डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उदारमतवादाचा वारसा : ‘ऑन लिबर्टी'

ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी लिहिलेल्या ‘ऑन लिबर्टी' या ग्रंथाने एकोणिसाव्या शतकातील बुद्धिवंतांच्या विचारालाच कलाटणी दिली. हा ग्रंथ प्रसिद्ध झाला त्या घटनेला फेब्रुवारी 2009 मध्ये 150 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ग्रंथाची व लेखकाची ओळख करून देणारा हा लेख..

‘केवळ एक व्यक्ती सोडून साऱ्या मानवजातीचे एकमत झाले तरीही त्या एका व्यक्तीला आपलं वेगळं मत व्यक्त करण्यापासून थांबवणं न्याय्य नाही. त्या एका व्यक्तीने (त्याच्यामधे इतरांना आपले मत व्यक्त करण्यापासून रोखण्याची ताकद असली तरी) साऱ्या मानवजातीला रोखणे जितके अन्याय्य आहे, तितकेच इतर सर्वांनी त्या एका व्यक्तीला रोखणेही अन्याय्यच आहे..' हे सूत्र ‘ऑन लिबर्टी ' या पुस्तकाचा गाभा आहे.

जॉन स्टुअर्ट मिल यांचे तत्त्वज्ञान

जॉन यांचे वडील जेम्स मिल हे उपयुक्ततावादी (युटिलिटेरियन)विचारपरंपरेतील एक प्रमुख तत्त्वज्ञ होते. कोणत्याही वस्तूचं, अनुभवाचं मूल्य त्याच्या उपयुक्ततेतून सिद्ध होत असतं अशी यातील तात्त्विक भूमिका आहे. मनुष्यजीवनाचं श्रेयसही याच संदर्भात सिद्ध केलं जातं, ते असं: माणूस स्वतःला अधिकाधिक सुख मिळवायचा प्रयत्न सतत करीत असतो. म्हणून ‘अधिकाधिक माणसांचं अधिकाधिक सुख' हे मनुष्यजीवनाचं ध्येय बनतं. जास्तीत जास्त माणसांनी स्वतःच्या सुखाचा पाठपुरावा केल्याने समाजाचं भलं होईल. परंतु हे श्रेयस प्रतिपादन करताना उपयुक्ततावादाला व्यक्तिवादी उदारमतवादी गृहीतकाचा आधार असावा लागतो. ह्या गृहीतकानुसार समाज सुट्या सुट्या व्यक्तींचा बनलेला आहे. त्यामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या सुखाचा शोध घेण्याची मोकळीक हवी. साऱ्यांच्या सुखाच्या शोधांची बेरीज म्हणजे समाजाचं सुख. या तांत्रिक गृहीतकातून उपयुक्ततावादावर असलेल्या वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव दिसून येतो.

जॉन मिल यांनी उपयुक्ततावादाची नव्याने मांडणी केली. ही मांडणी इंग्लंडमधील बदलत्या स्वरूपातील भांडवलशाहीला पूरक होती. त्यांनी या तत्त्वज्ञानाला व्यक्तिस्वातंत्र्य, प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धती आणि कल्याणकारी राज्य याबाबतच्या विचारांची जोड दिली आणि एका नवीन राजकीय विचारसरणीचा पाया घातला. यामध्ये व्यक्तीचे स्वातंत्र्य केन्द्रस्थानी आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे दोन पैलू आहेत. एक वैयक्तिक म्हणजे केवळ स्वतःशी संबंधित व दुसरा सामाजिक म्हणजे इतरांशी संबंधित असलेला. स्वतःशी संबंध असलेल्या आचारविचारांमधे व्यक्तीला पूर्ण मोकळीक, संपूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. कारण व्यक्तीच्या या वागण्याचा इतरांवर परिणाम होत नसतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या या मुद्यामध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर विशेष भर दिलेला आहे, तसाच स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचाही जोरदार पुरस्कार केलेला आहे.

स्वत:शी संबंधित कृतीच्या संदर्भात व्यक्तीला पूर्ण मोकळीक देतांना सुखाच्या कल्पनेवर आधारित असलेल्या उपयुक्ततावादाची ही जॉन स्टुअर्ट मिल यांना नव्याने मांडणी करावी लागली. जास्तीत जास्त सुखाचा विचार करताना केवळ संख्यात्मक निकष लावून भागणार नाही तर त्याचबरोबर सुखाच्या गुणवत्तेचाही विचार करायला हवा. म्हणून सुखाला नैतिक निकष लावण्याची गरज आहे हे प्रथम मिल यांनी सांगितले. अशा तऱ्हेने नैतिक निकष लावून सरस ठरलेल्या अत्युच्च सुखाच्या शोधाचे आत्मशोधात परिवर्तन व्हायला पाहिजे.

व्यक्तीच्या इतरांशी संबंधित असलेल्या व इतरांवर परिणाम करणाऱ्या सामाजिक कृतींच्या संदर्भात शासनाच्या हस्तक्षेपाची गरज मिल यांनी ओळखली. तसे पाहिले तर मिल यांच्या व्यक्तिवादानुसार व्यक्तिजीवनामधे शासनाचा हस्तक्षेप व्यक्तीच्या विकासास बाधा ठरतो. परंतु इथे मिल यांचे आणखी एक तत्त्व कार्यरत होते. ते म्हणजे आर्थिक क्षेत्रातील कल्याणकारी कार्यक्रमाची संकल्पना. या संदर्भात मिल यांच्या मते शासनाने सामाजिक क्षेत्रांमधे हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

राजकीय क्षेत्रामधे मिल यांनी लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या शासनाचा पुरस्कार केला, परंतु ह्या प्रतिनिधींनी व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक करावी आणि लोकांना सदैव जबाबदार रहावे अशी रास्त अपेक्षा ठेवली. अशिक्षित अशा बहुसंख्य लोकांच्या हातात समाजाची सूत्रे जाणे किंवा शासनाची सत्ता जाणे धोक्याचे आहे, म्हणून सुशिक्षित व्यक्तींकडे ही सूत्रे व शासन सोपवायला हवे असेही मिल यांचे मत होते. मिल यांचे हे तत्त्वज्ञान भांडवलशाहीच्या बदलत्या समाजरचनेसाठी एक वैचारिक आधार ठरले. मिल यांना आधुनिक उदारमतवादाचे प्रणेते म्हणून गौरविण्यात येते.

मिल यांचे जीवनचरित्र

जॉन यांचा जन्म लंडनच्या पेण्टनव्हिल या विभागात 20 मे 1806 या दिवशी झाला. जॉन कधी शाळेत गेलेच नाहीत. त्यांचे सारे शिक्षण त्यांचे वडील व वडिलांचे दोन मित्र- उपयुक्ततावादाचे प्रणेते जेरेमी बेंथॅम आणि फ्रान्सिस प्लेस- यांच्या मदतीने घरीच झाले; परंतु अत्यंत कडक शिस्तीमधे. स्वत:च्या भावंडांखेरीज त्यांना इतर मुलांमधे कधीच मिसळू दिले गेले नाही. जेम्स मिल साहचर्यवादी (ॲसोसिएशनिझम) होते. एक प्रज्ञावन्त निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय होते. असा प्रज्ञावन्त जो उपयुक्ततावादाचा जोमाने पुरस्कार करील आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवील.

मिल यांच्या बुद्धीची अगदी लहान वयातच अफाट वाढ झाली होती. वयाच्या तिसऱ्या वर्षीच ते ग्रीक भाषा शिकले. व आठव्या वर्षापर्यंत त्यांचे इसापच्या गोष्टी, झेनोफोनचे ॲनॅबिस वाचून झालेले होते. ल्युसियस, डायोजेनिस, प्लेटो यांचे डायलॉग्ज इत्यादींशी ही त्यांची ओळख झालेली होती. तो पावेतो इतिहास व गणित याविषयांचाही त्यांचा बराच अभ्यास झालेला होता. या सुमाराला त्यांनी लॅटीन भाषा, यूक्लिडची भूमिती आणि बीजगणिताचा अभ्यास करायला सुरुवात केली. होरेस, व्हर्जिल, होमर इत्यादींचे सर्वसाधारणपणे कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी वाचतात ते वाङ्‌मय वाचले होते. दहाव्या वर्षापर्यंत ते प्लेटो आणि डेमोस्थेनीस सहजपणे वाचू शकत होते. याबरोबर त्यावेळच्या लोकप्रिय कादंबऱ्याही ते वाचीत असत. पुढे ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजसारख्या विश्वविद्यालयात जाण्यास त्यांनी नकार दिला, कारण अँग्लिकन चर्चच्या आज्ञेत राहणे त्यांना मान्य नव्हते. त्याऐवजी त्यांनी आपल्या वडिलांबरोबर ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी'मधे 1858 पर्यंत काम केले.

1818 साली जेम्स मिल यांचे भारताचा इतिहास (हिस्टरी ऑफ इंडिया) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर 12व्या वर्षी जॉन मिल यांचा तर्कशास्त्राचा सखोल अभ्यास सुरू झाला. पुढच्याच वर्षी त्यांची राजकीय अर्थशास्त्राशी ओळख करून देण्यात आली; आणि त्यांनी वडिलांबरोबर ॲडॅम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून जेम्स मिल यांचे ‘रिकार्डो यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्त्वे'(एलिमेंट्‌स ऑफ रिकार्डिमन इकॉनॉमिस) हे पुस्तक सिद्ध झाले.

आपल्या पित्याच्या या शैक्षणिक तालमीचे आपल्या आत्मचरित्रात जॉन स्टुअर्ट मिल वर्णन करतात: ही तालीम एक विचारवंत निर्माण करण्यासाठी अगदी योग्य होती. पण ही पद्धती राबवण्यासही माझ्या वडिलांसारख्या एका महान विचारवंताचीच गरज आहे. मी सर्व विषयांमधे खूप रस घेत असतानासुद्धा हा मार्ग जसा मला काट्याकुट्यांनी भरलेला वाटला तसाच तो त्यांच्यासाठीही होता. जिथे यशाची आशा करता येणार नाही अशा कठीण समस्यांमधेही मी अपयशी झालो तर ते खूप रागावत. सर्व समस्या मला स्वकष्टाने सोडवाव्या लागत व त्यानंतरच ते आपले स्पष्टीकरण देत असत. त्यामुळे तर्कशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र या दोन्ही विषयांचे मला अचूक ज्ञान तर मिळालेच पण या विषयांमधला मी एक विचारवंतही बनलो. एवढा की काही काळानंतर मी माझे मुद्दे त्यांच्यापुढे मांडून त्यांच्या मतांचे परिवर्तनसुद्धा करू शकलो. यातून त्यांचा निखळ प्रांजळपणा व त्यांच्या शिक्षणपद्धतीचे मूल्य दिसून येते.

या अथक बौद्धिक परिश्रमांचा परिणाम मिल यांच्या मेंदूवर झाला. आणि ऐन विशीमधे त्यांना मानसिक थकवा (नर्व्हस ब्रेकडाऊन) आला. या कठोर तालमीमध्ये आणि परिश्रमांमध्ये नैसर्गिक भावभावनांच्या जोपासनेला व अभिव्यक्तीला मोकळा अवसर मिळाला नव्हता. त्यावेळी त्यांना जीन फ्रँकोइस मारमाँटेल यांच्या आठवणी आणि विल्यम वड्‌सवर्थच्या कविता यांच्या वाचनातून दिलासा मिळाला, त्यांचा मानसिक थकवा नाहीसा झाला. तसेच ‘ऑन लिबर्टी'या पुस्तकात स्वत:च्या इतकाच आपली पत्नी हॅरियेट हिचाही बरोबरीचा वाटा आहे असे ते आत्मचरित्रात नमूद करतात.

जॉन मिल व हॅरियेट टेलर यांच्या संबंधांबद्दल लिहिणे आवश्यक आहे. हॅरियेट यांचे जॉन टेलर या व्यावसायिकाशी लग्न झालेले होते व त्यांचा संसार सुखाने चालला होता. परंतु श्री. टेलर यांची व्यवसायाव्यतिरिक्त इतरत्र फारशी बुद्धी चालत नसल्याने ते आपल्या पत्नीला बौद्धिक पातळीवर साहचर्य देण्यास असमर्थ होते. त्याउलट हॅरियेट ‘वेस्टमिन्स्टर रिव्ह्यू' या नियतकालिकात तत्त्वज्ञानविषयक लेखन करीत असे. त्या क्षेत्रांत उद्‌भवणाऱ्या समस्यांविषमी जॉन मिल हे योग्य मार्गदर्शन करू शकतील असे तिला तिच्या मित्रांनी सुचविले. त्या दोघांची 1830 मधे भेट झाली. त्यांची ओळख झाली तेव्हा हॅरियेटला दोन मुले होती. पुढच्या वर्षी ती आणखी एका मुलाची आई झाली. परंतु मिल व हॅरिमेट यांची मैत्री दृढ होत राहिली. ती दोघे लांबचे प्रवासही एकमेकांच्या बरोबर करू लागली. श्री. टेलर यांनीही या संबंधाबद्दल नाराजी व्यक्त केली नाही, परंतु लोकापवादाचा इशारा तेवढा दिला. त्याकाळी घटस्फोट मिळणे अशक्यच होते. 1849 साली टेलर यांचा मृत्यू झाल्यावर, म्हणजे ओळख झाल्यावर 21 वर्षांनी जॉन मिल व हॅरियेट यांनी लग्न केले. पण दुर्दैवाने अवघ्या सात वर्षांतच त्यांच्या सुखी संसाराचा हॅरियेटच्या निधनामुळे अंत झाला.

ऑन लिबर्टी या पुस्तकाबाबत थोडेसे

या दांपत्याच्या बौद्धिक प्रयासातून जन्मलेले ‘ऑन लिबर्टी' हे पुस्तक त्यानंतर 1959 मधे जॉन मिल यांच्या नावे प्रसिद्ध झाले. ते हॅरियेटला अर्पण करताना जॉन मिल यांनी तिची अफाट स्तुती केली आहे. इतर तत्त्ववेत्त्यांच्या पुढे जाऊन मिल यांनी (इतरांना होणारी)इजा हे तत्त्व (हार्म प्रिन्सिपल)जास्त विकसित केले. प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत त्याच्या वागण्याने इतरांना त्रास पोचत नाही तोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. आणि जो पावेतो त्या वागण्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरताच मर्यादित असतो तो पावेतो समाजाला (जरी त्याच्या वागण्याने ती व्यक्ती स्वत:चे नुकसान करीत असली तरी) त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. याला अपवाद फक्त जे स्वतःचे नियंत्रण करण्यास असमर्थ आहेत अशा लहान मुले आणि अतिमागास व्यक्तींचाच असू शकतो. समाजाच्या रूढी किंवा समाजाने मान्य केलेली नैतिकता यांच्या आड येणारे वर्तन या कारणावरून समाज व्यक्तीला रोखू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही या पुस्तकात जोरदार पुरस्कार केलेला आहे. बौद्धिक व सामाजिक विकासासाठी मोकळ्या वातावरणात वादविवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वादविवादातून आपण बरोबर आहोत का व चुकत असल्यास कुठे चुकतो हे प्रत्येकाला समजू शकेल. आपला समज खरा आहे एवढेच कळणे पुरेसे नाही तर तो का खरा मानायचा ह्याचाही ऊहापोह व्हायला पाहिजे.

‘ऑन लिबर्टी' प्रसिद्ध झाल्यानंतर

150 वर्षांनी व मिल यांच्या निधनानंतर 100 पेक्षा जास्त वर्षे उलटून गेल्यावर समाज आणि जग खूप बदलले आहे. मिल यांचा कल अनिमंत्रित वैयक्तिक नैतिकतेकडे झुकलेला होता.(या दृष्टिकोनाला बऱ्याच कायदेतज्ज्ञांकडून व इतरांकडूनही आक्षेप घेतला जातो.) पण आजचा उदारमतवाद थोडा वेगळा आहे. आधीच्या काळातील उदारमतवाद्यांना सामाजिक क्षेत्रांमधे शासनाचा कमीत कमी हस्तक्षेप असावा असे वाटे, परंतु नंतर अनेक सामाजिक क्षेत्रांमधे त्यांना शासनाने कायदे करणे आवश्यक वाटू लागले. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याला काही धोका उत्पन्न होईल अशी भीती वाटली नाही. आणि थोडे फार स्वातंत्र्य हिरावले गेले तरी असे कायदे आवश्यक वाटले. मिल यांच्या मते समाजाने व्यक्तीवर कोणतीही बळजबरी करू नये. केवळ अमली पदार्थाचे व्यसन, स्त्रिया व मुले यांच्यासाठी कामाचे तास अशांसारख्या गोष्टी शासनाने हाताळाव्यात. मिल यांचा रोष शासनाच्या जबरदस्ती आणि बळजबरीपेक्षा समाजाकडून व्यक्तीवर होणाऱ्या बळजबरीवर जास्त आहे. त्यांच्या काळी शासन आजच्या एवढे सर्वव्यापी व सर्वशक्तिशाली झालेले नव्हते. जॉन स्टुअर्ट मिल व्यक्तिवैशिष्ट्य आणि विक्षिप्तपणा यांच्यामधे गल्लत करतात असाही त्यांच्यावर आरोप केला जाई. अनैतिक वागण्याला अशा वागण्यामधे इतरांबाबतच्या कर्तव्यांमधे काही कुचराई नसली तरीही कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी असे अनेकांचे मत होते. मिल यांच्या मतांबाबत कितीही उलटसुलट ऊहापोह झाला असला तरी मिल यांनी मानवतेला दिलेला उदारमतवादाचा वारसा आजच्या काळात किती महत्त्वाचा आहे हे सर्वच जाणतात.

देशाला जर महान विचारवंत घडू द्यायचे असतील तर सत्याचा शोध घेणे आवश्यक आहे आणि त्या सत्यशोधनाचा परिणाम कितीही गंभीर असला तरीही त्यामध्ये कोणतीही आडकाठी येता कामा नये. मानसिक गुलामगिरीच्या वातावरणामधे काही लोक तग धरून राहू शकतील पण क्रियाशील माणसांना कधीच प्रोत्साहन मिळणार नाही. कोणतेही मत मांडायला मुभा असली पाहिजे. एखादे मत गैर अथवा चुकीचे असले तरी ते चुकीचे सिद्ध होण्यासाठी अचुक मताच्या बरोबरीने ते मांडले गेले पाहिजे, तरच ते का चुकीचे आहे हे समजेल. अन्यथा आपण कधीच तपासल्या न गेलेल्या श्रद्धासिद्धांतामधे अडकून पडू. व्यक्ती, समाज आणि विशेषतः आपल्या राजकारण्यांनी मिल यांच्या ‘ऑन लिबर्टी'चा अभ्यास करून त्यांची ही शिकवण वैयक्तिक व सामाजिक आचरणात आणली तर समाजाचे चित्र पार बदलेल.

जॉन स्टुअर्ट मिल यांनी अनेक विषयांवर आपले स्वतंत्र विचार मांडलेले आहेत. ‘ऑन लिबर्टी' व्यतिरिक्त त्यांचे इतर महत्त्वाचे व अत्यंत गाजलेले ग्रंथ असे आहेत: सिस्टिम ऑफ लॉजिक (1843)याची तुलना या क्षेत्रातील ॲरिस्टॉटलच्या ग्रंथाशी केली जाते; प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (1848) या ग्रंथात मिल यांनी आर्थिक तत्वे सामाजिक परिस्थितीला लागू केली आहेत; कन्सिडरेशन्स ऑन रिप्रेझेन्टेटिव्ह गव्हर्नमेन्ट (1861);युटिलिटेरियॅनिझम (1863); द सब्जेशन ऑफ विमेन (1869)आणि 1873 मध्ये मिल यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

उदारमतवादाप्रमाणे मिल यांनी दीड शतकापूर्वीच स्त्रीमुक्तीचा पुरस्कार केला होता. यामध्ये अर्थात त्यांची पत्नी हॅरियेट हिचा बराच प्रभाव होता. वांशिक समानतेचे समर्थन, तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत कळकळीने प्रतिपादन करणे ह्याही गोष्टी मिल यांनी दीडशे वर्षांपूर्वीच उजेडात आणल्या होत्या. त्यांच्याकडे वेळीच लक्ष न देण्याचे परिणाम आपण आज भोगतो आहोत. जागतिक लोकसंख्येची वाढ, अवाढव्य शासन व्यवस्था, प्रचंड व्यापार-उद्योग आणि एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राच्या कारभारात लुडबूड किंवा आंतरराष्ट्रीय बाबतींमधे बळाचा वापर इत्यादींबाबतचे मिल यांनी इतक्या जुन्या काळी व्यक्त केलेले विचार आजच्या काळातही किती समर्पक आहेत हे पाहून आश्चर्य वाटते. विषय ‘शून्य विकासाचे अर्थशास्त्र' (नो ग्रोथ इकॉनॉमिस)असो किंवा ‘मानववादी धर्म' (ह्युमनिस्ट रिलिजन)असो, मिल यांनी त्याबाबत इतर विचारवंतांच्या कैक वर्षे अगोदर चिंतन केलेले आहे असे दिसते.

Tags: भारताचा इतिहास उपयुक्ततावाद सुमन ओक ऑन लिबर्टी हॅरियेट मिल जॉन मिल suman oak on liberty john mill weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुमन ओक
sumanoak@hotmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके