डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरं म्हणजे, एसडींचा जन्म राजघराण्यातला. जन्मभर ते संपत्तीत लोळत राहू शकले असते, पण कोवळ्या वयातच त्यांनी संगीताचं व्रत घेतलं आणि ते अशा प्राणपणाने जोपासलं की, संगीताच्या दुनियेत त्यांचं नाव लखलखीतपणे उजळत राहिलं. त्यांचे अंध गुरू केश्तोबाबू यांचे खास गुण त्यांनी अचूक उचलले. बंगालचे ‘बाऊल’ गायक आणि तिथल्या नावाड्यांच्या ‘भाटियाली’ रचना त्यांच्या गीतांतून अभिनव रूपांत प्रगटत राहिल्या. प्रत्येक वाद्य नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे हे त्यांना कोवळ्या वयातच उमगलं. आणि मग केवळ सतार अन्‌ व्हायोलीन नव्हे, तर कंगवा आणि चहाची किटली यांच्याही आगळ्या ध्वनीने त्यांच्या संगीतात बहार आणली!

एखाद्या संगीतकाराच्या चरित्रात प्रामुख्याने वाचण्यासारखं काय असतं? अर्थातच, त्याचं गीत आणि संगीत. पण ते तर ऐकायचं असतं. एस. डी. बर्मन यांचं कर्तृत्व असं अद्‌भुत आहे की, ‘सुन मेरे बंधु रे’ यासारख्या त्यांच्या सुमधुर गीतांचे पहिले शब्द समोर येताच ती गीतं आपल्या कानात निनादू लागतात! ‘सुन मेरे बंधु रे’ या नावाने बर्मनदांचं चरित्र रोहन प्रकाशनतर्फे नुकतंच प्रसिद्ध झालं आहे, ते वाचताना याचाच प्रत्यय येतो. एस. डी. बर्मन यांच्या ठायी असलेली अफाट कर्तबगारी, प्रचंड लोकप्रियता आणि अद्वितीय प्रतिभा उगाच कोणालाही जाता-जाता मिळत नाही. त्यासाठी आयुष्य पणाला लावावं लागतं. या पुस्तकाला अतिशय उत्कृष्ट प्रस्तावना लिहिणाऱ्या अमरेंद्र धनेश्वरांनी असं नमूद केलंय की, ‘‘एस.डीं.च्या काही समकालीन संगीतकारांची कारकीर्द दहा-पंधरा वर्षांची होती, तर एसडींची तीन दशकांची! आणि त्यांच्या मृत्यूला 40 वर्षे होऊन गेली असली तरी ‘नजर लागी राजा’सारखी त्यांची सदाबहार गीतं आजही सर्वांना आकर्षित करताहेत...’’

खरं म्हणजे, एसडींचा जन्म राजघराण्यातला. जन्मभर ते संपत्तीत लोळत राहू शकले असते, पण कोवळ्या वयातच त्यांनी संगीताचं व्रत घेतलं आणि ते अशा प्राणपणाने जोपासलं की, संगीताच्या दुनियेत त्यांचं नाव लखलखीतपणे उजळत राहिलं. त्यांचे अंध गुरू केश्तोबाबू यांचे खास गुण त्यांनी अचूक उचलले. बंगालचे ‘बाऊल’ गायक आणि तिथल्या नावाड्यांच्या ‘भाटियाली’ रचना त्यांच्या गीतांतून अभिनव रूपांत प्रगटत राहिल्या. प्रत्येक वाद्य नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे हे त्यांना कोवळ्या वयातच उमगलं. आणि मग केवळ सतार अन्‌ व्हायोलीन नव्हे, तर कंगवा आणि चहाची किटली यांच्याही आगळ्या ध्वनीने त्यांच्या संगीतात बहार आणली! त्यांच्या रचनांमध्ये अजिबात बाजारू वृत्ती नाही, किंचितही उथळपणा नाही आणि बदलत्या काळासोबत बेताल, भडक बहकणं नाही... जणू ‘बासरीच्या लहरीवर तरंगत जाणारं’ त्यांचं गीत देशभरच्या उदंड जनमानसानं हृदयाशी जपलं.

‘है अपना दिल’, ‘ये महलों, ये तख्तों’, ‘मेरा सुंदर सपना’, ‘वक्तने किया’, ‘पूछो ना कैसे’, ‘दिवाना, मस्ताना हुआ दिल’, ‘अपनी तो हर आह’, ‘अच्छा जी मै हारी’... अशी त्यांची अविस्मरणीय गीतं वारंवार ऐकावीशी वाटतात ती त्यांच्या सकस गोडव्यामुळे. ‘भावभावनांचा भव्य पट कसा उभा केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ’ त्यांच्या रचनांमधून मिळतो, असं धनेश्वरांनी लिहिलंय; तर या चरित्राच्या आरंभी एसडींना मानवंदना देताना अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय की, ‘संगीताबद्दल त्यांना कमालीची आसक्ती होती आणि संगीतावर त्यांनी अगदी हृदयापासून प्रेम केलं.’ या साऱ्याचा परोपरीने प्रत्यय हे सुंदर पुस्तक देतं. त्यांच्यातला गायक एचएमव्ही कंपनीने आरंभी नाकारला; पण ‘आत्म्याची पुकार’ घेऊनच कंठातून बाहेर पडणारा त्यांचा आवाज अखेर साऱ्या देशाने आपलासा केला आणि ‘वहाँ कौन है तेरा’, ‘सुन मेरे बंधु रे’, ‘ओ रे मांझी’ अशी त्यांच्या अनुनासिक आवाजातली गीतंही अधिकाधिक लोकप्रिय ठरली.

कारकिर्दीच्या आरंभी आपल्या पहिल्या गीताचं दहा रुपये मानधन स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते; आणि आयुष्याच्या अखेरीस कृतार्थतेने आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांचं ऋण मान्य करताना ते म्हणाले होते, ‘‘आज ये लोग हैं, तो मैं हूँ. मैं हू तो ये लोग है.’’ अशाच साध्या-सोप्या भाषेतला त्यांचा आणखी एक   रांगडा संवाद मुद्दाम वाचण्याजोगा आहे. सुऱ्हिद नावाच्या एका हार्मोनियमवादकासोबत त्यांची तालीम सुरू असताना एसडींनी त्याला हटकलं, ‘‘सुऱ्हिद, तुम्हारा ‘मा’ कहां है?’’ सुऱ्हिद बावचळून म्हणाला, ‘‘मा तो कोलकाता में है...’’ यावर एसडी उद्‌गारले, ‘‘हट्‌. हार्मोनियम में ‘मा’ कहां है, वो मैं पूछ रहा हूँ. संगीतरचनेमधला ‘मा’ तू विसरलास का? तुझ्या वाद्यात ‘मध्यम’ कुठे लागतो?’’ गोंधळून गेलेला सुऱ्हिद हार्मोनियमवर ठेवलेल्या आपल्या बोटांकडे पाहतो. एसडी : सुऱ्हिद, तुम्हारा ‘मा’ कहाँ है? वो कहाँ जा रहा है? शुद्ध आहे की तीव्र? ‘मा’ कुठे गेला? सुऱ्हिद बर्मनदांकडे पाहतो, आपल्या कानांना हात लावून ‘माफ करा’ असा संकेत देतो. एसडी बर्मन एक मंद स्मित करतात आणि सुऱ्हिद पुन्हा काळजीपूर्वक धून वाजवू लागतो... या साध्याशा प्रसंगातून प्रगटलेली एसडींची अस्सल संगीतमयता रसिकाच्या काळजाला भिडल्याखेरीज राहत नाही.

सबंध पुस्तकभर त्यांच्या सुरांचे नाद जणू अद्‌भुत आविष्कार करत राहतात.

लेखिकेने कधी स्वत:च्या निवेदनातून, कधी नाट्यमय संवादांतून, कधी कल्पनाचित्रं रेखाटून, कधी मुलाखतींतून, तर कधी एसडींच्या आत्मचरित्रातील उताऱ्यांतून एक जितंजागतं आयुष्य असं काही उभं केलं आहे की; त्यातल्या ताण्याबाण्यांतूनही संवेदनशील एसडींच्या सुकोमल, सदाबहार गीतांची नजाकत रसिकाच्या मनावर अमीट ठसा उमटवून जाते. एकेका गीताची गंभीर आणि गमतीदार निर्मितीकथा... कलेमागे दडलेले कटू व्यवहार... जोडलेली आणि तुटलेली नाती... यांच्या अशा कहाण्या या चरित्राच्या पानापानांवर उमटल्या आहेत की, त्या सगळ्यातून एक अविस्मरणीय आयुष्य रसिकाला झपाटून टाकतं. ‘बाह्य व आंतरिक जीवनातील विलक्षण घटनांचा हा मोंटाज’ नक्षीदार चित्रविचित्र कहाण्यांचे असे अनोखे आकृतिबंध उभे करतो की, रसिक अक्षरश: अवाक्‌ होतो! उदाहरणार्थ- साहिर लुधियानवी यांची सुरेख गीतं एसडींना हवीहवीशी वाटत, पण कोणत्याही गीताच्या यशात संगीतकारापेक्षा गीतकाराचं श्रेय अधिक मोठं असतं, असा हेका साहिरने धरला आणि त्यामुळे आपल्याला संगीतकारापेक्षा एक रुपया अधिक मानधन मिळायला हवं अशी दुराग्रही भूमिका घेतली; त्या क्षणी एसडींचं साहिरबरोबरचं नातं कायमचं तुटलं!

...लता मंगेशकर यांच्याबरोबरच्या अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर एकदा एसडींनी आपणहून त्यांना विचारलं, ‘माझ्यासाठी किती तारखा देशील?’ तेव्हा लताबाईंनी मुक्तकंठाने प्रतिसाद दिला, ‘तुम्ही मागाल तेवढ्या देईन!’... एसडींचा मुलगा आरडी संगीतकार म्हणून नाव मिळवू लागला, तेव्हा तो वडिलांवरच कुरघोड्या करू लागला! एकदा तो वडिलांच्या सहायकाचा पूर्ण ताफा घेऊन मद्रासला पळून गेला, तेव्हा मागे उरलेल्या दोन मदतनीसांच्या सहकार्याने एसडींनी हातातलं काम तडीस नेलं! ...अंगी मोठेपण येण्यासाठी माणसाला बऱ्या-वाईटाची परीक्षा कशी द्यावी लागते, याची ही नमुनेदार उदाहरणं आहेत. पण या सगळ्या आनुषंगिक हकिगती झाल्या. त्यातून एसडींची ‘फकिरी आणि बेफिकिरी’ तर उमगतेच; पण त्याहीपलीकडचा त्यांच्या सुरांमधला स्वत्वाचा अंत:प्रवाह या जीवनकहाणीतून सतत धावताना जाणवतो, तो अत्यंत हृद्य आहे.

त्यांची पत्नी मीरा ही त्यांची पूर्वाश्रमीची शिष्या. ती उत्तम गायिका होती, तरी तिला चित्रपटात पार्श्वगायनाची संधी एसडींकडून मिळाली नाही. पण आयुष्याच्या उत्तरार्धात तिने काही बंगाली गीतं लिहिली, आणि ती एसडींच्या आवाजात गाऊन घेतली, तेव्हा बंगालमध्ये त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली! ‘अभिमान’ या संगीतमय कथानकाच्या चित्रपटाचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला, तेव्हा ते तत्काळ उद्‌गारले, ‘ऐसा मीठा मैं कभी नहीं छोडूंगा!’ अशा असंख्य अंतर्बाह्य नोंदींमधून एक अशक्यप्राय उंची या चरित्राने गाठली आहे, त्याचं मुख्य श्रेय मूळ लेखिका सत्या सरन यांचं. भारतातल्या इंग्रजी साहित्यविश्वात त्यांचा लौकिक आहे आणि त्याची साक्ष हे पुस्तक पटवतं. मिलिंद चंपानेरकर यांचा अनुवाद कसदार आहे आणि रोहन प्रकाशनाची निर्मितिमूल्यंही अप्रतिम आहेत. तेव्हा रसिकांनी अवश्य आस्वाद घ्यायला हवा, अशी ही खास जीवनगाथा आहे यात शंका नाही.


सुन मेरे बंधु रे

मूळ लेखिका : सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर 
रोहन प्रकाशन, पुणे 
किंमत : 300 रुपये (सवलतीत 250 रुपये)
    

Tags: सुनील कर्णिक सत्या सरन मिलिंद चंपानेरकर एस डी बर्मन रोहन प्रकाशन पुस्तक book review sun mere bandhu re Milind champanerkar satya saran rohan publication s d burman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके