ. कोवूर यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. कोवूर यांचे हे आव्हान प्रेमानंद आणि इतर समविचारी चळवळींनी कायम ठेवले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही रक्कम आता एकवीस लाखांवर नेली आहे. पण आव्हान स्वीकरण्यास कोणी धजत नाही. लोकांच्या मनातून अंधश्रद्धा नाहीशा करण्यासाठी आधी पिढ्यान्‌पिढ्या देव-धर्म-रूढी यांनी खुरटून टाकलेले त्यांचे मेंदू सुदृढ करायला हवेत, असे प्रेमानंदांचे स्पष्ट मत होते. त्यांच्यात स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करण्याची कुवत व ते विचारप्रकट करण्याचे धैर्य निर्माण करण्यासाठी बुद्धिवादी प्रेमानंद तीन दशके भारतभर हिंडले; हजारो खेडी आणि शहरे त्यांनी पालथी घातली; बाबा-बुवांच्या कपटकारवाया उघड केल्या आणि कार्यशाळा भरवून विज्ञान लोकांपर्यंत पोचविण्याचा व त्यांच्यात चिकित्सक वृत्ती रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांनी 49 देशांना भेटी दिल्या. त्यांच्या या जीवनकार्याची दखल घेऊन ‘नॅशनल कौन्सिल फॉर टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’ या शासकीय संस्थेने त्यांना विद्यावेतन (फेलोशिप) दिले.

काही कार्मकर्ते सुरुवातीस बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतभाग घेऊन नंतर डाव्या राजकारणात शिरतात किंवा निसर्गोपचार, योग इत्यादींचा मार्ग अवलंबतात, त्याने बुद्धिवादी चळवळ कमकुवत होते असे प्रेमानंदांचे मत होते. काही अतिधार्मिक लोक तर ‘सर्वच बुद्धिवादी अखेरीस देवावर विश्वास ठेवू लागतात’, असा अपप्रचार सतत करीत असतात. प्रेमानंद मृत्युशय्येवर असताना त्यांच्या विषयीही अशाच अफवा पसरविण्यात आल्या. त्यांच्या कानावर ही गोष्ट त्यांच्या हितचिंतकांनी घातली त्या वेळेस ते ग्लानीमधे होते. परंतु अफवा कानी पडताच त्यांनी डोळे उघडून आपण शेवटच्या क्षणीही बुद्धीवादीच राहिलो आहोत हे दर्शविले, आणि हे जाहीर करण्यासाठी ‘मृत्मुशय्येवरील जबानी’ (डेथबेड टेस्टिमनी) वर हस्ताक्षर केले व आंगठ्याचा ठसाही उमटविला. 20 सप्टेंबर रोजी केलेली ही जबानी म्हणजे निरीश्वरवादाशी व बुद्धिवादाशी असलेल्या त्यांच्या जन्मभराच्या बांधिलकीचे प्रमाणपत्रच आहे.

असे असूनही इतरांच्या धर्मश्रद्धा बाळगण्याच्या अधिकाराचा त्यांनी कधीच अवमान केला नाही. श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे त्यांना मान्य होते.

त्यांच्यावर अनेक पारितोषिकांचा, सन्मानांचा आणि स्तुतिसुमनांचा वर्षावच झालेला होता. त्यांनी अनेक संस्था व संघ स्थापन केले, अनेक चळवळी व मोहिमा राबविल्या, अनेक लढे दिले. परंतु अखेर पर्यंत प्रेमानंद एक साधे, नम्र आणि निष्कांचन परंतु क्रियाशील व प्रेरणादायी कार्यकर्ताच राहिले. स्वतंत्र विचार करणं किंवा बुद्धिप्रामाण्यवादी असणं एवढंच प्रेमानंदांना पुरेसं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने धर्म आणि धर्माचे ठेकेदार नाकारण्यासाठी व एक मानववादी-बुद्धिप्रामाण्यवादी समाज निर्माण करण्यासाठी माणसाला वास्तवाचे पुरेसे ज्ञान आणि भान असावे लागते. हे ज्ञान व भान सर्वसाधारण माणसांपर्यंत पोचविणे हेही स्वतः बुद्धिप्रामाण्यवादी असण्याइतके महत्त्वाचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रौढ व्यक्तींवर वेळ खर्ची न घालता, तरुणांकडे व मुलामुलींकडे वळायला हवे.

Tags: चमत्कारविरोध बुवाबाजी विरोध अंनिस बुद्धीवाद निरीश्वरवाद अंधश्रद्धा निर्मूलन बी. प्रेमानंद सुमन ओक Antisuperstitions Intellectual Atheist ANIS Andhshradhha Nirmulan Suman Oak B. Premanand weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुमन ओक
sumanoak@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके